Friday, 14 March 2014

Datt

चित्रपटाची संहिता/पटकथा चांगली असेल तर पात्र कुणीही रंगवले असेल तर शक्यतो जमून जाते. आता बघा ना जिंदगी ना बनेगी दोबारा मध्ये कतरिना सुद्धा कसली उच्च दर्जाची अभिनेत्री वाटते. एवढंच कशाला त्या फरहानची spanish girl friend हि आपल्या लक्षात राहते. लगान मधील कचरू आणि पार म्हातारे झालेले ए के हंगल हि विसरू म्हणता विसरत नाही आपण. स्वदेस मधील बल्ब पेटल्यावर आनंद झालेली म्हातारी विसरू शकतो का आपण?. ३ idiot मधील प्रत्येक charectar मनात घर करून राह्ते अगदी मिलीमीटर सकट.

हे असं असताना मुन्नाभाई MBBS  किंवा लगे रहो मुन्नाभाई सारख्या तगड्या संहिता असताना विधू विनोद चोप्रा आणि राजकुमार हिरानी यांनी लीड actor म्हणून संजय दत्त याची का निवड केली असावी बरे! म्हणजे त्याच्या जागी अगदी कोणीही खपून गेला असता. बरं हि दोघंही जर हुशार आणि सेन्सिबल मंडळी वाटतात. म्हणजे यांना कुणी असं सांगत नाही का कि "अरे हा संजय दत्त चालू माणूस आहे. शेकडो लोकांचा जीव घेणाऱ्या एका मोठया conspiracy चा तो एक भाग आहे. त्याच्या नका तुम्ही नादी लागू" विद्या बालन किंवा ग्रेसी सिंग कशा intelligent बायका वाटतात. त्यांना म्हणावसं नाही वाटत का "हा माणूस असेल तर मी त्याच्या गळ्यात पडणार नाही" मला आठवतंय, लहानपणी मी एका मित्राबरोबर दुकानात गेलो होतो ज्याने काही दिवसांपूर्वी त्याच्याच घरात २-३ रुपयाची चोरी केली होती. मी त्याच्याबरोबर गेलो म्हणून बंबाच्या लाकडाने बदडला होता मला माझ्या आईने. मग हे चोप्रा आणि हिरानी सारखी विचारवंत मंडळीचं  संजय दत्त बाबत विचार करताना यांच्या बुद्धीचं दही होत नाही का? फारच बाळबोध प्रश्न आहेत, पण आज गप्पा मारताना उपस्थित झाले खरे.

Monday, 10 March 2014

मुश्ताक भाई

सध्या आमच्या engineering industry मध्ये तथाकथित recession चालू आहे. पण काही कंपन्या अशा असतात ना कि तिथे मंदी, recession वैगेरे शब्द अस्तित्वातच नसतात. अशीच एक कंपनी माझ्या जवळची मुश्ताक भाई यांची महाराष्ट्र इंजिनीअर प्रायवेट लिमिटेड.

नाही, पण असं काय आहे ना कि मी लिहावं मुश्ताक भाई बद्दल. अशा बर्याच कंपन्या असतात कि ज्यांचे मालक हरहुन्नरी असतात, खूप शिकून सवरून आपापल्या परीने व्यवस्थित मार्केटिंग करून कंपनीचा डोलारा सांभाळत असतात. गम्मत खरी इथे आहे. मुश्ताक भाई फक्त चौथी पास आहेत. १९८९ साली फक्त रु ५००० भांडवलावर (ते पण उधारीचे) एक लेथ घेऊन धंदा चालू केला. स्वत: काम आणायचे, स्वत:नीच करायचे आणि स्वत: डीलीवरी देऊन यायची. पण धडाडी, कल्पकता, हुशारी या जोरावर मुश्ताक भाई आज जवळपास १०० लोकांना सांभाळतात. त्यांचं अदयावत (CNC) अशा मशिन्सची भलीमोठी कंपनी आहे. म्हणजे जवळपास ४० VMC/ HMC आणि turning centers, २ भल्यामोठ्या VTL, ३ जिग बोरिंग, २ grinding मशिन्स, १ CMM  असा भला मोठा पसारा आहे. माझ्या Engineers नसलेल्या मित्रांना कदाचित याचा अंदाज येणार नाही, म्हणून मी जरा पैशाच्या हिशोबात सांगतो. त्यांचा साधारण रु १० कोटीचा वर्षाचा लेबर चा टर्न ओवर आहे. म्हणजे with material जर म्हणायचे झाले तर रु २५ कोटी फक्त.

