ते दिसतंय ठिकाण अंधुकसं. हो हो तेच. तिथं पोहोचायचं आहे तुला. कसं जमणार म्हणतोस? अरे, काही नाही चालायला लागायचं. त्या आधी वाटेल तुला की नको जायला तिथे. पण झटकून टाक ते विचार. आणि चालू लाग. मध्ये काही संकटं येतील, वाट खाचखळग्याची होईल, पण तू धीर सोडू नकोस. कधी तुला मरणाची तहान लागेल, भीतीने तोंडातून शब्द फुटणार नाहीत, पाय थरथरतील. तेव्हा उडवून टाक मनातले विचार, घे हातात भीतीला अन फेक बाजूला दिसणाऱ्या झाडाझुडपात, पायदळी तुडव त्या अंगातल्या मरगळीला अन चालत रहा त्या ध्येयाच्या दिशेने. थांबू नकोस. मागे वळू नकोस. त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुला एकंच करायचं आहे.........तिकडे जाण्यासाठी पाहिलं पाऊल ऊचलायचं आहे. बास!
Wednesday, 13 April 2016
दुनियादारी
काल मी बंगलोर ला आलो. इथे माझा एक जवळचा मित्र राहतो. कृष्णा नाव ठेवू आपण त्याचं. बरोबर काम करायचो आम्ही. तो मूळ दिल्लीचा. वर्ष सरली, तो आता एका कंपनीचा मोठा अधिकारी झाला आहे. एकटाच राहतो. फॅमिली दिल्लीत.
तो ज्या कंपनीत काम करतो ती मोठी आहे, पण सध्या काम नसल्यामुळे गळपटली आहे. चार सहा महिन्यापासून पगार पण नाही असं ऐकत होतो. त्यानेच मला फोन करून सांगितलं होतं.
काल बंगलोर ला आल्या आल्या माझा फोन झाला त्याच्याशी. दुपारी मी एक्झिबिशन चा स्टॉल सजवत असताना मला त्याचा परत फोन आला "अरे राजेश, मला आताच्या आता दहा हजार रुपयाची गरज आहे. आताच्या आता देऊ शकतोस का? साला पगार नाही झाला चार महिने. अन तिकडे दिल्लीहून बायकोचा फोन आला की महत्वाच्या कामासाठी पैसे हवे आहेत, आजच्या आज"
आता एकदा दोस्ती केली म्हंटल्यावर प्रश्न मिटला. आजकाल क्रेडिट कार्ड मुळे खरं तर कॅश ठेवत नाही, पण सुदैवाने होती. पाच दिवस कंपनीचे तिघे राहणार, त्यांना लागेल कदाचित म्हणून ठेवले होते. लागले तर मी काहीतरी करून जमवू शकत होतो.
एक्झिबिशन चा स्टॉल सजवत होतो. त्यात तो म्हणाला की जरा पिनिया ला ये आणि तिथे आणून दे पैसे. झालं, टॅक्सी केली, धावपळ करत पिनिया ला गेलो आणि त्याला पैसे दिले अन परत गेलो.
दुसऱ्या दिवशी कृष्णा एक्झिबिशन पाहायला आला. मी आणि तो जेवायला गेलो. जेवताना त्याला विचारलं "काय जमलं का काल सगळं?"
तर म्हणाला "जमलं यार, पोराला ट्रिप ला जायचं होतं आणि पैसे भरायची लास्ट डेट होती. पोरगं खूप नाराज झालं होतं. म्हणून बायकोचा फोन आला, काहीही करा, पण पैसे पाठवा" पुढं म्हणाला "तुला लागत नव्हते ना पैसे"
मी म्हणालो "अरे, नाही रे. म्हणजे पोरं पाच दिवस राहणार. एक चेन्नई हुन येणार. त्यांना लागेल म्हणून आणले होते. त्यांच्या कडे असतीलच पैसे, पण सेफ्टी म्हणून आणले होते. आता पुण्याला गेलो की पाठवतो"
इथपर्यंत सगळं व्यवस्थित झालं. पुढं कृष्णा जे बोलला त्याने मात्र चकित झालो.
