Thursday, 21 March 2019

जिम

सेल्स आणि मार्केटिंगच्या पोरांनी जिम जरूर लावावी. सेल्स कॉल साठी बाहेरगावी गेल्यावर तुम्ही अशा हॉटेलमध्ये राहण्याची शक्यता असते जिथे जिम असते. तुम्हाला जिमचा शौक जास्तच लागला तर तुम्ही हॉटेलच्या जिम मध्ये पण जाण्याची शक्यता असते.

सकाळची सहाची प्रसन्न वेळ आणि तुम्ही एकटे जिम मध्ये आहात. तिथे मग एखादी व्यक्ती येण्याची शक्यता असते. ट्रेड मिल चालू कशी करावी किंवा लेग प्रेस मारताना बॅक सपोर्ट ऍडजस्ट कसा करावा याची त्या व्यक्तीला माहिती नसण्याची शक्यता असते. मग ती व्यक्ती तुम्हाला मदत मागू शकते.

तुम्ही रेग्युलर जिम वाले असाल तर तुम्ही आत्मविश्वासाने इक्विपमेंट चालू करून देऊ शकता. ती व्यक्ती तुमच्यावर खुश होण्याची शक्यता असते. तुम्हा दोघांमधील संवाद फोन नंबर एक्स्चेंज होण्यापर्यंत जाऊ शकतो.

A lot can happen in Gym.

ती व्यक्ती त्या हॉटेल मधेच राहत असल्यामुळे कधी ब्रेकफास्ट टेबल वर तर कधी डिनर ला तुमची भेट होण्याची शक्यता असते.

तर शक्याशक्यतेचा विचार करता ती व्यक्ती म्हणजे तो एक महत्वाचा  ग्राहक,  असू शकतो. आणि त्या संवादाद्वारे एक महत्वाचा सेल्स लीड मिळू शकतो.

बाकी कुठल्याही शक्यतापेक्षा ही शक्यता जास्त आहे असं मला वाटतं.

तुम्हाला काय वाटलं?

अंधश्रद्धा

माझ्या एक ओळखीचे काका आहेत. त्यांनी नोकरी करत असताना मजबूत पैसा खाल्ला. पुढं एका पोराला इलेक्ट्रॉनिक आयटम ची शो रूम काढून दिली. ते पोरगं पण कचकावून बिझिनेस करतंय. दुसऱ्या पोराला कन्स्ट्रक्शन ची लाईन पकडून दिली. सध्या जरी शांत असेल तरी मधल्या तेजीत धुवाधार पैसे कमावले आहेत. पोरीचं लग्न झालेत आणि ती अमेरिकेत आहे.

रिटायर झाल्यावर काकांनी बीएमडब्ल्यू घेतली. य वेळा अमेरिकेला जाऊन आले. सध्या दररोज टीचर्स किंवा त्या पेक्षा भारी नाईंटी मारतात. चकना म्हणून रोस्टेड काजू अन पोंफ्रेट घेतात. एकदम तब्येतीत चालू आहे.

ते पैसे खात असताना आम्ही खूप म्हणायचो, यांना झोप कशी येत असेल. पुढं जाऊन बीपीचा त्रास होईल. ७५ वय झालंय, म्हातारा तुकतुकीत आहे. देवभोळ्या असणाऱ्या काकू पाच वर्षांपूर्वी देवाघरी गेल्या आहेत.

हे एक उदाहरण म्हणून दिलं. जगात असे करोडो लोक आहेत की ज्यांनी खून, चोऱ्या माऱ्या, लांडयालबाड्या, भ्रष्टाचार करून सुद्धा ते एक नॉर्मल आयुष्य जगत आहेत.

सांगायचा मुद्दा हा की असं वागणार्यांना आयुष्यात त्रास होईल वगैरे अंधश्रद्धा आहेत. तसं असतं तर दाऊद किंवा मेमन तिकडं कराचीत आलिशान घरात लोळत पडले नसते.

आपण जे जगतो ते बरोबर की चूक याबद्दल थिंकिंग प्रोसेस क्लिअर असेल तर डोक्याला शॉट लागत नाही.

अनपेक्षित प्रतिसाद

कालची पोस्ट टाकल्यावर तिला अनपेक्षित प्रतिसाद मिळाला. काहींना असं वाटलं की मंडलीकची सेटको वगैरे अफवा आहे. खरंतर  धाकदपटशा करून खंडणी गोळा करण्याचा त्याचा धंदा आहे. असो.

तसल्या वागण्याचं मी समर्थन करतोय असंही काही जणांना वाटलं. हा डिस्क्लेमर टाकायला विसरलो. तो टाकावा म्हणेपर्यंत वेळ निघून गेली होती.

खरंतर सुख आणि समाधान या वेगळ्या गोष्टी आहेत. जे आपल्या कडे नाही आहे ते मिळवणं म्हणजे सुख, जे आपल्याकडे आहे त्यात आनंदी असणं म्हणजे समाधान. बऱ्याचदा लोक समाधानाला सुख समजतात आणि तिथं गल्लत होते. आणि ते समाधानी होण्यासाठी सुखाच्या मागे धावतात. ते धावणं जे आहे त्याला एक छान शब्द वाचला "हेडोनिक ट्रेडमिल". म्हणजे धावत असलो तरी आपण तिथेच असतो. त्या सुखाचं आयुष्यही अगदी कमी. या सिद्धांताला गंडवायचं असेल तर काही युक्त्या आहेत. त्यात सगळ्यात पहिली म्हणजे जितके पैसे पाहिजेत, तितकेच कमावणे. याचा अर्थ रिटायर होणे किंवा पैसे न कमावणे असा नाही तर एका विशिष्ट मर्यादेनंतर पैसे कमावले तरी त्याचा आनंद वाटला नाही पाहिजे. अवघड आहे ते, पण ते जमू शकतं हे स्वानुभवातून सांगू शकतो. अजून चार युक्त्या आहेत पण पोस्ट खूप लांबेल, त्यावर नंतर कधी तरी.

त्या पोस्टमध्ये आणि कॉमेंट मध्ये बरेच कंगोरे आहेत असं मला आज परत ते सगळं वाचताना जाणवलं. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे सापेक्षता. मला ते काका सुखी वाटले पण ते समाधानी आहेत का हे माहीत नाही कारण सुख हे जरी मूर्त असलं तरी समाधान हे अमूर्त आहे.

अजून एक. भौतिक गोष्टींवर समाधानी जितक्या लवकर होऊ तितकं चांगलं आणि अभौतिक गोष्टी, म्हणजे कामाची गुणवत्ता किंवा काम करण्याच्या पद्धतीत सुधारणा यावर समाधानी नसणं हे पण चांगलंच.

असो. जास्त तारे तोडत नाही. दोनदा प्लास्टी झाल्यावर "मीच का" ह्या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना माझ्या लक्षात आलं की आपणच निर्माण केलेल्या परिस्थितीला आपण कसे हाताळतो यावर सगळं अवलंबून आहे आणि म्हणून तो थॉट प्रोसेस चा मुद्दा.