इंग्रजीचा गंध नाही. पण आज देश विदेशात त्यांच्या इथून material supply केले जाते. स्वत: मुश्ताक भाई जर्मनी, फ्रांस, बेल्जिअम, सिंगापूर या देशात जाऊन आले आहेत. काही नाही,एक इंग्लिश येणारा मित्र घ्यायचा आणि जायचे. २-४ कोटीच्या मशिन्स घेऊन यायच्या.

आणि माणूस स्वभावाला एकदम दिलदार. पोरांना भारीच सांभाळतात. "माणसं टिकत नाहीत" वैगेरे फालतू complaints त्यांच्याकडे चालतच नाहीत. एकदा माणूस लागला त्यांच्याकडे कि त्यांचाच. आणि का नाही हो. वसंत म्हणून हुशार operator. वयाच्या २२ व्या वर्षी मुश्ताक भाई कडे लागला. आज वसंत जवळपास २० वर्ष आहे त्यांच्याकडे आहे, आता सुपरवायझर झाला आहे. wagon r मधून फिरतो. निलेश आहे, मी १२ वर्षापूर्वी त्याला बघितलं तेव्हा एक सुपर वायझर होता (डिप्लोमा आहे तो). आज अख्खी factory सांभाळतो. मुश्ताक भाई पण त्याला i २० देताना कचरत नाहीत.

मुश्ताक भाई, स्वच्छतेचे एकदम भोक्ते. factory तर एकदम कडक पण बघण्यासारखी त्यांची केबिन. भपका नाही पण सुबक. आतच फ्रीज. भरलेला. स्वत: चहाचे आशिक. पण पाहुण्यांनी शब्द काढावा आणि मुश्ताक भाई दोन मिनिटात हजर करणार. कोल्ड ड्रिंक, ice टी. लेमन टी, कॉफी आणि बरोबर बिस्कीट. crockery पण दर्जेदार. engineering industry चालवतात पण कायम पांढरा शर्ट, तो पण परीटघडी चा. आयुष्यभर हात काळे केलेल्या माणसाचं हे पांढऱ्या रंगाचं प्रेम मला कायम अचंबित करत आलं आहे.

व्यसनं पण केली, अतिरेक हि झाला पण धंद्यावर कधी आच नाही येऊ दिली. ५ वर्षापूर्वी हाजी झाले. सगळी व्यसनं सोडून दिली. आता बाह्य रूप तर स्वछ आहेच पण तब्येत हि बढीया. हात मिळवला कि कळतं, हा कुणावर पडला तर काय हाल होतील ते. सामाजिक कार्यातही पुढे. कायम त्यांच्या कडे मदत मागायला लोकं असतात आणि मी त्याच्यात पडत नाही पण कळतं कि कुणी त्यांच्या केबिन मधून रिकाम्या हातानी जात नसावा.

मला नेहमी म्हणतात "च्यायला, मी तुझ्यासारखा शिकलेला पाहिजे होतो" मी म्हटलं "कशाला, बिझनेस प्लान, sales forecast, cash flow याचा अभ्यास करता करता चाचपडत राहतो मी आणि ३-४ लाखाचं equipment आणेपर्यंत तुम्ही ३०-४० लाखाचं मशीन घेऊनही आले असता". ७-८ वर्षापूर्वी मला म्हणाले "हि वेब साईट काय भानगड आहे रे" मी समजावलं. निलेशला बोलावलं "काही नाही महिन्याभरात आपली वेबसाईट पाहिजे." तीन आठवडयातच मला बोलावलं. दाखवली "कशी आहे www.maharashtraengineers.com" मी चाट. सहा महिने माझी साईट develop करायला घेतलेला मी, तीन आठवड्याची करामत बघून चकित झालो होतो. थोडे काही suggestions दिले आणि म्हणालो "साईट चं नाव फारंच मोठं झालं हो. upload झाली आहे का?" म्हणाले "काय, mepl.com करू" ४ दिवसात www.mepl.com.

आजही  मुश्ताक भाई सकाळी ९ वाजता कंपनीत हजर असतात, रात्री साडेआठ वाजेपर्यंत जी तोड काम करतात. बरोबर दुपारी २ वाजता घरून आणलेला डबा खातात. कधीही त्यांना भेटायला गेलो कि त्यांच्याकडे वेळ नाही असं नाही. ते केबिन मध्ये आपल्याशी बोलत असतात. आणि कुठल्याही कस्टमर चा फोन आला तरी त्यांना कुठल्या मशीन वर जॉब चं काय operation चालू आहे हे मुखोद्गत असतं. मार्केटिंग, production, बिझिनेस development, finance अशी विविध department पुस्तकी पद्धतीने हाताळणारा मी मुश्ताक भाई ना observe करत असतो, एखादा IIM चा विद्यार्थी मुंबई च्या डब्ब्यावाल्याचा अभ्यास करतो तसा.

