Monday 22 May 2017

मॅकडोनाल्ड

का कुणास ठाऊक, पण मॅकडोनाल्ड मला काही फार भावत नाही. मुळात आपण भारतीय अन त्यातल्या त्यात मराठी हे कुठल्याही गोष्टीत भावभावना शोधतात. मॅकडोनाल्ड मध्ये मानवी भावभावनांचं खूप यांत्रिकीकरण झाल्यासारखं वाटतं.
तिथली ऑर्डर घेणं, ती देणं, खाताना पाणी द्यायला उशीर करणं अन त्याऐवजी कोल्डड्रिंक विकून पाजणे, सॉस डिस्पेन्सर, तो पोचा मारणारा आणि खाल्ल्यावर निर्विकार पणे वेस्ट बिन ला ट्रे घेऊन जाणारा माणूस. सगळं कसं यंत्रवत. यायचं असेल तर या, खायचं असेल तर खा, जाताय तर जा असा सगळा मामला.

त्यांनी त्यांच्या बिझिनेसचं मार्केटिंग करताना सॉफ्ट टारगेट शोधलं अन ते म्हणजे लहान मुलं. त्यांच्यासाठी फुगे, खेळणी, वाढदिवसाच्या पार्ट्या असले उद्योग करतात. आणि मग पोरं आपल्या आईबापांना आपसूक ओढत आणतात. सगळ्या जगात त्यांच्या प्रकृतीस घातक अशा खाद्यपदार्थांची बोंबाबोंब होत असताना तेच पदार्थ थोपण्याची त्यांची अरेरावी उद्दाम आहे.

मी भारतात मॅकडोनाल्ड ला खूप कमी वेळा गेलो. सगळ्यात जास्त वापर केला तो चीन मध्ये. नॉन व्हेज खात असूनसुद्धा चीनमध्ये खायचे वांदे होतात. तिथे मी आठवड्या भराच्या वास्तव्यात पाच सहा वेळा मॅकडोनाल्ड मध्ये गेलो.

मला असं वाटलं त्यांच्या पदार्थांच्या क्वालिटीच्या निगेटिव्ह गोष्टींबद्दल वाचल्यामुळे माझ्या मनात एक अढी असेल. पण ती अढी का आहे हे मी फाऊंडर पिक्चर बघितल्यावर कळलं.

फाऊंडर.......

मॅकडोनाल्ड ची स्टोरी. रे क्रॉक, क्रॉक कुठला क्रोकडाईल च तो. समोरच्याला गिळंकृत करणारा.

अत्यंत पापभिरू अन इमानेइतबारे धंदा करणाऱ्या मॅकडोनाल्ड बंधूकडून त्याने हा बिझिनेस अक्षरशः हिसकावला. लुटलाच म्हणा. अर्थात काही जणांना रे चं वागणं पटेलही, पण मला नाही पटलं. श्रीमंत बनण्याच्या हव्यासापोटी आणि त्या वृत्तीला persistance, पाठपुरावा असं गोंडस नाव देऊन जगातली सगळी सुखे पायावर लोळवून घेतलेल्या रे चा मला रागच नव्हे तर तिरस्कार वाटला. ज्या ब्रूट मसल पॉवर बद्दल अमेरिका बदनाम आहे त्याचा अनुभव फाऊंडर बघताना ठायीठायी येतो. रे क्रॉक मॅकडोनाल्ड ची लूट करत असताना लाज अक्षरशः कोळून पितो. ०.५% वर्षाला रॉयल्टी द्यायच्या क्लॉज ला पानं पुसतो (आज मॅकडोनाल्ड कुटुंबाला त्यापोटी १८०० कोटी रु वर्षाला मिळाले असते), तो मॅक च्या तब्येतीची काळजी करत नाही, इन्व्हेस्टरच्या बायकोला पटवतो, राक्षसी स्वप्न पूर्ण करण्यासाठी बायकोला घटस्फोट देतो, ज्या मॅकडोनाल्ड बंधूनी बर्गर बनवण्याची स्पिडी सिस्टम बनवली त्यांचं नामोनिशाण गायब करतो अन अत्यंत मानभावीपणे डिक मॅकडोनाल्ड ला आपलं कार्ड देतो, रे क्रॉक, फाऊंडर, मॅकडोनाल्ड कॉर्पोरेशन.

कुठल्याही कंपनीची टॉप मॅनेजमेंट जशी वागते ती क्वालिटी अगदी कंपनीच्या खालच्या लेव्हल पर्यंत पाझरत जाते.  एखाद्याशी बिझिनेस व्यवहार करतानाचा निर्विकारपणा रे क्रोकच्या वागण्यातून जाणवतो अन मॅकडोनाल्ड च्या काउंटर वरील बारक्या पोरापोरींच्या वागण्यातून सुद्धा.

No comments:

Post a Comment