Friday 31 October 2014

मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा

फेसबुकवर चौफेर वाचन करत असल्यामुळे मला राजकारण्याचंही एक गुप्त अंग (शब्द जोडून वाचून नये) आहे असा एक फील येऊ लागला आहे. माझ्या राजकीय विश्लेषणाची (ख्या ख्या, असं कोण हसतय रे) दखल कुणी घ्यावी असंही नाही, पण त्यातून डावी विचारसरणी प्रतिध्वनित होते असं माझं मन सांगत होतं. (माझ्या राजकीय विचारांची माझ्याशिवाय दुसरा कुणी कुत्राही दखल घेणार नाही हे माहित आहे. आता या वाक्यात मी स्वत:ला कुत्रा म्हणवलं असा कुणी जावईशोध लावला तर माझा नाईलाज आहे.) फेसबुकवर येईपर्यंत, माणूस एक तर सरळ किंवा वाकड्या विचारसरणीचा असतो एवढंच माहित होतं. ही डावी अन उजवी विचारसरणी म्हणजे वेगळंच झेंगट. असो.

तर आपणच तयार केलेल्या भाजप विरोधक या प्रतिमेला जागणं तर भाग होतं. ते बजावत मी कालपासून देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलच्या पोस्ट वाचत होतो. पेपर पण अख्खा चाळून काढला. आजचा लोकसत्ता (मला काही कळत नाही, पण काही लोक याला संघसत्ता संबोंधतात. इथं बोंबलायला मला तरूण भारत संघाचं आणि लोकमत/सकाळ काॅंग्रेसचा वाटत नाही तर बाकीच्यांची काय कथा), मग मटा, पुढारी, संध्यानंद सगळे पेपर पिंजून काढले. पेपर मधे तर नाहीच नाही, पण फेसबुकवरच्या पोस्टमधेही कुठे टिंगल टवाळी नाही. पार विश्वंभर चौधरीपासून ते माझा आवडता मित्र निर्भय पर्यंत सगळ्यांनी स्तुतीच केली राव. माझी पंचाईतच झाली. म्हंटलं आपल्याला काही सुचत नाही तर कुणाला तरी अनुमोदन द्यावं. पण नाहीच. नाही म्हणायला काही माझ्या सेन्सिबल मित्रांनी ते ब्राह्मण किंवा संघाचे म्हणून, पेशवाई आली वैगेरे अशी गरळ ओकली, पण आपल्या काय पल्ले नाही पडली. त्यामुळे असल्या फडतूस पोस्टच्या मी वार्यालाही उभा नाही राहिलो.

आता काय विधीमंडळ नेते झालेच आहेत. मुख्यमंत्री होतीलच. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.

लेन्स आणून ठेवली आहे. घासून पुसून साफ करून ठेवतो, आणि बघतो कुठं काही चुकतंय का साहेबांचं. आणि मग हाणायचं काहीतरी तिरकं. तेव्हढेच आपली प्रतिमा जपल्याचं समाधान. नाही का?

मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा


No comments:

Post a Comment