Sunday 18 September 2016

नंदू

नंदकुमार चव्हाण, नंदू म्हणायचो आम्ही त्याला. एस के एफ ला होता माझ्या बरोबर. ग्राइंडिंग स्टोअर्स मध्ये असायचा. त्याची आणि माझी शिफ्ट सहसा एक असायची. वयाने ७-८ वर्षाने मोठा होता तो माझ्यापेक्षा. काही लोकांशी आपली  मैत्री होताना वयाचं महत्व एका आकड्यापुरतं मर्यादित असतं. नंदूची आणि माझी चटकन मैत्री झाली.  त्याची मेमरी खतरनाक होती. त्या वेळेला काही कॉम्पुटर वगैरे नव्हते. पण स्टोअर्स मधल्या हजारो गोष्टी कुठल्या रॅक मध्ये ठेवल्या आहेत हे त्याला बरोबर लक्षात असायचं. "६२०८ ची ड्रायव्हिंग प्लेट दे रे नंदू" असा आवाज दिला की नंदू ती बरोबर हुडकून द्यायचा.

एस के एफ ला मी अगदीच कोवळा इंजिनिअर होतो. करिअर च्या सुरुवातीला आधार देणारं कुणी असेल तर ते आकार चांगलं घेतं. अशी आधार देणारी अनेक मंडळी होती (आजार देणारी पण होती), नंदू त्या पैकी एक होता. अनुभवी असल्यामुळे त्याला कंपनीची बरीच माहिती होती. लोकं कशी आहेत, कुणाशी कसं वागायचं याचं ज्ञान तो कायम द्यायचा. सेकंड किंवा थर्ड शिफ्ट मध्ये गप्पा मारण्यासाठी आम्हाला सुर्याखालील कुठलाही विषय वर्ज्य नसायचा. वैभवी बरोबर माझं तेव्हा प्रेमप्रकरण चालू होतं. सेकंड शिफ्ट ला तिचा फोन ग्राइंडिंग स्टोअर्स मध्ये यायचा. नंदू आवाज द्यायचा "डॉक्टर मॅडम चा फोन आला रे".

पुढे १९९४ साली मी एस के एफ  घेऊन सोडली आणि नंदूने व्ही आर एस घेऊन १९९८ साली. नंदू ने एस के एफ का सोडली हे एक मला न उलगडलेलं कोडं आहे. म्हणजे त्याचं तेव्हा वयही जास्त नव्हतं आणि कंपनीतले लोकं ही त्याच्या कामावर खुश असावेत.

काही वर्षांनी तो माझ्याकडे जॉब साठी अप्रोच झाला, पण तेव्हा माझ्याकडे जागा नव्हती. मग त्याने बहुधा मिळेल ती नोकरी केली.

२००६ की ७ ला माझ्याकडे नंदू फिट होईल अशी जागा तयार झाली. मी त्याला निरोप पाठवला. आणि नंदू आमच्याकडे जॉईन झाला. कामात तो पद्धतशीर होता. समरासतेने काम करायचा. कंपनीची पार्टी वगैरे असेल तर त्याच्या उत्साहाला उधाण यायचं. सगळं चांगलं चालू होतं, तर नंदूला हृदय विकाराचं निदान झालं. त्याची कुठली वाहिनी ब्लॉक झाली होती.

इ एस आय च्या थ्रू त्याची अँजिओ प्लास्टी झाली आणि यथावकाश तो कंपनीत जॉईन झाला. पूर्वीचा जोश त्याच्यात नव्हता आणि आम्हीही त्याला जपूनच कामं सांगायचो.

नंदू ९:३० ते ९:४५ ला वाघेला बरोबर कंपनीत यायचा अन त्याच्या बरोबर निघायचा. त्याने मग एक हिरो होंडा विकत घेतली. कंपनीची वेळ ८:३० होती. ती पाळण्यासाठी त्याने बाईक घेतली असावी असा माझा अंदाज आहे. पण तरीही तब्येतीपायी त्याच्या खूप सुट्ट्या होऊ लागल्या. बाईक घेतली तरी वेळ पाळणं त्याला जमत नसे. जॉब करणं त्याला अवघड जात होतं पण कौटुंबिक परिस्थितीमुळे त्याला सोडता पण येत नव्हता.

एके दिवशी संध्याकाळी आम्ही हार्ट टू हार्ट बोलत बसलो होतो. मी त्याला म्हणालो "नंदू, तब्येत बरी नसून तू किती कष्ट करतोस. गुरुवार पेठेतून नांदेड फाट्याला यायचं, परत जायचं. दिवसभर काम करायचं. कशाला इतका जीवाला त्रास करून घेतोस. तुझी इच्छा असेल तर मी गावात तुझ्यासाठी जरा लाईट जॉब बघतो. विचार कर तू" निरोप घेऊन तो गेला.

दुसऱ्या दिवशी मला सकाळी फोन आला. "काल रात्री नंदू सिव्हिअर हार्ट ऍटॅक ने गेला"

तेव्हापासून मला टोचणी लागली आहे की आदल्या दिवशीच्या बोलण्याचा अर्थ मी इंडायरेक्टली जॉब सोडायला सांगतोय असा नंदूने घेतला की काय?

आज सहा वर्षे झाली या घटनेला. दोनदा प्रायश्चित पण घेतलं मी. पण आजही ती नंदू बरोबर ची संध्याकाळ आठवली की मी सैरभैर होतो. 

No comments:

Post a Comment