Friday, 19 May 2017

पतंजली १

परवा पतंजली च्या दुकानात गेलो होतो. काही बिस्किटं घेऊन पैसे देण्यासाठी काउंटर वर जाऊन उभा राहिलो. माझ्यासमोर एक गृहस्थ त्यांच्या पत्नीबरोबर घेतलेल्या मालाचे पैसे देत होते. त्यांचं टोटल बिल झालं रु ११३७. दुकानदाराने बिल सांगितल्यावर जोडप्यातील स्त्री लागलीच म्हणाली "अहो इतकं बिल झालं तर डिस्काउंट द्या की"

तर लागलीच "अहो मॅडम, पतंजली च इतक्या कमी भावात प्रॉडक्ट उपलब्ध करून देतंय, तर अजून काय डिस्काउंट मागताय तुम्ही."

गंमत म्हणजे हा डायलॉग दुकानदाराने नाही तर त्या बाईंच्या नवऱ्यानेच मारला.

मनातल्या मनात मी खूप खदखदून हसलो.

पतंजली

कालच्या पोस्टचा विनोद सोडून गाडी भलत्याच ट्रॅक वर गेली. पतंजली बद्दल माझं मत सांगतो.

रामदेवबाबा यांच्याबद्दल मला अजिबात सख्य नाही. किंबहुना रागच आहे. कारण नसताना राजकीय क्षेत्रात त्यांनी केलेली ढवळाढवळ म्हणजे मला विनाकारण केलेली लुडबुड वाटते. स्त्रीवेष धारण करून त्यांनी केलेलं पलायन हे हास्यास्पद होतं. राष्ट्रभक्तीच्या नावाखाली त्यांनी त्यांचे प्रॉडक्टस वापरण्याचं आवाहन हे ही मला आवडत नाही. माझी स्वतः ची कंपनीच मी अमेरिकन कंपनीला विकून बसलोय तर मी काय राष्ट्रभक्तीचं कौतुक सांगणार.

असं असलं तरी त्यांचं बिझिनेस मॉडेल भारी आहे हे मान्य करायला हवं. प्रत्येक एरियाला एक फ्रँचाईजी, हे खायचं काम नाही. युनिलिव्हर ला टक्कर द्यायची म्हणजे गंमत नाही. डाबर आणि निरमा पुरून उरलेत, पण कित्येक देशी ब्रँड्स ला लिव्हर ने गिळंकृत केलं आहे. अन तिथे त्यांच्या नाकावर टिच्चून हा बाबा प्राईम स्लॉट मध्ये टीव्ही वर ऍड करत फिरतो आहे.

आणि याउपर त्यांचं जे काही प्रॉडक्ट घरात येतंय त्याची क्वालिटी अजून तरी स्वीकारार्ह आहे. ती नसली असती तर मी पतंजली चं प्रॉडक्ट कधीही वापरलं नसतं. ती कुणाला स्वीकारार्ह नसण्याची शक्यता असेल.

स्वीकारार्ह क्वालिटी नाही आणि फक्त राष्ट्रभक्तीच्या नावाखाली मी जर गोष्टी विकत घेतल्या असत्या तर आज मी टाटांची कार फिरवत असलो असतो.

पतंजली चं काय काय होऊ शकतं?

- ज्याप्रमाणे सुभिक्षा गायब झालं त्या पद्धतीने ह्यांच्या पण पाट्या गुल होऊ शकतात.
- रामदेव बाबा कुठल्या तरी मल्टी नॅशनल ला पतंजली विकून पाच सहा हजार कोटीचे मालक होऊ शकतात.
- पतंजली ही एक सक्सेस स्टोरी बनून, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून भरपूर कंपन्या उदयाला येऊ शकतात.





पत्र

अभी दिल्ली बहोत दूर है, असा एक जुना फेमस डायलॉग आहे. गुजरात सारखं छोटं राज्य सांभाळणं वेगळं आणि देश सांभाळणं वेगळं असं मीच २०१४ साली हिणवलं. अन त्यांनी तर दिल्लीच काबीज करून टाकली. मग आम्हाला वाटलं, केंद्रात आले खरे, पण राज्यात काही त्यांची डाळ शिजणार नाही. पण महाराष्ट्रातल्या मतदाराने त्यांचा आवडता पंजा बीजेपी च्या हातात मिळवला अन टिकटिक ला टुकटुक केलं. मग आम्हाला वाटलं केंद्रात आहेत, राज्यात आहेत पण महानगरपालिका, पंचायतीत आमचं वर्चस्व आहे. तिथंही यांनी हातपाय पसरले.