बऱ्याच जणांनी लास्ट लाईन भारी अशी कॉमेंट केली. त्यावरून फक्त लास्ट लाईनच वाचली का, की वरचं सगळं बकवास मात्र शेवटचं वाक्य चांगलं असं काही होतं हे विचारण्याचा मोह टाळत नाही आणि अजून एका कन्फ्युजिंग पोस्टचा समारोप करतो. 

बोइंग

पुढील वीस वर्षांत भारताला २३०० लो कॉस्ट कॅरियर लागणार आहेत असा बोइंग चा अंदाज आहे. त्याची किंमत साधारण पणे ३२० बिलियन डॉलर्स होते.

२०१८ साली, भारतात दरमहा सरासरी एक कोटी लोकांनी विमानाने प्रवास केला.

भारतातील वाणिज्य विमानवाहतुकीने सलग ५१ महिने डबल डिजिट वृद्धी केली.

भारतीय अर्थव्यवस्था पुढील दोन दशकात ३.५ पट वाढून जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनणार आहे असा अंदाज आहे. याकाळात भारतातील एकूणच लोकांचा आर्थिक स्तर उंचावणार आणि त्यांना लो कॉस्ट कॅरियर तसेच लांब पल्ल्याच्या विमानाची गरज असणार असे निर्देश देण्यात आले आहेत.

जगातील एकूण विमानसंख्येच्या ५% ही भारतात असतील. आणि त्यामुळे ही इंडस्ट्री वेगाने वाढणार आहे. त्या अनुषंगाने येणारे जॉब्स, म्हणजे पायलट, एअर होस्टेस/होस्ट, मेंटेनन्स इंजिनियर, ग्राउंड स्टाफ यांची मोठ्या प्रमाणावर गरज लागणार आहे.

सदर माहिती कुठल्याही राजकीय पक्षांचा जाहीरनामा नसून बोइंग कंपनी तर्फे प्रसारित केली आहे. तेव्हा त्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही.

😊😊

काढता पाय

लिंक्ड इन वर एक पोस्ट होती. भारताच्या मार्केट कॅप ने जगात सातवा क्रमांक गाठला. जर्मनी ला मागे टाकले.

आता अशा बातम्या वाचून भारताबद्दल विनाकारण पोटशूळ उठणारे आंग्लेय मंडळी असतातच. तिथे एकाने प्रतिक्रिया व्यक्त केली.

"देव असे न करो, पण भारत या भूमीवरून नाहीसा झाला तर कुठल्याही दुसऱ्या देशाचं काहीही बिघडणार नाही. जर्मनीबद्दल तसं म्हणता येणार नाही."

मी प्रतिवाद करत त्याला सांगितलं "त्या पोस्टमध्ये भारताची टिमकी वाजवायची असं काही नाही आहे. ती फक्त माहिती आहे. त्यामध्ये आम्ही भारतीय हे जर्मन पेक्षा भारी आहोत असा कुठेही अविर्भाव नाही आहे"

मग अजून एकाने भारतातल्या खराब प्रॉडक्ट क्वालिटीचा उल्लेख केला. महिंद्रा किंवा टाटा च्या गाड्या बेसिक सेफ्टी नॉर्मस् पूर्ण करू शकत नाही. (हे कुठून कळलं ते देव जाणे) बीएमडब्ल्यू किंवा मर्क बद्दल असं बोलू शकत नाही.

मी परत त्याला सांगितलं "पोस्ट आणि तुम्ही म्हणता ती कदाचित वस्तुस्थिती असेलही. आमच्या लोकसंख्येच्या हिशोबाने केवळ हे झालंही असेल. त्यामध्ये आमची प्रॉडक्ट क्वालिटी ग्रेट आहे हा दावा कुठंही नाही. इन फॅक्ट आमची सगळी इंजिनियरिंग इंडस्ट्री ही जर्मन इंडस्ट्री ला बेंचमार्क करते." वगैरे वगैरे.

असे वाद प्रतिवाद चालू असताना तिथे एक उत्तर भारतीय सद्गृहस्थ आले. आणि त्यांनी आंग्ल लोकांना उद्देशून कॉमेंट टाकली
"तुम्हाला माहिती आहे का भारताने जगाला शून्य दिलं......" आणि मग तेच पुढचं टेस्ट ट्यूब बेबी, प्लास्टिक सर्जरी वगैरे.

मी तिथून मग हळूच काढता पाय घेतला. 😊😊

फेसबुकवर ओळख

फेसबुकवर ओळख झालेल्या एक कुटुंबाकडे मला जेवायला बोलवलं होतं. माझ्याबरोबर त्यांनी अजून एका मित्राला जेवायला बोलावलं होतं जो त्या कुटुंबाला बरेच वर्षांपासून, म्हणजे वीस एक वर्षे, ओळखत होता.

नमस्कार झाले, ओळख झाली, गप्पा झाल्या, बिझिनेस काय वगैरे जाणून झालं.

जेवणाच्या टेबलवर तो कौटुंबिक मित्र म्हणाला "हे तुमचं सगळं छान आहे. फेसबुकवरील मैत्री, विचार जुळले वगैरे वगैरे. पण तरीही एक गोष्ट मला झेपत नाही ती अशी की मी या कुटुंबाबरोबर मैत्रीचं नातं फुलवण्यासाठी पंचवीस वर्षे व्यतीत केली आहेत. तुझी यांच्याशी मैत्री फारतर दोन वर्षांची. आणि तरीही आपण आज एका टेबल वर एकत्र जेवायला बसलो आहे, हे काही मला पटत नाही."

म्हणणं बिनतोड होतं.

माझा एक लहानपणीचा मित्र मला नेहमी तक्रारवजा म्हणतो "फेसबुकच्या लोकांना द्यायला तुला वेळ आहे आणि आम्हाला भेटत नाही."

हे बरोबर की नाही ते वेगळं पण प्रतिमा तशी तयार झाली आहे हे खरं. तसं बघायला गेलं तर गेल्या पाच वर्षात फार तर पन्नास एक वेळा, जास्तच वाटताहेत, फेसबुकच्या मित्रांना भेटलो असेल. पण त्या न्यूज फीड चा आवाका इतका मोठा आहे, आणि परत पोस्टवर होणारी चर्चा यामुळे पोस्टकर्ता कायम या गोतावळ्यात असतो असं वाटण्याची शक्यता आहे.

