Sunday, 18 September 2016

ओंजळ

काही जणांच्या पोस्ट अशा असतात की जणू समुद्र. त्यात विशालता तर असतेच पण खोली ही असते, अर्थाला. अनुभवाचे शिंपले किनाऱ्यावर चमकत असतात.

काही जणांच्या पोस्ट अशा असतात, की जणू शांत तळं. त्या वाचल्यावर काहीच बोलावसं वाटत नाही. तळ्याच्या काठावर बसून नीरव शांतता अनुभवावी तसं ह्या पोस्ट वाचून आपण स्तब्ध होतो. दगड टाकून चुबुक असा आवाज करून तिथली शांतता भंग करावी वाटत नाही.

काही जणांच्या पोस्ट अशा असतात, की जणू एखादी नदी. चांगल्या वाईट गोष्टी कशा सामावून घेते नदी, तसंच बरे वाईट अनुभव घेत जीवनाचा प्रवाह ठरवणारी.

काही पोस्ट मात्र पूर आलेल्या नदीसारख्या बेफाम विध्वंसक असतात. त्यात चीड असते, अन्याय झाल्याची भावना असते.

काही पोस्ट या शेतातून जाणाऱ्या पाण्यासारख्या असतात. त्यात संगीत असतं, नाद असतो.

काही जणांच्या पोस्ट अशा असतात, जणू डोंगरातून धावत येणाऱ्या पाण्याचा झरा. त्यात आवेग असतो, त्याचे तुषार जेव्हा अंगावर पडतात, मन प्रसन्न होतं. आपण सुखावतो, चेहऱ्यावर आपसूक हास्य उमलतं.

काही जणांच्या पोस्ट मात्र डबक्यासारख्या असतात. साठलेलं पाणी कुजलं असतं. विचारांची घाण साफ केली नसते, आणि मग उग्र दर्प  त्या डबक्यातून येत राहतो.

चॉईस भरपूर आहे. ओंजळ कोणत्या पाण्याने भरायची हे आपण ठरवायचं. 

No comments:

Post a Comment