Sunday, 30 August 2015

मार्केट

बरेच आर्थिक तज्ञ हे शेयर मार्केट मध्ये कसे "सोल्लेड रिटर्न्स" मिळतात वैगेरे सांगत असतात. मला स्वत:ला मात्र त्यावर डौट आहे. नाही नाही, मला असं नाही म्हणायचं आहे की  शेयर मार्केट मध्ये आकर्षक रिटर्न्स मिळत नाही. तर नक्कीच मिळतात. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की  या मार्केटची दोलायमानता समजून घेता घेता माणूस अर्धमेला होतो. आणि मग सुर्याखालील कुठल्याही घटनेचा मार्केट वर परिणाम होऊन जेव्हा आपल्या झोपा उडतात. उरलेला अर्धा मग त्यात मरतो. आणि या सगळ्यांची गोळा बेरीज केली तर ते रिटर्न्स "सोल्लेड" वैगेरे राहत नाहीत तर बरे असतात, इतकंच.

हे शेयर मार्केटचे अर्थ तज्ञ ही एक सेपरेट category आहे. एकदम युनिक असतात ते. ते चढत्या मार्केट वर आणि उतरत्या मार्केट वर एकाच आत्मविश्वासाने कारणं देऊ शकतात. म्हणजे अगदी सकाळी उठलेलं मार्केट, संध्याकाळी झोपलं तरी यांच्याकडे कारणं तयार असतात. "अरे F & O सेटलमेंट होती संध्याकाळी, म्हणून झोपलं" "FII ने जबरदस्त बायिंग केलं म्हणून उठलं" अरे काय  F & O अन काय FII बायिंग.

तुम्ही जर मार्केट चं  SWOT analysis केलं तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला मार्केटच्या opportunities (संधी) आणि threats (धोका) यावर जास्त अवलंबून रहावं लागतं जे साधारण तुमच्या आवाक्याच्या बाहेरचं काम असतं. ग्रीसने दिवाळखोरी जाहीर करणे, मान्सून वीक आहे, RBI चा रेपो रेट, चायना चं ढासळत मार्केट, ग्लोबल इंधनाच्या किमती अशा कुठल्याही कारणामुळे मार्केट वर जातं किंवा खाली येतं. तुम्ही काय करू शकता हो यावर? तर उत्तर आहे, काहीही नाही. हे असं असलं तरी, तथाकथित अर्थ तज्ञ, जे बऱ्याचदा तुमचे माझे मित्र असतात, असे तारे तोडतात की जणू काही जेटली ला हेच कानात सांगतात "भाऊ, डिझेल कमी कर ना ५० पैशांनी". आणि मार्केट वर जाऊ दे, खाली जाऊ दे, ही मंडळी त्यावर झुलत असतात.

एक फारच पौराणिक वाक्य आहे मार्केट बद्दल चं "market sentiments are good for this company as it is fundamentally strong" काय अर्थ आहे हो याचा?  कुणालाही माहित नसतं. आणि ही अशी वाक्य नोकरदाराकडून येतात तसंच काही बिझिनेसमन कडूनही येतात. पण मला मात्र असं नेहमीच वाटत आलं आहे की "एखादया कंपनीच्या फंडामेंटल्स चा अभ्यास करून त्यावर पैसे लावून रिटर्न्स ची वाट बघण्यापेक्षा स्वत:च्या कंपनीच्या balance sheet चा व्यवस्थित अभ्यास करून त्यात पैसे इन्व्हेस्टमेंट करून guaranteed रिटर्न्स मिळवणं हे जास्त शहाणपणाचं नाही का?". दुसऱ्या कंपनीच्या management स्किल्स वर आपल्या स्वत:पेक्षा   जास्त विश्वास आहे का?

शेयर मार्केटची दुसरी गंमत अशी की लोकं फक्त सक्सेस स्टोरी पसरवतात. "अरे बॉस इन्फीत इतके छापले. धीरू सॉलीड पेटला" बरोबरच आहे म्हणा. धुतली गेली असेल तर कोण सांगेल?. पण मी दिवाळखोरीत गेलेले, स्वत:ची साठवलेली पुंजी घालवलेले बरीच लोकं बघितली आहेत. इतकंच काय पैसे घालवले म्हणून गायब झालेलेही दोन चार उदाहरणं आहेत. आणि यात नोकरदार असतात, धंदेवाईक अाहेत, म्हातारे आहेत, तरूण आहेत, बाप्ये आहेत आणि बायकाही आहेत. "माझं घर शेयर मार्केटमधून कमावलेल्या पैशावर चालतं" असं छातीठोकपणे सांगणारा एकही आतापर्यंत भेटला नाही आहे. तुम्हाला सांगतो, जे मार्केटमधे खरंच छापतात, ते कधीच ढोल बडवत नाहीत. त्यामुळे ५ रू चा कटिंग चहा पिताना जे शेयर मार्केटच्या लाखों रूपयांच्या ट्रेडिंगच्या गप्पा ठोकतात त्यांना जरा दूरच ठेवा.

माझ्या आई बाबांनी आयुष्यभर बँक आणि पोस्टात पैसे टाकले अन मजेत जगले. अर्थात मी सेव्हिंगजचा तो सर्वोत्तम मार्ग आहे असं म्हणत नाही. पण डेट किंवा बँलन्स्ड म्युच्युअल फंडस् हे नक्कीच आकर्षक रिटर्न्स देतात आणि मुद्दल ही सुरक्षित राहते. बँकेपेक्षा हा नक्कीच स्वीकाराह्र ऑप्शन आहे.

मी असं म्हणत नाही की शेयर मार्केटकडे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन म्हणून बघू नका. नक्कीच पहा. तुमच्याकडे अवांतर वेळ असेल तर मार्केट नक्कीच चांगले रिटर्न्स देतं. गृहपाठ करा, एक रक्कम ठरवा आणि ती फिरवा मार्केटमधे. दर महिन्याला तुम्ही अशी रक्कम टाकू शकता. पण त्यावर खूप अवलंबून राहू नका. त्यातून मिळणार्या रिटर्न्स मधून तुम्ही कुटुंबाचा वर खर्च भागवू शकता, तुम्हाला जास्त यश मिळालं तर तुम्ही दरवर्षी कौटुंबिक सहल ही काढ़ू शकता आणि जर खुप जास्त यश मिळालं तर फॉरेन ट्रिपही करू शकता. बास, त्या पलीकडे नाही.

अर्थात हा सगळा ज्याचा त्याचा प्रश्न! वैयक्तिक मी मार्केट मधे खूप प्रॉफिट कमावला किंवा खुप फटके खाल्ले असं नाही. बँकेपेक्षा नक्कीच जास्त रिटर्न्स कमावले. पण त्यासाठी बराच वेळ खर्च केला. ते रिटर्नस किती मिळाले याच्या आकडेमोडीचा शास्त्रीय आधार नसल्यामुळे गेले वर्षभर तरी शेयर मार्केटला मी फ़ॉलो करत नाही आहे 

Friday, 28 August 2015

पत्र

हे असं काही मनात येईन असं कधी वाटलं नव्हतं. पण सगळ्यांनी स्वत:च्या मुलीबरोबरचे फोटो लावले आणि उद्या बहिणीबरोबरचे फोटो झळकतील. मला तुमच्या बद्दल खूपच असूया होईल मनात. आई सांगते की माझ्या जन्माच्या तीन वर्ष आधी तिला मुलगी झाली होती. पण महिन्या दोन महिन्यात गेली. आजही आई त्या तारखेला रडते.

तुमच्या सगळ्यांच्या पोस्टी वाचून मग मी पण हे पत्र लिहिलं. माझ्या बहिणीकडून आलेलं. खुन्नस म्हणून. हं मग, नाद करायचा नाय.

एक कन्फेशन. घरात मुलगी किंवा बहीण असली असती तर मी आज आहे त्यापेक्षा अधिक रिस्पोन्सिबल माणूस असलो असतो असं मला नेहमीच वाटतं. असो. 

प्रिय राजेश

अनेक उत्तम आशीर्वाद.

