Tuesday, 19 May 2015

विमानप्रवास

परवा एयर इंडियाच्या पोस्टवर कॉमेंटी पडल्या त्या एयरइंडियाच्या होस्टेस काकू असतात म्हणून. ही मानसिकता कधी आणि का तयार झाली हा एक प्रश्नच आहे. फायनली ती एयर होस्टेस आहे, तुमची तास, दोन तास किंवा प्रवासाच्या वेळेइतकी यजमानीण. तिने सुंदर अन तरूण असावं ही अपेक्षा का ठेवावी? तिने चटपटीत असावं, पटापट पाहिजे ते आणून द्यावं आणि थोडं पोलाईट असावं याच्यापलीकडे तिने अजून काही असावं हे चुकीचं वाटतं. शेवटी ती होस्टेस आहे, मॉडेल नाही.

दुसरं एक जाणवतं ते प्रवाशांची बिनडोकगिरी. एयरलाईन वाले सांगतात ना ७ किलोच्या वर हँड बँगेज नको म्हणून. तुम्ही च्यायला ट्रंकाच्या ट्रंका केबिनमधे आणता. कसं चालेल. त्या जागेत बँग बसवताना तर तुमची फाटतेच, बाकीच्यांनाही inconvenience होतो.

आज सकाळी चेन्नैहून बंगलेरला आलो. इनमिन ४० मिनीटाची फ्लाईट. म्हणजे होस्टेसची इतकी घाई असते की हॉट बेव्हर्जेस ते सर्व्ह करत नाहीत. त्या ४० मिनीटात चार अण्णा मुतायला उभे. बरं विमानतळावर आधी तासभर आले असतात. तिथे भरमसाट टॉयलेटस आहेत. उतरल्यावर असतात. पण नाही आम्हाला त्या ४० मिनीटातच धार मारायची असते.

विमानाचे भाडे कमी झाल्यामुळे तो प्रवास सामान्य माणसाच्या आवाक्यात आला आहे, त्याचा आनंदच आहे. पण ज्या देशामधे जहॉ सोच वही शौचालय सारखी जाहिरात करावी लागते तिथे हे विमानातले अत्याधुनिक टॉयलेटस आणि बाकीही कसं वापरायचं हे सांगायला नको. ते एयरलाईन वाले ज्या सुचना देतात त्यातली बेल्ट कशी लावायची ही एकमेव सुचना कामाची असते. बाकी सेफ्टी इंन्स्ट्रक्शन चा खरोखर अपघात झाला तर त्याचा झाट उपयोग नसतो. पण मग विमानात कसं वागल्याने प्रवास आनंदी होईल हे सांगायचं एयरलाईन्स काम नाही. वेबसाईटवर लिहा, पत्रक वाटा, टीव्ही वर अँड दया. पण जर तुम्ही सांगितलंच नाही तर आम्ही पहिल्यांदा प्रवास करणारे काय अंतर्ज्ञानी आहोत काय?

काही नाही हो, प्रवासात हे सगळं बघताना पाहतो अन प्रवाशांना अन कर्मचार्यांना जो मनस्ताप होतो तो बघून वाटतं की सांगावं. आता बोंबलायला तिथं कुणाला सांगणार, म्हणून इथं.

नागरिकशास्त्राचा अभ्यास परत करावा लागणार आहे.

