Friday 19 May 2017

मी मराठी

श्रीकांत दा ने मराठी मानासिकतेबद्दल लिहिलं. दादांचा दरारा असा आहे की त्यांच्या विरोधात बोलायला फाटतेच. पण तरीही धीर करून लिहितो.

सगळ्यात आधी एक किस्सा लिहितो. जसाच्या तसा घडलेला.

१९९७-९८ ची गोष्ट असेल. मी आणि माझा अमहाराष्ट्रीय मित्र रेल्वे ने लखनौ ला चाललो होतो. प्रवासातले काही तास गेल्यावर समोर बसणाऱ्या माणसाने मला म्हंटले

"आप दोनो मराठी बात कर रहे है, लेकिन मेरा अंदाज है के आपके दोस्त मराठी नही है"

मी आणि माझा मित्र आश्चर्याने त्यांना विचारलं "आपने कैसा पहाचना"

तर तो म्हणाला, की बिसलेरी च्या झाकणाचं प्लास्टिक आवरण डस्ट बिन मध्ये टाकायचं म्हणून तू खिशात ठेवलं आहे, पण तुझ्या मित्राने इथंच खाली फेकलं आहे.

माझ्या मते बहुतांश मराठी माणूस हा लॉयल असतो, प्रामाणिक असतो. अर्थात अपवाद आहेच पण ते सगळीकडे च आहेत. माणसा मधील धडाडी ही अनेक वर्षाची जडणघडण, सामाजिक परिस्थिती यातून बनलेली असते. ही एक इवोल्युशन प्रोसेस आहे. कदाचित तो कंटेंट असेल, अल्पसंतुष्ट ही असेल पण मराठी माणसाची इंटिग्रिटीं ही वादातीत आहे.

बाकी प्रांतात रिस्क घेण्याची क्षमता, धंदेवाईक पणा जास्त असेल ही पण त्या बरोबर काही दुर्गुण ही ठासून भरले आहेत. ती लोकं त्या दुर्गुणांना गुण म्हणून मिरवतात ही गोष्ट अलाहिदा. आपण मराठी मात्र दुर्गुणांना दुर्गुण संबोधतो हा एक मोठा गुण नव्हे काय?

हेमंत नावाचा एक माझा मित्र दुसऱ्या स्टेट मधून पुण्याला एका प्लांट चा हेड म्हणून आला. तो म्हणाला "इथले इंजिनियर हे खूप हुशार आहेत. त्यांचं नॉलेज हे वरच्या दर्जाचं आहे."

मला स्वतः ला महाराष्ट्र आणि कर्नाटक हे धंदा आणि नोकरी करणाऱ्या लोकांचं परफेक्ट ब्लेंड वाटतो. इथे लोकं हुशार आहेत आणि एथिकली बिझिनेस करतात. उद्योजकतेची खतपाणी करण्यात अत्यंत व्यवस्थित प्रयत्न चालू आहेत. आणि उद्योग करताना त्याचा उद्देश फक्त ओरबाडून पैसे कमावणे नसून, त्या पेक्षा मोठा उद्देश आहे याची पायाभरणी आजचा महाराष्ट्रीयन समाज करतो आहे अशी माझी प्रामाणिक धारणा आहे.

No comments:

Post a Comment