Tuesday 13 September 2016

टोमणा

शाळेत आणि कॉलेजात असताना एक फिश पॉंड्स म्हणून एक कार्यक्रम असायचा. मुलं, मुली, शिक्षक, शिक्षिका यांच्या काही विशिष्ट लकबी, वैगुण्य आणि गुण सुद्धा याचा काही शब्दात वा वाक्यात उल्लेख व्हायचा. त्याचं सिलेक्शन करताना तज्ञ मंडळींची बरीच तारांबळ उडत असावी. कारण काही फिश पॉंड्स हे निंदनीय शब्दात असायचे. ते जर वाचले तर, ज्याच्यावर पडले त्यांच्यावर मानसिक परिणाम होण्याची शक्यता पण असायची. पण एकुणात माझ्या शाळेत आणि कॉलेज मध्ये वातावरण इतकं खेळीमेळीचं असायचं की हा कार्यक्रम हसी मजाक करत पार पडायचा. "चंद्र वाढतो कलेकलेने, xxx वाढतो किलोकिलोने" "दुरसे देखा तो लगी हसीना, पास जाके देखा तो आया पसीना" "ये दोस्ती हम नही छोडेंगे" "xxx च्या शेजारी xxx ची मूर्ती छोटी, जणू विजेच्या खांबाखाली पोस्टाची पेटी" असे काही फिश पॉंड्स लोकप्रिय होते. मग काही सरांना "हिमालयाची सावली" वगैरे म्हंटलं जायचं. माझ्यावर सुद्धा "भासमारं वांगं" किंवा "स्वतः ला समजतो शम्मी, आहे अक्कल निम्मी" वगैरे शेरे पडले होते. काही मुलींच्या टोळीला "ढालगजभवान्या" असा फिश पॉंड् पडला होता.  अगदी सांगायचं म्हणजे दुसर्यांना टोमणे मारायला लायसन्स मिळायचं. पण त्यातून टीका झेलायची मानसिकता तयार व्हायची. त्याकडे खिलाडू वृत्तीने पाहता यायचं.

तसं बघायला गेलं तर दुसऱ्याच्या मनावर ओरखडे न पडता असं काही लिहिणं ही पण एक कलाच आहे. म्हणजे हे टोमणे जसं स्वीकारणं सोपं गेलं तसं ते दुसरा अगदी कोलमडून जाऊ नये अशा पद्धतीने ते बनवणं पण बरेच जण शिकले.

याचं महत्व नंतर आयुष्यात बऱ्याचदा कळलं. जॉब मध्ये असताना घालून पाडून बोलणाऱ्या साहेबा बरोबर लोकं काम करायला कशी नाखूष असतात ते अनुभवलं. ज्याला passing by comments म्हणता येईल, त्याने मी कसा उन्मळून पडलो ते ही आठवतं. एक वेळ डायरेक्ट बोलणं  परवडलं पण ते फालतू आडून बोललेलं मन दुखावून जायचं.

फेसबुक वर पण हे तुफान जाणवतं. शिव्यांची रेलचेल असते अन त्याहून जास्त एकमेकांवर कुरघोडी करणारे टोमणे कधी पोस्ट च्या  तर कधी कॉमेंट च्या रुपात बाहेर पडतात. इन बॉक्स मध्ये येऊन शहाणपणा करणाऱ्यांना टोमणे मारणाऱ्या एक दोन पोस्ट्स मी पण लिहिल्या आहेत. पण त्या पलीकडे नाही. अर्थात माझ्या पोस्ट वर सुद्धा काही वेळा विरोधात प्रतिक्रिया असतात पण त्या अत्यंत संयत आणि यथोचित असतात. टोमणे आणि टोमणा हा शब्द अत्यंत सौम्य आणि मावळ वाटेल असल्या फालतु कॉमेंट्स टाकणारे मित्रवर्य मलाही लाभले पण खूपच मोजके.  त्यातल्या एकबद्दल तर मला किमान २० एक मेसेजेस आले होते की यांना तुम्ही सहन का करता किंवा यांच्या कॉमेंट तुम्ही डिलीट का करत नाही.  कॉमेंटस कशा नसाव्यात याचा वस्तुपाठ दाखवणाऱ्या त्या कॉमेंट्स मी ठेवतो. आणि यादीतून उडवत पण नाही. जेव्हा अगदीच अतिरेक झाला तेव्हा मात्र दोघा तिघांना उडवलं.

जॉब मध्ये किंवा फेबु वर दाखवलेल्या असल्या पुचाट सहनशक्तीचं मूळ त्या फिश पॉंड्स च्या कार्यक्रमात असावं असं मला सारखं वाटतं. 

No comments:

Post a Comment