Saturday, 28 March 2015

निश्चिंत

१ सप्टेंबर १९९४. हॉटेल हर्ष. शिवाजीनगर बंगलोर. SKF ची सुखाची नोकरी सोडून बंगलोर ला जॉईन व्हायला आलो होतो. स्टार्ट अप कंपनी. भविष्याची चिंता. कुंद संध्याकाळ. मी विचार केला, जरा चालत फिरावं. म्हणून निघालो. विचारांच्या गर्तेत  चिन्नास्वामी स्टेडीयम च्या बाजूने चालत होतो. संध्याकाळचे ७-७:१५ झाले असतील. रस्त्यावर अत्यंत तुरळक गर्दी.

अचानक आकाशात ढग भरून आले. आणि क्षणार्धात राप राप असा पाऊस चालू झाला. मला त्या पावसापासून लपायला कुठे आसरा दिसत नव्हता. डावीकडे बघतो तो मिलिटरी बराक. धावत धावत एका बराकी त जाऊन उभा राहिलो. पावसानं एव्हाना चांगलाच वेग पकडला होता.

मिलिटरी चे जवान माझ्याकडे पाहत होते. मी आपलं त्यांच्या कडे पाहत कसं नुसं हसत होतो. एक दोघं बोललेही "अंदर आईये" मी म्हणालो "यही ठीक हू"

पाऊस काय थांबायचं नाव घेत नव्हता. मी थांबून एव्हाना तास सव्वातास झाला होता. एक जवान आला आणि म्हणाला "आता मोठया साहेबांचा राउंड असेल. तू आत येउन बस. त्यांनी एकदा उभं राहायची परवानगी नाकारली तर आम्ही कुणी काही बोलू शकणार नाही." मी मुकाटपणे आत गेलो. एका जवानाने टॉवेल दिला, म्हणाला "डोकं पुसून घे."

एकेक जवान माझ्याशी येउन गप्पा मारू लागला. हि पलटण उत्तर प्रदेश ची होती बहुधा. सगळे हिंदी भाषिक. चेन्नई बाजूला पोस्टिंग होतं त्याचं. वेगवेगळ्या ठिकाणी. काही IPKF ला जाऊन आली होती. बर्याच दिवसांनी एकत्र आले होते हिंदीभाषिक. खुश होते. एक दोघांनी माझ्या कुटुंबाविषयी विचारलं. आपुलकीने चौकशी चालू केली. कुठे उतरला आहेस वैगेरे. मी सगळं सांगितलं. 

पाऊस काही थांबत नव्हता.

त्यांची जेवणाची वेळ झाली. मला म्हणाले "दोस्त, अभी यही खाना खाकर जाना." मी नाही म्हणालो. तर म्हणाले "स्टार हॉटेलमे  रह्नेवाला तू. ये खाना अच्छा नही लगेगा" माझा नाईलाज झाला. मन नाही मोडू शकलो.

त्यांनी त्यांचे ओल्ड monk चे टमलर काढले. मला पण एकाने ग्लासात भरून दिली, Old Monk. माझा एक दोन ग्लास संपेपर्यंत त्यांनी किती घेतले मला माहित नाही. पण एक दोघं खूप भावूक झाले. कुणी मला त्यांचा छोटा भाऊ म्हणू लागले. तर कुणाला माझ्याकडे बघून गावाकडच्या मित्राची आठवण येऊ लागली. एका जवानाने मला बायकोचा फोटो खिशात ठेवतो का म्हणून विचारले. खरं तर त्याला त्याच्या बायकोचा अन लहान पोरीचा फोटो मला दाखवायचा होता. त्याच्या पाणावलेल्या डोळ्यात मला त्याच्या बायको पोरीचं प्रतिबिंब दिसलं. बहुधा ते सगळेच जवान बरेच दिवसात फ्यामिली ला भेटले नसावेत.

एव्हाना जेवण आलं. कुणी कुणाला न सांगता माझ्यासाठी एक जवान ताट घेऊन आला होता. चपाती, भात अन मटन. मटणाची चव भन्नाट लागली. माझ्याशी बोलून भावूक झालेले गप गुमान डोकं खाली घालून जेवू लागले.

