Sunday, 18 September 2016

बिझिनेस प्रपोजल

मुकुल शर्मा दिल्लीतील आमच्या क्षेत्रातला एक नावाजलेला बिझीनेसमन. कटिंग टूल ची एजन्सी आहे त्याच्याकडे. दणकेबाज श्रीमंत आहे, मुकुल. एन आर आय स्टेटस आहे. बायको मुलं दुबईत राहतात. हा पंटर येऊन जाऊ असतो. उंची इंपोर्टेड गाड्यांचा त्याला भारी शौक. फोर्ड, निसान च्या एस यु व्ही उडवतो तो दिल्लीत. आणि "I fly business only" ह्याचा त्याला खूप अभिमान पण आहे.

का कोण जाणे, आमच्या स्पिन्डल बिझिनेस मध्ये त्याला खूप इंटरेस्ट. जेव्हा आम्ही तिसरी स्पिन्डल रूम पुढच्या वर्षी दिल्लीला काढणार हे त्याच्या कानावर पडलं आणि तो मला अप्रोच झाला की आपण मिळुन स्पिन्डल रूम काढू. म्हणाला "क्या यार आप एक दो रन निकालते हो. मेरे साथ काम करो, चौके छक्के लगाएंगे". त्याने त्याचं बिझिनेस प्रपोजल मांडलं. ज्या पद्धतीने तो सांगत होता, ते खूप इम्प्रेसिव्ह होतं. तो म्हणाला "आपण पुढच्या दोन महिन्यात स्पिन्डल रूम चालू करू" त्याच्या धडाडीचं मला कौतुक वाटलं. सेटको अमेरिका आता कुणी नवीन शेअर होल्डर घेण्यासाठी राजी नव्हतं. पण मी जेफ ला त्याच्याबद्दल सांगितलं. जेफ पुण्यात आला होता तेव्हा मुकुल स्पेशली त्याला भेटण्यासाठी दिल्लीहून आला. त्याचं बोलणं पाहून जेफ ला माझ्या बोलण्यातील तथ्य कळलं.

जेफच्या पुढच्या व्हिजिट ला दिल्लीला मुकुलच्या ऑफिस मध्ये भेट द्यायचं ठरवलं आणि एकत्र काम करण्यावर डिस्कशन करायचं ठरलं. ठरल्याप्रमाणे मी आणि जेफ मुकुल शर्मा च्या ऑफिस मध्ये गेलो. श्रीमंती अशी ओसंडून वाहत होती. त्या ऑफिस मध्ये असलेल्या प्रत्येक गोष्ट कुठल्या देशातून आणली हे मुकुल सांगत होता. ते सगळं कीर्तन ऐकल्यावर आम्ही बिझिनेस बद्दल बोललो. मुकुलचा प्लॅन जबरदस्त होता. त्याचा त्याच्या सेल्स आणि मार्केटिंग स्किल्स बद्दल भलताच आत्मविश्वास होता. जेफ आणि मी सॉलिड इम्प्रेस झालो होतो.

दुपारी दीड वाजता आम्ही मुकुलच्या आलिशान एस यु व्ही मधून जेवायला निघालो. एका गल्लीतून आम्ही मोठ्या रस्त्याला आलो. अन आम्हाला उजवीकडे वळायचं होतं. पण रस्त्यावर सिमेंटचे टेम्पेररी ब्लॉक टाकून मध्ये जाड दोर टाकून रस्ता उजवीकडे वळण्यासाठी बंद होता. साहजिकच डावीकडे वळून यु टर्न मारून आम्ही आम्हाला जिकडे जायचं तिकडे येणार होतो.

मुकुल ने गाडी पुढे घेतली आणि सरळ तो जाड दोर तोडून गाडी उजवीकडे काढली. हे करताना एक वेगळाच बेदरकार पणा मुकुलच्या चेहऱ्यावर होता आणि तो दोर तोडल्यावर एक अभिमान.

दुपारी एका पंचतारांकित हॉटेल मध्ये जेवलो. परत काही फाईन डिटेल्स वर काम केलं आणि पुण्याला येण्यासाठी दिल्ली एअरपोर्ट वर आलो. आल्यावर मी आणि जेफ कॉफी पिताना जेफ म्हणाला "So what do you think Rajesh of Mukuls proposal.? Impressive, isn't it?"

मी जेफ ला म्हणालो "Yes, it is. Though we can't go with MuKul for business"

जेफ ने आश्चर्याने विचारलं "Why so"

मी म्हणालो "I found MuKul quite aggressive while breaking traffic rule. I think this attitude is not good for long term business. We better scrap this proposal"

जेफ म्हणाला '"Rajesh, I echo what you say. With you on this" हे म्हणताना त्याने माझ्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.  

थोडक्यात काय तर आडनाव सांगताना चूक केली म्हणून जीएम पोजिशन ला एकाचा ऍप्लिकेशन उडवला तसं  साधा ट्रॅफिक रुल मोडला म्हणून अख्ख बिझिनेस प्रपोजल स्क्रॅप करण्याचं पाप माझ्या अंगावर घेतलं. 

ओंजळ

काही जणांच्या पोस्ट अशा असतात की जणू समुद्र. त्यात विशालता तर असतेच पण खोली ही असते, अर्थाला. अनुभवाचे शिंपले किनाऱ्यावर चमकत असतात.