(लेखातील नावं बदलली आहेत, पण मागे लिहिल्याप्रमाणे कुणाला असेच मुश्ताक भाई भेटले तर तो योगायोग समजू नये. कारण असे मुश्ताक भाई जागोजागी सापडतात आणि माझ्यासारख्या मरगळलेल्या जीवांना उभारी देत असतात) 

Saturday, 8 March 2014

अ………ज्ञानी

परवाच मोबाईल फोन घेताना विविध मॉडेल compare करत होतो. आणि लक्षात आले कि कसला  ढ आहे ना मी. technical specification चा काहीच गंध नव्हता. पुढे जाऊन असेही लक्षात आले कि अशी बरीच क्षेत्रं आहेत कि जिथे माझं ज्ञान अगदीच जुजबी आहे. अज्ञांनीच म्हणा ना!

ज्याची लाज वाटायला पाहिजे पण मुर्खासारखा अभिमान वाटतो अशी जागा म्हणजे स्वयंपाक घर. काही म्हणता काहीच जमत नाही. माझा मित्र विनय इतका भारी डॉक्टर पण काय जेवण बनवतो. चवीने आणि आश्चर्याने मी त्याच्या हातचं खाताना बोटं तोंडात घालतो. वैभवीच्या सगळ्या बहिणींचे नवरे हे अतिशय उत्तम  बल्लव आहेत. सागर, शिवकुमार, दिलीपभाई यांच्या या कलेची रसभरीत वर्णनं ऐकली कि तोंडाला तर पाणी सुटतच, पण डोळ्यातूनही. कारण साला मी त्यांच्या आसपासही फिरकू शकत नाही. (कांदा फारच तिखट आहे राव). (नाही म्हणायला मंडलिक परिवारात नाही बरं कुणी माणूस लोकांच्या जिभेचे चोचले पुरवणारा. तेवढंच एक समाधान. थोडक्यात या क्षेत्रात आम्ही  खानदानी येडे आहोत)

दुसरं म्हणजे शेती. भारत हा कृषिप्रधान देश आहे, हे फक्त पुस्तकातच. मध्ये अनिकेत दा कडे गेलो होतो मुरुमला. त्यांनी फारच प्रेमाने दाखवली त्यांची शेती. आणि हळूच विचारले "काही जमतंय का" बहुधा ताडलंच असावं कि बाबाला काही सुधरत नाही आहे. मी पण खालच्या मानेनं कबुली दिली "नाही बुवा"

दिवसभर जो laptop बडवत असतो, त्याचे specifications. LAN, Server या hardware चे features. अगम्य आहे हो सगळं. आणि त्यात परत software languages चा विषय निघाला कि लोकं मला हिब्रू भाषेबद्दल चर्चा करत आहेत असंच वाटतं. अहो  Microsoft Excel, काय भारी प्रकार आहे. पण CA जेव्हा प्रोजेक्ट report घेऊन येतो तेव्हा आ वासून सगळे formulas बघण्याशिवाय काही पर्याय उरतो का?

विमानं, rocket यांचा तर मी धसकाच घेतला आहे. मुलं पण आपला बाप engineer आहे असं समजून या विषयावर काही प्रश्न विचारतात, तेव्हा मी ऐकून न ऐकल्यासारखा करतो किंवा काहीतरी थातुरमातुर उत्तर देऊन वेळ मारून नेतो. कुठलीही गोष्ट अवघड नाही आहे हे सांगताना मात्र "this is not rocket science" हे मात्र आवर्जून सांगतो.

कॅमेरा, tv, फ्रीज या सगळ्या वस्तू घेताना लोकं किती चिकित्सक असतात. मी मात्र या गोष्टींचं selection छापा कि काटा या style नि च करतो. पण चेहऱ्यावर मात्र ज्ञानी भाव मात्र सोडत नाही हे सगळं करताना. तिथे एकदम जोरात.

राजकारण. काय पब्लिक ला मतं असतात ना. bjp, कॉंग्रेस, आप कसली बेफाम चर्चा चालते फेसबुकवर आणि काही मित्रमंडळी मध्ये. नाही म्हणायला मी पण एक अधून मधून वाक्य टाकतो पण त्यात काही जोर नसतो. (ते काहीही असलं तरी मोदी साहेब काही झेपत नाही बुवा आपल्याला) हे असलंच कंसातील. तेवढीच लायकी आपली.

