Saturday, 3 January 2015

Spindle

मध्ये काही दिवस काही पोस्ट टाकल्या अन खूप जणांना स्पिंडलबद्दल कुतूहल निर्माण झाले. विचारलं "हि काय भानगड आहे बुवा" तेव्हा आजची पोस्ट स्पिंडल बद्दल. थोडी टेक्निकल. कदाचित बोर होईल. आधीच वैधानिक इशारा.

अगदी सोप्या शब्दात "any part which rotates around its own axis can be called as spindle. It becomes more relevant if it is cylindrical in cross section i.e. shaft." पुस्तकी व्याख्या वेगळी असेल. पण मला जी वाटली व्यवहाराची भाषा. आता मग स्पिंडल कुठेही असू शकतो. कारमध्ये, सायकल, गियर बॉक्स एवढंच काय पण नळात पण स्पिंडल असतो. टेक्सटाईल स्पिंडल तर फ़ेमस आहे. तर मग ज्या स्पिंडलच्या गिरकीमुळे मी गिरक्या घेतो (संतोष शेलार) ते काय आहे. तर सांगतो:

कोणताही पार्ट बनवायचा म्हणजे त्याला मशिनिंग करून बनवावे लागते. म्हणजे थोडक्यात round बार किंवा चौकोनी ठोकळा किंवा for that matter कुठल्याही भौमितीय आकारा मधला लोखंडाचा पीस घेतला (आता इथे वापरले जाणारे वेगवेगळे धातू आहेत. तूर्तास आपण लोखंड समजू. ज्याचा वापर कमी झाला आहे पण तरीही तेच सगळ्यात जास्त वापरले जाणारे) तर पाहिजे नसलेले मटेरियल आपण मशिनिंग करून काढतो. आता हे काम करण्यासाठी CNC मशिन्स असतात. ज्याला turning center आणि मशिनिंग सेंटर म्हणतात. यातला आपण मशिनिंग सेंटर प्रकार घेऊ. तर स्पिंडल म्हणजे heart ऑफ मशीन. म्हणजे स्पिंडल च्या पुढे टूल पकडलं जातं आणि त्याला rpm देतात आणि मटेरियल कट केले जाते.

थोडक्यात आपल्या दैनंदिन जीवनातील कोणतंही व्हेइकल आणि त्याचे पार्टस आणि बाकी मेकँनिकल काम्पोनन्टस बनवताना CNC मशीन्स लागतात. आणि मेटल कटिंग मशीन आली की स्पिंडल आलाच. पुढे हेच application Wood working (फर्नीचर), PCB इंडस्ट्री, ग्लास mfg, dental applications याठिकाणी मोठ्या प्रमाणात वापरले गेले आहे. त्यामुळे यात ही स्पिंडल आलाच.

हा स्पिंडल म्हणजे १५-२० पार्ट मिळून असेम्ब्ली असते. त्यात सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे बेअरिंग. ह्या बेअरिंग ला stipulated लाइफ असतं. म्हणजे काही ठराविक तासाने बेअरिंग खराब होतात. (१००००-१२००० working hours. साधारण ४-५ वर्ष.) आणि त्या बेअरिंग खराब झाला कि स्पिंडल आमच्याकडे येतात. रिपेयर करायला. (थोडक्यात आमचं पोटा पाण्याचं त्यामुळे भागतं). कधी मशीन्स वर accident होतात. त्याने पण स्पिंडल खराब होतात. बेअरिंग replacement शिवाय बरीच कामं असतात, पण ते इथं explain करणं फार किचकटीचं होईल.

आता हे आमच्याकडे का? तर ह्या मशिन्स इम्पोर्टेड असतात. जर्मनी, जपान, तैवान, USA ह्या देशातून मशिन्स येतात.  आणि त्याचा स्पिंडल रिपेयर करायचा म्हणजे तो परत त्या देशात पाठवावा लागतो. कारण तो रिपेयर करायचे स्किल इथे फार कमी लोकांकडे आहे. बाहेरच्या देशात स्पिंडल पाठवणे आणि तो रिपेयर करून आणणे हे दिव्य काम आहे. Thanks to Indian Customs. वेळ प्रचंड लागतो. आणि परत कॉस्ट. हि गोरी मंडळी पार धुलाई करतात हो. आणि त्यामुळे आमची चलती. साधारण पणे OEM पेक्षा आम्ही १/४ th कॉस्ट मध्ये काम करतो. म्हणजे एक ठोकताळा. हे १/१० ते १/२ पर्यंत बदलू शकते.