खरंतर काळाच्या कसोटीवर इथली मैत्री अजून सिद्ध व्हायची आहे. एखादी जाहिरात केल्यासारखे आपण, म्हणजे मी तरी, इथे व्यक्त होतो. त्यावरून कुणी इम्प्रेस होतं, कुणी हाडतुड करतं. प्रत्यक्षात मी किती चालू आहे, आक्रस्ताळा आहे हे इथं माहीत होण्याची सुतराम शक्यता नसेल याची मी पुरेपूर काळजी ब्रँड बनवताना घेतो. इथे आतापर्यंत मोजके लोक भेटले आहेत जे मला लॉंग टर्म मध्ये मित्र म्हणून स्वीकारतील. अन्यथा फेसबुकवरील मैत्री न्यूज फीड पुरती मर्यादित असून ती प्रत्यक्षात फुलवण्यासाठी, तो मित्र म्हणल्याप्रमाणे, खूप प्रयत्न करावे लागतील पण तितका वेळ देऊ शकणार नाही, हे माझं मत आहे.

😊😊

५७ सेकंदाचा व्हिडीओ.

मोजून ५७ सेकंदाचा व्हिडीओ.

चौथी पाचवीच्या मुलामुलींचा शाळेतला क्लास. जेवणाची सुट्टी होते. मुलं मुली वह्या पुस्तकं दप्तरात टाकतात आणि खाण्याचे डबे उघडतात.

तो ही डबा काढतो. थोडयाशा आशंकेनेच झाकण उघडतो. त्याच्या मनातील भीती जी चेहऱ्यावर दिसते तीच खरी ठरते.

डबा ठक्क रिकामा असतो.

गरिबीने दिलेला चटका त्याच्या बरोबर आपल्यालाही बसतो.

क्लास टीचर ला सांगून तो एवढासा जीव वर्गाबाहेर जातो. तोंडात आलेलं पाणी बाहेर थुंकून टाकतो. थोड्यावेळ वर्गाबाहेर टाईमपास करत, बाकीच्यांचं खाऊन झालं असेल या बेताने तो परत वर्गात येतो.

अत्यंत निराश मनाने त्याचा डब्बा परत स्कुल बॅग मध्ये टाकण्यासाठी उचलतो.

त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य. डबा थोडासा जड लागतो. विस्मयचकित भावनेने तो हळूच झाकण उघडतो तर डबा काही खाद्य पदार्थांनी पूर्ण भरला असतो.

तो आजूबाजूला पाहतो. सगळी मुलं मुली आपापल्या जगात मश्गुल असतात. काही गालात हसतात पण डबा कुणी भरला हे त्याला कळू न देण्यात ते यशस्वी होतात.

आत्यंतिक आनंदाने तो पहिला घास घेतो.

आणि आपल्या धूसर डोळ्याला स्क्रीनवर मेसेज दिसतो.

We can not help everyone, but everyone can help someone.

कुणीतरी म्हणून गेलं आहे

"भले तुम्ही मेंदूने कॅपिटलिस्ट असा, नव्हे व्हाच, पण हृदयात समाजवाद जोपासा आणि हाताला साम्यवाद शिकवा. There is possibility that this world may be livable and lovable."

(कुणीतरी म्हंटलं असं लिहिलं की लोक सिरियसली घेतात, आदरवाईज हे वाक्य माझंच आहे 😊)

ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजी

एअरपोर्टवर ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजी नावाचं पुस्तक वाचत बसलो होतो. बिझिनेस करताना कॉम्पिटिशन ला तोंड देताना काय करायला पाहिजे, आपल्या प्रॉडक्ट च्या प्राईस वर नव्हे तर व्हॅल्यू वर लक्ष केंद्रित करून, ती वाढवून स्वतःला वेगळं कसं प्रस्थापित करायचं याचं सुंदर स्पष्टीकरण पुस्तकात दिलं आहे. थोडक्यात स्वतःची एक मार्केट स्पेस तयार करून तिथे असलेल्या भाऊगर्दीपासून वेगळं कसं ठेवायचं याबद्दल युक्तीच्या चार गोष्टी त्यात आहेत.

बोर्डिंगची घोषणा झाली अन मी विमानाकडे नेणाऱ्या बसमध्ये शिरलो. या बसच्या मधल्या भागात मोकळी जागा असते. तिथे एकमेकांना रेटारेटी करत खूप लोक दाटीवाटीने उभे होते. माझी नजर बसच्या मागच्या बाजूला गेली तर तिथे अमाप जागा होती. सीटची मागील रांग तर पूर्ण रिकामी होती.

मी त्या गर्दीतून वाट काढत बसच्या मागच्या बाजूला गेलो. त्या मागील सीटच्या रांगेत मी एकटाच बसलो होतो. मी इकडे एकटा बसलो असताना समोर मधे उभे असलेले लोक मात्र श्वास पण धड घेऊ शकत नव्हते.

एखादं मॅनेजमेंटचं पुस्तक वाचावं आणि त्यात लिहिलेल्या गोष्टीचा अनुभव इतक्या पटकन आपल्याला यावा असं या आधी क्वचितच घडलं होतं.

ग्रोथ राम 21

"मग आता काय करायचं ठरवलं आहेस?"

रामने नोकरीचा राजीनामा दिल्यावर मी त्याला विचारलं.

"बिझिनेस" राम म्हणाला.

मी विचारलं "पण इतकी चांगली नोकरी का सोडलीस तू?" उत्तरादाखल राम फक्त हसला.

"तुझी ग्रोथ झाली नाही का?" मी विचारलं.

राम परत हसला.

"नुसतं गालातल्या गालात हसतोस, म्हणजे नक्कीच तुझी ग्रोथ झाली नसेल, म्हणून तू जॉब सोडलास" मी पिच्छा पुरवला.

माझ्याकडे राम ने खूप आश्वासक नजरेने पाहिलं अन म्हणाला

"अरे, ज्या नोकरीने मला बिझिनेस करण्याची धमक दिली तिथं माझी ग्रोथ नाही झाली असं कसं म्हणू शकतोस?"

"चल पार्टी करू" राम माझ्या खांद्यावर हात टाकत म्हणाला.

"So what is next course of action?" I asked RaM when he resigned from his job.

RaM said 'I will get in to business."

I asked him "Why did you leave such a good company?" RaM simply laughed at my question.

"Did not you grow in your job?" I asked.

RaM smiled again.

"You are just smiling at my question. It shows that company did not offer you growth opportunities. That must be the reason, you left job. Is that right?" I perceived my mind.

RaM looked at me very promisingly and said to me "My company developed me and my mindset to venture in to business. How can you say that it did not give me opportunity to grow? I believe that was the biggest growth company offered me."

RaM had a point. I could not deny his invitation to go for party. 

इमटेक्स २०१९

इमटेक्स २०१९ या औद्योगिक प्रदर्शनात मला एका पॅनल डिस्कशन साठी बोलावलं होतं. विषय होता "Life beyond machine tool- passionate people with passionate hobbies".

माझे सगळे छंद तसे अशातले. ब्लॉग आणि व्यवसायातील अनुभव हे २०१३-१४ पासून लिहायला लागलो, कवितावाचन तर अगदी ताजा ताजा छंद, गिनीज रेकॉर्ड सारखा काही तरी अनोळखी उद्योग हे पण २०१६ मधील. त्या सगळ्यांचा मी प्रश्नाला उत्तर देताना उल्लेख केला. पॅशन वर बोलताना म्हणालो "Passion is strong desire to carry out certain activity by investing time and money, knowing that you don't get any return except intangible pleasure."

