Friday, 28 October 2022

डॉ शंतनू अभ्यंकर

डॉ शंतनू अभ्यंकर आणि माझी तशी जुजबी ओळख. म्हणजे मी त्याला ओळखतो पण तो मला ओळखत नसावा. किंवा ओळखत असला तरी वैभवीचा नवरा म्हणून. मला मात्र या ना त्या कारणाने शंतनू बद्दल माहिती आहे. त्याचा मोठा भाऊ शशांक माझ्या चांगला ओळखीचा. रादर माझं पहिलं व्हिजिटिंग कार्ड शशांकने छापलं आहे १९९४ साली. शंतनू चे सासरे बजाज औरंगाबाद चे उच्चपदस्थ. त्यांच्याही घरी माझं जाणं झालेलं. त्याने होमिओपॅथी करून मग बीजेला ऍडमिशन घेतली ते ही लक्षात आहे. असो, मी शंतनूला ओळखतो हे सांगण्यासाठी ही पोस्ट नाही आहे. तर पोस्ट आहे त्याच्या लेखाबद्दल. 

शंतनूला नुकताच भेटलो होतो डॉ कल्पना सांगळेच्या पुस्तक प्रकाशनाला. आपल्या खुसखुशीत शब्दात त्याने त्या दिवशी भाषण पण केलं. आणि त्यानंतर दीड दोन महिन्यात त्याच्या आजाराचं निदान झालं. लंग्ज कँसर. मी आणि वैभवी पण ऐकून अवाक झालो. काल त्याचा त्या संदर्भांतील लेख वाचला.

ज्यांना कुणाला कँसरबद्दल, किंबहुना कुठल्याही आजाराबद्दल भीती असेल त्याने हा लेख वाचावा. लोक अध्यात्मिक, तात्विक बऱ्याच गोष्टीवर बोलतात. मला वाटतं शंतनू ते जगतोय. ते तो जगतोय हे सांगण्यासाठी त्याला शब्दजंजाळ भाषा वापरावी लागत नाही. त्याने स्वतःचे अनुभव, त्या आजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि एकुणात आयुष्याकडे किती निरपेक्ष भावनेनें बघायला हवं हे त्या लेखातून प्रत्येक वाक्यातून उद्धृत केलं आहे. त्यात फार अलंकारिक भाषा नाही आहे, काहीही अनाकलनीय नाही आहे. इन फॅक्ट एखादा मित्र आपल्या खांदयावर हात ठेवून स्वतःच्याच आजाराबद्दल आपलंच सांत्वन करतोय, त्यातले बारकावे आपल्याला समजावून सांगतोय आणि एकुणात ते सगळं करताना जगण्याकडे किती तटस्थ भूमिकेने बघायला हवं आहे हे सांगतोय. बरं  हे सगळं करताना कुठलाही अभिनिवेश नाही आहे, कुठलीही निराशा नाही आहे. विज्ञान आणि अध्यात्म हे एकमेकांवर कायम विरोधात आहे असा एक समज आपल्याकडे आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगत शंतनू जे आयुष्य जगतो आहे ते अध्यात्मापेक्षा कमी नाही असं मला वाटतं. तो लेख वाचताना शंतनू बद्दल कणव निर्माण होत नाही, त्याच्याबद्दल रागही येत नाही तर आपण स्तिमित होत तो लेख वाचत संपवतो. 

योगी लोक काय सांगतील ते तुमच्या माझ्या आजूबाजूला वावरणाऱ्या, कुठलाही फॅन्सी ड्रेस न घालणाऱ्या, हातात कमंडलू वगैरे न घेता या संवेदनशील डॉक्टर ने अगदी सहजगत्या सांगितलं आहे. बोरकरांनी म्हंटल्याप्रमाणे "जीवन यांना कळले हो" ही कविता शंतनूला परफेक्ट लागू होते. 

एक किस्सा ऐकला होता. मंदाताई आमटेंनी, विश्वास मंडलिकांना विचारलं होतं म्हणे की "आमचे हे योग वगैरे काही करत नाही, तर तुम्ही समजावून सांगा त्यांना." तेव्हा मंडलिक मंदा ताईंना म्हणाले की "हा माणूसच योग जगतोय, त्यांना वेगळ्या योगाभ्यासाची गरज नाही आहे." शंतनूला ही तुलना कदाचित आवडणार नाही, पण त्याने ज्या पद्धतीने लिहिलं आहे त्यावरून लक्षात येतं की त्याने आपली जीवनप्रणालीच योगशी जुळणारी ठेवली आहे.

हे मी का लिहितोय? शंतनूच्या लेखाची समीक्षा म्हणून, तर नाही. मी मलाच समजावून सांगतोय. माझ्या आणि माझ्या जवळच्यांच्या आजाराच्या बाबतीत मी एक नंबरचा भित्रा. माझे सारेच जण जणू काही अमरत्वाचा पट्टा घेऊन आले आहेत अशा समजुतीत मी असायचो. वयोपरत्वे ती भावना हळूहळू कमी होत चालली आहे. शंतनूच्या लेखाने ती भावना अगदी नाहीशी नाही पण तिचा परिणाम स्वतःवर कमी होण्याची शक्यता तयार झाली आहे.

एकदा मी कार मधून येताना किशोरी ताईचं "आज सजन संग मिलन बनिलवा" ही बंदिश ऐकत होतो. ती पूर्ण झाल्यावर मी आपसूक दीर्घ श्वास घेत नमस्कार केला. माझ्या ड्रायव्हर ने विचारलं "काय हे भजन होतं का?" मी काहीच बोललो नाही. तसाच शांत बसून राहिलो. कारण मला ती बंदिश काय आहे हे आजही माहित नाही, पण जे ऐकलं ते कमाल होतं. शंतनूचा लेख वाचल्यावर मी असाच नतमस्तक झालो. तो लेख मेडिकल जर्नल चा लेख आहे, स्वानुभव आहे, तात्विक आहे किंवा अजून काय आहे ते माहित नाही पण जे आहे ते मेस्मराइज करणारं आहे हे नक्की. 

डॉ शंतनू, तुला हार्दिक शुभेच्छा. बी व्हिक्टोरियस.

राजेश मंडलिक

Thursday, 6 October 2022

कोविड नंतर भारतीय इकॉनॉमी

खरंतर या विषयावर मी आधी लिहिलं होतं, पण पब्लिक मेमरी शॉर्ट असते आणि त्यातही फेसबुकवर लिहिलेलं कुणी सिरियसली घेत नाही. त्यामुळे मध्ये एका पोस्टवर जेव्हा मी भारत आर्थिक बाबींवर सुस्थितीत आहे असं लिहिलं होतं तेव्हा कुणाला तो विनोद वाटला होता किंवा काहींचा त्यावर विश्वास बसला नव्हता. 

जे काही मी लिहिणार आहे ते स्टॅटेस्टिक्स हे वेगवेगळ्या कॉन्फरन्स मधून मांडलं गेलेलं आहे. व्यवसायाच्या निमित्ताने मला तिथे हजर राहायला मिळतं आणि तिथून हा डेटा मिळतो. त्याची सत्यासत्यता प्रूव्ह करण्याची जबाबदारी मी टाळणार नाही, पण मी काही बिझिनेस ऍनालिस्ट वगैरे नाही आहे. जे काही मोठी लोक सांगतात ते टिपून ठेवतो. 

- भारतासारखे विकसनशील देश हे जागतिक इकॉनॉमी च्या तुलनेत चांगला परफॉर्मन्स देत आहेत. यात भारतासकट साऊथ ईस्ट एशियातील काही देशांचा समावेश होतो. 

- भारताचा इन्फ्लेशन रेट हा प्री कोविड वर्षात ३.५% ते ५% दरम्यान होता. पोस्ट कोविड काळात तो ७% पर्यंत पोहोचला आहे. पुढच्या वर्षी तो परत प्रि कोविड लेव्हल ला येण्याची शक्यता आहे म्हणजे ४% च्या आसपास. प्रगत देशांचा इन्फ्लेशन रेट हा प्रि कोविड काळात साधारण पणे  १.५% ते २% या दरम्यान होता. पोस्ट कोविड आणि त्यात परत रशिया युक्रेन युद्धामुळे तो १०% पर्यंत पोहोचला आहे. तो सध्या ८.५% ते ९% दरम्यान स्थिरावला आहे. पण तो परत मूळ पदावर येण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे असे तज्ञ लोक सांगतात. 

- रशिया बरोबरचे राजनैतिक संबंध हा भारताच्या बाबतीत एक महत्वाचा मुद्दा झाला आहे. भारत आणि रशिया यांच्यामध्ये टेक्नॉलॉजी ट्रान्सफर अनेक वेळा झाले आहे. त्यात लष्करी सामुग्री शिवाय क्रायोजेनिक इंजिन सारख्या हाय एन्ड टेक्नॉलॉजी चा समावेश होतो. या मैत्रीपूर्ण संबंधामुळे रशिया युक्रेन युद्धात आपण रशियाला विरोध केला नाही आणि त्यामुळे भारताला फ्युएल प्राईस इन्फ्लेशन वर बाकी जगाच्या मानाने चांगलं यश मिळालं. भारतातही इंधनाचे दर वाढले पण रेट ऑफ चेंज हा अनेक प्रगत देशापेक्षा कमी होता. 

- भारताचा जीडीपी ग्रोथ रेट हा येणाऱ्या काही वर्षात ७% च्या वर असणार आहे हे माझं नाही तर अनेक फायनान्शियल संस्थांचा कयास आहे. जगात इतका ग्रोथ रेट हा फार कमी देशांचा असणार आहे. 

- भारताने आपली बँकिंग प्रणाली ही फार सेफ बनवली आहे. आणि हे आज नव्हे तर अगदी २००३ पासून. आणि त्यामुळेच दोन मोठे धक्के जागतिक अर्थव्यवस्थेला बसले पण भारतीय आर्थिक स्थिती डळमळीत झाली नाही. पहिला धक्का लेहमन ब्रदर्स चा २००९ साली आणि नंतर २०२० चा कोविड. त्या दोन्हीला भारतीय अर्थव्यवस्थेने समर्थ पणे तोंड दिलं आहे. 

- आजच्या घडीला कॅपिटल गुड मार्केट साईझ (म्हणजे यात ऑटोमोबाईल, हेवी मशिनरी वगैरे सारखे प्रोजेक्ट येतात) हे साधारण पाने $ ४३.२ बिलियन चं आहे ते २०२६ साली $ १०० बिलियन पर्यन्त जाण्याचं प्रोजेक्शन आहे. मेक इन इंडिया या ड्राइव्ह चा सगळ्यात जास्त फायदा या सेक्टर ला होताना दिसतोय. रेल्वे, डिफेन्स, एरोस्पेस या क्षेत्रात प्रचंड काम भारतीय कंपन्यांना मिळालं आहे. पी एल आय, गतिशक्ती या योजनेमुळे याला सकारत्मक इंधन मिळालं आहे. 

- सगळ्यात मुख्य म्हणजे जागतिक मार्केट मध्ये चीन ने आपली विश्वासार्हता गमावली आहे. यात कोविड एक भाग झाला. याव्यतिरिक्त गेल्या दोन एक वर्षातील घडामोडी पाहिल्या तर चीन-तैवान संबंध, सेमी कंडक्टर सप्लाय मध्ये आलेलं अभूतपूर्व शॉर्टेज, श्रीलंका इश्यू, भारताशी घेतलेला राजनैतिक पंगा, त्यांच्या पोलादी पडद्याआड घडणाऱ्या अनेक घटना यामुळे त्यांनी आपली इमेज खराब करून टाकली आहे. याचा अर्थ असा नाही की चीन फार प्रॉब्लेम मध्ये वगैरे आहे कारण त्यांचं अंतर्गत कंझम्पशन खूप जास्त आहे. त्यामुळे "चीन साठी चीन, आणि बाकी जगासाठी भारत" अशी एक प्रतिमा उत्पादन क्षेत्रात तयार झाली आहे. भारताबरोबरच व्हिएतनाम, थायलंड, इंडोनेशिया या दक्षिण पूर्व देशांना फायदा होणार आहे. 

संधी दाराशी आली आहे. तिचं सोनं करण्यासाठी "उत्पादकता" हा कळीचा मुद्दा आहे. आजच्या घडीला भारताची उत्पादकता ही जगात खूप कमी आहे. यावर जास्त बोलत नाही कारण गाडी मग वेगळ्याच ट्रॅक वर जाईल. फक्त एक माझं मत सांगतो. या संधीचा फायदा उठवण्यासाठी प्रचंड सामाजिक स्थित्यंतर तर राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. तसं जर झालं र पुढील ७-८ वर्षे प्रचंड घडामोडीची असणार आहेत. 

आंतरराष्ट्रीय जिओ पॉलिटिकल सिस्टम घडामोडी मध्ये आपली पावले बरोबर पडली तर भविष्यात येणाऱ्या  अनेक दीपावली समृद्धी घेऊन येणार आहेत, असा अनेकांचा अंदाज आहे. मीही त्याबद्दल आशावादी आहे

Monday, 3 October 2022

ब्रेन ड्रेन

 आजकाल बऱ्याच वेळा हे दिसून येतं आहे की अनेक घरातून मुलं मुली हे परदेशात शिकायला जातात आणि तिकडेच नोकरी पकडून सेटल होतात. बऱ्याचदा आपण या गोष्टीकडे "आजची तरुणाई पैशाच्या मागे लागली आहे" किंवा "चंगळवाद फोफावला आहे" इतकं बोलून त्या वस्तुस्थितीची बोळवण करून टाकतो.  ही तिकडे गेलेली मुलं मुली भारतात असणाऱ्या लोकांचा चेष्टेचा विषय बनतो. 

माझ्या मते आपण हे सगळ्या गोष्टीकडे फार सुपरफिशियल पद्धतीने बघतो आहोत. म्हणजे अगदी माझीच केस स्टडी घेऊ यात. माझा व्यवसाय हा बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. देवकृपेने बऱ्यापैकी नाव वगैरे कमावलं आहे. एका मल्टी नॅशनल कंपनीशी सामंजस्य करार झालेला आहे. बरं सेटको बोर्ड आमच्या मुलांना कंपनीत घ्यायला तयार आहे. तरीही माझा मोठा मुलगा मेकॅनिकल इंजिनियरिंग करून एम एस करण्यासाठी अमेरिकेत गेला आहे आणि परत येण्याची सुतराम शक्यता नाही आहे. माझ्या पार्टनर ची मुलगी सुद्धा सेटको त काम करून आता अमेरिकेला गेली आहे. आणि तिची पण परतण्याची शक्यता धूसर आहे. यापलीकडे जाऊन माझ्या मोठ्या मुलाने नील ला मेकॅनिकल इंजिनियरिंग न घेता कॉम्पुटर सायन्स घ्यायला लावलं आहे आणि त्यालाही तो तिकडे बोलावतो आहे. 

माझ्या देशप्रेमाच्या मला फार गप्पा मारायला आवडत नाही. पण ज्या पद्धतीने मी कंपनी चालवतो त्यावरून माझ्या कंपनीतल्या लोकांनाच नव्हे तर माझ्या अमेरिकन काउंटर पार्ट ला पण माहिती आहे की माझं भारतावर आणि इथल्या लोकांवर किती प्रेम आहे ते. त्यामुळे ती भावना घरात पण झिरपलेली आहे, असा माझा समज आहे. 

आता प्रश्न हा आहे की इतकं असलं तरी माझी पोरं बाहेर राहण्याचा विचार करत आहेत. मग याचं उत्तरदायित्व आपल्या सोशल इको सिस्टम वर आहे असं माझं हळूहळू मत बनत चाललं आहे. 