आणि मुख्य म्हणजे त्याला लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करणे हे फार किचकट आहे. आणि मुख्य म्हणजे कॅपिटल intensive आहे.  आम्ही सुद्धा गेली १२ वर्ष हे उभं करतोय पण पूर्ण international standards च्या ५०% उभं केलं असेल, आता पर्यंत.

अगदी थोडक्यात सांगायचं तर मशीन म्हणजे माणसाचा देह समजला तर हृदयाला जे जे करावं लागतं ते आम्हाला या क्षेत्रात करावं लागतं. फक्त cardiologist इतके आम्ही श्रीमंत नसतो. (कारण Cardiologist माणसाला जिवंत ठेवून हृदयावर काम करत असतात. आमच्या केस मध्ये मशीन बंद असते).

याउपर कुणाला माहिती हवी असल्यास rmandlik87@gmail.com यावर विचारणे. माहिती दिली जाईल. (मोफत). कुणाला अजून इंटरेस्ट असेल तर पुण्याला या, यथाशक्ती, यथा बुद्धी सांगेल.

आता इतक सांगितलंच आहे तर अजून सही. आमच्या इंडस्ट्री बद्दल.

आम्ही मशीन टूल इंडस्ट्री ला represent करतो. थोडक्यात मदर इंडस्ट्री. आज make in India चा बराच बोलबाला
चालू आहे. त्या प्रोजेक्ट ला यशस्वी करण्यामध्ये मशीन टूल इंडस्ट्री चा सिंहाचा वाटा असेल याबाबत शंका नाही. मशीन टूल इंडस्ट्री ला स्कोप हि खूप आहे. आपल्या देशाच्या मानाने इंडस्ट्री चा साईझ लहानच आहे. ५००० कोटी ची अख्या देशाची इंडस्ट्री. जगात ५००० कोटी पेक्षा जास्त उलाढाल असणार्या किमान १५ कंपन्या आहेत. आणि सध्या भारतात लागणाऱ्या मशिन्सच्या ७०% मशिन्स बाहेरून येतात. म्हणजे तुमच्या लक्षात येईल किती प्रचंड स्कोप आहे ते. थोडक्यात यंग इंजिनियर्स जे हे वाचत आहेत, त्यांनी मशीन टूल इंडस्ट्री हा एक करियर ऑप्शन जरूर ठेवावा. कष्ट भरपूर करण्याची तयारी हवी. पण जर creativity चा आनंद लुटायचा असेल तर Mechanical आणि Electronics इंजिनियर्स खुप enjoy करू शकतील. IMTMA नावाची असोसिएशन आहे. ते या इंडस्ट्रीला लागणारे खुप कोर्सेस कंडक्ट करतात, बंगलोरला. यामुळे industry compatible engineers तयार होतात.

पधारो मारो industry.



Sunday, 28 December 2014

तुम मुझे भूल

- तुमचं असं कधी झालं का की एखादं गाणं ऐकताना त्या नायिकेबद्दल आदर दाटून येतो. माझं आज झालं बुवा.

- तुमचं असं कधी झालं का की एखादं गाणं ऐकताना त्या हिरोबद्दल वाटतं, च्यायला येडं आहे बेणं. माझं आज झालं बुवा.

- तुमचं असं कधी झालं का की एखादं गाणं ऐकताना त्याच्या सादगीने, त्याच्या अनवट सुरावटीने तुमचे डोळे पाणावले. माझं आज झालं बुवा.

- तुमचं असं कधी झालं का की गीतकाराच्या दिव्य प्रतिभाशक्तीने तुम्ही स्तिमीत झाला. माझं आज झालं बुवा.

सिंहगड पायथ्याला जाताना आज सकाळी सुधा मल्होत्रा आणि मुकेश यांनी गायलेलं खालील गाणं ऐकलं. विविधभारतीवर. जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकतो येडा होतो. पण आज माहोलच वेगळा होता. सकाळची वेळ. गाडीत एकटाच. विचारांच्या गर्दीत हरवलेला. अन हे गाणं. साहिर, काय लिहीणार या माणसाबद्दल. कभी कभी चा शेवट करताना जोडलेल्या पहिल्या ओळी. पगलावतो लेकाचा. अन या गाण्यासमोर तर लोटांगण. प्रभा जोशींनी सांगितलं एन दत्ता आजारी होते म्हणून गाणं बांधलं सुधा मल्होत्रांनीच. त्यांच्याबद्दलचा आदर द्विगुणीत झाला.