हे सांगितल्यावर मॉडरेटरने साहजिक सगळ्यांना पुढचा प्रश्न विचारला "पण हे सगळं करायला वेळ कसा काय मिळतो?" मी थोडक्यात सांगितलं की आपण कोण वेळ मॅनेज करणार? वेळ आहे तिथं आहे. आपलं आयुष्य त्याभोवती गुंफण्यापलीकडे आपण काही फार काही जास्त करत नाही.

हे असं असण्यामागे आमचे बिझिनेस कोच मनीष गुप्ता सरांचा मोठा वाटा आहे.

इमटेक्स च्या ग्राउंड वर सहा सात मोठे दणकट स्क्रीन लावलेत अन हे पॅनल डिस्कशन तिथं दाखवत होते. एका ओळखीच्या माणसाने फोटो काढून पाठवले, कारण मी पुण्याला परत आलो होतो.

मी पुण्याला परत का आलो म्हणून विचारताय? अहो, माझ्या पेक्षा तरुण आणि हुशार इंजिनियर्स आमचा बूथ बंगलोर मध्ये सांभाळत आहेत. मग माझी तिथं गरज ती काय? 😊😊

राम 20

मी असा एम डी वगैरे झालो कंपनीचा तरी तु माझ्याकडे ढुंकून पण पाहत नाहीस. साला समजतो कोण तू स्वतःला?" मी रामला चिडून विचारलं.

"भावड्या, तुझी पोझिशन काय, तू एमडी का काय असशील, तू पैसे किती कमावतो याने मला काही घंटा फरक पडत नाही. तू लोकांना कसं वागवतोस इतक्या साध्या गोष्टीवरून तुझी लायकी कळते'. राम म्हणाला.

माझी लायकी काढल्यावर मी ही सटकलो. मी म्हणालो "अच्छा, अजून काय तुझे असले फंडे आहेत, ते तर कळू देत."

"आता तू विचारण्याचा गुन्हा केला आहेस तर ऐकून घे."

- स्वतः प्रॉब्लेम्स च्या गर्तेत अडकला असताना सुद्धा तू दुसर्यांना मदत करू शकतो का?

किंवा

- ज्याला इम्प्रेस करायचं त्यालाच नव्हे तर प्रत्येकाशी आदर देत तू वागतोस का?

झालंच तर

- स्वतःच्या चुका कबूल करण्याइतकं तुझं मन मोठं आहे का आणि मुख्य म्हणजे ती चूक निस्तरण्याची धमक ठेवतोस का?

असलं काही असेल तर माझ्यासमोर उभा रहा. नाहीतर बाजू हो. जरा हवा येऊ दे."

मी

मी एक सुशिक्षित बिनडोक आहे. मुर्खच म्हणा ना! मी माझ्या देशात फारसा फिरलो नाही आहे. इथे शेकडो भाषा बोलल्या जातात याची मला काहीही कल्पना नाही आहे. मी विविध प्रदेशातील अन्नाची चव कधी घेतली नाही आहे. मी इतर राज्यातील लोक, धर्म, भाषा, प्रथा, कथा, कला, कविता याबाबत जागरूक नाही आहे. मी माझ्या विश्वात, माझ्या सुखासीनतेत रममाण आहे. माझ्या साठी प्रगती म्हणजे, मोठे रोड्स, एक चांगली नोकरी, त्यातून मिळणारा पगार ज्यातून मी छान कपडे विकत घेऊ शकतो आणि सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत दारू पिऊ शकतो. कधीही आणि कुणीही मला विरोध केला की मी त्याला माझा दुश्मन समजतो. माझ्या मागे सेल्फीत दिसला पाहिजे किंवा कधी सुट्टीत मला त्याची शांतता वाटली पाहिजे, याशिवाय निसर्गाशी मला काही घेणं देणं नाही आहे. मला संस्कृती म्हणजे काय हे माहीत नाही. सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ असणं म्हणजे काय हेही मला माहित नाही. आयुष्याचा अत्यंत उथळ विचार करणारा माणूस आहे मी.

मला सार्वजनिक ठिकाणी वागावं कसं, स्वच्छता ठेवावी कशी याची अक्कल नाही आहे. मी कुठंही थुंकतो, कुठेही मुततो, बायकांची छेड काढतो, त्यांच्यावर बलात्कार करतो, त्यांना घाणेरड्या शब्दात शिव्या देतो. दुसऱ्या भाषा तर सोडाच, मी माझ्या भाषेतील कोणतेही साहित्य वाचले नाही आहे. इतिहासाकडून काय शिकावं ही बुद्धी माझ्याकडे नाहीच. ऐतिहासिक स्थळांना विद्रुप करणं, धार्मिक स्थळांची कचराकुंडी करणं हा माझा हक्क आहे. माझी विनोदबुद्धी बकवास आहे. स्वच्छता ठेवणे ही मी सोडून बाकी साऱ्यांची जबाबदारी आहे यावर मी ठाम आहे. मी विनाकारण जोरात हॉर्न वाजवतो, नो एन्ट्री मध्ये बिनदिक्कत गाडी घालतो, रांग मोडतो, काम करून घेण्यासाठी लाच देतो, निषेध व्यक्त करताना सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतो. समाजात वावरताना मी खांद्याच्या वरचा भागाचा वापर करत नाही, सुसंवाद साधत नाही, दुसर्याप्रति आदर ठेवत नाही, शांतता ठेवत नाही, स्वच्छता पाळत नाही. त्यामुळेच राजकारणात मी ज्यांना फॉलो करतो ते ही असेच एकतर भ्रष्ट आहेत, नाहीतर अहंकारी आहेत, माजोरडे आहेत आणि त्यांच्या असं असण्याचा मी उदोउदो करतो.

मी असा आहे. इथल्या बहुतांश वर्गाचा प्रतिनिधी. काय म्हणता, तुम्ही असे नाही आहात? खरं सांगताय का? नाही, तुम्ही असे नसाल तर कदाचित तुम्ही या देशाचे नागरिक आहात का, या बद्दल शंका आहे. किंवा तुम्हाला शिक्षण आणि संस्कार चुकीचे मिळाले आहेत. किंवा परिस्थितीने तुम्हाला मूर्खासारखं वागण्यापासून परावृत्त केलं आहे. कुणास ठाऊक, तुम्ही चांगली पुस्तकं वाचली असावीत, कदाचित. की असं काही आहे की "विशाल मनाचा माणूस" हा रोग तुम्हाला झाला आहे?

या सर्वसाधारणपणे बिनडोक लोकांच्या महाकाय देशात तुमचं अस्तित्व नगण्य आहे. तुमच्या असण्याचा इथं काहीही फरक पडत नाही. आणि लक्षात ठेवा, तुम्ही असे मूर्ख नाही आहात यासाठी मी तुम्हाला ठोकुही शकतो. 

