Wednesday, 11 March 2015

भक्त आणि भक्ती

मध्ये एका WA ग्रुपवर एक मित्र म्हणाला "तू (कुणाचातरी) भक्त आहेस"

मी बोललो: नाव, राजेश मंडलिक, वय ४६,  रूढार्थाने जग ज्याला मानते तसा दोन पोरांचा बायोलोजीकाल बाप आणि लौकिकार्थाने ३० जणांच्या कुटुंबियांचा भार वाहणारी कंपनी चालवतो म्हणून पूर्ण पुरुष. कुणा माणसावर भक्ती म्हणाल तर माझ्या आई बापावर आणि त्यानंतर…………. स्वत:वर.

बाकी कुणावर भक्ती, माय फूट.

भक्त/भक्ती, फेसबुकीय लिखाणात काही शब्दांचे अर्थ वहावत जातात, भक्ती हा त्याचं उत्तम उदाहरण. खरं तर भक्ती हा अत्यंत पवित्र शब्द. माझ्या मते भक्ती ही आपण अमुर्त अशा गोष्टीवर करतो. कला, खेळ, बुद्धीमत्ता, कर्तृत्व यावर जेव्हा अलौकिकत्व दिसतं तेव्हा आपण स्वत:ला विसरतो आणि अलौकिक रूपावर आपण जे भाळतो ती भक्ती. आणि जी लोकं ह्या अमूर्त गोष्टी आपल्यासमोर घेऊन येतात त्यांच्यासमोर आपण नतमस्तक होतो. परवाच परत एकदा ऐकलेलं "सरणार कधी रण" यामधील संगीत/शब्द/आवाज याने मनात जे तरंग उठतात ती भक्ती, झाकिरभाईंचा हात तबल्यावर कडाडल्यावर जी अनुभूति येते ती भक्ती, तेंडुलकर जेव्हा कड़ाकड स्ट्रेट ड्राईव्ह ओढतो तेव्हा जो शहारा उमटतो ती भक्ती, पुल रावसाहेब सांगताना हसता हसता रडवतात तो अनन्य भाव म्हणजे भक्ती, आज जाने की झिद ना करो मधे फ़रीदा खन्नूम खिळवून ठेवते ते खिळणं म्हणजे भक्ती.

पण या फेसबुकवर भक्त आणि भक्ती या शब्दाची पार बोळवण झाली आहे. खरंतर बहुतांश मानवजातीची जर कुठल्या मूर्त व्यक्तीवर भक्ती असेल तर ती स्वत:वर. "देव आपणात आहे, शीर झुकोवनिया पाहे" हे बाबूजी म्हणून गेले तेच खरं तर सत्य. ही अशी पवित्र भावना कुणाच्या पायावर वाहत असेल ही शक्यता कमीच, अन त्यातल्या त्यात ह्या राजकीय नेत्यांवर हे तर अशक्यच.

त्यातही, आपल्या सोयीनुसार या शब्दाचा वापर करायचा. म्हणजे एका पक्षाच्या समर्थकांना हे भक्त म्हणणार. त्याचवेळेस यांचे नेते भ्रष्टाचाराच्या चिखलात गळ्यापर्यंत रूतले आहेत ते विसरणार. दुसरे यांना भ्रष्टाचारी दिसणार पण स्वत:च्या पक्षात घराणेशाही पायी सुंदोपसुंदी चालू आहे ते विसरणार. या असल्या भंगार लोकांच्या चरणी लीन होण्याइतकी तुमच्यामाझ्या सारख्या साध्या लोकांची, हो साध्या सामान्य नव्हे, भक्ती स्वस्त झाली नाही आहे.

विठ्ठलाचं नाव घेत तल्लीन होणार्या ज्ञानेश्वर तुकोबाच्या अभंगात ती दिसते, पावनखिंडीत बाजीप्रभूच्या त्वेषात ती दिसते, रॉजर फ़ेडरर च्या नजाकतदार फटक्यात दिसते ती आणि हो ४५००० rpm चा स्पिंडल रिपेयर करताना राजेश मंडलिकच्या तन्मयतेत दिसते ती..............भक्ती.

तेव्हा मित्रहो, काळाच्या ओघात कित्येक शब्दाच्या अर्थाचे अनर्थ होतात. भक्त/भक्ती या ओवीच्या शब्दाला शिवी चे रूप येऊ न देणे हे तुमच्या माझ्या हातात आहे.

