Tuesday 3 March 2015

SFL

मागल्या आठवड्यात चेन्नईला चाललो होतो. हो, तीच पहाटे ५:५० ची फ़्लाइट. बसलो, मी aisle मधे, विंडोला एक जण आणि मधली सीट रिकामी. एक सरदारजी आले. बसतानाच म्हणाले "Good morning friends" खिडकीधारकाकडे त्यांनी बघितलं, तो कसंबसं हसला आणि मोबाईल मधे कुडमुड करू लागला. माझ्याकडे बघितलं, मी तोंडभरून म्हणालो "Good morning Sir" मला म्हणाले "how are you doing this morning young man" आता ४६ वर्षाच्या इसमाला एक साठीचा माणूस young man म्हणतो, मला आनंदाचं भरतं आलं. मी म्हणाला "good and thanks" (बास, आता याचा पुढचा क़िस्सा पुर्ण मराठीत लिहीतो. तरच त्याचं गांभीर्य राहीन. इंग्रजीत जे बोललो ते लिहीलं तर एका गंभीर लेखाचं विनोदी लेखात रूपांतर होईल). तर म्हणाले "गालातल्या गालात का हसतो आहेस" मी म्हणालो "अहो, कितीतरी महिन्यांनी कुणीतरी सहप्रवाशाला इतकं सुंदर ग्रीट केलं आहे. आनंद वाटतोय"

अंगावर कंपनीचा युनिफॉर्मचा शर्ट होताच. "कुठली कंपनी ही सेटको" गुजरातमधे एक सेटको नावाचीच कंपनी आहे, क्लच बनवतात. फ़ेमस आहे. (गुजरात मधे आहे, फ़ेमस तर असणारच). मी म्हणालो "नाही, ती वेगळी. आम्ही मशीन टूल स्पिंडल मधे आहोत" स्पिंडल बोलल्यावर खुललाच गडी. सगळंच माहिती होतं त्यांना. कोणत्या मशीनचे स्पिंडल रिपेअर करता, ग्राईंडींग कसं करता, डिस्क स्प्रिंग कुठुन घेता. मी पण प्रेमाने सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत होतो. मधेच त्यांनी विचारलं "सिंग फोर्जिंगला कधी गेला होतास का?" 

सिंग फोर्जिंग लिमिटेड, ९० च्या दशकात उदयाला आलेली. ७५० कोटी टर्नओव्हर झालेली एक अग्रगण्य कंपनी. जितक्या वेगाने वर गेलेली अन त्याच्या दुप्पट वेगाने लयाला गेलेली सिंग फोर्जिंग लि SFL. खुप कथा ऐकल्या, बँकेला बुडवलं, कँनडाला पळून गेले सिंग साहेब वैगेरे. 

मी म्हणालो "गेलो होतो, पण तेव्हा SFL चा डाऊनटर्न चालू झाला होता. तरी बिझीनेस साठी खुप प्रयत्न केला होता" SFL ने खुप सेकंड हँड मशीन्स आणल्या होत्या. काम खूप होतं त्यांच्याकडे, पण मला काही शेवटपर्यंत काम मिळालं नाही. बरंच झालं म्हणा, कंपनी २-३ वर्षात गुंडाळली गेली. मला म्हणाले "कुणाला भेटायचास तु" मी बोललो "आता लक्षात नाही........." "You must have met Mr Bhargav" मी म्हणालो "Could be. But I made mistake. I should have met one of Mr Singhs" दोन चार भाऊ होते ते. तर सरदारजी म्हणाले "This is destiny. Finally you are meeting Mr Singh in Chennai bound flight" 

मी अवाक. I was meeting one of Singhs. माझा कानावर, डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. आणि मग SFL चा उत्कर्ष कसा झाला ते सांगितलं. कसे ते स्वत: ब्रेकफ़ास्ट बजाजच्या चेयरमेन बरोबर तर डिनर महिंद्राच्या MD बरोबर करायचे ते सांगितलं. त्या दिवसांचं वर्णन करताना त्यांच्या चेहर्यावर आनंद नुसता ओसंडून वाहत होतो आणि मी पण त्या चित्तरकथेत गुंगुन गेलो होतो. 

कॉफ़ी घेतली. पहिला सीप मारताना मी म्हणालो "Sir, I have a question for you." बारा गावाचं काय, बारा देशाचं पाणी पिलेला तो stalwart. मला म्हणाला "you want to know, what went wrong with SFL" मी त्यांचा हात हातात घेतला "if it hurts, please do not tell" तर म्हणाले "नाही, मला सांगू दे. त्यानेच माझ्या मनावरचं ओझं उतरेल" आणि मग पुढचे एक तास सिंग साहेब बोलत होते अन मी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो. खूप ऑर्डर्स, एक्सपान्शन प्रोग्राम, बँक प्रपोजल्स, Business rivalry, फ़ंडस् disbursement थांबणं, over trading झालेलं, सप्लायर्सचे पैसे थकले, बँक अकाउंट npa, भावांची कचखाऊ वृत्ती, वडिलांनी ऐनवेळी काढलेला पाठिंबा........ आणि मग सगळं ठप्प. कधी भरल्या गळ्याने, कधी पाणावल्या डोळ्याने सिंग साहेब त्यांची कथा, छे व्यथा, सांगत होते अन मी ही त्या हेलकाव्याबरोबर हिंदकळत होतो. नंतर मग मिडल इस्टमधे जॉब, रेड कॉर्नर नोटीस, कफल्लक असताना पैसे दाबून बसले आहेत असे टोमणे, स्वत:चं आडनावही लावत नाहीत ते. उफ़्फ़. चित्रपटच जणू. 

सिंग साहेब म्हणाले "मी आयुष्यात प्रचंड यश पाहिलं अन पराकोटीचं अपयश ही. आता मी लोकांना सांगतो, तुझं कुठे चुकतंय ते. लोकं म्हणतात जे स्वत: अपयशी होतात ते कन्सलटन्सी करतात. असेलही ते खरं. माझ्या मनात मात्र हेच येतं की ज्या चुका मी केल्या त्या इतरांनी करू नये" 

सिंग साहेबांना भेटून दहा दिवस झालेत. दिवसाआड मेलवरती ब्लॉग पाठवतात ते. आजही पाठवला. म्हंटलं तो मराठीत पोस्ट करण्याआधी त्यांची तर ओळख करून द्यावी, म्हणून हा प्रपंच. 

(सिंग साहेबांचं आडनाव बदललं आहे. पण माणूस अस्सल. कंपनीत येणार म्हणून त्यांनी सांगितलं आहे.) 


No comments:

Post a Comment