विविधभारती. I am love'in it.

तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक़ है तुमको 
मेरी बात और है मैंने तो मोहब्बत की है

मेरे दिल की मेरे जज़बात की कीमत क्या है
उलझे उलझे से खयालात की कीमत क्या है
मैंने क्यों प्यार किया तुमने ना क्यों प्यार किया
इन परेशान सवालात की कीमत क्या है
तुम जो ये भी ना बताओ तो ये हक़ है तुमको 
मेरी बात और है मैंने तो मोहब्बत की है

जिन्दगी सिर्फ मोहब्बत नहीं कुछ और भी है
जुल्फ-ओ-रुखसार की जन्नत ही नहीं कुछ और भी है
भूख और प्यास की मारी हुयी इस दुनियाँ में 
इश्क ही एक हकीकत नहीं कुछ और भी है
तुम अगर आँख चुराओ तो ये हक़ है तुमको 
मैंने तुम से ही नहीं सब से मोहब्बत की है

तुमको दुनिया के ग़म-ओ-दर्द से फुरसत ना सही 
सबसे उल्फत सही मुझसे ही मोहब्बत ना सही 
मैं तुम्हारी हूँ यही मेरे लिये क्या कम है
तुम मेरे हो के रहो ये मेरी किस्मत ना सही 
और भी दिल को जलाओ तो ये हक़ है तुमको 
मेरी बात और है मैंने तो मोहब्बत की है 

Thursday, 25 December 2014

अजून एकदा सिंहगड डायरी

काय होतं, मनात काही नसतं हो. पण बोलतात लोकं अन मग मन फसतं हो. आता हेच बघा ना. काल उतरत होतो सिंहगडावरून. समोरून मुलींचा घोळका आला. ४-५ जणी होत्या. साधारण पंचविशीच्या. समोर तीन जणी आणि मागे दोघी जण. त्या दोघी मैत्रिणी आणि एकीने दुसरीला ग्रुपमध्ये आणलं असावं. त्यांचं नाव समजा अ आणि ब. (खूप नावं लिहिली पण सध्या फ्रेंड लिस्ट मोठी झाल्यामुळे वेगवेगळी नावे आहेत. फेसबुकचे वातावरण जरा मचुळले आहे सध्या. त्यामुळे अ आणि ब यावर समाधान माना) तर तिघींमध्ये एक भैरवी होती. भैरवी अ आणि ब कडे बघून म्हणाली "ए, तुम्ही दोघी किती सेम टू  सेम दिसता" तर अ म्हणाली "हो मग, आम्ही शेजारीच राहत एकमेकांच्या."

एकटाच होतो. मनातल्या मनात हसत निघालो.

*******************************************************************************

BSNL म्हणजे भगवान से भी नही लगता……. म्हणे

*******************************************************************************

पूर्ण उतरलो. नेहमीच्या शेतात गाडी पार्क केली होती. मी पोहोचलो तेव्हा सीन असा होता, कि एक साधारण तिशीची  स्त्री, अर्थातच सुंदर. लग्न झाल्यापासून सुंदर स्त्रियांशीच माझी का गाठभेट होते हे एक न सुटलेलं कोडं आहे. हा, तर त्या बाईंनी माझ्या कारचा ड्रेसिंग टेबल केला होता. बॉनेट वर पर्स अन त्यातून मेक अप चं सगळं सामान. त्या कारच्या खिडकीत बघून केश संभार सावरत होत्या. त्यावेळेस दुसरी एक कन्यका साईड मिरर मध्ये पापण्यांना ब्रश ने काही तरी छळत होती. कारच्या एका बाजूला ह्या दोन तर पलीकडे अजून दोन कन्यका लिपस्टिक चा मुक्त वापर करत होत्या. बॉनेट पूर्ण भरलेलं.