मोबाईल आणि मेलच्या जमान्यात हे पत्र लिहायचं म्हणजे जरा मागासलेपणाच लक्षण. मी पण बरेच दिवसांनी पत्र लिहित आहे. तू डिप्लोमाला असताना उपदेशपर पत्र पाठवायची तीच खरी पत्रं. नंतर त्याचं प्रमाण कमी होत गेलं, म्हणजे पत्र लिहायचं. उपदेश तर अजून ही देतच असते. मोठी बहिण आहे. हक्क तर गाजवणारच. राखीच्या निमित्ताने ही संधी साधली. लहानपणी तू मला संधिसाधू आहे असं चिडवायचास त्याला मी जागले.

सध्या आपलं बोलणं होतं आणि ख्याली खुशाली कळते. पत्राच्या निमित्ताने मी भूतकाळातल्या आठवणी जागवते. हे वाचल्यावर "तू भूत आहेस, त्यामुळे तू भूतकाळातल्या आठवणी काढतेस" अशी कोटी तू करणार हे मी इथे बसून सांगू शकते. आजकाल मी घरात एकटीच असते. त्यामुळे परभणीच्या आठवणीत बऱ्याचदा रमते. मुक्ताजीन मधले आपले कापसाच्या गाठीवरचे खेळ, जांभूळ खाल्ल्यावर कुणाची जीभ जास्त जांभळी झाली ते आरशात पाहून झालेली भांडणं, तिथल्या बागेत खेळलेली लपाछपी हे आठवून जीव कातर होत असतो. माझ्या पेक्षा तू तीन वर्षांनी लहान खरं  तर. पण नाशिकला मात्र सायकल तूच मला शिकवलीस. दमायचास पण पळायचा मागे सायकल ला धरून. एक दोनदा पडले ही मी. माझा गुडघा फुटल्यावर तुझ्या डोळ्यात आलेले पाणी आठवून आजही पाणावते.

औरंगाबादला तू डिप्लोमा साठी गेलास. त्यावेळेस मीच तुला बाबांबरोबर सोडायला आले होते. १५ च वर्षाचा होता तू. त्यावेळेस मी निघताना घट्ट पकडलेला हात सोडवतानाची आठवण आली की मी गलबलते.

तुला डिग्री ला admission घेतली. कदाचित तुला माहिती नसेल पण आई बाबांनी पोटाला चिमटे काढून तुझं आणि उन्मेष चं इंजिनियरिंग चं शिक्षण पूर्ण केलं. बाबांचा टेन्शन घेण्याचा स्वभाव. त्यांची इच्छा होती की तू नोकरी करावीस. पण आईच्या आग्रहामुळे जीवाचा आटापिटा करून भारती विद्यापीठ ला तुझं शिक्षण केलं. आज वर्षाची ७५०० रु फी काहीच वाटत नाही. पण त्याकाळी हे पैसे जमावतानाची त्यांची ओढाताण आठवली की त्याच्या ऋणातून कधी उतराई होऊ शकू असे वाटत नाही.

वैभवी तुला आवडते, हे तू मलाच पहिल्यांदा फोन करून सांगितलं. फोटो पाहिल्यावरच मला ती आवडली. आणि प्रत्यक्षात भेटल्यावर तर ती माझी मैत्रीणच झाली. तुझ्यासारख्या चिडक्या माणसाला लगाम घालण्यासाठी तिच्यासारखी खंबीर पण सोशिक जोडीदार हवी होती आणि ती तुला मिळाली हे तुझं  भाग्यच समज. बाबांच्या शेवटच्या दिवसात तिने जी सेवा केली त्याला तोड नाही. घर सांभाळून lab चालवणाऱ्या बायकोकडे लक्ष दे.

स्वत:चं करियर घडवताना तब्येतीकडे दुर्लक्ष करतो असं मला वाटतं. २०११ ला प्लास्टी झाली पण तुझा टेन्शन घेण्याचा स्वभाव काही बदलत नाही. ह्या बाबतीत तरी वैभावीचा आदर्श ठेव. प्रतिकूल परिस्थितीत शांत डोकं कसं ठेवायचं हे शिक तिच्याकडून. ठीक आहे, थांबते. आठवणीत रमताना पुन्हा उपदेशाचे डोस पाजू लागले.

बरंच मोठं पत्र झालं. आईला साष्टांग नमस्कार सांग. (तिच्या नावामागे सौ  लिहिता लिहिता राहते आणि सहा वर्षानंतर ही मी  रडते) एक दोन दिवसात फोन करीनच. यश आणि अभिषेकला आशीर्वाद आणि नील ला गोड पापा.

वैभवी, उन्मेष, अर्चना ला नमस्कार. त्यांच्यासाठी वेगळं पत्र लिहीन. परत हा प्रकार आवडू लागला आहे. पत्र.

तुझीच

ताई 

Thursday, 27 August 2015

शिक्कामोर्तब

२००२ ला मी रोलॉन नावाच्या कंपनीचा जॉब सोडला. माझा Manager बोनी म्हणून होता. मला म्हणाला "अरे राजेश, कसं होईल आता. नवीन माणूस कसा मिळेल. आणि मुख्य म्हणजे चांगला पण मिळायला हवा" काय कारण ते माहित नाही, पण माझी अन बोनीची सॉलिड घष्टन होती आणि बोनीशीच नाही तर ऑफिस मधल्या सगळ्यांशी जुळलं होतं व्यवस्थित होतं. मी बोनीला बोललो "चिंता नको करू. एक नाही, चार राजेश मिळतील तुला. आणि मिळवून द्यायची जबाबदारी माझी."  TOI मध्ये छान डिझाईन केलेली ad टाकली. आणि सेन्ट्रल हॉटेल ला इंटरव्ह्यू अरेंज केले. दोन दिवसात कडाकड २० लोकांचे इंटरव्ह्यू झाले आणि पाच एकाहून एक सरस लोकं सिलेक्ट केले अन म्हंटल बोनीला "घे लेका. एक नाही पाच राजेश उभे केलेत. आणि त्याच्या पेक्षाही सरस"

ही गोष्ट तेरा वर्षापूर्वीची.

गेले दोन दिवस इंटरव्ह्यू घेतोय. सेल्स को ऑर्डीनेटर साठी. आज शोर्टलिस्ट केले ९ जण. ६ मुली आणि ३ मुलं. आणि तुम्हाला सांगतो नऊ  नावं लिहायची कागदावर एका खाली एक. अन डोळे झाकून कुठल्याही एका नावावर बोट ठेवायचं आणि सिलेक्ट करा. कामात परफेक्ट असणारच. असे एक नाही ९ हिरे सिलेक्ट केलेत.

लोकं घ्यायची चौथी वेळ. लोकं मिळत नाही अशी जी बोंब मारतात तिच्यात काही अर्थ नाही असं मला तेरा वर्षापूर्वी वाटलं होतं.

आज त्यावर शिक्कामोर्तब झालं.

**************************************************************************

किमान पाच कंपन्याचे लोकं आले. ह्या पाचही कंपन्या पुण्यात चालू झाल्या होत्या दोन एक वर्षापूर्वी. दोन अमेरिकन, दोन ब्रिटीश, एक जर्मन. दोन वर्षातच गाशा गुंडाळला. कारणं काय, तर ह्या देशात बिझीनेसला पुरक वातावरण नाही. शासनाचा taxation चा जाच आहे, कस्टमर वेळेत पैसे देत नाही, वारंटी स्कीमचा गैरफायदा घेतात. पुण्यातच ५ उडल्या तर देशात किती गेल्या असतील. परदेशात जाऊन मोठमोठी आश्वासनं देणं ठीक आहे पण ग्राउंड लेवल ला जे सांगितलं त्याची पूर्तता पुढील वर्षभरात केली नाही तर २०१९ ला वांदे होतील हे ध्यानात असू द्यावं. परवा जेफ शी बोलत होतो, अमेरिकेत. म्हणाला "अमेरिकेत तर भारताचा खुप बोलबाला आहे. ब्रिक्स देशापैकी फक्त भारतातंच आलबेल आहे असं अमेरिकेत बोललं जातं. आम्ही खुप ambitious प्लानिंग करतो आहे, भारतासाठी." मी बोललो "तात्या, सावकाशीने घे. तिथल्या भारतीयांच्या बाजारगप्पांवर तू जर काही ठरवत असशील तर चूक करतो आहेस. इथे आमच्याशी बोल. मान्सून अर्धा झाला तर आमची पळता भुई थोडी झाली आहे. श्रद्धा ठेव पण सबुरी ही ठेव".