आपल्या इथलं असलेलं क्वालिटी ऑफ लाईफ, मग त्यामध्ये रस्त्याची कंडिशन, सार्वजनिक स्वच्छता, आपल्या इथं असणारी जातिव्यवस्था, धार्मिक भावनेचं झालेलं अति उन्मादीकरण या आणि यासारख्या अनेक गोष्टी कारणीभूत असाव्यात असा माझा दावा नाही तर कयास आहे. घरापासून कॉलेज पर्यंत जाताना फ्लेक्स वर दिसणारे भावी नेते जे गळ्यात सोन्याच्या साखळ्या घालून असतात, कानावर सातत्याने पडणाऱ्या भ्रष्टाचाऱ्याच्या बातम्या, शिक्षणासारख्या महत्वाच्या क्षेत्रात राजकारण्यांचा झालेला शिरकाव या सगळ्यांचा तरुणाईच्या मनावर सबकॉन्शसली फरक पडत नसेल असं जर आपल्याला वाटत असेल तर मोठी गल्लत होत आहे.

वानगीदाखल दोन घटना सांगतो. सहावी सातवीत असताना निलला शाळेतर्फे ट्राफिक कंट्रोल कसा करायचा हे शिकवायला रस्त्यावर नेलं होतं. लाल सिग्नल असल्यामुळे ते बारा वर्षाच्या पोराने एक इनोव्हाला हात दाखवून अडवलं. तर त्या गाडीतल्या पांढरे कपडे आणि सोनसाखळी घातलेल्या सद्गृहस्थाने निलला, बारा वर्षाच्या पोराला "ए ***चोद चल, बाजूला हो" असं सांगून गाडी पुढं दामटली. 

सिंहगडच्या पायथ्याला काही गावकरी आपल्या शेतात कार पार्किंग साठी जागा देतात. यश, नील आणि मी असे तिघेही होतो. सिन असा होता की आमच्या शेजारी एका पोलीस अधिकाऱ्याची एर्तिगा होती. तो अधिकारी आपल्या कुटुंबकबिला घेऊन आला होता. पण बाहेर जाताना त्या गावकऱ्याने त्याला पार्किंग चे ३० रु मागितले तेव्हा "पैसे कसले मागतोस हरामखोर" असं म्हणत निघून ती गाडी निघून गेली. 

अशा घटनांचा मुलांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत नसेल का? घरातील एक सद्भाव वातावरण आणि घराच्या बाहेर जे १२ एक तास असतात तिथलं विचित्र वातावरण यामुळे ही तरुणाई कन्फ्युज होत नसेल का? 

त्यामुळे हे बिघडलेलं सोशल इंजिनियरिंग जर आपण बदललं नाही तर हे प्रश्न दिवसेंदिवस उग्र होत जाणार आहे. आज अनेक शहरात बिल्डिंगमध्ये फक्त म्हातारे लोक राहत आहेत. राष्ट्रप्रथम ही भावना खऱ्या अर्थाने मनात रुजवायची असेल तर शैक्षणिक, मनुष्यबळ विकास, सामाजिक विकास या मूलभूत गोष्टीवर अगदी मुळापासून काम करत प्रगल्भ समाज बनवणं ही काळाची गरज असणार आहे. 


ब्रेन ड्रेन 

Monday, 26 September 2022

आपल्याला माणसं मिळत नाहीत?

 सध्या उत्पादन क्षेत्रातील लघु उद्योजकांची आपले प्रश्न मांडण्याबाबतीत कुठलीही मिटिंग असेल तर त्यातील सगळ्यात जास्त कुठल्या प्रश्नावर चर्चा होत असेल तर तो आहे "आपल्याला माणसं मिळत नाहीत?". मोठी गमतीशीर गोष्ट आहे. एकीकडे १४० कोटी लोकांचा देश आहे असं आपण म्हणतो आणि त्यापैकी ४० ते ४५ कोटी रोजगार करू शकतील अशी तरुणाईची फौज आहे असंही म्हंटलं जातं आणि तरीही आम्हा लोकांचा "चांगली माणसं मिळत नाही" हा धोशा काही सुटत नाही. 

इथं खरी मेख आहे. माणसं मिळतात पण "चांगली" माणसं मिळत नाही हा मोठा प्रश्न आहे. चांगली म्हणजे रोजगारक्षम. म्हणजे कोण तर निष्ठेने आपल्या कामाप्रती लोक वचनबद्ध असतील असे लोक. 

लघु उद्योजकांनी एक गोष्ट आता लक्षात घ्यायला हवी या प्रश्नामागे मोठी सामाजिक पार्श्वभूमी आहे. गेल्या दोन अडीच दशकात झालेला अनेक वेगळ्या क्षेत्रातील उद्योगांचा उदय, त्यांना जे मनुष्यबळ पाहिजे होतं त्यांची विविध अभियांत्रिकी शैक्षणिक संस्थामार्फत झालेला पुरवठा, त्यातून तयार झालेलं अर्थकारण, त्या अर्थकारणातून उभ्या राहिलेल्या तथाकथित शिक्षणसम्राट आणि शिक्षणमहर्षीं लोकांच्या शैक्षणिक संस्था, तिथं मिळणारं अत्यंत तकलादू शिक्षण अशी एक विचित्र साखळी तयार झाली आहे. त्याबरोबर प्रश्न उभा झाला आहे तो वर उल्लेख केलेल्या गुणांचा, निष्ठा आणि वचनबद्धता, पूर्णतः अभाव. इंटरनेट च्या माध्यमातून या तरुणाईचं लक्ष ज्या स्वयंविकासाकडे असायला हवं त्यालाच हरताळ फासला जातोय. खर्च वाढण्याचे नवनवीन मार्ग तयार होत आहेत, त्यातून पिअर प्रेशर तयार होत आहे. या सगळ्या घडामोडीतून तयार काय झालं तर मागणीपेक्षा पुरवठा जास्त झालेले, शैक्षणिक आघाडीवर अत्यंत कमकुवत आणि मूळ सिद्धांताच्या कसोटीवर न उतरणारे रोजगारक्षम नसणाऱ्या युवकांची फौज उत्पादनक्षेत्रात धडकू लागली. आणि आपण लघु उत्पादक एका विचित्र कात्रीत अडकलो की माणसाच्या सागरात मात्र आपल्या योग्य माणसे मिळत नाहीत. 

आता हे प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी तर एक मोठं सामाजिक स्थित्यंतर घडायला हवं आणि त्यासाठी प्रचंड राजकीय इच्छशक्ती हवी. हे तर आपल्या हातात नाही. मग आजच्या घडीला आपल्या हातात उरतं,  ते म्हणजे आपण या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी काय करू शकतो. खाली काही मुद्दे देतो, त्यावर आपण काम करायला हवं असं माझं मत आहे. 

१. सगळ्यात पहिले म्हणजे काही शैक्षणिक संस्थांसोबत आपण सहयोग तत्व अंगीकारायला हवं. म्हणजे आपल्याला आयटीआय, तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी या शैक्षणिक संस्थांशी संपर्क साधून त्यांच्याबरोबर एकत्रित काम करायला हवं. तिथल्या मुलामुलींना इंटर्नशिप आणि प्रोजेक्ट्स आपण द्यायला हवेत. ज्यायोगे तुमच्या व्यवसायाचं, मग भले तो छोटा असेना, होतकरू तरुणाई मध्ये ब्रॅण्डिंग होईल. आणि हे गरजेचं आहे. 

२. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रशिक्षण. आपल्या व्यवसायाच्या अनुषंगाने जी कौशल्ये आपल्या कर्मचाऱ्यांच्या मध्ये असावीत असं वाटतं त्यासाठी आपली प्रशिक्षण योजना असावी. आपल्याला तयार माणसे मिळतील अशी परिस्थिती नाही हे वास्तव स्वीकारायला हवं. आपण लघुउद्योजक या महत्वाच्या गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष करतो असा माझा अनुभव आहे. 

३. पगारापलीकडे जाऊन आपण आपल्या एम्प्लॉईज साठी काय करतो हे ही आजची तरुणाई बघते. जिथे आपण काम करतो तिथलं वातावरण कसं आहे, स्वच्छता आणि टापटीप आहे का, बाकी कुठल्या सुविधा दिल्या जातात याकडे सुद्धा लघु उद्योजकांनी लक्ष द्यायला हवे. पी एफ, लिव्ह मॅनेजमेन्ट, लिव्ह एनकॅशमेंट, ग्रॅच्युइटी या सारख्या सुविधा द्याव्यात. त्यासाठी २० लोकांच्या हेडकाऊन्ट होण्याची वाट पाहू नये. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी फार खर्च येत नाही. 

४. कार्य संस्कृती (वर्क कल्चर) विकसित करायला हवं. कंपनीमध्ये सौहार्दाचे वातावरण असावं. ते तयार करण्यासाठी मूल्याधिष्ठित कार्य संस्कृती रुजवायला हवी. व्यवसायाची भविष्यातील वृद्धी कशी आणि कुठल्या पद्धतीने होणार याबद्दल खुली चर्चा होणे अपेक्षित आहे. कर्मचारी व्यवसायाशी प्रतिबद्ध असण्यासाठी ही कार्य संस्कृती खूप महत्वाचं काम करते. 

५. सगळ्यात मुख्य म्हणजे ह्युमन ऍसेट या विभागाला व्यवसायाच्या इतर प्राथमिक विभागाप्रमाणे महत्व द्यायला हवं. बऱ्याचदा उद्योजक ह्युमन असत विभागाला सर्वात कमी महत्व देतो, खरंतर काही जण अजिबात महत्वच देत नाही. खरंतर जितकी काळजी आपण एखादी मशीन विकत घेताना तितकीच, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त काळजी आपण माणसं कंपनीत घेताना घ्यायला हवी. 

शैक्षणिक संस्था, समाज आणि आपण लघु उद्योजक हे तीन कोन आहेत, रोजगारक्षम युवक/युवती तयार करण्याच्या त्रिकोणाचे. ऍकेडेमिक आणि समाज त्यांची जबाबदारी कसे पार पाडतील हा त्यांचा प्रश्न आहे. पण आपण या समस्येला कशा पद्धतीने हाताळू शकतो याचे काही मुद्दे वर मांडले आहेत. यापेक्षा अजून काही मुद्दे असतील तर त्यावर काही चर्चा नक्कीच घडू शकते. फक्त त्यावेळेस मानसिकता ही प्रश्नाभोवती फेर धरायची नको तर त्यावर सोल्युशन काय आहे आणि त्यावर काय वेगवेगळे उपाय योजता येतील यावर आपलं लक्ष केंद्रित करायला हवं. कारण इंग्रजी म्हणीप्रमाणे "God help those, who help themselves" 

Monday, 29 August 2022

बर्न आउट

 प्रत्येक व्यावसायिकाला मग तो उद्योजक असो वा नोकरदार, बर्न आउट होणे या भावनेचा शिकार कधी ना कधी तरी व्हावे लागते. बर्न आउट ला मराठीत प्रतिशब्द नाही आहे म्हणून आपण हाच शब्द वापरू यात. नाही म्हणायला "निरिच्छ" हा शब्द त्याच्या जवळ पोहोचतो पण तरीही प्रतिशब्द म्हणता येत नाही. 

ही बर्न आउट भावना नैराश्याच्या जवळपास पोहोचणारी असते. त्यामुळे त्यावर वेळीच काम करणं गरजेचं असतं. अन्यथा कोणताही निर्णय घेताना किंवा कृती करताना "याची काय गरज आहे?" असा प्रश्न विचारत आपण चालढकल करतो आणि हे व्यवसायासाठी मारक ठरू शकतं. त्या निरिच्छतेचा आवाका कितीही मोठा असू शकतो, अगदी सकाळी ऑफिसला जाताना मनावर दगड ठेवून जाणे, हे देखील त्यात अंतर्भूत असू शकतं. 

बर्न आउट या भावनेवर विजय मिळवायचा असेल तर अनेक उपाय आहेत. पण त्यावरील मूलभूत अशा तीन गोष्टीवर काम केलं तर व्यवसायाच्या कुठल्याही पातळीवर काम करताना बर्न आउट हा भावना कमी स्पर्श करण्याची शक्यता असते. आणि ती शक्यताच असते, खात्री नाही. 

पहिली गोष्ट म्हणजे आपल्या अस्तित्वाचा मूळ उद्देश शोधणे. थोडं अवघड आहे पण अशक्य नाही. तो एकदा शोधला की  तुमच्या लक्षात येईल की मूळ उद्देश सध्या करताना त्यावर पैसे किंवा नफा किंवा कुठलीही ऐषोआरामाची चटक लावणारी गोष्ट याचा प्रभाव नसतो. त्यामुळे एकदा हे लक्षात आलं की आपण काम हे कुठलीही मूर्त गोष्ट मिळवण्यासाठी नव्हे तर अमूर्त असं समाधान या साठी करतो आहे, बर्न आउट या भावनेपासून आपण कोसो दूर जातो. इथे आर्थिक उद्देश आणि मूळ उद्देश यातील फरक समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याची गल्लत होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. 

दुसरी महत्वाची गोष्ट जी वर उल्लेखलेल्या मूळ उद्देशाशी संबंधित आहे आणि ती म्हणजे मूळ उद्देशाला केंद्रभागी ठेवून आपल्या व्यावसायिक नीतिमूल्यांची आखणी करायची करणं हे अत्यंत महत्वाचं असतं. अगदी खरं सांगायचं म्हणजे त्याचे एक आखीव रेखीव फॉरमॅट आहे. दुर्दैवाने तो कुठल्याही विद्यापीठात शिकवला जात नाही. त्यासाठी आपल्याला एक व्यावसायिक मेंटॉर ची तर गरज असतेच पण त्यांनी जे सांगितलं त्याला आपल्या स्वतःच्या कल्पनाशक्तीची जोड देऊन व्यवसायाची श्वेतपत्रिका तयार करावी लागते. त्यामध्ये ऑर्गनायझेशनमध्ये एक सॉलिड टीम तयार करणे ही पहिली गरज आहे. ही  करताना बऱ्याचदा उद्योजकाने आपले विकनेस ओळखून, त्यामध्ये स्ट्रेंथ बाळगणारे टीम मेंबर आणणे, इतकंच नव्हे तर एका कक्षेनंतर आपल्या स्ट्रेंथ सुद्धा डेलिगेट करण्याची तयारी हवी. हे एकदा झालं की उद्योजक स्वतः अनलर्निंग आणि रीलर्निंग च्या प्रोसेस मधून जातो आणि बर्न आउट भावना त्याच्या जवळपास पण पोहोचत नाही. व्यवसायाशी संदर्भात असणाऱ्या सर्व गोष्टींसाठी मी आणि मीच जबाबदार आहे या भावनेपासून मुक्ती घ्यायला हवी. आणि काही अगदी क्षुल्लक गोष्टीपासून आपलं लक्ष काढून जे व्यवसायासाठी अत्यंत महत्वाचं आहे त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला हवं. हे एकदा केलं की उद्योजकच नव्हे तर पूर्ण आस्थापन हे आर्थिक नव्हे तर मूळ उद्देशाला जागत व्यवसाय करतं. आर्थिक कामगिरी हा आपल्या कृतिशीलतेचा बाय प्रॉडक्ट  बनण्याची शक्यता आहे. 

इथं एक मेख आहे. हे वर जे लिहिलं आहे ते वाचताना फार छान वाटतं पण विश्वास ठेवा, उद्योजकाला व्यवसायापासून अलिप्त ठेवून वर उल्लेखलेलं प्रत्यक्षात आणणं हे फार अवघड आहे. जगातला प्रत्येक मेंटॉर, मग तो सायमन सिनेक असू द्या की जिम कॉलिन्स किंवा अगदी आपल्या भारतातील प्रत्येक जण याचं महत्व विशद करतो तरी अनेक व्यावसायिक हे करू शकत नाहीत मग त्यामध्ये कदाचित असुरक्षितेतची भावना असेल किंवा वृद्धिधिष्ठित मानसिकता नसेल. ते मग टर्नओव्हर किंवा नफा यांच्यामागे धावत राहतात आणि काही कारणाने ते साध्य झाले नाही तर बर्न आउट भावनेचा शिकार होतात. एकदा तुम्ही अल्पकालीन फायद्यावर लक्ष केंद्रित केलं आणि दीर्घकालीन योजनेकडे दुर्लक्ष केलं की निरिच्छता येण्याची शक्यता आहे. 