काही जणांच्या पोस्ट अशा असतात, की जणू शांत तळं. त्या वाचल्यावर काहीच बोलावसं वाटत नाही. तळ्याच्या काठावर बसून नीरव शांतता अनुभवावी तसं ह्या पोस्ट वाचून आपण स्तब्ध होतो. दगड टाकून चुबुक असा आवाज करून तिथली शांतता भंग करावी वाटत नाही.

काही जणांच्या पोस्ट अशा असतात, की जणू एखादी नदी. चांगल्या वाईट गोष्टी कशा सामावून घेते नदी, तसंच बरे वाईट अनुभव घेत जीवनाचा प्रवाह ठरवणारी.

काही पोस्ट मात्र पूर आलेल्या नदीसारख्या बेफाम विध्वंसक असतात. त्यात चीड असते, अन्याय झाल्याची भावना असते.

काही पोस्ट या शेतातून जाणाऱ्या पाण्यासारख्या असतात. त्यात संगीत असतं, नाद असतो.

काही जणांच्या पोस्ट अशा असतात, जणू डोंगरातून धावत येणाऱ्या पाण्याचा झरा. त्यात आवेग असतो, त्याचे तुषार जेव्हा अंगावर पडतात, मन प्रसन्न होतं. आपण सुखावतो, चेहऱ्यावर आपसूक हास्य उमलतं.

काही जणांच्या पोस्ट मात्र डबक्यासारख्या असतात. साठलेलं पाणी कुजलं असतं. विचारांची घाण साफ केली नसते, आणि मग उग्र दर्प  त्या डबक्यातून येत राहतो.

चॉईस भरपूर आहे. ओंजळ कोणत्या पाण्याने भरायची हे आपण ठरवायचं. 

रेखांश

परतीच्या प्रवासात मी डेट्रॉईट वरून शिकागो ला येत होतो. विमानाची सिटिंग अरेंजमेंट २+३ अशी होती. मी माझ्या सीट वर पोहोचलो तर शेजारच्या सीट वर एक अप्रतिम सौन्दर्य बसलेलं. साधारण ४५-५० ची असावी. इटालियन असावी बहुधा.

मी बसताना गुड मॉर्निंग असं म्हंटलं, ती पण पुटपुटली, खिडकीतून बाहेर बघत राहिली.

 थोडा वेळ गेला. ती सौन्दर्यवती निद्राधीन झाली. अन मी पण स्वर्गवासी झालो.

शिकागो जवळ आलं तसं ती जागी झाली अन मी ही जागा झालो.

विमान लँड झालं अन रनवे काही अंतर गेलं अन अचानक त्या अप्सरेने माझा आर्म रेस्ट वर चा हात धरला आणि ओरडली "Oh my God". तिच्या चेहऱ्यावरचे भीतीदायक भाव बघून मला वाटलं हिला काय खिडकीतून विंग ला आग वगैरे लागलेली दिसली की काय. पण तसं काही नव्हतं.

माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून ती ललना माझ्या खांद्याला धरून परत चित्कारली "Oh my God. I am going to miss my connecting flight"

माझं लक्ष गेलं तिच्या फोन कडे. त्यावर 10:05 अशी वेळ दिसत होती. तिने तिचा बोर्डिंग पास दाखवला त्यावर तिच्या नेक्स्ट फ्लाईट ची वेळ होती 10:30.

मी तिला बोललो "Your phone is on Flight mode. Turn it off" तिने तसं केल्याबरोबर फोनमध्ये 9:05 अशी वेळ दिसू लागली.

शिकागो हे डेट्रॉईट पेक्षा एक तास पुढे आहे. फोन वर टाइम झोन तेव्हाच चेंज होतो जेव्हा तुम्ही नेटवर्क मध्ये असता. सगळा घोळ तिच्या लक्षात आल्यावर खदखदून हसू लागली. चार वेळा थँक्स म्हंटलं तिने मला. ते म्हणताना तिचे दोन्ही हात तिच्याच गालावर होते.

कुणाच्या नशिबात कशामुळे काय होईल हे सांगता येत नाही. पृथ्वीवरच्या रेखांशामुळे असे क्षण आयुष्यात आले हे नवलच नव्हे काय?

तळटीप:

- जर टाइम झोन चेंज चा घोळ माझ्याही लक्षात आला नसता तर तिने पुढे काय केलं असतं हे आठवून आता मला दुःख होतं. नाही तिथे चांगुलपणा दाखवायची सवय आता सोडायला हवी.

- प्रसंग जसाच्या तसा घडला आहे. फक्त ललनेचं वय आणि सौन्दर्याचं परिमाण यात फेरफार होऊ शकतात. मी माझ्या परीने केले आहेत, तुम्ही तुमच्या परीने करू शकता. 

नंदू

नंदकुमार चव्हाण, नंदू म्हणायचो आम्ही त्याला. एस के एफ ला होता माझ्या बरोबर. ग्राइंडिंग स्टोअर्स मध्ये असायचा. त्याची आणि माझी शिफ्ट सहसा एक असायची. वयाने ७-८ वर्षाने मोठा होता तो माझ्यापेक्षा. काही लोकांशी आपली  मैत्री होताना वयाचं महत्व एका आकड्यापुरतं मर्यादित असतं. नंदूची आणि माझी चटकन मैत्री झाली.  त्याची मेमरी खतरनाक होती. त्या वेळेला काही कॉम्पुटर वगैरे नव्हते. पण स्टोअर्स मधल्या हजारो गोष्टी कुठल्या रॅक मध्ये ठेवल्या आहेत हे त्याला बरोबर लक्षात असायचं. "६२०८ ची ड्रायव्हिंग प्लेट दे रे नंदू" असा आवाज दिला की नंदू ती बरोबर हुडकून द्यायचा.

