Saturday, 18 October 2014

आजी अन तिचे नातू

२०११ च्या जुलैला मी केसरीबरोबर अमेरिकेची ट्रीप केली.   My fair lady. सगळ्या बायका, साधारण माझ्याच वयाच्या. काहीतरी ८० च्या पण. पहिल्या दिवशीच आमची घट्ट मैत्री झाली. दुसर्या दिवसापासून गप्पांच्या मैफिली सजू लागल्या. बर्याच जणी नोकरी करणार्या, काही उद्योजिका तर काहींना रीतसर पेंशनर. मला विचारलं "तुम्ही काय करता?" मी तर आयुष्यभर चुल अन मुल केलं. ह्यांची आई ते चार वर्षाचे असताना गेली, घरात बाईमाणूस नाही. मग मीच ओढ़ला गाड़ा. "पण, मग आता काय करता?" "आता, मी नातवांमधे रमते, गेली कित्येक वर्षं." माझ्या तोंडून चटकन निघून गेलं. मग त्यांचं चालू झालं "सरळ पाळणाघरात ठेवायचं वैगेरे, वैगेरे". मला तर ते काही पटलं नाही. पैश्यांचं सोडा हो, पण आजीचे प्रेम, त्यांना आवडेल ते खाऊ घालणे, वेळेवर दुध देणे ही कामं माझ्याव्यतिरिक्त दुसरं कुणी व्यवस्थित करू शकेल यावरच मुळी माझा विश्वास नव्हता.

नातवंडं जेव्हा मांडीवरून रांगायला अन मग हळूहळू पाऊल टाकायला लागतात तेव्हा आजीबाई ला होणारा आनंद शब्दात नाही सांगता येणार. मुले वर्षात कशी मोठी होतात ते कळतच नाही. त्यांचे बोबडे बोलणे, आई बाबा आॅफीसला निघाल्यावर निरागसपणे टाटा करणे (त्या छोट्यांच्या मनात काय घालमेल चालू असेल याचा विचार केला तर आपल्यालाच थोड़े वाईट वाटते).

अरे हो, एक सांगायचंच राहिलं, माझी मोठी सुन, वैभवी, डाॅक्टर, तिची स्वत:ची पॅथ लॅब अन धाकटी अर्चना, इलेक्ट्रानिक इंजिनियर, MSEB त.

तर सांगत होते, की मोठा नातू यश, ३ वर्षाचा झाला, चुरचुर गोड़ बोलू लागला. (आता वय १९. आता जणू त्याचं बोलणंच आटलंय). एकदा त्यांच्या आईला घरी यायला उशीर झाला. तेव्हा म्हणाला, "आजी, आता माझी मम्मी येईपर्यंत तुच माझी मम्मी. आणि मग ती आल्यावर तु परत आजी. चालेल?" तो इतका निरागसपणे म्हणाला की मला अतीव समाधान वाटले. त्या रात्री माझ्या वजनात २ पौंडाची भर पडली. या अशाच सतत भर पडण्यामुळे मी जाड झाली आहे. (कसलं भारी कारण).

दुसरा नातू, अभिषेक, जन्मत:चं एकदम गुटगुटीत. त्याची आई संध्याकाळी साडेसहाला घरी यायची. तोपर्यंत आम्ही तयार होऊन खाली फिरायचो. आजूबाजुच्या बायका म्हणत "आजीला नातू शोभतो" माझे ताबडतोब उत्तर "आजीला दृष्ट नाही लागणार, पण माझ्या गोड़ नातवाला लागेल." त्याच्या काकाने प्रथमच कार घेतली. त्या रंगाची कार दिसली, की "चल त्या कारमधे जाऊ या" म्हणून तिथेच अडायचा. आता दहावीचा आहे तो. अभ्यासात मग्न आहे.

यश ९ वर्षाचा झाल्यावर मला तिसरा नातू झाला. खरंतर मला मुलगी नाही, आणि पहिले दोन नातू. मला वाटलं की आता नात होणार. पण झाला तो नील, अतिशय गोड. हे मुलं खेळतच मोठं झालं. त्याचं अंगाखांद्यावर खेळणं, त्याच्या बरोबर हाॅलमधे खेळणं ही म्हणजे माझ्यासाठी करमणूक. सारखी बडबड, आणि बरीच लाॅजिकलही. आता तो दहा वर्षाचा आहे, पण घरात तो चालतो म्हणजे फ़ुटबॉल बरोबर पळतो.

ह्या तीन नातवंडांच्या सहवासात मला tv चे वेड लागले नाही (मी अजिबात tv बघत नाही). त्यांच्या सहवासात कसा वेळ गेला हे कळलंही नाही अन अजून कळतही नाही. कधीकाळी नोकरी केली नाही याची खंत वाटायची, आता तीही वाटत नाही. आजही राजेश अाणि यशने ठरवलं की दोघांचं दररोजचं ३८ किमी फिरणं कमी होण्यासाठी नांदेड सिटीत छोट्या फ्लॅटमधे रहायचं. पाळणाघरासारखी परत माझ्या मनाने उचल खाल्ली अन मी त्यांच्या दिमतीला येऊन राहते आहे. आणि यात मला एक प्रकारचे आत्मिक समाधान लाभते आहे. (नाही म्हणायला नील पासून लांब राहते त्यांची खंत वाटते, पण ठीक आहे)

या पोरांचे आईबाप, पोरांचं जीवन मार्गी लागावं म्हणून हाय वे बांधताहेत. त्यावरून ही पोरंाच्या पायाला चाकं लागून ती भरधाव जातीलही. कुणाच्या पंखात इतके बळ येईन, की ती हवेतून उडतीलही. उडावंही त्यांनी, माझे आशिर्वाद आहेत त्यांना. पण या मोरपंखी आठवणींची साठवण मात्र माझ्याजवळंच राहीन. ती कुपी या आजीच्या पदरात बंदिस्त असेल.

नातूही खुश अन आजीही.............

"घरात असता हासरे तारे, मी पाहू कशाला नभाकडे"

कुमुद मंडलिक 

No comments:

Post a Comment