तिसरा मुद्दा हा व्यवसायाशी नव्हे तर वैयक्तिक उद्योजकांशी संबंधित आहे आणि तो म्हणजे व्यायामाच्या मदतीने स्वतःला आरोग्यदायी आणि तंदुरुस्त ठेवणे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या भावभावना या आपल्या शरीरात तयार होणारे केमिकल नियंत्रित करतात. बर्न आउट कुठल्या केमिकल मुळे प्रभावित होते हे मला  माहिती नाही पण व्यायामामुळे रिलीज होणारे एंडोर्फिन्स मात्र तुम्हाला आनंदी ठेवू शकते, हे मी खात्रीने सांगू शकतो. एव्हाना मला हे कळून चुकलं आहे व्यायामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहता. शारीरिक तंदुरुस्ती हा तर साईड इफेक्ट आहे. 

कुणी असं म्हणू शकतं की बर्न आउट (निरिच्छता) ही काही मेडिकल डिसऑर्डर नाही आहे. पण मग अहंकार तरी कुठे मेडिकल डिसऑर्डर आहे.? पण ज्या पद्धतीने अहंकार हा अवगुण व्यावसायिक अपयश देतो त्याच पद्धतीने बर्न आउट ही भावना व्यवसायाच्या कमी वृद्धी कडे नेऊ शकतो. त्यावर वेळीच काम करून नियंत्रण आणणे यात व्यावसायिक शहाणपण आहे.  

 

Friday, 26 August 2022

burn out

काल डायनॅमिक क्रेनच्या मॅनेजिंग डायरेक्टर भारती गोखले यांनी माझ्याबरोबर एक पॉडकास्ट  रेकॉर्ड केला आणि तो करताना प्रश्न विचारला "Dont you feel burn out while facing day to day challenges?".

अगदी खरं सांगायचं तर एक काळ होता की सकाळी ऑफिसला जाताना वाटायचं की कशासाठी आपण ही झकमारी करतोय. त्यातही अँजिओप्लास्टी दुसर्यादा झाली तेव्हा तर ती भावना फार प्रबळ झाली होती. आणि त्याच सुमारास मनीष गुप्ता हे एक मेंटर म्हणून माझ्या आयुष्यात प्रवेश करते झाले. त्यांनी ज्या गोष्टी म्हणून शिकवल्या त्यातील तीन गोष्टीमुळे या बर्न आउट व्हायच्या प्रोसेस ला पराभूत करू शकलो. 

पहिली गोष्ट म्हणजे आयुष्याचा मूळ उद्देश काय आहे हे शोधलं. गंमत म्हणजे त्या उद्देशात पैशाला किंवा कुठल्याही भौतिक गोष्टीला स्थानच नव्हतं. एकदा मनाला हे कळलं की आपण स्वतःच्या सुखासीनतेची चटक लावणाऱ्या कुठल्याही गोष्टीला वश करण्यासाठी काम करत नाही आहे, मग कामाप्रति निरिच्छ भावना येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 

दुसरी महत्वाची गोष्ट ही त्या उद्देशाची निगडित आहे आणि ती म्हणजे तो उद्देश सफल करण्यासाठी स्ट्रक्चर शिकलो आणि त्यावर जीवापाड मेहनत केली. मग त्यासाठी व्यवसायात टीम उभी केली, त्यांना आवडणारी कामं दिली, त्यांची जबाबदारी वाढवली आणि प्रत्येक गोष्टीला मीच जबाबदार आहे या भावनेला फाटा दिला, लेड गो करायला शिकलो. हे जर केलं नसतं तर मी आणि पर्यायाने व्यवसाय आर्थिक उद्देशामागे पळत राहिला असता आणि मीच नव्हे तर अख्खी कंपनी बर्न आउट या भावनेचा शिकार झाली असती. 

विश्वास ठेवा, वरील दोन्ही गोष्टी ऐकायला फार मस्त वाटतात पण त्यावर काम करणं हे प्रचंड अवघड आहे. सायमन सिनेक, जिम कॉलिन्स, झीग झिगलर पासून ते आमच्या मनीष गुप्तांपर्यंत जगातला प्रत्येक मेंटर याच महत्व सांगतो, पण तरीही जगातील बहुसंख्य उद्योजक यावर मात करू शकत नाही. 

तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शिकलो आणि ते म्हणजे व्यायामाचे महत्व. २०१७ पर्यंत मी व्यायाम करायचो, पण रेग्युलरली इररेग्युलर या पद्धतीने. मेंटली बर्न आउट च्या भावनेला त्याची जागा दाखवायची असेल तर शारीरिक तंदुरुस्ती अत्यंत महत्वाची आहे आणि त्याचं महत्व मला फार उशिरा कळलं. मार्च २०१७ नंतर मात्र व्यायाम हा आयुष्याचा अविभाज्य अंग बनला. इतका की आता सलग दोन-तीन दिवस काही कारणाने व्यायाम बुडला तर आजारी आहे असं वाटतं. डॉक्टर महेंद्र लोमटे यांचं वाक्य मी मनात कोरून ठेवलं आहे. "Exercise helps you to be psychologically fit. Physical fitness is just side effect." 

गंमत म्हणजे बर्न आउट ही मेडिकल डिसऑर्डर नाही आहे. पण मग अहंकार सुद्धा मेडिकल डिसऑर्डर नाही आहे. पण अहंकार हा अवगुण म्हणून जितका धोकादायक आहे तितकाच बर्न आउट सुद्धा. त्याला नियंत्रणात ठेवणे यात शहाणपण आहे. 

Friday, 12 August 2022

आडमुठे लोक

२००५-०६ ची गोष्ट आहे. आमच्या व्यवसायासाठी आम्हाला काही प्रिसिजन कामासाठी मशीन शॉप ची गरज होती. मशिन्स विकत घ्यायची तोवर आमची ऐपत नव्हती. म्हणून आम्ही मग एक व्हेंडर डेव्हलप केला. सगळं काम प्रचंड ऍक्यूरसी चं, अन त्यामुळे क्रिटिकल. असा डिलिव्हरन्स असल्यामुळे का कोण जाणे, पण आमचा व्हेंडर आमचा प्रचंड घाम काढायचा. मनाला वाटेल तो रेट आणि मनाला वाटेल तो डिलिव्हरी पिरियड. क्वालिटी मात्र चांगली होती त्याची. पण कॉस्ट आणि डिलिव्हरी तो आम्हाला सॉलिड थर्ड लावायचा. आणि काही बोलायला जावं तर त्याचा तोरा अफाट. अनेक वर्ष त्याच्या बरोबर काम केलं तरी त्याचा गंड काही कमी झाला नाही. 

एकदा एक जॉब बनवायचा म्हणून मी त्याच्याकडे टाकला. टाटा मोटर्स ची ऑर्डर घेतली होती. ढाळे साहेबांनी दिली होती. मी आपला फॉलो अप घ्यायचो, पण आज देतो, उद्या देतो अशी चालढकल चालली होती. तब्बल तीन आठवड्याने मी त्या मालकाला न सांगता त्याच्या वर्कशॉप मध्ये सरप्राईज व्हिजिट दिली. तर रॉ मटेरियल जसं च्या तसं पडलं होतं. म्हणजे थोडक्यात कामाला हातच लावला नव्हता. माझं टाळकंच सटकलं. मी तिथून मनाशी गाठ मांडून निघालो. म्हंटलं या व्हेंडर वरची डिपेन्डन्सी बंदच करायची. बँक प्रपोजल बनवलं आणि शांतीत क्रांती करत स्वतःचं मशीन शॉप टाकलं. आणि जी कामं म्हणून त्या व्हेंडर कडे व्हायची ती इन हाऊस करायला लागलो. पुढील काळात व्यवसाय वृद्धी करण्यासाठी हा निर्णय फार महत्वाचा ठरला. 

आज हे आठवायचं कारण म्हणजे पुन्हा एकदा अशीच परिस्थिती आली आहे. गेल्या काही वर्षात खूप प्रॉडक्टस आम्ही भारतीय मार्केट मध्ये लॉन्च केले आणि परत एकदा आम्हाला एक प्रिसिजन जॉब आउटसोर्स करायची वेळ आली. यावेळी व्हेंडर बाहेरगावचा होता. चांगली दोनशे शाफ्ट्स ची ऑर्डर होती. पण त्याआधी ज्या ट्रायल साठी ऑर्डर दिल्या होत्या त्याच्या काही जॉब्ज मध्ये थोडे क्वालिटी इश्यू होते. आमच्या लोकांनी त्याला ते सांगायचा प्रयत्न केला, तर तो तोऱ्यात सांगू लागला की तुमच्या चेकिंग प्रोसेस मध्ये काही तरी चूक आहे वगैरे. आमची लोक तशी मवाळ आहेत, म्हणजे कंपनीला कोअर व्हॅल्यूज ला धरून आहेत आणि आम्ही व्हेंडर लोकांना खूप अकोमोडेट करून घेतो. पण या व्हेंडर चा अहंकार काही औरच होता. शेवटी ती दोनशे शाफ्टची ऑर्डर आज कॅन्सल केली. आणि आमच्या कंपनीत सांगितलं, हा पार्ट बनवण्यासाठी आता आपणच कंबर कसू यात आणि बनवून टाकू. आता अशी शक्यता आहे की येत्या वर्षात आमचं मशीन शॉप अजून ग्रो होईल. 

सांगायचा मुद्दा हा की व्यवसायात वृद्धी करण्यासाठी नेहमी आपल्याला साथ देणारेच हवेत असंच नाही तर कधी कधी वरती उल्लेखलेल्या दोन व्हेंडर सारखे आडमुठे लोक पण असावेत. ज्यांच्यामुळे आपण आपल्याच क्षमतेला आव्हान देऊ शकतो आणि काहीतरी भन्नाट घडू शकतं. 

(काही लोक मला सुचवतील कि अनेक इंजिनियरिंग वर्कशॉप्स असताना सुद्धा तुम्हाला दुसरा व्हेंडर शोधता येत नाही का? तर कुणी माझा क्लास घ्यायच्या आधी सांगून टाकतो की कॉस्ट, डिलिव्हरी आणि क्वालिटी या सगळ्यांचा मेळ लावताना आमचे पार्ट बनवताना बऱ्याच जणांची दमछाक होते, अगदी आमची सुद्धा.  म्हणजे अगदी रॉकेट सायन्स नसलं तरी आमची ऍक्यूरसी ची गरज ही बाकी इंजिनियरिंग कॉम्पोनंट पेक्षा खूप जास्त आहे)

 

Saturday, 16 April 2022

आपलं घर हॉस्पिटल

तर स्टोरी अशी आहे की आमच्या फळणीकर सरांची अशी फार इच्छा होती की एकदा तरी गडकरी सरांनी आपलं घर या प्रकल्पाला भेट द्यावी. दोघेही नागपूरकर हा एक दुवा होताच. आधी बरेच प्रयत्न झाले पण निष्फळ ठरले. 

आपलं घर ने त्यांचं छोटेखानी हॉस्पिटल मोठं करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचवेळेस फळणीकरांनी या हॉस्पिटलच्या उदघाटनाला गडकरी साहेब यावेत हा मानस व्यक्त केला. फळणीकर हा माणूस असा आहे की त्यांच्या मनात काही आलं की झपाटल्यासारखा काम करतो. ध्यासच पकडतात ते. 

वर्षभरापूर्वी हॉस्पिटलचं काम चालू झालेलं आणि ते दोन-तीन महिन्यात पूर्ण होईल असा अंदाज आल्यावर फळणीकरांनी  मोर्चेबांधणी केली. आपलं घरचे दिल्लीतील सुहृद आणि इतर रिसोर्सेस च्या मदतीने गडकरी साहेबापर्यंत पोहोचता येईल अशी व्यवस्था केली. २८ मार्च ची माननीय श्री नितीन गडकरी यांना भेटता येईल असं आम्हाला कळवण्यात आलं. २७ मार्च ला आम्ही पोहोचलो खरं आणि २८ मार्चला सकाळी आम्हाला निरोप मिळाला की गडकरी साहेब गोव्याला शपथविधी साठी गेले आहेत, दुपारी चार वाजता फोन करा. 

२८ मार्चला मग मी स्वार्थ साधला आणि फळणीकरांच्या हस्ते सेटको च्या मानेसार प्लांट चं उदघाटन संपन्न झालं आणि चार वाजता हॉटेल वर येऊन थांबलो. मंत्री महोदयांचं शेड्युल ऐकूनच छाती दडपली होती. २५ मार्च सांगली, २६ पुणे, २७, नागपूर, २८ गोवा. हे सगळं बोलत असतानाच आम्हाला निरोप मिळाला की संध्याकाळी साडेसात वाजता साहेबांच्या बंगल्यावर पोहोचा. तिथं गेल्यावर कळलं की साहेब माननीय राष्ट्रपतींना भेटायला गेलेले. अशी चर्चा चालू झालीच होती की उद्याची म्हणजे २९ मार्च ची कुठली वेळ मिळेल. इतक्यात साहेब आले असं कळलं आणि आम्हाला साहेबांना निमंत्रण देता आलं, जे आम्ही दिलं होतं १३ मे नंतर कधीचं पण. 

गडकरी साहेबांनी मोठ्या मनाने आमचं निमंत्रण स्वीकारलं. फळणीकरांचा आनंद गगनात मावेना. आणि आम्ही पुण्यात परत आलो. हॉस्पिटलच्या बिल्डिंगचं काम जोरात चालू होतं, कारण ३०-३५% काम राहिल होतं. मे ची तारीख मिळाली असती तर फार धावपळ झाली असती. 

आणि ३ एप्रिलला गडकरी साहेबांच्या ऑफिसमधून फोन आला १४ एप्रिल ला उदघाटन करू शकतो, नंतर चार पाच महिने पुण्यात यायचा प्लॅन नाही. फळणीकरांनी होकार दिला. 

फळणीकर हो म्हणाले खरे पण दहा दिवसात उरलेलं काम पूर्ण करणं हे निव्वळ अशक्य काम होतं. पण अशक्याला शक्य करण्यात फळणीकरांचं अख्ख आयुष्य गेलं. आणि इथं त्यांना साथ मिळाली ती श्री उदापूरे नावाच्या चमत्कारी बाबाची. हो, चमत्कारच म्हणायला हवा. केवळ दहा दिवसांमध्ये उदापूरे सर आणि त्यांचे पार्टनर प्रशांत सर यांनी, दोन एकशे लोकांची टीम लावून न भूतो न भविष्यती असं काम करत एक अत्यंत रेखीव अशी बिल्डिंग उदघाटनाच्या दिवशी तयार केली. 

१४ एप्रिल ला उदघाटनाचा सोहळा देखणा झाला. श्री नितीन गडकरी, औरंगाबादच्या हेडगेवार हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ तुपकरी, आणि जेष्ठ अभिनेते श्री दिलीप प्रभावळकर या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हॉस्पिटलचं उदघाटन झालं. सर्वांची भाषणं यथोचित झाली. या प्रमुख पाहुण्यांच्या बरोबरच अनेक देणगीदार, सीएसआर मधून मदत करणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी, दिल्लीतील उच्चाधिकारी कार्यक्रमास हजर होते. 

हॉस्पिटल पूर्ण कार्यन्वित होण्यात अजून दीड एक महिना लागेल. 

ते चालू झाल्यावर आपलं घरच्या समाजोपयोगी कार्याचं एक नवीन पर्व चालू होईल यात शंका नाही. 

या प्रकल्पाला फेसबुकवरील काही लोकांनी सढळ हातांनी मदत केली, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक  धन्यवाद. 


Monday, 14 March 2022

लेख क्र १०

डेलिगेशन या व्यवस्थापकीय कौशल्याला मराठीत प्रतिशब्द नाही आहे. दुसर्यांना अधिकार सुपूर्द करणे असे चार शब्द वापरल्यावर डेलिगेशन शब्दाचा अर्थ ध्वनित होतो. एखाद्या व्यवसायाला थोडं रंगरूप आल्यावर व्यावसायिकाने जबाबदाऱ्या आपल्या सहाय्यकाला सुपूर्त कराव्यात असं अभिप्रेत असतं. म्हणायला अत्यंत सोपी प्रतिक्रिया पण प्रत्यक्षात आणायला अतिशय अवघड. त्याला काही कारणं आहेत. ज्यांच्या खांद्यावर जबाबदारी टाकावी असे लोक आपले सहकारी म्हणून असणं ही फार अनुकूल परिस्थिती.  पण ती सहजासहजी तयार होत नाही. ती तयार करण्याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे आपली इंटरव्ह्यू प्रोसेस इतकी सक्षम करायची की ती जबाबदारी निभावणारी लोक घ्यायची किंवा व्यवसायाची इको सिस्टम अशी बनवायची की असे लोक अंतर्गत तयार करायचे. 