"अरे, सांगायचं की मला. मी केले असते पैसे कुठून तरी मॅनेज. माझा चुलत भाऊ बंगलोर मधेच राहतो, पण त्याचं घर जरा लांब होतं, म्हणून मी तुला मागितले. तू सांगायचं मला की तुला पैसे लागणार म्हणून. मी जमवलं असतं कसं तरी"
मी चकित तर झालोच पण व्यथित ही झालो. एकदा कृष्णाने पैसे मागितले, मग मी काही मागचा पुढचा विचार नाही केला. कधी परत देणार तेही विचारलं नाही, आज सहा वर्ष झाली तो बंगलोर मध्ये आहे, मग त्याचं मित्र मंडळ जमा नाही का, जे त्याला मदत करतील, मी समजा आज बंगलोर मध्ये नसतो तर त्याने काय केलं असतं. आणि हा म्हणतोय "अरे, इतकं काय मोठं. मी जमवलं असतं कुठून तरी"
धन्य झालो. आईच्यान, पन्नाशी आली, पण दुनियादारी काही कळत नाही राव अजून.
आडनाव
काही वर्षांपूर्वीची गोष्ट. नांदेड हुन दोन भाऊ आमच्या घरी बाबांना भेटायला आले होते. त्या दोघांचे वडील बाबांच्या ओळखीचे होते. ते दोघं आता इकडे शिफ्ट झाले होते. म्हणजे एक पुण्यात तर एक सातारा ला. त्यांचं आडनाव घोडके ठेवू. संतोष आणि सुरेश अशी नावं.
सुरेश वेबसाईट डेव्हलपमेंट चं काम करायचा. त्यानं कार्ड दिलं. तर त्यावर त्याचं नाव सुरेश जोशी असं लिहिलं होतं. मी असं का विचारलं. त्याने जे सांगितलं ते विचित्र होतं.
पुण्यात आल्यावर त्याने बाजीराव रोड ला बिझिनेस साठी रेन्ट वर ऑफिस घेतलं. यायला जायला सोपं पडावं म्हणून शनिपार आणि आसपासच्या भागात तो रूम शोधू लागला. आठवडाभर पायपीट केल्यावरही त्याला रूम काही मिळेना. त्याला आश्चर्य वाटत होतं. म्हणजे रूम होत्या पण घरमालक थोड्या गप्पा झाल्यावर, नाही द्यायची म्हणून सांगायचा.
त्याच्या दुसऱ्या एका मित्राला सांगितल्यावर मित्र म्हणाला "तू ब्राह्मण आहेस, पण तुझं हे घोडके आडनाव घोळ करतंय" सुरेश ला रूम तर त्या एरिया मधेच हवी होती. त्याने गॅझेट मध्ये अर्ज करून आडनाव जोशी करून घेतलं.
दोन दिवसात त्याला रूम मिळाली.
संतोष साताऱ्यात एका प्रायव्हेट कंपनीत इंजिनियर म्हणून लागला होता. मी संतोष ला विचारलं "तू ही आडनाव बदलून घ्यायचं की." तर तो म्हणाला की या भागात हे घोडके आडनाव असलेलं बरं पडतं. जास्त कुणी हिणवत नाही.
दोन सख्खे भाऊ. एक सुरेश जोशी तर दुसरा संतोष घोडके.
आम्हा मंडलीक लोकांचं बरं आहे. आम्ही सगळ्यांना आपला माणूस वाटतो.
दिल्लीकर
मी दिल्लीतल्या लोकांबद्दल मनात एक आकस ठेवून होतो. ही लोकं फार agressive असतात, त्यांच्यावर फार विश्वास ठेवू नये, ते लोकांना फसवतात वगैरे. जेव्हा दिल्लीला आपला रिप्रेझेंटेटिव्ह ठेवायचा असं आमच्या मीटिंग मध्ये ठरलं तेव्हा गोर्यांना हा माझा कंसर्न बोलून ही दाखवला. जेफ ने मला विचारलं "Have you experienced it ever?" दिल्लीच्या रिक्षावाल्यांशिवाय मला असा अनुभव काही आला नाही. पण रिक्षा ड्रायव्हर हे कुठल्या शहरात धड सापडले आहेत? (सन्माननीय अपवाद वगळता). तसे काही सुपरफिशियल नॉलेज असणारे भेटले, पण ते ही सगळीकडेच भेटतात. पण वर सांगितलेले अवगुण असलेली मंडळी मला काही भेटली नव्हती. मी आपलं "I have never experienced. But many people talk of these qualities of Delhites" जेफ म्हणाला "Don't conclude on what other people talk. I am sure you will get right person".
