Sunday 1 March 2015

चला मग

(सदर लेखात आत्मस्तुतीचा मोठा डोस आहे. रिचवून घ्या)

"काय सांगायचं राव माणसं च टिकत नाही"

"चांगली माणसं मिळतच नाही राव"

साधारणत: माझ्या साईजच्या कंपनीच्या मालकांना भेटलो की  अशी वाक्य हमखास कानावर पडतात. खोटं नाही सांगत, मला हा प्रॉब्लेम कधी जाणवलाच नाही. नाही म्हणजे माणसं सोडूनच जात नाही, असंही नाही. पण दर्जेदार मिळतात ही लागलीच.

मधे गानू सरांनी लिहीलं होतं की कॉंन्ट्रँक्ट लेबर वैगेरे बद्दल लिहा म्हणून. खरं सांगू का मला हंगामी कामगार हा फंडाच झेपत नाही. तुम्ही त्याला हंगामी समजता मग तो तुम्हाला हंगामीच समजतो. काय आहे, आपल्याकडे सुवर्ण मध्य काढण्याची पद्धतच नाही आहे. म्हणजे बघा सुरूवातीला मालक लोकांनी कामगारांवर अत्याचार केले असणार. मग कामगार संघटना आल्या. त्यांनी मग अतिरेक केला. बंद, संप, मनमानी. ती चळवळ दडपताना हे हंगामी कामगारांचं प्रकरण निघालं. आता त्या प्रकाराने खुपच बेकार स्वरूप धारण केलं आहे.

माझ्या कंपनीपुरतं बोलायचं झालं तर माझा याबाबतचा प्रवास लिहीतो. कंपनीत फक्त ३० लोकं आहेत.

- माझ्या कंपनीत एकही कंत्राटी कामगार नाही. सगळे कायमस्वरूपी कामगार.
- साधारणपणे २० हेडकाउंट झाला की PF आणि ESI चं कंपनीवर उत्तरदायित्व येतं. माझ्या कंपनीत आम्ही या सोशल सिक्युरिटी ५ जण असल्यापासून लागू केल्या.
- दर २२ दिवसामागे १ पीएल, ८ CL, ८ SL वर्षाला देतो. PL साठल्या तर leave encashment ची सुविधा आहे.
- गेले ५ वर्षापासून gratuity scheme लागू केली आहे.
- कंपनीत subsidized कँटीन आहे.
- वर्षाला युनिफॉर्मचे दोन जोड देतो आणि एक शूजचा.
- बर्याच कामगारांना कंपनीतर्फे कार ड्रायव्हिंगचा क्लास लावला. कस्टमर कॉल अटेंड करायला कार ने पाठवतो.
- गेली १२ वर्षे इमानऐतबारे लोकांना increment देतो. न चुकता.
- सगळ्यात मुख्य म्हणजे लोकांशी बोलताना कामावरून discrimition करत नाही. भेदभाव नाही.

(अजूनही खूप मुद्दे आहेत, पण फारच लाल करतो असं होईल. जेवढी केली तितकी पुरे)

मित्रांनो, मला सांगायचं हे की तुम्ही बिझिनेस करता तेव्हा या गोष्टी लक्षात ठेवाव्या असं मला वाटतं. याला फार पैसे पडतात का? तर नाही. परवा पश्चिम महाराष्ट्रातल्या एका कंपनीत गेलो. ऑटो कॉंम्पोनन्ट कंपनी. १०००-१२०० कोटी टर्नओव्हर. पण लोकांना नुसतं राबवायचं. कामाच्या वेळा नाही. कँटीन नाही. काही सुविधा म्हणून नाही. बरं मालकाकडे पैसे नाहीत, असं आहे का, तर नाही. मालकाने कुटुंबात ७-८ मर्क, ३ जग्वार अशी गाड्यांची लूट. पुण्यात एक सातारा रोडला वेंडर आहे. त्याची जागा करोडो रूपयांची आहे. स्वत: गडगंज. पण साधी मुतारी नाही हो धड कामगारांसाठी. एक टॉयलेट बांधायला किती खर्च येतो, ₹ ५००००. तितके पण तुमच्या खिंशातून पडत नाही आणि गाड्या मात्र उडवायच्या. असं कसं चालेल. आपण लोकं असं वागतो मग लोकं भांडवलशाही चूक म्हणून बोंब मारतात. त्यात काही चूक नाही हो. अहो, नफ़ा कमवाच पण आपल्या कर्मचार्यांना त्याचा फायदा पोहोचवा. त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवा. काय सोडेल मग तो कंपनी. Be a capitalist by brain and socialist at heart.

अजून एक मुद्दा सांगतो. कमीत कमी नातेवाईक घ्या. लोकं घेताना रीतसर पेपर मधे ad देऊन लोकं घ्या. एकदा कंपनीचं reputation बनलं की लोकं स्वत:हून चालत येतात. आणि हो, कामगारांने कंपनी सोडली तर त्याचे dues पूर्ण द्या.

कदाचित कुणी असं म्हणेलही, लहान कंपनी चालवतो, म्हणून शहाणपणा शिकवतोय, १०० लोकं झाले की समजेल साल्याला. असेलही असं कदाचित, पण १०० होतील तेव्हा काही दुसर्या आयडियांचा वापर केला असेल लोकं टिकवण्यासाठी. कसं आहे लोकं आहेत तर आपण आहे.

"लोकांचे भले करण्याच्या नावाखाली त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्याची पद्धती म्हणजे भांडवलशाही" ही व्याख्या वाचताना मनस्वी दु:ख होतं. तर चला, ही व्याख्याच बदलू यात.

No comments:

Post a Comment