Friday, 31 October 2014

का?

ऐकीव माहिती आहे, म्हणे अॅमस्टरडॅम मधे सायकलचं खुप वेड. पण मग सायकलीच्या चोर्या होऊ लागल्या. देशाच्या अर्थव्यवस्थेपुढं सायकलची किंमत ती काय. पण पोलिस तक्रारी वाढल्या. भांडणं वाढली. शासनानं गंमत केली. मुख्य चौंकात ४-५ हजार सायकली ठेवून दिल्या. लोकांना सांगितलं, काय वापरायच्या ते वापरा. आणून परत ठेवून द्या. सायकल चोरीचं प्रमाण कमी झालं.

आमच्या SKF मधे तीन ची Allen key कमी. छोटी असल्यामुळे हरवायची. मग लोकं एकमेकांची ढापायचे. ज्याच्याकडं नसायची त्याचं काम delay व्हायचं. आम्ही एक काम केलं ३ च्या १०० Allen keys आणून ठेवल्या open box मधे. लोकांना सांगितलं, वापरा पण परत आणून ठेवा. १०-१५ गेल्या, पण परत ३ च्या Allen key साठी काम अडलं नाही.

आपल्याला कमी वाढतो की काय, किंवा परत वाढायला येईल की नाही, या भितीपोटी लोकं जास्त वाढून घेत असावेत. अन्न वाया जाऊ लागलं. त्यातूनच buffet जेवणाची पद्धत आली असावी. तुम्हाला पाहिजे तेवढं घ्या. अन्न कमी वाया जाऊ लागलं असेल.

अमेरिकेत बर्याच ठिकाणी कोक किंवा coffee चं refill फुकट मिळतं. मग असं होतं का हो, फुकट मिळतं तर लाईन लागली आहे.

काय असेल बरं मानसिकता. कुठं थांबायचं हे काही बाबतीत कळतं, पण काही बाबतीत नाही.

म्हणजे एका जन्मात पुरेल इतके पैसे कमावल्यावरही, माणसाला पैसे कमावण्यासाठी का काम करावं वाटतं? का पुढच्या पिढीच्या भविष्याची तरतूद करून ठेवावी वाटते? त्याचा त्याच्या मुलामुलींच्या कर्तृत्वावर विश्वास नसतो का?

किंवा दारू फुकट मिळाली तर पार उलट्या होईपर्यंत, फालतूची बडबड करेपर्यंत माणूस का पितो? त्याला असं वाटतं का की परत ही वेळ आपल्या आयुष्यात येणार नाही म्हणून.

त्या ५-६ वर्षाच्या मुलींवर अत्याचार करताना कुठे या लोकांची बुद्धी शेण खायला जाते?

धड धाकट अशा तीन तीन लोकांची हत्या करताना यांचे हात थरथरून थांबत का नाहीत?

का?

मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा

फेसबुकवर चौफेर वाचन करत असल्यामुळे मला राजकारण्याचंही एक गुप्त अंग (शब्द जोडून वाचून नये) आहे असा एक फील येऊ लागला आहे. माझ्या राजकीय विश्लेषणाची (ख्या ख्या, असं कोण हसतय रे) दखल कुणी घ्यावी असंही नाही, पण त्यातून डावी विचारसरणी प्रतिध्वनित होते असं माझं मन सांगत होतं. (माझ्या राजकीय विचारांची माझ्याशिवाय दुसरा कुणी कुत्राही दखल घेणार नाही हे माहित आहे. आता या वाक्यात मी स्वत:ला कुत्रा म्हणवलं असा कुणी जावईशोध लावला तर माझा नाईलाज आहे.) फेसबुकवर येईपर्यंत, माणूस एक तर सरळ किंवा वाकड्या विचारसरणीचा असतो एवढंच माहित होतं. ही डावी अन उजवी विचारसरणी म्हणजे वेगळंच झेंगट. असो.

तर आपणच तयार केलेल्या भाजप विरोधक या प्रतिमेला जागणं तर भाग होतं. ते बजावत मी कालपासून देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलच्या पोस्ट वाचत होतो. पेपर पण अख्खा चाळून काढला. आजचा लोकसत्ता (मला काही कळत नाही, पण काही लोक याला संघसत्ता संबोंधतात. इथं बोंबलायला मला तरूण भारत संघाचं आणि लोकमत/सकाळ काॅंग्रेसचा वाटत नाही तर बाकीच्यांची काय कथा), मग मटा, पुढारी, संध्यानंद सगळे पेपर पिंजून काढले. पेपर मधे तर नाहीच नाही, पण फेसबुकवरच्या पोस्टमधेही कुठे टिंगल टवाळी नाही. पार विश्वंभर चौधरीपासून ते माझा आवडता मित्र निर्भय पर्यंत सगळ्यांनी स्तुतीच केली राव. माझी पंचाईतच झाली. म्हंटलं आपल्याला काही सुचत नाही तर कुणाला तरी अनुमोदन द्यावं. पण नाहीच. नाही म्हणायला काही माझ्या सेन्सिबल मित्रांनी ते ब्राह्मण किंवा संघाचे म्हणून, पेशवाई आली वैगेरे अशी गरळ ओकली, पण आपल्या काय पल्ले नाही पडली. त्यामुळे असल्या फडतूस पोस्टच्या मी वार्यालाही उभा नाही राहिलो.

आता काय विधीमंडळ नेते झालेच आहेत. मुख्यमंत्री होतीलच. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.

लेन्स आणून ठेवली आहे. घासून पुसून साफ करून ठेवतो, आणि बघतो कुठं काही चुकतंय का साहेबांचं. आणि मग हाणायचं काहीतरी तिरकं. तेव्हढेच आपली प्रतिमा जपल्याचं समाधान. नाही का?

मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा


Tuesday, 28 October 2014

Bargaining

दहा बारा वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी अहमदाबादला गेलो होतो. तिथे नवरंगपुरा मार्केटमधे गेलो होतो. म्हंटलं मुलासाठी ड्रेस घ्यावा. त्यावेळी कुठल्याही गावाला गेलो की आई सांगायची, घरातल्या लोकांसाठी आणत जा काहीतरी. त्याआधी दोन वर्षापूर्वी बायकोला बंगलोर हून रु १६०० ची साडी आणली होती. तेव्हापासून या प्रकारातला माझा interest तसा कमीच झाला होता. आता तर कुठं गेलो आणि कुणी गिफ्ट वैगेरे दिलं तर घेऊन येतो. नाहीतर तसाच. (भेटलो तर लक्षात ठेवा)

तर काय सांगत होतो, गेलो दुकानात. आणि बोललो दाखवा ड्रेस. किमती चालू झाल्या २००, २५०, ३००. मला एक ड्रेस फारच आवडला. पण किंमत रु ३५०. दुकानदाराला म्हणालो "थोडा कम करो ना". नंतरचं संभाषण तो गुजरातीत आणि मी हिंदीत (इथे मराठीत) चालू झालं. गुजराती लोकांचं हे एक वैशिष्ट्य, समोरचा तमिळ मध्ये बोलत असला तरी हे गुजरातीत, मग माझ्यासारख्या मराठी बाणाची काय कथा. उगाच नाही वेस्टर्न लाईन चा भैया  पण गुजराती बोलत. 

दु:  तू सांग 
मी: २०० ला दया
दु:  नाही परवडत.
मी: बरं ठीक आहे, २२५ ला दया
दु: नाही जमणार
मी: तू सांग
दु: ३००
मी: थोडे कमी करा कि
दु: नाही जमणार. ३०० च्या खाली एक रुपया नाही.

