Friday 19 May 2017

शहरातल्या पहाट

आज पहाटेच मॉर्निंग वॉक ला निघालो. पाच ची वेळ.

उजवीकडच्या पहिल्या वळणाला एका दुकानाच्या पायरीवर ती आणि तो बसले होते. ती हमसाहमशी रडत होती, तो तिला काहीतरी जीव तोडून समजावत होता. त्यांच्यातला अजून एक मुलगा त्या दोघांकडे बघत सिगरेट पित उभा होता. प्रकरण काय ते कळलं नाही.

थोडं पुढे चालत गेल्यावर रस्त्यावर एक कुत्रा छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडला होता. रात्रीच कुणी वाहनाने उडवलं असेल त्याला. आतडी रस्त्यावर पडली होती. ज्यांच्या लक्षात येत होतं, ते त्याला चुकवून जात होते. ज्यांच्या नाही ते वाहनचालक त्यावरून जात होते अन त्याची विछिन्नता वाढवत होते.

पुढे चालत गेलो तर डिव्हायडर वर कार चढली होती. रात्री कधीतरी ऍक्सिडेंट झाला असावा.  रेडिएटर चं पाणी खाली दिसत होतं.

रस्ता परिचयाचा. चहाचं दुकान नुकतच उघडलं होतं. चहावल्याने दोन कप चहा आणि पाव जमिनीवर फेकला, नैवेद्य म्हणून. रोज फेकतो.

मॅकडोनाल्ड च्या समोरच्या फुटपाथवर दोन कुटुंब झोपली आहेत. त्यातलं दोन एक वर्षाचं नागडं मूल  आईला उठवायचा प्रयत्न करतंय.

२०० मीटर नंतर कचऱ्याचा ढीग असतो. त्यातून एक विचित्र दुर्गंधी येत असते. एखादं डुक्कर वगैरे मेलं असावं बहुधा.

मी रेसकोर्स ला येतो. त्याच्या गेट वर शूज, चपला आणि पाण्याच्या बाटल्या इतस्ततः विखुरलेल्या असतात. आदल्या दिवशी जवानांची भरती होती. गर्दी होऊन चेंगराचेंगरी झाली असावी.

शरीरात ऊर्जा येण्यासाठी मी सूर्य उगवायची वाट बघत राहतो.

शहरातल्या पहाट आजकाल रम्य बिम्य नसतात.

No comments:

Post a Comment