आपली एक लई भारी थेअरी आहे. जे खूप लोकं घेतात, तेच आपण पण घ्यायला असं काही नाही. हा rule लावून मी २००० साली santro घेतली (तेव्हा santro च्या आकाराची फारच मजाक उडवत होते लोकं), माझ्याकडे tv आहे तो पण RCA चा (Radio Corporation ऑफ America) ऐकलं कधी, कार मध्ये पहिल्यांदा टेप लावला तो पण blaupunkt चा, नाव ऐकूनच लोकांनी नाक मुरडलं होतं. बर्याचदा बसला मटका जागेवर.

लोकांना किती माहित असतं. सुर्याखालील कुठलाही विषय घ्या, बाह्या सरसावून तयारच असतात authoritatively बोलायला. मी तर बाबा अस काही अतर्क्य आलं कि हळूच काढता पाय घेतो. आणि बरीच कारणं असतात नाही का. आजकाल मोबाईल फोन नि फारंच चांगली सोय दिली आहे अशा discussion मधून निघून जायला. (पूर्वी nature's call हे एकंच कारण असायचं) फोन आला म्हणून कानाला लावायचा आणि निघून जायचं. (एकदा मी अशीच acting करत निघालो कानाला फोन लावून बोलत, तेवढयात रिंग च वाजली फोनची)


तर असामी………… नाही नाही आसामी नाही तर चालू माणूस. Jack of all, master of none. (हे jack पेक्षा काही degraded version आहे का? फिट बसलं असतं मला). कुठल्याही क्षेत्रात असामान्य प्राविण्य न मिळवता जीवनाची नैया हाकणारा अ…………ज्ञानी असा सामान्य माणूस.

Tuesday, 4 March 2014

It happens only in...........

खरं म्हणजे हा किस्सा मी लिहिणारच नव्हतो. पण डोक्यात फारच वळवळ चालू होती. तर विचार केला लिहूनच टाका.

तर झालं असं कि १५ दिवसांपूर्वी अस्मादिक दिल्ली हून पुण्याला येत होते. (कसलं भारदस्त वाटतय ना "अस्मादिक" आणि काय काय). विमान नागपूर ला थांबले. शेजारची तरुणी (पुढं वाचा, लागलीच "बर्या भेटतात शेजारी" असले विचार मनात आणू नका) आपल्या ४ वर्षाच्या कन्यकेला घेऊन उतरती झाली. माझी aisle ची जागा होती. नवीन प्रवासी येऊ लागले. कुतूहलाने मी माझ्या शेजारी कोण येतंय ते बघू लागलो.

तेवढयात आलीच, ती, डोक्यावरून ओढलेला घुंघट, हातभर बांगडया, आ तळहातकोपर्या पर्यंत पसरलेली मेहंदी (आसेतुहिमाचल या धर्तीवर) (आज काल "तळव्यावर मेहंदीचा अजून रंग ओला" असलं गाणं कालबाह्य झालं आहे), गळ्यात दागिने अशी नवपरिणीत वधू. तिला खिडकीजवळच्या सीट वर जायचे होते. मुखदर्शन अपरिहार्य होते. रुपगर्विता जणू. म्हणजे अगदी ऐश्वर्या किंवा प्रियांका नाही पण परिणीती किंवा विद्या बालन पर्यंत. तिच्या मागेच तिचा नवरा होता. पण तिच्या मानाने काहीतरीच होता तो. म्हणजे अगदी उदय चोप्रा पेक्षाही बंडल. असं माझ्या मनात आलं. (आणि मग माझ्या लग्नाच्या वेळेस मला बघितल्यावर सोनईकरांच्या घरी कशी कुजबुज झाली ते जाणवलं. "डॉक्टर नाही तर, थोडा तरी उजळ बघायचा वैभवीने." काहीतरीच आहे हा आपल्या वैभूच्या मानाने" वैगेरे). आता मला वाटलं कि नवरदेव विराजमान होतील मधल्या सीट वर. पण नाही, मला मागे ढकलून, त्याने  त्याच्या वधूला आत जाऊ दिलं आणि त्या पाठोपाठ एक १४-१५ वर्षाचा बंड्या (बहुधा विद्याचा भाऊ असावा) मधल्या सीट वर विसावला.

मग उदय (हेच नाव ठेऊन देऊ) च्या मागे एक पगडी घातलेले वयस्कर गृहस्थ होते, त्यांना उदयनी aisle सोडून जी दुसरी रांग सुरु होते तिथल्या मधल्या सीट वर बसतं केलं आणि स्वतः त्या रांगेच्या aisle सीट वर बसला.