ही झाली एक बाजू. पण दुसरी महत्त्वाची बाजू असते ती म्हणजे आपली मानसिकता आहे का जबाबदारी डेलिगेट करण्याची. मुख्य म्हणजे ती जबाबदारी देताना आपण अधिकार पण देतो आहे का? बऱ्याचदा व्यावसायिकाला किंवा व्यवस्थापकाला जबाबदारी तर द्यायची असते पण त्या बरोबरीने द्यावे लागणारे अधिकार मात्र द्यायची तयारी नसते. "हे तू कर, पण फायनल करण्याच्या अगोदर एकदा मला विचार" हा शेवटचा संवाद झाला की आतापर्यंत जबाबदारी देण्याचं फक्त नाटक केलं होतं असं दिसून येतं. 

डेलिगेशन आपल्याला अनेक वेळा करावं लागतं. सगळ्यात पहिले व्यावसायिकाला हे समजून घेतलं पाहिजे की त्याला व्यवसायाच्या सर्व बाजूंची पूर्णतः माहिती नसते. आणि असली तरी बऱ्याचदा वृद्धीला पोषक नसते. जसजसा व्यवसाय वाढत जातो तसं काही जबाबदारी ही त्या क्षेत्रातील माहितगार लोकांना देणं हे व्यवसायाला पोषक ठरतं. अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर उत्पादन क्षेत्रातील व्यवसाय हे शक्यतो इंजिनियर लोकांनी चालू केले असतात. तांत्रिक क्षेत्रातील त्यांचं ज्ञान हे व्यवसाय पूरक असलं तरी बऱ्याचदा फायनान्स या क्षेत्रातील त्यांचं ज्ञान हे तोकडं असतं. यावेळी फायनान्स ज्यांना कळतं असे लोक व्यवसायात आणून त्यांना त्या डिपार्टमेंट ची जाबाबदारी देणं हे शहाणपणाचं ठरतं. असंच मी एचआर किंवा पर्चेस क्षेत्राबद्दल म्हणू शकेल. थोडक्यात सांगायचं तर व्यावसायिकाने आपली स्ट्रेंथ ओळखून तिचा व्यवसायासाठी वापर करावा आणि ज्या क्षेत्रात विकनेस आहे ती जबाबदारी दुसर्यांना द्यावी. 

बऱ्याचदा कामाचा आवाका वाढतो आणि व्यावसायिकाला भविष्यात काय करायचं यावर जास्त काम करावं लागतं. ते करताना व्यावसायिक हा दैनंदिन कामात अडकून पडला तर तो फ्युचर प्लॅनिंग करू शकत नाही. खरंतर व्यवसायाने एक चांगली पातळी गाठल्यावर व्यावसायिकाने नवीन उत्पादन शोधणे, नवीन मार्केट शोधणे, भौगोलिकदृष्ट्या व्यवसायाची वाढ करणे या विविध क्षेत्रात काम कारणं अभिप्रेत असतं. या सर्व गोष्टीसाठी त्याला मानसिक दृष्ट्या वेळ मिळावा या साठी त्याने आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये दुसरी किंवा तिसरी फळी तयार करून त्यांना जबाबदारीचं वितरण करणं आणि स्वतः व्यवसाय वृद्धीसाठी वेळ काढणं हे यशस्वी उद्योगाचं गमक आहे, असं माझं मत आहे. 


लेख क्र १०



सकाळ लेख क्र ११

 कम्युनिकेशन स्किल्स हा विषय इंजिनियरिंग कॉलेज मध्ये आपल्या अभ्यासक्रमात असतो. पण त्या दिवसांपासून आपण त्या विषयाकडे दुर्लक्ष करतो. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की व्यावसायिक जसा अनुभवी होत जातो तसं त्याच्या काही कौशल्यात सातत्याने सुधारणा व्हायला हवी आणि त्यात संवाद कौशल्य, कम्युनिकेशन स्किल, याला अग्रक्रम द्यावा लागेल. 

रूढार्थाने व्यवसायात दोन प्रकारचे संवाद साधले जातात. एक म्हणजे औपचारिक संभाषण (फॉर्मल कम्युनिकेशन) आणि दुसरं म्हणजे अनौपचारिक संभाषण. (इनफॉर्मल कम्युनिकेशन). दोन्ही प्रकारचे संभाषण आस्थापनेत होत असले तरी आपण फक्त औपचारिक संभाषण कौशल्याबद्दल बोलणार आहोत.

कुठल्याही आस्थापनेत खालील पद्धतीचे संभाषण घडणे ही स्वाभाविक  प्रक्रिया आहे. 

१. मौखिक संभाषण (व्हर्बल कम्युनिकेशन): कामाच्या ठिकाणी जर सगळ्यात जास्त संवाद/संभाषण जर कुठल्या पद्धतीने घडत असतील तर ते म्हणजे मौखिक संभाषण. प्रत्यक्ष समोरासमोर, फोनद्वारे किंवा आजकाल प्रसिद्ध झालेल्या ऑनलाईन मिटिंग मध्ये मौखिक संभाषणाचा वापर आपलं म्हणणं समोरच्याला पटवून देण्यासाठी केला जातो. या प्रकारचा संवाद साधताना आवाजाचा पोत, त्याची लय, वेग या सगळ्यांचं महत्व आपापल्या जागी आहे. 

२. अ-मौखिक संभाषण: संवाद साधताना नेहमीच शब्दांची गरज लागतेच असं नाही. मौखिक संभाषण करताना आपल्या चेहऱ्याचे हावभाव, नजरेतील बदल, शरीराच्या विविध अवयवांचा जसे की हात याचा वापर याद्वारे सुद्धा आपल्याला जे व्यक्त करायचं आहे ते परिणामकारकरित्या करू शकतो. जेव्हा ग्रुप मिटिंग घेतली जाते तेव्हा या संवाद कौशल्याचा वापर जर योग्य पद्धतीने केला तर पाहिजे तो परिणाम मिळवू शकतो. 

३. लिखित संवाद/संभाषण (रिटन कम्युनिकेशन): आस्थापनेत जर कुठल्या संवाद माध्यमाला प्रमाण मनात असतील तर ते म्हणजे लिखित संभाषण. तिथे वापरल्या जाणाऱ्या कार्यालयीन दस्तऐवजात लिखित संभाषण हे वापरले जाते. आस्थापनेतील वेगवेगळ्या विभागात जाणारे इ मेल्स, अपॉइंटमेंट लेटर्स, पर्चेस ऑर्डर्स या सगळ्यांमध्ये रिटन कम्युनिकेशन चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. 

४. दृश्यमान संभाषण (व्हिज्युअल कम्युनिकेशन): आजकल प्रसिद्ध झालेले पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन हे या प्रकारचं समर्पक उदाहरण आहे. असं म्हंटलं जातं की एखादा संदेश हजारो शब्दांनी पोहचवला जात नसेल, पण एखाद्या चित्राने तो परिणामकारकरीत्या पोहोचू शकतो. 

५. काळजीपूर्वक ऐकणे (लिसनिंग): संभाषणात बहुतेकदा आपण जे बोलतो तिथपर्यंत हे कौशल्य मर्यादित केलं जातं पण आपण जितक्या काळजीपूर्वक आपण ऐकतो त्यावर अनेक रिझल्ट्स अवलंबून असतात. 

व्यावसायिक जगात वरील संवादकौशल्याचं महत्व अनन्यसाधारण आहे. त्यात परत मेख अशी आहे की वरील पाचपैकी फक्त एकाच प्रकारचं कौशल्य अंगात असून चालत नाही तर या सर्व प्रकारच्या संवाद पद्धतीत जितकं आपण प्रभुत्व मिळवू तितकं लीडर म्हणून स्वीकारले जातो. या संवाद कौशल्याला तर्कशास्त्र आणि संख्याशास्त्राची  आणि त्याच्याबरोबर जे मांडलं जातं त्याला कृतिशीलतेची जोड दिली तर लीडरबद्दलची विश्वासार्हता वाढीला लागते आणि त्यायोगे हे सार्वत्रिक व्यवसाय वृद्धीसाठी पूरक असतं.  

सकाळ लेख क्र ११



Sunday, 27 February 2022

सकाळ लेख क्र ९

 व्यवस्थापन करत असताना, एका महत्वाचं कौशल्य शिकून घ्यावं लागतं  आणि ते म्हणजे SWOT विश्लेषण. SWOT म्हणजे Strength (सामर्थ्य), Weakness (दुर्बलता), Opportunities (संधी), Threat (धोका). म्हणायला गेलं तर हे एक ताकदीचं टूल आहे, व्यवस्थापनासाठी. पण यातील मेख अशी आहे की याचा परिणामकारक वापर करून घेण्यासाठी त्यामागचा विचार समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. 

बाकीच्या व्यवस्थापकीय कौशल्यासारखं SWOT सुद्धा हॉवर्ड विद्यापीठात शोधलं गेलं असं म्हंटलं जातं. आपला व्यवसाय हा चार कसोटीवर कसा उतरतो आहे याचं विचारपूर्वक विश्लेषण केला तर त्यावर नियंत्रण आणणं सोपं जाईल असा या मागचा विचार आहे. 

यातील अनुभव असा आहे की SWOT विश्लेषण करताना ते फार संदिग्ध स्वरूपात केलं जातं आणि त्यामागे स्पष्टता नसते. या कारणामुळे अनेक व्यवसाय त्याचा म्हणावा तसा परिणामकारक वापर करून घेत नाही. त्यामुळे तो शब्द फक्त एक व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील एक परिभाषा म्हणून प्रचलित आहे. पण त्यावर फारसं काम केलं जात नाही असा माझा अनुभव आहे. 

SWOT विश्लेषण करताना काही गोष्टी अत्यंत व्यापक स्वरूपात लिहिल्या जातात आणि त्यामुळे त्यावरून कृती काय ठरवायची हे शोधता येत नाही. ज्या विश्लेषणातून कृती तयार होत नाही तो प्रयोग करणे हा वेळेचा अपव्यय असतो. मला असं म्हणायचं आहे की SWOT विश्लेषण करताना वस्तुनिष्ठ पद्धतीने आपण स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट लिहून काढले तर त्या प्रत्येक विश्लेषणातून एक कृतिशील आराखडा बनण्याची शक्यता तयार होते. 

थोडं उदाहरणातून समजावून सांगायचा प्रयत्न करतो. स्ट्रेंथ लिहिताना बऱ्याचदा व्यापक पद्धतीने लिहितो "आमचे तांत्रिक ज्ञान चांगले आहे." या वाक्यरचनेतून विषयाचा आवाका कळला पण त्याची वस्तुनिष्ठता, सांख्यिकी पायावर आपल्याला काय म्हणायचं आहे हे लक्षात येत नाही. हीच स्ट्रेंथ आपण जर प्रमाणबद्ध पद्धतीने लिहिली तर तिचा परिणाम वेगळा होऊ शकतो. उदाहरणार्थ: आम्ही आमच्या तांत्रिक ज्ञानाद्वारे पंधरा प्रकारचे उत्पादन करतो आणि येत्या तीन वर्षांमध्ये आम्हाला ती संख्या तीस पर्यंत न्यायची आहे. थोडक्यात आज बनवले जाणारे पंधरा प्रॉडक्टस हे आमचे सामर्थ्य आहे पण आमची मार्केट मधील पोझिशन अजून बळकट करण्यासाठी आम्हाला तीस वेगवेगळी उत्पादने आणणे ही काळाची गरज आहे. एकदा हे लिहून काढलं की पंधरा पासून तीस वर जाण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागणार आहे, या वेगवेगळ्या कृती लिहून काढता येतात. एकदा त्या लिहिल्या की मग त्याला टारगेट टाइम लाईन ठरवता येते आणि ते करण्यासाठी कोण जबाबदार आहे ते ठरवता येतं. हा कृतिशील आराखडा तयार झाला की पुनरावलोकन करण्याचा आराखडा तयार करता येतो. आपण ठरवलेल्या गोष्टी या वेळेत होत आहेत का, होत नसेल तर त्यासाठी काय करावं लागेल यावर अभ्यास करता येतो. 

याच धर्तीवर मग आपण आपल्याला व्यवसायाचे दुर्बल घटक, मार्केट मध्ये असणाऱ्या संधी आणि व्यवसायाला उभे राहणारे धोके याचं विश्लेषण करू शकतो. स्ट्रेंथ आणि विकनेस यावर आपण काम करून नियंत्रण आणू शकतो. बहुतेकदा संधी आणि धोके यावर आपले नियंत्रण नसते.  याचा वापर जर व्यवस्थित केला तर व्यवसायाला अनिश्चततेपासून जे प्रश्न उद्भवतात त्याचे उत्तर शोधू शकतो. 

सकाळ लेख क्र ९ 

Tuesday, 22 February 2022

चित्रा रामकृष्णा

इथं आपले राजकारणी एकमेकांना शिव्या देण्यात मश्गुल असताना त्या चित्रा रामकृष्णा कडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालेलं दिसतंय. कसली खंग्री स्टोरी आहे. एखादा हॉलिवूड पिक्चर निघू शकेल. बॉलिवूड वाल्यांचा घासच नाही, असला खतरनाक मालमसाला आहे. 

मागे रॅनबॅक्सी विकल्यावर दोघा भावांनी कसे दहा हजार कोटी रुपये एका बाबाच्या नादी लागून उडवले होते त्यापेक्षाही रंगीत स्टोरी आहे चित्रा रामकृष्णाची. कोण तो आनंद सुब्रमणियन, त्याची बायको सुनिथा आनंद, कोण तो हिमालयन योगी. बीसी, जगातल्या सगळ्यात पॉवरफुल स्टॉक एक्स्चेंज ला स्वतःची जहागीर बनवून टाकली होती. काय म्हणे तो हिमालयन योगी, त्याला प्रत्यक्ष दर्शन द्यायची गरज नाही म्हणे. आणि तो बाईला वर हे ही सांगतोय "तू केशरचना आज अशी कर, ज्यामुळे तू अजून आकर्षक दिसशील." सेशेल्स ला न्यायचं काय निमंत्रण देतो, तिथं समुद्रात एकत्र पोहू या काय म्हणतो आणि ती बाई पण काय त्याला परमहंस म्हणते, योगी, सिद्धपुरुष म्हणते. इ मेल आय डी पण कसला कडक बनवला आहे rigyajursama@outlook.com, ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद चं कॉम्बिनेशन म्हणे. खलास. भाषा बघितली का इ मेल ची. स्वामी नित्यानंद पण फिका पडेल. 

कुठली ती को लोकेशन ची थेअरी. त्या मायक्रो मिलिसेकंद च्या ऍडव्हान्स इन्फॉर्मेशन वरून कमावलेले करोडो रुपये, त्याची चौकशी करताना सापडलेले योगीला पाठवलेले इ मेल्स आणि कुणालाही न कळू देता झालेली आनंद सुब्रमणियन ची चीफ ऍडव्हायजर म्हणून अपॉइंटमेंट. कसली सुरस आणि चमत्कारिक कथा आहे. 

अन त्याहून कहर म्हणजे, बाईच्या आजूबाजूला बागडणारे तथाकथित फायनान्स विझकिड्स ना त्याची भनक पण लागू नये? अख्ख्या देशाच्या जीडीपी साईझ पेक्षा जास्त व्यवहार होणाऱ्या संस्थेची ही स्त्री एमडी आहे आणि खुशाल तिथल्या अंतर्गत बाबी दुसऱ्या कुणा तिऱ्हाइताला इ मेल वरून शेअर करते. आणि हे कुणाच्या लक्षात येत नाही? जोक करून टाकला आहे सगळ्या सिस्टमचा. 