अनिच्छेनेच मी पेपर ला ऍड दिली. दणदणीत रिस्पॉन्स मिळाला. ३० एक लोकं शॉर्टलिस्ट केली. लोकांशी बोललो आणि त्याला गाळणी लावून मग ५ जण निवडली. काल त्यांच्याशी बोललो. चार पाच दिवसात त्यांच्यातला एक फायनल करेल.
या प्रोसेस मध्ये माझ्या दिल्लीच्या लोकांबाबतच्या आकसाच्या धज्जीया उडाल्या. ही पाचही लोकं अत्यंत सॉफ्ट स्पोकन, जीवनाबाबत अत्यंत पॉझिटिव्ह attitude असणाऱ्या, आयुष्यात काय आणि का करायचं याबाबत clarity असणाऱ्या आढळल्या. किंबहुना या पाच जणांपैकी एक जण थोडा डावा निघाला. पण मी उरलेल्या चारांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकून कुठलीही एक उचलली तर ते कंपनीसाठी लाभदायक ठरेल अशा ताकदीची लोकं निघाली. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या चारपैकी दोघं फ्रेशर आहेत. आणि त्या दोघांपैकी एक अत्यंत स्ट्रॉंग कंटेडर आहे. पुण्यापासून इतक्या लांब फ्रेशर घेण्यात थोडी रिस्क असेल पण मी ती बहुतेक घेणार आहे.
यावेळेस मी प्रश्नांचा ढाचा ही बदलला होता. कनव्हेन्शनल एच आर प्रॅक्टिस च्या हिशोबाने ते प्रश्न योग्य होते की नाही हे मला माहित नाही. कारण हे एच आर चं झेंगट आता डोक्यावर घेतलं आहे. त्याचं काही फॉर्मल ट्रेनिंग ही घेतलं नाही. पण नॉलेज पेक्षा एखाद्या परिस्थितीला हाताळताना attitude कसा ठेवेल यावर जास्त भर दिला. खूप विचार करून प्रश्न लिहून काढले होते. इंटरव्ह्यू प्रोसेस मधील एकसुरी पणा टळला आणि त्यात नावीन्यता आली. आणि आता घेणाऱ्या माणसाला जोखून, तोलून मापून नेवता दिला आहे हा विश्वास मनात आला. काही कारणामुळे जर हे सिलेक्शन अपयशी ठरलं तर त्याचं उत्तरदायित्व घेण्याबाबत काहीही वाईट वाटणार नाही, कारण प्रोसेस मध्ये शत प्रतिशत स्वत:ला अप्लाय केल्याची जाणीव असेल.
तेव्हा दिल्लीच्या ग्राहकांनो, आम्ही येतोय तुमच्या शहरात, वर्ल्ड क्लास स्पिंडल रिपेयर सर्व्हिस घेऊन. आणि बाय द वे, आमच्या स्पर्धक कंपन्यानो, तुम्हीही हे लक्षात असू द्या.
(पोस्ट मराठीत लिहिली आहे आणि ती ही फेसबुक साठी. कोण दिल्लीकर हिंदी भाषिक वाचणार नाही म्हणून फुल लाल करून घेतली आहे. एकदम स्टाईल मध्ये. अर्थात माझ्या चाणाक्ष मित्रांना वेगळं सांगायची गरज नाही आहे. 😊😊)
Tuesday, 12 April 2016
Social Media
साधारण ६ एक महिन्यांपूर्वीची गोष्ट असेल. मी काही कामानिमित्त बडोद्याला गेलो होतो. तिथून मला राजकोट ला जायचं होतं. कामं आटोपून मी संध्याकाळी मुकुंद च्या घरी गेलो. गप्पांचा फड जमवला. माझी ट्रेन रात्री १२:०५ ला होती. दहा वाजता जेवण वगैरे झाल्यावर मुकुंदाने मला स्टेशन ला सोडलं.
