Friday, 19 May 2017

तारे जमीन पर

बस ने निघालो आहे. व्हिडिओवर तारे जमीन पर लागला आहे. घशात येणारे कढ थांबवायचे असतील तर काही तरी खरडण्याशिवाय पर्याय नाही.

पिक्चर बघताना पुन्हा एकदा जाणवलं की आई आणि पोराचं/पोरीचं नातं हे अजब असतं. त्यावरून एक आठवलं. मी मोबाईलवर एका प्रसंगाची क्लिप पाहिली. तो प्रसंग असा होता.

माझ्या भाचीचं नुकतंच लग्न झालं होतं आणि ती नागपूर हुन पुण्याला तिचा नवा संसार थाटायला आली. महिना दीड महिना झाला, पोर आईपासून दूर होती. मी या मायलेकीचं नातं जवळून पाहिलं आहे. माझ्या बहिणीने ठरवलं की पोरीला न कळवता भेटायचं. आणि ती नागपूरहून पुण्याला आली.

फ्लॅटची बेल दाबली. जावयाने दरवाजा उघडला. भाचीची आणि तिच्या आईची नजरानजर झाली. हातातला पोळ्याचा डब्बा तिने तिथेच टेबलवर ठेवला.

अन धावत जाऊन अत्यंत आवेगाने आपल्या आईला मिठी मारली. काही सेकंद दोघींनी एकेमकाना घट्ट पकडलं होतं. त्या मिठीतील ऊब मला निर्जीव मोबाईलमध्ये ही जाणवली.

त्या पन्नास सेकंदाच्या क्लिप मध्ये ज्या भावभावनांचा आविष्कार दिसला तो कोणतीही अभिनेत्री अभिनित करू शकणार नाही याची खात्री आहे.

असो. कुणी काहीही म्हणो, पण नंदकिशोर अवस्थीचा थोडा का होईना, माझ्यात अंश आहे याची जाणीव हा पिक्चर बघताना मला खूप अस्वस्थ करते.

No comments:

Post a Comment