माझ्या आजूबाजूला बांधलेले आदर्शवादाचे बुरुज हे कितपत दणकट आहेत याबद्दल शंका आहे. थोड्या थोड्या धक्क्यांनी पण त्याला हादरे बसतात.
हे असे धक्के देणारे काही जवळचे मित्र असतात. एखाद्याची हलाखीची परिस्थिती पाहून आपल्या डोळ्यांत पाणी यावं आणि आपण त्यांना मनापासून सामावून घ्यावं आणि त्याने मात्र आपलंच डोळ्यातील पाणी वापरून आपल्यावर फवारा मारावा अन टाळ्या पिटाव्या. प्रोफेशनल लेव्हल ला कुणी खिंडीत पकडावं आणि सपासप वार करावेत. एखाद्या मुजोरने असाह्य परिस्थितीचा फायदा घेऊन फास असा आवळावा की आपली तडफड व्हावी. ज्या घरामुळे एखाद्याचं घर चालतं तिथेच त्याने चोऱ्यामाऱ्या कराव्यात.
गेल्या काही काळात असे बरेच धक्के बसलेत. आता काळच ठरवेल की ही आदर्शवादाची भिंत अभेद्य राहील की ती ढासळून त्याखाली मी गाडला जाईल.
कदाचित असंही होऊ शकेल की ती भिंत कोसळेल, आणि मी मात्र त्या ढिगाऱ्यातून तावून सुलाखून बाहेर पडेल. अंग धुळीने माखलं असेल. झटकून टाकेल ती धूळ एका फटक्यासारशी. विखुरलेल्या दगडांना एका नवीन उमेदीने पुन्हा एकदा गोळा करेल आणि मग पहिल्यापेक्षा अभेद्य भिंत बांधेल. काय माहित, भविष्यातील हादऱ्यांची तीव्रता जास्त असेल.
हे चक्र मरेपर्यंत चालू राहील. आदर्शवादाला मग तेव्हाच तिलांजली मिळेल.
No comments:
Post a Comment