आता पाऊस ही थांबला होता. मी म्हणालो "निघतो आता" तर व्हरांड्यात एक जण सायकल घेऊन आला आणि म्हणाला "अभी इतनी रात चलते कहा जाते हो. ये सायकल लेकर जाईये. कल लौटा देना" मी म्हणालो "अरे नको, मी जाईल चालत" हो नाही करता करता, ते मला निरोप देता झाले. पाच सहा जणांनी मला मिठी मारली. चार तासाच्या वास्तव्यात असा माहोल झाला कि मी कातर कातर झालो. बहुधा ते पण झाले असावेत. इतक्या कमी वेळात अशी मैत्री आधी कधी झाली नाही आणि नंतर तर नाहीच नाही.

रात्री एकटा चालत परत हॉटेल वर आलो.

आकाशातील मळभ एव्हाना दूर झाले होते. तारे लुकलुकत होते.

मी आता भविष्याबद्दल निश्चिंत झालो होतो.

Thursday, 26 March 2015

दर्शन

मी अधूनमधून मॉर्नींग वॉकतो. मोठी चक्कर पडते. ६-७ किमीची. घर-साळुंखेविहार-रामटेकडी-एसआरपीएफ-घर. मधे SRPF च्या आवारात एक मंदिर लागतं. मी मॉर्नींग वॉकला पारोसे जात असल्यामुळे मंदिरात जात नाही. त्यामुळे आत कोणता देव राहतो माहित नाही. मंदिराच्या बाहेर शिवार आहे. तिथे बाकडी ठेवली आहेत. सिमेंटची. मी त्यावर बसतो. गर्दभावलोकन करतो.

परवा रविवारी एक गोष्ट घडली.  सकाळचे ६:३० झाले होते. मी मंदिराच्या आंगणात पोहोचलो. बाहेर बाकडंयावर बसलो. ५ मिनीटे. गर्दभाला अवलोकन करायला ५ मिनीटे पुरतात. मी उठलो अन निघालो.

तेव्हढ्यात मंदिरातून एक साधारण सत्तरीचा माणूस दुडूदुडू चालत आला. पांढरा शर्ट, पांढरं धोतर आणि डोक्यावर पांढरीच टोपी. सव्वापाच फूट उंची. कपाळावर गंध. चेहर्यावर प्रसन्न हास्य. आधी कधी पाहिलं नव्हतं त्यांना. का कुणास ठाव, माझ्यातल्या मीपणाची पुटं गळून पडली. तसंही सकाळी ६:३० वाजता अहंकाराचा ज्वर चढ़त नाही.

मला काय झालं माहित नाही, पण मी त्या माणसाच्या समोर गेलो. त्याचं प्रसन्न हास्य तसंच होतं. तुळशी वृंदावनाच्या शेजारी उभे आम्ही. मी झटकन त्याच्या पाया पडलो. मागे लिहीलं तसं "आपसूक घडतो तो नमस्कार, नाहीतर पाठीला व्यायाम"

तर ते सत्तरीचे गृहस्थही माझ्या पटकन पाया पडले.

मी चरकलो. इतका वयाने मोठा माणूस, पाया का पडला. तरी शब्द नाही फुटला, तोंडातून. पण त्या माणसाच्या डोळ्यात प्रेमभाव झळकत होता. तो दिसला.

मी आणि तो माणूस कमानीपर्यंत चालत होतो. तिथून त्याला डावीकडे जायचं होतं, मला उजवीकडे. आम्ही निघालो.

चार पावलं चालल्यावर मी थांबलो. वळलो. तर तो माणूस तो माणूस ही काही अंतरावर थांबला होता. अन आता माझ्याकडे बघत होता. जणू काही त्याला माहित होतं, मी वळून बघणार म्हणून.

सेकंदात आम्ही परत निघालो, आपापल्या रस्त्याने.

तेव्हापासून विचार करतोय, वळून बघितलं तेव्हा तो माणूस दोन्ही हात कमरेवर ठेवून का उभा होता?




