Saturday, 25 October 2014

करद्यातली सकाळ

करद्याचा निसर्गरम्य समुद्रकिनारा. सकाळची सहाची रम्य वेळ. त्या किनारी कुणीच नाही. पायाला गुदगुल्या करणार्या वाळूतून एकटाच चालत असणारा मी. लाटा किनार्यावर विसर्जित झाल्यावर परत जाताना झालेली वाळूची मोहक नक्षी. अचानक मला त्या खळाळणार्या समुद्राच्या किनार्यावर दिसलेले असंख्य पक्षी. काही उडणारे, काही नितळ पाण्यात खाद्य शोधणारे, तर काही नुसतेच बसलेले.

मला वाटलं अशा रम्य वेळी मी एकटाच का. मला वाटलं माझ्याबरोबर असायला पाहिजे...................,माझ्याबरोबर असायला पाहिजे.......................गणेश बागल

कसलं कद्रू डोकं दिलं आहे मला. अशावेळी स्वत:च्या बायकोबरोबर चालण्याचा विचार करायचा सोडून, गणेश. छ्या. "आपल्याला हव्या ते वेळी हव्या त्या व्यक्तिची आठवण न येणे म्हणजे नरक." वपु

(खरंतर हे भंगार वाक्य माझंच आहे. याला आपण वपुंचं मरणोत्तर साहित्य म्हणू यात फारतर. सध्या पुलंची प्रार्थना जोरात फिरत आहे. वपुंवर का अन्याय)

कुठल्याही बीच रिसोर्ट ला किंवा कुठल्याही ट्रॅव्हल एजन्सीबरोबर मी टूर वर गेलो की "स्वत:च्या" हे आवर्जून लिहावं लागतं यावर माझे समस्त पुरूषमित्र सहमत असावेत. बाकी दोन गोष्टी पहायला मला अशा ठिकाणी मला बिलकुल आवडत नाही, एक म्हणजे माझे सुटलेले पोट व एकंदरच अस्ताव्यस्त पसरलेलं शरीर आणि दुसरं म्हणजे स्वत:च्या व्यक्तिमत्वाला न शोभणार्या अन त्याला व्यवस्थित carry न करू शकणार्या ३/४th घातलेल्या बायका. हो म्हणजे, स्वत:च्या सोडून दुसर्या बायकांबरोबर चालण्याच्या विचार करण्याच्या पापापासून मला जर कुणी वाचवत असेल तर हा 3/4th युक्त ड्रेसिंग सेन्स. आणि या एका कारणासाठी कुणाची नज़र लागू नये म्हणून मी माझ्या बायकोला ही ती घालण्यास उद्युक्त करतो. Men will be men. पण ३/४th या पाश्चात्य वेशभूषेबद्दलचा मनातला आकस समस्त पुरूषवर्गाने कमी करायला हवा. त्याचं असं झालं की मी व मंडळी मुरूडगावात देवीच्या मंदिरात दर्शनाला गेलो, तर तिथे पाटी "प्रवेश हिंदू पद्धतीने पोशाख केलेल्यांना" मला वाटलं मंडळीला बाहेर उभं रहायला सांगतात की काय! तर पुजारीने काही अडवलं नाही बुवा. यावरून मी तीन inferences काढले

- ३/४th हा आता हिंदु पोशाख म्हणून मान्य व्हावा (हे मोहन भागवतांसाठी) बाकी ३/४th च्या 1/4th होतील तेव्हा डोळे उघडतील, असंही  काही लोकं म्हणतील. पण एकच सांगू इच्छितो. जर्मनीला चर्च मधे गेलो होतो. मी अन रियाज. म्हणजे एक हिंदू अन एक मुसलमान, ख्रिश्चन देवालयात. मुख्य म्हणजे चर्च मधे एकही उघड़ी नागडी स्त्री दिसली नाही. मला म्हणायचं हे की कुठे कसे कपडे घालायचं याचा sense असतो बायकांना
- हिंदु पद्धतीने पोशाख, म्हणजे पोशाख असावा आतमधे माणूस पाहिजे. बरीच प्रगती म्हणायची की. (हे शंकराचार्यांसाठी. तुम्ही किती समाजाला मागे ओढण्याचा प्रयत्न केला तरी तो सुधरतोय) काही वर्षात जाईल ती पाटीही.
- पुर्वी एका पेक्षा अधिक बायका असाव्यात म्हणून ओळख करून देताना "या आमच्या मंडळी" असं म्हणत असावेत. मी आपलं सहज मंडळी म्हणून लिहून बघितलं. लिहीतानाच हडबडलो.

खरं म्हणजे पुरावा म्हणून दोन चार फोटो मोबाईलमधून उडवले पण आहेत मी. (या वाक्याचा अर्थ डिलीट केले असा वाटत असेल, पण तो फ्लॅश उडवला म्हणजे फोटो काढला या धर्तीवर घ्यावा. १९६८ ला जन्मलेल्या माणसाने नवीन technology adapt केली तरी त्याची बुद्धी जुनाटच आहे याचं हे एक उत्तम उदाहरण), पण ते इतके गचाळ आहेत की माझी ते पोस्ट करण्याची daring नाही झाली. गणेशचं नाव ज्या फ्रेम मधे आहे तिथे माझं फोटो, ते पण पक्ष्यांचे, लावणं म्हणजे पंडितजींच्या समोर एखाद्या बाथरूम सिंगरने "इंद्रायणी काठी" म्हणण्याचं धाडस करण्यासारखं आहे. (उपमा चुकली का? पंडितजी म्हणजे  जरा जास्तच झालं नाही का. बरं मग आनंद भाटे, नाहीतर जयतीर्थ मेवूंडी, नाहीतर राहूल  देशपांडे, नाहीतर.......... बास पेपर मधे वाचून शास्त्रीय गायकांपैकी ही तीनच नावं आठवत आहेत) 


असो. तर गणेश, या पोस्टमधे मी तुझी खुपंच स्तुति केली आहे. माझा एक दोन दिवसात तुला जर फोन आला तर काही तरी assignment साठी केला असं काही वाटू देउ नको ही लै म्हणजे लैच नम्र विनंती. फोनला उत्तर द्यावे.

Sent from my iPad

No comments:

Post a Comment