तो अशा टेचात म्हणाला कि माझाही मराठा बाणा जागा झाला. मी बोललो "राहू दे मग. जातो मी" तो म्हणाला " जेवढयात मिळतं घ्या, नंतर पस्तावाल." मी बोललो "अरे जा, तू काय एकटाच आहे का मार्केट मध्ये. शोधेन मी" आणि तडक निघालो. दीड तास मार्केट पालथं घातलं, पण तसा ड्रेस काय मिळाला नाही. परत गेलो त्या दुकानात आणि म्हणालो "दया तो ड्रेस"

दु: हे घ्या
मी: ३०० ना
दु: नाही आता ३५० लाच.
मी: अहो असं काय, मगाशी ३०० म्हणालात ना
दु: मग तेव्हा का नाही घेतला. आता भाव ३५०.
मी: अहो असं काय करता, दया  ना  हो प्लीज ३०० ला.
एव्हाना त्याचा साथीदार आला.
दु: एकदा बोललो ना आता ३५० म्हणजे ३५०. त्याच्या खाली एक पैसा नाही. पाहिजे असेल तर घ्या नाही तर बघा.
मी: (काकुळतीने) अहो द्या ना ३०० ला, मुलगा खुश होईल, बायको ओवाळेल मला.
दुकानदार साथीदाराकडे बघतो. साथीदार दरवाज्यापाशी जाऊन उभा राहतो, दरवाजा उघडतो, "आता निघा" असं नजरेतूनच बोलतो. माझ्या मनात विचार आला, साला जेवढयाला मिळत होता ड्रेस, घेतला असता तर बरं झालं असतं. उगाचच नाटकं केली. मन कुरतडत बसलो.

उद्धव ठाकरेंच्या मनात काय चालू आहे याची कल्पना आहे मला.

दोन गोष्टी:

- तो ड्रेस शेवटी घेतला कि नाही हे दोन दिवसात सांगतो.
- तुमच्या मनात आलं असेल कि तो दुकानदार पण दाढीवाला अन ५६ इंच छातीवाला आणि साथीदार दाढीवाला अन डोक्यावर टक्कल असलेला होता का? तर उत्तर आहे, नाही.  इतके पण योगायोग नसतात घडत आयुष्यात.

Saturday, 25 October 2014

करद्यातली सकाळ

करद्याचा निसर्गरम्य समुद्रकिनारा. सकाळची सहाची रम्य वेळ. त्या किनारी कुणीच नाही. पायाला गुदगुल्या करणार्या वाळूतून एकटाच चालत असणारा मी. लाटा किनार्यावर विसर्जित झाल्यावर परत जाताना झालेली वाळूची मोहक नक्षी. अचानक मला त्या खळाळणार्या समुद्राच्या किनार्यावर दिसलेले असंख्य पक्षी. काही उडणारे, काही नितळ पाण्यात खाद्य शोधणारे, तर काही नुसतेच बसलेले.

मला वाटलं अशा रम्य वेळी मी एकटाच का. मला वाटलं माझ्याबरोबर असायला पाहिजे...................,माझ्याबरोबर असायला पाहिजे.......................गणेश बागल

कसलं कद्रू डोकं दिलं आहे मला. अशावेळी स्वत:च्या बायकोबरोबर चालण्याचा विचार करायचा सोडून, गणेश. छ्या. "आपल्याला हव्या ते वेळी हव्या त्या व्यक्तिची आठवण न येणे म्हणजे नरक." वपु

(खरंतर हे भंगार वाक्य माझंच आहे. याला आपण वपुंचं मरणोत्तर साहित्य म्हणू यात फारतर. सध्या पुलंची प्रार्थना जोरात फिरत आहे. वपुंवर का अन्याय)

कुठल्याही बीच रिसोर्ट ला किंवा कुठल्याही ट्रॅव्हल एजन्सीबरोबर मी टूर वर गेलो की "स्वत:च्या" हे आवर्जून लिहावं लागतं यावर माझे समस्त पुरूषमित्र सहमत असावेत. बाकी दोन गोष्टी पहायला मला अशा ठिकाणी मला बिलकुल आवडत नाही, एक म्हणजे माझे सुटलेले पोट व एकंदरच अस्ताव्यस्त पसरलेलं शरीर आणि दुसरं म्हणजे स्वत:च्या व्यक्तिमत्वाला न शोभणार्या अन त्याला व्यवस्थित carry न करू शकणार्या ३/४th घातलेल्या बायका. हो म्हणजे, स्वत:च्या सोडून दुसर्या बायकांबरोबर चालण्याच्या विचार करण्याच्या पापापासून मला जर कुणी वाचवत असेल तर हा 3/4th युक्त ड्रेसिंग सेन्स. आणि या एका कारणासाठी कुणाची नज़र लागू नये म्हणून मी माझ्या बायकोला ही ती घालण्यास उद्युक्त करतो. Men will be men. पण ३/४th या पाश्चात्य वेशभूषेबद्दलचा मनातला आकस समस्त पुरूषवर्गाने कमी करायला हवा. त्याचं असं झालं की मी व मंडळी मुरूडगावात देवीच्या मंदिरात दर्शनाला गेलो, तर तिथे पाटी "प्रवेश हिंदू पद्धतीने पोशाख केलेल्यांना" मला वाटलं मंडळीला बाहेर उभं रहायला सांगतात की काय! तर पुजारीने काही अडवलं नाही बुवा. यावरून मी तीन inferences काढले

- ३/४th हा आता हिंदु पोशाख म्हणून मान्य व्हावा (हे मोहन भागवतांसाठी) बाकी ३/४th च्या 1/4th होतील तेव्हा डोळे उघडतील, असंही  काही लोकं म्हणतील. पण एकच सांगू इच्छितो. जर्मनीला चर्च मधे गेलो होतो. मी अन रियाज. म्हणजे एक हिंदू अन एक मुसलमान, ख्रिश्चन देवालयात. मुख्य म्हणजे चर्च मधे एकही उघड़ी नागडी स्त्री दिसली नाही. मला म्हणायचं हे की कुठे कसे कपडे घालायचं याचा sense असतो बायकांना
- हिंदु पद्धतीने पोशाख, म्हणजे पोशाख असावा आतमधे माणूस पाहिजे. बरीच प्रगती म्हणायची की. (हे शंकराचार्यांसाठी. तुम्ही किती समाजाला मागे ओढण्याचा प्रयत्न केला तरी तो सुधरतोय) काही वर्षात जाईल ती पाटीही.
- पुर्वी एका पेक्षा अधिक बायका असाव्यात म्हणून ओळख करून देताना "या आमच्या मंडळी" असं म्हणत असावेत. मी आपलं सहज मंडळी म्हणून लिहून बघितलं. लिहीतानाच हडबडलो.

खरं म्हणजे पुरावा म्हणून दोन चार फोटो मोबाईलमधून उडवले पण आहेत मी. (या वाक्याचा अर्थ डिलीट केले असा वाटत असेल, पण तो फ्लॅश उडवला म्हणजे फोटो काढला या धर्तीवर घ्यावा. १९६८ ला जन्मलेल्या माणसाने नवीन technology adapt केली तरी त्याची बुद्धी जुनाटच आहे याचं हे एक उत्तम उदाहरण), पण ते इतके गचाळ आहेत की माझी ते पोस्ट करण्याची daring नाही झाली. गणेशचं नाव ज्या फ्रेम मधे आहे तिथे माझं फोटो, ते पण पक्ष्यांचे, लावणं म्हणजे पंडितजींच्या समोर एखाद्या बाथरूम सिंगरने "इंद्रायणी काठी" म्हणण्याचं धाडस करण्यासारखं आहे. (उपमा चुकली का? पंडितजी म्हणजे  जरा जास्तच झालं नाही का. बरं मग आनंद भाटे, नाहीतर जयतीर्थ मेवूंडी, नाहीतर राहूल  देशपांडे, नाहीतर.......... बास पेपर मधे वाचून शास्त्रीय गायकांपैकी ही तीनच नावं आठवत आहेत) 


असो. तर गणेश, या पोस्टमधे मी तुझी खुपंच स्तुति केली आहे. माझा एक दोन दिवसात तुला जर फोन आला तर काही तरी assignment साठी केला असं काही वाटू देउ नको ही लै म्हणजे लैच नम्र विनंती. फोनला उत्तर द्यावे.