मला काही सुधारलं नाही. आयला हे नुकतंच लग्न झालेलं जोडपं पण असं वेगळं वेगळं का बसतंय. बरं असा विचार केला कि विमान उडल्यावर ताऊ जी झोपल्यावर विमानाचे लाईट बंद झाल्यावर बंड्या व उदय सीट exchange करतील आणि… बास (म्हणजे मी धुमारे उडवणं बंद करा म्हणतोय), तर तशीही काही शक्यता नव्हती. इनमिन १ तासाची फ्लाईट. फक्त उडताना आणि उतरताना लाईट बंद. ३०००० हजार फुटावर पोहोचलं कि विमानाचा ड्रायवर फुल उजेड पाडतो.

मागे एका पोस्ट च्या निमित्ताने विकास गोडगे आणि संतोष शेलार यांनी खूप कानपिचक्या दिल्या होत्या पण भोचक स्वभावाचा मी. एवीतेवी डाराडूर झोपणारा त्यादिवशी जागा राहण्यासाठी कॉफीचे  (रु ६०, तेवढंच daring आपलं) घुटके मारत हळूच उदय कडे बघत होतो. तर तो आपला विद्याकडे बघून स्मित करायचा आणि परत समोर बघायचा. विद्या पण बहुधा लाजून हसत असावी. ताऊ एव्हाना निद्रादेवीच्या आधीन झाले होते. मला राहवलं नाही, मी बंड्याला म्हणालो "तू उदयच्या सीट वर बस आणि त्याला इकडे बसू दे कि" तो म्हणाला "नाही जमणार". त्याचा कोल्ड response पाहून मी बंडयाला म्हणालो "एक काम करू यात, मी ताऊ जिच्या शेजारी बसतो, तू माझ्या जागी बस आणि उदयला ला विद्या शेजारी बसवू. म्हणजे ते काय करतात यावर तुला लक्ष पण ठेवता येईल." हे ऐकल्यावर बंड्याने तोंड वाकडं केलं आणि झोपल्याची pose घेतली.

मी विचार केला कि आता उदय ला च आपण proposal द्यावं. पण तो पठ्ठ्या विदयाकडे बघून मुरकं मुरकं हसण्यात इतका गर्क होता कि माझ्याकडे लक्षच देत नव्हता. एव्हाना ताउजी पण डोळे किलकिले करू लागले. शेवटी ठरवलं कि विदयालाच propose करावं कि…… अरे काही चुकली का वाक्यरचना! ठीक आहे जसा मी विचार सोडून दिला तसंच हे वाक्य पण सोडून देतो.

एव्हाना विमानाच्या ड्रायवर ने, यावेळेला बहुधा cleaner असावा, उद्घोषणा केली कि विमान थोडया वेळातच पुणे विमानतळावर (हवाई अड्डा, कसला भंगार शब्द आहे ना, अड्डा काय!) उतरणार आहे. बंड्याने पण झोपेचं सोंग बंद केलं. मी त्याला विचारलंच "का रे हलला नाहीस लेका" तर म्हणाला "जीजू नही आते थे, ताउजी जो साथ मे है!"

विमानातून खाली उतरलो. अजूनही बंड्या आणि विद्या बरोबरंच चालत होते आणि उदय ताउजीना पुणे विमानतळाची माहिती देताना दिसत होता. (सुखोई squadron बद्दल सांगत असावा)

मी अवाक. शप्पथ, कसले एकएक अनुभव येतात ना. ( माझ्या पोराला तर मी आत्ताच unwanted झालो आहे. ताउजी एवढा झालो  तर बरोबर प्रवास, आणि तेही लग्नानंतर लगेच, तर फार दूरचं, १०० मी च्या त्रिज्येत उभं राहू देणार नाही)


संभ्रम

दोन दिवसांपूर्वी चाकणला चाललो होतो. समोर एक सिक्स सीटर काळा धुर भकभक सोडत चालली होती. शेजारी अमन बसला होता. मी म्हणालो "कसलं विष ओकत आहे ना ही सिक्स सीटर". तर अमन म्हणाला " हमम…पण त्या रिक्शा ड्रायव्हरचं पोट आहे त्याच्यावर. त्याच्यासाठी अमृतंच ते"

खरं आहे "एकासाठी जे विष असतं ते दुसर्यासाठी अमृत असु शकतं"

गाणी बजावणी चालू असलेली वरात. जोरात आवाजाचा ब्रास बॅंड. कानाला प्रचंड त्रास. जे माझ्या कानाला बेसूर वाटतं ते त्या वाजवणार्याच्या घरच्यांना मंजुळ वाटत असेल कदाचित.

