अजूनही फार काही भारी नाही आहे, पण बारा एक वर्षांपूर्वी माझं इंग्रजी फार काही चांगलं नव्हतं. वापरातल्या बऱ्याच शब्दांचे मला अर्थ माहित नव्हते.
बंगलोर मध्ये एका इंडस्ट्रीअलिस्ट च्या घरी संध्याकाळी मी गेलो होतो. त्याने पार्टी ठेवली होती. आम्ही तिघे होतो.
यजमानाने ग्लेनफिडीच काढली. आणि मस्त किणकिण करणाऱ्या काचेचे तीन ग्लास. समोर खारवलेले काजू, चिजलींग्स आणि तळलेले प्रॉन्ज.
ग्लेनफिडीच चं झाकण उघडत मुरलीधरन साहेबांनी मला विचारलं "Are you teetotaler?".
मला वाटलं साहेब आपलं चहाबद्दल वगैरे विचारत असतील. कारण teetotaler या शब्दाचा अर्थच माहित नव्हता. मी म्हणालो "Yes, I am complete teetotaler" चहा तसाही मला प्रिय होताच.
"Oh, I am so sorry. I never asked you about it" असं म्हणत मुरलीधरन साहेबांनी माझ्यासमोरचा ग्लास काढून घेतला. मला काही कळलं नाही काय झालं ते.
"मग काय घेशील तू?"
काय घडतं काही कळत नव्हतं. ग्लेनफिडीच समोर असताना मुरलीधरन हे काय विचारतो आहे. चहा डोक्यात भिरभिरत होताच. माझ्या तोंडून पटकन निघून गेलं "टी"
माझं उत्तर ऐकताच मुरलीधरन माझ्याकडे दोन सेकंद बघतच राहिले. आता गेस्ट चहाच मागतोय तर तेच सही. म्हणून मग माझ्यासाठी चहा मागवण्यात आला.
आणि मग पुढचे दोन तास ते दोघे ग्लेनफिडीच अन प्रोन्जचा आनंद लुटत होते अन मी
चहा अन मारी बिस्कीट.
No comments:
Post a Comment