मी थक्क होऊन बघत बसलो. म्हणजे ड्रेसिंग टेबल कडे. कन्यका आणि त्या सिनियर मग्न होत्या. मी मागे येउन उभा राहिलो, घसा खाकरला. पण कुणी बघायला तयार नाही. मी काही बोलणार तेवढयात त्या सिमरन चं, आलियास सिनियर, माझ्याकडे लक्ष गेलं. अन फणकार्याने म्हणाली "काय बघताय काका" त्या रागाचा अंदाज घेत तो काका हा शब्द शिसासारखा कानात गेला. मी बोललो "अहो माझी कार" तर ती म्हणाली "ओह सॉरी हं, लक्षात च नाही आलं." वर मंजुळ आवाज करत म्हणाली "रागावलात का". हे ती असं ती हसत म्हणाली अन मी फसत गेलो. काही न बोलता कार चालू करून स्पीड पकडणार तेव्हढ्यात मागे डिकीवर हात आपटून कार थांबवा असा इशारा केला. आता ती मला काय करणार अशी कल्पना करत थांबलो तर समोर बॉनेट आणि वायपर च्या मधे तिने भली मोठी हेयरपिन अडकवली होती. ती ओढून घेतली.

देवी माझ्यावर प्रसन्न् आहे मित्रांनो. नाहीतर विचार करा, मी घरी पोहोचलो आहे. सोसायटीच्या गेटवर वैभवी उभी आहे. तिचे लक्ष कुठेही न जाता हेयरपिन कडे जातं....................Rest in pieces च्या मायला.

********************************************************************************

कोपर्या कोपर्यावर मोबाईल मधून फोटो उडवणारी जनता बघून वाटते, कि गेल्या शतकात लोकांनी जितके फोटो उडवले असतील तितके या दशकात याबाबत मला शंका नाही.
********************************************************************************
सिंहगड वरून परत येताना डावीकडे पाटी दिसते " Advocate अमृता मालुसरे". मला बर्याचदा वाटतं, एक दिवशी कार थांबवावी, घरात जावं आणि विचारावं "ताई, तुम्ही त्या वीर तानाजी मालुसरे यांचे वंशज का" त्यांनी हो म्हणावं आणि मग मला त्या काळातील त्यांच्याकडे असलेली पत्रे किंवा काही वस्तू दाखवाव्यात. मी त्या वस्तूवर हात फिरवत इतिहासात हरवून जावं आणि आपसूक माझ्याकडून ललकारी पडावी "क्षत्रिय कुलवंतस राजाधिराज गोब्राह्मण प्रतिपालक श्रीमंत शिवाजी महाराज की जय"

*******************************************************************************

अजून एकदा सिंहगड डायरी

Monday, 22 December 2014

बाकी निवांत

दहावी करून डिप्लोमा ला गेलो तेव्हा आपल्याच मस्तीत मश्गुल होतो. Mechanical ला असून दोन मुली होत्या वर्गात, हे म्हणजे alien असल्यासारखं होतं त्या काळात. पण आम्ही हॉस्टेल ची पोरं कुठल्या धुंदीत होतो आठवत नाही, पण कधी त्या दोघींशी बोललेलो आठवत नाही. पौगंडात असा गंडलो.

मग भारती विद्यापीठात. डोळे माझे परजून तयार झाले होते एव्हाना. पण तिथल्या फटाकड्या भोवती इतकी पोरं असायची, म्हणजे मराठी पोरी असल्या तरी पोरं मात्र नॉर्थ इंडियन, कि २० मीटर त्रिज्येच्या आत कधी असल्याचं आठवत नाही.

पुढचा टप्पा SKF. hardcore mechanical कंपनी. स्त्री पार्टी होती. पण आमच्यापासून कोसो दूर. आम्ही पोरं त्यांच्या बद्दलच्या दंत कथा ऐकायचो. कोण कुणाबरोबर फिरतं वैगेरे. पण ते फक्त गॉसिप. मुंडकं खाली घालून bearings चं production किती झालं यातंच आम्ही मश्गुल.

एव्हाना लग्नही झालं.