स्टेशन ला मी चौकशी केली. माझी ट्रेन राईट टाईम होती, प्लॅटफॉर्म नं ६ वर येणार होती. वेळ असल्यामुळे मी वेटिंग रूम मध्ये जाऊन बसलो. मला आता आठवत नाही, बहुधा ब्लॉग लिहित होतो वा फेसबुक चाळत होतो.
साधारण ११:४५ ला परत प्लॅटफॉर्म तोच आहे याची खातरजमा केली. त्यांनी हे ही सांगितलं की ट्रेन १२ वाजता येईल. मी प्लॅटफॉर्म नं ६ वर जाऊन बसलो.
बरोबर रात्री१२ वाजता ट्रेन आली. मी माझ्या बर्थ पर्यंत पोहोचलो. पाहतो तर तिथे एक स्त्री अगोदर पासून झोपली होती. हिचा कुठला दुसरा बर्थ असेल आणि ती आता काही तरी पाचकळ कारण सांगून बर्थ एक्स्चेंज करायला सांगेल हे मी ताडलं. मी, ओ मॅडम म्हणत त्यांना झोपेतून उठवायचा प्रयत्न केला. दोन चार हाका मारल्यावरही त्यांची झोपमोड नाही झाली. मग अनिच्छेने का होईना, ओ बहेनजी, असा पुकारा केला. कूस बदलून त्यांनी जागं होत माझ्याकडे पाहिलं अन त्यांना बहेनजी संबोधून आपण घोडचूक केली याची जाणीव झाली. पण बाण सुटला होता. त्यांनी मला चेहऱ्यावरच्या बटा सावरत विचारलं "क्या है" मला दोन क्षण त्यांनी फक्त बटा चेहऱ्यावरून बाजूला करत राहव्या असं वाटत राहिलं. पण बहेनजी म्हंटल्याची चूक स्मरत मी म्हणालो "ये मेरा बर्थ है" तर त्या म्हणाल्या "आप फिरसे चेक करो, ये मेराही बर्थ है"
आमचा हा प्रेमळ संवाद चालू असताना, म्हणजे आता भावा बहिणीतला, ट्रेन ने बडोदा स्टेशन सोडलं होतं. एवढया रात्री आता ताईंना त्रास देण्यात काही अर्थ नव्हता. मी आपला टी सी ची वाट पाहत थांबलो.
टी सी आला. मी टेचात स्मार्टफोन वरचा मेसेज दाखवला. तो पण चक्रावला. १२:०५ची ट्रेन असली तरी जो नेहमी तारखेचा होतो तो घोळ पण नव्हता. त्याने परत मेसेज वाचला अन म्हणाला "क्या गुरू, आप गलत ट्रेन में चढे हो. तुम्हारी ट्रेन इसके पीछे आ रही है" मी पाहिलं, माझ्या ट्रेन चा नं १९८१२ होता तर ज्यात बसलो तिचा नं १९८२० होता.
मी खजील झालो. गेल्या २० वर्षात मी अक्षरश: हजारो ट्रेन प्रवास केले. आणि ट्रेन मध्ये चढायची आणि उतरायची वेळ २४ तासातील कुठलीही असायची, पण इतकी घोडचूक पहिल्यांदा झाली.
एव्हाना रात्रीचे १२:३० होऊन गेले. मला टी सी ने सांगितलं "आता आणंद ला उतर, तिथे तुझी मागून येणारी ट्रेन थांबते. एक स्टेशन जाईपर्यंत तुमचा बर्थ आम्ही दुसऱ्या कुणाला देऊ शकत नाही. त्यामुळे तुला बर्थ मिळेल".
त्याने सांगितल्या प्रमाणे केलं आणि माझा पुढचा प्रवास व्यवस्थित पार पडून मी राजकोटला पोहोचलो.
यात काय घडू शकलं असतं?
- मी ज्या ट्रेन मध्ये बसलो होतो किंवा जी माझी निर्धारित ट्रेन होती ती सुपर फास्ट असती आणि आणंद ला न थांबणारी असती तर?
- बडोदा जंक्शन वरून दोन ट्रेन चे मार्ग भिन्न असते तर?
- बाकी ती स्त्री प्रवासी आणि माझ्यातला संवाद कुठं पर्यंत पोहोचला असता, या कल्पनेला इथंच फुल स्टॉप देऊ.
