"मला कलर प्लस चा शर्ट घ्यायचा आहे. आज जाऊ यात" पार्टनर म्हणाला.
मी म्हणालो "अरे, सिपी चा सेल लागतोय पुढच्या महिन्यात. तेव्हा घेऊ यात की. २०% स्वस्त मिळेल"
मी बोललो अन लॅपटॉप वर मेल बडवत बसलो. पार्टनर जवळ आला अन खांद्यावर हात ठेवत म्हणाला
"एक लक्षात ठेव, आपल्या औकाती पेक्षा पैसे जास्त खर्च करायचा माज करू नये. तसंच आपल्याला जितकं परवडतं तितके पैसे खर्च करण्याची लाजही वाटू नये.
माझं एक निरीक्षण आहे, हे जे सतत डिस्काउंट अन सेल शोधणारी माणसं असतात ना, ती स्वभावाने अत्यंत कोती असतात. ते घेताना गोष्टी डिस्काउंट मध्ये घेतात अन देताना पण डिस्काउंट मधेच. आणि हे मटेरियल व्हॅल्यू मधेच नाही तर, एखाद्या गोष्टींमध्ये स्वतः ला झोकून देणे किंवा दोस्ती निभावणे याबाबतीतही ही मंडळी हातचं राखून वागतात.
परिस्थिती नाही म्हणून सेल ची वाट पाहणं मी समजू शकतो. पण सेल मध्ये येणारी बरीच मंडळी ही सुखवस्तू घरातील असतात. ही लोकं abundance mindset ठेवत नाहीत. आणि मग मूर्त स्वरूपातील कुठलीही गोष्ट डिस्काउंट मधेच घेण्याची सवय ही अमूर्त गोष्टींमध्ये शिरकाव करून त्यांच्या स्वभावाचा कधी भाग बनते हे त्यांना कळत सुद्धा नाही.
आणि एक गंमत सांगू, सेलची वाट न पाहता तू खरेदी करत गेलास तर ५०% वेळा मध्ये तुला सेल भेटेलच.
आणि शेवटचं. There is no free lunch. या जगात ज्याची त्याची योग्य किंमत चुकवावीच लागते. अशा पद्धतीने तू पैसे वाचवशील ही एक वेळ, पण ही नियती असा डाव टाकते की कधी त्या पैशाला पाय फुटतील हे तुला कळणार पण नाही.
तेव्हा उतू नकोस मातू नकोस, पण कोत्या मनाचा पण राहू नकोस"
हा पार्टनर येडा आहे. कधी मी खुर्चीतून उठलो अन त्याच्या मागे जाऊन कार ला स्टार्टर मारला हे मला कळलं पण नाही.......जंगली महाराज रोडच्या कलर प्लस मध्ये जाण्यासाठी.
No comments:
Post a Comment