(खरं तर मला या प्रकारात त्या घोड्यावर बसलेल्या गाढवाचंच नवल वाटतं. या युगात त्याला आवडतं बरं हे सगळं नाटक करायला)

एक मजेदार किस्सा सांगतो. अमेरिकन जिम एकदा माझ्या घरी आला होता. गणपती होते तेव्हा घरात. दाराशीच बायकोने स्वस्तिक ची रांगोळी काढली होती. एकतर तो बूट घालूनच घरात शिरत होता. त्याला मी सांगितले जर बूट काढावा लागेल. विचित्र नजरेने बघत त्याने काढले बूट. आणि दरवाजातून आत शिरताना त्याला स्वस्तिक दिसले. पायाच्या अंगठ्याने स्वस्तिक ला स्पर्श करत त्याने विचारले "what is this?" जीवाच्या आकांताने मी ओरडलो "don't touch it with your feet" त्याने चमकून विचारले "why" मी म्हणालो "this is our sacred sign" जिम निर्विकार चेहऱ्याने म्हणाला "this looks similar to Hitler's Nazi sign. how is that this is your holy sign?"  माझ्याकडे उत्तर नव्हतं.

मला पवित्र वाटणारं दुसर्या कुणासाठी तिरस्काराचं कारण नक्कीच असु शकतं.

पथारी पसरून फूटपाथवर भाजी विकणारी आजीबाई आणि रेवड्याची हातगाडी ढकलत आणि शेजारीच चालणार्या त्याच्या चिमुकलीशी गप्पा मारताना जाणारा तो विक्रेता जेव्हा ट्राफीक जाम करत असतात़, तेव्हा मी पुर्णपणे संभ्रमात पडलो असतो.

कळतच नाही ना मी संभ्रमात आहे की कुठल्या..................भ्रमात. 

Thursday, 27 February 2014

हे आहे असं आहे

जून २०१३ चा तिसरा आठवडा. तारीख आठवत नाही, पण शनिवार असावा. तैचुंग, तैवान मध्ये ३ दिवस neo कंपनीत grueling sessions नंतर परत यायला निघालो होतो. Howard Prince नावाच्या हॉटेल मधून सकाळी चेक out करत होतो. हॉटेल छानच होतं पण रेट नि धडकी भरवणारा नव्हतं. मला see off करायला पीटर ली आला होता. मुख्य दरवाजापाशी taxi येउन थांबली होती. अचानक counter ची कन्यका म्हणाली "excuse me,  you will have to wait for 5 minutes" खरं तर माझ्याकडे वेळ होता पण मी शायनिंग टाकत उगाचच मोबाईल मधल्या घड्याळाकडे बघत म्हणालो "Hurry up, please. I need to catch train to Taipei and my cab is already here." ती हसली आणि कुणी तरुणी हसल्या नंतर साधारण मध्यमवयीन पुरुषाचं जे होतं तेच माझंही झालं, मी पाघळलो. हॉटेल मधल्या एका माणसाने माझ्या taxi ड्रायवर ला सांगितलं कि इथे थांबण्याच्या ऐवजी पार्किंग मध्ये गाडी लाव आणि दहा मिनिटात ये. मला काही सुधरेना, आयला आधी माझी चेक out ची procedure थांबवली आता ड्रायवर ला सांगितलं इथे थांबू नको. म्हंटल काय राडा झाला कि काय?

हॉटेलच्याच एका माणसाने रिकामा corridor त्याच्या शोधक नजरेने पालथा घातला. हॉटेलचा स्टाफ, म्हणजे ६ मुली आणि ६ मुलं entrance ला ओळीने उभी राहिली. विम्बल्डन च्या बक्षीस समारंभात ते ग्राउंड वरची पोरंपोरी उभी राहतात तशीच. दोन रांगेमधील वाट सरळ लिफ्ट पर्यंत जात होती. एक माणूस लिफ्ट पाशी थांबला. मी हे सगळं कुतूहल मिश्रित काळजीने बघत होतो. कारण मला ट्रेन पकडायची पडली होती. पीटर ला मी म्हणालो "भाऊ, काय ठीक आहे ना सगळं" त्याने काही विचारायचा प्रयत्न केला, येउन म्हणाला "you will have to wait for 5 minutes" मी कारण विचारले तर त्याने नकारादाखल खांदे उडवले. मी पण जास्त भोचकगिरी नाही केली.