तर मला हा प्रसंग का आठवला? एक पोस्ट बनवायची म्हणून?
तर दोन तीन महिन्यापूर्वी Linkedin वर WA आणि फेसबुक च्या आहारी जाऊन तुमच्या काय चुका होऊ शकतात यावर एक आर्टिकल वाचलं. यात ट्रेन, बस किंवा फ्लाईट चुकू शकतं हे लिहिलं होतं.
आता मी बडोदा स्टेशनच्या वेटिंग रूम मध्ये ब्लॉग लिहित होतो किंवा फेसबुक खेळत असेल. हे जर करत नसलो असतो तर मी ट्रेन मध्ये चढायच्या अगोदर ट्रेन चा योग्य नं आहे का हे मी चेक केलं असतं का? ब्लॉग वर आर्टिकल लिहित होतो तर त्याच्या विचारात गुंतलो होतो का आणि त्यामुळे चुकीच्या गाडीत चढलो का?
नेमकं आठवत नाही, पण या प्रश्नाची उत्तरं "हो" असण्याची दाट शक्यता आहे.
त्या लेखाचा शेवट ज्या वाक्याने केला तेच इथे परत लिहितो.
Remember, you are not made for social media. It should not control your deeds, actions. You might feel that social media's strings are at your fingertips and you make it dance while using it on smartphone. In fact it is exactly other way round.
Thursday, 7 April 2016
"Disruptive Innovation"
Disruptive innovation leads to creating new market. And if you are not ready to accept it, it is very likely that you are swept away with all together new technology or loose leadership position. A journey from Mainframe computer to smartphone is perfect example of disruptive innovation. And as we all know there have been many companies who closed down as they could not anticipate changes happening around. Even company like Nokia had a big set back in the process and Blackberry has become part of history.
The beautiful part of disruptive innovation is that it allows outcome of it for the masses. The products which are otherwise only few can afford, are made available to middle class or lower middle class people of society. It boosts nation's economy.
I think No frill airline is one such disruptive innovation. You can see what happened to Kingfisher who could not take this form to grow their business. Had Etihad not been come to rescue, even Jet would have nose dived. Middle class people started dreaming of car in 1983 with disruptive innovation that Maruti brought and off late it is further extended by Tata Nano. Fiat and Ambassador who pretended to sleep are now nothing but monuments in Museum.
I was co relating this to recent talk of Tesla who has innovated electric car called T3. American society is well aware of Global warming and future fuel crisis. Tesla management has picked up same thread and launching this electric car. I am sure they must have worked very hard on charging time and charging stations and all other aspects of automobile engineering. Americans loved the tagline Sustainable growth and literally jumped to book by staying whole night in tents. It is said that close to 300000 vehicles are already booked in two days. The whole saga is compared only to Ford when they introduced its famous model T in 1910, another example of disruptive innovation. An electric car, a technology which was not in radius of common man thinking is brought to their door step by Tesla through these magical word Disruptive Innovation. While Tesla is working hard to launch, only GM of big three have worked in parallel and launched Bolt. It would be interesting to see their competition.
In fact electric car is not new concept for India. Maini Motors, which is now taken over by Mahindra has launched Reva fifteen years back. For some unknown reasons, it was never success to boast about. It is very likely that Tesla would come to India and we will for sure awestruck by its success only to say that "Oh! nothing great about it. We had this technology 20 years back". We are otherwise very good in patting own back with achievements which are part of history.
Disruptive innovation
तर असं इनोव्हेशन की ज्यामुळे प्रचलित उत्पादने आणि ते बनवणाऱ्या कंपन्या ह्या इंडस्ट्री च्या क्षितिजावर एक तर मागे पडतात किंवा नाहीशा होतात. मेनफ्रेम कॉम्पुटर ते स्मार्ट फोन हे disruptive innovation चं उत्तम उदाहरण सांगितलं जातं. ह्या प्रवासात कित्येक कंपन्याच्या पाट्या गुल झाल्या. अगदी नोकिया सारखी कंपनी, तिलासुद्धा स्मार्ट फोन चं वादळ समजलं नाही आणि ती पालापचोळ्यासारखी उडाली. जो फोन हातात आहे हे कॉर्पोरेट स्टॅंडर्ड मध्ये प्रतिष्ठेचं लक्षण असायचं तो ब्लॅकबेरी काळाच्या ओघात लुप्त झाला.