Monday, 18 May 2015

चिंतन

बर्याचदा मी रामटेकडी ला सकाळी फिरायला जातो. म्हणजे बर्याचदा जातही नाही. तिथे चालताना महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासाचा नेहमीप्रमाणे अर्धवट अभ्यास करावा काय याच्यावर आज काल चिंतन करतो. जिथे गाडी पार्क करतो त्याच्या समोरच्या बाजूला एक चहाची टपरी आहे. म्हणजे स्थावर नाही तर एका टेम्पो ची टपरी बनवतो. एक तर महापालिकेच्या हद्दीत आहे, पण लांब. अधिकृत परवाना असण्याचं काही कारण नाही. तशी फार गर्दीही नसते त्याच्याकडे. अर्थात मी सकाळी ६ ला जात असल्यामुळेही असेल कदाचित, पण तुरळक गिऱ्हाईक. आम्ही सगळे चालायला येणारे गाड्या रामटेकडीला टेकून, म्हणजे चहाच्या टपरीच्या विरुद्ध बाजूला गाडी लावतो. 
परवा (आम्ही मराठवाड्यातले लोकं खर्या परवापासून ते साधारण एक वर्ष या काळाला परवा असे संबोधतो.) मी चालून परत आलो तेव्हा साधारण सीन असा होता. एका तिशीतल्या तरुणीने तिची भलीमोठी कार टपरीच्या बाजूला लावली होती. तरुणी आपण for a  change भलीमोठी होती असं समजू यात. ती बहुधा पहिल्यांदा च आली होती. बहुधा नाही,नक्कीच. कारण चालताना मी खाली बघण्याचा अभिनय करत असलो तरी माझं लक्ष असतं चालणाऱ्या लोकांकडे. त्या तरुणीला माहितच नव्हतं की तिथे चहाची टपरी असते म्हणून. पण तिथे नो पार्किंगचा बोर्ड ही नव्हता. त्यामुळे गाडी लावण्यात काही चूक नव्हती. 
पण त्या अनधिकृत चहाच्या टपरी मालकाला त्याचा खूप राग आला. साहजिकच आहे म्हणा. पुण्याची प्रथाच नाही का ती. लक्ष्मी रोड ला लोखंडी पाट्या टाकतात च की दुकानासमोरची जागा अडवायला. तिथे पण स्कूटर लावलेली चालत नाही दुकान मालकाला. इथे तर अख्खी कार च लावली होती.  त्याचा चहाचा टेम्पो त्याच्या जागेवर जाण्या इतकी जागा कन्यकेने ठेवली होती. आता त्याने तो टपरीवजा टेम्पो अशा पद्धतीने लावला होता की ड्रायव्हर साईड चा दरवाजा उघडायला तसूभर ही जागा नव्हती. मी पोहोचलो तेव्हा ती पोरगी त्या टपरीधिपती ला काकुळतीने सांगत होती की "मला माहित नव्हतं, इथे तुमचा टेम्पो लागतो म्हणून. मी चुकून गाडी लावली. पण माझ्या पाठीत खूप दुखतं, त्यामुळे मी बाजूच्या सीट वरून कसरत करत ड्रायव्हर सीट पर्यंत नाही जाऊ शकत. तर तुम्ही प्लीज दोन मिनिटासाठी टेम्पो काढा, मी कार काढते. तुम्ही परत टेम्पो तुमच्या जागेवर लावा." लॉजिकल नाही का! बरं हे ती अजीजीने सांगत होती. 
तर तो टपरीचा बादशहा तिला सांगत होता "तुम्हाला काय करायचं ते करा, टेम्पो काय इथून हलणार नाही." आणि आवाजाचा तोच बाज, ज्याची आता आपल्याला सवय झाली आहे. ती तरुणी पार रडकुंडीला आली होती. 
अशा ठिकाणी भोचक पणा करायची सवय आहेच. मी विचारल्यावर परत त्या विशिष्ट टोन मध्ये बाईचं कसं चुकलं ते सांगण्यात आलं. मी त्या तरुणीला विचारलं "तुम्हाला खरंच ही गाडी दुसऱ्या बाजूने जावून काढता नाही येणार का?"ती नाही म्हणाल्यावर मी बोललो किल्ली द्या कारची"तर ती म्हणाली अहो, पण काका त्यांना टेम्पो काढायला काय प्रॉब्लेम आहे? काका म्हणून सुद्धा मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवत तिला बोललो "तुम्हाला घरी लवकर जायचं असेल तर किल्ली दया" तिने अविश्वासाने बघत किल्ली दिली तेव्हा मी तिला सांगितलं "टेन्शन नका घेऊ. समोर माझी कार उभी आहे. अन ही त्याची किल्ली" तर ओशाळत नको म्हणाली. (etios च्या बदल्यात Camray काही वाईट सौदा नव्हता खरं तर). कार काढून दिली. आभार प्रदर्शनाचा सोपस्कार पार पडला. आणि आम्ही आपापल्या वाटेने निघून गेलो. 
आता मला पडलेले प्रश्न:
- टपरीच्या राजाचं बरोबर की चूक? असा आडमुठे पणा काय कामाचा? बरं असं पण नव्हतं की चार गिऱ्हाईक थांबलेत त्याचा चहा पिण्यासाठी, काका हलवाई ला लोका लाईनीत थांबतात तसे. (आता किती वर्षं चितळेचं उदाहरण देणार). म्हणजे ती कार निघेपर्यंत, तो टेम्पो लावायला थांबू शकत होता. 
- याच ठिकाणी तरुणीच्या जागी एखादा गडी असला असता अन त्याचं अन टपरीधिपतीचं भांडण झालं असतं तर मी कुणाची बाजू घेतली असती? कारण कायद्याने ती टपरी अनधिकृत आहे, तिथे नो पार्किंग चा बोर्ड नाही आहे. म्हणजे गाडी लावणं चूक नाही आहे. 
- मी अशी मदत करणे बरोबर आहे का? इथे प्रश्नाचं मूळ उत्तर न शोधता सोपं उत्तर देऊन बोळवण केली नाही का?
बाकी तरुणी होती म्हणूनच तू मदत केली वैगेरे अशा दुय्यम वादात आपण पडायला नको. 
महाराष्ट्राच्या इतिहासशास्त्रावर अर्धवट अभ्यास करण्याऐवजी वर्तमान काळातील नागरिकशास्त्रावर चिंतन, चालताना करायचे ठरवले आहे.   