मग आली युपी ची निवडणूक. एक्झिट पोल चे अंदाज चुकवत, सोशल मीडिया ला चकवा देत त्यांनी ३०० हुन अधिक जागा आणल्या. आमच्या एका मित्रवर्याने इथे लिहिलं, ७३ खासदार आहेत पण युपी त ७३ आमदार तरी येतील का? ओबामा साहेबांनी यूएस सिनेट मध्ये हिंदू प्रिस्ट आणल्यानंतर बोंब मारलेल्या माझी, योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यावर दातखीळ बसली. मित्रवर्याची पण बसली असेल.

इतकं सगळं होऊनही आम्ही आणि आमचे नेते आजही आपल्याच धुंदीत मश्गुल आहोत. सहा महिन्यांपूर्वी आमच्या एरियात ग्रीन झोन मधील एक प्लॉट लाटला, जुन्या राज्यकर्त्यापैकी एकाने. तिकडे ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट सारखे होतकरू लोकं वाळूत चोच खुपसून गप्प बसलेत. ओमर अब्दुल्ला सारखा काश्मिरी नेता कबूल करून बसलाय की आता विरोधकांनी २०२४ ची तयारी करावी. हे सगळं होऊनही आम्ही आपलं बीजेपी काँग्रेसयुक्त झाली असं खिजवण्यात धन्यता मानतोय. आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेल्या दहशतवादाच्या सावटामुळे अमेरिकेसकट अनेक देशाचं  ध्रुवीकरण होतं. आपण कसे अपवाद राहणार.? जग म्हणजे ग्लोबल व्हिलेज झालं अशा गप्पा मारायच्या पण मानसिकता मात्र लोकल ठेवायची. 

आता आपल्या नेत्यांना ही आठवण करून द्यायची वेळ सामान्य जनतेवर आली आहे. विरोधक इतके क्षीण होणं हे लोकशाहीसाठी अपायकारक आहे.

आपलं ठरलं. ते राहुल बनसोडे कसं प्रत्येक गोष्टी साठी मोहन भागवतांना पत्र लिहितात, तसं मी पण आता हे सगळं लिहून आमच्या नेत्यांना पत्र पाठवणार "आहेय".

पत्र लिहून झालंय, दिल्लीतल्या काँग्रेस भवनाचा पत्ता पण टाकला आहे.

कुठल्या नेत्यांचं नाव टाकायचं, इथं येऊन थांबलो आहे. एकदा ते सुचलं की पाठवून देतो पत्र.

भेट रुचिरा

फेबुकवर ओळखी झाल्या. त्यातून मी काहींना भेटलो, काही मला भेटायला आले. फेसबुकच्या ओळखीची पहिली भेट आजचे जागतिक कीर्तीचे छायाचित्रकार आणि नुकतेच पिता झालेले श्री गणेश बागल. मग बरीच मंडळी भेटली. त्यातल्या काही भेटी अविस्मरणीय. तैवान मध्ये दोन तास प्रवास करून खास मला भेटायला आलेले तुषार आणि गौरव. किंवा सत्कार हॉटेलच्या बाहेर माझी कार बघून पाऊण तास  वाट पाहून, भेटल्यावर दोन वाक्य बोलून पाया पडून झटकन गेलेला विशीतील यशोधन. किंवा नागपूरमध्ये वैशाली आणि नंदकिशोर या दोघांनी केलेलं आदरातिथ्य ही काही वानगीदाखल उदाहरणं. असाच अनुभव आठ एप्रिलला वसईला घेतला.

सात आणि आठ एप्रिलला मुंबईत होतो. सातला श्रीनिकेत बरोबर गप्पा टाकल्या. त्याच्या भाषेत फेसबुक गॉसिप.

आठला एका अफलातून फॅमिलीला भेटलो. जिच्यामुळे भेटलो ती रुचिरा सावंत. यश इतकं वय. मी सामनात कॉलम लिहिला तेव्हा तिने मेल पाठवला, पहिला. म्हणजे तीन वर्षांपूर्वी. आणि मग ती अनेक गोष्टी सांगत गेली, तिच्या शिक्षणाबाबत. काही विचारत गेली. त्यातले बरेचसे प्रश्न मला कळलेच नाही. तिचा पिंड बेसिक सायन्सचा तर मी ऍप्लिकेशन कामगार. मी यथाबुद्धी तिच्या प्रश्नांना झेलत राहिलो. जिथे माहीत नाही तिथे सपशेल हात टेकले.