एस के एफ ला मी अगदीच कोवळा इंजिनिअर होतो. करिअर च्या सुरुवातीला आधार देणारं कुणी असेल तर ते आकार चांगलं घेतं. अशी आधार देणारी अनेक मंडळी होती (आजार देणारी पण होती), नंदू त्या पैकी एक होता. अनुभवी असल्यामुळे त्याला कंपनीची बरीच माहिती होती. लोकं कशी आहेत, कुणाशी कसं वागायचं याचं ज्ञान तो कायम द्यायचा. सेकंड किंवा थर्ड शिफ्ट मध्ये गप्पा मारण्यासाठी आम्हाला सुर्याखालील कुठलाही विषय वर्ज्य नसायचा. वैभवी बरोबर माझं तेव्हा प्रेमप्रकरण चालू होतं. सेकंड शिफ्ट ला तिचा फोन ग्राइंडिंग स्टोअर्स मध्ये यायचा. नंदू आवाज द्यायचा "डॉक्टर मॅडम चा फोन आला रे".

पुढे १९९४ साली मी एस के एफ  घेऊन सोडली आणि नंदूने व्ही आर एस घेऊन १९९८ साली. नंदू ने एस के एफ का सोडली हे एक मला न उलगडलेलं कोडं आहे. म्हणजे त्याचं तेव्हा वयही जास्त नव्हतं आणि कंपनीतले लोकं ही त्याच्या कामावर खुश असावेत.

काही वर्षांनी तो माझ्याकडे जॉब साठी अप्रोच झाला, पण तेव्हा माझ्याकडे जागा नव्हती. मग त्याने बहुधा मिळेल ती नोकरी केली.

२००६ की ७ ला माझ्याकडे नंदू फिट होईल अशी जागा तयार झाली. मी त्याला निरोप पाठवला. आणि नंदू आमच्याकडे जॉईन झाला. कामात तो पद्धतशीर होता. समरासतेने काम करायचा. कंपनीची पार्टी वगैरे असेल तर त्याच्या उत्साहाला उधाण यायचं. सगळं चांगलं चालू होतं, तर नंदूला हृदय विकाराचं निदान झालं. त्याची कुठली वाहिनी ब्लॉक झाली होती.

इ एस आय च्या थ्रू त्याची अँजिओ प्लास्टी झाली आणि यथावकाश तो कंपनीत जॉईन झाला. पूर्वीचा जोश त्याच्यात नव्हता आणि आम्हीही त्याला जपूनच कामं सांगायचो.

नंदू ९:३० ते ९:४५ ला वाघेला बरोबर कंपनीत यायचा अन त्याच्या बरोबर निघायचा. त्याने मग एक हिरो होंडा विकत घेतली. कंपनीची वेळ ८:३० होती. ती पाळण्यासाठी त्याने बाईक घेतली असावी असा माझा अंदाज आहे. पण तरीही तब्येतीपायी त्याच्या खूप सुट्ट्या होऊ लागल्या. बाईक घेतली तरी वेळ पाळणं त्याला जमत नसे. जॉब करणं त्याला अवघड जात होतं पण कौटुंबिक परिस्थितीमुळे त्याला सोडता पण येत नव्हता.

एके दिवशी संध्याकाळी आम्ही हार्ट टू हार्ट बोलत बसलो होतो. मी त्याला म्हणालो "नंदू, तब्येत बरी नसून तू किती कष्ट करतोस. गुरुवार पेठेतून नांदेड फाट्याला यायचं, परत जायचं. दिवसभर काम करायचं. कशाला इतका जीवाला त्रास करून घेतोस. तुझी इच्छा असेल तर मी गावात तुझ्यासाठी जरा लाईट जॉब बघतो. विचार कर तू" निरोप घेऊन तो गेला.

दुसऱ्या दिवशी मला सकाळी फोन आला. "काल रात्री नंदू सिव्हिअर हार्ट ऍटॅक ने गेला"

तेव्हापासून मला टोचणी लागली आहे की आदल्या दिवशीच्या बोलण्याचा अर्थ मी इंडायरेक्टली जॉब सोडायला सांगतोय असा नंदूने घेतला की काय?

आज सहा वर्षे झाली या घटनेला. दोनदा प्रायश्चित पण घेतलं मी. पण आजही ती नंदू बरोबर ची संध्याकाळ आठवली की मी सैरभैर होतो. 

हो, असाच आहे मी

आमचा एक ग्रुप फॉर्म झाला होता. WA चा. तो ग्रुप बनवण्याची आयडिया एका माणसाची होती आणि मग बाकीचे माणसं तो जोडत गेला. ग्रुप ची संकल्पना त्याची, त्याने काही रुल्स बनवले. तो ग्रुप त्याच्या मनाप्रमाणे चालवायचा. त्याने काही मेंबर्स नाराज व्हायचे. आणि मग कंप्लेंट करायचे. आणि मला विचारायचे "तू कसं सहन करतो हे सगळं" मी त्यातल्या एकाला सांगितलं "हे बघ असं आहे, एकतर मी लीडर असतो नाही तर फॉलोअर. एकदा मी कुणाला फॉलो करायचं ठरवलं की मग मी फाटे फोडत नाही. त्याने जसं सांगितलं तसं करतो. मला जर आवडलं नाही तर मी तिथून सरळ बाहेर पडतो, पण त्या लीडर बद्दल माझी काही तक्रार नसते. आणि जेव्हा मी लीड करतो तेव्हा कुणी फालतू ची लुडबुड केलेली आवडत नाही. मी टीम मेंबर चं ऐकल्यासारखं करतो पण शेवटी माझ्या मनाप्रमाणे करतो".