Thursday, 14 May 2015

मंथन.

मी राजेश मंडलिक, वय ४६, व्यवसायाने इंजिनियर.

व्यवसायात येणाऱ्या ताण तणावापासून दूर पाळण्यासाठी पहिल्यांदा ब्लॉग चा अन नंतर फेसबुकचा सहारा घेतला. माझं लिहिणं ही माझी गरज आहे. लोकांना ते आवडलं तर ह्याचा अर्थ ते कुठं तरी मनाला भावत असेल. पण म्हणून मी लोकांसाठी लिहितो असं जर कुणाला वाटत असेल तर हे धादांत खोटं आहे. माझ्या मनातल्या भावभावनांचा निचरा व्हावा म्हणून लिहितो.

कुणी मला लेखक वैगेरे म्हंटल की माझ्यातल्या इंजिनियरला धक्का पोहोचतो. कारण अभियंता ही प्रतिमा मला जास्त जवळची आहे. हे ब्लॉग लिहिणं, आय पॅड वर फेसबुकवर कॉमेंट टाकणं, स्मार्ट फोन चं इंटरनेट चं बिल भरणं, झालंच तर घरचा किराणा, कपडे लत्ते, गाडीचं डिझेल हे सगळं मला मी अभियंता असल्यामुळे शक्य होतं. लेखक मंडळी हे सगळं करू नाही शकत असं मी म्हणत नाही. त्यांच्या लेखनातून हे सगळं जमवत ही असतील ते. पण म्हणून त्यांनाच  लेखक म्हणणं जास्त योग्य ठरतं.  मला नाही. मी अ….भि…यं……ता.

एखादया लेखकाला कपडे शिवायची आवड असेल अन कादंबरी लिहिताना त्याने दोन चार टाके मारले तर त्याला तुम्ही शिंपी म्हणाल का?

आज ही माझं मन कंपनीतल्याच घटनांनी उचंबळतं किंवा खट्टू होतं. एखादी चांगली ऑर्डर मिळाली की नाच, कुठे फेल्युअर झालं की बस चिडचिड करत. 

मी कुठल्याही कमाई साठी लिहिलेलं आंतरजालावर टाकत नाही. त्यामुळे ते कुणीही चोरलं तर मला काही फरक पडत नाही. त्यातून त्याला मानधन मिळत असेल तर कदाचित मला थोडा राग येईन. पण मी सुद्धा कमाई साठी लिहिलं अन कुणी ते चोरून जर पैसे कमवायचा प्रयत्न केला तर मात्र मी त्याला योग्य तो न्याय देईन. शाब्दिक, कोर्ट कचेरी…… अगदी काहीही. अन्यथा मी जे लिहितो ते कुणीही, कुठेही टाकू शकतं. स्वत:च्या भिंतीवर (ती पण बोंबलायला खरं तर तुमची नाही), WA वर किंवा कचरा पेटीत.  कुठेही. लिहिल्याचं श्रेय लिहिणाऱ्याला देणं हा सदसदविवेक बुद्धीचा भाग आहे. तो ज्याचा त्याचा प्रश्न. माझी स्वत:ची विवेक बुद्धी जागृत आहे हे मी ठामपणे सांगू शकतो. मार्क झुकेरबर्ग ला मार्केंडेय शब्द मीराताई नी वापरला, हे सांगून टाकतो. "लोकांच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या असतीलही कदाचित, दु:ख मात्र एक समान असतात" हे शरद चं वाक्य हे मी invariably लिहितो. तसंही भासमान जगातल्या दांभिकपणाचं मनावर ओझं असताना उसन्या शब्दांचं अन वाक्याचं ओझं कशाला?