गमतीची गोष्ट ही की जेव्हा जेव्हा disruptive innovation मुळे मार्केट मध्ये नवनवीन गोष्टी आल्या तेव्हा त्या सामान्य माणसाच्या आवाक्यात आल्या. ज्या गोष्टी एकेकाळी ही फक्त श्रीमंत लोकांची मक्तेदारी होती, disruptive innovation मुळे त्या गोष्टी समाजाच्या मोठ्या वर्गाच्या वापरात आल्या.
नो फ्रिल एयर लाईन ह्या अशाच disruptive innovation चा प्रकार आहे. यासमोर किंगफिशर ची काय हालत झाली ते आपण पाहतोच आहे. एतिहाद ने हात दिला म्हणून जेट गर्तेतून बाहेर आली, नाहीतर तिचं काही खरं नव्हतं. १९८३ साली मारुती मुळे त्यावेळच्या मध्यमवर्गीयाना चार चाकीची स्वप्न दाखवली तर नुकतंच टाटा नॅनो ने हे स्वप्न अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचवलं. मारुतीने फियाट आणि अँबेसेडर ला म्यूजियम आयटम बनवलं हे आपण जाणतोच.
हे आठवलं या साठी की टेस्ला नावाच्या कार कंपनीने सध्या अमेरिकेत धूम मचवली आहे. ग्लोबल वॉर्मिंग आणि भविष्यात येणारे फ्युएल क्रायसिस याची जाणीव अमेरिकन समाजमनाला झालीच आहे. तोच धागा पकडून टेस्ला ने T3 नावाचं मॉडेल लॉन्च केलं आहे. ही इलेक्ट्रिक कार आहे. ती बनवताना चार्जिंग टाईम, चार्जिंग स्टेशन यावर टेस्ला ने खूप इन डेप्थ काम केलं आहे. Sustainable growth ह्या टॅग लाईन वर अमेरिकन अक्षरश: तुटून पडले आहेत. आपल्या बजाज एम 80 चं बुकिंग होताना जसं लोकांनी लाईन रात्र भर जागून लावली तसंच मॉडेल 3 बुक करताना लोकांनी टेंट मध्ये झोपून गाडी बुक केली. दोन दिवसात तब्बल पावणे तीन लाख बुकिंग झालं आहे. याची तुलना १९१० च्या फोर्ड च्या T मॉडेल शी होऊ शकते. हे सगळं होताना तिथले बिग थ्री मागे पडलेले दिसतात. त्यातल्या त्यात जी एम ने बोल्ट नावाचं मॉडेल आणलं आहे आणि या दोघांच्या चढाओढीत कुणाची सरशी होणार हे २०१८ पर्यंत कळेलच.
सामान्य माणसाच्या आतापर्यंत आवाक्यात नसलेली इलेक्ट्रिक कारची टेक्नॉलॉजी टेस्ला ने disruptive innovation द्वारे अमेरिकन्स पर्यंत पोहोचवली आहे. यथावकाश आपल्याकडे येईल.
खरं तर इलेक्ट्रिक कार ही आपल्याकडे रेवा नावाखाली मैनी नावाच्या कंपनीने १५ एक वर्षांपूर्वी आणली होती. काही वर्षांपूर्वी महिंद्रा ने तिच्यावर कब्जा केला. पण ही कार भारतात लोकप्रिय करण्यात त्याचे उत्पादक सपशेल अपयशी ठरले. कारणं माहित नाही पण ते झालं खरं. आता २०१९-२० ला टेस्ला आपल्याकडे इलेक्ट्रिक कार घेऊन येतील आणि तिचं यश बघून "अरे ही टेक्नॉलॉजी आमच्या कडे २० वर्षांपूर्वी आली होती." असं म्हणत आपलीच पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानत राहू.
जाता जाता: ह्या टेस्ला ला भारतात उत्पादन चालू करण्याचा नेवता घेऊन खुद्द मोदी सर गेले होते. कारण माहित नाही, पण तिथल्या मॅनेजमेंट ने भारतापेक्षा चीन ला पसंती दिली.