Sunday 12 October 2014

अ........अभियंत्याचा २

साधारण ९२-९३ च्या सुमारास माझ्या डोक्यात धंदा करण्याचा किडा वळवळू लागला. (विचार मनात आला अन लौकिकार्थाने बरं घडलं तर किडा डोक्यात वळवळला असं म्हणतात अन कलमडला की तोच किडा..........) घडामोडी अशा घडल्या की ९३ च्या सुमारास hobby business म्हणून spindle repair करण्याचं चालू केलं. फुलटाईम धंदा करण्याची डेअरिंग नव्हती. मी विचार केला की अशी नोकरी शोधावी की वेळेचं बंधन नसावं, पण थोडा पगारपाणी व्यवस्थित असावा. हे म्हणजे बायको म्हणून माधुरी पाहिजे (दिक्षीतांची हो, जास्त लिहीलं का जरा) पण स्वयंपाक निपुण पण असावी. आणि सापडली, माधुरी सापडली, म्हणजे नोकरी.  Resident engineer हा concept नवीन होता. पाच ठिकाणी अर्ज केले. Rollon Hydraulics नावाच्या कंपनीने मला वरलं. MD संजीव शहा म्हणाला "तुझा धंदा वैगेरे आहे ठीक आहे, पण तुझ्या कामासाठी कंपनीचं काम नाही झालं असं ऐकलं तर बाहेर जावं लागेल" मी "कबूल" बोललो. २००० हेडकाउंट आणि ३०० कोटी  turnover असलेल्या multinational SKF मधून एका रात्रीत start up venture आणि ५ लोकं असलेल्या बनियाच्या देशी कंपनीत मी रूजु झालो. १ सप्टेंबर १९९४. शप्पथ सांगतो १ महिना आई वडिल बोलत नव्हते माझ्याशी. जणू काही inter caste marriage केलं आहे मी. (ते खरंतर मी केलं होतं १९९१ ला तेव्हा ठीकठाक होते). पण मी बधलो नाही. वैभवीचा पुर्ण पाठिंबा. (असावा, असं वाटतंय)

कंपनी बंगलोरला, मी पुण्यात. प्रोडक्शन सोडून सेल्स मधे उडी. सगळी उलथापालथ नुसती. 

डायरेक्ट बाॅस बोनी पाॅल, मल्लू. अन अजून चार लोकं. वेंकट, गणेश, विजया आणि मुर्ती. कोणाला हिंदीचा गंध नाही, माझी अगाध इंग्रजी. हळू हळू बस्तान बसवायला चालू केलं. माझा सेल्स एरिया महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश. कंपनी नवीन, प्रोडक्ट नवीन. Busak+Shamban hydraulic seals. भारतातल्या प्रचलित seals पेक्षा चौपट किमती. पण MD संजीवला विश्वास प्रोडक्टवर आणि बोनीवरही. मी पण पुण्यात गरागरा फिरू लागलो. पहिले दोन वर्ष M 80, मग हिरो होंडा अन शेवटची दोन वर्षं सँट्रो. प्रतिदिन दिवसाला ९०-१०० किमी. आणि त्या बरोबर इतर शहरातही. इंडियन रेल्वेजची नाळ जुळली ती इथे. दिवस सरू लागले, कंपनी establish होऊ लागली. पहिल्या दोन तीन वर्षात तास न तास reception मधे बसून ठेवणारे कस्टमर्स आता फोन करून बोलावू लागले. अहमदाबाद, वडोदरा, सुरत, इंदोर, गोवा, बंगलोर, नागपुर, नाशिक अशी तूफ़ानी भ्रमंती होवु लागली. रेल्वे माझं दुसरं घर झालं. एका वेळेस ८-९ तिकीटं काढायचो. रविवार पेठ आरक्षण केंद्राचा बुकींग क्लर्क मित्र झाला होता. अहमदाबादचं हाॅटेल अॅपेक्स, बडोद्याचं अमिटी ही  हाॅटेलं म्हणजे माझे पत्ते झाले. सगळीकडचे माझे टॅक्सीवाले, रिक्षावाले दोस्त बनले. अहमदाबादच्या गोवर्धनकाकांनी तर नंतर आई बाबांना सौराष्ट्र ची ट्रीप त्यांच्या ambassador मधून करवुन आणली. 
Injection moulding machines, hydraulic cylinders, steel mills हे manufacturers करत automobile manufacturing असा कस्टमर बेस वाढत गेला. 