मग रोलॉन चा जॉब. ऑफिस बंगलोर ला. मला जावं लागायचं, चार महिन्यातून एकदा. तिथे होत्या मुली. म्हणजे कशी एकदम ideal कंडीशन. मी बंगलोर मध्ये, तरुण. ऑफिस च्या पोरी त्याही तरुण. संध्याकाळ नंतर वेळच वेळ. हो, म्हणजे तेव्हा हे फेसबुक प्रकरण पण नव्हतं. पण इथे पण नियती निष्ठुर. MD संजीव शहा बहुधा ad मध्ये लिहित असावा "कृपया सुंदर दिसणाऱ्या मुलींनी अर्ज करू नये." त्यामुळे आम्ही संटे च पार्ट्या करायचो. त्यातही मेरी नावाच्या एका accounts ऑफिसर चं कृष्णा नावाच्या ऑफिस बॉय शी जुळलं. प्रेम हे आंधळं असतं हे त्यावेळी कळलं. (तसं वैभवी चं अन माझं लग्न झाल्यावर सासरच्या लोकांमध्ये "जाऊ दया, जे झालं ते झालं, प्रेम आंधळं असतं, काय करणार" अशी कुजबुज झाल्याची ऐकवात आहे).

मग मीच धंदयाला बसलो. (अर्थ कसे विचित्र प्रचलित होतात नाही).  मी धंदयाला लागल्यावर बाकीचे धंदे करायला वेळ च नाही मिळाला.

तसंही म्हणा माझ्या माय बापाचे संस्कार, बायका पोरांचे प्रेम, अरे चुकलं, बायको पोरांचे प्रेम या पेक्षा "तसलं" काही करायला opportunity मिळाली नाही म्हणून मी सोवळा राहिलो हेच वखवखतं वास्तव आहे. आणि त्याही पेक्षा "तसलं" काही प्रकरण पुढे गेलं तर ते आवरण्याची क्षमता या पामरात नाही हे प्रखर आणि धगधगतं सत्य आहे.

(तुम्हाला म्हणून आतली गोष्ट सांगतो chat बॉक्स मध्ये माझं आणि माधुरी नेने चं बोलणं झालं आणि केवळ त्या ओढीपायी ती डेनवर सोडून नवरा आणि पोरा सकट मुंबई ला आली. chat बॉक्स ची ही ताकद आहे. "श्रीराम नेने, माफ करा.")

Friends, let us use social media to spread love and respect, not hate and anger.

बाकी निवांत

Thursday, 18 December 2014

शेती

हर्षल बोलला म्हणून यथाशक्ती यथाबुद्धी लिहायचा प्रयत्न करतोय.

तर शेती उद्योगाला प्रचलित उद्योगासारखा बघावं का?

सगळ्यात प्रथम आपण मार्केटचा विचार करू. तर भारतासारख्या देशात शेतीच्या उत्पादनाला मरण नाही. खाणारी तोंडे इतकी आहेत कि जे उगवेल ते खपेल. ही luxury इतर उद्योगाला नाही आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचा पार्ट, ग्राहक, याची चिंता करायची गरज नाही आहे. मग एखाद्या उद्योगाला लागणारे घटक शेतीत कसे काम करतात, ते बघू.

१. शिक्षण: कुठलाही उद्योग चालू करताना त्याचं शास्त्रीय शिक्षण गरजेचं असावं. आता लागलीच कुणी तरी म्हणेल कि बिल गेटस कुठे शिकला होता. तर अपवाद हे नियम नाही होऊ शकत. मला असं वाटतं कि शेतीचा शास्त्रीय अभ्यास देणाऱ्या संस्थांनी जास्त meticulously काम करायला हवे. शेतीच करायची तर काय करायचं शिकून, हा attitude सोडून द्यावा. शेती करण्याच्या शास्त्रीय पद्धतीशिवाय vocational ट्रेनिंग द्यायलाच हवे. अभियांत्रिकी उद्योजक आणि शेतकरी यात मला हा पहिला फरक जाणवतो. (आता कुणी आजकालचा शेतकरी शिकला नाही असं कुणी सांगितलं, असा वाद घालू नये. जे दिसतं ते लिहितो)

२. उत्पादन: कुठलेही उत्पादन करायचे तर ढोबळ मानाने एखाद्या मटेरियल चे स्वरूप बदलतो. मग तो लोखंडी बार असो कि सोने असो. आता हे बेसिक raw material मिळण्यात धोके असतात. पण विचार करा, शेतीचे raw material काय, तर शेत जमीन, बी बियाणं, खत आणि मुख्य म्हणजे पाणी. आता ह्या पाण्याची उपलब्धता करून देणे कुणाच्या हातात आहे. निसर्गाच्या. निसर्ग पाणी देतो असं एक वेळ गृहीत धरू. पण शेतकऱ्याला ते योग्य वेळी, योग्य प्रमाणात मिळते का हि कुणाची जबाबदारी आहे. त्या उपरही म्हणू कि शेतकर्याने पाणी वाचवले पाहिजे. पण बदलत्या परिस्थितीत हे ज्ञान त्याला कुणी दिले आहे का? थोडक्यात प्रचलित उद्योगाला raw material चे धोके कमी तर शेतीला सगळीच अस्थिरता.