इथल्या लिखाणात अन वाचनात व्यवहार नाही म्हणून गोडी टिकून आहे असं माझं मत आहे.


बरेच जण म्हणतात पुस्तक लिही. माझं मत सांगतो. फेसबुक लिखाण हा एक फॉर्म आहे. त्याला कवितेला असतं तसं एक मीटर आहे. ते जमलं म्हणजे पुस्तक बिस्तक जमेल असं काही नाही. तो वेगळा प्रांत आहे. त्याला समर्पणाची भावना लागते. एकदा deliverables मागे लागले की पळता भुई थोडी होते.      

तसाही माझ्यावर आत्ममग्नतेचा आरोप होतोच. तुम्ही बघितलं असेल तर मी जे लिहितो ते माझ्या भोवती फिरतं. ते खरं तर मी माझ्या ऐवजी मोहन, संजय, प्रदीप असं काही नाव टाकून लिहू शकतो. ते फिक्शन होऊ शकेल. पण ती माझीच फसवणूक असेल. परवा मिथिला सुभाष म्हणाल्या "माणसाने प्रथमपुरुषी एकवचनी लिहिले म्हणजे ती त्याची आत्मकथाच  असते का? फिक्शन असू शकत नाही का?" विचार करावा.

आता माझ्या सत्य अन काल्पनिकता याचं जोड असणार्या लिहिण्याला साहित्यिक मुल्य असते का? मला नाही वाटत.

तुम्ही माझे मित्र आहात, मित्रच रहा. वाचक बनू नका.

असो. काही घटना, काही संवाद, काही वाद, काही प्रतिवाद यावरून झालेलं मंथन.

Wednesday, 13 May 2015

attention seeker

चेन्नई हून चार मुलं आली होती ट्रेनिंग साठी, तीन महिन्यासाठी. काल त्यांच्या साठी रात्री पार्टी होती. कंपनीत च रात्री बिर्याणी मागवली होती. जेवण झाल्यावर कुणीतरी गाणी लावली. पोरांचे लागलीच पाय थिरकायला लागले. मी पण दोन वेळा पाय पुढे अन चार वेळा मागे करून हलवले. मला कॉलेज चे दिवस आठवले. स्वत:बद्दल त्यावेळेस बरेच गैरसमज होते. अजूनही आहेत, गैरसमजाचे मुद्दे बदलले आहेत. तर गैरसमज असा होता की, मी खूप चांगला नाचतो. तो समज पुढे एरोबिक्स मध्ये शिस्तशीर नाचताना फोल ठरला. पण गद्धे विशी ती, कोण सांगणार.

ह्या गैरसमजापायी कोणत्याही गणपतीच्या मिरवणुकीत किंवा अजून कुठल्याही नाचणार्यांच्या घोळक्यात मी जरा हटके नाचायचो. म्हणजे लोकांच्या लक्षात यावं म्हणून. त्यावेळेही, लोकं बघून न बघितल्या सारखे करायची, कुणी गालातल्या गालात हसायची. छद्मश्री. हे नवीन नाव कळलं, छद्मी हसणाऱ्यासाठी, मोहन सरांकडून. कुणी दुसर्याच्या कानात काही तरी सांगायचं. त्यातल्या त्यात हे कुणी "सांगणारी किंवा बोलणारी" असेल तर मी अजून चेकाळायचो. साधारणपणे अशा वागण्यार्याला attention seeker म्हणतात.