एकंदरीत काय! तर भरपूर घासायची आहे आपल्याला.

****************************************

तशी गरज नाही, पण यावर्षापासून एक तरी ट्रेनी इंजिनियर घ्यायचा ठरवला आहे. पंखात बळ द्यायला चालू करावं, नाही का?


Sunday, 23 August 2015

टिटो भाग २

टिटो चौधरी, बांग्लादेशचा रहिवासी. तिथला अल्पसंख्यांक. घरचं ठीकठाक. पण एकत्र कुटुंब. घरात १०-१२ सदस्य. कर्ता पुरूष, टिटोचे आजोबा. त्यांचं सगळ्यांनी ऐकायचं. टिटो तरूण झाला, पण होता होता कंटाळला बांग्ला देशमधल्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीला. तेव्हाच ठरवलं त्याने, हा देश सोडायचा. आणि देश निवडला पृथ्वीवरचा स्वर्ग, स्विट्झरलँड. व्हिसा मिळवणं काय खायची गोष्ट नव्हती. टिटोने पूर्ण ताकद लावली. पण दुर्दैव. तीनवेळा व्हिसा रिजेक्ट. आणि तीनवेळा नाकारला की तीन वर्षं त्याला अर्ज देता होणार नव्हता. अन टिटोला तर कधी तो देश सोडू असं झालं होतं. मग त्याने एक शक्कल लढवली. रूमानिया चा व्हिसा काढला. तो तसा गरीब देश. तिथला मिळाला. तिथून लपतछपत टिटो स्वित्झरलँडला आला. एक लक्षात घ्या, तेव्हा युरोपियन संघाचा शेनगेन व्हिसा नव्हता. प्रत्येक देशाचा वेगळा व्हिसा. दोन एक देशातून प्रवास करत पठ्ठ्या आला.
स्वित्झरलँडला पोहोचण्यापूर्वी एका नदीतून बोटीने प्रवास करताना टिटोने बांग्लादेशचा पासपोर्ट पाण्यात फेकून दिला. हे सांगताना टिटो म्हणाला "मुझे वापस जानाही नही था। मेरा पासपोर्ट डोर थी। पासपोर्टही नही रहेगा तो मुझे कैसे डिपोर्ट करेंगे?"

कुठल्यातरी जंगलातून चालत येत स्वित्झरलँडच्या पोलिसांना सरळ सरंडर झाला. युनोच्या नियमानुसार आणि मानवतेच्या आवरणाखाली पोलिसांनी त्याला ठेवून घेतलं. अशा लोकांची डिपोर्टची व्यवस्था पूर्ण करेपर्यंत स्वित्झरलँडचे पोलिस तात्पुरता जॉब मिळवून पोटापाण्याची व्यवस्था करतात. टिटोला ही सगळी माहिती होती. अभ्यास करूनच त्याने पाऊल टाकलं होतं. टिटोला फ्रान्स बॉर्डरजवळच्या एका गोपाळाकडे रवानगी केली. गायी, म्हशी होत्या. पण एकटाच म्हातारा अन टिटो त्याचा स्वीय सहाय्यक. दहा दिवसातच कंटाळला अन सरळ त्याने तिथून पोबारा केला. अर्थात आता त्याची काळजीची जबाबदारी स्वित्झरलँड पोलिसांची होती.

तिथून त्याने सरळ न्युशॅटल गाव गाठलं गावाच्या बाहेरच एका इंडियन रेस्टॉरंटमधे जॉब धरला. आता इंडियन रेस्टॉरंट पण मालक पाकिस्तानचा. हे तुम्हाला जगभरात पहायला मिळेल की नाव इंडियन रेस्टॉरंट चं अन मालक पाकिस्तानी. "पाकिस्तानी लिखेेंगे तो आयेगा कोन हॉटेलमें" इति टिटो. तिथे काम करतानाच त्याने एक रूम घेतली भाड्याने. लपत छपत काम करू लागला. चार पैसे गाठीशी जमा होऊ लागले.

पण ती स्वित्झरलँडची पोलिस. झिरो क्राईम देश. त्यांनी शोधलाच त्याला. आणि डिपोर्टची प्रोसेस चालू झाली. बांग्ला देश दूतावासाने टिटोच्या पासपोर्टची पूर्तता करण्याचं काम चालू केलं होतं.

टिटोला संभाव्य धोक्याची कल्पना आली. त्याच्या लक्षात आलं, आता या देशात रहायचं असेल तर स्वित्झरलँडचा जावई होणे हा एकमेव पर्याय होता. त्याची तशी घरमालकाच्या एकुलत्या एक मुलीशी घसट वाढली होती. किंवा त्याने वाढवली होती असं म्हणा. दिसायला सुंदर पण तिला एक हात नव्हता. वयाने दोन वर्षाने मोठी. अर्थात तो काही प्रश्नच नव्हता. तिच्या अपंगत्वामुळे तिला कुणी स्वीकारलं नव्हतं अन तेच टिटोच्या पथ्यावर पडलं.

पोरीचा बाप मात्र नाराज होता. जन्माने बांग्लादेशी असलेल्या हॉटेलच्या वेटरच्या, अन मुख्य म्हणजे इललिगल इमिग्रंटला कोण आपली मुलगी देणार. पण पोरगी टिटोच्या प्रेमात आकंठ बुडली होती. बाप लग्नाची टाळाटाळ करत होता.

अन ती घटिका समीप आली. लग्नाची नव्हे तर टिटोच्या डिपोर्टची. बांग्लादेशचा पासपोर्ट पोलिसांच्या हातात होता. टेंपररी वर्क परमिटची मुदत संपत आली होती. आठवड्याभरात टिटोची रवानगी स्वर्गातून नरकात होणार होती.

इथे मात्र टिटो भेटला पोरीच्या बापाला अन जीवाच्या आकांताने त्याने सांगितलं की मी तुमच्या पोरीच्या पदरात जगातलं जमेल तितकं प्रेम ओतेल. अन बाप फळला. पोरीच्या हट्टापुढे अन टिटोच्या निग्रहापुढे त्याने नमतं घेतलं.

स्वित्झरलँडचे पोलिस टिटोची मांडवपरतणी करण्याची तयारी करत होते त्याचवेळेस टिटो गुडघ्याला बाशिंग बांधून बोहल्यावर उभा होता. वाजंत्री वाजली अन टिटो चौधरी युरोपातल्या एका श्रीमंत देशाचा जावई अन पर्यायाने नागरिक झाला.

आम्हाला भेटला तेव्हा टिटो फिलीप मॉरिस नावाच्या सिगरेट कंपनीत टेक्निशियन झाला होता अन सौ चौधरीचे डोहाळजेवणाचे कार्यक्रम झडत होते. 

टिटो भाग १

१९९९, स्वित्झरलॅंड चा पहिला दौरा. स्वर्गवासी होऊन दोन दिवस झाले होते. न्युशॅटल नावाच्या गावात युरोटेल नामक हॉटेलमधे राहत होतो. अशाच एका रम्य संध्याकाळी (रम घेऊन खाली उतरलो म्हणून रम्य) हॉटेलच्या खाली येणार्या जाणार्या लोकांकडे भोचक नजरेने पाहत मी आणि वाघेला उभे होतो. मोटरसायकलवर सवार असलेला एक हेल्मेटधारी नौजवान वेगाने अचानक आमच्या दिशेने आला आणि थांबून वायजर वर करून म्हणाला "हिंदुस्थान से हो". पहिले तर तो ज्या पद्धतीने आला त्यावरून तर वाटलं हा उडवणार आपल्याला अन त्यामुळे गाळण उडाली. सावरून म्हंटलं "हा". तर शिरस्त्राण काढून चेहरा दाखवत अन हात पुढे करत तो म्हणाला "मैं टिटो चौधरी" मी विचारलं "इंडियन?" तर म्हणाला "नही बांग्लादेश से। लेकिन हिंदी बात कर लेता हू" अर्थातच बातचीत चालू झाली, कॉफ़ी झाली. सात वाजले. म्हणाला "चलो, खाना खाएँगे" आम्ही आपलं हो ना करता करता, खरं तर होच, चला म्हंटलं. चार बिल्डींग सोडून एका अपार्टमेंट मधे तिसर्या मजल्यावर टिटो आम्हाला घेऊन गेला. तिथं अजून दोघं जण बसले होते. आमची ओळख करून दिली. अश्फ़ाक आणि रिझवान. आणि पाठोपाठ टिटो ने सांगितलं "ये दोनो पाकिस्तानसे है"

इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. आम्ही कशाला न्युशॅटल ला आलो ते सांगितलं. तोपर्यंत त्यांनी जेवण दिलं प्लेट मधे. सॉलीड टेस्टी होतं. नॉनव्हेज अर्थातच. आम्हीही त्यांना विचारलं ते कधीपासून आहेत, का आलेत. त्यांनी मोघम उत्तरं दिली. बोलण्याचा रोख साधारण आमचा बिझीनेस, हिंदुस्तान मधे (हो ते सारखा उल्लेख हिंदुस्तान असाच करत होते) मोकळं वातावरण याकडेच होता. जेवण झाल्यावर साधारण ९ वाजता "खुदा हाफ़िज़" वैगेरे निरोपाचे सोपस्कार झाले. दुसर्या दिवशी रविवार होता. टिटो हॉटेलवर मला म्हणाला "चलो, कल आपको मैं घूमाके लाता हूँ।" नेकी और पूछ पूछ.

सकाळी साडेआठला ब्रेकफ़ास्ट ताबडून आम्ही टिटो बरोबर निघालो. ले लॉक नावाचं जवळच गाव आहे आणि बर्यापैकी जंगल आहे. टिटो आम्हाला त्या जंगलात घेऊन गेला. त्या घनदाट जंगलाच्या मधोमध एकच रेस्टॉरंट निवांत उभं होतं. साडेअकरा वैगेरे झाले असतील. ते हॉटेल १८५० चं  रस्टिक वैगेरे असं होतं. काऊबॉयच्या हँट घालून एक दोघं बसले होते. हॉटेलची मालकीण सुहास्यवदना गौरांगना होती. आज १६ वर्षानंतरही लख्ख आठवते मला. सागर मधील डिंपल आठवते, मारिया, साधारण तशीच. तेव्हा सालं हे फेसबुक प्रकरण नव्हतं नाहीतर सॉलीड फोटो टाकले असते.

अमृतप्राशन करत असताना, हो, बियरला स्वीसमधे अमृत म्हणतात, मी टिटोला विचारलं "अश्फ़ाक और रिझवान नही आये हमारे साथ" त्याने जे सांगितलं, मी तीनताड उडालो. "वो कहासे आयेंगे. पोलिटिकल असायलम लेकर यहाँ रहते है। शायद गुंडे है। पोलिटीकल पार्टीसे जुड़े है। काफ़ी मर्डर है उनके नाम। देशसे हकाल दिये है।" मला त्या थंडीतही घाम सुटला. आता टिटो खरं सांगत होता की फेकत होता, काय माहित. पण त्या सुमसान जंगलात मला टिटोची पण भिती वाटू लागली. आत्ता याठिकाणी मला तुकडे करून फेकूनदिलं तर कुणाला पत्ता लागणार नव्हता. मी विषय बदलला.

साधारण एकच्या सुमारास आम्ही उठलो. कारमधून परत येताना मी टिटोला विचारलं "लेकिन आप कैसे बांगला देशसे यहाँ पहुँचे" टिटो ने त्याची सुरस आणि चमत्कारिक कथा सांगितली. 

Wednesday, 19 August 2015

रोशनी

अॅडमिनने सांगितलं आहे नो मेसेज म्हणून. पण नाही राहवत आहे. काल सिप्लात गेलो आणि आज तळेगावला.

हं ती गेली. मित्रविनंती आली होती दोन एक वर्षापूर्वी. आणि ती अक्षरश: धडकायची पोस्टवर. पोस्टला लाईक, कॉमेंटसला लाईक. दुसर्यांच्या पोस्टवरील कॉमेंटसला लाईक. मी विचार करायचो, कोण आहे बा ही. एक दोघांनाही विचारलं तिच्याबद्दल, कोण आहे ती. कुणी सांगू नाही शकलं. ती लाईक वर्षावत राहिली अन मी त्यात चिंब भिजत राहिलो. मग मला शशांकने खर्डेघाशीवर आणलं. आल्या दिवशीच मेसेज आला "मुजरा राजे" प्रत्यक्ष ओळखीचे सोपस्कार झाले. आणि मग सिलसिला चालू झाला, प्रतिक्रियांचा, कधी कारूण्याचा, तर कधी विनोदाचा. लहान मुलांचं वेड होतं बहुधा तिला. नीलवर काही लिहीलं की खळखळून दाद दिलीच म्हणून समजा. नीलच्या फुटबॉल प्रेमाबद्दल कळल्यावर तिचा मेसेज आला "नील 👍🙌🙌   त्याच स्वप्न नक्की पूर्ण होणार आपण सगळे ती मैच एकत्र बघणार 😊😊" (मॅच म्हणजे वर्ल्ड कप फायनल)

एकदिवशी तिचा अचानक मेसेज आला "राजे, तुमच्याविषयी ऐकून कान तृप्त झाले" म्हंटलं आता हे काय नवीन. पहिल्यांदा बोललो, भरभरून. कुठेतरी MIDC त माझं नाव निघालं अन ही तिथे. मिन्नतवारी करून म्हंटलं राजे म्हणणं बंद कर. तर म्हणाली "तुम्ही अहो जाहो म्हणणं बंद करा"

कॉमेंटायची नाही कधी पोस्टवर. मी छेडलं तिला याविषयी. तर म्हणाली "तुमच्या पोस्टवरच्या कॉमेंटस किती छान असतात. मी त्यात इतकी गुंगुन जाते की लिहायचंच सुचत नाही"

फेसबुक डिअॅक्टिव्हेट केल्यावर पंधरा एक दिवसाने तिचा असोशीचा मेसेज आला. "या परत. सध्या जे चालु आहे तिकडे त्यात तुमची उणीव जाणवते"

परवा मुकुंदने, दादू तिचा, खुप मानायची त्याला,  सांगितलं "आजारी आहे ती खुप. जाऊन भेट" तसंही मला तिला भेटायचंच होतं. म्हंटलं गप्पा मारू, टाळ्या वैगेरे देऊ. पण तसं व्हायचं नव्हतं. काल गेलो मी. हिरमुसलो. ती निपचित पडून होती. श्वास चालू होता फक्त. नाही म्हणायला बीपी चेक करण्यासाठी नर्सला मदत करतानी तिचा हात हातात घेतला. टाळ्यांच्या ऐवजी असा हात घेताना कसंसंच झालं. आई बोलली तिची भरभरून. ग्रूपवरच्या लोकांची आठवण काढायची म्हणे. "त्ये कोन मच्छुदा. त्यांचा मेसेज आला की खुदखुदत बसायची. मी म्हनायचे, वेड लागल तुला" इति आई. निलीमावर भारी जीव होता तिचा.

परत निघताना आईंना म्हंटलं "येतो गुरूवारी. उद्या मुंबईला जाऊन येतो" माऊली म्हणाली "ये बाळ" निघालो तेव्हा जाणवलं होतं की ती परत न येण्याच्या वाटेवर चालत आहे, पण मन वेडं असतं.  ती त्या वाटेवर इतक्या लवकर दिसेनाशी होईल असं वाटलं नव्हतं.

फेसबुकवर च्या परिचिताचा हा पहिला मृत्यु. चटका लावून गेला. उद्यापासून स्टेटस पडतील, शेकडो लाईक्सही पडतील.  पण ती नसेल.

ती, रोशनी alias अनिता, कालच कळलं तिचं खरं नाव.

आज गेली अनंताकडे.

___/\___

Tuesday, 18 August 2015

स्वगत

तुम्हाला म्हणून सांगतो एकेकाळी मी पण जबरी चिडका माणूस होतो. मला नेते, अभिनेते, पुरस्कार देणारे, पुरस्कार घेणारे यांच्याबद्दल सॉलीड चीड यायची. पण माझ्या लक्षात आहे की माझा सोयीचा राग असायचा. म्हणजे मी अशा लोकांवरच चिडायचो जेव्हा मला माहित असायचं की:

- या लोकांपर्यंत माझ्या शब्दावाटे व्यक्त केलेली चीड पोहोचत नाही.