Tuesday, 24 March 2015

सलाम

एखाद्यानं सांगावं आणि मी डोकं झुकवावं अशा काही मोजक्या व्यक्ती आहेत. न्हावी हा त्यापैकी एक. तो, पहिला रविवार कारंजा नासिकचा. दुसरा औरंगाबादचा असावा. पण त्या काळात माझं स्वत:कडे इतकं कमी लक्ष होतं की तो मला आठवत नाही. तिसरा अशोकनगरचा शामभाऊ आणि आताचे रिझवानभाई. लहानपणी नशिकला रविवार कारंज्यावर कोपर्यावर न्हाव्याचं दुकान होतं. बाबा तिथे आम्हाला सोडायचे. एकच सांगून जायचे "बारीक करा". हे बारीक करा सांगणं डोक्यात इतकं फिट बसलं आहे की आजही मी तीच विनंती करतो. हो, मग वस्तरा, कात्री वैगेरे भीषण हत्यारं हातात असणार्याला आपण फक्त विनंती करू शकतो, आज्ञा नाही. पण एक आहे, हत्यारांचा धाक असला तरी इतक्या प्रेमाने माझ्या गालावरून हात फिरवण्याचे मोहक काम अजून कुणी दुसर्या पुरूषानं केल्याचं मला तरी आठवत नाही. (पुरूष महत्वाचा शब्द आहे). शक्यतो, आपल्या नकळत, चुकून अंगावर पाणी पडलं तर आपण दचकतो. पण न्हावी पाण्याचा फवारा उडवणार हे माहित असतं, तरीही मी दरवेळेस दचकतो, invariably. कटिंग झाल्यावर तो न्हावी डोक्याच्या मागचा कट व्यवस्थित झाला हे दाखवण्यासाठी आरसा धरतो. त्या आरशात बघून मी आजतागायत काही सुधारणा सुचवली असेल असं मला तरी आठवत नाही.

सांप्रतकाळात दुनियेचा विसर पाडायला लावणारे, रिझवानभाई. छोटंसंच दुकान आहे घराजवळ. वय असेल ६५ च्या आसपास. थरथरत्या हाताने डोक्यावरून कंगवा आणि कात्री फिरवतात, ते बहारदार असतंच. पण कटिंग झाल्यावर ते नवरतन टाकून डोकं बडवतात ना, तेव्हा साली मेंदूवर चढलेली निराशेची पुटं पटापटा झडत जातात. रिझवानभाईंनी जो माझा मिलीटरी कट निवडला आहे त्याला तर तोड नाही. त्यामुळे खुप फ़ायदे होतात. ट्राफीक हवालदार, आर्मीचा माणूस म्हणून सोडून देतो, रेल्वेत एखादी सुंदरी, डिफेन्सच्या माणूस म्हणून आदराने बोलते. मुळात बथ्थड असलेल्या चेहर्याला जरा राकट रूप येतं. एकदा सदर्न कमांडच्या इथे चालत असताना तर एका मिलीटरीच्या जवानाने मला कडक salute मारला. मी पण निर्लज्जासरखा reciprocate केलं. च्यायला मी खरं कोण कळलं असतं तर पोकळ बांबूचे फटके टाकले असते. असो. पण डिप्लोमानंतर मला फार इच्छा होती, आर्मीत जावं म्हणून. SSB भोपाळला जाणार पण होतो. पण परीक्षेची गडबड झाली अन मी मग असा डमी आर्मीमन होण्यात आनंद मानत राहिलो.

नंतरची चकाचक दाढी. माझ्यासाठी त्यांनी जरा स्पेशल ब्लेड आणून ठेवलं आहे. आणि मग ते ओल्ड स्पाईस टाकत जेव्हा गालावर हात ठेवतात. अहाहा. सुख हो, निव्वळ सुख. आणि मग तो स्क्रब लावून केलेला फेसमसाज. साला, रंग गेला तर पैसे परत असा आमचा चेहरा. पण त्यालाही तरतरी आणण्याचं काम रिझवानभाई न कंटाळता गेले दशकभर करत आहेत.

मधे एकदा मी खुर्चीवर बसलो असतानाच दरदरून घाम फुटला. रिझवानभाई दुकानाबाहेर घेउन जात असतानाच धडपडलो. दुसर्या दिवशी अमेरिकेला जाणार होतो. कसंबसं सावरलं स्वत:ला. डॉक्टरने परवानगी दिली. रिझवानभाईंनी त्या आठवड्यात चार वेळा विचारलं "साब ठीक है क्या?". पण त्या घटनेपासून रिझवानभाईंचा हात माझ्या डोक्यावर पडताना आधीपेक्षा जास्त थरथरतो हे जाणवतं मला.