मग पुढील आयुष्यात कुणाचं लक्ष वेधून घ्यावं असं काही घडलं नाही. नाही म्हणायला, वैभवीच्या आई वडिलांचं लक्ष वेधून घेतलं, कारण इलाजच नव्हता. एकदा महिन्याच्या पगारापेक्षा क्रेडीट कार्ड वर जास्त खर्च केला म्हणून इन्कम tax अधिकाऱ्याचं लक्ष वेधून घेतलं. स्क्रुटिनी झाल्यावर अधिकाऱ्यानेच मला १००० रु वरखर्चासाठी दिले. मागच्या महिन्यात २७ रु कमी सेल्स tax भरला म्हणून ही सेल्स tax अधिकाऱ्याचं लक्ष वेधून घेतलं. यश आणि नील ही 5 स्टार क्याड्बरी वैगेरे आणली तरी ढुंकूनही बघेनासे झाले. त्यांच्या अपेक्षा म्हणे Mac D किंवा KFC सारख्या माझ्या खिशाला न परवडनार्या आहेत म्हणे. 

एकंदरीत फारच गळचेपी होऊ लागली. कुणी बघायला तयार नाही.

शेवटी ती संधी फेसबुकने दिली. मित्रांच्या वाढदिवसाचे नोटिफिकेशन देवून.  लक्षात आलं की सगळे जण वाढदिवसाच्या शुभेच्छा न्यूज फीड मध्ये किंवा टाईम लाईन वर देतात. इथे मी डाव साधला. मी इन बॉक्स मध्ये जाऊन शुभेच्छा टाकतो. अगदीच माहितीतलं असेल अन फोन नंबर पण असेल तर WA वर. अन दुसरं म्हणजे विविध डे च्या शुभेच्छा, सर्वपित्री अमावसे सारख्या सणांच्या शुभेच्छा, नेत्यांच्या शुभेच्छा या आपण दिल्या तर इतक्या पोस्टच्या भाऊ अन बहीण गर्दीत कोण बघणार त्यांच्याकडे , केवळ ह्या कारणासाठी मी तिकडे फिरकत ही नाही.

Hard core attention seeker, you know.

जे आहे ते आहे.


Monday, 11 May 2015

हॉर्न

सदर पोस्ट जरा दीड शहाणपणाची. कुणी त्याला स्वत: भोवती उदबत्ती ओवाळणं म्हणतं, अन काल एका मित्राने माझ्या अशा लिहिण्याला तोंडपाटीलकी म्हंटल. तर तीच सही. (बाकी मित्र यादीतील शरद, सौरभ, राकेश, डॉ यशवंत, मिलिंद या अशा अत्यंत सेन्सिबल अन विचाराने प्रगल्भ असलेल्या लोकांच्या आडनावाला वापरून आलेला हा तोंडपाटीलकी शब्द माझ्या डोक्यात गेला आहे. ज्याने कुणी शोधून काढला त्याला बुकलावसं वाटतंय. असो)

सध्या मीरा सिरसमकर अमेरिकेत आहेत. त्यांनी लिहिलं "आठ दिवस झालेत अमेरिकेत. हॉर्न ऐकला नाही."

तुम्हाला म्हणून सांगतो, मी गेले सतरा वर्षं झालेत कारचा हॉर्न वाजवत नाही. अविश्वसनीय आहे, पण हे सत्य आहे. आणि फक्त पुण्यात नाही तर कोणत्याही शहरात. मुंबई, नासिक, औरंगाबाद, नगर, कोल्हापूर, नागपूर, बंगलोर, चेन्नई ह्या सगळ्या गावात मी कार चालवतो पण हॉर्न वाजवल्याशिवाय.

माझे काका इराणला असायचे. लहान असताना माझ्या काकांनी कार घेतली. ठाण्यात आम्ही खूप फिरायचो. कार चालवताना ते म्हणायचे कि परदेशात कुणीही हॉर्न वाजवत नाही. ही गोष्ट माझ्या डोक्यात इतकी फिट होती कि मी ठरवलं कि आपण कधीही स्कूटर चा हॉर्न वाजवायचा नाही. हो म्हणजे, तेव्हा कार घेऊ हे स्वप्नात ही वाटलं नव्हतं.

