Tuesday 28 October 2014

Bargaining

दहा बारा वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी अहमदाबादला गेलो होतो. तिथे नवरंगपुरा मार्केटमधे गेलो होतो. म्हंटलं मुलासाठी ड्रेस घ्यावा. त्यावेळी कुठल्याही गावाला गेलो की आई सांगायची, घरातल्या लोकांसाठी आणत जा काहीतरी. त्याआधी दोन वर्षापूर्वी बायकोला बंगलोर हून रु १६०० ची साडी आणली होती. तेव्हापासून या प्रकारातला माझा interest तसा कमीच झाला होता. आता तर कुठं गेलो आणि कुणी गिफ्ट वैगेरे दिलं तर घेऊन येतो. नाहीतर तसाच. (भेटलो तर लक्षात ठेवा)

तर काय सांगत होतो, गेलो दुकानात. आणि बोललो दाखवा ड्रेस. किमती चालू झाल्या २००, २५०, ३००. मला एक ड्रेस फारच आवडला. पण किंमत रु ३५०. दुकानदाराला म्हणालो "थोडा कम करो ना". नंतरचं संभाषण तो गुजरातीत आणि मी हिंदीत (इथे मराठीत) चालू झालं. गुजराती लोकांचं हे एक वैशिष्ट्य, समोरचा तमिळ मध्ये बोलत असला तरी हे गुजरातीत, मग माझ्यासारख्या मराठी बाणाची काय कथा. उगाच नाही वेस्टर्न लाईन चा भैया  पण गुजराती बोलत. 

दु:  तू सांग 
मी: २०० ला दया
दु:  नाही परवडत.
मी: बरं ठीक आहे, २२५ ला दया
दु: नाही जमणार
मी: तू सांग
दु: ३००
मी: थोडे कमी करा कि
दु: नाही जमणार. ३०० च्या खाली एक रुपया नाही.

तो अशा टेचात म्हणाला कि माझाही मराठा बाणा जागा झाला. मी बोललो "राहू दे मग. जातो मी" तो म्हणाला " जेवढयात मिळतं घ्या, नंतर पस्तावाल." मी बोललो "अरे जा, तू काय एकटाच आहे का मार्केट मध्ये. शोधेन मी" आणि तडक निघालो. दीड तास मार्केट पालथं घातलं, पण तसा ड्रेस काय मिळाला नाही. परत गेलो त्या दुकानात आणि म्हणालो "दया तो ड्रेस"

दु: हे घ्या
मी: ३०० ना
दु: नाही आता ३५० लाच.
मी: अहो असं काय, मगाशी ३०० म्हणालात ना
दु: मग तेव्हा का नाही घेतला. आता भाव ३५०.
मी: अहो असं काय करता, दया  ना  हो प्लीज ३०० ला.
एव्हाना त्याचा साथीदार आला.
दु: एकदा बोललो ना आता ३५० म्हणजे ३५०. त्याच्या खाली एक पैसा नाही. पाहिजे असेल तर घ्या नाही तर बघा.
मी: (काकुळतीने) अहो द्या ना ३०० ला, मुलगा खुश होईल, बायको ओवाळेल मला.
दुकानदार साथीदाराकडे बघतो. साथीदार दरवाज्यापाशी जाऊन उभा राहतो, दरवाजा उघडतो, "आता निघा" असं नजरेतूनच बोलतो. माझ्या मनात विचार आला, साला जेवढयाला मिळत होता ड्रेस, घेतला असता तर बरं झालं असतं. उगाचच नाटकं केली. मन कुरतडत बसलो.

उद्धव ठाकरेंच्या मनात काय चालू आहे याची कल्पना आहे मला.

दोन गोष्टी:

- तो ड्रेस शेवटी घेतला कि नाही हे दोन दिवसात सांगतो.
- तुमच्या मनात आलं असेल कि तो दुकानदार पण दाढीवाला अन ५६ इंच छातीवाला आणि साथीदार दाढीवाला अन डोक्यावर टक्कल असलेला होता का? तर उत्तर आहे, नाही.  इतके पण योगायोग नसतात घडत आयुष्यात.

No comments:

Post a Comment