नीलच्या जावळापासून ते बाबा कँसर ने आजारी असताना घरी येऊन दाढ़ी करताना त्यांच्याशी गोड बोलत त्यांना फ़्रेश ठेवणारे रिझवानभाई. केसाने गळा कापणार्या लोकांच्या मांदियाळीत केस कापताना प्रेमाची पखरण करणारे रिझवानभाई.  एकदा डोकं त्यांच्या हातात गेल्यावर दीड दोन तास आयुष्यातल्या तमाम प्रश्नांना विसरायला लावणारे रिझवानभाई.

सलाम! रिझवानभाई समोर मी नतमस्तक होतो अन त्यांना वाटतं, मी म्हणतोय "चला, कटिंग चालू करा" ते बिचारे कात्रीचा कट कट आवाज चालू करतात.




Thursday, 19 March 2015

हे ही

बोनी एकदा बंगलोर हून मुंबई ला आला. आम्ही दादरला पूनम ला राहायचो. यावेळेस मात्र सकाळीच उठून नागपूरला जायचे होते. मग विचार केला तिथेच राहू एयरपोर्ट जवळ एखादया हॉटेल मध्ये. सन न शील नावाची हॉटेल ची पाटी घेऊन एक माणूस उभा होता. बस हि होती. तिथेच JB नगर ला हॉटेल होतं. चेक इन केलं. रात्रीचं जेवायला हॉटेल च्या restaurant मध्ये गेलो. तर डान्स बार तिथे. टाय घातलेले लोकं दारू पिउन उताणे पडलेले. समोर पोरी नाचताहेत. कुणाचं त्यांच्याकडे लक्ष होतं, काहींची शुद्ध हरपली होती, काही इशारे करत होते. गुमान रूम मध्ये आलो आणि तिथेच जेवण मागवलं. पहिल्यांदा प्रकार पहिला पण अनुभवायची डेरिंग नाही झाली.

एकदा गोदरेज मधून बाहेर पडलो. Cab ड्रायव्हर ला बोललो, भूक लागली आहे, कुठल्यातरी हॉटेल मध्ये घेऊन चल. तो निघाला, तर काही मिनिटातच एशियाड नावाचं हॉटेल दिसलं, घाटकोपर जवळ. बोनी म्हणाला, चल जाऊ यात. कॅब ड्रायव्हरने चमकून बघितलं आमच्याकडे. मी म्हणालो, उतरतो आम्ही.  आत गेलो तर अंधारच अंधार. काहीतरी वेगळं वाटत होतं खरं. टेबल वर जाऊन बसलो. अंधाराला डोळे सरावल्यावर बघितलं तर बधीरच झालो. सगळ्या पोरी, सर्व्ह करण्यासाठी. थोडक्यात लेडीज बार होता तो. एक जण आली "क्या लोगे साब" तर मी म्हणालो "आम्हाला फक्त जेवायचं आहे" तर म्हणाली "क्यू साब, बियर तो लिजिये. वो देखो वैसा पिलाउंगी" माझ्या तर घशाला कोरड पडली होती. माझ्या तोंडून शब्द पडले "जरा मेल वेटर रहेगा तो भेजो ना" तर आजूबाजूला उभ्या असलेल्या दोघींकडे उभ्या असलेल्या दोघींकडे बघून म्हणाली "ए, देख साब को आदमी चाहिये, सर्विस देने के लिये" तिघीजण खदखदल्या. माझ्याबरोबर बोनी होता, त्याला येडयाला काही कळत नव्हतं. मल्लू तो. मी बोललो "हे बघ निघतो आम्ही." तर खांद्यावर हात ठेवत म्हणाली "साब, तुम्हारे तरफ देख के लगता है, तुम कभी लेडीज बार  में गया नही दिखता. चलो ठीक है, ऑर्डर दो"

निघताना पैसे दिल्यावर म्हणाली "साब, इतना भी जंटलमनगिरी मत दिखाव. तकलीफ होगी लाईफ मे" माझं लेडिज बार बद्दलचं अज्ञान हा तिच्या लेखी दिखावाच होता.

