Wednesday, 4 March 2015

निवांत

फेसबुकवर काय लिहायला पाहिजे, कसं लिहायला पाहिजे, कुणाबद्दल लिहायला पाहिजे याबाबतीत बरीच लोकं बरीच मतं व्यक्त करतात. मी काही त्यावर मत व्यक्त करायला पाहिजे असं काही नाही आहे, पण काल एका मित्राने समजावून सांगितलं तेव्हा विचार केला. तसा विचार आधीही केला होता, हात सळसळले ही होते. पण शांतीला धरलं. अगदी नुकतेच आबा पाटील गेले तेव्हा श्रद्धांजली कशी द्यावी यावर उहापोह झाला. अगदी द्यावी की नाही असंही झालं. मग पानसरे गेले. तेव्हाही एका सेन्सिबल मित्रवर्याने "अशा काळात विनोदी पोस्ट टाकणर्यांची लाज वाटते. अनफ्रेंड करून टाकीन वैगेरे" आता अवकाळी पाऊस झाला तेव्हा हे मित्र रिसॉर्ट वर मजा करत आहेत, मग तेव्हा कुणी असं म्हंटलं तर चालेल का "शेतकर्याचं नुकसान झालंय, अन तुम्ही पार्टीचे फोटो लावताय खुशाल" तर नाही म्हणू शकत.

आता कुणी फक्त शुभेच्छा देतं तर कुणी उपहासाचा राग आळवतं. काहीजण फक्त राजकीय पोस्ट. पण ही ज्यांची त्यांची आवड. तुमच्या पोटात दुखायचं काही कारण नाही. वाटलंच कॉमेंटमधे प्रतिवाद करा. पण हे "का लिहीतोस" असं नाही म्हणू शकत.

मला म्हणायचं असं की हा प्लँटफॉर्म दिला आहे, चावडी. तिथं होऊन बोंबा मारायच्या, कुजबूज करायची, धुसफुस करायची, रडायचं हे ज्या त्या माणसावर अवलंबून आहे. आता ते तुम्हाला आवडलं, नाही आवडलं त्याला काही घेणं देणं नाही. आभासी जगात मित्र झालो आहोत. काही अपवाद वगळता एक व्यक्ती म्हणून समोरच्याची थोडी माहिती असते, बाकी आनंद असतो. आता तुम्ही नाराज असाल तेव्हा समोरच्याला आनंद नाही झाला पाहिजे हा अट्टाहास काही कामाचा नाही. बरं त्याउपरही तुम्ही अनफ्रेंड करू शकता, अनफॉलोचा ऑप्शन आहे. करा की ते. अन शांतपणे करा. काही जगाला बोंबलून सांगायची गरज नाही. थोडक्यात फेसबुक म्यानर्स किंवा रूल असे काही नाहीत. क्लोज़ ग्रूपला असतील ते असतील. बाकी तुम्ही शिवि देऊ शकता, ओवी म्हणू शकता, गाणं गाऊ शकता, रडगाणं गाऊ शकता. काहीही. लोकांना आवडलं तर त्यांनी ठेवावं, नाहीतर उडवावं. शिव्या घालाव्या. पण "तु हे का लिहीलं" हा विचारायचा अधिकार मला नाही.

यावेळेस मित्राने नाव वैगेरे टाकून लिहीलं. आता माझ्या मित्राने लिहीलं "तु (मी) फक्त स्वत:च्याच पोस्टवर कॉमेंट करतो. आत्ममग्न आहे" तर माझ्या आताच्या धकाधकीच्या लाइफ़स्टाइल मधे मी विचार लिहायचे, ते विचार दळभद्री का असेना, पण त्यावर येतात कॉमेंट. त्यांना उत्तर द्यायचं. कुठे सहमती तर कधी कापाकापी. इतकंच जमतं. एक दिवसाआड पोस्टचा रतीब टाकून, सगळा उद्योग करून परत दुसर्यांच्या पोस्ट वाचायच्या. त्यावर कॉमेंटही करायच्या. अन मग घरी पोटापाण्यासाठी न्यायचे काय, मातीची ढेकळं. मी काय लिहीतो, हा माझा प्रश्न आहे, तुम्ही काय लिहीता हा तुमचा. पण मी काय, कसं, कुणाबद्दल लिहीतो हा तुमचा प्रश्न होऊ नाही शकत. आणि तुम्ही काय लिहावं याचं मला काही घेणं देणं असण्याचं काही कारण नाही. बरं त्यात आपण आतल्या गाठीचे, त्यामुळे ज्या विषयाची माहिती नाही त्याच्या वाटेलाही जात नाही मी. शेती, साहित्य समीक्षा, इतिहास, ism यावर फुकाचा आव आणून मिशीवर ताव मारून कॉमेंटा ठोकायची इच्छाही नाही आणि अक्कल ही नाही. आधी च काय कमी मनस्ताप असतात की ओढवून घेऊ.  मी काय लिहीतो, काय शेयर करतो त्याचं उत्तरदायित्व माझं. तिथं काही राडा झाला तर स्वत:ला डिफ़ेंड करण्याची ताकद ठेवतो.

आता कुणी कविता टाकतं, काय बोंबाबोंब होते हो. अहो ठीक आहे, नका वाचू ना!  स्क्रोल करा. Fraction of second लागतो. आज वाचलं "फोटोला कोण हॉट कसं म्हणू शकतं" अहो उडवून टाका ना मग. कुणी म्हणतं, प्रोफ़ाईल फोटोच का सारखा बोलतात कुणी, पदार्थाचे फोटो का टाकतात. का टाकतात म्हणजे? लिहीलं आहे का कुठे नाही टाकायचे म्हणून. ह्या फेसबुकच्या भिंती असतील तर मार्कच्या तातश्रीच्या आहेत बाकी कुणाच्या नाहीत.

आता अधूनमधून व्हिक्टोरिया, लिंडा, कँटरीना वैगेरेचे, कुणी पाठ उघड़ी दाखवतं तर कुणी अजून काही उघडं करून दाखवतं अन येतात मेसेज, "hi dear, how are you?" आता दोन मुलांचा बाप मी, मग होते कधी प्रोफ़ाईल बघायची इच्छा. तर mutual friend मधे इथे ह भ प म्हणून वावरणारे, पोरीच्या मित्रयादीत. मग काय करायचं? काही नाही करायचं , गालातल्या गालात हसायचं अन शांत बसायचं.

मधे एक जण म्हणाली "मला इथे survive व्हायचं, मग चांगलं तर लिहावं लागेल" मी म्हणालो "ए ताई, तुझं कर्तृत्व सिद्ध करायची ही काही जागा नाही. हे आपलं कर्तव्य ही नाही अन भूषणही नाही"

हसीमजाक थोडी ठीक आहे, मजेत सांगितलं तर अजून चांगलं आहे. पण जिवाच्या आकांतानं या फेसबुक
अन बाकी सोशल मिडीयात कसे दिवे लावावे हे सांगण्यात काही मतलब नाही देवा!

असो.

बाकी निवांत 

No comments:

Post a Comment