असो. ह्या शब्दाचा कसा वापर करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न. मी मात्र माझ्यापुरता हा प्रश्न सोडवला आहे. 

Monday, 9 March 2015

मी आणि मि

काही महिन्यांपूर्वी  एका मित्राकडून पैसे उधार घेतले होते. त्याला बोललो कि साधारण जानेवारीच्या  च्या दुसर्या आठवडयात पैसे परत देईन म्हणून. काल गेलो होतो त्याच्याकडे पैसे परत करायला. त्याच्यातला अन माझा संवाद.

मी: तुझे पैसे परत देतोय.

मि: अरे धन्यवाद. काय सांगू तुला, मला पैशाची गरज होतीच. योग्य वेळेस पैसे दिलेस.

मी: अरे, इतकं काय त्यात. मैत्रीत इतकं तर चालतं यार.

मि: तू म्हणाला होतास जानेवारीत पैसे देशील म्हणून. फोन करणारच होतो मी तुला, मला एका महत्वाच्या कामासाठी लागत होते.

मी: अरे, काय सांगू तुला धंद्यात इतकी मंदी आहे सध्या. पैसेच मिळत नाहीत रे. परत मागच्या महिन्यात युरोप टूर ला गेलो होतो बायको पोरांना घेऊन.

मि: ओहो, तसंही मला genuinely पैसे लागत होते रे. अगदी गरज असल्याशिवाय फोन करेल का मी तुला.

मी: ठीक आहे रे. दिले ना आता. खुश. लोकं वर्ष भर पैसे देत नाहीत. दोन महिने उशिरा का होईना दिले ना. ऐश कर. चल. निघतो.

मी रुबाबात परत निघालो. मि उपकाराच्या ओझ्याखाली झुकत निरोप देता झाला.

मी, मीत्राचा अन मि म्हणजे मी असं कुणी समजलं असेल तर माझं व्याकरण कच्चं आहे असं समजावं.




Friday, 6 March 2015

तैवान डायरी

मुंबईहून तैपै साठी निघालो. अमेरिकन जेफ अन क्रेग ही होते. मी आपलं चेक इन काऊंटरला सांगायचा प्रयत्न केला की आम्ही तिघं बरोबर आहोत. तर हे दोघेही वेगवेगळ्या काऊंटरवर गेलेही चेक ईन ला. ४७, ६१ आणि ६७ रो. माझा होता ६७ नं. बाजूला गुजराती मुलगा. "सर, वो दोस्त है ७० नंबर पे. विंडो सीट है. एक्सचेंज करेंगे" आज सीट स्वँपिंग. तरी मी खिजवलंच जरा "दोस्त, रातको ११ बजे फ्लाईट निकलेगा, सुबहं ७ बजे हॉंगकॉंग. तो रातमे ऐसा क्या करनेवालों हो आप" की लागलीच "क्या सर, ऐसाभी क्या, प्लीज़ सर" मी दिली सीट एक्सचेंज करून, तर इकडे बाजूला............. चला या वेळेस सस्पेन्समधेच ठेवतो.  उगाच एकमेकांच्या मांडीला मांडी न लावणारे अमेरिकन अन बिनकामाचे गळ्यात पडणारे आपण.
*********************************************************************************
चीनची मागील वर्षाची GDP Growth 7.4% झाली. १९९० पासूनचा हा निच्चांक आहे. म्हणजे गेले ३० वर्षे चीन ८% पेक्षा जास्त ग्रोथ अचिव्ह करत होतं. महिन्यापूर्वी एका लेखात मी लिहीलं होतं की हे दोन चार वर्षे दिवे पाजळून काही होणार नाही, तर वर्षानुवर्षे केलं तर दारिद्र्यरेषेच्या वर समाजाचा मोठा भाग येईल. त्याला पुष्टी मिळाली.
********************************************************************************
तैपै १०१ या एकेकाळच्या जगातल्या सर्वात उंच इमारतीच्या ८५ व्या मजल्यावर एका अलिशान रेस्टॉरंट मधे पार्टी झाली. चायनीज कस्टमर्सला उंची दारू पाजणे आणि उत्तमोत्तम पदार्थ खाऊ घालणे, असा द्विकलमी कार्यक्रम होता.

साधारण सहा महिन्यापूर्वी एका लेखात २००५ साली चायनीज बिझीनेसमन बरोबर शांघायमधे रात्रीची जेवणं केली होती अन मला हे बिझीनेसमन बावळट अन आढ्यतेखोर वाटले असा मी उल्लेख केला होता. दहा वर्षानंतर ही मला जाणवलं की त्यात काहीच फरक पडला नाही आहे. ते तसेच वाटले, मुर्ख.