Sent from my iPad

Wednesday, 22 October 2014

ISRO हवाल आणि हाल

परवा परत आले होते  ISRO चे scientist. मग परत ते मंगलयानाचं टॅक्सी पेक्षा कमी चार्ज वैगेरे झालं. हसलो परत. त्यांनी काही भारी गोष्टी सांगितल्या अजून. एक तर यानाच्या velocity मधे पूर्ण प्रवासात जर कधीही 0.1 m/sec इतका जरी फरक पडला असता तरी यान भलतीकडेच भरकटलं असतं. यानाने पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षण कक्षेत ७ फेर्या मारल्या. हेच काहीतरी पुढच्या प्रवासासाठी इंधन होतं. (हे काही कळलं नाही, पण असंच काहीतरी म्हंटले बुवा). पृथ्वीच्या कक्षेतून, मंगळाच्या कक्षेत जाताना अशी वेळ निवडली होती जेव्हा दोन ग्रहात कमीत कमी अंतर होतं. पृथ्वीच्या बाहेर गेल्यावर एक मेसेज जायला एका बाजूने १२ मिनीट लागतो. म्हणजे एखादा fault जर आला तर तो solve झाला की नाही याला २४ मिनीटे लागतात. प्रत्येक गोष्टीसाठी plan B तयार होता. पण यानाच्या संपूर्ण प्रवासात कुठलाही plan B वापरावा लागला नाही. ज्या वेळेला पाहिला मेसेज येणं expected होतं, तो येण्यात एक सेकंदाचाही फरक पडला नाही.

आले त्याच दिवशी IRS हा communication satellite पाठवला होता. सिरीजमधला दुसरा. सात पाठवायचे आहेत. ते झालं की अख्खा भारत GPRS साठी कव्हर होईल. अमेरिकेची गरज पडणार नाही.

काही दिवसांपूर्वी कॅनडा, Switzerland, Germany, France या प्रगत चार देशांचे एकूण ५ satellite आपण एकाच launcher ने ठेवून आलो orbit मधे.

३०० बिलीयन डाॅलरची बाजारपेठ ही मंगलयानामुळे नसून क्रायोजेनिक इंजिन बनवण्याच्या सफलतेमुळे आणि वरच्या दोन business avenue मुळे आहे.

Cheers. मजाच आली हे सगळं ऐकताना. तुम्हाला पण ना!

I am proud of ISRO.

********************************************************************************

आता हे पण वाचा.

- या scientist ना (म्हणजे जे माझ्याकडे आले होते) दिवसाला हाॅटेलमधे राहण्याचे रू ५५० मिळतात.

- यांना पूर्ण दिवसाच्या जेवणाखाण्याचे रू १५० मिळतात.

- यांना कामासाठी दिवसभराच्या फिरण्याचे फक्त रू १५० मिळतात.

- माझ्याकडे inspection आले तेव्हा रेल्वे नी आले. त्याचेही tatkal मधे तिकीट काढलं तर त्यांचे पैसे मिळत नाही. आज काल premium train चं तिकीट ४ ते ५ हजार असतं. ते काढलं तरी पैसे regular तिकीटाचे मिळतात.

शप्पथ, या मंडळींना जर private sector सारख्या facilities दिल्या ना, आकाशगंगेतला एकही ग्रह सोडणार नाहीत.

जे झालं ते झालं, नवीन सरकारने या बाबींकडे लक्ष द्यावं ही अंतरिक इच्छा.

(वरची सगळी गप्पा मारण्यातून आलेली माहिती आहे. पुरावा मागू नये. बाकी govt undertaking च्या लोकांच्या हालाचे क़िस्से आहेत, ते नंतर. एक आठवलं, विमानप्रवास फक्त Air India ने म्हणे. आता काय बोलायचं कप्पाळ)

Tuesday, 21 October 2014

ते आणि आपण

बऱ्याचदा मी परदेशातले अनुभव लिहितो. तुम्हाला वाटेल हा फारच स्वत:ची लाल करतो, आणि तिकडे काय भारी असतं असं लिहून आम्हाला शहाणपणा शिकवतो. पण जे आहे ते आहे. एका बाबतीत मात्र आपण भारतीय समस्त जगाला मात देऊ शकू आणि ती गोष्ट म्हणजे "दिलदारपणा". आणि त्यातल्या त्यात मी जेव्हा आपल्याला जर्मनी या अत्यंत प्रगत अन गुणवत्तेचा मापदंड असलेल्या देशातील लोकांबरोबर compare करतो, तेव्हा मला आपली लोकं फारच भारी वाटतात.

माझे जर्मनीत ६-७ सप्लायर आहेत. त्यापैकी एक मायकेल फ्रीटाग. महिन्याला मी त्याच्याकडून १००० एक युरोचं मटेरियल घ्यायचो. (साधारण लाखभर रुपये). पैसे आधी रेमिट करायचे. दरवेळेला. मग हा बाबुराव मटेरियल पाठवणार. बँक पैसे रेमिट करायला २५ युरो चार्ज करते, अर्थात माझ्या कंपनीवर. एकदा order दिली होती, ३०० युरोची. बँके नि पैसे रेमिट करताना चुकून २५ युरो त्याला चार्ज केले. थोडक्यात त्याला २७५ युरो मिळाले. तर म्हणाला "आधी २५ युरो पाठव. मग मटेरियल पाठवतो" मी बोललो "बंडू, तुझ्याकडून मी दर महिन्याला माल उचलतो. पुढच्या order मध्ये २५ युरो जास्त टाकतो". तर म्हणाला "नाही, तू नाही दिलेस पैसे तर" आहे कि नाही बिनडोक. शेवटी माझा भाऊ आहे अमोल. तो असतो जर्मनीत.  त्याला सांगितलं, टाक त्या मायकेलच्या बोडक्यावर २५ युरो. तेव्हा कुठं त्यानं मटेरियल पाठवलं. (आता तुम्ही विचार कराल, कि बँकेला का नाही सांगितलं. तर आपली सिस्टम आहे. विनाकारण आपण परदेशात पैसे नाही पाठवू शकत)

आतासुद्धा होतो जर्मनीत ट्रेनिंग ला. त्या  चं authorisation आहे आम्हाला. तरी आम्हाला म्हणे ट्रेनिंग चे दिवसाला १००० युरो पडतील. मी म्हणालो "तात्या, तुझेच स्पिंडल आम्ही रिपेयर करणार. भारतात तुझं सर्विस सेंटर आहे म्हंटल्यावर तुझाच बिझिनेस वाढेल ना. तरीही आम्हालाच बांबू लावणार" तर म्हणाला "माझा एक ट्रेनर ४ दिवस तुमच्यात बिझी राहणार" मी बोललो "अरे, आम्ही दोन माणसं तिथं येणार. दोघांचे १ लाख रु, हॉटेल आणि इतर खर्च ५०००० रु. आम्ही इतक्या ची वाट लावतो, तू थोडा खर्च कर ना" कसाबसा बाबा तयार झाला.

rigid तर इतके आहेत कि ज्याचं नाव ते. यांच्याकडून चूक म्हणजे होतंच नाही कधी अशी शायनिंग. अरे काय आकाशातून पडले का तुम्ही. नाव नाही लिहित, पण क्वालिटी भंगार म्हणून, एजन्सी सोडून दिली त्यांची. आताची गोष्ट. ज्या कंपनीत गेलो होतो त्याने ३ spare part  पाठवले होते. आम्ही सांगत होतो, त्यात प्रोब्लेम आहे म्हणून. तर नाहीच. जर्मनीला गेल्यावर कळलं कि त्यांची चूक होती म्हणून. तर म्हणतो कसा "मला चेक करावं लागेल तू order बरोबर दिलीस का ते" आहे कि नाही अतिशहाणा.

ऱ्हाईन नदी अख्ख्या जर्मनी तून १२ महिने दुथडी भरून वाहत असते. अमाप पाणी. तरी हॉटेल मध्ये फुकट पाणी दिलं तर शप्पथ. रूम वर पण ३.३० युरो ला ५०० ml ची बाटली ठेवली असते रुबाबात. (३०० रु). जेवायला गेलो कि विचारणार "what would you like to drink?" पाण्याचा, कोल्ड ड्रिंक चा आणि बियर चा रेट सेम. कशाला बोंबलायला लोकं पाणी पितील.

स्वच्छतेचं लय कौतुक इथल्या लोकांचं.  दांडू दाखवून लोकांना सवयी लावल्यात. Given a chance, आपल्यापेक्षा घाण करतील. ऑक्टोबर फेस्ट ऐकलं असेल ना तुम्ही. अरारा, बियर पिउन काय राडा करतात. उलटया करणे, बाटल्या फोडणे सगळे प्रकार चालतात. एकच नशीब, शहरभर राडा करत नाहीत तर एका मैदानात घालतात गोंधळ. समोरच्या बाकावर पाय ठेवून बसणं अगदी सर्रास चालतं ट्रेन मध्ये.