एकदा आम्ही, म्हणजे संजय सर, बोनी आणि मी, ठाण्याला शुभम नावाच्या हॉटेल मध्ये पार्टी करत बसलो होतो. बरोबर  बोनी पण होता. बोलताना बोनी सहज म्हणाला "what is dance bar? I had never been there". मी संजय सरांना बोललो "सर, मी पण कधीच नाही पहिला डान्स बार. पुढच्या ट्रीप मध्ये घेऊन जाऊ याला डान्स बारला" ते म्हणाले "ओके". अकरा ला पार्टी संपली. ते म्हणाले "चेक नाक्याला सोडतो" फियाट होती त्यांची. निघालो अन चेक नाका गेला तरी गाडी काही थांबायला तयार नाही. मी म्हणालो "अहो सर, थांबा कि" तर म्हणाले "गधड्या, तू कधी या बोन्याला घेऊन येशील. आजच जाऊ यात" कार डायरेक्ट हुमा palace ला. मी तिथे सगळं पाहिलं, ते पैसे उडवणं, पुरुषांच्या बुभुक्षित नजरा, पोरींचे आव्हानात्मक हावभाव. मध्ये असाच बाहेर आलो, तर डान्स साठी वाट बघणाऱ्या पोरीही बघितल्या. निवांत गप्पा मारत होत्या एकमेकींशी. त्या मादक नजरांची जागा काही डोळ्यात करुणेने  घेतलेली दिसली. आत हॉल मध्ये असलेल्या वखवखलेल्या नजरेपासून लपणार्या या बारबालांची मला कीवच आली.

एकंदरीत तो प्रकार काही आवडला नाही. मी आयुष्यात पहिल्यांदाच डान्स बार ला गेलो अन तीच शेवटची वेळ होती.

आज परत गदारोळ चालू झाला. त्यावरून आठवलं, इतकंच.

आणि हो, मत द्यायचं तर नकोच तो प्रकार. 

Wednesday, 18 March 2015

संजय काटकर

"हं, काय आहे रे" संजय  सर आत येताना म्हणाले. संजय  काटकर ,  हायड्रो फोर्स इंजिनियरिंग या ठाण्यातल्या कंपनीचे डायरेक्टर. मी कोवळा २७ वर्षाचा. बुसाक+शामबान नावाचे हायड्रॉलिक सील विकायचो मी तेव्हा. मी सांगायला गेलो प्रॉडक्ट वैगेरे, तर म्हणाले "अरे, माहित आहे तुझी कंपनी. डिलीव्हरीचा पत्ता नाही, किंमती मनाला वाटेल लावता तुम्ही येडझव्यासारख्या" कॉलेजपर्यंत माझ्याही तोंडून कानाला गुदगुल्या करणारे शब्द नेहमीच पडायचे. एस के एफ मधे पण काही कमी नव्हती. पण नंतर दोन वर्ष हे मंत्रोच्चार कमीच होत होते. बर्याच दिसांनी हा शब्द ऐकल्यावर पहिले मेंदूला झिणझिण्या आल्या अन मनात या संजय काटकर या  गृहस्थाबद्दल ममत्व तयार झालं. मी म्हणालो "हे १०० चं सील तुम्हाला आत्ता हवं आहे. किंमत ५८२ रू. उद्या हे सील नाही मिळालं तर कंपनीत परत पाय ठेवणार नाही, अन मिळालं तर हायड्रो फोर्स च्या सिलेंडर मधे बुसाक+शामबान, standardize करायचे. बोला आहे कबूल" तर म्हणाले "डन"