(फ़ार्मा इंडस्ट्रीच्या संबंधित दोघांना माझं बोलणं आवडलं नव्हतं. आधीच सॉरी)
********************************************************************************
एका डिनरमधे मेन्यु ऑर्डर करताना जेफ तैवानीज होस्टला म्हणाला "Rajesh does not eat beef and pork. Orde........." मी त्याला मधेच थांबवलं. म्हंटलं "भाऊ, तु कर ऑर्डर. आज खाणार. तब्येतीला रेड मीट चांगलं नाही म्हणून जास्त खाणार नाही, पण आज थोडं का होईना खाणार.

महाराष्ट्र सरकारच्या गोहत्याबंदी चा निषेध असा केला.

दोन्ही खाल्लं. बीफ अन पोर्क.

(पण तैवानमधे शेतीला उपयुक्त प्राणी म्हणून आदरापोटी बीफ न खाणारा सेक्ट आहे बरं का!)
*********************************************************************************
Exhibition मधे आमच्या बूथवर दोघी जण होत्या होस्टेस म्हणून. ऑफीसमधेच काम करतात. गुडघ्यावरती दोन इंच स्कर्ट. सजलेल्या नटलेल्या. पण ढुंकून म्हणून बघत नव्हतं त्यांच्याकडे. म्हणजे लोकं बोलायचे, पण कामापुरतं फक्त. लाळघोटेपणा नाही. दोघी हॉटेलवर राहतात. लहान आहेत वयाने. आणि हॉटेलपण ठीक ठाकच असावं. दोघं पोरं पण आहेत. आज जेवलो की त्यांच्याबरोबर. नजरेत वखवख नाही. भंकस नाही.

जेवण करून आलो बाहेर. अन ५-६ सरदारजी अन तैवानीज मुली. आपली मंडळी चाळीशीची अन त्या पोरी विशीतल्या. आपली लोकं म्हणताहेत "please, one photo. And come close. No problem" मग एकाची दुसर्याला टाळी.

शक्यतो परदेशात भारतीय दिसला की मी थोडं का होईना मान वळवून बघतोच. आज मात्र प्रयत्नपूर्वक टाळलं. अन पीटरशी बोलताना मान जरा झुकलेलीच होती माझी.

निर्भयाची डॉक्युमेंटरी, हं............
******************************************************************************
Howard Plaza म्हणून हॉटेल आहे तैपैचं. कमोडचं सीटकव्हर चं टेम्परेचर adjust करता येतं. सकाळी पार्श्वभागाखाला थंड लागू नये म्हणून.

इतकी पण लक्झरी असू नये. अंगावर येते.

असो. उद्याला भेटू परत.

तोपर्यंत निवांत

Wednesday, 4 March 2015

निवांत

फेसबुकवर काय लिहायला पाहिजे, कसं लिहायला पाहिजे, कुणाबद्दल लिहायला पाहिजे याबाबतीत बरीच लोकं बरीच मतं व्यक्त करतात. मी काही त्यावर मत व्यक्त करायला पाहिजे असं काही नाही आहे, पण काल एका मित्राने समजावून सांगितलं तेव्हा विचार केला. तसा विचार आधीही केला होता, हात सळसळले ही होते. पण शांतीला धरलं. अगदी नुकतेच आबा पाटील गेले तेव्हा श्रद्धांजली कशी द्यावी यावर उहापोह झाला. अगदी द्यावी की नाही असंही झालं. मग पानसरे गेले. तेव्हाही एका सेन्सिबल मित्रवर्याने "अशा काळात विनोदी पोस्ट टाकणर्यांची लाज वाटते. अनफ्रेंड करून टाकीन वैगेरे" आता अवकाळी पाऊस झाला तेव्हा हे मित्र रिसॉर्ट वर मजा करत आहेत, मग तेव्हा कुणी असं म्हंटलं तर चालेल का "शेतकर्याचं नुकसान झालंय, अन तुम्ही पार्टीचे फोटो लावताय खुशाल" तर नाही म्हणू शकत.

आता कुणी फक्त शुभेच्छा देतं तर कुणी उपहासाचा राग आळवतं. काहीजण फक्त राजकीय पोस्ट. पण ही ज्यांची त्यांची आवड. तुमच्या पोटात दुखायचं काही कारण नाही. वाटलंच कॉमेंटमधे प्रतिवाद करा. पण हे "का लिहीतोस" असं नाही म्हणू शकत.