घर भाडयाने देतात, पण deposit परत देताना पार वाट लावतात.

तेव्हा एकच सांगतो मित्रानो, मोठं मन आपल्या लोकांचं. प्रगती झाली असेल त्यांची, पण कद्रू आहेत  लेकाचे.

आपलं मन आहे तसं ठेवून, काही गोष्टी थोडया सुधरवल्या ना, येड लावू आपण जगाला.

I love my India

ते आणि आपण




Saturday, 18 October 2014

आजी अन तिचे नातू

२०११ च्या जुलैला मी केसरीबरोबर अमेरिकेची ट्रीप केली.   My fair lady. सगळ्या बायका, साधारण माझ्याच वयाच्या. काहीतरी ८० च्या पण. पहिल्या दिवशीच आमची घट्ट मैत्री झाली. दुसर्या दिवसापासून गप्पांच्या मैफिली सजू लागल्या. बर्याच जणी नोकरी करणार्या, काही उद्योजिका तर काहींना रीतसर पेंशनर. मला विचारलं "तुम्ही काय करता?" मी तर आयुष्यभर चुल अन मुल केलं. ह्यांची आई ते चार वर्षाचे असताना गेली, घरात बाईमाणूस नाही. मग मीच ओढ़ला गाड़ा. "पण, मग आता काय करता?" "आता, मी नातवांमधे रमते, गेली कित्येक वर्षं." माझ्या तोंडून चटकन निघून गेलं. मग त्यांचं चालू झालं "सरळ पाळणाघरात ठेवायचं वैगेरे, वैगेरे". मला तर ते काही पटलं नाही. पैश्यांचं सोडा हो, पण आजीचे प्रेम, त्यांना आवडेल ते खाऊ घालणे, वेळेवर दुध देणे ही कामं माझ्याव्यतिरिक्त दुसरं कुणी व्यवस्थित करू शकेल यावरच मुळी माझा विश्वास नव्हता.

नातवंडं जेव्हा मांडीवरून रांगायला अन मग हळूहळू पाऊल टाकायला लागतात तेव्हा आजीबाई ला होणारा आनंद शब्दात नाही सांगता येणार. मुले वर्षात कशी मोठी होतात ते कळतच नाही. त्यांचे बोबडे बोलणे, आई बाबा आॅफीसला निघाल्यावर निरागसपणे टाटा करणे (त्या छोट्यांच्या मनात काय घालमेल चालू असेल याचा विचार केला तर आपल्यालाच थोड़े वाईट वाटते).

अरे हो, एक सांगायचंच राहिलं, माझी मोठी सुन, वैभवी, डाॅक्टर, तिची स्वत:ची पॅथ लॅब अन धाकटी अर्चना, इलेक्ट्रानिक इंजिनियर, MSEB त.

तर सांगत होते, की मोठा नातू यश, ३ वर्षाचा झाला, चुरचुर गोड़ बोलू लागला. (आता वय १९. आता जणू त्याचं बोलणंच आटलंय). एकदा त्यांच्या आईला घरी यायला उशीर झाला. तेव्हा म्हणाला, "आजी, आता माझी मम्मी येईपर्यंत तुच माझी मम्मी. आणि मग ती आल्यावर तु परत आजी. चालेल?" तो इतका निरागसपणे म्हणाला की मला अतीव समाधान वाटले. त्या रात्री माझ्या वजनात २ पौंडाची भर पडली. या अशाच सतत भर पडण्यामुळे मी जाड झाली आहे. (कसलं भारी कारण).

दुसरा नातू, अभिषेक, जन्मत:चं एकदम गुटगुटीत. त्याची आई संध्याकाळी साडेसहाला घरी यायची. तोपर्यंत आम्ही तयार होऊन खाली फिरायचो. आजूबाजुच्या बायका म्हणत "आजीला नातू शोभतो" माझे ताबडतोब उत्तर "आजीला दृष्ट नाही लागणार, पण माझ्या गोड़ नातवाला लागेल." त्याच्या काकाने प्रथमच कार घेतली. त्या रंगाची कार दिसली, की "चल त्या कारमधे जाऊ या" म्हणून तिथेच अडायचा. आता दहावीचा आहे तो. अभ्यासात मग्न आहे.

यश ९ वर्षाचा झाल्यावर मला तिसरा नातू झाला. खरंतर मला मुलगी नाही, आणि पहिले दोन नातू. मला वाटलं की आता नात होणार. पण झाला तो नील, अतिशय गोड. हे मुलं खेळतच मोठं झालं. त्याचं अंगाखांद्यावर खेळणं, त्याच्या बरोबर हाॅलमधे खेळणं ही म्हणजे माझ्यासाठी करमणूक. सारखी बडबड, आणि बरीच लाॅजिकलही. आता तो दहा वर्षाचा आहे, पण घरात तो चालतो म्हणजे फ़ुटबॉल बरोबर पळतो.

ह्या तीन नातवंडांच्या सहवासात मला tv चे वेड लागले नाही (मी अजिबात tv बघत नाही). त्यांच्या सहवासात कसा वेळ गेला हे कळलंही नाही अन अजून कळतही नाही. कधीकाळी नोकरी केली नाही याची खंत वाटायची, आता तीही वाटत नाही. आजही राजेश अाणि यशने ठरवलं की दोघांचं दररोजचं ३८ किमी फिरणं कमी होण्यासाठी नांदेड सिटीत छोट्या फ्लॅटमधे रहायचं. पाळणाघरासारखी परत माझ्या मनाने उचल खाल्ली अन मी त्यांच्या दिमतीला येऊन राहते आहे. आणि यात मला एक प्रकारचे आत्मिक समाधान लाभते आहे. (नाही म्हणायला नील पासून लांब राहते त्यांची खंत वाटते, पण ठीक आहे)

या पोरांचे आईबाप, पोरांचं जीवन मार्गी लागावं म्हणून हाय वे बांधताहेत. त्यावरून ही पोरंाच्या पायाला चाकं लागून ती भरधाव जातीलही. कुणाच्या पंखात इतके बळ येईन, की ती हवेतून उडतीलही. उडावंही त्यांनी, माझे आशिर्वाद आहेत त्यांना. पण या मोरपंखी आठवणींची साठवण मात्र माझ्याजवळंच राहीन. ती कुपी या आजीच्या पदरात बंदिस्त असेल.

नातूही खुश अन आजीही.............

"घरात असता हासरे तारे, मी पाहू कशाला नभाकडे"

कुमुद मंडलिक 

Sunday, 12 October 2014

अ........अभियंत्याचा २

साधारण ९२-९३ च्या सुमारास माझ्या डोक्यात धंदा करण्याचा किडा वळवळू लागला. (विचार मनात आला अन लौकिकार्थाने बरं घडलं तर किडा डोक्यात वळवळला असं म्हणतात अन कलमडला की तोच किडा..........) घडामोडी अशा घडल्या की ९३ च्या सुमारास hobby business म्हणून spindle repair करण्याचं चालू केलं. फुलटाईम धंदा करण्याची डेअरिंग नव्हती. मी विचार केला की अशी नोकरी शोधावी की वेळेचं बंधन नसावं, पण थोडा पगारपाणी व्यवस्थित असावा. हे म्हणजे बायको म्हणून माधुरी पाहिजे (दिक्षीतांची हो, जास्त लिहीलं का जरा) पण स्वयंपाक निपुण पण असावी. आणि सापडली, माधुरी सापडली, म्हणजे नोकरी.  Resident engineer हा concept नवीन होता. पाच ठिकाणी अर्ज केले. Rollon Hydraulics नावाच्या कंपनीने मला वरलं. MD संजीव शहा म्हणाला "तुझा धंदा वैगेरे आहे ठीक आहे, पण तुझ्या कामासाठी कंपनीचं काम नाही झालं असं ऐकलं तर बाहेर जावं लागेल" मी "कबूल" बोललो. २००० हेडकाउंट आणि ३०० कोटी  turnover असलेल्या multinational SKF मधून एका रात्रीत start up venture आणि ५ लोकं असलेल्या बनियाच्या देशी कंपनीत मी रूजु झालो. १ सप्टेंबर १९९४. शप्पथ सांगतो १ महिना आई वडिल बोलत नव्हते माझ्याशी. जणू काही inter caste marriage केलं आहे मी. (ते खरंतर मी केलं होतं १९९१ ला तेव्हा ठीकठाक होते). पण मी बधलो नाही. वैभवीचा पुर्ण पाठिंबा. (असावा, असं वाटतंय)

कंपनी बंगलोरला, मी पुण्यात. प्रोडक्शन सोडून सेल्स मधे उडी. सगळी उलथापालथ नुसती. 