ब्रॉडर स्केल वर बोलायचं झालं तर गव्हर्नमेंट च्या बाबतीत मी असाच व्ह्यू अंगीकारतो. सध्याचं शासन हे मला न झेपणारं आहे. पण मी दर दिवशी त्यांच्यावर आगपाखड करत नाही. कारण ते वांझोटं असतं असं माझं मत आहे. त्याला विरोध करायला मतपेटी हा एकमेव मार्ग आहे असं मला वाटतं. आरक्षणाबद्दल मला काहीही मत नाही आहे. शासक जो ठरवेल त्याला फॉलो करतो. ज्या गोष्टी बदलण्याची माझ्यात ताकद आहे त्यावर मी विचार करतो. ते फेमस वाक्य आहे "हे विधात्या, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलण्याची मला ताकद दे, ज्या बदलू शकत नाही ते ऍक्सेप्ट करण्याची शक्ती दे, आणि या दोघातला बदल समजण्याची अक्कल दे" यावर माझा दृढ विश्वास आहे.

त्यामुळे मी दुसर्याने कसं वागायला पाहिजे ही अक्कल सहसा शिकवायला जात नाही. माझ्यात काय बदल घडवायचा ते पाहतो. कुठलेही सण साजरे करण्याची पद्धत आमूलाग्र पणे बदलण्याची गरज आहे. आणि हे ओळखून माझ्या पद्धतीत बदल केले आहेत. दुसर्याने ते करायलाच पाहिजे याबद्दल मी आग्रही नाही.

धर्म ही एक जीवन प्रणाली आहे असं मला वाटतं. गाईडलाईन्स, रुल नव्हे. त्याला तितकंच महत्व दिलं तर तो तुम्हाला सहिष्णू बनवतो. मानव्याला ते पूरक आहे असं मला वाटतं. धर्म  प्रणाली न राहता नियम म्हणून आला की ते आपल्यातल्या मानव्याला मारक होतं. त्या नियमांचा अतिरेक झाला की आपण दुसरी माणसं  मारायला लागतो.

माणसाच्या कर्मानुसार जाती व्यवस्था तयार झाली. कालानुरूप तिला काहीही महत्व नाही यावर माझा दृढ विश्वास बसतो आहे. त्यामुळे जातीबद्दल कुठलीही भावना माझ्या मनात नाही. अभिमानाची नाही आणि न्यूनत्वाची नाही. दुसऱ्याच्या नाही अन माझ्याही. तशी भावना ही माझ्यातल्या मानव्याला मारक आहे. तुरळक अपवाद वगळता मला जातीवरून कुणीही हिणवलं नाही आहे आणि ओवाळले पण नाही. माझ्याकडूनही अशी आगळीक झालेली आठवत नाही.

धर्माचं आचरण कसं करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तो प्रश्न माझ्यापुरता मी सोडवला आहे. तो कसा सोडवला याचा डिंडोरा पिटण्याची मला गरज वाटत नाही.

इथं बऱ्याच ठिकाणी "मला असं वाटतं" "माझं मत" असं लिहिण्यात आलं आहे. दुसर्यांची मत अशीच असायला हवी हा अट्टाहास नाही.

बरेच दिवस या विषयाला वॉल वर थारा न देण्याचा प्रयत्न केला, पण आपसूक ओढला गेलो. त्या विषयावरची पुढची लिहिपर्यंत शेवटची पोस्ट.

जात आणि आडनाव

मागच्या आठवड्यात कंपनीत जनरल मॅनेजर ह्या पोझिशन साठी मी आणि जेफ इंटरव्ह्यू घेत होतो. एक अशा आडनावाचा माणूस आला की ज्याचं नाव आपल्या महाराष्ट्रात एकाच जातीत येतं. त्याचं नाव सतीश होतं. तो सध्या रायपूर ला सर्व्हिस ला होता. आडनाव वाचून मी त्याला विचारलं "Do you belong to Maharashtra" तो म्हणाला "Yes" आणि पुढे म्हणाला "माझं आडनाव जरी अमुक असलं तरी मी तमुक (जातीचा) आहे" अर्थात हे सांगताना त्याचा काही अविर्भाव नव्हता.

इंटरव्ह्यू त्याचा एकदम झकास झाला. आम्हाला जनरल मॅनेजर मध्ये ज्या क्वालिटी हव्या होत्या त्या सगळ्यात सतीश एकदम फिट होता.

जेफ ला ज्यावेळेस म्हणत होता "So finally our search for GM ends here" त्याच वेळेला मी त्याच्या अप्लिकेशन वर रिजेक्टड लिहीत होतो. जेफ म्हणाला "He was a good candidate. Why are rejecting?"

मी त्याला सगळं सांगितलं. आणि या जनरल मॅनेजर पोस्ट साठी असा जातीचा उल्लेख करणं कसं चुकीचं आहे ते ही सांगितलं. सतीश ची विकेट पडली.