मला म्हणायचं असं की हा प्लँटफॉर्म दिला आहे, चावडी. तिथं होऊन बोंबा मारायच्या, कुजबूज करायची, धुसफुस करायची, रडायचं हे ज्या त्या माणसावर अवलंबून आहे. आता ते तुम्हाला आवडलं, नाही आवडलं त्याला काही घेणं देणं नाही. आभासी जगात मित्र झालो आहोत. काही अपवाद वगळता एक व्यक्ती म्हणून समोरच्याची थोडी माहिती असते, बाकी आनंद असतो. आता तुम्ही नाराज असाल तेव्हा समोरच्याला आनंद नाही झाला पाहिजे हा अट्टाहास काही कामाचा नाही. बरं त्याउपरही तुम्ही अनफ्रेंड करू शकता, अनफॉलोचा ऑप्शन आहे. करा की ते. अन शांतपणे करा. काही जगाला बोंबलून सांगायची गरज नाही. थोडक्यात फेसबुक म्यानर्स किंवा रूल असे काही नाहीत. क्लोज़ ग्रूपला असतील ते असतील. बाकी तुम्ही शिवि देऊ शकता, ओवी म्हणू शकता, गाणं गाऊ शकता, रडगाणं गाऊ शकता. काहीही. लोकांना आवडलं तर त्यांनी ठेवावं, नाहीतर उडवावं. शिव्या घालाव्या. पण "तु हे का लिहीलं" हा विचारायचा अधिकार मला नाही.

यावेळेस मित्राने नाव वैगेरे टाकून लिहीलं. आता माझ्या मित्राने लिहीलं "तु (मी) फक्त स्वत:च्याच पोस्टवर कॉमेंट करतो. आत्ममग्न आहे" तर माझ्या आताच्या धकाधकीच्या लाइफ़स्टाइल मधे मी विचार लिहायचे, ते विचार दळभद्री का असेना, पण त्यावर येतात कॉमेंट. त्यांना उत्तर द्यायचं. कुठे सहमती तर कधी कापाकापी. इतकंच जमतं. एक दिवसाआड पोस्टचा रतीब टाकून, सगळा उद्योग करून परत दुसर्यांच्या पोस्ट वाचायच्या. त्यावर कॉमेंटही करायच्या. अन मग घरी पोटापाण्यासाठी न्यायचे काय, मातीची ढेकळं. मी काय लिहीतो, हा माझा प्रश्न आहे, तुम्ही काय लिहीता हा तुमचा. पण मी काय, कसं, कुणाबद्दल लिहीतो हा तुमचा प्रश्न होऊ नाही शकत. आणि तुम्ही काय लिहावं याचं मला काही घेणं देणं असण्याचं काही कारण नाही. बरं त्यात आपण आतल्या गाठीचे, त्यामुळे ज्या विषयाची माहिती नाही त्याच्या वाटेलाही जात नाही मी. शेती, साहित्य समीक्षा, इतिहास, ism यावर फुकाचा आव आणून मिशीवर ताव मारून कॉमेंटा ठोकायची इच्छाही नाही आणि अक्कल ही नाही. आधी च काय कमी मनस्ताप असतात की ओढवून घेऊ.  मी काय लिहीतो, काय शेयर करतो त्याचं उत्तरदायित्व माझं. तिथं काही राडा झाला तर स्वत:ला डिफ़ेंड करण्याची ताकद ठेवतो.

आता कुणी कविता टाकतं, काय बोंबाबोंब होते हो. अहो ठीक आहे, नका वाचू ना!  स्क्रोल करा. Fraction of second लागतो. आज वाचलं "फोटोला कोण हॉट कसं म्हणू शकतं" अहो उडवून टाका ना मग. कुणी म्हणतं, प्रोफ़ाईल फोटोच का सारखा बोलतात कुणी, पदार्थाचे फोटो का टाकतात. का टाकतात म्हणजे? लिहीलं आहे का कुठे नाही टाकायचे म्हणून. ह्या फेसबुकच्या भिंती असतील तर मार्कच्या तातश्रीच्या आहेत बाकी कुणाच्या नाहीत.

