Friday 28 August 2015

पत्र

हे असं काही मनात येईन असं कधी वाटलं नव्हतं. पण सगळ्यांनी स्वत:च्या मुलीबरोबरचे फोटो लावले आणि उद्या बहिणीबरोबरचे फोटो झळकतील. मला तुमच्या बद्दल खूपच असूया होईल मनात. आई सांगते की माझ्या जन्माच्या तीन वर्ष आधी तिला मुलगी झाली होती. पण महिन्या दोन महिन्यात गेली. आजही आई त्या तारखेला रडते.

तुमच्या सगळ्यांच्या पोस्टी वाचून मग मी पण हे पत्र लिहिलं. माझ्या बहिणीकडून आलेलं. खुन्नस म्हणून. हं मग, नाद करायचा नाय.

एक कन्फेशन. घरात मुलगी किंवा बहीण असली असती तर मी आज आहे त्यापेक्षा अधिक रिस्पोन्सिबल माणूस असलो असतो असं मला नेहमीच वाटतं. असो. 

प्रिय राजेश

अनेक उत्तम आशीर्वाद.

मोबाईल आणि मेलच्या जमान्यात हे पत्र लिहायचं म्हणजे जरा मागासलेपणाच लक्षण. मी पण बरेच दिवसांनी पत्र लिहित आहे. तू डिप्लोमाला असताना उपदेशपर पत्र पाठवायची तीच खरी पत्रं. नंतर त्याचं प्रमाण कमी होत गेलं, म्हणजे पत्र लिहायचं. उपदेश तर अजून ही देतच असते. मोठी बहिण आहे. हक्क तर गाजवणारच. राखीच्या निमित्ताने ही संधी साधली. लहानपणी तू मला संधिसाधू आहे असं चिडवायचास त्याला मी जागले.

सध्या आपलं बोलणं होतं आणि ख्याली खुशाली कळते. पत्राच्या निमित्ताने मी भूतकाळातल्या आठवणी जागवते. हे वाचल्यावर "तू भूत आहेस, त्यामुळे तू भूतकाळातल्या आठवणी काढतेस" अशी कोटी तू करणार हे मी इथे बसून सांगू शकते. आजकाल मी घरात एकटीच असते. त्यामुळे परभणीच्या आठवणीत बऱ्याचदा रमते. मुक्ताजीन मधले आपले कापसाच्या गाठीवरचे खेळ, जांभूळ खाल्ल्यावर कुणाची जीभ जास्त जांभळी झाली ते आरशात पाहून झालेली भांडणं, तिथल्या बागेत खेळलेली लपाछपी हे आठवून जीव कातर होत असतो. माझ्या पेक्षा तू तीन वर्षांनी लहान खरं  तर. पण नाशिकला मात्र सायकल तूच मला शिकवलीस. दमायचास पण पळायचा मागे सायकल ला धरून. एक दोनदा पडले ही मी. माझा गुडघा फुटल्यावर तुझ्या डोळ्यात आलेले पाणी आठवून आजही पाणावते.

औरंगाबादला तू डिप्लोमा साठी गेलास. त्यावेळेस मीच तुला बाबांबरोबर सोडायला आले होते. १५ च वर्षाचा होता तू. त्यावेळेस मी निघताना घट्ट पकडलेला हात सोडवतानाची आठवण आली की मी गलबलते.

तुला डिग्री ला admission घेतली. कदाचित तुला माहिती नसेल पण आई बाबांनी पोटाला चिमटे काढून तुझं आणि उन्मेष चं इंजिनियरिंग चं शिक्षण पूर्ण केलं. बाबांचा टेन्शन घेण्याचा स्वभाव. त्यांची इच्छा होती की तू नोकरी करावीस. पण आईच्या आग्रहामुळे जीवाचा आटापिटा करून भारती विद्यापीठ ला तुझं शिक्षण केलं. आज वर्षाची ७५०० रु फी काहीच वाटत नाही. पण त्याकाळी हे पैसे जमावतानाची त्यांची ओढाताण आठवली की त्याच्या ऋणातून कधी उतराई होऊ शकू असे वाटत नाही.

वैभवी तुला आवडते, हे तू मलाच पहिल्यांदा फोन करून सांगितलं. फोटो पाहिल्यावरच मला ती आवडली. आणि प्रत्यक्षात भेटल्यावर तर ती माझी मैत्रीणच झाली. तुझ्यासारख्या चिडक्या माणसाला लगाम घालण्यासाठी तिच्यासारखी खंबीर पण सोशिक जोडीदार हवी होती आणि ती तुला मिळाली हे तुझं  भाग्यच समज. बाबांच्या शेवटच्या दिवसात तिने जी सेवा केली त्याला तोड नाही. घर सांभाळून lab चालवणाऱ्या बायकोकडे लक्ष दे.

स्वत:चं करियर घडवताना तब्येतीकडे दुर्लक्ष करतो असं मला वाटतं. २०११ ला प्लास्टी झाली पण तुझा टेन्शन घेण्याचा स्वभाव काही बदलत नाही. ह्या बाबतीत तरी वैभावीचा आदर्श ठेव. प्रतिकूल परिस्थितीत शांत डोकं कसं ठेवायचं हे शिक तिच्याकडून. ठीक आहे, थांबते. आठवणीत रमताना पुन्हा उपदेशाचे डोस पाजू लागले.

बरंच मोठं पत्र झालं. आईला साष्टांग नमस्कार सांग. (तिच्या नावामागे सौ  लिहिता लिहिता राहते आणि सहा वर्षानंतर ही मी  रडते) एक दोन दिवसात फोन करीनच. यश आणि अभिषेकला आशीर्वाद आणि नील ला गोड पापा.

वैभवी, उन्मेष, अर्चना ला नमस्कार. त्यांच्यासाठी वेगळं पत्र लिहीन. परत हा प्रकार आवडू लागला आहे. पत्र.

तुझीच

ताई 

No comments:

Post a Comment