थोडी कुजबुज चालू असतानाच, दोन गाडया हॉटेलच्या corridor मध्ये दाखल झाल्या. पहिली lexus किंवा अशीच कुठली तरी आणि त्यामागे अजून एक टोयोटा किंवा तत्सम. हॉटेलचा manager पुढे गेला. पहिल्या कार मधून मागच्या दरवाजातून साधारण एक पन्नाशीचा माणूस बाहेर आला. well dressed, पण भपका नाही, blazer होता अंगावर. manager ने त्याच्याशी हस्तांदोलन करून bouquet present केला. त्याने मागच्या माणसाच्या हातात तो सोपवून दिला. त्याच्याशी दोन शब्द बोलून तो रुबाबदार माणूस त्या हॉटेलच्या मुलामुलींशी आस्थेने बोलू लागला. विम्बल्डन ला ती राणी आणि तो duke बोलतात ना तसेच. (हि मंडळी काय बोलतात हे एक न उलगडलेले कोडे आहे). एव्हाना आमच्या पीटरच्या चेहऱ्यावर हास्य उमलले होते. त्या रुबाबदार माणसाचे पीटर कडेही लक्ष गेले. पीटर नि हात हलवून आणि नंतर वाकून अभिवादन केले. असा सोपस्कार करून तो लिफ्ट पाशी गेला, पलटला आणि परत त्याने सुहास्य वादनाने हात वर करून बाय केल्यासारखे केले आणि तो आणि त्याच्याबरोबर अजून त्याची दोन माणसे लिफ्ट मधून वर गेली. अजून काही लोकं होती ती दुसर्या लिफ्ट मधून वर गेली. हे सगळं घडलं ५-७ मिनिटात. पोरं पोरी पटापट आपापल्या कामाला लागली.

मी आश्चर्याने पीटर कडे बघत होतो. त्यांनी ते ताडलं आणि मला विचारलं "did you get who was he" मी म्हणालो "नाही बा" तर तो वदला "He is Premier of Taiwan" मी करवादलो "don't tell me that" तर म्हणाला "believe me" आणि त्या counter वरच्या पोरीला म्हणाला "याला सांग, हि आमच्या इथली सर्वोच्च व्यक्ती आहे" ती हसली आणि म्हणाली "Sorry Mr Rajesh for the delay. Here is your bill" आणि दुसरा एक माणूस माझी bag घेऊन निघाला. माझी taxi सुद्धा दरवाजात परत हजर होती.

काही कळायच्या आत पीटर मला बाय म्हणालासुद्धा आणि taxi च्या ड्रायवर ने  कार चालू केली, आणि मी निघालो आपल्या देशाकडे.

(आज एक  नगरसेवक आला होता फाट्यावर कुठल्या कार्यक्रमासाठी. मी तो तमाशा बघितला. पांढऱ्या रंगाची Fortunner, आणि पाठोपाठ ३-४ Xylo/Bolero. फटाके, हार तुरे आणि काय काय)

हे आहे असं आहे

Tuesday, 18 February 2014

बदल

कसला बदल घडतोय न आयुष्यात. कुठं चालू झालं आणि कुठे येउन पोहोचलय. नशीबवानच आहे मी या युगात जन्मलो ते.

- मनमाडच्या रेल्वे स्टेशनवर आईच्या कडेवर लहान भाऊ, मी आजोबांचा हात पकडून. दोघांच्या हातात ब्यागा. रात्री बाराची अजंता एक्स्प्रेस. सीट मिळवण्याची मारामारी. सकाळी परभणीला पोहोचण्यासाठी. 
- १९८९, बाबांची मुंबई ला बदली. डेक्कन क्वीन चं तिकीट काढण्यासाठी सकाळी ५ ला पुणे स्टेशन ला लायनीत. साडेआठ ला घामाघूम होऊन बाहेर आलेलो मी. 
- १९९४-२०००. computerized तिकिटे काढणारा मी, माझ्याच टुर ची.  पण रांगेत २-३ तास.

आणि आता घरबसल्या तिकीट काढून आरामात प्रवास करणारा मी (IRCTC चा फ्यान आहे मी)

- विमान फक्त आकाशात बघण्यासाठी असतं, हेच डोक्यात बसलं होतं. पहिला विमान प्रवास १९९६ साली. तिकीट दर पाहून डोळे विस्फारलेले.

आणि आता thanks to Captain Gopinath. एयर डेक्कन नि कवेत आणलं आणि आता सुदैवानं परवडू पण शकतं. तिकीट घरबसल्या.