३. वातावरण: गारपीट, बेधुंद पाऊस, वादळ ह्याला शेती जितकी vulnerable असते तितका दुसरा कुठला उदयोग असतो? तर उत्तर आहे कुठलाच नाही. आणि नुकसान तरी कसं तर हाताला आलेलं पीक भुईसपाट. म्हणजे आमच्या इंडस्ट्री मध्ये माल बनवला, ट्रक ने पाठवताना, ट्रक नदीत पडला आणि संपलं. हि अशी टांगती तलवार सतत डोक्यावर.

४. प्रोसेसिंग: धान्य, फळं, भाज्या बनवल्या, उत्पादित केल्या. पण पुढं काय. शेतकऱ्याला योग्य मोबदला देऊन हे ग्राहकाला पोहोचवायची व्यवस्था कुठे आहे. म्हणजे जास्त उत्पादन केलं तर प्रोसेसिंग करता येत नाही म्हणून फेकून द्यायचं अन कमी उत्पादन झालं तर उत्पन्न कमी. किंवा मधले दलाल लाटणार.

५. अर्थशास्त्र: बाकी मग बँकेचे लोन, त्याचा इंटरेस्ट, त्याचा उत्पन्नाशी ताळमेळ याचं काही धोरण शेतकऱ्याकडे असतं का आणि जर असेल तर त्यावर त्याचा कंट्रोल असतो का? त्याला त्याच्यातलं ज्ञान आहे का? ते ज्ञान गरजेचे नाही का? आहेच तर मग कोण देतं त्यांना हे ज्ञान? असे असंख्य प्रश्न उभे राहतात. आणि देत असून जर इतक्या घाऊक भावात आत्महत्या होत असतील तर शिकवणार्यांच काही तरी चुकतंय. शेतीचं यांत्रिकीकरण केव्हा करायचं, किती जमीन असली म्हणजे break even point त्या उत्पन्नाला येतो. आपण बर्याचदा ह्या ज्ञानाची खिल्ली उडवतो, पण याचा उपयोग धंद्यात होतो हे नक्की.

असो. पोस्ट मध्ये लिहिल्याप्रमाणे "भारत हा शेतीप्रधान देश आहे" यापलीकडे काहीच माहित नाही, आमच्या उदयोगात आम्ही काही ठोकताळे बांधतो, त्यातूनही प्रॉब्लेम येतात पण त्याची तीव्रता कमी. जे गोत्यात येतात ते स्वत:च्या कर्माने येतात. मला असं वाटतं शेतीचं तसं नाही. शेतीमध्ये शेतकऱ्याच्या कंट्रोल च्या बाहेरच्या खूप गोष्टी आहेत. आणि त्यासाठी सरकारच्या मदतीची गरज आहे. म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं तर SWOT analysis केलं तर strength खूपच कमी आहेत शेती उदयोगात तर weakness खूप जास्त. opportunity ला मरण नाही पण threats चा भडीमार आहे. मुख्य म्हणजे आमच्या उदयोगात threats या hypothetical असतात तर शेतीत ते वास्तव आहे.

त्यामुळे कुबेर म्हणतात त्याप्रमाणे शेतीला बाकी उद्योगासारखे ट्रीट करता येणार नाही. वरील मुद्द्यांवर शासनाने काम केलं तर १०-१५ वर्षानंतर त्या दृष्टीने विचार करता येईल. पण जर शेतीला आणि पर्यायाने शेतकऱ्याला सक्षम केलं नाही तर आत्महत्येचं पाप आपल्याच अंगावर आहे हे ध्यानात असू द्यावे.