किंवा

- जरी पोहोचलीच तरी माझ्या टिनपाटपणाबद्दल इतकी खात्री असते की ते माझी थोडीसुद्धा दखल घेणार नाहीत.

मग आता ठरवलं आहे, आपली शायनिंग तिकडंच टाकायची जिकडे आपली चलती आहे. एकदम पेटंट गिर्हाईक म्हणजे माझं धाकटं पोरगं. "ए गप रे" म्हंटलं की ते बिचारं मुटकुळं करून गप कोपर्यात बसतं. हं, आणि धाकटंच बरं का, थोरलं पण नाही. तोपण फाट्यावर मारतो मला. नाहीतर मग कंपनीतले पोरं. माझ्या अधिकाराच्या जरबेखाली दबलेले. माझ्यामागे  शिव्याच घालत असतील ते, पण समोर मात्र मला घाबरण्याचा जबर अभिनय करतात. माझा अहंकार त्यानेच सुखावतो.

काही लोकांची जळजळ बघून मधे मधे मी पण टूरटूर करण्याचा प्रयत्न केला. ती मंडळी गुरकायची, त्यांचं बघून मी ही भूंकायचो. पण मग लक्षात आलं की आपण कितीही जोरात भुंकलो तरीही कुई कुई असाच आवाज यायचा. स्ट्रेपसिल्सच्या पट्ट्या संपवल्या पण मायला म्याव म्याव चं रूपांतर काही डरकाळीत झालं नाही. आणि कसं येणार हो. भोगलं तर पाहिजे, सोसलं पाहिजे आयुष्यात. उगं आपलं आयुष्य फिरणार्या पंख्याखाली बुड थंड करत घालवलं तर शब्दातून धग कशी येणार.  नाही म्हणायला कधी त्रागा करतोही मी, पण परवा एक मित्र म्हणाल्याप्रमाणे त्यात भाबडेपणा आहे. पण कसं आहे, कुणाचं अनुकरण करत उसनं अवसान आणून चीड चीड करत बसण्यापेक्षा त्रागेखोर पण सच्चा भाबडेपणा व्यक्त करण्यात म्या पामर पुरुषार्थ मानतो.

आमचे मास्तर सांगायचे "कटिंगच्या बाबतीत पिताश्रींना फॉलो करा" "Always follow your dad's haircut" त्या धरतीवर स्टेटसच्या बाबतीत ठरवलं की स्टेटस असं असावं की आपल्या पोराने फ़ॉलो करावं. आई बापाने फॉलो करावं. विचार करतो इथं पसाभर लोकांना इम्प्रैस करण्यासाठी काहीबाही लिहीलही पण पोराने आपले विचार वाचले अन त्याच्या मेंदूत विद्वेषाचा निखार पेटला तर सगळं मुसळ केरातच की. मोठा झाला की तो द्वेषाचा भस्मासूर माझ्याच डोक्यावर बसून मुतेल की.

असो. तर स्वगत यासाठी की आता ठरवलं आहे, आपली वाफ तिथंच दवडावी जिथं समोरच्याला चटका बसेल. नाहीतरी ग्यास सिलींडर खुप महाग झालंय हो! 

Sunday, 16 August 2015

हं मग

मध्ये स्टीव्ह आला होता इंग्लंड हून. म्हणत होता की लंडन मध्ये आता भारतीयांची संख्या खूपच वाढली आहे. अमेरिकेहून जेफ आणि क्रेग आले होते. ते हि हाच सूर आळवत होते.

काय होईल ना  भविष्यात?

पूर्ण युरोप आणि अमेरिका हे दोन्ही खंड एशियन लोकांमुळे भरून जाईल. पाश्चात्यांची उद्यमशीलता वैगेरे हे गुण ही मंडळी उचलणार का ह्या संपूर्ण खंडाचं मानसिक स्वास्थ्य एशियन बिघडवून टाकणार हा कळीचा मुद्दा आहे. अत्यंत हेकेखोर असे चायनीज आणि पूर्णत: धर्मवेडे  असे भारतीय आणि पाकिस्तानी लोकांचं प्रमाण दिवसेदिवस वाढत जाणार असं दिसतं आहे. मध्ये अमेरिकन पार्लमेंट मध्ये की  व्हाईट हाउस मध्ये पूजा की काय झडली होती.

इथे फेसबुकवर ते आहेत म्हणून नाव लिहित नाही. पण लंडन मधील एका विभागाचे Conservative पार्टीचे नेते आहेत ते. दरवर्षी इंग्लंड सरकारकडून नवरात्र साजरा करण्यासाठी ७२००० ब्रिटीश पौंडाची मदत घेतात. दोन वर्षापूर्वी Cameroon सरकारने ती बंद केली तर या मंडळींनी निषेध मोर्चा नेला.

कुठल्यातरी उद्यानात jacket वैगेरे घालून होळी वैगेरे ही साजरी केली जाते. या पाश्चिमात्य देशाच्या सरकारांनी एशियन मंडळींचे लाड मतासाठी किंवा अजून कुठल्या कारणासाठी चालू ठेवले तर आपली  मंडळी त्यांच्या   डोक्यावर जाऊन बसणार याबबत शंका नाही.

शरद च्या वाक्याचा दुसरा संदर्भ घेऊन असं म्हणू शकतो की given a choice आपण आपल्या परंपरांचा डंका जगाच्या पाठीवर कुठेही वाजवू शकतो. अगदी अंतर्तिका वैगेरेला गेलं तरीही.

लंडन च्या साउथहॉल भागात गेलात तर तुम्हाला प्रश्न पडेल की पंजाबात फिरत आहात की इंग्लंड मध्ये आहात. तुम्हाला सगळं दिसेल इथे. फुटपाथ वर जिलेबी तळतात, दुकानाच्या बाहेर encroachment केली आहे, हॉर्न वाजवतात. अगदी रीतसर. मला खात्री आहे अमेरिकेत ही असे काही विभाग असतीलच जिथे आशियायी मंडळीनी नियम वाकवले आहेत.

जे वाचलं, आणि फिरलो त्यावरून असं वाटतं की फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि Scandinavian देशांनी या प्रकारांना कडक नियम लावून दूर ठेवलं आहे. पण इंग्लंड आणि अमेरिका मात्र याबाबतीत ढिलं धोरण ठेवून स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेत आहेत, असं मला वाटतं. (हं मग, तू कोण झिंगुर. चल हवा येऊ दे)   

Saturday, 15 August 2015

भविष्य

भारत एक समृद्ध देश व्हावा हे आपल्याला सगळ्यांना वाटत असतं. हो, मलाही तसंच वाटतं. पण आजची सामाजिक, राजकीय, भौगोलिक परिस्थिती पाहता अवघड तर वाटतं. पण हे मन खूप आशावादी आहे. मग मी विचार केला अन साधारण खालील पर्याय माझ्या मनात आले. या पैकी काही घडेल अन आपला  एक सशक्त आणि समृद्ध देश म्हणून नावारूपाला येईल. कुठलाही पर्याय घेतला तरी त्याचं मूळ लोकसंख्येशी जाऊन थांबतं. मग थोडक्यात लोकसंख्या कमी कशी होईल.

१. सध्या जे चालू आहे त्या पद्धतीने समाजाचं evolution होत राहील. एक दिवस असा येईल की तेव्हापासून लोकसंख्येची negative growth होईल. त्याच वेळेला पाण्याचं नियोजन होईल. सगळ्या देशात मुबलक प्रमाणात पाणी मिळेल. इंडस्ट्री आणि शेती याचा योग्य समन्वय साधला जाईल. लोकं धर्म आपल्या घरात सांभाळतील आणि बाहेर धर्मावरून मारामाऱ्या होणार नाहीत. विकासाचे विकेंद्रीकरण झाल्यामुळे मुंबईची लोकसंख्या २० लाख होईल. मेट्रो सिटी असा काही प्रकार न राहता अनेक छोटया गावांची लोकसंख्या वाढेल.

२. भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्धाची ठिणगी पडून मध्य दक्षिण आशिया त प्रचंड हाहाकार माजेल. अण्वस्त्रांचा मुबलक वापर होऊन भारताची निम्म्याहून अधिक लोकसंख्या मृत्युमुखी पडेल. ५० कोटी लोकसंख्या असलेल्या विशाल देशात प्रतिकुलतेची अनेक आव्हाने उभी राहतील. त्या आव्हानावर मात करत देश प्रगती करत राहील. आणि पुढील ५० वर्षात सशक्त देश म्हणून नावारूपाला येईल. (शेजारचा पाकिस्तान देश सुद्धा यातून शहाणपण शिकून राहण्यास योग्य देश होईल)

३. बोल तिरंग्या तुला देऊ कशी सलामी
    जातीय दंगलीत हात कापले दोन्ही …………. सतीश दराडे (शब्द पुढे मागे झाले असतील. माफी असावी)
भारतातील लोकं जातीधर्मावरून एकमेकांच्या जीवावर उठत जातील. एक दिवस असह्य होऊन देशात प्रचंड यादवी माजेल. पूर्ण देशात कत्तली होतील. देश अगदी होत्याचा नव्हता होईल आणि मग शून्यातून विश्व उभं राहील.

४. पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे देशात निरनिराळ्या भागात दुष्काळ पडेल. बर्याच भागात वाळवंट तयार होईल. त्या भागातले लोकं पाण्याच्या शोधात दुसर्या प्रदेशात जातील. तिथले लोकल लोकं आणि माय्ग्रेटेड लोकांच्यात युद्ध होईल अन लोकं मृत्युमुखी पडून देशाची लोकसंख्या कमी होईल.

५. उत्तर भारत, मध्य भारत आणि दक्षिण भारत असे किंवा याही पेक्षा छोटे देश तयार होतील. त्या छोटया देशांच्या समूहाला Indian Union असं म्हंटल जाईल. युरो सारखं त्याचं चलन सारखं असेल. आणि मग या छोटया देशांची अस्थापना सुकर होऊन शांतता आणि समृद्धी येईल.

६. देशात एखादा हुकुमशहा जन्माला येईल. तो आणि आर्मी सगळ्या देशाला ताब्यात घेईल. प्रचंड हिंसाचार होईल. असंख्य लोकांना नाहीसं करण्यात येईल. लोकं उठाव करतील. हुकुमशहाला लोकं चिरडून टाकतील. आणि मग पुन्हा देश उभा राहील.

७. लोकं या देशातल्या अनागोंदीला कंटाळतील. आणि मग देश सोडून जगात जिथे जागा मिळेल तिथे इमिग्रेट होतील. जगभरात ठिकठिकाणी भारतीय दिसतील. हे होताना भारताची लोकसंख्या कमी होईल.

८. देशात ठिकठिकाणी भूकंप, पूर असे निसर्ग निर्मित संकटं येतील. मोठमोठी शहरं जमिनीवरून गायब होतील.

९. देशात कुठला तरी रोग आक्रमण करतील अन मग मुंग्यासारखी माणसं पटापटा मरत जातील. जो पर्यंत रोगाला आटोक्यात आणायची लस तयार होईल, मी निम्म्याहून अधिक देश त्या रोगाला बळी पडला असेल.

असं काहीतरी होईल आणि हा देश आजपासून ५० वर्षाने/१०० वर्षाने एक समृद्ध देश होईल.

बाकी माहित नाही, पण होईल खरं हे नक्की

भविष्य 

वारसा

नील: पप्पा, तुम्ही मला शाळेत सोडायला या ना. मला खुप मजा वाटते.
मी: हो रे मला ही खुप मस्त वाटतं.

नील: आता तुम्ही तीन वर्षानंतर रिटायर होणार म्हणता ना. मग तुम्हाला हेच काम. मला शाळेत सोडायचं, घेऊन यायचं. फुटबॉल क्लास न्यायचं. थांबायचं. येताना काहीतरी मस्त खायचं, प्यायचं. मस्त मजा करू यात.
(संदर्भ: वैभवी अन माझं बोलणं, कंपनीत जाणं बंद करून दुसरं काही तरी काम करायचं, वयाच्या पन्नासाव्या वर्षी)

मी: हो ना, कसली धमाल! पण अरे एक प्रॉब्लेम झाला आहे. माझी रिटायरमेंट पाच वर्षाने होईल असं ठरलं आहे. तोपर्यंत तुझी शाळा संपेल!

नील: काय यार पप्पा तुम्ही

असं म्हणत फुटबॉल खेळू लागतो. दोन मिनीटाने परत माझ्याकडे येत म्हणाला

"नाहीतर मी एक काम करतो. मी दोन वर्षं नापास होऊ का?"

मी: ऑं
********************************
नील: पप्पा, एक गंमत सांगू का?

मी: काय रे?

नील: टीचर ने प्रश्न विचारला की मी काय करतो ते माहित आहे का?

मी: नाही रे. काय करतोस?

नील: मला जर प्रश्नाचं उत्तर थोडं थोडं माहित असेल तर मी मुद्दामून हात जोरात वर करून Mam, here. Mam असं बोलावून दाखवतो की मला ग्यारंटेड उत्तर माहित आहे. मॅम ला पण ते खरं वाटतं. मग ती मला प्रश्नच विचारत नाही. (हात वर करतानाचं नील चं तोंड अन डोळे हे अनुभवयाचं फक्त. इथे लिहू नाही शकत)

मी: ओहो. भारी रे. आणि समजा तुला उत्तर अजिबात माहित नसेल तर काय करतोस?

नील: सोप्प आहे. मॅम ने प्रश्न विचारला की मी मुद्दामून पेन्सिल नाहीतर रबर जमिनीवर पाडतो. आणि ती शोधण्याची अॅक्टिंग करतो. तोपर्यंत कुणातरी दुसर्याला विचारते मॅम. मग आपण परत बसायचं.

मी: (अचंबित होऊन) कुणी शिकवलं बे तुला हे गधड्या.

नील: कुणी नाही. मी असाच शिकलो.

पुढच्या पिढीचा शिलेदार वडिलोपार्जित वारसा लहान वयापासूनच इतक्या समर्थपणे पुढे चालवतोय हे पाहून मला आनंदाचं भरतं आलं आहे

Tuesday, 11 August 2015

कन्क्लुजन

मध्ये एक सिरीज लिहिली. अ…….अभियंत्याचा म्हणून. WA वर एका परिचित ग्रुप वर टाकली असता, मित्राने प्रश्न विचारला, का लिहिलं तू हे? आणि साधारण त्या प्रश्नाचा रोख असा होता की  स्वत:ला जास्त शहाणा समजतोस का? की लोकं वाचत आहेत म्हणून काहीही लिहित सुटायचं का? की तुझा वेळ जात नाही का? धंदा मंदीत आहे का? प्रश्न एकंच पण त्यातून अनेक अर्थ ध्वनित होत होते.

मी पण मग विचार केला, खरंच का लिहिलं आपण हे? एक उत्तर तर नक्कीच, दुसरं कोण लिहिणार, नाही का? आपल्या हातून आजवरच्या आयुष्यात तर असं काही नाही घडलं की दुसऱ्याने त्याची दखल घ्यावी. आणि आत्मचरित्र वैगेरे लिहिण्या इतका काही मी स्वत:च्या नजरेत मोठा नाही. मग आपली टिमकी आपणच वाजवावी. ढोल पण म्हणता येत नाही. तर लिहिलं यासाठीच की अत्यंत सरधोपट पणे आयुष्य जागून सुद्धा ती वाट बिकट वहिवाट आहे असं लोकांना वाटत गेलं. तर ती तशी नसते हे सांगण्यासाठी हा खटाटोप.