आता अधूनमधून व्हिक्टोरिया, लिंडा, कँटरीना वैगेरेचे, कुणी पाठ उघड़ी दाखवतं तर कुणी अजून काही उघडं करून दाखवतं अन येतात मेसेज, "hi dear, how are you?" आता दोन मुलांचा बाप मी, मग होते कधी प्रोफ़ाईल बघायची इच्छा. तर mutual friend मधे इथे ह भ प म्हणून वावरणारे, पोरीच्या मित्रयादीत. मग काय करायचं? काही नाही करायचं , गालातल्या गालात हसायचं अन शांत बसायचं.

मधे एक जण म्हणाली "मला इथे survive व्हायचं, मग चांगलं तर लिहावं लागेल" मी म्हणालो "ए ताई, तुझं कर्तृत्व सिद्ध करायची ही काही जागा नाही. हे आपलं कर्तव्य ही नाही अन भूषणही नाही"

हसीमजाक थोडी ठीक आहे, मजेत सांगितलं तर अजून चांगलं आहे. पण जिवाच्या आकांतानं या फेसबुक
अन बाकी सोशल मिडीयात कसे दिवे लावावे हे सांगण्यात काही मतलब नाही देवा!

असो.

बाकी निवांत 

Tuesday, 3 March 2015

SFL

मागल्या आठवड्यात चेन्नईला चाललो होतो. हो, तीच पहाटे ५:५० ची फ़्लाइट. बसलो, मी aisle मधे, विंडोला एक जण आणि मधली सीट रिकामी. एक सरदारजी आले. बसतानाच म्हणाले "Good morning friends" खिडकीधारकाकडे त्यांनी बघितलं, तो कसंबसं हसला आणि मोबाईल मधे कुडमुड करू लागला. माझ्याकडे बघितलं, मी तोंडभरून म्हणालो "Good morning Sir" मला म्हणाले "how are you doing this morning young man" आता ४६ वर्षाच्या इसमाला एक साठीचा माणूस young man म्हणतो, मला आनंदाचं भरतं आलं. मी म्हणाला "good and thanks" (बास, आता याचा पुढचा क़िस्सा पुर्ण मराठीत लिहीतो. तरच त्याचं गांभीर्य राहीन. इंग्रजीत जे बोललो ते लिहीलं तर एका गंभीर लेखाचं विनोदी लेखात रूपांतर होईल). तर म्हणाले "गालातल्या गालात का हसतो आहेस" मी म्हणालो "अहो, कितीतरी महिन्यांनी कुणीतरी सहप्रवाशाला इतकं सुंदर ग्रीट केलं आहे. आनंद वाटतोय"

अंगावर कंपनीचा युनिफॉर्मचा शर्ट होताच. "कुठली कंपनी ही सेटको" गुजरातमधे एक सेटको नावाचीच कंपनी आहे, क्लच बनवतात. फ़ेमस आहे. (गुजरात मधे आहे, फ़ेमस तर असणारच). मी म्हणालो "नाही, ती वेगळी. आम्ही मशीन टूल स्पिंडल मधे आहोत" स्पिंडल बोलल्यावर खुललाच गडी. सगळंच माहिती होतं त्यांना. कोणत्या मशीनचे स्पिंडल रिपेअर करता, ग्राईंडींग कसं करता, डिस्क स्प्रिंग कुठुन घेता. मी पण प्रेमाने सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत होतो. मधेच त्यांनी विचारलं "सिंग फोर्जिंगला कधी गेला होतास का?" 

सिंग फोर्जिंग लिमिटेड, ९० च्या दशकात उदयाला आलेली. ७५० कोटी टर्नओव्हर झालेली एक अग्रगण्य कंपनी. जितक्या वेगाने वर गेलेली अन त्याच्या दुप्पट वेगाने लयाला गेलेली सिंग फोर्जिंग लि SFL. खुप कथा ऐकल्या, बँकेला बुडवलं, कँनडाला पळून गेले सिंग साहेब वैगेरे. 

मी म्हणालो "गेलो होतो, पण तेव्हा SFL चा डाऊनटर्न चालू झाला होता. तरी बिझीनेस साठी खुप प्रयत्न केला होता" SFL ने खुप सेकंड हँड मशीन्स आणल्या होत्या. काम खूप होतं त्यांच्याकडे, पण मला काही शेवटपर्यंत काम मिळालं नाही. बरंच झालं म्हणा, कंपनी २-३ वर्षात गुंडाळली गेली. मला म्हणाले "कुणाला भेटायचास तु" मी बोललो "आता लक्षात नाही........." "You must have met Mr Bhargav" मी म्हणालो "Could be. But I made mistake. I should have met one of Mr Singhs" दोन चार भाऊ होते ते. तर सरदारजी म्हणाले "This is destiny. Finally you are meeting Mr Singh in Chennai bound flight" 

