एके दिवशी त्याने मला त्याने काढलेल्या एका चित्रबद्दल सांगितले. "म्हणजे साधारण त्या चित्राची थीम अशी आहे राजेश, की एक तरुणी ओल्या वस्त्रनिशी नदीतून बाहेर येत आली आहे. तिच्या सुंदर चेहऱ्यावरून पाण्याचे ओघळ वाहत आहेत. तिने तिचे केस पाठीवर मोकळे सोडले आहेत. आणि मान वळवून तिचे मोहक स्मितहास्य विलसत आहे. आणि मी त्या चित्राला नाव ओलेती दिलं आहे"
पुढे जाऊन त्याने हे ही सांगितलं की '"सातारा जिल्ह्यातल्या औंध च्या राजवाड्यात हेच चित्र आहे आणि मी ते कॅनव्हास वर उतरवण्याचा प्रयत्न केला आहे".
त्याने जे वर्णन केलं ते माझ्या मनावर पक्कं ठसलं गेलं. वय पण तेच होतं म्हणा.
दोन तीन दिवसांनी मी गुलमंडीवर फिरत असताना सुपारी हनुमान जवळ एक फ्रेम बनवणाऱ्या दुकानासमोर थबकलो. विवेक ने सांगितलेल्या सारखं हुबेहूब चित्र समोर दिसत होतं. तीच ती मोहक ललना, नखशिखांत भिजलेली, पाठमोरी पण हलकेच मान वळवून भाव विभोर करणारं स्मित देणारी. मी स्तिमित होऊन पाहत राहिलो. दोन मिनिटाने दुकानदार म्हणाला "पावनं, कुठं हरवलात?" मी त्याला त्या कॅनव्हास च्या खाली असलेलं दुसरं चित्र हलवायला सांगितलं. आणि माझ्या चेहऱ्यावर हास्य फुललं.
खाली विसू अशी सही होती. विवेक पत्की ची.
हे लिहिण्याचं निमित्त झालं बालाजी सुतार यांचं लिखाण. बासुदांची ओळख मी करून द्यावी इतकं काही माझं कर्तृत्व नाही. पण एक जाणवतं मात्र की त्यांचं लिखाण हे वेगळ्या धाटणीचं आहे. अगदी ठसतं ते मनावर. मला खात्री आहे, यापुढे मला कधीही बासुदाचं लिखाण ओळखायला कष्ट पडणार नाही. त्यांच्या लिखाणात त्यांची झोकदार सही एकदम उठून दिसते. अर्थात ते प्रथितयश लेखक अन कवी म्हणून प्रसिद्ध आहेतच. किंबहुना आपल्या व्यापातून वेळ काढून ते कधी त्यांचे शब्द अग्निहोत्र म्हणून उतरवतात तर कधी शीतल चांदणे बनून. कधी दाहक वास्तव म्हणून तर कधी कल्पनेच्या भराऱ्या घेत.
खरं सांगायचं तर बासुदा सारखंच आपल्या एका वेगळ्या शैलीची छाप सोडणारे बरेच जण आहेत. त्यांची सगळ्यांची नावं लिहीत नाही. कारण त्यातून मन दुखवण्याची शक्यता असते. ग्रामीण बाज जपणारे उच्च श्रेणीचं लिहिणारे आहेत, ज्या पार्ल्यात पु ल चं वास्तव्य झालं ती शैली हुबेहूब पकडणारे आहेत, चित्रपट आणि त्याच्या गाण्याचं विवेचन करणारे आहेत, पुरोगामी असूनही विषय छान मांडणारे आहेत, गूढकथा, भयकथा लिहिणारे आहेत, एखादया कुंभाराप्रमाणे कुठल्याही विषयाला आकार देणारे आहेत, विनोदाचा बाज पकडणारे आहेत, तात्विक लिहिणारे आहेत, अध्यात्मिकही लिहिणारे आहेत. चित्रकार आहेत, छायाचित्रकार आहेत.
बस, या फेसबुकच्या उंचच उंच वॉल ओलांडून तुम्हा सगळ्यांचं लिखाण फलो फुलो हीच सदिच्छा.