(श्रीविद्या श्रीनिवासन यांचा मूळ इंग्रजी लेख चैताली आहेर यांच्या वॉल वर वाचल्यावर कुणीतरी कानाखाली मारली असं वाटलं मला. मी विचार केला, मी एकटाच का मार खाऊ. म्हणून मग भाषांतर केलं आणि इथं टाकला 😊😊)

इंडिया शायनिंग

बीजेपी चं हे मागच्या वेळीही झालं होतं. त्यावेळी इंडिया शायनिंग ह्या टॅग लाईन ने त्यांचा घात केला होता. आता अशी काही टॅग लाईन नाही आहे, पण एकुणात न केलेल्या कामाचा बोलबाला रेटून करायचा आणि मुख्य म्हणजे जनतेला येडं समजायचं, हा बीजेपी चा मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्या मानसिकतेतून ते बाहेर येत नाहीत.

सगळ्यात मोठी गल्लत इथे झाली की बीजेपी ला अजूनही असं वाटतं की लोकांमध्ये धार्मिक तेढ वाढवून राज्य करता येईल. विकासाचं नाव पुढं करायचं आणि अत्यंत हिणकस असे धार्मिक अजेंडे रेटायचे. हा जो विश्वासघात ते करतात त्यामुळे त्यांचे वांदे होतात. स्वच्छ भारत साठी महात्मा गांधींचा वापर करून घेणे, वल्लभभाई पटेल यांना हायजॅक करणं, त्या योगींनी सुद्धा काय बिनडोक मुहूर्त शोधला, फैजाबाद चं नाव बदलायला, गायीचं अनाठायी उदात्तीकरण हे सगळं भोवलं. जे तुमच्या मनात आहे ते स्वीकारलं जाणार नाही हे माहिती असल्यामुळे विकासाचा मुखवटा समोर केला आणि अत्यंत खालच्या दर्जाचं राजकारण करत समाजात तेढ निर्माण केली. फाजील आत्मविश्वास आणि सगळी दुनिया आपल्या मुठीत आहे या गैरसमजात राहिले आणि स्वतःचा गळा घोटून घेतला.

एक वेळेत गरिबीत राहू हे जनता मान्य करेल, धार्मिक अस्मितेच्या जोरावर स्वतःचं अस्तित्व जोपासणं हे सामान्य जनतेला कधी जमलं नाही आणि जमणार नाही हे बीजेपी कधी ध्यानात घेत नाही.

भ्रष्टाचार हा मोठा प्रॉब्लेम आहेच आणि काँग्रेस त्यासाठी बदनाम आहे. पण तो सामान्य माणसाच्या आयुष्यात भीती निर्माण करत नाही, असुरक्षितता तयार करत नाही, मनातल्या माणुसकीला मारत नाही. भ्रष्टाचार हा गुन्हा आहे आणि त्याला योग्य ती शिक्षा दिली जाण्याची शक्यता असते. बऱ्याचदा ती दिली जात नाही हे सत्य आहे, पण तो स्वीकारार्ह नसतो. पण धर्मांधता आणि भ्रष्टाचार असा जर चॉईस दिला तर सामान्य जनता भ्रष्टाचाराचा स्वीकार करेल हे पण या निकालावरून सिद्ध होतंय.

मंदिर, पुतळे, नाव बदलणे, गोहत्याबंदी, बाष्कळ बरळणे या असल्या अन प्रॉडक्टिव्ह गोष्टीत हे सरकार वेळ, पैसा, ऊर्जा वाया घालवत गेली. शेतकऱ्यांप्रति दाखवलेली अनास्था आणि आश्वासनांची चक्क जुमला म्हणून केलेली बोळवण   

समाजसेवा

२०१३ साली मला समाजसेवा करण्याची खाज आली होती. त्यातून मग मी पाच समाजसेवी संस्थांना कॉन्टॅक्ट केलं. त्यातील आपलं घर चे फळणीकर आणि स्नेहालय च्या गिरीश कुलकर्णी यांच्या संपर्कात आलो. दोन्ही संस्थांना वेळ देता येतो का याची चाचपणी करण्यासाठी दोन्ही ठिकाणी मी जाऊ लागलो. पण लक्षात आलं, सेटको सांभाळून या संस्थांना वेळ देणं हे निव्वळ अवघड आहे. थोडक्यात खाज कमी झाली. 😊😊.

दोन्ही संस्थाचालकांच्या संपर्कात मात्र राहिलो. पुढे मग स्नेहवन च्या अशोक देशमाने आणि आरंभ च्या अंबिका टाकळकर यांच्याशी ओळख झाली.

या भेटीगाठी चालू असताना, आपलं घर आणि माझी कंपनी जवळ असल्याने तिथे मी बऱ्याचदा जाऊ लागलो. आपलं घर च्या डोणजे वसतिगृहात या ना त्या कारणाने चकरा वाढल्या.

एके दिवशी फळणीकरांनी आपलं घरच्या विश्वस्त मंडळावर यायचं निमंत्रण दिलं. काम काय करायचं हे काहीच माहीत नव्हतं. तरी एक अनुभव घ्यावा म्हणून मी मंडळावर गेलो. त्यांच्या मीटिंग अटेंड करू लागलो. त्यापेक्षा भरीव काम काही मी करू नाही शकलो. पण एकुणात समाजसेवी संस्थांचं काम कसं चालतं याची जाणीव झाली. परत फळणीकर म्हणजे परफेक्शन चे भोक्ते. शासनाची कुठलीही मदत घ्यायची नाही हा खाक्या. शिस्तीचे दुसरे नाव.

वर्षभरातील काही नोंदी आणि आवाहन.

१. ना नफा ना तोटा तत्वावर समाजसेवी संस्था चालवणं हे एखादा नफा कमावणारा बिझिनेस चालवण्यापेक्षा खूप अवघड असतं.

२. आधी नि:स्पृहपणे काम करायचं, तेच संतपणाचं काम. ते केल्यावर काही असे काही अनुभव येतात की "हे ची फळ काय मम तपाला" अशी परिस्थिती फाळणीकरांनी खूप वेळा अनुभवली. जिवंतपणी मोक्ष प्राप्ती घ्यावी वाटली.

३. या समाजसेवी संस्था चालवताना डोनेशनची गरज असतेच, पण मनुष्यबळ ही लागतं.

४. समाजसेवेसाठी दुसरी फळी तयार करणं हे फार जिकिरीचं काम.

५. कुणाला डोनेशन द्यायची किंवा संस्थेत काम करायची इच्छा असेल तर जरूर संपर्क साधावा.