संजय  सरांची अन माझी ही पहिली ओळख. सील आलं दुसर्यादिवशी अन कस्टमर-सप्लायर पेक्षा एका वेगळ्याच मित्रत्वाच्या नात्याची नांदी झाली. दोन उच्चशिक्षीत भावांपाठचा हा कमी शिकलेला भाऊ. पण मनाने एकदम दिलदार. मला ते शक्यतो "रामभाऊ" म्हणून हाक मारायचे. त्यांना ड्रिंक्सचं व्यसन होतं. मला ते इतक्यांदा जेवायला घेऊन गेले की त्याची काही गणतीच नाही. अन गंमत म्हणजे ते माझे कस्टमर असून ही, मला एकदाही, and I mean it, बिल देऊ दिलं नाही. मला जेवायला घेऊन गेले की invariably त्यांच्या घरी फोन करायचे "मी राजेशबरोबर आहे" अन ठेवल्याबरोबर मला म्हणायचे "बायकोला सांगितलं ना की मी राजेशबरोबर आहे, की तिला टेन्शन नसतं रे. तिला माहित होतं की मी सज्जन माणसाबरोबर आहे" बरं मिसेस काटकर यांना मी कधीच भेटलो नाही खरंतर.

एकदा मी दादरला एका मोठ्या कंपनीत टेक्निकल डिस्कशन्स साठी गेलो होतो. तिथे माझ्या लक्षात आलं की त्यांचे पॉवर पँक अन सिलींडरचे सप्लायर्स फ़ुल येडं बनवायचे. मी तिथल्या साहेबांना वस्तुस्थितीची कल्पना दिली. मला म्हणाले "सिलींग सिस्टम तुच ठरव अन सप्लायर्सही तुच सांग, सिलींडर अन पॉवर पँकचे" मी त्यांना तीन सप्लायर्स दिले. त्या पैकी हायड्रो फोर्स  अन पुण्यातल्या कंपनीने विचारले "तुझं काही कमिशन ठेवायचं का?" मी बोललो "ह्या कस्टमर्स चे जितके प्रोजेक्टस येतील त्यात आमच्या कंपनीचे सील वापरायचे. तेच माझं कमिशन" पहिलीच दणदणीत ऑर्डर मिळाल्यावर योगायोगाने आम्ही कोकणात किहीम बीचजवळ संजय सरांच्या घरी त्यांच्या आईच्या हातचं माशांचं कालवण जेवत होतो. संजय  साहेब म्हणाले "बघ ५% ठेवणं काही अवघड नाही, विचार कर" मी म्हणालो "तुमच्या आईच्या हातचं जेवण माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे, कमिशनपेक्षा" "रामभाऊ, जिंकलंस लेका" असं म्हणत जोरात पाठीत धपाटा घातला. (पुढं दहा वर्षात तीन कंपन्यांनी दादरच्या कंपनी बरोबर ५० कोटीचा बिझीनेस केला. मी कंपनी सोडल्यावरही बुसाक चे सील च वापरत राहिले, अजूनपर्यंत. अन पुण्यातल्या कंपनीच्या मालकाने मी बिझिनेस चालू केला तेव्हा खूप मदत केली)

आम्ही खूप फिरलो. एसार स्टील हझीरा, विंडसर छत्राल आणि अशा बर्याच ठिकाणी मी triangular working करायचो. म्हणजे माझेच कस्टमर मी तिकडे त्यांचे सप्लायर म्हणून recommend करायचो. त्याचा खूप फायदा झाला. माझे कस्टमर म्हणून तर ते घट्ट झालेच पण त्यापेक्षा ते माझे सॉलिड जवळचे मित्र झाले. खरं तर मी hydraulics चं स्पेलिंग हि विसरलो आहे. तरीही मी अजून  अशा बर्याच कस्टमर च्या संपर्कात आहे.  

मी नोकरी सोडून बिझिनेस चालू करायचं ठरवल्यावर त्यांनी मला बोलावलं. त्या दिवशी ठाण्यात वागळे मध्ये द्वारका काय ते हॉटेल आहे, तिथे राहिलो. त्यांनी खूप ड्रिंक्स घेतले. मला म्हणाले "साल्या, विसरू नकोस आम्हाला. आणि कधी पैशाची मदत वैगेरे लागली तर सांग." ते आणि मीच होतो. भरपूर गप्पा मारल्या. निघताना प्रेमभराने मिठी मारली.

पण हि दारू फार बेकार चीज आहे. एखाद्याचं लिव्हर खराब करताना, ती दारू, त्याचं हृदय किती मोठं आहे वैगेरे बघत नाही. पोखरतच ते. जे व्हायचं, तेच झालं. २००४ साली, संजय सर हे जग सोडून निघून गेले. मी औरंगाबाद ला होतो. नाही जाऊ शकलो, अंत्यविधीला. 