तर साने सर, आहे हे असं आहे. माझ्या सारखे टिनपाट कंपनी चालवणारे जात प्रकाराला घराच्या आणि कंपनी बाहेर लटकवून ठेवतात. तर बाकी कार्पोरेट चं काय सांगणार. हे नारायण मूर्ती, रतन टाटा, अझीम प्रेमजी तुम्हाला वाटतं, जात वगैरे बघत असतील?

हे जाती धर्मावरून एकमेकांना घोडे लावण्याचं काम फक्त फेसबुक आणि WA वर चालतं. तुम्ही जास्त त्रास करून नका घेऊ.

आपण आपलं काम करत राहायचं. ते चांगलं आहे तुमच्या माझ्या तब्येतीसाठी. 

इंग्रजी शब्द

इंग्रजीत काही काही शब्द असे आहेत की त्यांचा उच्चार सारखा असला तरी अर्थ काही तरी वेगळाच आहे. म्हणजे उदा:

Automation या शब्दाचा अर्थ आहे की एखाद्या प्रक्रियेला स्वयंचलित करणे. बरेच लोकं या शब्दा ऐवजी atomisation हा शब्द वापरतात. Atomisation म्हणजे एखादा द्रव पदार्थ हाय प्रेशर ने एखाद्या नोझल मधून पास केले असता जे छोटे पार्टीकल्स तयार होतात, त्याला atomization म्हणतात. एखादी मटेरियल हॅंडलिंग ची मॅन्युअल प्रोसेस काढण्यासाठी atomization असं म्हंटलं की गोंधळ उडतो.

एकदा मी उद्यान एक्स्प्रेस ने बंगलोर ला गेलो होतो. एका स्टेशन वर आंदोलन झाल्यामुळे माझी ट्रेन उशीरा पोहोचली. हे कारण सांगताना मी आमच्या MD ला म्हणालो "there was some allegation en route" MD संजीव म्हणाला "do you want to say agitation?"

एखाद्या कार्यक्रमाची सूत्र सांभाळणे त्याला facilitation म्हणतात आणि एखाद्याचा सत्कार करायचा त्याला felicitation.

Instead of म्हणजे त्याऐवजी आणि inspite of म्हणजे असं असलं तरी.

सगळ्यात हाईट म्हणजे परवा एक कस्टमर आमच्या डिझाइन इंजिनियर ला म्हणाला "we will stimulate this process" Stimulate म्हणजे उत्तेजित करणे, त्यांना simulate असं म्हणायचं होतं बहुधा. Simulate म्हणजे एखादी प्रोसेस कॉम्पुटर वा छोट्या स्केल वर जशीच्या तशी करून दाखवणे. अर्थाचा कसा अनर्थ होतो बघा.

सुटाबुटातला प्रोफाइल पिक्चर लावल्यावर, इतका शहाणपणा करण्याचा हक तो बनता है यार!

Tuesday, 13 September 2016

पार्टनर ७

मी पार्टनरला विचारलं "काय रे, आजकाल फार तारे तोडत असतोस. नेहमीच कसं पॉझिटिव्ह. जणू काही तुला प्रॉब्लेम्स च नाही. असं कसं?"

पार्टनर छद्मी पणे हसला.

चिडलोच मी "अरे, हसतोस काय बावळटासारखा. काय म्हणतोय मी"

पार्टनर शांतपणे बघत म्हणाला "हे बघ, तुलाही माहित आहे की प्रॉब्लेम्स मलाही आहेत पण पॉझिटिव्ह राहण्याशिवाय दुसरा ऑप्शन आहे का काही मित्रा"

"कसं आहे, असं राहिलं तर काही तरी मार्ग सुचतात. नाहीतर ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलं तर आपण फक्त शिव्या देत राहतो. डोकं शांत ठेवलं तर अल्टरनेटिव्ह रस्त्याचा ऑप्शन डोळ्यासमोर येतो. एखादी गोष्ट करायची नाही म्हंटलं की संपलं की सगळं. आणि काही करायचं म्हंटलं की ते करण्याचे एक एक मार्ग सुचत जातात."

"आणि तसं ही नकारात्मक विचार आले की, हं मग पुढे काय, असं विचार स्वतः ला. त्याचं शेवटचं उत्तर तुला, हं, झालं सांगून आता कामाला लाग, असंच येतं. आणि मग ती शक्ती आणावी लागते."

"हे आहे हे असं आहे दोस्ता. व्रत स्वीकारलं आहे ना! मग  चॉईस नाही दुसरा"

पार्टनर उवाच.

हरतालिका

पोटभर जेवून आणि एक वाटी श्रीखंड वगैरे चोपून मी काल रात्री वैभवी ला विचारलं "काय मग, झाली का हरतालिकेची पूजा? ते सात जन्माबद्दल काही मागितलं की नाही?"

दिवसभराचा उपवास करून पिचलेली आणि येत्या आठवड्यातल्या गौरी गणपती च्या पूजा आणि व्रत वैकल्य याच्या कल्पनेनंच धास्तावलेली ती प्रियतमा वदली

"हो, मी पूजलं हरतालिकेला आणि म्हंटलं 'हे वरदायिनी, जगन्माते, या सात जन्माच्या थिअरी बद्दल मला जास्त माहित नाही. पण त्यात थोडं जरी तथ्य असेल तर माझ्यावर प्रसन्न हो आणि म्हण की बाई, ह्या माणसाबरोबर हा तुझा सातवा जन्म आहे. यापुढे हा धोंडा काही तुझ्या पदरात बांधणार नाही"

आता काल रात्रीपासून,  हरतालिका "तथास्तु" म्हंटली की काय या काळजीने मला ग्रासलं आहे. 