Monday, 18 March 2019

पाचवी पणती

ती आली होती माझ्याकडे फेसबुकच्या माध्यमातून. कुणीतरी रेफरन्स दिला होता. जॉब साठी. त्या वेळेस माझ्याकडे तिच्या प्रोफाईलचा जॉब नव्हता. मुलगी थोडी विस्कळीत वाटली होती मला. नकारात्मकता तर अगदी ठासून भरली होती तिच्यामध्ये. मी सांगितलं तिला की सध्या तरी जॉब नाही.

साधारण पाच महिन्यात तिच्या प्रोफाईलचा जॉब माझ्याकडे तयार झाला. मी तिला कॉंन्टॅक्ट केला तर ती कुठलासा कोर्स करायला बंगलोर का कुठेशी गेली असं कळलं. मग मी ती जागा भरली. तेव्हापासून एकाच महिन्यात ती परत आली जॉब मागायला. मी तर जागा भरली होती.

मला काळजी वाटली त्या मुलीची. तिच्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नव्हतं. होती मराठवाड्यातील. एकटीच पुण्याला. वय ही २८-२९. लग्नाचा पत्ता नाही. निगेटिव्हिटी सदैव टपकायची तिच्या बोलण्यातून. मी विचार केला ही पोरगी जर रस्त्यावर आली नाही तर आयुष्यातून उठेल.

मी तिला पहिले सांगितलं "तुला पहिले आर्थिक स्थैर्य आणावं लागेल आयुष्यात. मग आपण तुझे बाकीचे प्रॉब्लेम बघू. जॉब शोधतो तुझ्यासाठी."

सुदैवाने एक जॉब मिळाला, तिच्या प्रोफाईल ला सूट होणारा. मुख्य म्हणजे ऑफिस मला माहित होतं. तिथला मालक आणि इतर अनेक एम्प्लॉईजला मी ओळखत होतो. तिथं तिच्या व्यक्तिमत्वात बदल होईल असं मला वाटायचं.

ती जॉईन झाली तिथं. काम चालू झालं. पण ही  दर  महिन्याला कटकट करायची. मला जमत नाही, आवडत नाही, मला तुमच्या कंपनीत घ्या. मी जॉब सोडते. एकदा आली आणि म्हणाली "मी ब्युटी पार्लर काढते." आता मात्र तडकलो. तिला म्हणालो "डोकं जागेवर असेल तर एक वर्ष हा जॉब सोडू नको. चार पैसे कमव. एक वर्षाच्या आधी जर जॉब सोडलास तर परत मला कुठल्याही कारणांसाठी कॉन्टॅक्ट करायचा नाही. आणि जरा अवतार बदल. थोडी जिम वगैरे लाव, वॉर्डरोब चेंज कर."

पोरीने ऐकलं. खुश राहू लागली. सव्वा वर्षे काम केलं.

आणि एक दिवशी तिचा फोन आला. स्थळ आलं आहे, मुलगा जर्मनीत असतो. पोराचं प्रोफाईल झकास. आपल्या आयुष्यात काही तरी चांगलं घडतं म्हणजे काही तरी प्रॉब्लेम या धारणेने ती मुलगी परत काही त्यात खोट काढत होती. मी तिला सांगितलं "जास्त फाटे फोडू नकोस. जशा गोष्टी सामोऱ्या येतील तशा फेस कर. चांगलं होईल."

यथावकाश तिचं लग्न झालं.

दहा दिवसांपूर्वी भेटली मला. खूप खुश दिसत होती. सुखात्मकता आणि सकारात्मकता ठायी ठायी दिसत होती. जी मुलगी फक्त माझ्याशी प्रॉब्लेम्स शेअर करायची, तिने सगळं काही आलबेल आहे असं सांगितलं. काही दिवसात जाईल ती जर्मनीला. तिला हार्दिक शुभेच्छा.

मी वर पोहोचल्यावर चित्रगुप्त सांगेल मला की तुझी जागा तशी नरकातच आहे. पण अशी काही गोष्ट सांगितली की ज्यामुळे एखाद्याच्या आयुष्याचा ट्रॅक बदलण्यात तुझा थोडा हातभार आहे, तर मी तुला दोन एक दिवस स्वर्गात राहायला देईल. तर मी ही घटना सांगेन.

(स्वतःची टिमकी वाजवणाऱ्या मी पोस्ट टाकतोच. पण ही पकडून आधीच्या पाच पोस्ट या केवळ फेसबुकच्या माध्यमातून काही चांगलं घडू शकतं हे सांगण्यासाठी आहेत.)

पाचवी पणती 

R K Laxman

२००३ साली टाटा सन्स मध्ये हरखलो होतो. लंडन मध्ये ललिता जेम्स मला तिच्या ऑफिस मध्ये घेऊन गेली होती. तिने मला एक केबिन दाखवली होती, एम एस ओबेरॉय यांची. फार भारी वाटलं होतं. असाच एक अनुभव नुकताच आयुष्यात आला. तो म्हणजे आर के लक्ष्मण यांच्या घरी जाण्याचा. हो तेच “Creator of common man with uncommon sense of humor”.

फेसबुकने मला काही रत्ने दिली आहेत. त्यापैकी एक आहे  तिच्या वयाला न शोभणारी संवेदनशीलता बाळगणारी, शास्त्रज्ञ होण्याच्या दिशेने हळूहळू पण दमदार पावलं टाकणारी. तिची अन माझी ओळख झाली तेव्हा मला तिचं फेक अकौंट वाटलेलं. अनेकानेक प्रश्न विचारून भंडावून सोडणारी. (तिच्या निम्म्यापेक्षा जास्त प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नसतातच). तिच्याच नव्हे तर तिच्या पूर्ण कुटुंबाबद्दल मला आत्मीयता आहे अशी रुचिरा.

तर ही सारखी मला सांगायची श्रीनि सर आणि तुम्ही भेटावेत असं खूप वाटतं. तर हे श्रीनि सर म्हणजे आर कें चे चिरंजीव. मी विचार करायचो, इतक्या मोठ्या माणसाचा वारसा. मी भेटून काय बोलणार? त्यांना आवडेल का? बरं ते स्पेस जर्नलिस्ट. माझं त्या बद्दलचं नॉलेज अगदी उथळ. मी आपलं हो म्हणायचो. १४ फेब्रुवारीला ने रुचिरा ने परत चिवचिव केल्यावर आम्ही तारीख ठरवली. ९ मार्च.

प्रिया प्रभुदेसाई बरोबर आस्वाद मध्ये नाश्ता केला. आणि मॅजेस्टिक मध्ये काही पुस्तकं घेतली एक श्रीनिसाठी आणि एक माझ्यासाठी. श्रीनि सरांना द्यायचं पुस्तक अर्थात रुचिरा ने ठरवलेलं. मग लोअर परेल च्या फिनिक्स मॉल मध्ये भेटलो श्रीनि सरांना. तुम्हाला सांगतो साधेपणाची कमाल मर्यादा म्हणजे श्रीनिवास लक्ष्मण. गर्व, अहंकार, दिखाऊपणा हे अवगुण त्यांच्या जवळपास पण नाहीत. दोन एक तास गप्पा मारल्यावर आम्ही त्यांच्या घरी गेलो. पेडर रोडला.

