आमच्या मतोश्रींचे चार बँकेत सेव्हिंग्ज अकौंट आहे. त्यातील तीन राष्ट्रयीकृत तर एक को ऑपरेटिव्ह बॅंक. या शिवाय तिचं पोस्टात पण अकौंट आहे. ह्या पाच अकौंट मधील ऍक्टिव्हिटी चालू ठेवण्यासाठी ती एक दोन महिन्यातून चक्कर मारत असते. दोन बँक आणि पोस्ट घरापासून लांब आहेत. आर्थिकदृष्ट्या परवडत असूनही ती बऱ्याचदा या ठिकाणी वयाच्या ७३ व्या वर्षी बसने जाते.
मी तिला पुष्कळदा समजावून सांगतो की आता ही दगदग सोड. एका कुठल्या बँकेत अकौंट ठेव. वेगवेगळ्या बँकेत एफडी ठेवून १५ एच फॉर्म भरून टॅक्स वाचवायचे दिवस गेले आता. बरं माझा एक पैसा एफडीत नाही हे पण तिला माहीत आहे.
मी तिला सांगतो की तू म्हणत असशील तर तुझी गंगाजळी मी व्यवस्थित मॅनेज करून देतो. एकाच सिक्युर्ड बँकेत तुझं अकौंट ठेवू यात. तुझी दगदग वाचेल. आजकाल शहरात प्रवास करणं पण जिकिरीचं आहे. पण मी तिला या बाबतीत फोर्स करू शकत नाही. कारण तसं केलं की तिला माझ्या हेतुबाबत शंका येत असावी. तू माझ्या फंदात पडू नकोस, तुझं तू सांभाळ. असं ती मला बजावते. इकडेतिकडे शहाणपणा मिरवणारा मी आईपुढे मात्र हार मानतो.
असं विचित्र त्रांगडं आहे.
पण ठीक आहे. ज्यांच्यासमोर हार मानावी अशी व्यक्ती आयुष्यात आहे त्यामुळे त्रांगडं सुसह्य आहे.
No comments:
Post a Comment