Tuesday, 3 March 2015

अबोला

"राजेश दादाला मी फारच घाबरते" इति मामे बहिण स्वप्ना

"काय असेल ते असेल, तुला आम्ही दोघंही भाऊ खुप टरकून असतो" अमोल आणि आशिष माझे मावस भाऊ

"कैसा है ना वो तेरा मंडलिक. बहुत गुस्सेवाला लगता है" ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला, अशी वैभवीची मैत्रिण. अन कॉलेजमधे असताना  तिचं अस्मादिकाबद्दल मत.

"तुला माहित नाही, कंपनीत सगळे तुला टरकून असतात" माझा बिझीनेस पार्टनर

फेसबुकवर मिश्कील, सरळमार्गी माणूस वैगेरे अशी लोकांची माझ्याबद्दल गैर समजूत झाली आहे असं वाटतं. प्रत्यक्षात मात्र माझ्याबद्दल अशी मतं आहेत. फेसबुकला मुखवट्यांचं जग म्हणतात, ते बहुधा यासाठीच.

माझे वाद होतात का? तर होतात. कंपनीतले सहयोगी, कस्टमर, सप्लायर संगळ्यांशी वाद होतात. अगदी खडाजंगी. पण बहुतेकवेळा वाद झाल्यावर लोकांचं बोलणंच बंद झालं का, तर नाही. सुदैवाने जिथे जिथे माझं कडाक्याचं भांडण झालं तिथेही माझा अबोला वैगेरे कधी झाला नाही. किंबहुना, जिथे म्हणून माझी चुकी वाटली तिथे मी कान धरून उभा राहिलो. लोकांनी पण मला माफ केलं. पण जिथे मी बरोबर आहे, तिथे मी भांडलो, जीव तोडून भांडलो अन सांगितलं की "तु चुकीचं वागत आहेस" त्या प्रोसेस मधे मात्र कटुता नाही आली आणि तुम्हाला म्हणून सांगतो, भांडण झालं म्हणून मी कुणाशी बोलत नाही असं आजतागायत झालं नाही आहे.

कस्टमर धंद्यातला महत्वाचा घटक. माझी सगळ्यात जास्त भांडणं यांच्याशीच झाली आहेत. जे कस्टमर सप्लायरला येडे समजतात त्यांना तर मी धुतला आहे, अर्थात शाब्दिक. खुप क़िस्से आहेत.

हे सगळं आठवलं, मधे एका पोस्टवर कॉमेंटमधे अबोला हा विषय आला. मला खरंच कळत नाही बोललं नाही तर प्रश्न सुटतात का? मला नाही वाटत सुटतात म्हणून. उलट बिघडतात. When you run away from problem, you are actually going away from solution. बरं समजा एखाद्या मुद्द्यांवर पटत नसेल तर तो मुद्दा सोडून सौहार्दाचे संबंध होऊ नाही शकत का? माझ्या आजीवरून एका मामाचे अन आईचे भांडण झाले. आता आमची आजी जाऊन ७-८ वर्षं झाली, तिचा दुसरा जन्मही झाला असेल अन हे दोघं धड बोलत नाहीत. मित्रांमधे होतं असं, भावंडात होतं. पण सगळ्यात मला दु:ख वाटतं ते आई अन मुलात/मुलीत भांडणं लागतात तेव्हा. तुरळक अपवाद वगळता आई वडिलांनी पोरासाठी ख़स्ताच खाल्ल्या असतात. पण जेव्हा ही लोकं दहावा पण जेवायला येत नाही तेव्हा मनस्वी दु:ख होतं अन राग पण येतो.

माझी पण लोकांनी भरपूर ठासली आहे. कुणी पैसे बुडवले आहेत, कुणी करियरमधे काड्या घातल्या आहेत, कुणी च्युत्या बनवलं आहे पण तरीही अहमदाबादला गेलो की त्याला फोन करतो, बंगलोरला गेलो की भेटतो, पुण्यात भेटलं की पार्टी करतो.

बाकी नातेवाईक मंडळी तर वर लिहीलेल्या प्रतिमेमुळे वाट्यालाच जात नाही माझ्या. कुणी गेलंच तर फाट्यावर मारतो पण बोलणं सोडत नाही.

सॉरी, म्हणजे कुणाचे genuine मुद्दे असतीलही, नाही म्हणत नाही मी. पण एकदा विचार करून बघा हे न बोलणं त्या नात्याला न्याय देत आहे का? आणि परत जुळलंच तर बोलवा मला चहाला...............बाकी कुणाला दुसरं काही पाजायचं असेल तर ना नाही माझी. 

No comments:

Post a Comment