तीन चार वर्षा खाली एक फोन आला "काय रामभाऊ" आणि पाठोपाठ ते गडगडाटी हास्य, हा हा हा. सटपटलोच मी. "अरे, मी अजय बोलतोय, संजयचा मोठा भाऊ" आणि मग ते बोलत राहिले, ४-५ मिनिटे. काय बोलले, मला काहीच आठवत नाही कारण मी मनाने संजय सरां बरोबर किहीम बीच जवळच्या त्यांच्या गावात त्यांच्याच आईच्या हातचे सुरमई खात होतो.  

Monday, 16 March 2015

प्रश्न

खालील पोस्ट मी खाजगीरीत्या ५-६ जणांना पाठवली. पण कार्यबाहुल्यामुळे कुणी त्याला उत्तर नाही दिलं. फक्त एकाशी फोनवर बोललो. हा फोन फेसबुकच्या फोरम वर टाकतो आहे. हो, आणि कृष्णा उमरीकर म्हणतो तसं हे काही मधमाश्याच्या पोळ्यावर दगड मारायचा प्रयत्न नाही आहे. genuine प्रश्न आहे, genuine comment टाकाव्यात हि विनंती. 

बरेच दिवसापासून हे डोक्यात घर करून आहे. 

खरं तर सगळेच स्वातंत्र्य काळातील नेते हे तुमच्या माझ्यासारखे नॉर्मल लोकं होते. त्यांनी केलेल्या काही चुका अगदी अक्षम्य अशा होत्या. पण त्या चुका ज्यासाठी करत होते तो उद्देश, देशाला स्वातंत्र्य देण्याचा, हा इतका महान होता कि त्यासमोर या चुका झाकोळल्या गेल्या. किंबहुना त्यातल्या काही चुकांचं रीतसर ग्लोरिफिकेशन केलं गेलं. गांधी, सावरकर, आंबेडकर यांच्यावरून तर इथे नेहमीच वाद होतात. या तीन नेत्यांवरून, इथे म्हणजे महारष्ट्रात, जितके वाद होतात तितके दुसर्या कुठल्याही नेत्यावरून होत नसावेत. 

हिटलर चा जो Fascism, ज्याला नंतर Fascist असं संबोधलं जातं आणि साधारण हे विशेषण सावरकरवादी मंडळीना लावलं जातं. याच हिटलर चा पाठपुरावा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनीही केला होता. हिटलर बरोबर ते मुसोलिनी सारख्या हुकुमशहा ला भेटले होते. इतकंच नव्हे तर इंग्रजांना पळवून लावण्यासाठी त्यांनी त्या काळी अत्यंत भ्रष्ट आणि स्त्री लंपट असलेल्या जपान्यांची मदत घेतली होती. त्यांचे हे सगळे प्लान सपशेल फसले होते असं दिसून येतं. 

असं असताना, सावरकरांच्या एकंदरीत शैलीबद्दल जितकं वादळ उठतं, तितकं नेताजींच्या शैली बद्दल उठत नाही असं दिसतं. यामागची कारणं काय असावीत. सावरकरांचा गांधी हत्येतील कथित सहभाग, यामुळे त्यांची जनमानसातील प्रतिमा डागाळली हे तर नक्कीच. त्यांना न्यायालयाने सोडलं वैगेरे हि गोष्ट वेगळी. पण त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाला मोठा  डाग लागला हे त्यांचे समर्थक हि मान्य करतील. या व्यतिरिक्त काय?

दुसरं, महारष्ट्रात सावरकर यांच्यावरून  दोन गट आहेत आणि ते जातनिहाय आहे हे स्पष्ट दिसतं. अशा वेळेस प बंगाल मधेही नेताजींच्या विचार शैलीवरून जात निहाय दोन गट आहेत का? कि सरसकट बंगाल मध्ये नेताजींना मानतात. कि सरसकट विरोध आहे, जी शक्यता कमी आहे. 