डायरेक्ट बाॅस बोनी पाॅल, मल्लू. अन अजून चार लोकं. वेंकट, गणेश, विजया आणि मुर्ती. कोणाला हिंदीचा गंध नाही, माझी अगाध इंग्रजी. हळू हळू बस्तान बसवायला चालू केलं. माझा सेल्स एरिया महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश. कंपनी नवीन, प्रोडक्ट नवीन. Busak+Shamban hydraulic seals. भारतातल्या प्रचलित seals पेक्षा चौपट किमती. पण MD संजीवला विश्वास प्रोडक्टवर आणि बोनीवरही. मी पण पुण्यात गरागरा फिरू लागलो. पहिले दोन वर्ष M 80, मग हिरो होंडा अन शेवटची दोन वर्षं सँट्रो. प्रतिदिन दिवसाला ९०-१०० किमी. आणि त्या बरोबर इतर शहरातही. इंडियन रेल्वेजची नाळ जुळली ती इथे. दिवस सरू लागले, कंपनी establish होऊ लागली. पहिल्या दोन तीन वर्षात तास न तास reception मधे बसून ठेवणारे कस्टमर्स आता फोन करून बोलावू लागले. अहमदाबाद, वडोदरा, सुरत, इंदोर, गोवा, बंगलोर, नागपुर, नाशिक अशी तूफ़ानी भ्रमंती होवु लागली. रेल्वे माझं दुसरं घर झालं. एका वेळेस ८-९ तिकीटं काढायचो. रविवार पेठ आरक्षण केंद्राचा बुकींग क्लर्क मित्र झाला होता. अहमदाबादचं हाॅटेल अॅपेक्स, बडोद्याचं अमिटी ही  हाॅटेलं म्हणजे माझे पत्ते झाले. सगळीकडचे माझे टॅक्सीवाले, रिक्षावाले दोस्त बनले. अहमदाबादच्या गोवर्धनकाकांनी तर नंतर आई बाबांना सौराष्ट्र ची ट्रीप त्यांच्या ambassador मधून करवुन आणली. 
Injection moulding machines, hydraulic cylinders, steel mills हे manufacturers करत automobile manufacturing असा कस्टमर बेस वाढत गेला. 

SKF प्रमाणेच इथलेही अनंत क़िस्से आहेत. मी एकटाच पुण्यात असल्यामुळे working colleague नव्हतेच. पण माझे कस्टमर्स माझे मित्र बनत गेले. स्वत: बोनी आणि दिल्लीचा रेसिडेंट इंजिनियर बन्सी हे जीवाभावाचे मित्र झाले. आजही महिन्यातून एकदा तरी आमचा फोन होतोच. न्यू हायड्रो चा मोहन चोळकर, फास्टोचे उदय मराठे, विंडसरचे अनेक इंजिनियर्स यांच्याशी दोस्ती होत गेली. फास्टोचे MD सुमंत सर तर मला लहान भाऊच म्हणायचे. त्यांना ड्रिंक्सचा जबरी शौक होता. मी आलो की, घरी फोन करून सांगायचे राजेश आला आहे अन मला म्हणायचे, तुझं नाव सांगितलं की बायकोला माहित असतं, नवरा चांगल्या संगतीत आहे. कॅटइंजिनियरिंगचे पालेकर. त्यांच्या पत्नि, सविता वहिनी चहा नाश्ता करायच्या.तुम्ही म्हणाल त्यात काय एवढं. अहो या सविता (की सरिता) पालेकर म्हणजे सचिन तेंडुलकरच्या सख्ख्या भगिनी. मला हे त्यांच्याशी ओळख झाल्यावर बरेच दिवसांनी कळलं. सुहास पालेकरांचं अन माझं फार काही जमलं नाही. अन्यथा सचिनला एकदा दर्शन दिलंच असतं माझं. एकदा गोवा हायड्राॅलिक्स मधून फोन आला एका application संदर्भात. परिकर म्हणून होते. तेच आजचे गोव्याचे मुख्यमंत्री. एक ना अनेक. मी या कंपनीत पहिला मोबाईल कसा घेतला हा एक क़िस्सा आहे. 

इकडे कंपनीत ही बरंच चाललं म्हणायचं. इंजिनियर म्हणून stepping stone नोकरीला वापर करून २-३ वर्षात बाय करायच्या विचारात असणारा मी ६ वर्ष झाली तरी हलायचं नाव घेत नव्हतो. Sales, Marketing या functions ची चांगलीच ओळख झाली. Foreigners येत जात असल्यामुळे आणि बोनीमुळे इंग्रजी बोलण्याचा सराव झाला. आता मी hydraulic seals चं ट्रेनिंग द्यायला भारतात जाऊ लागलो. संजीव अन बोनीचं इंग्रजी ड्राफ्टींग उच्च दर्जाचं होतं. दररोजच्या official कामात मी involved नसलो तरी त्यांची official letters माझ्यापर्यंत यायची अन मी ती बारकाईनं वाचायचो. ७०० स्क्वेअर फुटच्या डिकन्सन रोडच्या छोट्या आॅफीसपासून सुरू केलेला प्रवास आता ५५०० sqft चं जयनगर चं अलिशान आॅफीस अन २५००० sqft ची बनरगट्टा रोडचं mfg unit पाशी आला होता. आणि त्या सगळ्यांचा मी साक्षीदार होतो. 

१ आॅगस्ट २००२ ला नोकरीचा राजीनामा दिला. संजीव अन बोनीला सांगितलं की आता spindle repair चा छोटासा का होईना, स्वत:चा बिझीनेस pursue करतो.  पण नंतरच्या माझ्या स्वत:च्या बिझिनेसमधे स्थिर स्थावर होण्यात रोलाॅनच्या ८ वर्षाच्या नोकरीचा सिंहाचा वाटा हे निसंशय. ते पण पक्के व्यावसायिक होते. साल्यांनी ८ वर्षात विचारलं नव्हतं, काय म्हणतोय बिझीनेस. २५ सप्टेंबरला बंगलोरला निरोपसमारंभ झाला. संजीव म्हणाला "I was risking by hiring Rajesh as resident engineer which was relatively new concept then. But I am happy that he proved, my decision was not wrong." मला पण बोलायला सांगितलं. 

सालं कुणाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करताना माझा घसा का दाटून येतो़ हे एक न उलगडलेलं कोडं आहे. बोनीने माझ्या पाटीवर थोपटलं. सगळ्यांशी हस्तांदोलन करून मी निरोप घेतला............मुकपणे

Saturday, 11 October 2014

History of Germany

काल जर्मन इतिहासावरचे म्युझियम बघितले. फार जुना नाही, साधारण दुसर्या महायुद्धापासून.

फोटो १: बाँब, अजूनही सापडतात. हा नुसता नमुना. युद्ध बेकार बरं का. परत होऊ नये बुवा.

फोटो २: हिटलर रस्ता हे नाव काढून नवीन नामकरण. हिटलरचं नामोनिशाण नाही आहे म्युझियम मधे.

फोटो ३: युद्धात आईवडिलांपासून हरवलेल्या मुलांच्या मुलाखती. कोण, कुठला. Tracing service. जर्मन भाषा कळत नाही पण तरीही गळा भरून येतो, धूसर दिसतं. १९४५ साली इतकी effective service दिली की ५०००० मुलांपैकी फक्त ४०० मुलं अनाथ राहिली.

फोटो ४: जे म्हणायचं ते फोटोत लिहीलं आहे. युद्ध स्य कथा रम्यं, म्हणजे दुसर्याच्या.

फोटो ५: पश्चिम जर्मनीला मदत म्हणून मार्शल प्लान. अमेरिकन एकदम येडे नाहीत बरं का. इराक़, अफ़ग़ानिस्तान फसलं तरी कुठेतरी बरोबर पडले आहेत त्यांचं दान.