दरवाजावर पाटी वाचली. R K Laxman. अंतर्बाह्य थरारलो. आत गेलो आणि भारावल्यासारखं त्या हॉल मध्ये भिरभिरत होतो. आर कें नी स्वहस्ते काढलेली अनेक चित्रे मी पाहिली. यातली तीन मला चित्रं फार आवडली. पण सगळ्यात भारी १९६२ साली काढलेलं, ज्यात त्यांनी त्यांचा मुलगा चांद्रभूमीवरून पृथ्वीकडे पाहतो. १९६९ साली मानवाने चंद्रावर पाय ठेवला आणि श्रीनि पुढे स्पेस जर्नलिस्ट झाले. हा दिवस आहे की स्वप्न याची मी पुन्हा पुन्हा खातरजमा करून घेत होतो.

श्रीनिवास सरांची स्वतःची रूम म्हणजे अंतराळातल्या माहितीचा खजाना आहे. आपल्या आवडीच्या कामासोबत जगणे म्हणजे काय हे तिथं जाऊन कळतं. दुपारभर सर आणि त्यांची पत्नी उषा यांच्याशी गप्पा आणि सोबतीला रुचिरा ची टीवटीव.

निघालो. राहवलं नाही. R K Laxman या पाटीच्या शेजारी उभा राहून फोटो काढून घेतला. कुणाबद्दल असणारी आदराची भावना उचंबळून येणे याची अनुभूती झाली.

एका स्वप्नवत दिवस अंजली आळेकर यांना भेटून संपला.

सांगायचं म्हणजे, आयुष्यात पहिल्यांदा कुणाला भेटण्यासाठी कामावरून सुट्टी घेतली.

Thursday, 14 March 2019

जॉब

फोन आला. फोनकर्त्याच्या मित्राला जॉब हवा होता. जॉब सिकर चं नाव होतं सचिन. 

सचिनचा बायोडाटा आला. खणखणीत करियर होतं. मल्टिनॅशनल कंपनीत दहा बारा वर्षे काम केलं होतं. नंतर आवड म्हणून टिचिंग प्रोफेशन मध्ये शिरले. पण एकुणात शिक्षण महर्षींनी केलेला बाजार पाहून आणि एकुणात अभियांत्रिकी शिक्षणाच्या क्वालिटी ची वाट लागलेली पाहून तीन चार वर्षात पस्तावले. 

माझ्या इंटरव्ह्यू मध्ये हे सगळं पोटतिडकीने बोलले. त्यांची या विषयाची तळमळ पाहून मी त्यांना विचारलं की फायनली काय करायचं ठरवलं आहे. तर म्हणाले की मॅन्युफॅक्चरिंग मध्ये परत यायचं. मी विचारलं, पण तुमची आवड अध्यापन असेल तरीही. तर हो म्हणाले. 

मी म्हणालो "असं समजा की माझ्याकडे मॅन्युफक्चरिंग च्या हेड ची पोझिशन आहे आणि एक माझी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. तिथे मला एका चांगल्या प्रोफेसरची गरज आहे. हे कॉइन आहे. टॉस करू. हेड पडलं तर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आणि टेल पडलं तर ट्रेनिंग मध्ये. आता मी टॉस केलं तर कॉइन हवेत असताना, तुमच्या मनाला काय वाटेल? हेड पडावं की टेल?"

सचिन संभ्रमात पडला. अन हळूच म्हणाला "टेल. पण तरीही......"

मी सांगितलं "कॉइन पडल्यावर जे येईल ते स्वीकारणं ही तडजोड झाली. आणि कॉइन हवेत असताना काय पडावं असं वाटणं ते निवडणं हे आयुष्य. तुम्ही अध्यापन क्षेत्र सोडू नका. तुमच्या सारखी लोक अभियांत्रिकी क्षेत्राची गरज आहे. दुर्दैव हे की आज सगळ्यात जास्त विनोद हे इंजिनियर्स वर होत आहेत. चहाचा धंदा चांगलाच पण इंजिनियरिंग च्या डिग्रीला हार घालून त्याची खिल्ली उडवण्याचा नतद्रष्ट पणा डोक्यात जातो. लॅब मध्ये शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधाला लोकाभिमुख करण्याचं काम तंत्रज्ञांचं आणि ते ताकदीने व्हावं यासाठी तुमच्या सारख्या लोकांनी हे क्षेत्र सोडू नये". 

इतकं बोलून अशी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट निवडली जी प्रोफेशनल पद्धतीने चालवली जाते. तिथे त्यांचा रेफरन्स दिला. इंटरव्ह्यू बहुतेक शेड्युल झाला आहे. सचिनला जॉब मिळाला तर तो त्याचं सोनं करेल याबाबत शंका नाही. त्याला हार्दिक शुभेच्छा. 

अ...... अभियंत्याचा हे फक्त पुस्तकाचं नाव नाही आहे, ती माझी जीवन प्रणाली आहे आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि हो, अभिमान आहे, गर्व नव्हे. 

Wednesday, 13 March 2019

फेसबुक ची पणती

एक महिना फेबुवर नसताना दोन महत्वाचे प्रसंग घडले आणि त्याला करण फेसबुकच होतं. 

२१ फेब्रुवारीला जयसिंगपूर येथील जेजे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग इथे "उद्योजकता" या विषयावर बोलायला बोलावलं होतं. खणखणीत स्वागत केलं होतं. ढोलताशा, औक्षण अन काय काय! प्रमुख पाहुण्यांमध्ये अभिनेत्री स्पृहा जोशी होती, त्यामुळे गर्दीला तोटा नव्हता. पण तिच्याशिवाय श्री सुनील जाजीत होते. एल अँड टी बंगलोर चे एच आर चे प्रमुख. काही महिन्यांपूर्वी भारताला इंजिनियर लोकांची किती कमी प्रमाणात गरज आहे हे अधोरेखित करणारा, तो लेख श्री जाजीत यांनी लिहिलेला. मी त्यावर आधारित मराठीत लेख पण लिहिला होता. चौथे गेस्ट होते ते कॉलेज चे माजी विद्यार्थी श्री बघाटे. पुढे आय आयटी करून युकेमध्ये पीएचडी केली आणि दहा वर्षे जॉब केला. फक्त बिझिनेस करण्याच्या उद्देशाने ते पुण्यात परत आले आणि तो व्यवस्थित सेट केला. या तिघांनीही अत्यंत समयोचित आणि मुद्देसूद भाषणं केली. 

उद्योजकता या विषयावर माझी मतं आता आकार घेत आहेत आणि ती माझ्या अनुभवातून आली आहेत. मुलांना ती पटतात असं मला त्यांच्या प्रतिक्रियेतून जाणवतं. 