असं असण्यामागे काय कारण असावे.? नेताजींनी ज्या चुका केल्या त्याचं glorification केलं गेलं का? नेताजींचा मृत्यू हा गूढ आहेच. कि आजकाल सावरकरवादी त्यांचा मृत्यू हा मानसिक क्लेशातून प्रायोपवेशन ने झाला असं म्हणतात तसाच नेताजींचा मृत्यू सुद्धा glorified आहे का?

आणि एक. नेताजी बद्दल सहानुभूती असण्यासाठी गांधीनी त्यांना दिलेली सापत्न वागणूक कारणीभूत आहे का?

प्रश्न

Sunday, 15 March 2015

UOB

आताची तैपै फ्लाईट रात्री १०:५५ ची होती. मी पेंगुळलेल्या डोळ्याने जाऊन बसलो. मिलियन डॉलर आर्म म्हणून भारी पिक्चर आहे. मेरठचे दोघं अमेरिकेच्या बेसबॉल गेमचे चँपियन बनतात, असा काहीतरी विषय. झोप होती तर म्हंटलं बघावा, म्हणून ads ला फ़ास्ट फ़ॉरवर्ड मारला. तरीही, एक गोंडस पोरगा अन साधारण गावातली गल्ली टिपली होती मी. झोपलो मग, पिक्चर अर्धवट. हॉंगकॉंग तैपै मधे आधीच्या सेक्टरचा झोपेचा बँकलॉग पूर्ण केला.

परत येताना पहिल्या सेक्टर मधे तैवान डायरी कीबोर्डवर बडवली. हॉंगकॉंगला बसलो, निवांत होतो. सहा तासाचा प्रवास. ते गोंडस पोरगं आठवलं ad मधलं. पिक्चर लावला, हॉलीडे. आधी ad.

"साधारण चाळीतल्या घराचा दरवाज़ा बंद करून एक बाबा त्याच्या पोराचं बोट धरून बाहेर पडतो. बाहेर निघताना वरांड्यावर माणूस बिड़ी ओढत बसला असतो. मग पूर्ण दर्शन होतं त्या बाप लेकाचं. बाबाचा साधाच पण परीटघडीचा हाफ स्लीव्हज शर्ट, व्यवस्थित खोचलेला त्या खाकी सदृश पँटमधे. कमरेला बेल्ट. भांग व्यवस्थित. ते, पोट्टं, बापाचीच झेरॉक्स. पँटच्या ऐवजी हाफ चड्डी फक्त. गल्लीतून चालत आहेत दोघं. हा मार्ग माझा एकला मधे राजाभाऊ परांजपे आणि सचिनची आठवण येते. खरं सांगू, चाळीस वर्षापूर्वीच्या भास्कर मंडलिक अन राजेश मंडलिकची ही आठवण हळूच मनाला स्पर्शून गेली.

रस्त्यावर बसलेले मासे विकणारे, भांड्याच्या कल्हई करणार्या लोकांवरून कँमेरा झरकन फिरून तो जत्रेत येतो. तोंडातून जाळ काढणार्या माणसाकडे ते पोरगं आश्चर्य मिश्रीत कुतुहलाने बघतं. अन मग समोर दिसतं भलं मोठं मेरी गो राऊंड. बापाला पोराच्या नजरेतच कळतं, त्याला बसायचं आहे. दोघं तिकीट देणार्या दाढीवाल्या म्हातार्याकडे जातात.

"How can I help you Sir"

"How much do you charge for a ride" बाप विचारतो

" A dollar per person. And if a kid is less than 5, then it is free  ride for kid"

बाप: "Here, 2 dollars. Two tickets please"

म्हातारा, पोराकडे बघत. "How old is kid"

बाप "6 years old"

म्हातारा आश्चर्याने "You could have told as 5. What difference does it make? I would  not have known it, anyway."

बाप "Ya! But my son would have known it"

हे बोलताना बापाच्या डोळ्यात वात्सल्य, अन त्या चिमुकल्याच्या डोळ्यात बापाबद्दल ओतप्रत अभिमान.

We live by principles..........असं म्हणत ती बँकेची ad संपते.

मी सावकाश डोळे मिटतो. माझ्या पाणावलेल्या डोळ्यात भास्कर मंडलिकांचा चेहरा तरळत राहतो.