फोटो ६, ७: हा इंस्ट जर्मनीचा स्टालीन प्लान. विचार स्वातंत्र्याची गळचेपी. रणगाडे घातलेत अंगावर. आणि पुढचा फोटो. जर्नलिस्टची कमाल. पुस्तकात कॅमेरा ठेवून फोटो काढलेत अन जगासमोर आणलेत अत्याचार.

फोटो ८: १९५४ मधे फ़ुटबॉल वर्ल्ड कप मधे जर्मनीची हंगेरीवर २-० अशा पिछाडीवरून ३-२ अशी मात. युवकांमधे नवचैतन्य. विकसित देश होण्याची सुरूवात. फोटो, त्या वर्ल्ड कप च्या मेडल सेरेमनीचा.

फोटो ९: Economic miracle strengthens the political stability.

फोटो १०: बीटल्स, जगात सगळ्यात जास्त विकली गेलेली कार (असं ते म्हणतात, मला टोयोटाची करोला वाटते) औद्योगिक क्रांतीची सुरूवात

फोटो ११:  election voting turn out : 90% अबबब! वर्ष: १९५७ आँ

फोटो१२: अपोलोने चंद्राहून आणलेला दगड.

फोटो १३: Economic growth and prosperity must not be persued at the cost of environment.

फोटो १४, १५: बर्लिन वाॅल जमीनदोस्त. इंस्ट जर्मनीतून आलेल्या कुटुंबाची ही कार. दोन देशांच्या लोकांचे मीलन. हर्षोल्लास, आनंद, लोकांच्या डोळ्यातून पाणी. आणि डोळे पुसणारा मी.


Friday, 10 October 2014

ते आणि आपण

आता हा फोटो पहा. तुम्ही म्हणाल की काय हा येड्यासारखे विचित्र फोटो लावतोय. इतकं फोटोजेनिक आहे जर्मनी. पण मी काय बोलतो याच एकदा. मी इथल्या डोंगराचे, बागांचे, तळ्याचे फोटो लावले तर मजा नाही येणार. तुम्ही स्वत:च अनुभवा, इथल्या वीजेचा कल्पक वापर, स्वच्छता, अत्याधुनिक तरीही निसर्गाच्या बरोबर. युरोप अनुभवावाच. नाही म्हणजे सिंगापूर,चीन, थायलंड, हे पण चकाचक देश पण युरोपची अकृत्रिमता नाही तिथे. एखाद्या घरी पाहुणे यायचे म्हंटले की आवराआवरी होते आणि एखादं घर कधीही जा स्वच्छंच, हाच फरक. रस्त्यावर झाडाचा पालापाचोळा असतो, तो कुणीही साफ नाही करत, पण प्लास्टीकची पिशवी शोधून सापडणार नाही रस्त्यावर. कोकच्या बाॅटल्स, बियर कॅन्स कचरापेटीत, दररोज सकाळी ५ वाजता साफ होणार्या. माझा एक मित्र आहे पुण्यात. कारमधे बसून बियर प्यायची फार हौस. प्या हो, पण कुणी बघत नाही आहे हे बघून बियर कॅन रस्त्यावर कुठेही फेकणार आणि दुसर्या दिवशी शहाणपणा रामटावत  पुणं किती घाण आहे ते बोलणार. (मुख्य म्हणजे हे विस्थापितच आहेत, कुठुन ते सांगितलं तर हसाल तुम्ही) जेव्हा आपल्याला कुणी बघत नाही असं असताना आपण जसे वागतो ते खरं वागणं. मोदींच्या स्वच्छता अभियानाला पुर्ण पाठिंबा. बाकी tv कॅमेरासमोर मानभावीपणे झाड़ू मारणार्या लोकांनी सांगावं की ते बोलले "सखुबाई, आज आराम कर जरा, मी झाड़ू मारतो". असो, बरंच विषयांवर झालं. 

तर हा पहिला फोटो आहे माझ्या रूमसमोर असलेल्या पेट्रोल पंपच्या दरपत्रकाचा. डिझेलचा भाव १.३० युरो. लोकसभा निवडणुकीच्या आधी फेसबुक आणि WhatsApp वर आंतरराष्ट्रीय अर्थकारण यावरचा गाढा अभ्यास असलेली विद्वान मंडळी इतर देशात पेट्रोल अन डिझेल किती स्वस्त आहे याचा मेसेज हिरीरीने एकमेकांना forward करत होती. हा दर डिझेलचा जर्मनीतला, १.३ युरो म्हणजे तब्बल १०९ रू लिटरला. अशीच गत पेट्रोलची पण आहे. आतासुद्धा ७५ पैसे पेट्रोल स्वस्त झाल्यावर सरकारचे गुणगान गाणारी मंडळी डिझेल de control होऊन त्याचा भाव खाली वर होणार  आहे हे लक्षातच घेत नाही. थोडक्यात काय तर इंधनाचा भाव वरखाली होणं याला फक्त सरकार जबाबदार आहे (थोडंसं असेलही पण रूपयात एखादा पैसा) या गैरसमजुतीला फारकत द्यावी असं मला वाटतं. मग ते आधीचं ममो चं सरकार असो की नमोचं. आणि जर कुणी दावा करत असेल की सरकारमुळे भावात चढउतार होतो तर समजा तो फेकतोय. 

हा दुसरा फोटो आहे दिल्ली विमानतळावरचा. नितांत सुंदर विमानतळ. आपलं मुंबईचं विमानतळही झकास झालं बरं का. त्यावरून आठवलं मुंबईच्या जुन्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाहेरच्या देशातून आलो की बेल्टवर लगेज घ्यायला थांबलो की पॅ असा आवाज करून तो बेल्ट बंद पडायचा. अन मग कुठुनतरी आवाज यायचा "welcome to India" नज़र वळवली की हे देशीच बेणं. कुठल्यातरी परदेशी माणसाचं हास्य बघून परत अत्यंत लोचट, बुळबुळीत हास्य तोंडावर आणणार. मीच चुकीचा असेल, पण मला त्यांचा भयंकर राग यायचा. आता तो घाणेरडा प्रकार बंद. असो. तर फोटो आहे चार्जिंग स्टेशनचा. काही पिन्स व्यवस्थित होत्या, पण बहुतांश चार्जिंग स्टेशनवर samsung च्या पिना नव्हत्याच. म्हणजे तोडून नेल्या होत्या. आता विचार करा, या पिना काय तुटायची गोष्ट आहे का? हे कुठल्यातरी बिनडोक माणसाचं काम. असं मुर्खासारखं  वागायचं अन परत आलं की म्हणायचं Welcome to India. 

मित्रांनो, काय आहे ज्या गोष्टी तुमच्या आमच्या नियंत्रणात आहेत त्या आपण ठेवू अन ज्या नाहीत त्याच्यावर कुठं शायनिंग टाकायची. 

Sent from my iPad

Tuesday, 7 October 2014

।।ओम हृषाय नम:।।

हा डाॅ. हृषीकेश कुलकर्णी, म्हणजे जगभर त्याला आता या नावाने ओळखत असावेत. पण बी जे त ल्या कुणाला तुम्ही विचारलं, या नावाचं कुणी माहित आहे का, तर मोठं प्रश्नचिन्ह दिसेल. त्यांची बायको प्रज्ञा ही बीजेचीच आहे, पण ती सुद्धा सटपटेल दोन सेकंद.

 तेव्हा हा हृष्या, माझ्या बायकोचा, वैभवीचा जवळचा मित्र. (बीजे मधील सगळेच लोकं एकमेकांचे जवळचे मित्र असतात).

एका कार्यक्रमात मी हृष्याची वाट पाहत होतो, म्हणजे तो त्याच्या मित्राशी (अर्थातच जवळच्या) बोलत होता. मी नेहमीप्रमाणे भोचकपणे त्यांचं बोलणं ऐकत होतो.