वसईला आलात की या असं सारखं निमंत्रण द्यायची. शेवटी आठ एप्रिलला योग आला. सावंत कुटुंबाने माझं जे आतिथ्य केलं त्याला तोड नाही. अत्यंत टापटीपीचं घर, अन त्या छोट्याशा घरात राहणारी मोठ्या मनाची माणसं. मला विचारून केलेलं साधं पण कमालीचं रुचकर जेवण. सावंत वहिनी घेतात तो ट्युशनचा क्लास, अन त्या क्लासमधील एकसुरात "नमस्कार काका" म्हणणारी शाळेतील पोरं पोरी. मी काही बोलायला लागलो की सावंत वहिनींना, सावंत साहेब "बोलू नकोस, त्यांना बोलू दे" असं सांगणारी खूण.  घरी आलो म्हणून शाल श्रीफळ देऊन त्यांनी केलेला आदरसत्कार. त्यात रुचिराने लिहिलेलं एक मनस्पर्शी पत्र. माझ्या घरच्यांसाठी म्हणून दिलेले कोकणातील स्पेशल खाद्यपदार्थ. आणि या सगळ्यांवर कडी म्हणून त्यांनी वर्षावलेला अद्भुत प्रेमभाव. त्या वर्षावात चिंब भिजताना मी डोळ्यातील पाणी थोपवायचा जीवतोड प्रयत्न केला अन त्यात यशस्वी झालो.

चूक की बरोबर हे माहीत नाही. पण आयुष्याच्या रहाटगाडग्यात, प्रगतीचे दोर ओढताना मानव्याचा अंश हरवत चालला आहे. पण ते शहरात. छोट्या गावात हे मानव्य घाऊक भावात मिळतं ह्याचं याची देही याची डोळा दर्शन मला सावंतांच्या घरात ठायी ठायी घडलं.

फेसबुकमुळे तयार झालेल्या अंगणात अजून एक पणती पेटली. निरामय, प्रेमळ प्रकाश देणारी.

जिचं अकौंट फेक आहे असा मला संशय आला होता त्या रुचिरापासून चालू झालेल्या मैत्रीच्या धाग्यात मी तिच्या कुटुंबाबरोबर जोडला गेलो आहे. सावंत कुटुंबाचं आभार मानत नाही पण त्यांनी दिलेल्या प्रेमभावात मी कित्येक दिवस, महिने, वर्षे डुंबत राहील हे नक्की.

नील

आमचा नील फार चालू आहे. त्यातल्या त्यात माझ्याशी सॉलिड गेम खेळतो. मला मराठी गाणं आवडतं म्हणून मी आलो की नाट्यगीते किंवा भावगीतं लावून ऐकत बसतो. मला सांगतो "पप्पा, आज सांगा ना कुठलं तरी भारी गाणं" असं म्हंटल्यावर मी पण खुश होतो हे त्याला माहित आहे.

परवा त्याने असाच डाव टाकला माझ्यावर. मी त्याला "सरणार कधी रण" लावून दिलं. ते संपलं तसं मग "भय इथले संपत नाही" झालं आणि मग "त्या फुलांच्या गंधकोषी".

माझं लक्ष नाही हे पाहून तो गायब झाला. मी त्याला शोधत त्याच्या रूम मध्ये गेलो तर "जुम्मा चुम्मा दे दे" या गाण्याची डोळे बंद करून श्रवण भक्ती करत होता.

मी काय आहे म्हणत त्याच्या समोर उभा राहिलो तर म्हणाला "मी लहान आहे म्हणून ठीक आहे पण माझं डोकं इतकं नका जड करत जाऊ"