मी अवाक. I was meeting one of Singhs. माझा कानावर, डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. आणि मग SFL चा उत्कर्ष कसा झाला ते सांगितलं. कसे ते स्वत: ब्रेकफ़ास्ट बजाजच्या चेयरमेन बरोबर तर डिनर महिंद्राच्या MD बरोबर करायचे ते सांगितलं. त्या दिवसांचं वर्णन करताना त्यांच्या चेहर्यावर आनंद नुसता ओसंडून वाहत होतो आणि मी पण त्या चित्तरकथेत गुंगुन गेलो होतो. 

कॉफ़ी घेतली. पहिला सीप मारताना मी म्हणालो "Sir, I have a question for you." बारा गावाचं काय, बारा देशाचं पाणी पिलेला तो stalwart. मला म्हणाला "you want to know, what went wrong with SFL" मी त्यांचा हात हातात घेतला "if it hurts, please do not tell" तर म्हणाले "नाही, मला सांगू दे. त्यानेच माझ्या मनावरचं ओझं उतरेल" आणि मग पुढचे एक तास सिंग साहेब बोलत होते अन मी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो. खूप ऑर्डर्स, एक्सपान्शन प्रोग्राम, बँक प्रपोजल्स, Business rivalry, फ़ंडस् disbursement थांबणं, over trading झालेलं, सप्लायर्सचे पैसे थकले, बँक अकाउंट npa, भावांची कचखाऊ वृत्ती, वडिलांनी ऐनवेळी काढलेला पाठिंबा........ आणि मग सगळं ठप्प. कधी भरल्या गळ्याने, कधी पाणावल्या डोळ्याने सिंग साहेब त्यांची कथा, छे व्यथा, सांगत होते अन मी ही त्या हेलकाव्याबरोबर हिंदकळत होतो. नंतर मग मिडल इस्टमधे जॉब, रेड कॉर्नर नोटीस, कफल्लक असताना पैसे दाबून बसले आहेत असे टोमणे, स्वत:चं आडनावही लावत नाहीत ते. उफ़्फ़. चित्रपटच जणू. 

सिंग साहेब म्हणाले "मी आयुष्यात प्रचंड यश पाहिलं अन पराकोटीचं अपयश ही. आता मी लोकांना सांगतो, तुझं कुठे चुकतंय ते. लोकं म्हणतात जे स्वत: अपयशी होतात ते कन्सलटन्सी करतात. असेलही ते खरं. माझ्या मनात मात्र हेच येतं की ज्या चुका मी केल्या त्या इतरांनी करू नये" 

सिंग साहेबांना भेटून दहा दिवस झालेत. दिवसाआड मेलवरती ब्लॉग पाठवतात ते. आजही पाठवला. म्हंटलं तो मराठीत पोस्ट करण्याआधी त्यांची तर ओळख करून द्यावी, म्हणून हा प्रपंच. 

(सिंग साहेबांचं आडनाव बदललं आहे. पण माणूस अस्सल. कंपनीत येणार म्हणून त्यांनी सांगितलं आहे.) 


अबोला

"राजेश दादाला मी फारच घाबरते" इति मामे बहिण स्वप्ना

"काय असेल ते असेल, तुला आम्ही दोघंही भाऊ खुप टरकून असतो" अमोल आणि आशिष माझे मावस भाऊ

"कैसा है ना वो तेरा मंडलिक. बहुत गुस्सेवाला लगता है" ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला, अशी वैभवीची मैत्रिण. अन कॉलेजमधे असताना  तिचं अस्मादिकाबद्दल मत.

"तुला माहित नाही, कंपनीत सगळे तुला टरकून असतात" माझा बिझीनेस पार्टनर

फेसबुकवर मिश्कील, सरळमार्गी माणूस वैगेरे अशी लोकांची माझ्याबद्दल गैर समजूत झाली आहे असं वाटतं. प्रत्यक्षात मात्र माझ्याबद्दल अशी मतं आहेत. फेसबुकला मुखवट्यांचं जग म्हणतात, ते बहुधा यासाठीच.