गुण अवगुण

माझा एक भाऊ आहे सुहास नावाचा.  फॅब्रिकेशन चा बिझिनेस करतो. नासिक मध्ये. सुहास स्वतः बेदम श्रीमंत आहे. नासिक आणि औरंगाबाद मध्ये ८-९ फ्लॅट, साधारण पणे ३० एक एकर ची इगतपुरी आणि सिन्नर साईड ला लँड बँक. लँड बँक, हं, फार आवडता शब्द आहे त्याचा.

सुहास बिझिनेस करतो खरा पण त्याची मॅनेजमेंट स्टाईल एकदम अलग आहे. आरडाओरडा, शिवीगाळ हे त्याच्या ऑफिस मध्ये नेहमी चालू असतं. सप्लायर्स च्या पेमेंट ला डिले हे नेहमीचंच. बँकेचं अकौंट एन पी ए ही त्याच्यासाठी आम बात असते. लोकांकडून पैसे व्याजावर घ्यायचे आणि व्याज बुडवण हे म्हणजे अगदी नेहमीचं. मुद्दल परत देतो उपकार केल्यासारखी. लोकांचे पैसे परत द्यायला त्याच्याकडे पैसे नसतात. असं असताना मागच्या सप्टेंबर मध्ये सुहास बायको पोरांना घेऊन ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड ला जाऊन आला.

 बिझिनेस म्हणाल तर अडखळत चालू आहे. सुहास ने तुफान ओव्हरट्रेडिंग केलं आहे. साधे फॅब्रिकेशन करता करता अचानक मोठ्या व्हेसल्स बनवायच्या बिझिनेस मध्ये तो पडला. नाशिक जवळ दोन तीन एकराचा प्लॉट घेतला, तिथे मोठी फॅक्टरी बांधली.  बँकांची बेधुंद लोन्स उचलली. ती बुडवली. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट चा ससेमिरा लागला. नाना भानगडी.

इतकं होऊनही पठया ऑफिस मध्ये ताठ मानेने बसला असतो. त्याचे देणेकरी पैसे मागायला येतात तेव्हा त्याचा रुबाब असा असतो जणू हाच त्यांना काही मदत करणार आहे. "माझ्याकडे आहेत ना पैसे, म्हणजे रिझर्व्ह बँकेत पैसे आहेत असं समजा" देणेकरी रिकाम्या हाताने परत जातो तेव्हा सुहास सुहास्य वदनाने पुढच्या माणसाची ठासायला सज्ज झाला असतो.

शिवा आयथळ म्हणतो  Liars Prosper तसं सुहास चं आयुष्य आहे खरं तर.

वैभवी मला म्हणते "बघा तो सुहास, इतकं बेकार आयुष्य जगून ही स्वतः किती मजेत असतो. काय कारण असेल की नशीब याच्यावर इतकं न्योछावर असेल" मी तिला म्हणालो "नक्कीच सुहास मध्ये एक गुण असा असेल की तो त्याच्या सगळ्या दुर्गुणांवर मात करत असेल. तो गुण कुठला हे मला सापडत नाही आहे. पण जी परिस्थिती त्याने तयार केली आहे त्याच्या मध्यात राहून पंचवीस तीस कोटींचा टर्न ओव्हर करणे खायची गोष्ट नाही आहे"

सुहास  बद्दल माझी ही भावना आहे. तीन लाख कोटी टर्न ओव्हर करणाऱ्या आणि भारतात नव्हेच तर जगात अव्वल स्थान पटकावणाऱ्या रिलायन्स बद्दल शेरेबाजी करण्यासाठी माझी बोटं कि बोर्ड बडवायला धजावत नाही हा माझा कमकुवतपणा आहे.

पण एक नक्की की मरायच्या आधी सुहास चा किंवा अंबानी बंधूंचा तो गुण शोधायला आवडेल जो साऱ्या प्रचलित दुर्गुणांवर मात करतोय. 

पार्टनर ६

मी आणि राम थेऊर च्या गणपतीचं दर्शन घेऊन बाहेर आलो तर एक भिकारी पैसे मागण्यासाठी मागे येऊ लागला. मी राम ला बोललो "च्यायला, कसली लोकं आहेत ही. चांगला धडधाकट असूनही भीक मागतोय लेकाचा"

राम गालातल्या गालात हसला.

मी म्हंटलं "का रे, हसलास का?"

तर म्हणाला "तो देवळाच्या बाहेर भीक मागतो अन तू देवळात जाऊन"

गप गुमान कारचा स्टार्टर मारला अन निघालो.

राम, माझा पार्टनर. बेकार माणूस आहे साला. 

