Friday 19 May 2017

राम आणि शाम

एक असतो राम, अन एक असतो शाम
दोघे घर सोडतात, वयाच्या १८ व्या वर्षी.
राम देतो सीईटी, अन शाम मिलिटरी ची एन्ट्रन्स
राम जातो इंजिनियरिंगला अन शाम एनडीए मध्ये

राम इंजिनियरिंग करू लागला
शाम झाला कणखर, शारीरिक आणि मानसिकरित्या
रामचा दिवस सकाळी ७ ते संध्याकाळी ५
शामचा सकाळी ४ ते रात्री ९, आणि कधी तर अख्खी रात्र जागा.

रामचा झाला दीक्षांत समारोह
शामची झाली पासिंग आऊट परेड
राम जॉईन झाला एका मल्टिनॅशनल मध्ये
दणदणीत पगारावर

शामच्या युनिफॉर्मवर खांद्याला २ स्ट्रिप्स लावतात
आणि त्याला ऑर्डर मिळते रेजिमेंट जॉईन करायची

नोकरी मिळाल्यावर रामचं आयुष्य मार्गी लागतं
शाम आयुष्याला आपल्या खांद्यावर वाहू लागतो

राम नेहमी त्याच्या कुटुंबियाला भेटायचा
तर शाम दीड एक वर्षातून एकदा
रामची दिवाळी साजरी व्हायची दिव्यांच्या प्रकाशात तर कधी संगीत पहाट ऐकत
शाम साजरी करायचा आपल्या जवान साथीदारांबरोबर
अंधाऱ्या बंकर मध्ये

राम चं लग्न झालं
तसंच शामचं पण झालं
रामची बायको त्याला रोज निरोप द्यायची
शामची बायको शाम जिवंत असावा यासाठी रोज देवाजवळ प्रार्थना करायची
राम गेला बिझिनेस ट्रिप वर कधी देशात तर कधी परदेशात
शाम गेला कधी लाईन ऑफ कंट्रोल वर तर कधी एनडीआरएफ च्या प्रोजेक्ट वर

राम घरी परत आला
तसाच शामही घरी परत आला
रामच्या बायकोच्या डोळ्यातून अश्रू आले
आणि शामच्या बायकोचे पण डोळे पाणावले
रामने त्याच्या बायकोला हळुवार पणे जवळ घेतलं आणि तिचे डोळे प्रेमाने पुसले
शाम काही असं प्रेम दाखवू शकला नाही

छातीवर लटकवलेल्या वीरचक्रासाहित शाम तिरंग्यात लपेटून शवपेटीत शांतपणे पहुडला होता.

एक आहे राम अन एक होता शाम
दोघे घर सोडतात, १८ व्या वर्षी
खांद्यावर घेतलेलं आयुष्य शामला संपवतं
रामचं आयुष्य मार्गी लागण्यासाठी




No comments:

Post a Comment