मार्केट वर गेल्यावर इथं लोकांना फायनान्स चा ऑर्गझम होतो, अन खाली गेल्यावर लोक आत्महत्या करतात, इतक्या सेन्सिटिव्ह असणाऱ्या संस्थेचा खेळ मांडून टाकला या लोकांनी. असा डोकं घुसळवून टाकणारा गुन्हा केल्यावर यांना शिक्षा काय, तर म्हणे रु ३ कोटी. बाईंचा निव्वळ पगार चार वर्षाचा ३० कोटी झाला आणि त्या आनंद सुब्रमणियन चा वीस एक कोटी. फुकटात बाहेर पडतात की अल्मोस्ट. 

वाईट ही वाटतं, राग पण येतो. इतकी शिक्षित बाई. एनएसइ चालू झाल्यापासून त्या इन्व्हॉल्व्ह होत्या. स्ट्रॉंग बिझिनेस वूमन म्हणून नावाजली गेलेली. पण इतकं मिस्टेरीयस वागणं. आम्हाला पंधरा रु जीएसटी कमी भरला म्हणून नोटीस येते आणि इथं सगळ्या सिस्टम ला वेठीला धरलं जातं आणि सगळं हश हश अफ़ेअर. 

काय काय घडतं या जगात, त्या रामकृष्णाला माहिती!

Saturday, 19 February 2022

सकाळ लेख क्र ८

मागील लेखात लिहिल्याप्रमाणे एकदा व्यवसायाचे मूळ सिद्धांत आणि उद्देश शोधला की मग पुढची पायरी येते ती व्यवसायाचा थोडा दूरवर विचार करण्याची. साधारण हा काळ तीन ते पाच वर्षाचा असावा. त्या काळामध्ये व्यवसायाचं रूप काय असणार आहे, आपल्याला काही नवनवीन गोष्टी करायच्या आहेत का आणि असेल तर त्या कुठल्या याबद्दल विचारमंथन व्हायला हवं. व्यवस्थापनेच्या भाषेत याला "बिझिनेस प्लॅन" म्हणतात. उद्याचा विचार करण्याची मानसिकता ही सिनियर लीडरशिप कडे असणं अपेक्षित असतं. त्याचं प्रतिबिंब हे या व्यवसायाच्या योजनेवर पडावं ज्यायोगे येणाऱ्या वर्षांमध्ये व्यवसायाची वाटचाल कोणत्या मार्गावर होणार हे अधोरेखित करता येतं. 

या श्वेतपत्रिकेत व्यवसायाचे मूळ सिद्धांत आणि उद्देश याशिवाय कंपनीचं मिशन स्टेटमेंट काय आहे आणि ते कुणासाठी, कोणत्या पद्धतीने पूर्ण करायचं आहे हे उल्लेखलं गेलं पाहिजे. हे मिशन स्टेटमेंट बनवण्यासाठी जर तुम्हाला फारसे कष्ट पडत नसतील तर तुम्ही व्यवसाय योग्य पद्धतीने करत आहात असा निष्कर्ष काढायला हरकत नाही. थोडक्यात व्यवसायाचा आराखडा हा तुमच्या डोक्यात तयार आहे, तो फक्त व्यवस्थितपणे कागदावर उतरवायचा आहे. एकदा ते झालं की लिहिलेल्या गोष्टींवर वैचारिक मंथन करता येतं आणि व्यवसायच्या भावी काळातील योजना या स्पष्टपणे समोर येतात. 

कंपनीचे मूळ सिद्धांत, मूळ उद्देश, मिशन स्टेटमेंट आणि हे मिशन कोणासाठी, काय पद्धतीने, किती काळात पूर्ण करतोय हे ज्याठिकाणी लिहिलं जातं त्याला व्यवसायाचा "दूरदृष्टी फलक" (व्हिजन बोर्ड) म्हंटलं जातं. हा एकदा तयार झाला की व्यवस्थापकीय कौशल्याचा पुढील भागाकडे आपल्याला जाता  येतं. 

तो भाग म्हणजे वार्षिक ध्येय ठरवणे. हे वार्षिक ध्येय बनवताना मी हॉवर्ड बिझिनेस रिव्ह्यू च्या एका पेपरचा संदर्भ देतो. ते असं म्हणतात की आपले वार्षिक ध्येय जर सांख्यिकी पायांवर लिहून काढायचे असतील तर त्यांना चार भागात विभागावं. या पद्धतीला त्यांनी "बॅलन्स स्कोअर कार्ड" असं नाव दिलं आहे. हे चार भाग आहेत, फिनान्शियल गोल (आर्थिक ध्येय), कस्टमर ओरिएन्टेशन (ग्राहकांप्रती सजगता), इंटर्नल प्रोसेस अँड सिस्टम्स (अंतर्गत पद्धती), लर्निंग अँड ग्रोथ (नाविन्यता आणि वृद्धी). थोडक्यात हा संदर्भ असं सांगतो की आपल्या व्यवसायात आपण जी काही ध्येये ठरवतो आणि ती पूर्ण करण्यासाठी ज्या काही कृती ठरवतो, त्या सर्व कृतींना आता उल्लेखलेल्या चार क्षेत्रात विभागता येतं आणि ते कौशल्य एकदा अंगीकारलं तर व्यवसायाचं व्यवस्थापन करणं हे सोपं जातं आणि त्यामागे पद्धतशीर निर्णयाचा आणि त्यायोगे कृतींचा आराखडा बनवता येतो. सगळ्यात मुख्य म्हणजे आपण जे ठरवलं ते त्याबरहुकूम घडतं आहे का हे मॉनिटर करता येतं. 

हे सगळं वाचताना कदाचित असं वाटू शकेल की हे सगळं छोट्या व्यवसायाने करायची गरज आहे का? तर माझं उत्तर हो, असं आहे. आता इथे वाचताना ते अवघडही वाटू शकेल, पण एकदा तुम्ही व्यवसायाचा अभ्यास करत हे कौशल्य शिकलात तर तुमचा व्यवसाय हा शाश्वत पद्धतीने आणि त्याचबरोबर तो तुमच्या नियंत्रणात आहे असं लक्षात येईल. तस झालं तर मग करोना सारख्या आपत्तीने अस्थिर झालेल्या जगात तुमच्या व्यवसायाला स्थैर्य आणण्यात हातभार लागेल असं मला वाटतं. 

सकाळ लेख क्र ८, 


Friday, 18 February 2022

रिलायन्स

या आधीच्या बजाज सरांवर लिहिलेल्या पोस्टमध्ये पॉझिटिव्ह वाईब्ज चा उल्लेख केला होता. तेव्हा कॉमेंट मध्ये असं लिहिलं होतं की "रिलायन्स मध्ये कोणते वाईब्ज जाणवतील?" कॉमेंटचा टोन थोडा उपहासाचा होता, असं आपलं मला वाटलं.  

शक्यतो माझे अनुभव इथं लिहितो. ऐकीव माहितीवर शक्यतो लिहीत नाही. रिलायन्स बद्दल बरेच वाद प्रवाद आहेत. रिलायन्सचा अन माझा कुठल्याही मार्गाने व्यावसायिक संबंध आला नाही. त्यामुळे मी कधी त्यांच्यावर लिहिलं नाही. आज लिहितो. ही पूर्णपणे माझी मतं आहेत. ती पटावी असा आग्रह नाहीच, नेहमीप्रमाणे. हे जे काही लिहिलं आहे ते माझं भारतीय व्यवसायाबद्दल जे काही तोकडं नॉलेज आहे त्यावर आधारित आहे.  

रिलायन्स चा अन माझा संबंध आला असेल तर तो अप्रत्यक्ष पणे. मी हायड्रॉलिक सील विकत असताना सुरत जवळ हाझीरा नामक गावी जायचो. एस्सार आणि एल अँड टी मध्ये मला जावं लागायचं. रस्त्यात रिलायन्स ची अजस्र रिफायनरी दिसायची. ती बघून मी नेहमीच अचंबित व्हायचो. 

अजून मी आमच्या घराजवळ असणाऱ्या रिलायन्स मार्ट, रिलायन्स फ्रेश, रिलायन्स डिजिटल या दुकानात एक ग्राहक म्हणून जायचो. तिथला अनुभव असा फार काही एक्स्ट्रा ऑर्डीनरी वगैरे नव्हता. मध्ये मी जिओ चं कार्ड घेतलं, एक एक्स्ट्रा कार्ड असावं म्हणून. त्यांचाही काही असा उल्लेखनीय अनुभव नाही आहे. नाही म्हणायला माझ्याकडे रिलायन्स चे शेअर आहेत. सामान्य माणसाला रिलायन्सने शेअर मार्केट ची गोडी लावली असं म्हणतात. मला काही त्या शेअरने खूप जास्त परतावा दिला वगैरे अशातला काही भाग नाही. इन फॅक्ट त्याच्यापेक्षा जास्त पैसे मी एल अँड टी, किंवा टाटा च्या काही कंपन्यात कमावले. रिलायन्सने नुकसान पण केलं नाही. 

थोडक्यात सांगायचं तर रिलायन्स बद्दल मला फार काही ममत्व वगैरे नाही आहे. 

पण तरीही रिलायन्स मला एक भारी कंपनी वाटते. मुळात उत्पादन क्षेत्रातील कुठल्याही अवाढव्य कंपनीबद्दल मला आदर वाटतो. कारण त्यांनी असंख्य एम्प्लॉयमेंट जनरेट केली असते. आज रिलायन्स मध्ये साधारण अडीच लाखापर्यंत लोक काम करतात. ही झाली डायरेक्ट एम्प्लॉयमेंट. त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या व्हेंडर कडे काम करणाऱ्या लोकांची बेरीज केली तर साधारण ही संख्या पंधरा लाखापर्यंत जाईल. जास्तच असणार आहे ही संख्या. त्यांचा ग्रुप टर्नओव्हर साधारण पणे ५ लाख कोटी रुपयाच्या जवळपास आहे. म्हणजे आपल्या जीडीपीच्या ०.२%. रिलायन्स चा ऍसेट बेस खतरनाक आहे. मुळात धीरूभाईंनी एकाच आयुष्यात शून्यातून ६०००० कोटीपर्यंत टर्न ओव्हर नेला. आणि पुढे मुकेशभाईंनी तो पाच लाख कोटीपर्यंत. ही खायची गोष्ट नाही आहे मित्रानो. माझा स्वतःचा एका गोष्टीवर विश्वास आहे की ही अचिव्हमेंट लांड्यालबाड्या करून जमत नाही. त्यांच्या मूळ सिद्धांतात एक कुठलीतरी गोष्ट ताकदीची असणार आहे जि त्यांच्या सगळ्या तथाकथित अवगुणांना ओव्हपॉवर करते.  परत आपण हे ही लक्षात घ्यायला पाहिजे की हे सगळं घडतं आहे भारतासारख्या देशात. जिथं कॅपिटॅलिस्ट लोकांना आजही गुन्हेगार म्हणूनच बघितलं जातं. आजही इझ ऑफ डुईंग बिझिनेस च्या स्केल वर आपण कुठंतरी तळाला आहोत. भारतातल्या ब्युरोक्रसीला, कस्टम डिपार्टमेंट ला तोंड देत असा भव्य दिव्य बिझिनेस उभं करणं ही माझ्या मते क्रेडीटेबल गोष्ट आहे.  

राहता राहिला त्यांची टाटा च्या एथिकल बिझिनेस प्रॅक्टिसशी केली जाणारी तुलना. ती अनाठायी आहे असे मी म्हणणार नाही. पण शेवटी प्रत्येकाच्या व्यवसायाचं एक स्ट्रक्चर असतं, उद्देश असतो.  टाटा असो वा एल अँड टी असो, यांचे ओनर कुठलीही फॅमिली नाही आहे. प्रोफेशनल्स ने चालवणाऱ्या या दोन्ही कंपन्या आहेत. रिलायन्स चे मूळ सिद्धांत पटणार पण नाहीत आपल्याला पण भारतीय उद्योगक्षेत्रातील काँट्रीब्युशन आपण नाकारू शकत नाही, हे ही तितकंच खरं. 

आज अनेक सर्व्हिस सेक्टर मधील कंपन्यांचं गुणगान होतं. व्हावं, त्यात वावगं नाही आहे. त्यांनी सुद्धा समाजाच्या एका मोठ्या वर्गाला आर्थिक स्थैर्य दिलंच आहे. पण उत्पादन क्षेत्रातील आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देत एक जागतिक दर्जाची कंपनी उभी करणाऱ्या धिरुभाई आणि मुकेश अंबानी यांना सर्व्हिस इंडस्ट्रीच्या लीडर्सपेक्षा मी वरचं स्थान देईल. 

असो. राजकीय विचारधारा बाजूला ठेवून जर प्रतिक्रिया लिहिल्या तर संयुक्तिक राहील. अर्थात हे अपील आहे, आग्रह नाहीच.... नेहमीप्रमाणे 


श्री राहुलकुमार बजाज

बजाज ऑटो मध्ये जॉईन होण्याची संधी दोनदा आली होती. एक १९८६  मध्ये आणि नंतर १९८९ मध्ये. १९८६ मध्ये त्यांनी जवळपास आमचा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक औरंगाबादचा अख्खा क्लास जॉईन करून घेतला होता. रादर त्या काळात औरंगाबाद मध्ये त्यांना मिळतील तेवढे इंजिनियर्स लागत होते. मला डिग्रीला ऍडमिशन मिळाली आणि बजाजला जॉईन झालो नाही. १९८९ मध्ये डिग्री झाल्यावर परत बजाज ऑटो औरंगाबादमध्ये कॅम्पस मध्ये निवड झाली होती, पण ऐनवेळेला जॉईन होताना मेडिकल मध्ये फेल झालो आणि परत एकदा निराशा पदरी आली. 

पुढे मी एसकेएफला लागलो. तिथले हुशार म्हणून गणले जाणारे इंजिनियर्स यांनी बजाज ऑटो मध्ये काम केलं होतं आणि मग एसकेएफ ला आले होते. इतकंच काय पण माझे क्लासमेट असणाऱ्या साऱ्या जणांच्या वागण्यात एक धार आली होती. टेक्निकल नॉलेज त्यांचं झळाळून निघत होतं. बजाज ऑटोच्या टेक्निकल कामाची कमाल होती. अशी तगडी ऑर्गनायझेशन श्री राहुलकुमार बजाज यांनी बनवली होती. 

पुढे हायड्रॉलिक सील्स विकण्याच्या आणि नंतर माझ्या स्पिंडल दुरुस्ती आणि उत्पादन करायच्या व्यवसायाच्या निमित्ताने मला बऱ्याचदा बजाज ऑटो च्या औरंगाबाद आणि आकुर्डी प्लांट मध्ये जावं लागलं. आजही जातो. लौकिकर्थाने मी फारसा काही बिझिनेस केला नाही, पण कधीही बजाज ऑटो मध्ये जायचं म्हंटल्यावर मी हरखून जायचो. एक वेगळीच सकारात्मक भावना बजाज ऑटो च्या मेन गेट पासून सरसरत जायची. कंपनीच्या लीडरची ही कमाल असते. श्री राहुलकुमार बजाज यांच्यामुळे असणारे पॉझिटिव्ह व्हाइब्ज हे कंपनीच्या प्रत्येक आवारात जाणवत राहतात. 