टोमणा

शाळेत आणि कॉलेजात असताना एक फिश पॉंड्स म्हणून एक कार्यक्रम असायचा. मुलं, मुली, शिक्षक, शिक्षिका यांच्या काही विशिष्ट लकबी, वैगुण्य आणि गुण सुद्धा याचा काही शब्दात वा वाक्यात उल्लेख व्हायचा. त्याचं सिलेक्शन करताना तज्ञ मंडळींची बरीच तारांबळ उडत असावी. कारण काही फिश पॉंड्स हे निंदनीय शब्दात असायचे. ते जर वाचले तर, ज्याच्यावर पडले त्यांच्यावर मानसिक परिणाम होण्याची शक्यता पण असायची. पण एकुणात माझ्या शाळेत आणि कॉलेज मध्ये वातावरण इतकं खेळीमेळीचं असायचं की हा कार्यक्रम हसी मजाक करत पार पडायचा. "चंद्र वाढतो कलेकलेने, xxx वाढतो किलोकिलोने" "दुरसे देखा तो लगी हसीना, पास जाके देखा तो आया पसीना" "ये दोस्ती हम नही छोडेंगे" "xxx च्या शेजारी xxx ची मूर्ती छोटी, जणू विजेच्या खांबाखाली पोस्टाची पेटी" असे काही फिश पॉंड्स लोकप्रिय होते. मग काही सरांना "हिमालयाची सावली" वगैरे म्हंटलं जायचं. माझ्यावर सुद्धा "भासमारं वांगं" किंवा "स्वतः ला समजतो शम्मी, आहे अक्कल निम्मी" वगैरे शेरे पडले होते. काही मुलींच्या टोळीला "ढालगजभवान्या" असा फिश पॉंड् पडला होता.  अगदी सांगायचं म्हणजे दुसर्यांना टोमणे मारायला लायसन्स मिळायचं. पण त्यातून टीका झेलायची मानसिकता तयार व्हायची. त्याकडे खिलाडू वृत्तीने पाहता यायचं.

तसं बघायला गेलं तर दुसऱ्याच्या मनावर ओरखडे न पडता असं काही लिहिणं ही पण एक कलाच आहे. म्हणजे हे टोमणे जसं स्वीकारणं सोपं गेलं तसं ते दुसरा अगदी कोलमडून जाऊ नये अशा पद्धतीने ते बनवणं पण बरेच जण शिकले.

याचं महत्व नंतर आयुष्यात बऱ्याचदा कळलं. जॉब मध्ये असताना घालून पाडून बोलणाऱ्या साहेबा बरोबर लोकं काम करायला कशी नाखूष असतात ते अनुभवलं. ज्याला passing by comments म्हणता येईल, त्याने मी कसा उन्मळून पडलो ते ही आठवतं. एक वेळ डायरेक्ट बोलणं  परवडलं पण ते फालतू आडून बोललेलं मन दुखावून जायचं.

फेसबुक वर पण हे तुफान जाणवतं. शिव्यांची रेलचेल असते अन त्याहून जास्त एकमेकांवर कुरघोडी करणारे टोमणे कधी पोस्ट च्या  तर कधी कॉमेंट च्या रुपात बाहेर पडतात. इन बॉक्स मध्ये येऊन शहाणपणा करणाऱ्यांना टोमणे मारणाऱ्या एक दोन पोस्ट्स मी पण लिहिल्या आहेत. पण त्या पलीकडे नाही. अर्थात माझ्या पोस्ट वर सुद्धा काही वेळा विरोधात प्रतिक्रिया असतात पण त्या अत्यंत संयत आणि यथोचित असतात. टोमणे आणि टोमणा हा शब्द अत्यंत सौम्य आणि मावळ वाटेल असल्या फालतु कॉमेंट्स टाकणारे मित्रवर्य मलाही लाभले पण खूपच मोजके.  त्यातल्या एकबद्दल तर मला किमान २० एक मेसेजेस आले होते की यांना तुम्ही सहन का करता किंवा यांच्या कॉमेंट तुम्ही डिलीट का करत नाही.  कॉमेंटस कशा नसाव्यात याचा वस्तुपाठ दाखवणाऱ्या त्या कॉमेंट्स मी ठेवतो. आणि यादीतून उडवत पण नाही. जेव्हा अगदीच अतिरेक झाला तेव्हा मात्र दोघा तिघांना उडवलं.

जॉब मध्ये किंवा फेबु वर दाखवलेल्या असल्या पुचाट सहनशक्तीचं मूळ त्या फिश पॉंड्स च्या कार्यक्रमात असावं असं मला सारखं वाटतं. 

समानार्थी

इंग्रजीत काही काही शब्द असे आहेत की त्यांचा उच्चार सारखा असला तरी अर्थ काही तरी वेगळाच आहे. म्हणजे उदा:

Automation या शब्दाचा अर्थ आहे की एखाद्या प्रक्रियेला स्वयंचलित करणे. बरेच लोकं या शब्दा ऐवजी atomisation हा शब्द वापरतात. Atomisation म्हणजे एखादा द्रव पदार्थ हाय प्रेशर ने एखाद्या नोझल मधून पास केले असता जे छोटे पार्टीकल्स तयार होतात, त्याला atomization म्हणतात. एखादी मटेरियल हॅंडलिंग ची मॅन्युअल प्रोसेस काढण्यासाठी atomization असं म्हंटलं की गोंधळ उडतो.

एकदा मी उद्यान एक्स्प्रेस ने बंगलोर ला गेलो होतो. एका स्टेशन वर आंदोलन झाल्यामुळे माझी ट्रेन उशीरा पोहोचली. हे कारण सांगताना मी आमच्या MD ला म्हणालो "there was some allegation en route" MD संजीव म्हणाला "do you want to say agitation?"

एखाद्या कार्यक्रमाची सूत्र सांभाळणे त्याला facilitation म्हणतात आणि एखाद्याचा सत्कार करायचा त्याला felicitation.

