Tuesday 7 October 2014

।।ओम हृषाय नम:।।

हा डाॅ. हृषीकेश कुलकर्णी, म्हणजे जगभर त्याला आता या नावाने ओळखत असावेत. पण बी जे त ल्या कुणाला तुम्ही विचारलं, या नावाचं कुणी माहित आहे का, तर मोठं प्रश्नचिन्ह दिसेल. त्यांची बायको प्रज्ञा ही बीजेचीच आहे, पण ती सुद्धा सटपटेल दोन सेकंद.

 तेव्हा हा हृष्या, माझ्या बायकोचा, वैभवीचा जवळचा मित्र. (बीजे मधील सगळेच लोकं एकमेकांचे जवळचे मित्र असतात).

एका कार्यक्रमात मी हृष्याची वाट पाहत होतो, म्हणजे तो त्याच्या मित्राशी (अर्थातच जवळच्या) बोलत होता. मी नेहमीप्रमाणे भोचकपणे त्यांचं बोलणं ऐकत होतो.

हृ: कसा आहेस?
मि: मस्त मजेत.
हृ: कुठं रहायला
मि: अरे, पौड रोड वर ते हाॅस्पिटल आहे ना, त्याच्या बाजूला मंदिर आहे...........
हृ: (मधेेच) अरे, असा मंदिरात का राहतोस, फ्लॅट वैगेरे घ्यायचा ना
मग दोघांच्याही खळखळून हसून एकमेकांना टाळ्या. "तु यार बिलकुल बदलला नाही" वैगेरे (बीजे च्या डाॅक्टर्स चं हे एक वैशिष्ट्य, ते कितीही म्हातारे झाले तरी बदलत नाही)

जर्मनीत जायचं हे ठरल्यापासून वैभवी म्हणत होती, हृष्या कुठे आहे ते बघ. मला वाटत होतं, तो म्युनिकला आहे. तर तो Bad Homburg म्हणजे मी जिथं होतो, तिथून ३० किमी वर. येतो़ म्हणाला भेटायला ४ वाजता. म्हंटलं ये मजा येईल.

४:३० वाजता आला. मग sorry, उशीर झाला वैगेरे. वेळेचं अन माझं फार काही सख्य नसल्यामुळे मला काही फार वाईट नाही वाटलं, किंवा रागही नाही आला. खरंतर मनातून बरंच वाटलं. प्रज्ञा, त्याची बायकोपण आली होती. (ती लग्नाआधी त्याची मैत्रीण होती, अर्थातच जवळची. हे शेवटचं. ती बहुतेक अजूनही त्याची मैत्रीणच आहे, असं वाटलं. ती हृष्या ला अजूनही हृष्याच म्हणते. हृष किंवा नुसतं हृ नाही).

गप्पा चालू झाल्या. पुण्याचे हालहवाल विचारले. (खरंतर हालंच). वैभवी अन पोरांची चौकशी झाली. मग तो म्हणाला "तुझी हरकत नसेल तर जेवायला जाऊ यात जवळंच" आता हे काय विचारणं झालं. आम्ही तिघं रेस्टाॅरंट कडे चालू लागलो.

आणि मग हृष्याने तो प्रश्न विचारला "हे स्पिंडल म्हणजे काय असतं बुवा" यातून एक अर्थ असा निघतो की असा कुठला दिव्य item आहे की धंदा करून तुला फेसबुकवर लिहायला वेळ मिळतो. पण मी वाईट विचार झटकले.असा चान्स कोण सोडणार? ही डाॅक्टर मंडळी अगम्य शब्दात आपल्यासमोर मेडिसीन या विषयाबद्दल बोलत असतात. काहीच कळत नसतं. त्याचा राग मनात होताच. खरंतर एखादा डाॅक्टर यांत्रिकी विषयाबद्दल आत्मीयतेने बोलतो हे मुळात संघातल्या माणसाने गांधीजीबद्दल आदराने बोलण्याइतकं दुर्मिळ आहे. (जर्मनीत बसून लिहीत असल्यामुळे हिटलर-ज्यू, किंवा ओबामा-पुतिन अशा आंतरराष्ट्रीय उपमा सुचत होत्या. पण मेरा भारत महान आणि परत निवडणुका) पण मग spindle बद्दल सांगून त्याला पकवून टाकलं.

बोलता बोलता हाॅटेल आलं. (रेस्टाॅरंट लिहीलं की आधी उडपी लिहीलं आहे असंच वाटत राहतं). साग्रसंगीत जेवण झालं. बिलही आलं (हे कशाला). ते आल्याबरोबर माझ्या डोळ्यासमोर गुणीले ८४ करून आँकड़ा नाचू लागला. भारतात मी बिल देण्याचा अभिनय तरी करतो. इथं तोही प्रयत्न केला नाही. उगाच हृष्याची परीक्षा कशाला? (खरंतर हे विधान अमेरिकेत गुणीले ६० किंवा तैवान मधे गुणीले ३ असं निर्लज्जासारखं लिहू शकतो).

परत येताना प्रज्ञाने, हृष्या माझ्या लिखाणाचा fan आहे असं सांगितलं होतं. परत हृष्याने पण त्याबद्दल एकदोन स्तुतिपर वाक्य बोलून मला कुरवाळलं होतं. मग दुसर्या दिवशी WhatsApp वर हा फोटो पाठवला. खरंतर हा तो फेसबुकवर टाकू शकत होता. पण माझ्या लक्षात आलं आधी कुरवाळून हा फोटो पाठवणे म्हणजे छू: म्हणण्यासारखं आहे. मी हृष्याला मनोमन दाद देत कुईकुई करत हा लेख पुर्ण केला.

।।ओम हृषाय नम:।।


No comments:

Post a Comment