- तुमच्या घरात चार चाकी असेल असं जर बाबांना कुणी सांगितलं असतं तर त्यांनी त्यांनी त्याला येडयात काढलं असतं.
- अचानक १९९१ साली लहान भाऊ (लहान असला तरी करामती आहे तो) फियाट घेऊन आला.
- १९९१-१९९७, कधी बंद पडत, कधी ढकलत चालू ठेवलेली कार.

आणि मग तंत्रज्ञान बदललं. २००० ते आतापर्यंत फक्त एकदा गाडी रस्त्यात बंद पडली आहे.

- १९९१ पर्यंत शेजारच्यांच्या फोन वर मदार. ट्रंक call ची मारामार.
- ISD फार दूरची गोष्ट, STD करताना जीव खाली वर व्हायचा.बुथवर कंटाळवाणी  वाट बघणे. 
- १९९८-९९ साली कंपनीच्या फोन चं बिल महिन्याला रु ५०००.

आणि आता मोबाईल, STD जणू लोकल call. ISD पण फार महाग नाही. Skype, Facetime सगळं दिमतीला. एवढं  करून महिन्याचा खर्च रु ३०००

- सगळीकडे लाईन. विजेच्या बिलाची, फोनच्या बिलाची, पोस्टाची, बँक लाईन. आपला नंबर आला कि खिडकी बंद होणे.

आणि आता फोन बँकिंग. सगळं घरात बसून. मोलकरणीचा पगार, दुध बिल, पेपर बिल, इस्त्रीवाला असे मोजकेच पैसे कॅश मध्ये. बाकी नेट  बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड वर. बँकेत गेलोच नाही आहे कित्येक वर्षात.

सगळ्यात जास्त फरक पडला आहे तो माझ्यासारख्या मध्यमवर्गीयाच्या जीवन शैलीत. पण वाईट याचं वाटतं कि हाच वर्ग बोंब मारतो "६० वर्षात काहीच नाही घडले". अहो साधे ५०० डॉलर विदेशात घेऊन जायचे म्हंटले ना कि बँकेची permission लागायची. आणि आता सहजासहजी सह कुटुंब परदेशात जाताहेत, आरामात स्थायिक होत आहेत, पाहिजे तेव्हा परत येत आहेत. आणि वर तोंड घेऊन म्हणायचं काय तर मुंबई airport वर बेल्ट बंद पडला २ मिनिटासाठी कि उपहासाने "welcome to India" आणि मग एखाद्या गोर्याकडे बघून हसायचं,  आणि दाखवायचं काय जोक करतोय.

माझ्या ड्रायवर च्या घरी गेलो होतो. घर किती, तर १६० sqft चं. २ खोल्या. पुढच्या खोलीत अंघोळीची
 जागा ३x ३ फुट. दोन माणसं बसली तर तिसर्याला उभं राहावं लागतं. किती वर्ष राहतो आहे तर उणीपुरी ५० वर्षं. घरात माणसं किती, ४. नवरा, बायको, २४ वर्षाचा मुलगा आणि १९ वर्षाची मुलगी. बोला कसं मोठं केलं असेल, कधी त्याला बायकोशी एकांतात बोलायला मिळाले असेल. अशी लोकं गप्पं, जगताहेत आणि आम्ही सगळ्यात जास्त फायदा झालेले लोक ओरडतोय कि , "काही नाही, बकवास आहे".

सालं जिथे राहतो ती cooperative society नीट सांभाळू नाही शकत आपण. चार लोकं अंगावर आली तर फाटते आणि म्हणायचं कि यांना राज्य करता येत नाही.

टीका करा पण जर धरबंद ठेवू यात. गप्प बसा असं नाही म्हणत पण be part of solution. नेहमी प्रश्नच घेऊन उभे राहिलो तर कसे चालेल?

मित्रांनो, सकारात्मक बोलू यात, वागू यात. त्यातूनच काही चांगलं घडलं तर घडेल. नाहीतर नुसतं बोंबलंत राहिलो ना तर भविष्यात पण तेच करावं लागेल.

मनात आलेला प्रश्न:

- कनिष्ठ मध्यमवर्गीय चे आपण मध्यमवर्गीय झालो नंतर उच्च मध्यमवर्गीय झालो तरी आरडाओरड चालूच.मला माहिती आहे गरीब कुटुंब सुद्धा मध्यमवर्गीय होतंच असतील. ही कोकलायची सवय कुठल्या category त लागत असेल?


(माझ्यासारख्या तथाकथित मध्यमवर्गीय सुखवस्तु घरातल्या मुलांपेक्षा, रूढार्थाने गरीब घरातल्या, पण संवेदनशील अशा मुलमुलींच्या हातात उद्याच्या भारताचं भविष्य सुरक्षित आहे असं मला वाटतंय.)