SKF प्रमाणेच इथलेही अनंत क़िस्से आहेत. मी एकटाच पुण्यात असल्यामुळे working colleague नव्हतेच. पण माझे कस्टमर्स माझे मित्र बनत गेले. स्वत: बोनी आणि दिल्लीचा रेसिडेंट इंजिनियर बन्सी हे जीवाभावाचे मित्र झाले. आजही महिन्यातून एकदा तरी आमचा फोन होतोच. न्यू हायड्रो चा मोहन चोळकर, फास्टोचे उदय मराठे, विंडसरचे अनेक इंजिनियर्स यांच्याशी दोस्ती होत गेली. फास्टोचे MD सुमंत सर तर मला लहान भाऊच म्हणायचे. त्यांना ड्रिंक्सचा जबरी शौक होता. मी आलो की, घरी फोन करून सांगायचे राजेश आला आहे अन मला म्हणायचे, तुझं नाव सांगितलं की बायकोला माहित असतं, नवरा चांगल्या संगतीत आहे. कॅटइंजिनियरिंगचे पालेकर. त्यांच्या पत्नि, सविता वहिनी चहा नाश्ता करायच्या.तुम्ही म्हणाल त्यात काय एवढं. अहो या सविता (की सरिता) पालेकर म्हणजे सचिन तेंडुलकरच्या सख्ख्या भगिनी. मला हे त्यांच्याशी ओळख झाल्यावर बरेच दिवसांनी कळलं. सुहास पालेकरांचं अन माझं फार काही जमलं नाही. अन्यथा सचिनला एकदा दर्शन दिलंच असतं माझं. एकदा गोवा हायड्राॅलिक्स मधून फोन आला एका application संदर्भात. परिकर म्हणून होते. तेच आजचे गोव्याचे मुख्यमंत्री. एक ना अनेक. मी या कंपनीत पहिला मोबाईल कसा घेतला हा एक क़िस्सा आहे. 

इकडे कंपनीत ही बरंच चाललं म्हणायचं. इंजिनियर म्हणून stepping stone नोकरीला वापर करून २-३ वर्षात बाय करायच्या विचारात असणारा मी ६ वर्ष झाली तरी हलायचं नाव घेत नव्हतो. Sales, Marketing या functions ची चांगलीच ओळख झाली. Foreigners येत जात असल्यामुळे आणि बोनीमुळे इंग्रजी बोलण्याचा सराव झाला. आता मी hydraulic seals चं ट्रेनिंग द्यायला भारतात जाऊ लागलो. संजीव अन बोनीचं इंग्रजी ड्राफ्टींग उच्च दर्जाचं होतं. दररोजच्या official कामात मी involved नसलो तरी त्यांची official letters माझ्यापर्यंत यायची अन मी ती बारकाईनं वाचायचो. ७०० स्क्वेअर फुटच्या डिकन्सन रोडच्या छोट्या आॅफीसपासून सुरू केलेला प्रवास आता ५५०० sqft चं जयनगर चं अलिशान आॅफीस अन २५००० sqft ची बनरगट्टा रोडचं mfg unit पाशी आला होता. आणि त्या सगळ्यांचा मी साक्षीदार होतो. 

१ आॅगस्ट २००२ ला नोकरीचा राजीनामा दिला. संजीव अन बोनीला सांगितलं की आता spindle repair चा छोटासा का होईना, स्वत:चा बिझीनेस pursue करतो.  पण नंतरच्या माझ्या स्वत:च्या बिझिनेसमधे स्थिर स्थावर होण्यात रोलाॅनच्या ८ वर्षाच्या नोकरीचा सिंहाचा वाटा हे निसंशय. ते पण पक्के व्यावसायिक होते. साल्यांनी ८ वर्षात विचारलं नव्हतं, काय म्हणतोय बिझीनेस. २५ सप्टेंबरला बंगलोरला निरोपसमारंभ झाला. संजीव म्हणाला "I was risking by hiring Rajesh as resident engineer which was relatively new concept then. But I am happy that he proved, my decision was not wrong." मला पण बोलायला सांगितलं. 

सालं कुणाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करताना माझा घसा का दाटून येतो़ हे एक न उलगडलेलं कोडं आहे. बोनीने माझ्या पाटीवर थोपटलं. सगळ्यांशी हस्तांदोलन करून मी निरोप घेतला............मुकपणे

No comments:

Post a Comment