Wednesday 1 October 2014

आईचं मन

माझ्या मुलाचा "स्विस मध्ये कासावीस" असा लेख सामनामध्ये आला. तो सर्वांनाच भावला. रविवारी मी मात्र घरातच देवापुढे बसल्या बसल्या राजेश साठी कासावीस झाले.

तो इथे नांदेड सिटी ला असला कि रविवारी सिंहगडावर सकाळी सहा वाजता फिरायला जातो. त्याच्या बरोबर कधी कुणी असते, कधी नसते. आला कि तिथले अनुभव सांगतो. येताना दुध, पेपर घेऊन येतो. गडावरच्या गमती जमती लिहून हि काढत असतो.

या रविवारी नेहमीप्रमाणे, पण थोडा उशिरा म्हणजे ७ वाजता गडावर जायला निघाला. रात्री त्याची पाठ दुखत होती होते. आज काल पाठ दुखणे म्हणजे काहीही असू शकते असं ऐकावात आहे, तेव्हा त्याने आज जाऊ नये असं मनातून वाटत होतं. पण तो  आता ४ वर्षात पन्नाशीचा होईल, त्याला काय बोलणार? "आई, मी आज वर पर्यंत जाणार नाही. अर्ध्यातून परत फिरेल आणि लवकर येईल" असं सांगून निघाला. मी हि माझ्या सकाळच्या कामाला लागले. ती झाली, कि देवपूजेला लागले. घड्याळात पहिले तर नऊ वाजले होते. मनात आले "एव्हाना राजेश यायला पाहिजे होता. अर्धाच गड चढणार होता." विचार झटकून मी पूजा करू लागले. ९;३० वाजले अन मग मात्र माझं चित्त पूजेतून उडालं. "देव देव्हार्यातआणि चित्त खेटरात" अशी माझी अवस्था झाली. मोबाईल लावला, तर ती कार्टी म्हणाली "आपला फोन त्या व्यक्तीपर्यंत पोहचू शकत नाही". आईचं मन, काळजी त्यावर कब्जा घेऊ लागली. "माझा मुलगा लवकर परत येऊ दे, पाच रुपयाचे पेढे वाटीन" (जुनी सवय, देवाला पाच रुपयाचे पेढे कबूल करायचे. पेढ्याचे भाव वाढले, काळज्याही वाढल्या, पण मी म्हातारी लहान चेहरा करून दुकानदाराला सांगते "ये मन्नत के है" तो बिचारा इच्छा नसताना देऊन टाकतो). फोन वर प्रयत्न चालूच होते, पण व्यर्थ. हे डबडं फेकून द्यावं कि काय असाही विचार मनात आला.

ह्या काळजीचे कारण हि तसेच आहे. त्याच्या लिहिण्यातून ते बऱ्याचदा डोकावतेही. तीन वर्षापूर्वी तो आणि वैभवी पुरंदर का राजगड अशा कुठल्यातरी गडावर गेले होते. तिथे त्याच्या छातीत दुखलं होतं. पुढं त्या दुखण्याची परिणीती त्याची angioplasty होण्यात झाली. कारण ९० का ९५% कुठली रक्त वाहिनी ब्लॉक होती म्हणे. आणि दिवस पण कुठला प्लास्टी चा तर १८ जून. दोन वर्षापूर्वी त्याचे वडील १८ जूनलाच गेले होते. मी तर त्यांच्या फोटोकडे हि पाहू शकले नाही. फक्त देवाजवळ प्रार्थना करत होते "राजेश अनेक नवसाचा आहे, माझे आयुष्य त्याला दे" (गंमत म्हणजे तो तर बरा होऊन आलाच, पण मी अजूनही टुणटुणीत आहे, अगदी शब्दश:). ते चित्र डोळ्यासमोर येत होते आणि म्हणून मी बैचैन झाले होते.

शेवटी न राहवून शेजारच्यांकडे गेले आणि लवकर येतो म्हणून सांगून गेलेला राजेश अजूनही आला नाही हे रडवेल्या सुरात सांगितले. आणि शेजारच्या संदीपने फोन लावल्याबरोबर रिंग वाजलीही. आणि राजेश चा आवाज कानावर पडला "गडावर वर पर्यंत गेलो होतो, आलो आहे खाली, अर्ध्या तासात पोहोचतो घरी" खरं सांगायचं तो काय बोलला हे मी ऐकलेच नाही, त्याचा आवाज कानावर आला, तेव्हाच या माउलीची कासावीस शांत झाली. काय करणार, तो पन्नाशीचा होत आला, मी सत्तरी पार केली तरी हे आईचं मन आहे, त्याचं थोडी वय वाढणार!

- कुमुद मंडलिक

No comments:

Post a Comment