फेबुकवर ओळखी झाल्या. त्यातून मी काहींना भेटलो, काही मला भेटायला आले. फेसबुकच्या ओळखीची पहिली भेट आजचे जागतिक कीर्तीचे छायाचित्रकार आणि नुकतेच पिता झालेले श्री गणेश बागल. मग बरीच मंडळी भेटली. त्यातल्या काही भेटी अविस्मरणीय. तैवान मध्ये दोन तास प्रवास करून खास मला भेटायला आलेले तुषार आणि गौरव. किंवा सत्कार हॉटेलच्या बाहेर माझी कार बघून पाऊण तास वाट पाहून, भेटल्यावर दोन वाक्य बोलून पाया पडून झटकन गेलेला विशीतील यशोधन. किंवा नागपूरमध्ये वैशाली आणि नंदकिशोर या दोघांनी केलेलं आदरातिथ्य ही काही वानगीदाखल उदाहरणं. असाच अनुभव आठ एप्रिलला वसईला घेतला.
सात आणि आठ एप्रिलला मुंबईत होतो. सातला श्रीनिकेत बरोबर गप्पा टाकल्या. त्याच्या भाषेत फेसबुक गॉसिप.
आठला एका अफलातून फॅमिलीला भेटलो. जिच्यामुळे भेटलो ती रुचिरा सावंत. यश इतकं वय. मी सामनात कॉलम लिहिला तेव्हा तिने मेल पाठवला, पहिला. म्हणजे तीन वर्षांपूर्वी. आणि मग ती अनेक गोष्टी सांगत गेली, तिच्या शिक्षणाबाबत. काही विचारत गेली. त्यातले बरेचसे प्रश्न मला कळलेच नाही. तिचा पिंड बेसिक सायन्सचा तर मी ऍप्लिकेशन कामगार. मी यथाबुद्धी तिच्या प्रश्नांना झेलत राहिलो. जिथे माहीत नाही तिथे सपशेल हात टेकले.
वसईला आलात की या असं सारखं निमंत्रण द्यायची. शेवटी आठ एप्रिलला योग आला. सावंत कुटुंबाने माझं जे आतिथ्य केलं त्याला तोड नाही. अत्यंत टापटीपीचं घर, अन त्या छोट्याशा घरात राहणारी मोठ्या मनाची माणसं. मला विचारून केलेलं साधं पण कमालीचं रुचकर जेवण. सावंत वहिनी घेतात तो ट्युशनचा क्लास, अन त्या क्लासमधील एकसुरात "नमस्कार काका" म्हणणारी शाळेतील पोरं पोरी. मी काही बोलायला लागलो की सावंत वहिनींना, सावंत साहेब "बोलू नकोस, त्यांना बोलू दे" असं सांगणारी खूण. घरी आलो म्हणून शाल श्रीफळ देऊन त्यांनी केलेला आदरसत्कार. त्यात रुचिराने लिहिलेलं एक मनस्पर्शी पत्र. माझ्या घरच्यांसाठी म्हणून दिलेले कोकणातील स्पेशल खाद्यपदार्थ. आणि या सगळ्यांवर कडी म्हणून त्यांनी वर्षावलेला अद्भुत प्रेमभाव. त्या वर्षावात चिंब भिजताना मी डोळ्यातील पाणी थोपवायचा जीवतोड प्रयत्न केला अन त्यात यशस्वी झालो.
चूक की बरोबर हे माहीत नाही. पण आयुष्याच्या रहाटगाडग्यात, प्रगतीचे दोर ओढताना मानव्याचा अंश हरवत चालला आहे. पण ते शहरात. छोट्या गावात हे मानव्य घाऊक भावात मिळतं ह्याचं याची देही याची डोळा दर्शन मला सावंतांच्या घरात ठायी ठायी घडलं.
फेसबुकमुळे तयार झालेल्या अंगणात अजून एक पणती पेटली. निरामय, प्रेमळ प्रकाश देणारी.
जिचं अकौंट फेक आहे असा मला संशय आला होता त्या रुचिरापासून चालू झालेल्या मैत्रीच्या धाग्यात मी तिच्या कुटुंबाबरोबर जोडला गेलो आहे. सावंत कुटुंबाचं आभार मानत नाही पण त्यांनी दिलेल्या प्रेमभावात मी कित्येक दिवस, महिने, वर्षे डुंबत राहील हे नक्की.
No comments:
Post a Comment