पहिली कार फियाट. चालवायला लागलो. हॉर्न न वाजवण्याची गोष्ट डोक्यात होती. हळूहळू सवय लावत गेलो. २००० साली santro घेतली. एव्हाना हॉर्न न वाजवणे ही सवय मला फारच आवडू लागली. तेव्हा मुंबईला सचिन काळे म्हणून माझा कलीग होता. तो जॉईन झाल्यावर hands on ट्रेनिंग साठी त्याच्या बरोबर ४ दिवस मुंबई त फिरलो. कांदिवली, अंधेरी, मरोळ, सिद्धीविनायक, विक्रोळी, भांडूप, ठाणे असा बेफाम कार्यक्रम असायचा. शेवटचा call कळव्याचा सिमेन्स चा होता. गाडी पार्क केल्यावर सचिन ने गाडीचा हॉर्न वाजवून बघितला अन मला म्हणाला "चार दिवसात एकदाही हॉर्न ऐकला नाही. बघावं चालू आहे कि खराब झाला आहे."

हॉर्न न वाजवण्याचे अनेक फायदे आहेत. एकतर तुम्ही गाडी सेफ चालवता. तुम्हाला माहिती असतं कुणीही कुठून ही घुसू शकतं. स्पीड लिमिट मध्ये राहतो. लोकांशी भांडणं कमी होतात. सिग्नल ला उभे असाल तर हिरवा दिवा लागल्यावर हॉर्न वाजवायची सवय आपोआप जाते. ट्राफिक मुळे रस्त्यावर जो मनस्ताप होतो आणि जे आपण कावून, मूड खराब करून ऑफिस ला किंवा घरी पोहोचतो त्या ऐवजी चांगल्या मूडमध्ये असतो.

आणि हे अवघड नाही आहे. एकच हुकमी एक्का आहे. "ज्या वेळेस तुम्हाला हॉर्न दाबायची इच्छा होते त्यावेळेस ब्रेक दाबा." प्रयत्न करून बघा. जमेल तुम्हाला.

आणि हे मी तुम्हाला सांगतो आहे म्हणून, आदरवाईज पुष्कळ लोकं नाही वाजवत हॉर्न. ज्याने मला कार शिकवली तो माझा मित्र प्रताप, अजिबात हॉर्न वाजवत नाही. मी ज्यांना कार शिकवली तो मिलिंद अन चेन्नई चा प्रदीप, अतिशय कमी हॉर्न वाजवतात. एक दोन वर्षात नाही वाजवणार नाहीत ते.

अमेरिकन आर्ट मिलर आला होता. मला म्हणाला "No wonder you honk so much. I have seen almost on every truck written "Horn Please". But I am surprised that you do not follow that instruction."

आपला तर गाडी चालवताना मोटो आहे बुवा "No Horn Please OK"

(चढावर गाडी उलटी येणे किंवा रस्त्यावर खुर्ची टाकून गप्पा टाकण्याऐवजी गाडीवर बसूनच गप्पा मारणे अशा अपवादात्मक वेळी वाजवतो ही हॉर्न. पण अपवाद म्हणूनच)

(वैधानिक इशारा: हॉर्न न वाजवता गाडी चालवणे हे प्रयत्नाने होते. आणि ब्रेक दाबायचं लक्षात ठेवा. नाहीतर तुम्ही स्पीड कमी करणार नाही आणि हॉर्न वाजवणार नाही. झालं मग माझी वाजवणार. वेगळं Disclaimer लिहित नाही बसत)

Saturday, 9 May 2015

हं मग, आपलं असंच आहे.

तसा मी पापभिरू माणूस. त्यातल्या त्यात ट्राफिक मध्ये काही पाप करायचं टाळतो. उगाच डोक्याला ताप. नो एन्ट्री त जात नाही, इथे तिथे गाडी लावत नाही, सिग्नल पाळतोच पाळतो. मुंबई ला पुण्याची कार टिपून पकडतात. फिल्म साठी. मुंबई पासिंग च्या गाड्या त्यांच्या रेब्यान मधून दिसत नाहीत. महिन्यापूर्वी  भर उन्हाळ्यात सो कॉल्ड आर टी ओ approved फिल्म उडवली. परवा बालेवाडीजवळ मर्सिडीज ला पुणे ट्राफिक हवालदार फिल्म वरून उकळत होता. पाहिलं तर मर्क ची पासिंग मुंबई ची. लैच मज्जा आली. बदला घेतल्याचा फील आला.