बजाज ऑटो मध्ये दिसणारा नेटनेटकेपणा, कुठलंही काम उत्तम करण्याचा तिथला आग्रह, सातत्याने नवनवीन होणारी डेव्हलपमेंट ही संस्कृती राहुलकुमार बजाज सरांनी रुजवली आणि त्यांची शिकवण पुढच्या पिढीने फुलवली. सगळ्या क्षेत्रामध्ये आपलं वर्चस्व असावं अशा पद्धतीने डावपेच रचणाऱ्या चायनीज उत्पादनाला मात्र दुचाकी आणि चारचाकी व्यवसायात भारतात जम बसवता आला नाही त्यामागे भारतातील सर्वच ऑटोमोबाईल कंपन्यांचा सहभाग आहे. बजाज ऑटो चे धोरण या क्षेत्रात पूरक होतं आणि ते बनवण्यात श्री राहुलकुमार बजाज यांचं योगदान असावं असं मानण्यात चांगला वाव आहे. उत्तर भारतातील हिरो ग्रुपने जपानच्या होंडा बरोबर सामंजस्य करार करार करत बजाज ऑटो ला टक्कर दिली आणि भले व्यवसायिक गणितावर ते बजाजच्या पुढे गेले पण मार्केट मध्ये बजाज ऑटो चा दबदबा कायम राहिला. स्कुटर या त्यांच्या एस प्रॉडक्ट ला दुरावा देत, पुढच्या पिढीने आणलेल्या मोटारसायकल ला श्री राहुलकुमार बजाज यांनी पाठिंबा दिला आणि कंपनीची सूत्र राजीव आणि संजीव बजाज यांच्या हातात सोपवताना कुठलंही फ्रिक्शन होणार नाही याची काळजी घेतली. 

भारतीय उत्पादनक्षेत्राला ज्या मोजक्या कंपन्यांमुळे चार चांद लागले त्यात बजाज ऑटो चा नंबर खूप वर आहे आणि पर्यायाने श्री राहुलकुमार बजाज यांचं नाव हे आपल्या औद्योगिक इतिहास जेव्हा कधी लिहिला जाईल तेव्हा आत्यंतिक आदराने घेतलं जाईल यात शंका नाही. चार पाच वर्षांपूर्वी एका लग्न सोहळ्यात श्री राहुलकुमार बजाज केवळ दहा फुटांवर बसले होते. पण त्यांच्या आजूबाजूला मोठमोठ्या लोकांचा घोळका होता, त्यामुळे इच्छा असूनही मी त्यांच्याशी बोलू शकलो नाही पण दुरूनच नमस्कार केला. सुदैवाने मला पुढचा जन्म जर इंजिनियरचा मिळाला तर काही कंपन्यांमध्ये माझी या जन्मी काम करायची अपूर्ण राहिलेली इच्छा तेव्हा पूर्ण होईल यात एक नाव हे बजाज ऑटो पण आहे. 

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राचे अर्ध्वयू, बुलंद भारत की बुलंद तस्वीर दिवंगत श्री राहुलकुमार बजाज यांना मनःपूर्वक श्रद्धांजली.  

Thursday, 17 February 2022

माझे एक ओळखीचे गृहस्थ आहेत. एका बहुराष्ट्रीय कंपनीत त्यांनी मशीन ऑपरेटर म्हणून काम चालू केलं. १९८५ च्या सुमारास. पुण्यात आले तेव्हा खिशात तीस रुपये होते. काम इमानेइतबारे केलं. कष्ट केले. काम करत एक वन बीएचके फ्लॅट घेतला. जिथं घेतला तो त्या काळात पुण्याच्या बाहेर एरिया होता. कालपरत्वे तिथं चांगली डेव्हलपमेंट झाली. 

तीन एक वर्षांपूर्वी त्यांनी रिटायरमेंट घेतली. पुण्यापासून साठ किमीवर त्यांचं गाव आहे. तिथं छोटं टुमदार घर बांधलं. घरामागे तीन साडेतीन एकरचं शिवार आहे. तिथं शेती करतात. कंपनीतून रिटायरमेंट घेताना चांगले पैसे मिळाले. ते व्यवस्थित इन्व्हेस्ट केले. त्याचे आता चांगले रिटर्न्स मिळतात. एस डब्ल्यू पी ने जितके हवे तितके पैसे त्यांना दरमहा मिळतात. 

वन बीएचके फ्लॅट च्या बिल्डिंग मध्ये होता ती बिल्डिंग रिडेव्हलपमेंट मध्ये गेली. तिथं टू बीएचके फ्लॅट मिळाला. तिथं मुलगा राहतो. मुलीचं लग्न झालं आहे. 

आयुष्यात सुरुवातीला काय वांदे झाले असतील तितकेच. आता कसली ददात नाही आहे. सगळं निवांत आहे. 

म्हंटलं तर अगदी सरधोपट स्टोरी.  

आणि म्हंटलं तर आयुष्याचा बराच काळ आर्थिक स्थैर्य. मला असं नेहमीच वाटत आलं आहे की असे लोक ज्यांनी आपले खर्च आपल्या कमाईला अनुसरून ठेवले त्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ हे एखाद्या श्रीमंत माणसापेक्षा कमी नसतं. आर्थिक साक्षरता म्हणतात ती ही. आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी खूप पैसेच कमवावे लागतात असं नाही आहे, पण आपले रिसोर्सेस व्यवस्थित प्लॅन करून मंथली आऊटफ्लो ला बीट करणारा इनफ्लो ठेवला की आर्थिक स्थैर्य येतं. नाहीतर खूप पैसे कमावल्यावर सुद्धा आर्थिकदृष्ट्या अस्थिरता असणारे अनेक लोक आपण आजूबाजूला पाहतोच की!

Sunday, 13 February 2022

सकाळ लेख क्र ७

 आपण मोठ्या आस्थापनेला भेट देतो तेव्हा तिथे एक बोर्ड भिंतीवर टांगलेला दिसतो. जिथे त्या आस्थापनेचे काम करण्याचे मूळ सिद्धांत (कोअर व्हॅल्यूज) आणि मूळ उद्देश (कोअर पर्पज) लिहिलेले असतात. कधी आपण विचार केला आहे का की  ते का लिहिले असतात? आणि मुख्य म्हणजे कधी हा विचार केला आहे का की हा फलक फक्त मोठ्या आस्थापनेत का दिसतो? कुणास ठाऊक काहींना वाटत असेल की हे सिद्धांत आणि उद्देश यावर विचार करायची गरज ही फक्त मोठ्या व्यवसायाला असते. किंवा कुणाला हे ही वाटू शकेल की हे फक्त लोकांना लुभावण्यासाठी केलेलं असतं. त्याने फक्त भिंती सजवल्या जातात प्रत्यक्ष व्यावसायिक जीवनात त्याचा काहीही उपयोग नसतो. 

माझं याबाबतचं मत थोडं वेगळं आहे. मला सुद्धा व्यवसायाचे मूळ उद्देश आणि सिद्धांत डिझाईन करण्याची प्रेरणा २०१६ ला मिळाली. म्हणजे व्यवसाय चालू केल्यानंतर तब्बल १४ वर्षांनी. हे माहिती का करून घ्यायला पाहिजे यावर माझं मत व्यक्त करतो. 

उद्योजक जेव्हा त्याचा व्यवसाय चालू करतो आणि जेव्हा व्यवसाय वयात येतो, म्हणजे त्याचं व्यावसायिक वय ८-१० वर्षे होतं तेव्हा आपण एक निष्कर्ष काढू शकतो की तो व्यवसाय आता तग धरू शकेल. याचा दुसरा अर्थ असा की ग्राहकांनी त्या व्यवसायाला स्वीकारलं आहे. पुढं जाऊन आपण असं म्हणू शकतो की उद्योजकाचे जे व्यवसायाचे सिद्धांत आहेत ते ग्राहकांनी, पुरवठादाराने तसेच त्याच्या एम्प्लॉईजने पण स्वीकारले असतात. आता थोडा असा विचार करा की ज्या सिद्धांतावर उद्योजकाने व्यवसायाचा डोलारा सांभाळला असतो तेच सिद्धांत त्याच्या प्रत्येक सहकाऱ्याने वापरले तर काय होईल?

अगदी बरोबर.....त्या आस्थापनेतल्या कर्मचाऱ्याबरोबर कोणताही व्यवहार करताना असं वाटेल की जणू काही आपण त्या व्यवसायाच्या संस्थापकाशी आपण व्यवहार करतोय. ग्राहकाला वाटेल की ज्या सिद्धांताच्या आधारे व्यवसायाला ऑर्डर दिल्या त्या आपण सातत्याने देऊ शकू कारण जी उत्पादन गुणवत्ता, जी सेवा आपल्या उद्योजकाने दिली तीच गुणवत्ता, तीच तत्पर सेवा त्या कंपनीचा कर्मचारी पण देतोय. साधारण अशाच पद्धतीची भावना पुरवठादार किंवा कामावर काम करणारे सहकारी यांच्या मनात पण असेल. 

या सगळ्याचा उपयोग कंपनीतील कर्मचाऱ्यांची निवड करताना होतो. त्यातही जेव्हा आपण जेष्ठ पदावरचे लोक निवडत असतो, त्यावेळेला या मूळ सिद्धांत आणि उद्देश याचा संयुक्तिक वापर केला तर तुमचे पर्याय कंपनीत उभे करायला मदत होते आणि त्यामुळे व्यवस्थापनाची जबाबदारी वाटून घेता येते. बऱ्याचदा असं होतं की आपण कर्मचाऱ्यांची निवड करताना व्यवसायाशी निगडित तांत्रिक कौशल्यांच्या आधारे निवड करतो पण जर कधी त्यांची कामाची पद्धती आवडली नाही तर ती मूळ सिद्धांताच्या निगडित असते. तेव्हा मुलाखत घेताना जॉब सीकर चे मूळ सिद्धांत हे तुमच्या सिद्धांताशी जुळतात का ते पहा. तांत्रिक कौशल्य हे नंतर ट्रेनिंगच्या माध्यमातून शिकवू शकतो पण सिद्धांत शिकवणं हे अत्यंत अवघड काम आहे. त्यातही ऑर्गनायझेशन च्या संरचनेत जेव्हा आपण जेष्ठ कर्मचारी निवडतो तेव्हा हा भाग अत्यंत महत्वाचा ठरतो. 

तेव्हा तुमच्या व्यवसायाला जर सात आठ वर्षे झाली असतील आणि आता त्याबद्दल मनात आत्मविश्वास आला असेल की आपण हा व्यवसाय अनेक वर्षे चालवू शकू,  तर तुमचे व्यवसायाचे मूळ सिद्धांत काय आहे आणि त्याचा उद्देश काय आहे हे शोधण्याचा जरूर प्रयत्न करा. थोडी अवघड प्रोसेस आहे पण अत्यंत उत्कंठावर्धक आहे. जर तुम्हाला काही अडचण वाटली तर सल्लागार लोकांची मदत घ्या. फक्त इथे एक निर्वाणीचा मुद्दा सांगतो. त्यावर काम करताना त्या प्रोसेसचा तुम्ही भाग व्हा. कारण तुमचे सिद्धांत आणि उद्देश हे तुम्हालाच शोधायचे आहेत. सल्लागाराची मदत फक्त प्रोसेस समजावून घेण्यासाठी घ्या. 

व्यवसायाच्या या महत्वाच्या टप्प्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

सकाळ लेख क्र ७

Wednesday, 9 February 2022

आमच्या एका फोरम मध्ये आम्ही काही ग्रुप तयार केले आहेत. जीडीपी ग्रुप म्हणतो आम्ही. ग्रोथ ड्रिव्हन पॅशनेट पीपल. महिन्यातून एक मिटिंग असते. व्यवसायाच्या संदर्भात वेगवेगळ्या गोष्टी आम्ही एकमेकांशी शेअर करतो ज्यायोगे व्यवसाय करण्याच्या पद्धतीत काही बदल आणता येतील. अर्थात चांगल्यासाठी. 

काल मीटिंगमध्ये आमचा एक चर्चेचा मुद्दा होता, जो पुढील आर्थिक वर्षाच्या संदर्भातील होता. प्रत्येकाने काही गोष्टीवर प्लॅनिंग करणं अपेक्षित होतं. काही जणांचं झालं होतं. काहींचं नव्हतं झालं. त्या मध्ये मी पण एक होतो. काम पूर्ण न झाल्याचं सांगताना मी पटकन म्हणून गेलो "नाही झालं, कारण मला सुचलं नाही. किंवा कंटाळा आला. मी कबूल करतो कि चूक झाली."

माझं बोलून झाल्यावर ग्रुप मधील एक जण म्हणून गेला "ते ठीक आहे. पण कन्फेशन इज नॉट ओन्ली सोल्युशन". 

थोडं हार्ड हीटिंग स्टेटमेंट होतं माझ्यासाठी. मी विचार केला त्यावर. आणि जाणवलं की त्या स्टेटमेंट मध्ये तथ्य आहे.  

बऱ्याचदा आपण चुकीची कबुली देऊन ते काम न केल्याचं प्रायश्चित्त घेतलं अशी मनाची समजूत घालतो. पण आपल्या वागण्यात एखादी चूक झाली तर ते कबूल करणं ही पहिली स्टेप झाली.  ती झालेली चूक सुधारून बरोबर प्रोसेसच्या दृष्टीने आपण काउंटर कृती करायला हवी ही पुढची पायरी. त्यापुढे जाऊन तशाच टाईपची चूक पुन्हा होऊ नये यासाठी आपण आपल्या जीवनपद्धतीत काय बदल घडवतोय यावर सुद्धा कॉन्शसली काम करण्याची तयारी हवी. नुसतीच तयारी नव्हे तर तसं प्रत्यक्ष वागत त्याची एसओपी बदलली की मग ते चूक झाल्याचं अकौंट क्लोज होतं. 

अवघड प्रोसेस आहे, पण स्वतःला व्यावसायिक म्हणून एस्टॅब्लिश करायचं असेल तर हे शिकायला हवं.  

थर्टी इयर्स चा एक्सपिरियन्स झाला आहे, पण हे शिक्षण काही सुटत नाही आहे. 

Tuesday, 8 February 2022

माझे एक रिझवान म्हणून मित्र आहेत. त्यांचा सणसणीत मोठं घर आहे. त्या घरामध्ये त्यांनी एक प्रार्थनास्थळ बनवलं आहे.  रिझवान स्वतः पाच वेळा नमाज पढतात. 

एके दिवशी मी रिझवानभाईंना भेटायला गेलो होतो. त्यांची नमाजाची वेळ होती. मी त्यांना विचारलं "मी येऊ का वर मशिदीत?" रिझवान भाई म्हणाले "चला की. पण चालणार आहे का तुम्हाला?" मी म्हणालो "तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर मलाही काही प्रॉब्लेम नाही."

मी त्यांच्याबरोबर त्यांच्या प्रार्थनास्थळी गेलो. रिझवानभाई आणि त्यांच्या बरोबर दोघे जण नमाज अदा करत होते. मी मागच्या भिंतीला टेकून डोळे मिटून हात जोडत वज्रासनात बसलो होतो.

नमाज पढून झाल्यावर रिझवानभाईंनी मला आवाज दिला "चला मंडलिक साहेब."  मी डोळे उघडले आणि त्यांच्याबरोबर खाली आलो. 

रिझवानभाईंचं कुठलं सोशल मीडियावर अकौंट आहे कि नाही माहित नाही. पण असलं तरी त्यांनी माझ्या नमस्काराच्या पोझ चा फोटो काढून काही द्वेषपूर्ण पोस्ट लिहिली नसती याबद्दल खात्री आहे. 


Sunday, 6 February 2022

सकाळ लेख क्र ६

 Planning without action is simply hallucinations. 


हेन्री फोर्ड


कल्पनांना कृतीची जोड नसेल तर या आभासी विश्वात आपण तरंगत राहतो. हे होतं बऱ्याचदा. चर्चा घडते, विश्लेषण होतं आणि जेव्हा म्हणून कृती करण्याची वेळ येते तेव्हा मात्र आपण कच खातो. कृतीशीलता हा व्यवस्थापकीय कौशल्याचा एक महत्वाचा गुण आहे. यातील एक गंमत अशी आहे की पैशाच्या अभावी आपण कृतिशील नसणं हे मी समजू शकतो, पण बऱ्याचवेळा कृती न करण्यामागे चालढकल पणा किंवा "करू की, घाई काय आहे" हा स्वभाव नडतो.


एखादा निर्णय घेतल्यावर कृती न करण्यामागे अजून एक कारण असू शकतं आणि ते म्हणजे प्राधान्य न ठरवणे.


कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचं हे न ठरवल्यामुळे एक वेळ अशी येते की अनेक कामं आ वासून उभी राहतात आणि मग कुठलंही कामं करण्याचा उत्साह मावळून जातो किंवा मग एखाद्या कमी महत्वाच्या कामामध्ये आपण वेळ घालवतो. कामाचा प्राधान्यक्रम जर ठरवला तर कृती अतिशय परिणामकारक ठरते. एक छोटा प्रयोग सांगतो. सकाळी काम चालू केल्यावर कोणती कामं करायची ती लिहून काढा. त्याला १ ते ५ प्राधान्यक्रम द्या. ही प्राधान्यता सोपं किंवा अवघड या पद्धतीने करू नका तर व्यवसायाची काय गरज आहे यावरून ठरवा. पहिलं काम पूर्ण केल्याशिवाय दुसरं काम हातात घेऊ नका. त्या पाच कामाशिवाय दुसरं कुठलंही काम करू नका. 


यालाच पूरक असं कौशल्य आपल्याला शिकावं लागतं आणि ते म्हणजे चिकाटी, पाठपुरावा. काही अवघड कामं असतात. आपण ती करायची टाळतो. लहानपणी प्रश्नपत्रिका सोडवताना आपण अवघड प्रश्न शेवटी सोडवण्यासाठी राखून ठेवायचो. व्यावसायिक आयुष्यात सुद्धा आपण असे प्रश्न नंतर सोडवायचे म्हणून बाजूला ठेवतो. प्रश्नपत्रिकेत हे प्रश्न सुटले नाहीत तर काही गुण वजा व्हायचे. व्यावसायिक जीवनात सुद्धा हे प्रश्न न सोडवण्याची किंमत असते. तिची पत काय आहे यावरून ते काम करायचं की नाही यावर एकदा होकार आला की मग मात्र ते पूर्णत्वाला न्यायचा ध्यास ठेवणं जमायला हवं. व्यावसायिक गरजेनुसार ते काम संपवायचं कधी यावर काही पुढे मागे होऊ शकतं. 


मॅक्डोनाल्ड ज्याने नावारूपाला आणली त्या रे क्रॉक च्या जीवनावर आधारित एक चित्रपट आहे. त्यात रे क्रॉक च्या तोंडी एक वाक्य आहे. Perseverance beats genius. हे वाक्य खरं करणारी असंख्य उदाहरणे आपल्याला आजूबाजूला घडताना दिसतात. लौकिकार्थाने शैक्षणिक काळात बुद्धिमत्तेच्या फुटपट्टीवर फार काही चमकदार कामगिरी न करणाऱ्या अनेकांनी पुढे व्यवसायिक आयुष्यात मात्र जगाने दखल घ्यावी असं काम केलं. हे करण्यासाठी कृतीशीलता वाढवणे, कामाचं प्राधान्य ठरवणे आणि सरतेशेवटी हातात काम घेतलं की ते पूर्णत्वाकडे नेण्याचा सचोटीने प्रयत्न करणे या तीन अमूर्त व्यवस्थापकीय कौशल्याना समजून घेऊन आत्मसात करणे हे गरजेचं आहे.


सकाळ लेख क्र ६

Saturday, 29 January 2022

सकाळ लेख क्र ५

 व्यवस्थापकीय कौशल्यात एक कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे निर्णयक्षमता. वेळेत निर्णय घेणे याचं महत्व हे वादातीत आहे. बऱ्याचदा असं लक्षात आलं आहे की लोक "बरोबर निर्णय" घेण्याची वाट बघतात आणि त्या वाट बघण्यात अनेक महत्त्वाच्या संधी हातातून निघून जातात. 

"योग्य निर्णय" घेण्याची सवय मनाला, मेंदूला लावावी लागते. गंमत अशी आहे की त्याची सुरुवात निर्णय घेण्यापासून होते. सुरुवातीला योग्य/अयोग्य अशी त्याची वर्गवारी करण्यात वेळ घालवू नये या मतापर्यंत मी एव्हाना आलो आहे. सुरुवातीला काही निर्णय बरोबर येतील तर काही चुकतील. क्रिकेट मध्ये एखादा फलंदाज नवीन चेंडू समोर जसा चाचपडत खेळतो तसं या निर्णयाच्या बाबतीत होतं. सुरुवातीला परिस्थिती चकवा देते. एखादा निर्णय चुकतो. पण जसं जीवदान मिळाल्यावर फलंदाज हळूहळू खेळपट्टीवर उभा राहतो आणि मग येणारा प्रत्येक बॉल त्याच्या बॅटच्या मधोमध बसू लागतो, त्याप्रमाणे या येणाऱ्या परिस्थितीशी दोन हात करत ठाम पणे उभं राहिलं की हळू हळू निर्णय ठोकताळ्यांच्या आधारावर बरोबर घेऊ लागतात. लौकिकार्थाने अशा लोकांना मग समाज "यशस्वी" हे बिरुद लावतात. इथे आणि "जो जिता वोही सिकंदर" हा न्याय पण लागू होतो. पण त्याने किंवा तिने  सिकंदर बनण्याआधी अनेक चुकीच्या निर्णयाचा सामना केलेला असतो, त्यातून झालेलं नुकसान सहन केलं असतं, मग ते मानसिक असो, आर्थिक असो वा शारीरिक हे लोकांच्या लक्षात येत नाही. पण ते नुकसान झालेलं असतं. मर्त्य मानव जात ते टाळू शकत नाही. फक्त आपल्या हातात तितकंच उरतं की चुकीचा निर्णय जरी घेतला असतील तरी त्यावर काम करून एक नवीन अनुभव घेणे आणि पुन्हा तशीच परिस्थिती उद्भवली तर दुसरा कुठला तरी मार्ग स्वीकारून आता नव्याने त्या प्रश्नाची उकल करणे. मार्ग थोडा अवघड आहे पण त्याशिवाय दुसरा कुठला सोपा मार्ग नाही आहे. 

ज्याला समाज "अपयश" म्हणतो, त्याकडे जर डोळसतेने बघितलं तर एक लक्षात येईल की नियती एका प्रश्नाची अनेक उत्तरं आपल्यासमोर ठेवत असते. आपण जर सातत्याने चुकीच्या निर्णयाचा मार्ग निवडला की अपयश पदरी पडतं आणि याउलट जर योग्य निर्णयाची निवड केली तर तो मार्ग यशाकडे घेऊन जातो. इथं एक शब्द महत्वाचा आहे आणि तो म्हणजे "सातत्य". एकदा चुकीचा मार्ग निवडला तर काही हरकत नाही. पण ते लक्षात आल्यावर त्या निर्णयाचा नाद सोडून दुसरा मार्ग निवडून त्यावर वाटचाल करणे हे संयुक्तिक असतं. दुर्दैवाने काही लोक सतत निवड चुकीची करतात आणि मग तथाकथित अपयशाचे धनी होतात. 

काही मॅनेजमेंट कोट्स इंटरनेटच्या विश्वात प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक म्हणजे "मी आधी निर्णय घेतो, आणि मग तो बरोबर ठरेल असं वागतो." माझ्यामते हे ही एक दिशाभूल करणारं वाक्य आहे. त्यातील खरा अर्थ असा आहे की निर्णय चुकीचा असेलही पण तो कशामुळे चुकला आहे यावर सखोल अभ्यास करून पुन्हा नव्याने त्या प्रश्नाकडे बघेल आणि मग नवीन उत्तरं शोधेल. ती एक प्रोसेस आहे. कुणास ठाऊक पण कधी तो प्रश्न सोडवण्याचा अट्टाहास सोडून पण द्यावा लागेल. असं करावं लागलं म्हणजे आभाळ कोसळत नाही. कारण नवनवीन संधी येत असतात, मार्ग दिसत असतात. त्या सर्वावर साकल्याने विचार करत परिस्थितीचा गुंता सोडवण्यात शहाणपण आहे. 


सकाळ लेख क्र ५

Wednesday, 19 January 2022

रिले रेस

ऍथलेटिक च्या खेळामध्ये मला सगळ्यात जास्त आकर्षित करणारा खेळ म्हणजे, रिले रेस. कसला भारी प्रकार असतो तो. 

चार जणांची टीम. त्यातल्या प्रत्येक खेळाडूला सगळ्यात बेस्ट परफॉर्मन्स देण्याची गरज. त्यात कुणाचीही सुटका नाहीच. तुम्ही कोणत्याही नंबर वर असा, ढिलं पडून चालतच नाही. तुमच्या एकट्याच्या परफॉर्मरन्स वर चार जणांचं मेडल अवलंबून असतं, वर ते मर्यादित वेळेत. 

त्यातील सगळ्यात आवडणारा क्षण म्हणजे साला तो बॅटन दुसऱ्याला पास व करण्याचा क्षण. काय नसतं त्या वेळात. पहिल्या खेळाडूला माहिती असतं की बॅटन आपल्या हातून आता दुसऱ्याच्या हातात सोपवायचा आहे. थोडक्यात मला ही जबाबदारी दुसऱ्याच्या हातात द्यायची आहे तरी माझं अस्तित्व तो/ती कसं पळणार यावर अवलंबून आहे. मनात तो ही विश्वास ठेवावा लागतो की समोरचा माणूस तितक्याच ताकदीचा आहे, तो ही तितक्याच निष्ठेने आणि आत्मीयतेने पुढच्या खेळाडूला बॅटन द्यायला पळणार आहे. हे सगळं होताना तो बॅटन सुद्धा हातातून पडू द्यायचा नाही आहे, नाहीतर सगळाच गोंधळ. वर परत बॅटन घेणाऱ्याची मानसिकता. तो/ती  ही वाट बघत असतो/ते, कधी ती जबाबदारी आपण आपल्या खांदयावर घेतो आहे ते. कमालीचा उत्सुक असतो. त्याची घालमेल तेव्हा बघण्यासारखी असते. पावलं त्याची थिरकत असतात आणि त्याचं सर्वांग आर्ततेने ते आधीच्या खेळाडूला सांगत असतं की "मित्रा, तू तुझं काम चोख पार केलं आहेस. आता ही माझी जबाबदारी आहे. तू बिनधास्त माझ्यावर विश्वास ठेव. मी जीव तोडून पळेल आणि हा बॅटन समोर पास ऑन करेल." 

आणि मग तो मोमेंट ज्यावेळी तो बॅटन एका हातातून दुसऱ्या हातात विसावतो. त्यावेळी बॅटन पास झाल्यावर देणाऱ्याच्या तोंडावर येणारे निश्चिन्ततेचे भाव. त्यात सुटकेची भावना नसते तर एक आनंद असतो त्याच्या तोंडावर की माझं काम जीव तोडून केलं आहे आणि त्याच बरोबर समोरच्या बद्दल दुर्दम्य विश्वास. आय बेट, कुठल्याही अभिनेत्याला ते भाव जसेच्या तसे दाखवता येणार नाही. उफ्फ.... साला मी त्यावेळी माझा राहत नाही. मी तो बॅटन समोरच्याच्या हातात देणारा खेळाडू बनतो. 

सकाळ लेख क्र ४

याआधी लिहिलेल्या लेखामध्ये काही व्यवस्थापकीय कौशल्याचा उल्लेख केला होता. त्याबद्दल थोडं विस्तृत लिहिण्याचा प्रयत्न करतो. 

वृद्धिधिष्ठीत मानसिकता ठेवायची असेल तर एक कौशल्य अंगात बाणवावं लागतं आणि ते म्हणजे अनलर्निंग. माणूस या आयुष्यभराचा विद्यार्थी असतो हे आपण लहानपणी शिकलो असतो. पण नंतर येणाऱ्या काळाच्या ओघात हे आपण विसरून जातो. जसजशी आस्थापनेत आपली पत किंवा लेव्हल वरती जायला सुरुवात होते त्यावेळेस असणारा आपला नॉलेज बेसला आपण घट्ट चिकटून बसलो असतो. ते नैसर्गिक सुद्धा आहे. कारण त्या माहितीच्या आधारावर आपण स्वतःला प्रस्थापित केलं असतं. तिथं आपल्याला खूप सुरक्षित वाटत असतं. त्या कारणामुळे ते नॉलेज, ती माहिती ज्यावर आपलं तथाकथित प्रभुत्व असतं ते सहजासहजी सोडायला तयार नसतो. त्या आणि त्याच कारणामुळे आपण ती माहिती दुसऱ्याला देत पण नाही, विसरणं तर फार लांबची गोष्ट. या मानसिकतेचा तोटा हा असतो की आपल्या मेंदूचा सीपीयू हा फक्त त्या माहितीने, किंवा रूढार्थाने त्याला ज्ञान म्हणतात, व्यापलेला असतो. जगामध्ये चालू असणाऱ्या नवीन गोष्टीचा अंगीकार करण्यासाठी, त्या शिकण्यासाठी आपला मेंदू हा तयारच नसतो. आपल्या प्रचलित म्हणीप्रमाणे बेडकाला ते छोटं डबकं म्हणजे समुद्र वाटायला लागतो आणि आपल्या वृद्धीला आपण स्वतःच एक अडसर तयार करतो. 

अनलर्निंग ही प्रोसेस फार भारी आहे. त्याचा अर्थ असा नाही कि शिकलेलं विसरून जायचं. तर एकदा त्या माहितीवर, किंवा एखाद्या प्रोसेस वर प्रभुत्व मिळवलं कि त्या वेळी ते नॉलेज दुसऱ्याला पास ऑन करायचं. रिले रेस मध्ये कसं आपण बॅटन समोरच्या खेळाडूच्या हातात देतो आणि निश्चिन्त होतो, तसं व्यावसायिक ज्ञान, माहिती, पद्धती या दुसऱ्याच्या खांदयावर टाकता यायला हव्या. अर्थात हे करताना तितके सक्षम खांदे पण तयार करायला हवेत. एकदा ते केलं तर आजकालच्या भाषेमध्ये, मेंदूच्या सीपीयू मधून सगळं काही डाउनलोड होतं आणि तो नवीन काही आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज होतो. 

यामध्ये गंमत अशी आहे की वृद्धिधिष्ठित मानसिकता म्हणजे श्रीमंती वाढवणे इतक्यापर्यंतच व्याख्या मर्यादित आहे. इतर लौकिक जगासाठी असेलही ते कदाचित, पण व्यावसायिक आणि उद्योजकतेच्या जगात मात्र ही मानसिकता नवनवीन आव्हानं स्वीकारून, त्यावर काम करत सोल्युशन काढणे आणि दुर्दैवाने काही कारणाने अपयश आलं तर हा मार्गच चुकीचा आहे असा अर्थ न काढता, आपल्या पद्धतीमध्ये काहीतरी चुकलं आहे याचा स्वीकार करणे आणि ते दुरुस्त करत पुन्हा नव्याने त्या किंवा दुसऱ्या आव्हानाला सामोरे जाणे हे आहे. आणि इथं आपल्याला लक्षात येते ती म्हणजे अनलर्निंग ची पुढची पायरी आणि ती म्हणजे रिलर्निंग. जे म्हणून आपण नवीन काम हातामध्ये घेतलं आहे ते तडीला नेण्यासाठी काहीतरी पद्धती ही आपल्याला नव्याने शिकावी लागते, त्यावर पुन्हा शून्यापासून काम करावं लागतं. तेव्हा कुठं ज्याला व्यवस्थापकीय भाषेत "इन्क्लुजिव्ह ग्रोथ", (सर्वांगीण विकास) होण्याची शक्यता तयार होते.   

अगदी शब्दाचे खेळ करत सांगायचं झालं तर लर्निंग (शिक्षण, माहिती, ज्ञान).........अनलर्निंग (मिळालेलं शिक्षण विसरणे नव्हे तर हे दुसऱ्याच्या सक्षम खांद्यावर सोपवणे) .... आणि रिलर्निंग (पुनःशिक्षण) ही अर्निंग (कमाई) ची अत्यंत शाश्वत पद्धत आहे हे एव्हाना अनेक उदाहरणावरून सिद्ध झालं आहे.   


सकाळ लेख क्र ४

Saturday, 15 January 2022

सकाळ लेख क्र ३

 पहिल्या लेखात उल्लेख केला होता की उद्योजक आणि व्यावसायिक हे बऱ्याचदा समानार्थी शब्द म्हणून ओळखले जातात. त्या दोघात काय फरक आहे ते जाणून घेऊ. 

