Friday 19 May 2017

पत्र

अभी दिल्ली बहोत दूर है, असा एक जुना फेमस डायलॉग आहे. गुजरात सारखं छोटं राज्य सांभाळणं वेगळं आणि देश सांभाळणं वेगळं असं मीच २०१४ साली हिणवलं. अन त्यांनी तर दिल्लीच काबीज करून टाकली. मग आम्हाला वाटलं, केंद्रात आले खरे, पण राज्यात काही त्यांची डाळ शिजणार नाही. पण महाराष्ट्रातल्या मतदाराने त्यांचा आवडता पंजा बीजेपी च्या हातात मिळवला अन टिकटिक ला टुकटुक केलं. मग आम्हाला वाटलं केंद्रात आहेत, राज्यात आहेत पण महानगरपालिका, पंचायतीत आमचं वर्चस्व आहे. तिथंही यांनी हातपाय पसरले.

मग आली युपी ची निवडणूक. एक्झिट पोल चे अंदाज चुकवत, सोशल मीडिया ला चकवा देत त्यांनी ३०० हुन अधिक जागा आणल्या. आमच्या एका मित्रवर्याने इथे लिहिलं, ७३ खासदार आहेत पण युपी त ७३ आमदार तरी येतील का? ओबामा साहेबांनी यूएस सिनेट मध्ये हिंदू प्रिस्ट आणल्यानंतर बोंब मारलेल्या माझी, योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यावर दातखीळ बसली. मित्रवर्याची पण बसली असेल.

इतकं सगळं होऊनही आम्ही आणि आमचे नेते आजही आपल्याच धुंदीत मश्गुल आहोत. सहा महिन्यांपूर्वी आमच्या एरियात ग्रीन झोन मधील एक प्लॉट लाटला, जुन्या राज्यकर्त्यापैकी एकाने. तिकडे ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट सारखे होतकरू लोकं वाळूत चोच खुपसून गप्प बसलेत. ओमर अब्दुल्ला सारखा काश्मिरी नेता कबूल करून बसलाय की आता विरोधकांनी २०२४ ची तयारी करावी. हे सगळं होऊनही आम्ही आपलं बीजेपी काँग्रेसयुक्त झाली असं खिजवण्यात धन्यता मानतोय. आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेल्या दहशतवादाच्या सावटामुळे अमेरिकेसकट अनेक देशाचं  ध्रुवीकरण होतं. आपण कसे अपवाद राहणार.? जग म्हणजे ग्लोबल व्हिलेज झालं अशा गप्पा मारायच्या पण मानसिकता मात्र लोकल ठेवायची. 

आता आपल्या नेत्यांना ही आठवण करून द्यायची वेळ सामान्य जनतेवर आली आहे. विरोधक इतके क्षीण होणं हे लोकशाहीसाठी अपायकारक आहे.

आपलं ठरलं. ते राहुल बनसोडे कसं प्रत्येक गोष्टी साठी मोहन भागवतांना पत्र लिहितात, तसं मी पण आता हे सगळं लिहून आमच्या नेत्यांना पत्र पाठवणार "आहेय".

पत्र लिहून झालंय, दिल्लीतल्या काँग्रेस भवनाचा पत्ता पण टाकला आहे.

कुठल्या नेत्यांचं नाव टाकायचं, इथं येऊन थांबलो आहे. एकदा ते सुचलं की पाठवून देतो पत्र.

No comments:

Post a Comment