Friday 10 October 2014

ते आणि आपण

आता हा फोटो पहा. तुम्ही म्हणाल की काय हा येड्यासारखे विचित्र फोटो लावतोय. इतकं फोटोजेनिक आहे जर्मनी. पण मी काय बोलतो याच एकदा. मी इथल्या डोंगराचे, बागांचे, तळ्याचे फोटो लावले तर मजा नाही येणार. तुम्ही स्वत:च अनुभवा, इथल्या वीजेचा कल्पक वापर, स्वच्छता, अत्याधुनिक तरीही निसर्गाच्या बरोबर. युरोप अनुभवावाच. नाही म्हणजे सिंगापूर,चीन, थायलंड, हे पण चकाचक देश पण युरोपची अकृत्रिमता नाही तिथे. एखाद्या घरी पाहुणे यायचे म्हंटले की आवराआवरी होते आणि एखादं घर कधीही जा स्वच्छंच, हाच फरक. रस्त्यावर झाडाचा पालापाचोळा असतो, तो कुणीही साफ नाही करत, पण प्लास्टीकची पिशवी शोधून सापडणार नाही रस्त्यावर. कोकच्या बाॅटल्स, बियर कॅन्स कचरापेटीत, दररोज सकाळी ५ वाजता साफ होणार्या. माझा एक मित्र आहे पुण्यात. कारमधे बसून बियर प्यायची फार हौस. प्या हो, पण कुणी बघत नाही आहे हे बघून बियर कॅन रस्त्यावर कुठेही फेकणार आणि दुसर्या दिवशी शहाणपणा रामटावत  पुणं किती घाण आहे ते बोलणार. (मुख्य म्हणजे हे विस्थापितच आहेत, कुठुन ते सांगितलं तर हसाल तुम्ही) जेव्हा आपल्याला कुणी बघत नाही असं असताना आपण जसे वागतो ते खरं वागणं. मोदींच्या स्वच्छता अभियानाला पुर्ण पाठिंबा. बाकी tv कॅमेरासमोर मानभावीपणे झाड़ू मारणार्या लोकांनी सांगावं की ते बोलले "सखुबाई, आज आराम कर जरा, मी झाड़ू मारतो". असो, बरंच विषयांवर झालं. 

तर हा पहिला फोटो आहे माझ्या रूमसमोर असलेल्या पेट्रोल पंपच्या दरपत्रकाचा. डिझेलचा भाव १.३० युरो. लोकसभा निवडणुकीच्या आधी फेसबुक आणि WhatsApp वर आंतरराष्ट्रीय अर्थकारण यावरचा गाढा अभ्यास असलेली विद्वान मंडळी इतर देशात पेट्रोल अन डिझेल किती स्वस्त आहे याचा मेसेज हिरीरीने एकमेकांना forward करत होती. हा दर डिझेलचा जर्मनीतला, १.३ युरो म्हणजे तब्बल १०९ रू लिटरला. अशीच गत पेट्रोलची पण आहे. आतासुद्धा ७५ पैसे पेट्रोल स्वस्त झाल्यावर सरकारचे गुणगान गाणारी मंडळी डिझेल de control होऊन त्याचा भाव खाली वर होणार  आहे हे लक्षातच घेत नाही. थोडक्यात काय तर इंधनाचा भाव वरखाली होणं याला फक्त सरकार जबाबदार आहे (थोडंसं असेलही पण रूपयात एखादा पैसा) या गैरसमजुतीला फारकत द्यावी असं मला वाटतं. मग ते आधीचं ममो चं सरकार असो की नमोचं. आणि जर कुणी दावा करत असेल की सरकारमुळे भावात चढउतार होतो तर समजा तो फेकतोय. 

हा दुसरा फोटो आहे दिल्ली विमानतळावरचा. नितांत सुंदर विमानतळ. आपलं मुंबईचं विमानतळही झकास झालं बरं का. त्यावरून आठवलं मुंबईच्या जुन्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाहेरच्या देशातून आलो की बेल्टवर लगेज घ्यायला थांबलो की पॅ असा आवाज करून तो बेल्ट बंद पडायचा. अन मग कुठुनतरी आवाज यायचा "welcome to India" नज़र वळवली की हे देशीच बेणं. कुठल्यातरी परदेशी माणसाचं हास्य बघून परत अत्यंत लोचट, बुळबुळीत हास्य तोंडावर आणणार. मीच चुकीचा असेल, पण मला त्यांचा भयंकर राग यायचा. आता तो घाणेरडा प्रकार बंद. असो. तर फोटो आहे चार्जिंग स्टेशनचा. काही पिन्स व्यवस्थित होत्या, पण बहुतांश चार्जिंग स्टेशनवर samsung च्या पिना नव्हत्याच. म्हणजे तोडून नेल्या होत्या. आता विचार करा, या पिना काय तुटायची गोष्ट आहे का? हे कुठल्यातरी बिनडोक माणसाचं काम. असं मुर्खासारखं  वागायचं अन परत आलं की म्हणायचं Welcome to India. 

मित्रांनो, काय आहे ज्या गोष्टी तुमच्या आमच्या नियंत्रणात आहेत त्या आपण ठेवू अन ज्या नाहीत त्याच्यावर कुठं शायनिंग टाकायची. 

Sent from my iPad

No comments:

Post a Comment