माझे वाद होतात का? तर होतात. कंपनीतले सहयोगी, कस्टमर, सप्लायर संगळ्यांशी वाद होतात. अगदी खडाजंगी. पण बहुतेकवेळा वाद झाल्यावर लोकांचं बोलणंच बंद झालं का, तर नाही. सुदैवाने जिथे जिथे माझं कडाक्याचं भांडण झालं तिथेही माझा अबोला वैगेरे कधी झाला नाही. किंबहुना, जिथे म्हणून माझी चुकी वाटली तिथे मी कान धरून उभा राहिलो. लोकांनी पण मला माफ केलं. पण जिथे मी बरोबर आहे, तिथे मी भांडलो, जीव तोडून भांडलो अन सांगितलं की "तु चुकीचं वागत आहेस" त्या प्रोसेस मधे मात्र कटुता नाही आली आणि तुम्हाला म्हणून सांगतो, भांडण झालं म्हणून मी कुणाशी बोलत नाही असं आजतागायत झालं नाही आहे.

कस्टमर धंद्यातला महत्वाचा घटक. माझी सगळ्यात जास्त भांडणं यांच्याशीच झाली आहेत. जे कस्टमर सप्लायरला येडे समजतात त्यांना तर मी धुतला आहे, अर्थात शाब्दिक. खुप क़िस्से आहेत.

हे सगळं आठवलं, मधे एका पोस्टवर कॉमेंटमधे अबोला हा विषय आला. मला खरंच कळत नाही बोललं नाही तर प्रश्न सुटतात का? मला नाही वाटत सुटतात म्हणून. उलट बिघडतात. When you run away from problem, you are actually going away from solution. बरं समजा एखाद्या मुद्द्यांवर पटत नसेल तर तो मुद्दा सोडून सौहार्दाचे संबंध होऊ नाही शकत का? माझ्या आजीवरून एका मामाचे अन आईचे भांडण झाले. आता आमची आजी जाऊन ७-८ वर्षं झाली, तिचा दुसरा जन्मही झाला असेल अन हे दोघं धड बोलत नाहीत. मित्रांमधे होतं असं, भावंडात होतं. पण सगळ्यात मला दु:ख वाटतं ते आई अन मुलात/मुलीत भांडणं लागतात तेव्हा. तुरळक अपवाद वगळता आई वडिलांनी पोरासाठी ख़स्ताच खाल्ल्या असतात. पण जेव्हा ही लोकं दहावा पण जेवायला येत नाही तेव्हा मनस्वी दु:ख होतं अन राग पण येतो.

माझी पण लोकांनी भरपूर ठासली आहे. कुणी पैसे बुडवले आहेत, कुणी करियरमधे काड्या घातल्या आहेत, कुणी च्युत्या बनवलं आहे पण तरीही अहमदाबादला गेलो की त्याला फोन करतो, बंगलोरला गेलो की भेटतो, पुण्यात भेटलं की पार्टी करतो.

बाकी नातेवाईक मंडळी तर वर लिहीलेल्या प्रतिमेमुळे वाट्यालाच जात नाही माझ्या. कुणी गेलंच तर फाट्यावर मारतो पण बोलणं सोडत नाही.

सॉरी, म्हणजे कुणाचे genuine मुद्दे असतीलही, नाही म्हणत नाही मी. पण एकदा विचार करून बघा हे न बोलणं त्या नात्याला न्याय देत आहे का? आणि परत जुळलंच तर बोलवा मला चहाला...............बाकी कुणाला दुसरं काही पाजायचं असेल तर ना नाही माझी. 

Sunday, 1 March 2015

चला मग

(सदर लेखात आत्मस्तुतीचा मोठा डोस आहे. रिचवून घ्या)

"काय सांगायचं राव माणसं च टिकत नाही"

"चांगली माणसं मिळतच नाही राव"

साधारणत: माझ्या साईजच्या कंपनीच्या मालकांना भेटलो की  अशी वाक्य हमखास कानावर पडतात. खोटं नाही सांगत, मला हा प्रॉब्लेम कधी जाणवलाच नाही. नाही म्हणजे माणसं सोडूनच जात नाही, असंही नाही. पण दर्जेदार मिळतात ही लागलीच.

मधे गानू सरांनी लिहीलं होतं की कॉंन्ट्रँक्ट लेबर वैगेरे बद्दल लिहा म्हणून. खरं सांगू का मला हंगामी कामगार हा फंडाच झेपत नाही. तुम्ही त्याला हंगामी समजता मग तो तुम्हाला हंगामीच समजतो. काय आहे, आपल्याकडे सुवर्ण मध्य काढण्याची पद्धतच नाही आहे. म्हणजे बघा सुरूवातीला मालक लोकांनी कामगारांवर अत्याचार केले असणार. मग कामगार संघटना आल्या. त्यांनी मग अतिरेक केला. बंद, संप, मनमानी. ती चळवळ दडपताना हे हंगामी कामगारांचं प्रकरण निघालं. आता त्या प्रकाराने खुपच बेकार स्वरूप धारण केलं आहे.