निधर्मी

इतिहासात रमणारी माणसे आणि चहात बुडावलेलं बिस्कीट सारखेच असतात........लिबलिबीत. एक देश म्हणून, समाज म्हणून आपण असेच होत चाललोय. लिबलिबीत. कारण आम्हाला वर्तमानाची पडली नाही, भविष्याची चिंता नाही. आम्हाला गोंजारायचा असतो अभिमान तो आमच्या दैदिप्यमान भूतकाळाचा. ज्याला खरंतर बाकी जगाच्या दृष्टीने शून्य महत्व आहे. आणि आम्ही कितीही वर्षे मागे जाऊ शकतो आणि आज त्यावर भांडू शकतो. राज्यकर्ते पण आम्हाला असे भेटले आहेत आणि त्यातल्या त्यात गेल्या दोन दशकात तर या लोकांनी इतकी जोरदार दुफळी माजवली आहे की ज्याचं नाव ते. निधर्मी म्हणून गौरवल्या गेलेल्या राष्ट्राची टॅग लाईन बदलून सर्वधर्म सम भाव अशी केली. कुठल्याही धर्माला थारा न देणाऱ्या देशाची अवस्था झाली ती सर्वच धर्माना गोंजारणारी. आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला धार्मिकतेचा एकतर छुपा किंवा काहीजण उघड उघड पुरस्कारच नव्हे तर असंच असायला पाहिजे हे ठासून सांगणारी लोकं. आणि या दोघांच्या मध्ये भरडले जाणारे तुमच्या माझ्या सारखे सामान्यजन.

विविधता में एकता वगैरे फक्त तारक मेहता का उलटा चष्मा मध्ये बघायला मिळतं. आणि या सोशल मीडिया ने तर इतका उच्छाद मांडला आहे, काय सांगायचं. मला पहिल्यांदा वाटलं होतं की हे काही समाजाच्या मानसिकतेवर परिणाम करणार नाही. पण होतोय. त्या गोबेल्स का कुठल्या नितीप्रमाणे द्वेषमूलक मेसेजेस चा इतका भडिमार होतोय अन जातीय, धार्मिक द्वेषाची आग घराच्या दरवाजापर्यंत आली आहे, त्याची धग जाणवत आहे. ही झळ शाकाहारी, मांसाहारी पर्यंत खालच्या लेव्हल ला जावी यापेक्षा दुर्दैव ते काय?

खरंतर मानसिक दृष्ट्या आपण इतके मागासलेले आहोत की कुठलाही रस्ता, पूल, योजना याला इतिहासातल्या व्यक्तीचे नाव देणे सरकारने बंद करावे. कारण ते फक्त वाद निर्माण करतात. मुंबई-नाशिक महामार्ग छान वाटतं की ऐकायला. किंवा फ्लायओव्हर क्रमांक २५, काय वाईट आहे. नवउद्योजक कर्ज योजना, ठीक आहे की. नका आमच्या अस्मिता गोंजारू. त्या गोंजारताना कधी आमच्या भावना भडकवतात ते कळत पण नाही.

हे पुरस्कार. झाले गेले ते विसरून जा. आता इतिहासातल्या कुठल्याही नेत्याला नका देऊ भारत रत्न. वर्तमानात तुम्हाला घडवता येत नाहीत. भूतकाळातल्या लोकांना पुरस्कार वाटून भविष्य काळ काही उज्वल होणार नाही.

जगाच्या पाठीवर आपल्या इतका कॉम्प्लेक्स देश कुठलाही नाही.  त्या विविधतेला विसरून निधर्मी असण्याशिवाय आपल्याला चॉईस कुठे आहे.? 

अच्छे दिन

नीलचा शेवटचा पेपर संपला अन मी घरी आल्यावर म्हणाला "पप्पा, आज मी गंमत सांगणार आहे. प्रॉमिस करा रागावणार नाही ते" मी प्रॉमिस केल्यावर त्याने जे सांगितलं त्याचा गोषवारा असा होता:

पेपर संपवून येताना बस मधून नील उतरला. त्याला ड्रायव्हर काकांनी आईस्क्रीम आणायला सांगितलं. त्याच्या मागोमाग अनुष्का पण उतरली. ड्रायव्हर काकांनी त्यांना सांगितलं की तोपर्यंत मी हर्षला पुढे सोडून मागे परत येतो तो पर्यंत दोघे इथंच थांबा.

त्यानंतर नीलने बरंच काही गोलमाल सांगितलं. शेवट असा होता की अनुष्का आणि तो दोघेच बोलत एक किमी आले. बस ड्रायव्हर परेशान झाला. पाहिले अनुष्काचं घर लागलं तिथे अनुष्काचे आई वडील तिला खूप बोलले. नीलने पण दोन चार शिव्या खाल्या. नील घरी आल्यावर त्याने रडत हे सगळं यश दादाला सांगितलं.

थोडक्यात सांगायचं हे की असा डाव घरात टाकायची जी अक्कल मला इंजिनियरिंगला आली ती नीलला सातवीत आली.

अच्छे दिन म्हणतात ते हेच का?