(सदर लेखक हे लोकांचे भले करण्याच्या नावाखाली वाटेल ती पापं करणाऱ्या भांडवलशाहीचे मायक्रो लेवल चे का असेना पुरस्कर्ते आहेत. चूभू देणे घेणे)

Wednesday, 17 December 2014

अज्ञानी

आता याला confession म्हणा की अजून काही. पण हे खरं आहे. सांगायला लाज वाटते पण शेती आणि शेतकरी या विषयी फारंच कमी माहिती आहे मला. दररोज होणार्या आत्महत्या या बातम्या वाचून जीव जळतो, पण क्षणभरच. नंतर परत ये रे माझ्या मागल्या. कदाचित सारं आयुष्य शहरात गेलं माझं, त्यामुळे कनेक्ट होत नसेल.

शेती, तिचे पावसावर अवलंबून असणे, बि बियाणांचे भाव, खतं- कीटकनाशकांचा वापर, बँकांचे interest rates याची एकमेकांशी विचित्र सांगड होऊन शेतकरी पार आत्महत्या करायला प्रवृत्त होतो यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही. त्याचं अर्थकारण किती complex असेल की अगदी होलसेल मधे लोकं जीव देत आहेत. शेतीचं यांत्रिकीकरण करणं योग्य की अयोग्य, त्याने ट्रँक्टर कधी घ्यावा, अंहं एकदम ढ.

खरंतर शेतकरी, अन्नदाता आपला. त्यांची अशी ससेहोलपट बघताना मन द्रवते, पण त्यावर उपाय काय यावर मत प्रकट करण्याइतकीही अक्कल आपल्याला असू नये याचं वाईट वाटतं.

असो. काही गोष्टींचा अभ्यास पुर्णपणे अभ्यास न करता अक्कल पाजळवायला अन जाहीरपणे लिहायला आपण पेपरचे संपादक थोडी आहोत.

आपल्याला शेतीमधलं कळत नाही हे लिहीताना वाटलं, बरं आहे, आपण निर्लज्ज  नाही आहे ते.

****************************************************************************

फेसबुकवर बर्याचदा जातीवरून चर्चा होते. शेतीसारखंच या क्षेत्रातलं माझं ज्ञान तोडकं आहे. आणि का अज्ञानी असू नये. लहानाचा मोठा झालो, पण जातीबद्दल ना कधी घरी विषय ना शाळेत. दहावीनंतर डिप्लोमा ला गेलो. तिथं रमेश नारखेडे नावाचा जीवलग मित्र झाला. तो काही लोकांना जयभीम म्हणायचा. मी एके दिवशी विचारलं, तु नमस्कार च्या ऐवजी जयभीम का म्हणतोस. पहिल्यांदा राग आला त्याला, पण मला खरंच काही माहित नसल्यामुळे शांत झाला.  मग तो मला कॉलेजच्या शेजारी आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर घेऊन गेला. आणि सांगितलं भीमराव आंबेडकर आणि त्यांचं महत्व. दोस्ती दृढच राहिली.

यथावकाश लग्न झालं. आंतरजातीय. विरोध झाला, नाही नाही जातीवरून नाही, अस्मादिक डॉक्टर नव्हते म्हणून. ज्या घरात मला दिलं आहे ते तर राष्ट्रीय संमेलन. माझं आंतरजातीय, वैभवीची बहिण क्षितीजा चं arranged आंतरजातीय, भाऊ अमोल त्याचंही स्वजातीत नाही. चुलत भाऊ शंतनु ची बायको ब्राम्हण, बहिण राधिका चं पंजाब्याशी लग्न. दुसरा चुलत भाऊ संजयची बायको ख्रिश्चन तर चुलत बहिणीचा नवरा ब्राम्हण. मामे बहिण चारू चा नवरा तमिलियन तर मावस बहिण शिल्पाचा नवरा काश्मिरी. प्रसादचं arranged आंतरजातीय. इतकंच काय वैभवीच्या आजोबांनी ब्राह्मण बायको शी लग्न केलं होतं. जमलो कधी अन जातीवरून भांडायचं म्हंटलं तर कुणी कुणाशी भांडायचं.

मी कधी कुणाची जात नाही काढली न माझी कुणी. (एकच आहे पण तो च्युत्या आहे हे जगाला माहित आहे).