हृ: कसा आहेस?
मि: मस्त मजेत.
हृ: कुठं रहायला
मि: अरे, पौड रोड वर ते हाॅस्पिटल आहे ना, त्याच्या बाजूला मंदिर आहे...........
हृ: (मधेेच) अरे, असा मंदिरात का राहतोस, फ्लॅट वैगेरे घ्यायचा ना
मग दोघांच्याही खळखळून हसून एकमेकांना टाळ्या. "तु यार बिलकुल बदलला नाही" वैगेरे (बीजे च्या डाॅक्टर्स चं हे एक वैशिष्ट्य, ते कितीही म्हातारे झाले तरी बदलत नाही)

जर्मनीत जायचं हे ठरल्यापासून वैभवी म्हणत होती, हृष्या कुठे आहे ते बघ. मला वाटत होतं, तो म्युनिकला आहे. तर तो Bad Homburg म्हणजे मी जिथं होतो, तिथून ३० किमी वर. येतो़ म्हणाला भेटायला ४ वाजता. म्हंटलं ये मजा येईल.

४:३० वाजता आला. मग sorry, उशीर झाला वैगेरे. वेळेचं अन माझं फार काही सख्य नसल्यामुळे मला काही फार वाईट नाही वाटलं, किंवा रागही नाही आला. खरंतर मनातून बरंच वाटलं. प्रज्ञा, त्याची बायकोपण आली होती. (ती लग्नाआधी त्याची मैत्रीण होती, अर्थातच जवळची. हे शेवटचं. ती बहुतेक अजूनही त्याची मैत्रीणच आहे, असं वाटलं. ती हृष्या ला अजूनही हृष्याच म्हणते. हृष किंवा नुसतं हृ नाही).

गप्पा चालू झाल्या. पुण्याचे हालहवाल विचारले. (खरंतर हालंच). वैभवी अन पोरांची चौकशी झाली. मग तो म्हणाला "तुझी हरकत नसेल तर जेवायला जाऊ यात जवळंच" आता हे काय विचारणं झालं. आम्ही तिघं रेस्टाॅरंट कडे चालू लागलो.

आणि मग हृष्याने तो प्रश्न विचारला "हे स्पिंडल म्हणजे काय असतं बुवा" यातून एक अर्थ असा निघतो की असा कुठला दिव्य item आहे की धंदा करून तुला फेसबुकवर लिहायला वेळ मिळतो. पण मी वाईट विचार झटकले.असा चान्स कोण सोडणार? ही डाॅक्टर मंडळी अगम्य शब्दात आपल्यासमोर मेडिसीन या विषयाबद्दल बोलत असतात. काहीच कळत नसतं. त्याचा राग मनात होताच. खरंतर एखादा डाॅक्टर यांत्रिकी विषयाबद्दल आत्मीयतेने बोलतो हे मुळात संघातल्या माणसाने गांधीजीबद्दल आदराने बोलण्याइतकं दुर्मिळ आहे. (जर्मनीत बसून लिहीत असल्यामुळे हिटलर-ज्यू, किंवा ओबामा-पुतिन अशा आंतरराष्ट्रीय उपमा सुचत होत्या. पण मेरा भारत महान आणि परत निवडणुका) पण मग spindle बद्दल सांगून त्याला पकवून टाकलं.

बोलता बोलता हाॅटेल आलं. (रेस्टाॅरंट लिहीलं की आधी उडपी लिहीलं आहे असंच वाटत राहतं). साग्रसंगीत जेवण झालं. बिलही आलं (हे कशाला). ते आल्याबरोबर माझ्या डोळ्यासमोर गुणीले ८४ करून आँकड़ा नाचू लागला. भारतात मी बिल देण्याचा अभिनय तरी करतो. इथं तोही प्रयत्न केला नाही. उगाच हृष्याची परीक्षा कशाला? (खरंतर हे विधान अमेरिकेत गुणीले ६० किंवा तैवान मधे गुणीले ३ असं निर्लज्जासारखं लिहू शकतो).

परत येताना प्रज्ञाने, हृष्या माझ्या लिखाणाचा fan आहे असं सांगितलं होतं. परत हृष्याने पण त्याबद्दल एकदोन स्तुतिपर वाक्य बोलून मला कुरवाळलं होतं. मग दुसर्या दिवशी WhatsApp वर हा फोटो पाठवला. खरंतर हा तो फेसबुकवर टाकू शकत होता. पण माझ्या लक्षात आलं आधी कुरवाळून हा फोटो पाठवणे म्हणजे छू: म्हणण्यासारखं आहे. मी हृष्याला मनोमन दाद देत कुईकुई करत हा लेख पुर्ण केला.

।।ओम हृषाय नम:।।


Saturday, 4 October 2014

एक कथन सामान्य अभियंत्याचं

तुम्हाला माहिती आहे, माझ्या कारकिर्दीला ३० sept ला २५ वर्षं पूर्ण झाली. (आम्हाला कसं माहिती असेल भैताडा. तू काय सचिन तेंडूलकर आहेस, पेपर मध्ये बातमी यायला). १ सप्टेंबर १९८९ ला या अभियंत्याने हातात Allen Key, Spanner, Screw Driver अशा आयुध्यांचा सेट घेतला (अगदी bat, racket किंवा ball च्या धर्तीवर). आणि तेव्हापासून आजतागायत त्यांनी साथ सोडलेली नाही. मध्ये मग Laptop, मोबाईल, i पॅड हि शस्त्रात्रही दिमतीला आली. ह्या अडीच दशकांच्या कारकिर्दीचे मुख्यत: तीन टप्पे पडतात. (१०००० आणि ९९९९९ दोन्ही पाच आकडी पगार. तेव्हा फक्त पाच आकडी पगार म्हणायचं. तसंच दशक, शतक हि उगाच अर्थाला वजन प्राप्त करतात.)

१९८९-१९९४: SKF India Ltd.

बजाज औरंगाबाद ने लत्ताप्रहार केल्यावर मी नोकरी शोधत भिरभिर फिरत होतो. बाबांनी शब्द टाकला आणि SKF कडून एक वर्षाची GTE Apprentice पदरात पाडून घेतली. (बाबांनी तसे शब्द कमी टाकले, पण जेव्हा टाकले, आयुष्याला वळण मिळाले इतकं नक्की). आपलं पाहिलं प्रेम (माझं ते हि शेवटचं ठरलं), पहिली नोकरी नेहमीच प्रिय  असते. तशीच माझी SKF ची नोकरी. पहिल्या आठवड्यात प्रोडक्शनच्या मशीन सेटर ने मला सांगितलं "ए, जा, स्टोर मधून O ring घेऊन ये" मी विचारलं "ओरिंग च spelling काय" तर सगळ्या लोकांना बोलावून सांगितलं "बघा आजचे इंजिनियर, येड्यांना O ring म्हणजे काय ते माहित नाही". एका मशीनचं मेंटेनन्स चं काम चालू होतं, मी थोडं डोकं घालून काय चालू आहे ते पाहण्याचा प्रयत्न करत होतो, तर एक सिनीयर फिटर "ए, बाजूला हो. च्यायला एक वर्षासाठी येतात, अन डोकं पकवून टाकतात" एकदा मला एका क्वालिटी इन्स्पेक्टर ने सांगितलं " 6219 च्या १०० outer rings, groove dia साठी चेक करून ठेव" दोन एकशे ग्रामची एक रिंग, पंजात घेऊन apparatus वर फिरवायची. २०-२२ रिंगात हात दुखायला लागले. एक भला माणूस म्हणाला "तुझी फिरकी घेत आहेत, बंद कर हे काम आणि जा जेवायला". अशा भल्याबुर्या घटनांनी अडखळत सुरू झालेल्या नोकरीत मी रूळलो. अजय नाईक, मकरंद महाजन, संजीव गोयल हे इंजिनियर मित्र आणि working associates यांच्या मदतीने हा चिखलाचा गोळा चाकावर फिरू लागला. मुर्ती, विकास, सराफ, हेक्टर, सोरघडे अशी सिनीयर सुपरवायजर, पांडू भोसले, शिरसकर, राव, बी आर पाटील या सेटर मंडळींनी या गोळ्याला थापायला सुरूवात केली. मशीनवरून हात फिरायला लागला, तशी ती माझ्याशी बोलू लागली. मला हे झालं, असं कर म्हणजे production व्यवस्थित येईल असं सुचवू लागली. विश्वास बसला, मग आत्मविश्वास आला. काही सिनीयर लोकांना मी त्याचं काय चुकते ते सांगू लागलो. वाद व्हायला लागले. एकदा असाच वाद झाल्यावर एक सेटर बोलला "इथे भेटलात, वर नका भेटू" मी बोललो "कसं भेटणार, तुम्ही स्वर्गात, मी नरकात" त्याला काय बोलावं ते कळलंच नाही.