माझ्या कंपनीपुरतं बोलायचं झालं तर माझा याबाबतचा प्रवास लिहीतो. कंपनीत फक्त ३० लोकं आहेत.

- माझ्या कंपनीत एकही कंत्राटी कामगार नाही. सगळे कायमस्वरूपी कामगार.
- साधारणपणे २० हेडकाउंट झाला की PF आणि ESI चं कंपनीवर उत्तरदायित्व येतं. माझ्या कंपनीत आम्ही या सोशल सिक्युरिटी ५ जण असल्यापासून लागू केल्या.
- दर २२ दिवसामागे १ पीएल, ८ CL, ८ SL वर्षाला देतो. PL साठल्या तर leave encashment ची सुविधा आहे.
- गेले ५ वर्षापासून gratuity scheme लागू केली आहे.
- कंपनीत subsidized कँटीन आहे.
- वर्षाला युनिफॉर्मचे दोन जोड देतो आणि एक शूजचा.
- बर्याच कामगारांना कंपनीतर्फे कार ड्रायव्हिंगचा क्लास लावला. कस्टमर कॉल अटेंड करायला कार ने पाठवतो.
- गेली १२ वर्षे इमानऐतबारे लोकांना increment देतो. न चुकता.
- सगळ्यात मुख्य म्हणजे लोकांशी बोलताना कामावरून discrimition करत नाही. भेदभाव नाही.

(अजूनही खूप मुद्दे आहेत, पण फारच लाल करतो असं होईल. जेवढी केली तितकी पुरे)

मित्रांनो, मला सांगायचं हे की तुम्ही बिझिनेस करता तेव्हा या गोष्टी लक्षात ठेवाव्या असं मला वाटतं. याला फार पैसे पडतात का? तर नाही. परवा पश्चिम महाराष्ट्रातल्या एका कंपनीत गेलो. ऑटो कॉंम्पोनन्ट कंपनी. १०००-१२०० कोटी टर्नओव्हर. पण लोकांना नुसतं राबवायचं. कामाच्या वेळा नाही. कँटीन नाही. काही सुविधा म्हणून नाही. बरं मालकाकडे पैसे नाहीत, असं आहे का, तर नाही. मालकाने कुटुंबात ७-८ मर्क, ३ जग्वार अशी गाड्यांची लूट. पुण्यात एक सातारा रोडला वेंडर आहे. त्याची जागा करोडो रूपयांची आहे. स्वत: गडगंज. पण साधी मुतारी नाही हो धड कामगारांसाठी. एक टॉयलेट बांधायला किती खर्च येतो, ₹ ५००००. तितके पण तुमच्या खिंशातून पडत नाही आणि गाड्या मात्र उडवायच्या. असं कसं चालेल. आपण लोकं असं वागतो मग लोकं भांडवलशाही चूक म्हणून बोंब मारतात. त्यात काही चूक नाही हो. अहो, नफ़ा कमवाच पण आपल्या कर्मचार्यांना त्याचा फायदा पोहोचवा. त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवा. काय सोडेल मग तो कंपनी. Be a capitalist by brain and socialist at heart.

अजून एक मुद्दा सांगतो. कमीत कमी नातेवाईक घ्या. लोकं घेताना रीतसर पेपर मधे ad देऊन लोकं घ्या. एकदा कंपनीचं reputation बनलं की लोकं स्वत:हून चालत येतात. आणि हो, कामगारांने कंपनी सोडली तर त्याचे dues पूर्ण द्या.

कदाचित कुणी असं म्हणेलही, लहान कंपनी चालवतो, म्हणून शहाणपणा शिकवतोय, १०० लोकं झाले की समजेल साल्याला. असेलही असं कदाचित, पण १०० होतील तेव्हा काही दुसर्या आयडियांचा वापर केला असेल लोकं टिकवण्यासाठी. कसं आहे लोकं आहेत तर आपण आहे.

"लोकांचे भले करण्याच्या नावाखाली त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्याची पद्धती म्हणजे भांडवलशाही" ही व्याख्या वाचताना मनस्वी दु:ख होतं. तर चला, ही व्याख्याच बदलू यात.