मधे मला एका मोठ्या कंपनीतून फोन आला "तुमच्या employees ची जात लिहून पाहिजे" मी विचारलं "का" तर म्हणाला आमच्या कंपनीचा नियम आहे. मी बोललो "employee ला घेताना जात विचारायची नाही हा माझा नियम आहे" तर म्हणाला "सांगावीच लागेल" मी म्हणालो "फोन ठेवतो, परत फोन करू नका" तर साहेबाला घेऊन आला. सगळं कळल्यावर मला म्हणाले "government ला डाटा द्यायचा आहे, प्रायव्हेट सेक्टर मधे मागासवर्गीयांचं स्थान काय?" बोललो "हे आधी सांगायचं ना मग, नियम आहे म्हणून काय सांगता" पोरांना बोलावलं "या कारणासाठी जात विचारतोय" डाटा अमनने गोळा केला अन कंपनीला दिला. (नंतर मग बर्याच कंपन्यांनी मागितला)

जात अजूनही आपल्या समाजात इतकी खोलवर रूजली आहे हे मला फेसबुकवरच कळतं, अन मनस्वी दु:खही होतं. लोकं कधी समोर वार करतात तर कधी आड़ून.

जातव्यवस्था फ़ारशी माहित नसलेला मी एक अज्ञानी माणूस आहे. 

Saturday, 13 December 2014

जोशी

मी मंडलिक, साधारण पणे मला मांडलिक या नावाने बोलावले जाते. जी लोकं फारच घाईत असतात, म्हणजे इंग्रजी स्पेलिंग पूर्ण वाचायचा हि त्यांना वेळ नसतो ते मला महाडिक असे बोलावतात. ज्यांना ऐकायचा वेळ नसतो ते मला पुंडलिक नावानेही बोलावतात. काल तर गम्मत झाली. तो कुरियर वाला मला कुंडलिक म्हणून बोलवत होता. असो आडनावामुळे गमती होत असतात. त्यावरून आठवलेलं.

कॉलेज मध्ये आमचे  दोन मित्र. मिलिंद जगन्नाथ जोशी आणि मिलिंद रामचंद्र जोशी. आता बोलवावं तर लागायचंच. "ए, अरे मिल्या जोश्याला बोलाव रे." आता या प्रश्नांवर कोणता मिल्या जोशी  हा प्रतिप्रश्न यायचाच. बरं या दोघांची अंगकाठी अन रंग पण सारखाच. दोघानाही डोक्यावर केस. म्हणजे कॉलेज मधल्या प्रचलित हाका "जाड्या किंवा बारक्या" "लंब्या किंवा बुटक्या" "काळ्या किंवा गोऱ्या" "टकल्या आणि केसवाल्या" हि अशी वर्गवारी पण करता येणं अवघड.

मग यावर मार्ग काय? तर एक दिवशी कुणी तरी म्हणालं "मिल्या जोशी ला बोलाव ना राव" तर कुणीतरी विचारलं "अरे जगन्नाथाचा कि रामचंद्राचा". झालं, ती प्रथाच चालू झाली. मिल्या जोशीला ला बोलाव म्हंटल कि पुढचा प्रश्न "जगन्नाथाचा कि रामचंद्राचा".

कॉलेज मध्ये कॉरिडोर मध्ये जात असताना एके दिवशी लेक्चर ला जात असताना साधारण ४०-४५ च्या गृहस्थाने मला अडवले. आणि कुठली ब्रांच वैगेरे विचारलं आणि पुढे म्हणाले "मिलिंद जोशीला ओळखतोस का?" मी विचारलं "कोण, जगन्नाथाचा कि रामचंद्राचा?" तर ते चपापले असावेत, अन लागलीच सावरून म्हणाले "जगन्नाथाचा". मी पण क्लासला जायच्या तिरमिरीत, बाजूने जाणार्या प्रदीप ला सांगितलं "ए जरा, जगन्नाथाच्या मिल्या जोशीला बोलाव रे" आणि त्या गृहस्थाला विचारले "कोण आलं म्हणून सांगू?"

तर देवदास मध्ये "डोला रे" गाण्यात माधुरी आणि ऐश्वर्या बघताना जसे माझे बुब्बुळे फिरतात अगदी तसेच  माझ्याकडे अन माझ्यापेक्षा सावळ्या असलेल्या प्रदीप कडे बघत ते गृहस्थ कडाडले "मी जगन्नाथ जोशी"

फूटलोच आम्ही.