मुळात Entrepreneur(उद्योजक) हे नाम नाही आहे ते विशेषण आहे. तो एक गुण आहे. त्यामुळे उद्योजकता ही जितकी व्यावसायिकाच्या अंगात असते तितकीच नोकरी करणाऱ्या माणसाच्या अंगात असू शकते.  उद्योजक आणि व्यावसायिक हे समानार्थी शब्द नसून ते फार तर एकमेकांना पूरक शब्द आहेत. 

काय फरक आहे उद्योजक आणि व्यवसायिक मध्ये. 

तर उद्योजक हा बिझिनेस चा पूर्ण पणे नवीन मार्ग दाखवतो. मग ते प्रोडक्ट च्या संदर्भात असेल नाही तर व्यवसाय करण्याच्या पद्धतीत असेल. व्यावसायिक मात्र मार्केट मध्ये अस्तित्वात असलेला मार्ग चोखाळतो. असे अनेक उद्योग आपल्याला दिसतील की ते येण्यापूर्वी त्यांच्या पद्धतीने व्यवसाय करता येतील हे जगाला माहीतच नव्हतं. ओला किंवा उबर सारखी टॅक्सी सर्व्हिस, ऍमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सारखं ऑनलाईन स्टोअर, एअर बी एन बी किंवा ओयो सारखी हॉस्पिटॅलिटी सर्व्हिस, बुक माय शो सारखी ऑनलाईन बुकिंग ची सर्व्हिस, एअर डेक्कन ने चालू केलेली नो फ्रिल एअरलाईन्स ही आजकालच्या जगातील काही उदाहरणे. 

उद्योजकाने आणलेली कल्पना ही नाविन्यपूर्ण असते आणि त्यामुळे त्याला स्पर्धा कमी असते. व्यवसायिक मात्र प्रचलित कल्पनेवर व्यवसाय चालू करतो. ते करत असणारे अनेक उद्योग अस्तित्वात असतात. त्यामुळे त्याला स्पर्धा जास्त असते. त्यातही काही हरकत नाही, पण जो पर्यंत तुम्ही व्यवसाय करण्याच्या धोरणामध्ये काही "हटके" करत नाही तोपर्यंत उत्पादन किंवा सेवेच्या किमतीत स्पर्धा होत राहते.  

साधारणपणे व्यावसायिक हा व्यवसायाची आर्थिक गणितं मांडत वाटचाल करतो. तर उद्योजक मात्र अमूर्त अशा मूळ सिद्धांताचा पाठपुरावा करतो. त्याच्या आणि बिझिनेसच्या संदर्भातील गोष्टी मध्ये बदल घडवायचा प्रयत्न करतो.

व्यावसायिक लोकांना अशी वागणूक देतो की बिझिनेस ची ग्रोथ होईल, तर उद्योजक बिझिनेस ची अशी जडण घडण करतो की लोकांची ग्रोथ होईल. 

कोणताही निर्णय घेताना व्यावसायिक आकडेमोडी मध्ये गढलेला असतो त्यामुळे रिस्क कमी घेतो, तर उद्योजक संख्यात्मक विश्लेषणाबरोबर अंतर्मनाचा पण आधार घेतो, त्यामुळे त्याच्या निर्णय प्रक्रियेत रिस्क असते.

व्यावसायिक मार्केट मध्ये स्वत:साठी जागा बनवतो तर उद्योजक स्वत:साठी नवीन मार्केट शोधतो.

उद्योजक व्यवसायाकडे त्रयस्थ भूमिकेतून बघू शकतो. तो स्वतःला व्यवसायापेक्षा मोठा समजत नाही. 

वरच्या मुद्द्यांच्या अनुषंगाने उकल केली तर असं सांगता येईल की व्यवसाय म्हणजे धोका घेणे, जो उद्योजकाचा स्थायीभाव आहे,  हे जितकं खरं आहे तितकंच त्या रिस्कला तोंड देता येईल असा बॅक अप प्लॅन बनवणे हेही महत्वाचं आहे. अगदी थोडक्यात सांगायचं दोन्ही बाजूंचे चांगले गुण उचलून व्यवसायाभिमुख दूरदृष्टी ठेवणं ही कसरत असते खरं, पण ती जर जमली तर समाजाने, राष्ट्राने आणि सरतेशेवटी जगाने दखल घ्यावी असा व्यवसाय उभा राहू शकतो. एव्हाना माझ्या लक्षात आलं आहे की उद्योजक आणि व्यावसायिक या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपल्यातल्या उद्योजकतेला जर व्यवसायिकतेचं कोंदण दिलं तर ते नाणं खणखणीत वाजण्याची शक्यता तयार होते.

सकाळ लेख क्र ३

Saturday, 8 January 2022

सकाळ, लेख क्र २

 "मूल जन्मल्यावर ते सात वर्षे माझ्या हवाली करा. आणि मी तुम्हाला ते काय म्हणून घडवायचं ते घडवू शकतो" असं कुणीतरी प्रसिद्ध शास्त्रज्ञ म्हणून गेलाय. थोडक्यात काय तर वयाच्या सात वर्षापर्यंत माणसाच्या पुढील आयुष्याचा प्रोग्रॅम लिहून पूर्ण होतो. तो बदलायचा असेल तर मग प्रचंड कष्ट आहेत. याचा संदर्भ पुढच्या पॅरा मध्ये आला आहे.

सात दशकांपूर्वी बहुसंख्य मराठी जनता ही नोकरी करण्यात गुंग होती अन त्यामुळे इंग्रज गेल्यावर सुद्धा अमहाराष्ट्रीय लोकांनी महाराष्ट्रात व्यवसाय थाटले आणि मराठी लोक त्यांच्याकडे नोकरी करू लागले. काळ बदलला आणि व्यवसायाचं वारं मराठी लोकांच्या मनात वाहू लागलं. पण पिंड नोकरीचा अन व्यवसाय खुणावतो हे द्वंद्व मराठी माणसाच्या मनात सुरू झालं. काही लोकांनी धाडस करत व्यवसायात आले सुद्धा पण आयुष्य सरली तरी चुकलं कुठं हे अनेक वर्षे काही लोकांना कळलंच नाही. आणि कसं कळणार. त्यांच्या वयाची पहिली सात वर्षे त्यांनी घरातल्या मोठ्या माणसांना सरकारी खाते, बँक किंवा खाजगी क्षेत्रात नोकरी करतानाच बघितलं होतं. त्यामुळे मेंदूत नोकरीचा प्रोग्रॅम घट्ट बसला होता. अमहाराष्ट्रीय लोकांची तिसरी, चौथी पिढी जेव्हा व्यवसायात स्थिरावत होती तेव्हा मराठी लोक व्यवसायाची बाराखडी शिकत होते. अर्थात काही मराठी लोकांनी मात्र व्यावसायिक म्हणून अटकेपार झेंडे रोवले.
नोकरी सोडून व्यवसायात जर प्रस्थापित व्हायचं असेल तर काय मानसिकता हवी हे थोडं स्वानुभव आणि काही परिचित उद्योजकांचे विचार सांगतो. माझाच अनुभव यासाठी घेतो की मी सुद्धा मूळचा पक्का नोकरदार माणूस. फासे पडत गेले आणि आज लघुउद्योजक म्हणून का होईना पण ओळखला जातो आहे. तर काही मुद्दे:
१. सगळ्यात पहिले व्यवसाय म्हणजे काहीतरी भपकेदार प्रकरण आहे असं काहीही नसतं. "नोकरीत काही दम नाही" किंवा "दुसऱ्यांची काय भांडी घासायची" किंवा "दुसऱ्यांची ऑर्डर घ्यायची आपल्याला नाही आवडत" असल्या काहीतरी टाळ्याखाऊ वाक्यावर फिदा होऊन व्यवसाय चालू करण्यात काही मतलब नाही. लौकिकार्थाने बहुतेक यशस्वी व्यवसाय हे नाविन्यपूर्ण कल्पनेवर चालू झाले आहेत. यातील मेख अशी आहे की फक्त कल्पना ही नाविन्यपूर्ण असून चालत नाही तर त्यांनंतर व्यवसाय उभा करताना काम करण्याची पद्धती यात नावीन्यता, सातत्याने सुधारणा, व्यवसायाप्रती कमालीची निष्ठा आणि वचनबद्धता आणि सगळ्यात मुख्य म्हणजे वृद्धिधिष्ठित मानसिकता या सगळ्यांचा मिलाफ व्हावा लागतो. आणि हा एक प्रवास आहे. सातत्याने अशा पद्धतीचे मूळ सिद्धांत अंगात बाणवत जेव्हा वर्षानुवर्षे व्यवसायिक प्रवास केला जातो तेव्हा कुठे मग टाटा, एल अँड टी, रिलायन्स, इन्फोसिस, विप्रो यासारखे देशावर आणि जगावर सकारात्मक परिणाम करणारे व्यवसाय उभे राहतात.
२. व्यवसायात यशस्वी व्हाल अशी कोणती प्रस्थापित सूत्र, नियम नाही आहेत. बरं एका यशस्वी व्यवसायाचा फॉर्म्युला दुसऱ्याला लागू होईल याची सुद्धा खात्री नाही. पण मार्गदर्शक तत्वे नक्की आहेत. त्यांचं जर अनुसरण केलं तर टिकून राहण्याची शक्यता तयार होते. खात्री नाहीच. उद्योजकता शिकण्याचं सगळ्यात भारी विद्यापीठ म्हणजे, उद्योजक बनणे.
३. माणूस हा आयुष्यभराचा विद्यार्थी असतो हा शाळेत वाचलेल्या सुविचाराचा अंगीकार व्यावसायिक म्हणून पदोपदी करावा लागतो. "अनलर्निंग" हा यशस्वी उद्योगाचा गाभा आहे.
४. योग्य निर्णय घेण्याची सवय लागावी लागते. पण गंमत अशी आहे की ती लागण्याआधी खूप चुकीचे निर्णय घेतले असतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे आधी निर्णय घ्यायला शिकावं लागतं. निर्णय घेण्याची क्षमता यावर सातत्याने जाणीवपूर्वक काम करत गेलं तर त्या क्षमतेत वाढ होते.
५. कृती हीच संस्कृती. कृतीची जोड नसेल तर कल्पनेचे इमले चढवण्यात काहीच मतलब नाही. "Planning without action is just hallucination." हे कुणीतरी म्हणून गेलं आहे.
६. मॅक्डोनाल्ड च्या रे क्रॉक च्या आयुष्यावर आधारित फाउंडर चित्रपटात एक भारी वाक्य आहे. Perseverance beats genius. एखादं काम हातात घेतलं की ते पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. हा गुण अनुभवाने अंगात भिनवावा लागतो.
७. स्वप्न पहायचं. ते सोडायचं नाही. ते स्वप्न प्रत्यक्षात यायला कदाचित दिवस लागतील, महिने लागतील किंवा वर्षे लागतील पण ती पूर्ण होतात यावर विश्वास ठेवा. अजून एक गंमत सांगतो. एक स्वप्न जगात एकाच वेळी दोन माणसं बघत नाहीत.
वरील सात मुद्द्यात पहिले दोन हे वास्तव आहे आणि नंतर आलेले पाच सूत्र आहेत, व्यावसायिक बनण्याचे. हे मला जाणवलेले. दुसर्यांचे वेगळे असतील. रिकॅप म्हणून खाली लिहितो
1. Unlearning
2. Decisiveness and no procrastination
3. Action
4. Perseverance
5. Dream.


सात दशकांपूर्वी बहुसंख्य मराठी जनता ही नोकरी करण्यात गुंग होती अन त्यामुळे इंग्रज गेल्यावर सुद्धा अमहाराष्ट्रीय लोकांनी महाराष्ट्रात व्यवसाय थाटले आणि मराठी लोक त्यांच्याकडे नोकरी करू लागले. काळ बदलला आणि व्यवसायाचं वारं मराठी लोकांच्या मनात वाहू लागलं. पण पिंड नोकरीचा अन व्यवसाय खुणावतो हे द्वंद्व मराठी माणसाच्या मनात सुरू झालं. काही लोकांनी धाडस करत व्यवसायात आले सुद्धा पण आयुष्य सरली तरी चुकलं कुठं हे अनेक वर्षे काही लोकांना कळलंच नाही. आणि कसं कळणार. त्यांच्या वयाची पहिली सात वर्षे त्यांनी घरातल्या मोठ्या माणसांना सरकारी खाते, बँक किंवा खाजगी क्षेत्रात नोकरी करतानाच बघितलं होतं. त्यामुळे मेंदूत नोकरीचा प्रोग्रॅम घट्ट बसला होता. अमहाराष्ट्रीय लोकांची तिसरी, चौथी पिढी जेव्हा व्यवसायात स्थिरावत होती तेव्हा मराठी लोक व्यवसायाची बाराखडी शिकत होते. अर्थात काही मराठी लोकांनी मात्र व्यावसायिक म्हणून अटकेपार झेंडे रोवले.

एक व्यावसायिक म्हणून जर प्रस्थापित व्हायचं असेल तर काय मानसिकता हवी हे थोडं स्वानुभव आणि काही परिचित उद्योजकांचे विचार सांगतो.     

स १. सगळ्यात पहिले व्यवसाय म्हणजे काहीतरी भपकेदार प्रकरण आहे असं काहीही नसतं. "नोकरीत काही दम नाही" किंवा "दुसऱ्यांची काय भांडी घासायची" असल्या काहीतरी टाळ्याखाऊ वाक्यावर फिदा होऊन व्यवसाय चालू करण्यात काही मतलब नाही. लौकिकार्थाने बहुतेक यशस्वी व्यवसाय हे नाविन्यपूर्ण कल्पनेवर चालू झाले आहेत. यातील मेख अशी आहे की फक्त कल्पना ही नाविन्यपूर्ण असून चालत नाही तर त्यांनंतर व्यवसाय उभा करताना काम करण्याची पद्धती यात नावीन्यता, सातत्याने सुधारणा, व्यवसायाप्रती कमालीची निष्ठा आणि वचनबद्धता आणि सगळ्यात मुख्य म्हणजे वृद्धिधिष्ठित मानसिकता या सगळ्यांचा मिलाफ व्हावा लागतो. आणि हा एक प्रवास आहे. सातत्याने अशा पद्धतीचे मूळ सिद्धांत अंगात बाणवत जेव्हा वर्षानुवर्षे व्यवसायिक प्रवास केला जातो तेव्हा कुठे देशावर आणि जगावर सकारात्मक परिणाम करणारे व्यवसाय उभे राहतात.     

व्य२. व्यवसायात यशस्वी व्हाल अशी कोणती प्रस्थापित सूत्र, नियम नाही आहेत. बरं एका यशस्वी व्यवसायाचा फॉर्म्युला दुसऱ्याला लागू होईल याची सुद्धा खात्री नाही. पण मार्गदर्शक तत्वे नक्की आहेत. त्यांचं जर अनुसरण केलं तर टिकून राहण्याची शक्यता तयार होते. खात्री नाहीच.      

३. ३. माणूस हा आयुष्यभराचा विद्यार्थी असतो हा शाळेत वाचलेल्या सुविचाराचा अंगीकार व्यावसायिक म्हणून पदोपदी करावा लागतो. "अनलर्निंग" हा यशस्वी उद्योगाचा गाभा आहे.     

यो ४. योग्य निर्णय घेण्याची सवय लागावी लागते. पण गंमत अशी आहे की ती लागण्याआधी खूप चुकीचे निर्णय घेतले असतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे आधी निर्णय घ्यायला शिकावं लागतं.     

कृ ५. कृती हीच संस्कृती. कृतीची जोड नसेल तर कल्पनेचे इमले चढवण्यात काहीच मतलब नाही.

६. एखादं काम हातात घेतलं की ते पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. हा गुण अनुभवाने अंगात भिनवावा लागतो.     

  प ६. स्वप्न पहायचं. ते सोडायचं नाही. ते स्वप्न प्रत्यक्षात यायला कदाचित दिवस लागतील, महिने लागतील किंवा वर्षे लागतील पण ती पूर्ण होतात यावर विश्वास ठेवावा लागतो.

यातील काही मुद्द्यावर आपण येणाऱ्या आठवड्यात सविस्तर चर्चा करू.


सकाळ, क्र २