खरंतर SKF चे अनंत किस्से आहेत. सगळे लिहायचे म्हंटलं तर पाच-सहा पानं होतील. पण एक नक्की, ग्रह, तारे एकदम जोरात होते. नाहीतर जाॅब allocation च्या दिवशी टीआरबी ला जा असं सांगून, परत बोलावून, नाहीतर असं कर डीजीबीबी ला जा हे सांगणं. (TRB ला पोरं तीन महिन्यापेक्षा जास्त टिकत नसत). GTE ना सहसा एक वर्षात बाय बाय ही तिथली प्रथा. पण मी आणि संजीव गोयल GTE चे कंपनी ट्रेनी झालो.  ते होताना सोमण साहेब म्हणाले, मी तुला प्लानींगला घेतो. मी तिथं टेचात बोललो "मला प्रोडक्शन मधेेच काम करायचं आहे" म्हणालो ते ठीक आहे, ते मान्य ही होणं. १८ आॅगस्ट १९९१ ला माझा साखरपुडा झाला, मी कंपनी ट्रेनी, म्हणजे confirmed जाॅब नाही. अशा वेळेस पाटील साहेबांनी बोलावून सांगायचं की "Management has decided to curtail your training period by 13 months" मी आणि तिघं १ आॅगस्ट १९९१ पासून कन्फर्म होणं. (कुणी याला वैभवीचा पायगुण ही म्हणतात). मी TQ नावाच्या लाईनवर काम करत होतो. Advanced मशीन्स, ट्रायल प्रोडक्शन पासून मी involve होतो. एकदा कंपनी हेड ग्रेस्कोव्ह (बहुधा पोलिश असावेत) लाईनवर आले आणि काहीतरी इलेक्ट्रानिक वस्तु तोंडासमोर धरून प्रश्न विचारू लागले. मला वाटलं की चांगलं काम करतोय म्हणून फोटो काढत आहेत. नंतर कळलं, माझी उत्तरं रेकाॅर्ड करून घेत होते. (९२ साली हे जरा अभिनवच). फाटलीच होती. अजय, मक्या आणि गोयलबरोबर सेकंड शिफ्टला येऊन रात्री १ वाजता केलेली  प्राईडची आॅम्लेट अन बियरची (तेव्हढेच परवडलं) बॅचलर पार्टी त्यांच्या लक्षात नसेल, पण माझ्या आहे.

SKF ची गाथा एम जी चव्हाण, ए बी पाटील आणि शिदोरे साहेब यांची नावं न लिहीता पुर्ण होणं निव्वळ अशक्यच. सहा महिन्यापूर्वी MGC कंपनीत आले तेव्हा पोरांना त्यांची ओळख करून देताना मीच गदगद झालो होतो.

निव्वळ स्वप्न वेगळी बघितली म्हणून SKF चा जाॅब ३१ आॅगस्ट १९९४ ला सोडला. बारक्याच होतो, त्यामुळे सेंड आॅफ वैगेरे झाला नसावा, पण शेवटच्या दिवशी एकटाच स्कूटरवर आसवं ढाळत परत घरी आलो होतो.

आजही कुठल्या कंपनीत गेलो की SKF मधे यायचा तसा कुलंटचा वास आला की मी तो केवड्याचा सुवास घ्यावा तसा भरून घेतो आणि त्या पहिल्या नोकरी च्या प्रति कृतज्ञेतीची भावना अंगभर सरसरत जाते.

तळटीप: खूप नावं सुचत आहेत, पण जागे अभावी लिहीता येणं अवघड आहे.

Wednesday, 1 October 2014

आईचं मन

माझ्या मुलाचा "स्विस मध्ये कासावीस" असा लेख सामनामध्ये आला. तो सर्वांनाच भावला. रविवारी मी मात्र घरातच देवापुढे बसल्या बसल्या राजेश साठी कासावीस झाले.

तो इथे नांदेड सिटी ला असला कि रविवारी सिंहगडावर सकाळी सहा वाजता फिरायला जातो. त्याच्या बरोबर कधी कुणी असते, कधी नसते. आला कि तिथले अनुभव सांगतो. येताना दुध, पेपर घेऊन येतो. गडावरच्या गमती जमती लिहून हि काढत असतो.

या रविवारी नेहमीप्रमाणे, पण थोडा उशिरा म्हणजे ७ वाजता गडावर जायला निघाला. रात्री त्याची पाठ दुखत होती होते. आज काल पाठ दुखणे म्हणजे काहीही असू शकते असं ऐकावात आहे, तेव्हा त्याने आज जाऊ नये असं मनातून वाटत होतं. पण तो  आता ४ वर्षात पन्नाशीचा होईल, त्याला काय बोलणार? "आई, मी आज वर पर्यंत जाणार नाही. अर्ध्यातून परत फिरेल आणि लवकर येईल" असं सांगून निघाला. मी हि माझ्या सकाळच्या कामाला लागले. ती झाली, कि देवपूजेला लागले. घड्याळात पहिले तर नऊ वाजले होते. मनात आले "एव्हाना राजेश यायला पाहिजे होता. अर्धाच गड चढणार होता." विचार झटकून मी पूजा करू लागले. ९;३० वाजले अन मग मात्र माझं चित्त पूजेतून उडालं. "देव देव्हार्यातआणि चित्त खेटरात" अशी माझी अवस्था झाली. मोबाईल लावला, तर ती कार्टी म्हणाली "आपला फोन त्या व्यक्तीपर्यंत पोहचू शकत नाही". आईचं मन, काळजी त्यावर कब्जा घेऊ लागली. "माझा मुलगा लवकर परत येऊ दे, पाच रुपयाचे पेढे वाटीन" (जुनी सवय, देवाला पाच रुपयाचे पेढे कबूल करायचे. पेढ्याचे भाव वाढले, काळज्याही वाढल्या, पण मी म्हातारी लहान चेहरा करून दुकानदाराला सांगते "ये मन्नत के है" तो बिचारा इच्छा नसताना देऊन टाकतो). फोन वर प्रयत्न चालूच होते, पण व्यर्थ. हे डबडं फेकून द्यावं कि काय असाही विचार मनात आला.

ह्या काळजीचे कारण हि तसेच आहे. त्याच्या लिहिण्यातून ते बऱ्याचदा डोकावतेही. तीन वर्षापूर्वी तो आणि वैभवी पुरंदर का राजगड अशा कुठल्यातरी गडावर गेले होते. तिथे त्याच्या छातीत दुखलं होतं. पुढं त्या दुखण्याची परिणीती त्याची angioplasty होण्यात झाली. कारण ९० का ९५% कुठली रक्त वाहिनी ब्लॉक होती म्हणे. आणि दिवस पण कुठला प्लास्टी चा तर १८ जून. दोन वर्षापूर्वी त्याचे वडील १८ जूनलाच गेले होते. मी तर त्यांच्या फोटोकडे हि पाहू शकले नाही. फक्त देवाजवळ प्रार्थना करत होते "राजेश अनेक नवसाचा आहे, माझे आयुष्य त्याला दे" (गंमत म्हणजे तो तर बरा होऊन आलाच, पण मी अजूनही टुणटुणीत आहे, अगदी शब्दश:). ते चित्र डोळ्यासमोर येत होते आणि म्हणून मी बैचैन झाले होते.

शेवटी न राहवून शेजारच्यांकडे गेले आणि लवकर येतो म्हणून सांगून गेलेला राजेश अजूनही आला नाही हे रडवेल्या सुरात सांगितले. आणि शेजारच्या संदीपने फोन लावल्याबरोबर रिंग वाजलीही. आणि राजेश चा आवाज कानावर पडला "गडावर वर पर्यंत गेलो होतो, आलो आहे खाली, अर्ध्या तासात पोहोचतो घरी" खरं सांगायचं तो काय बोलला हे मी ऐकलेच नाही, त्याचा आवाज कानावर आला, तेव्हाच या माउलीची कासावीस शांत झाली. काय करणार, तो पन्नाशीचा होत आला, मी सत्तरी पार केली तरी हे आईचं मन आहे, त्याचं थोडी वय वाढणार!

- कुमुद मंडलिक