सगळ्यात पहिली गोष्ट अशी की नोकरी की बिझिनेस? बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो. किंवा माझे बरेच मित्र म्हणतात "तुमची काय बुवा मजा आहे, धंदेवाली मंडळी तुम्ही" मला स्वत:ला असं काही वाटत नाही. माझं एक साधं सोपं गणित आहे. तुम्ही नोकरी करताना जिथे काम करता, ती कंपनी स्वत:ची आहे असं समजून काम करता तेव्हा भविष्यात तुम्ही बिझिनेस चालू करता. आणि जेव्हा धंद्यात तुम्ही स्वत:ला मालक न समजता नोकरदार म्हणून काम करता तेव्हा तुमची कंपनी मोठी घोडदौड करते. "An employee has to work as if he is an employer and an employer has to work as if he is an employee". धंदा केला तर श्रीमंती येते, नाही असं नाही. पण त्याला एक खूप मोठी किंमत चुकवावी लागते. मग ती कधी कुटुंबाला कमी वेळ देण्याच्या रुपात तर कधी ढासळत्या तब्येतीत. मला स्वत:ला असं वाटतं की भौतिकतेच्या कसोटीवर मी आता जसा आहे तसाच नोकरीत असलो असतो. आता कुणी यावरून असा अर्थ काढला की मी धंदा व्यवस्थित करत नाही तर ठीक आहे. एक मोठा फरक म्हणजे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य. हे मात्र धंद्यात जास्त असतं. नक्कीच.

दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बिझिनेस मध्ये खूप रिस्क आहे असं म्हंटल जातं. असेलही कदाचित. हो, लोकं पी एफ काढतात, कुणी घर बँकेत गहाण ठेवतं, कुणी मार्केट मधून पैसे उचलतं. मी मात्र स्वत: असं काहीही केलं नाही. धंदा केला पण निवांत. बाकी खूप प्रेशर्स सहन केले , पण पैशाचं टेन्शन कधी ओढवून घेतलं नाही. म्हणजे भरपूर पैसे होते असं नाही, पण अंथरूण पाहून पाय पसरले हे खरं. त्यामुळे खाण्याचे वांदे कधी झाले नाहीत. प्रतिकूलता आली की कर्तृत्व फुलतं असं म्हणतात. माझंही कदाचित जितकं फुलायाला हवं तितकं नसेलही. काही मित्र म्हणतातही, तुला धंदा करता येत नाही. खरंही असेल ते. परिस्थितीने कधी चटके दिले नाहीत की पोटाला चिमटा काढला नाही. याचा अर्थ कष्टच केले नाहीत का? तर ते केले की. एम ८० वरून दिवसाला १०० किमी ची रपेट केली. सिक्स सिटर किंवा जीपड्यातून अर्ध ढुंगण बाहेर काढून २० एक किमी प्रवास केला. कधी पायी चाललो तर कधी ट्रकमधून. पण आपण फार काय स्ट्रगल करतोय असं कधी वाटलं नाही.  अर्थात वैभवी साथीला होती, पण ती सुद्धा तिची lab चालवत होती. बँकेचं लोन, पोरांचा पगार आणि सप्लायर्स चे पेमेंट हे वेळेत करण्याची सुबुद्धी दे हीच प्रार्थना मी नेहमी देवाजवळ करत आलो आहे, आणि देवाने मला कधीही निराश केलं नाही आहेे.

मुळात उद्योजक हे नाम नसून विशेषण आहे. उद्योजकता आहे म्हणजे एक गुण आहे. ज्या कंपनीच्या एम्प्लॉयीजमधे उद्योजकता असते ती कंपनी भरभराटीची होते. त्यामुळे "हे हात नोकरी मागण्यासाठी नाही तर देण्यासाठी जन्माला आलेले आहेत" वैगेरे डायलॉग लोकं मारतात ते मला भंकस वाटतं. उद्योजकता फक्त मालकांची मक्तेदारी नसून ती कामगार आणि नोकरदार मंडळींची पण आहे.

हे आहे हे असं आहे.  मला हेच सांगायचं होतं की धंदा म्हणजे रिस्क, जोखिम वैगेरे म्हंटलं जातं. पण जेव्हढा त्याचा बागुलबुवा केला जातो तेवढं काही ते अवघड नाही. अनुभवांती दिशा ठरली अन त्या वाटेने इमानऐतबारे चालत गेलो की ती वाट कितीही खाचखळग्यांनी भरलेली असो, तिचं नंतर चांगल्या पायवाटेत आणि मग राजमार्गात रूपांतर होतं असा माझा अनुभव आहे. तुमचाही थोड्या फार फरकाने असाच असावा याबाबत शंका नाही. 

Tuesday, 4 August 2015

Picture

आयुष्यातील पहिली ब्ल्यू फिल्म औरंगाबादला बघितली. १९८५ किंवा ८६.  अक्षरश: सोहळा होता. ५-६ जण होतो. सर्व वयोगटाचे. अगदी शेजारचे काका ही होते. ते बाबांचे मित्र. मला भिती वाटत होती, की त्यांनी बाबांना सांगितलं तर? बहुधा त्यांनाही भिती असावी, मी काकूंना सांगितलं तर? दोघांनी एकमेकांना टाळ्या देत ते तासभरच प्रकरण बघितलं. हॉस्टेल ला राहत होतो खरं तर. पण औरंगाबादेत नंतर काही "तसलं" बघायची इच्छा झाली नाही.

तिथून मग पुण्यनगरीत आलो. अशोकनगर ला एम एस इ बी कॉलनी त रहायचो. इंजिनियरिंग चा अभ्यास चालू असायचा. आमच्या काळी इंजिनियरिंग रात्री अभ्यास केल्यावरच सुटतं असा एक सार्वत्रिक समज होता. अशाच एके रात्री अभ्यासात गर्क असताना, म्हणजे पेंगत असताना, आवाज आला "ए राज्या चल, शेवटच्या बिल्डींगमध्ये ट्रिपल एक्स  लावली आहे येडया." पेंगत असलेलो मी ताडकन उठलो आणि तडक त्या बिल्डींगचा टेरेस गाठला. 

रात्रीचा एक वैगेरे वाजला असेल. आणि थाट काय वर्णावा. म्हणजे अगदी रीतसर अरेंजमेन्ट होती. समोर टी पॉय वर टी व्ही. समोर दहा बारा आमचेच मित्र. हे सगळं ठरवताना त्यांनी मला का कटवलं होतं हे अजून न सुटलेलं कोडं आहे. चेहऱ्यावरच्या सज्जनतेच्या मुखवट्याला लोकं तेव्हापासून भुलत आहेत. बघू किती दिवस अभिनय करता येतो ते. असो. टी व्ही  ची पोझिशन अशी होती की डोळ्यांना कमीतकमी व्यायाम व्हावा. समोर चालू असलेला भक्ती रस सर्वजण अत्यंत विनम्रतेने ग्रहण करत होते. खूप हळू आवाजात कुजबुज चालू होती. मी डावीकडच्या कोपऱ्यात जाऊन बसलो. बाजूचा दिलीप ओशाळलेल्या चेहऱ्याने माझ्याकडे बघून हसला. मी त्याला हळूच टाळी दिली. थियेटर मध्ये उशिरा पोहोचल्यावर आपण पहिला प्रश्न विचारायचो "किती वेळ झाला?" तेच दिलीप ला विचारलं. तो म्हणाला "संपत आला लेका. आता शेवटचा सीन" मी हिरमुसलो. 

शेवटचा जबरी सीन चालू होता. सगळ्यांच्या उत्कंठा अगदी शिगेला पोहोचल्या होत्या. सगळ्यांनी रोखलेले श्वास सोडले असतानाच आवाज आला "ए, अरे काय चालू आहे रे नालायक पोरानो" अचानक कुणीतरी लाईट लावले. पाहतो तर महेश्या आणि संज्याचे वडील. "कुठं आहेत रे भाड्यानो. हे असले उद्योग चालतात रे हरामखोरानो. घरात सांगतो जय संतोषी मा पिक्चर पहायचा नवीन टी व्ही वर, आणि इथे ही थेरं चालू आहेत" हे बोलत असताना महेशच्या कानफटात बसली पण होती. पोरं आवरा आवरी करत असताना मी सुमडीत निघून आलो होतो. तसंही मला पोरांनी हे करताना विश्वासात घेतलं नव्हतं. आणि मुख्य म्हणजे सीन पण शेवटचा च पाहायला मिळाला होता. 

