Friday 19 May 2017

निधर्मी

इतिहासात रमणारी माणसे आणि चहात बुडावलेलं बिस्कीट सारखेच असतात........लिबलिबीत. एक देश म्हणून, समाज म्हणून आपण असेच होत चाललोय. लिबलिबीत. कारण आम्हाला वर्तमानाची पडली नाही, भविष्याची चिंता नाही. आम्हाला गोंजारायचा असतो अभिमान तो आमच्या दैदिप्यमान भूतकाळाचा. ज्याला खरंतर बाकी जगाच्या दृष्टीने शून्य महत्व आहे. आणि आम्ही कितीही वर्षे मागे जाऊ शकतो आणि आज त्यावर भांडू शकतो. राज्यकर्ते पण आम्हाला असे भेटले आहेत आणि त्यातल्या त्यात गेल्या दोन दशकात तर या लोकांनी इतकी जोरदार दुफळी माजवली आहे की ज्याचं नाव ते. निधर्मी म्हणून गौरवल्या गेलेल्या राष्ट्राची टॅग लाईन बदलून सर्वधर्म सम भाव अशी केली. कुठल्याही धर्माला थारा न देणाऱ्या देशाची अवस्था झाली ती सर्वच धर्माना गोंजारणारी. आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला धार्मिकतेचा एकतर छुपा किंवा काहीजण उघड उघड पुरस्कारच नव्हे तर असंच असायला पाहिजे हे ठासून सांगणारी लोकं. आणि या दोघांच्या मध्ये भरडले जाणारे तुमच्या माझ्या सारखे सामान्यजन.

विविधता में एकता वगैरे फक्त तारक मेहता का उलटा चष्मा मध्ये बघायला मिळतं. आणि या सोशल मीडिया ने तर इतका उच्छाद मांडला आहे, काय सांगायचं. मला पहिल्यांदा वाटलं होतं की हे काही समाजाच्या मानसिकतेवर परिणाम करणार नाही. पण होतोय. त्या गोबेल्स का कुठल्या नितीप्रमाणे द्वेषमूलक मेसेजेस चा इतका भडिमार होतोय अन जातीय, धार्मिक द्वेषाची आग घराच्या दरवाजापर्यंत आली आहे, त्याची धग जाणवत आहे. ही झळ शाकाहारी, मांसाहारी पर्यंत खालच्या लेव्हल ला जावी यापेक्षा दुर्दैव ते काय?

खरंतर मानसिक दृष्ट्या आपण इतके मागासलेले आहोत की कुठलाही रस्ता, पूल, योजना याला इतिहासातल्या व्यक्तीचे नाव देणे सरकारने बंद करावे. कारण ते फक्त वाद निर्माण करतात. मुंबई-नाशिक महामार्ग छान वाटतं की ऐकायला. किंवा फ्लायओव्हर क्रमांक २५, काय वाईट आहे. नवउद्योजक कर्ज योजना, ठीक आहे की. नका आमच्या अस्मिता गोंजारू. त्या गोंजारताना कधी आमच्या भावना भडकवतात ते कळत पण नाही.

हे पुरस्कार. झाले गेले ते विसरून जा. आता इतिहासातल्या कुठल्याही नेत्याला नका देऊ भारत रत्न. वर्तमानात तुम्हाला घडवता येत नाहीत. भूतकाळातल्या लोकांना पुरस्कार वाटून भविष्य काळ काही उज्वल होणार नाही.

जगाच्या पाठीवर आपल्या इतका कॉम्प्लेक्स देश कुठलाही नाही.  त्या विविधतेला विसरून निधर्मी असण्याशिवाय आपल्याला चॉईस कुठे आहे.? 

No comments:

Post a Comment