Friday 19 May 2017

त्रिगाव

पुण्यापर्यंत आयुष्याची गाडी पोहचेपर्यंत तीन थांबे घेतले होते. NAN, नासिक-औरंगाबाद-नागपूर. ते मंगळयानाला कसं एका लेव्हलला जाईपर्यंत फ्युएल लागलं होतं, अन नंतर त्याची स्वतः ची गती त्याला पुढचा प्रवास करण्यासाठी इंधन देतं, तसं मला या तीन गावांनी इंधन दिलंय. अर्थात माझं यान अजून तरी इथेच भरकटते आहे. ते असो.

तर सांगत होतो त्रिगावांबद्दल. या गावी जाण्यासाठी मी कधीही एका पायावर तयार असतो. रिफ्रेश होतो अगदी. परवा नाशिकला गेलो होतो. तसंच झालं.

दिवसभराची कामं आटोपून रात्री श्रीनिवास पत्की उर्फ टोटो ला भेटलो. तेहतीस वर्षांनंतर. भेटल्या भेटल्या गळाभेट झाली, त्या मिनिटभरात कालपटाची सगळी वर्षे गळून पडली. टोटो, खरंतर सीएट चा प्लांट हेड आहे तो, त्यामुळे ह्या नावाने त्याला बोलावणं कसं तरीच वाटतंय. तर टोटो आमच्या शाळेच्या पहिल्या बॅच चा विद्यार्थी. दोन वर्षाने पुढे. एकूणच या बॅच बद्दल कुतूहल होतं. त्या काळी पण टोटो बोलताना मी त्याच्या कडे कौतुक मिश्रित आदराने पाहायचो. (रादर त्या बॅच च्या प्रत्येकाकडे आमच्यातल्या प्रत्येकाला असंच वाटायचं) आज तेहतीस वर्षांनंतरही त्याच्या सहज बोलण्यात आणि मी ते कौतुकाने ऐकण्यात तसूभरही फरक पडला नाही. शाळा आणि शिक्षक यांच्या बद्दल प्रेमादर हा एक कॉमन आवडीचा विषय होता दोघांच्या. मनसोक्त गप्पा मारून मी हॉटेल पंचवटीला जाऊन झोपलो, वकील वाडीत.

दुसऱ्या दिवशी मॉर्निंग वॉक म्हणून मी चालू लागलो. यशवंत व्यायाम शाळेवरून मेन रोड च्या चौकातून रविवार कारंजा कडे आलो. मध्ये पेठे हायस्कुल नामक मंदिराचं दर्शन झालं. तिथून तांबट आळी कडे वळलो. एक सिमेंट चा रस्ता सोडला तर बरंच काही तसंच आहे अजून.  रविवार कारंजाच्या आमच्या स्टॉप वर येऊन उभा राहिलो. हाईट म्हणजे ते प्रभूइच्छा नावाचं दुकान पण दिसलं. साईबाबा चा वेष घालणारे ते पाटील काका मला आजही आठवतात.

पुढचा योगायोग अभूतपूर्व होता. वय विसरत भूतकाळाच्या गोधडीत शिरत मी त्या स्टॉप उभा राहिलो. तर पुढची सिटी बस मेरी म्हसरुळ. मला वाटलं आता ते चिडचिड करणारे घोलप ड्रायव्हर आणि तितकेच प्रेमळ पाटील कंडक्टर दिसतात की काय! अचानक पाठीवर मला दप्तर असण्याचा भास झाला अन कानात तांबट आळी तील "ठाक, ठाक" असा तांबे ठोकण्याचा आवाजही आला.

साला, आवंढा येणारा घसा आणि पाणी जमा होणारे डोळे या दोन अवयवांवर माझं अजिबात नियंत्रण नाही आहे. अदरवाईज मी खूपच चांगला आणि सभ्य माणूस आहे.

असो. एकंदरीत रविवार कारंजा आणि टोटो जसे होते तसेच आजही आहेत.

(टोटो आणि माझं "टीचर्स" बद्दल प्रेम हा पण एक कॉमन आवडीचा विषय होता 😊😊)

No comments:

Post a Comment