हे असं सगळं असताना आठवड्यापूर्वी फातिमानगर मध्ये डायमंड बेकरी ला सकाळी राहिलेले पाच रु देण्यासाठी गाडी चालूच बाहेर उभी करून दोन मिनिटासाठी गेलो. सकाळ ७:४५ ची वेळ. बाहेर येउन बघतो तर दोन हवालदार, एक तंबाखू चोळत तर एक काठी फिरवत कार भोवती फिरत होते. मी आपलं त्यांच्याकडे लक्ष न देत दरवाजा उघडला, तर एक जण आला
 "ओ, नो पार्किंग हाये"
मी बोललो "अहो, दोन मिनिटासाठी पैसे दयायला गेलो होतो"
तर तो "बरोबर, पण नो पार्किंग आहे इथे"
मी "अहो, गाडी सुद्धा चालू ठेवली आहे. लागलीच निघणार होतो."
हवालदार "घ्या, दीड शहाणे. म्हणजे नो पार्किंग मध्ये गाडी लावता हा एक गुन्हा. अन परत गाडी चालू ठेवता हा दुसरा गुन्हा"
मी अवाक. गाडी चालू ठेवणं हा गुन्हा? दहा मिनिटाची खोटी करून दादा पुता करत सोडलं पण जाताना "कार फिरवता, थोडे नियम वैगेरे पाळत जा जरा" हे म्हणायला विसरले नाही पोलिस दादा.

काल पुलगेट च्या चौकात सिग्नल ला डावीकडे वळायचं होतं. मला रेड सिग्नल होता. उजवीकडून ट्राफिक पण चालू होती. मी अर्थात थांबलो होतो, हिरवा दिवा लागेपर्यंत. मागे BMW किंवा तत्सम अशी गाडी होती. त्याने बहुधा हॉर्न वाजवून पोलिसाला विचारलं, जाऊ का?. हवालदाराने खुण केली, जा म्हणून. मी बघून न बघितल्यासारख केलं. त्याने शिट्टी मारून माझं लक्ष वेधत जा म्हणाला. मी ढिम्म. त्यालाच खुण करून सांगितलं "समोर रेड सिग्नल आहे" म्हणून. तर डोक्यावर हात मारत म्हणाला "अहो, जा की" एव्हाना मागचा BMW पिसाटला होता. प्या प्या करत बसला. पोलिस माझ्या कार जवळ आला अन म्हणाला "अहो जा की, का ताप देताय डोक्याला" मी गाडी बाजूला घेतली अन उतरून पोलिसाला विचारलं

मी: काय झालं?
पो: अहो, काय झालं म्हणून काय विचारताय. मी सांगत होतो ना जा म्हणून.
मी: रेड सिग्नल होता ना. मग का म्हणून जायचं मी
पो: मी सांगत होतो ना जा म्हणून.
मी: अहो तुम्ही कोण? तुमचं काय सांगायचं, उद्या तुम्ही या पेट्रोल पंपाच्या मागे लपणार आणि मी रेड सिग्नल असताना लेफ्ट मारला तर पंपाच्या मागून कारच्या पुढे येत म्हणणार, चला गाडी बाजूला घ्या. दोन तीनशे रुपयाची तोडपाणी होणार. तुम्ही एक दिवशी जा म्हणता अन दुसर्या दिवशी त्याच स्पॉट ला आमची वाट लावता. मला दोनशे रु दया मग मी जातो.

आज अवाक व्हायची पाळी पोलिसावर आली होती. विचित्र हातवारे करत तो म्हणाला "काय एक एक वल्ली असतात राव!" अन माझ्याकडे पाहत म्हणाला "इथे भेटलात, वर नका भेटू"

मग मी पण माझा ठेवणीतला डायलॉग टाकला "अहो, वर कसे भेटणार? तिथे तुम्ही स्वर्गात रंभा उर्वशी बरोबर डान्स करत असणार अन मी नरकात उकळत्या तेलात तळला जात असणार. जे काय बोलायचं ते इथंच उरकून घेऊ"

हात जोडत म्हणाला "या आता" मी पण शिट्टी वाजवत दरवाजा उघडला आणि पोलिसाला बाय करत गेलो.

हं मग, आपलं असंच आहे.