मी हळूच घरी पोहोचलो. गुपचूप अंथरुणात झोपून घेतलं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बाबांची नजर चुकवत असतानाच त्यांनी विचारलं "काय काल तुम्ही पण दिवे लावलेत का टेरेसवर" मला अंधारात कुणी पाहिलं नव्हतं, असं मला वाटत होतं. काय झालं, हे विचारण्यापासून माझा अभिनयाचा कस लागला. बाबा काही न बोलता पेपर वाचत बसले. त्यांना कळलं की नाही हे ते जाईपर्यंत समजलं नाही. अशी कित्येक गुपितं मृत्यूबरोबर गाडली जात असतील नाही ?

दोन दिवसांनी महेश भेटला. म्हणाला "लै मारलं रे बापाने. ते ठीक आहे रे. पण बापाने पण पूर्ण सीन बघूनच आवाज टाकला. किती वेळ बघितला असेल काय माहित. फार वाटत असेल तर सीन चालू झाल्या झाल्या थांबवायचं ना. आपल्याला थांबवणारे लोकं आपल्यापेक्षा चालू आहेत. काय बोलतो?" अन टाळीसाठी हात पुढे केला. 

महेश कुठे आहे माहित नाही. त्याला  आजही मला टाळी दयावीशी वाटत आहे. 
*****************************************************************************

गोष्टीतला मजेचा  भाग सोडून दया. पण मला नाही वाटत समाज इतका कमकुवत आहे म्हणून. एखादी गोष्ट व्हल्गर आहे हे सापेक्ष आहे. आणि जिथे सापेक्षता आली तिथे वाद आला. ज्या साईट वर बंदी आली त्या मुळातच भंगार असाव्यात. इतक्या की त्यावर बंदी न घालताच या महासागरात गायब झाल्या असत्या. पण वाद ओढवून घ्यायची सवय आहे त्याला कोण काय करणार?

अजून एक असं  आहे बघा. योग शिकवणाऱ्या पतंजलीचा आपल्या इथे उदो उदो होतो. रोग आणि त्यावरचे उपाय सुचवणार्या चरक आणि सुश्रुत ऋषींना आपण डोक्यावर चढवतो. त्या न्यायाने भोग शिकवणाऱ्या वात्सायानाला आपले सरकार इतकं  सहजासहजी फाट्यावर मारणार नाहीत. काय बोलता?

तळटीप

- वाचण्याच्या नादात योग, रोग आणि भोग हे यमक तुमच्या लक्षात आलं नसेल म्हणून परत आठवण. यमक विशारद च्या दिशेने अजून एक पाऊल.

- कुठल्याही विकृत साईट पेक्षा जांबाज मधील डिम्पल कापडिया-अनिल कपूर चा सीन, सागर मधील डिम्पल-ऋषीचा प्रणय, बेटा मधील अनिल कपूरला माधुरी कडे बघून धक धक होणं आणि मिस्टर इंडिया मधील फ्रेममध्ये नसणाऱ्या अनिल कपूरला काटे नही कटते म्हणत प्रेमाची साद घालणाऱ्या श्रीदेवीने मला नेहमीच भंडावून सोडलं आहे. बाय द वे या सगळ्या लिंक्स जिवंत आहेत.  

Saturday, 1 August 2015

जन्म

बऱ्याच वेळा जन्म वेळ आणि त्याचे भविष्यात होणारे परिणाम यावर बोललं जातं. तथ्य असेलही त्यात नाही म्हणत नाही. पण माझा तरी त्यावर काही कारणामुळे विश्वास नाही. अर्थात ते बरोबर की चूक यावर मला वादही नको आहे. त्यावर विश्वास ठेवणारे लोकं ही ठाम असतात. आणि माझ्यासारखे विश्वास न ठेवणारे मात्र डळमळीत असतात.

पहिला यश सिझेरियन पद्धतीने जन्मला. ती एक स्टोरी आहे. तरी आमचं मंडळ ही डॉक्टरच, पण तिचीही सुटका नाही. असो. त्यामुळे दुसरी डिलीव्हरी नॉर्मल होणार नाही हे आधीच ठरलं होतं. भालेराव डॉक्टर बोलल्या, तुम्ही नवरा बायको मिळवून ठरवा, तारीख कुठली हवी ते. मी आणि बायको, दोघांचाही कुंडलीवर जबर विश्वास. असा की यशची कुंडली वैभवीने बनवली खरी, पण सापडत नाही. महत्वाचा निर्णय घेताना आम्ही दोघे खूप चर्चा करतो. निर्णय दोन मिनीटात होतो, चर्चा भलत्याच गोष्टीची होते. मग आमची घनघोर चर्चा झाली आणि आम्ही दहा जून तारीख ठरवली. त्यामागचं कारण फारच अध्यात्मिक होतं. आमचा मित्र राजेश गोडबोले याचाही जन्म १० जूनचा. तोही गोरटेला, एकदम सचिन तेंडूलकरच जणू. परत हुशार आयआयटी मधून एम टेक वैगेरे.  अमेरिकेत डॉलर छापणारा. आणि डॉलर छापून खर्च रूपयात करण्याची काटकसरी वृत्ती. आता इतके अध्यात्मिक गुण असल्यावर आपलं पोरगा किंवा पोरगी गोडबोल्यांच्या राजेश सारखं गुणी निपजेल हाच ठोकताळा. मंडलिकांच्या राजेशपेक्षा हा नक्कीच चांगला सौदा होता.

पोहोचलो बा ९ जूनला रात्री हॉस्पीटलला. तर डॉक्टर म्हणाल्या "एक छोटा प्रॉब्लेम झाला आहे. परिसरात वीज आहे पण आमच्या हॉस्पिटल ची वीज काही कारणामुळे गायब आहे." माझ्या चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह आलं. तर पुढे त्या म्हणाल्या "पण तुम्ही काही काळजी नका करू. आपण ठरल्याप्रमाणे ऑपरेशन करू." मी विचारलं "कसं शक्य आहे?" तर बोलल्या "अहो, इन्व्हर्टर आहे" मी विचारलं "लाईट कधी गेली आहे?" तर म्हणाल्या "दुपारीच"

म्हणजे विचार करा, दुपारी लाईट गेली आहे म्हणजे तेव्हापासून हॉस्पिटल इन्व्हर्टर चालू आहे. आणि दुसर्या दिवशी सकाळचं ऑपरेशन डॉक्टर त्याच्या भरवश्यावर करायचं म्हणतात. माझ्यातला सदैव निद्रिस्त इंजिनियर जागा झाला. मी बोललो "म्याडम, इन्व्हर्टरला तुम्ही आज इतकं ताबडून घेतलं आहे की, उदया ऑपरेशन च्या वेळेस त्याने जर मान टाकली तर वांदेच वांदे. त्यापेक्षा आपण एक दिवस ऑपरेशन एक दिवस पुढे ढकलू." डॉक्टरीण बाईनी पुष्कळ समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यांचं ते ज्ञान माझ्यातल्या सामान्य ज्ञानाला आणि त्याही पेक्षा नवऱ्याला आणि बापाला इम्प्रेस नाही करू शकलं,

अशा रीतीने आमचं दुसरं अपत्य नील १० जून ऐवजी ११ जून ला जन्माला आलं. मरण तर माणसाच्या हातात नसतं हे ऐकलं होतं पण जन्मही नसतो हे त्या दिवशी कळलं. नाही तर बघा ना, त्या पूर्ण हडपसर मध्ये लाईट असणं आणि जिथे आम्ही वैभवी ऑपरेट होणार होती फक्त त्याच हॉस्पिटल मध्ये लाईट नसणं हा योगायोग नव्हे काय? १२ जून ला वारी जाणार होती हडपसर वरून. सकाळी डब्बा घेऊन जायचं होतं, भैरोबा नाला ते हडपसर. मुकाट वारीबरोबर चालत गेलो पाच किमी. तसा मी चालू आहे, पण काय करणार असं सक्तीचं देवदर्शन मला बऱ्याचदा घडत आलं आहे.

अशा रितीने गोडबोल्यांच्या राजेश सारखं हुशार अपत्य जन्माला घालायचा प्लान नियतीने धुडकावून लावला आणि मंडलीकांच्या राजेश सारखंच अजागळ पोर जन्माला आलं.

 वयाच्या दहाव्या वर्षापासून नील घरात जो पसारा घालतो त्यापेक्षा वेगळा पुरावा काय हवा?