असाच एक अनुभव आय एम डी आर, पुणे येथेही आला. स्टार्ट अप च्या कॉन्फरन्स मध्ये पुन्हा एकदा तरुणाईशी "उद्योजकता" या विषयावर बोलायला निमंत्रित होतो ते २ मार्चला. साधारण नव्वद साली आय एम डी आर ला ऍडमिशन घ्यायला गेलो होतो. काही कारणाने नव्हती घेतली. २ तारखेला वक्ता म्हणून गेलो. 

दोन्ही कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली ती फेसबुकमुळे. जयसिंगपूरच्या कॉलेजला रेफरन्स दिला कोल्हापूरचे राजन गुणे सरांनी तर आय एम डी आर ला बोलावलं श्री दिलीप रणदिवे यांनी. 

एका वर्षात पाच ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थिनीशी संवाद साधायचा हे ठरवलं होतं ते साध्य झालं. 


Sunday, 10 March 2019

ताडोबा 2

ताडोबा 1

या हर्षदचं पुस्तक वाचून वाघ बघण्याची उर्मी फारच मनात दाटून आली होती. माझे मित्र आणि सीएनसीटाइम्स.कॉम चे प्रवर्तक नीरज वणीकर यांनी ताडोबाची ट्रिप ठरवली आणि मी विचार केला, हा उद्योग पण करून टाकू.

वणीकरांनी बरोबर काय गोष्टी घ्यायच्या याची लिस्ट पाठवली होती. त्यात आयकार्ड घेण्याबद्दल चार चार वेळा बजावून ठेवलं होतं. त्यांनी सांगितलं की आयकार्ड नसेल तर जंगलात जाण्याचा विचार पण करू नका. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दाखवावं लागेल. नागपूरला इनोव्हा मध्ये बसल्यावर सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा आठवण करून दिली. इतकं घाबरवल्यामुळे मी कार मध्येच थांबवली. बॅगेत पॅन कार्ड आहे ते बघितलं आणि सुस्कारा सोडला.

तरुवन  नावाच्या रिसॉर्ट चे मालक निखिल अभ्यंकर, वणीकर, संदीप आणि मी असे गप्पा मारत निघालो, उमरेडला चहासाठी थांबलो. या जंगल क्षेत्रात चहा पिण्यासाठी सुद्धा पॅनकार्ड लागत असेल हा विचार करून मी कार्ड चहावाल्याला दाखवलं. सगळे हसले. चहावाल्याला काही कळलं नाही.

ताडोबाला पोहोचल्यावर पहिल्या सफारीसाठी सज्ज झालो. गाडीत इतकी उत्कंठा वाढली होती की कधी वाघ दिसतो असं झालं होतं. दुर्दैवाने ८ फेब्रुवारी ची पहिली सफारी आमची ड्राय गेली. सगळे हिरमुसले. मला फार काही वाटलं नाही. कारण तो आनंद काय असतो हे मला अजून माहित नव्हतं.

दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहाची पहिली सफारी चालू केली. इतका वेळ बरोबरच्या लोकांचं बोलणं ऐकून मला बफर, कोअर हा जंगलाचा एरिया, एकुणात १८०० स्क्वे किमी क्षेत्रफळ, त्यातील साधारण १२०० बफर तर ६०० कोअर हे कळलं होतं. जंगलातील सुरस आणि चमत्कारिक कहाण्या ऐकल्या होत्या. मटकासुर, माया, तारा, रूपा, सोनम, ताराचंद, छोटा मटका, कुवानी ही वाघ वाघिणींची नावं मला एव्हाना पाठ झाली होती.  कॉल कसे मिळतात तेही कळलं. आतली गावं कशी विस्थापित केलं तेही कळलं. काही कारणामुळे गावकरी कपल जंगलात उभं होतं आणि दोन वाघ त्यांना कसे हुंगून गेले अशा भीतीदायक कथा पण ऐकवल्या गेल्या.

एकुणात माहोल तयार झाला होता. बफर एरियात जिप्सी एंट्री करतो तोच गाईड प्रवीण म्हणाला, "थांबा. लेपर्ड रस्ता क्रॉस करतोय." डोळे फाडून बघत असताना ते छोटं जनावर रस्त्याच्या उजव्या बाजूला एका दगडावर बसलेलं दिसलं, फक्त एका मिनिटासाठी. आणि पटकन बाजूच्या झाडीत पळून गेलं. "फार शाय असतं ते". जंगलातील टर्म्स मला कळत  होत्या. सफारी चालू असताना जंगलातल्या एका पॉइंटला गार्डला हळूच विचारायचं, काही न्यूज. मग तो सांगणार त्या दिशेने जिप्सी पळवायची. आणि निराशा पदरी यायची. जंगलातून चंद्रपूरकडे जाणाऱ्या एका रस्त्यावर चार पाच जिप्सी आणि दोन कँटर कॉल मुळे शांतपणे थांबल्या होत्या.

आणि तितक्यात तीन एकशे मीटर वर ते डौलदार जनावर जिप्सीतील एकाला दिसलं आणि सर्व गाड्या सुसाट जात त्याच्या पासून अलीकडे थांबल्या. आणि आयुष्यात पहिल्यांदा जंगलाची सम्राज्ञी, हो वाघीण होती ती, दिसली. क्लिक क्लिक करत खचाखच फोटो ओढू लागले. आणि तितक्यात आमचा गाईड म्हणाला, ती थांबली आहे याचा अर्थ बच्चू येत आहे. रस्त्याच्या डाव्या कडेला ती राणी, छोटी तारा नाव तिचं उभी होती, सर्वच गाडीतील लोक कुजबुजत होते. 

शेवटी तिचा बछडा उजवीकडच्या जंगलातून आला. त्याच्या आईच्या दिशेने पळत गेला. इथे तो डौल नव्हता. बछडंच ते. दुडूदुडू करत आईला बिलगलं. आई आणि तिचं पिल्लू एकमेकांना अंग घासू लागलं. नील दुपारी अडीच वाजता शाळेतून आल्यावर जो सिन असतो त्याची आठवण आली.

पुढील दहा मिनिटे एकमेकांच्या साथीने ते मायलेकरू रस्त्याने जात मग जंगलात नाहीसे झाले.

उरलेल्या एक तासात आम्ही जंग जंग पछाडलं, पण त्या व्याघ्रराजाने किंवा राणीने काही दर्शन दिलं नाही.

कहर झाला तो दुपारच्या राईड मध्ये. त्या बद्दल पुढच्या पोस्ट मध्ये.

मला साईटिंग झालं (साईटिंग हा शब्द मला पहिल्यांदा कळला) यापेक्षा मी जास्त एन्जॉय केलं तो तिथला माहौल, ती उत्कंठा, जंगलातील शिस्त. मुख्य म्हणजे घरामध्ये लग्न असेल तेव्हा ते कसं भिनतं, तसा वणीकर किंवा बर्वेसारख्या लोकांमध्ये ताडोबा भिनतं.

अर्थात वणीकर. माझी आणि कॅमेराची दुश्मनी आहे.