Friday, 8 May 2015

जात

तुम्हाला म्हणून सांगतो वयाच्या ४५ व्या वर्षी पर्यंत जात हा काय प्रकार होता माहितच नव्हतं. जी काय ओळख झाली ती फेसबुकवर. सुरुवातीला चार पाचशे मित्र होते तेव्हा हे सुसह्य तरी होतं. जास्त मित्र झाल्यावर आता त्याची धग जाणवायला लागली आहे. मी स्वत: आंतरजातीय विवाह केलेला. कंपनी चालवताना सुद्धा जात, धर्म या गोष्टीला अजिबात थारा नाही. पण आज काल इतर वेळेस अत्यंत हृदय स्पर्शी  शब्दात मनोगत व्यक्त करणारे माझे काही मित्र, जेव्हा कुठल्या तरी दुसर्याच मुद्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून जातीवर गोळ्या झाडतात तेव्हा नवल तर वाटतेच, पण मनस्वी दु:ख होते.

कुठल्याही हि इतिहासातल्या गोष्टीकडे जातीचा चष्मा लावून ती पाहिली जाते तेव्हा त्याचा चुथडा होतो. मी स्वत: खूप मोठा अभ्यासक वैगेरे नाही आहे पण वाचन मात्र केलं आहे. आतापर्यंत माझ्याही मनात शंका उत्पन्न झाल्या आहेत, पण ते कालसुसंगत असेल असं वाटून समाधान करून घेतलं. चिवडत नाही बसलो. मग ते टिळकांचा गणेशोत्सव असो कि गांधींचं न समजणारं राजकारण असो. त्या काळात त्यांचं वागणं सुसंगत असेलही. त्या काळातल्या लोकांना हे सगळं करा, हे सांगण्याचं द्रष्टेपण तर त्यांच्यात होतं. पण मग नंतर आता ह्या सगळ्या प्रकारची गरज नाही हे तर्काधिष्ठित पद्धतीने सांगणारे द्रष्टे नेते आहेत कुठे. जे आहेत ते  कालबाह्य गोष्टींचा उपयोग करून एकमेकांवर कुरघोडी करण्यात रममाण झाले आहेत. आणि आपण त्यांचेच  समर्थक. आयला, जी मंडळी सावरकरांचा माफी वीर म्हणून त्यांच्या पुण्यतिथीला अन जयंतीला उद्धार करतात तीच मंडळी गो हत्या बंदी वेळेस मात्र  "सावरकर म्हणाले,गाय उपयुक्त पशु आहे" चे फलक फडकावत होते.  नव्वदीत उभारलेल्या सॉफ्टवेअर इंडस्ट्री ला २००० मध्ये Y २K प्रॉब्लेम न कळणाऱ्या पिढीचे प्रतिनिधी आपण ७०-१०० वर्षानंतर ती लोकं कशी चुकीची होती यावर खल करत बसतो.

नेते तर सोडाच, तर आपण संताना सोडलं नाही. ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, रामदास यांच्या जाती काढून एकमेकांवर गरळ ओकतो. हे म्हणजे अती झालं. नाठाळ च आपण. पण आपल्या डोक्यात काठी न मारणारे तुकाराम नाही आहेत हे आपलं दुर्दैव. 

मुळात आपली चेतना, मग ती रागाची असो वा अभिमानाची असो, ती चेतवायला जातीचा वापर केला जातो हेच मुळात लांच्छनास्पद आहे. आम्हाला आमच्या गरिबीची लाज वाटत नाही, आमच्या इथे स्वच्छतेच्या नावाने बोंबाबोंब आहे, आपण भ्रष्टाचार हा शिष्टाचार समजतो, स्वतंत्र होऊन ६७ वर्ष झाली तरी उन्हाळा आला कि पिण्याचं पाणी नाही अशी बोंब मारत असतो. ह्या कुठल्याही गोष्टीची ना खेद ना खंत. आपण आपली जात अन धर्म सांभाळण्यात गर्क आहोत. आपण जातीवंत अन धर्मपालक विष्ठावान दुर्गंधी पसरवण्यात धन्यता मानतो.

असो. जुलै २०१३ पासून फेसबुक जोरात फडफडावयला लागलो. तेव्हापासून जात शब्दाचा उल्लेख असलेली एक पोस्ट टाकली अन ही आता दुसरी. आता यापुढे नाही.

जात