Monday 5 September 2016

धसका

दीड दोन महिन्यांपूर्वी मी भुवनेश्वर ला गेलो होतो. फेबुवर कुठेतरी मी उल्लेख केला की लागलीच मित्राचा मेसेज आला "मग काय आता भुवनेश्वर ची सकाळ यव आणि रस्ते त्यंव अशी पोस्ट येणार असेल तुमची"

परवा एका मित्राला सांगितलं की बहुतेक एखाद्या आठवड्यात कलकत्त्याला जाईन. लागलीच तो म्हणाला "झालं मग आल्यावर लागलीच आठ एक दिवस कलकत्त्यात असं आणि तसं चालू राहील" (actually हे एक मैत्रीण म्हणाली, पण मुद्दामून मित्र लिहिलं. पोस्ट निस्तरायला सोपं पडतं)

मागच्या आठवड्यात नाशिक ला गेलो होतो. पाच सहा मित्र सुला वाईन्स ला गेलो होतो. टल्लीन होऊन गप्पा वगैरे झाल्यावर एक जण म्हणाला "काय रे तू गप्प होतास आज?" तर दुसरा लागलीच म्हणाला "अरे तो फेसबुक च्या पोस्ट साठी विषय शोधत होता. एक दोन पोस्ट तो उजवेल बघ आता"

गेल्या तीन पुण्या बाहेरच्या व्हिजिट मध्ये चार वेगवेगळ्या लोकांना भेटलो. त्यांना भिती वाटली मी त्यांच्या बद्दल लिहितो की काय अन मी घाबरून होतो ते माझ्या बद्दल लिहितील की काय. आठवड्यानंतर पण काहीच नाही पडलं, मग हायसं वाटलं.

वैभवी आणि तिचे डॉक्टर मित्र मैत्रिणी गप्पा मारत बसले होते. मी पोहोचलो तिथे की लागलीच सुशील म्हणाला "ए, अरे नीट वागा बरं आता. नाहीतर राजेश लागलीच पोस्ट बनवून फेसबुकवर टाकेल"

एकंदरीत हे असं चालू आहे. म्हणजे मी काय लिहिणार याचा मित्रांनी धसका घेतला आहे आणि मी कुठे गेलो की मित्र काय कॉमेंट करणार याचा मी धसका घेतला आहे.

फेसबुक सध्या असा एकुणात धसका धसकी चा खेळ झाला आहे. धार्मिक दहशतवाद झाला, राजकीय दहशतवाद पहिला, सामाजिक दहशतवाद पण अनुभवला, ते सांस्कृतिक की काय तसला दहशतवाद पण माहित आहे, तसं याला फेसबुकीय दहशतवाद म्हणावा काय?

(बाय द वे, भुवनेश्वर ला मेसेज करणारा मित्रच होता बरं.)

(तरीही विश्वास बसत नसेल तर विकास गोडगे ला विचारा)

No comments:

Post a Comment