Friday 19 May 2017

हे असं आहे, काय मग

बऱ्याचदा सोशल मीडिया वर कसं व्यक्त व्हावं याबद्दल बराच उहापोह होतो. कधी वाखाणलं जातं, तर कधी हिणवलं जातं. कुणी कौतुक करतं तर कुणी खिजवतं. माझा स्वतः चा आव इथे माहितीच्या देवाणघेवाणी चा आहे. आणि त्यापासून फारकत घ्यायची मला सध्यातरी आवश्यकता वाटत नाही. अन तसं वाटणाऱ्या काही घटना पण घडल्या.

नोव्हेंबर महिन्यात सत्कार हॉटेलच्या बाहेर  विशीतला यशोधन मला भेटला अन म्हणाला "सर, तुमची कार पाहून पाऊण तास मी वाट बघत थांबलो आहे. तुमचे विचार वाचून एक दिशा मिळते जगण्याची" असंच काहीबाही बोलून झटकन पाया पडून गेला सुद्धा. अन मी हतबुद्ध होत त्याच्याकडे बघत राहिलो. हे एक वानगीदाखल उदाहरण.

बरं दुसरं असं की राजकारणाबद्दल काही लिहावं इतकी माझी पोच नाही. आकलनशक्ती नाही. मुख्य म्हणजे, बाजू तरी कुणाची घ्यावी. धार्मिक उन्मादाचा उघड किंवा छुपा पुरस्कार करणारी लोकं, की ज्यांच्याशी वैचारिक नाळ जुळते अशांनी घराणेशाहीच्या आहारी जाऊन राष्ट्रहिताला तिलांजली देणाऱ्यांची. एका बाजूला मुत्सद्दीपणातून भ्रष्टाचारी नेत्यांची फौज तयार करणारी लोकं तर दुसऱ्या बाजूला प्रदेशिकवादाची संकुचित प्रवृत्ती जोपणारी मंडळी.

दुसरं झालंय असं की समाजकारण सुद्धा माजकारण झालं आहे. क्षुल्लक गोष्टीवरून रस्त्यावर होणाऱ्या मारामाऱ्या, डॉक्टर्स ना मारहाण, हॉस्पिटलची तोडफोड, गावगुंडाची चालणारी अरेरावी, स्त्रियांवर होणारे अत्याचार, स्मारकं, पुतळे, रस्त्याची नावं यावरून होणारे विध्वंसक वितंडवाद अन या सगळ्यांवर कडी करणारा, ज्याचं खरं तर निर्मूलन व्हायला पाहिजे तो जातीयवाद अन धार्मिक वाद. सोशल मीडिया मुळे असंतोष पसरत नाही या माझ्या प्रस्थापित विचारांना धक्का पोहोचवणाऱ्या घटना डोळ्यासमोर घडल्या आणि अशी सामाजिक तेढ दाराजवळ येऊन पोहोचली आहे याची भयानक जाणीव झाली.   आताच कुणीतरी बोललं की जाने भी दो यारो सारखा पिक्चर आज आला तर काय गजहब होईल!आणि या सामाजिक घसरणीला नुसते नेतेच नाहीत आपण सगळेही जबाबदार आहोत. ही उतरंड गेल्या काही वर्षात नाही तर काही दशकात झाली आहे.

मग अशा काळात माझ्यासारखा सामान्य माणूस आलिया भोगासी असावे सादर या उक्तीप्रमाणे समोर आलेल्या आव्हानांना सामोरे जात वाट काढत जातो. ज्या लोकांशी डायरेक्ट वा इंडायरेक्ट संबंध येतो त्यांनी या विषारी विचारांना दूर ठेवावं यासाठी माझ्या परीने प्रयत्न करतो. ज्या देशात आपण जन्मलो त्याची विविधता ही कॉम्प्लेक्स असली तरी स्थायीभाव आहे. तो जपणं हे माझं समाजाप्रती उत्तरदायित्व आहे. आणि ते ऋण फेडण्यासाठी मी प्रत्यक्ष जीवनात आणि सोशल मीडियावर कसं वावरायचं याची ढोबळ प्रणाली ठरवली आहे. त्यात मग राजकीय, धार्मिक विषयावर कमीत कमी भाष्य करायचं. कुठल्याही जातीबद्दल प्रत्यक्षात काडीचंही प्रेम वा अंशभरही द्वेष ठेवायचा नाही. आणि खरोखर सांगतो कोणत्याही जातीबद्दल ओलावा किंवा दुरावा हा मला प्रोफेशनल वा पर्सनल आयुष्यात परवडणारा नाही. त्यामुळे कोणत्याही जातीचा उल्लेख पोस्ट मध्ये तर काय पण कॉमेंट मध्ये पण करायचा टाळतो.

मग माझ्याकडे उरतं काय? तर अत्यंत चमत्कारिक परिस्थितीतून रांगणारा बिझिनेस. त्यातून येणारे चित्र विचित्र अनुभव. त्यात काही मानाचे, काही अपमानाचे, मूठभर प्रेमाचे, पसाभर द्वेषाचे, गुंजभर दुःखाचे अन मणभर सुखाचे क्षण. त्याची दवंडी पिटण्या चं सोडून माझ्याकडे काही नाही.

म्हणून म्हणतो, कुणी म्हणत पण असेल मला दीडशहाणा, म्हणो बापडे पण जे मी ठरवलं त्यापासून फारकत घेण्याची मला सध्यातरी गरज वाटत नाही.

No comments:

Post a Comment