Friday 19 May 2017

झुंडशाही

माझ्या ओळखीचे एक गृहस्थ विजयराव. रिटायर झाल्यावर एकावर्षात त्यांची प्लास्टी झाली. मागच्या महिन्यात, म्हणजे प्लास्टी नंतर तीन वर्षांनी त्यांना छातीत दुखू लागलं म्हणून हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं.

सगळं चेकिंग झालं. अँजिओग्राफी झाली. ब्लॉक कुठेही आढळला नाही. डॉक्टरांनी दुसऱ्या काही कारणांनी दुखत असेल म्हणून जनरल फिजिशियन ला दाखवायला सांगितलं, आणि दवाखान्यातून डिस्चार्ज दिला.

विजय राव घरी आले, अन त्याच रात्री चार वाजता त्यांचं हृदय बंद पडून निधन झालं.

मी आणि वैभवी त्यांना भेटायला गेलो. वैभवी शैला वहिनींना, विजयरावांच्या पत्नीला, म्हणाली की मी हॉस्पिटल मध्ये जाऊन विचारून येऊ का की असं कसं झालं? काही निदान चुकलं का?

तर शैला वाहिनी आणि त्यांची मुलगी नेहा म्हणाल्या "नको वैभवी, जे नशिबात होतं ते तर घडून गेलंय. आता ह्या सगळ्याचा काय फायदा"

शैला वाहिनी आणि त्यांच्या कुटुंबियासारखे शेळपट लोकं या देशात राहतात म्हणून हा आपल्या सगळ्यांचं सामाजिक स्वास्थ्य हरवलंय, त्यांच्यामुळे सगळीकडे बजबजपुरी झाली आहे. जमेल तिथं मनगटाची अन लाथांची ताकद न दाखवणारी लोकं या समाजात राहतात म्हणून आपली सामाजिक उतरंड चालू आहे.

चला, हे असं वागणं बदलू. शक्य असेल तिथं आपण झुंडशाही दाखवू, निर्बलांवर अत्याचार करू, असहाय्य लोकांना साथी हाथ बढाना म्हणत फटके देऊ.

हे असं वागलात तर आपण येत्या दशकात आर्थिक महासत्ता बनू.

No comments:

Post a Comment