Instead of म्हणजे त्याऐवजी आणि inspite of म्हणजे असं असलं तरी.

सगळ्यात हाईट म्हणजे परवा एक कस्टमर आमच्या डिझाइन इंजिनियर ला म्हणाला "we will stimulate this process" Stimulate म्हणजे उत्तेजित करणे, त्यांना simulate असं म्हणायचं होतं बहुधा. Simulate म्हणजे एखादी प्रोसेस कॉम्पुटर वा छोट्या स्केल वर जशीच्या तशी करून दाखवणे. अर्थाचा कसा अनर्थ होतो बघा.

सुटाबुटातला प्रोफाइल पिक्चर लावल्यावर, इतका शहाणपणा करण्याचा हक तो बनता है यार!

Thursday, 8 September 2016

Kessler Spindle repair

सेटको स्पिंडल ही भारतातली मशिनिंग सेंटर स्पिंडल , टर्निंग सेंटर स्पिंडल , ग्राइंडिंग स्पिंडल, पीसीबी स्पिंडल यांची दुरुस्ती आणि देखभाल करणारी अग्रगण्य कंपनी आहे. कंपनी पुणे स्थित आहे आणि तिची एक शाखा चेन्नई मध्ये आहे.

नजीकच्या काळात मशिनिंग सेंटर हा मशीनचा प्रकार इंडस्ट्री मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आल्या. त्याला काही कारणं आहेत. ती कारणं आपण दुसऱ्या लेखात पाहू.

या सगळ्या प्रकारच्या स्पिंडल्स मध्ये मशिनिंग सेंटर चे स्पिंडल हे दुरुस्ती आणि देखभालीसाठी अवघड असतात. आणि खरं सांगायचं तर त्यांचं गुणोत्तर प्रमाण ही जास्त आहे. मशिनिंग सेंटर मध्ये स्पिंडल हा काही फीड रेट ने हलत असतो. त्यामुळे या स्पिंडल चं वजन हा मशीन डिझाईन मध्ये कळीचा मुद्दा आहे. फॅक्टर ऑफ सेफ्टी हा स्पिंडल डिझाईन करताना कमीत कमी ठेवावा लागतो. कदाचित यामुळे हे स्पिंडल डिझाईन स्पेसिफिकेशन च्या बाहेर चालवले किंवा मशीन वर जर ऍक्सिडंट झाला तर ते लवकर खराब होतात. आणि त्यामुळेच ते दुरुस्तीसाठी खूप वेळा येतात.

या स्पिंडल चे ढोबळ मानाने चार प्रकार आहेत. पहिला बेल्ट ड्रिव्हन स्पिंडल, दुसरा डायरेक्ट ड्राइव्ह, तिसरा गिअर ड्रिव्हन आणि चौथा बिल्ट इन मोटर स्पिंडल. तांत्रिक दृष्ट्या हे बिल्ट इन मोटर किंवा त्याला मोटराइज्ड वा हाय फ्रिक्वेन्सी स्पिंडल असेही संबोधतात. हे रिपेयर करण्यासाठी स्किल ची गरज असतेच आणि त्या बरोबर एका मोठ्या सुविधा पूर्ण अशा टेस्टिंगची गरज असते. सेटको इंडिया कडे या सगळ्या अदयावत सुविधा आहेत.

हे स्पिंडल साधारणपणे मशीन उत्पादक बनवतात. या व्यतिरिक्त जागतिक स्तरावर काही स्पिंडल उत्पादक पण आहेत. केसलर नावाची अशीच एक जर्मनी ची अग्रगण्य कंपनी आहे. त्यांचे स्पिंडल हे अनेक मशीन उत्पादक वापरत असतात. असाच एक केसलर चा आमच्या कंपनीत दुरुस्तीसाठी आला होता. तर त्यामध्ये प्रॉब्लेम काय होते आणि तो आम्ही कसा रिपेयर केला याची माहिती देत आहे.

हा केसलर चा स्पिंडल एका मोठ्या इंजिनियरिंग कंपनी मध्ये टायटन नावाच्या मशीनवर कार्यान्वित आहे. टायटन कंपनी डबल कॉलम व्ही एम सी बनवण्यात अग्रेसर कंपनी आहे. ह्या मशीन वर जॉब सेटिंग होत असताना स्पिंडल टूल होल्डर सकट जॉब ला धडकला. हा अपघात इतका जबर होता की त्यामुळे स्पिंडल चा मेन शाफ्ट, ज्याला BT 50 टेपर आहे, त्याला क्रॅक्स तयार झाले. एकदा स्पिंडल शाफ्ट मध्ये क्रॅक्स आल्या की स्पिंडल वापरण्या योग्य राहत नाही. याचं कारण असं की स्पिंडल टेपर मध्ये टूल होल्डर पकडल्यावर TIR टॉलरन्स मध्ये येत नाही आणि त्यामुळे प्रॉडक्ट क्वालिटी खराब होते. बरं, या मशीन टूल कंपन्यांचा आफ्टर सेल्स रेव्हेन्यू वर फार भिस्त असते. त्यामुळे तो शाफ्ट हा त्यांच्या कडूनच घ्यावा लागतो. पण त्याचा लीड टाइम जास्त आणि किंमत पण तगडी असते. त्यामुळे टायटन कडून हा स्पिंडल रिपेयर करणं हे कस्टमर साठी दुरापास्त होतं. मग त्या कस्टमर ने तो स्पिंडल दुरुस्त करण्यासाठी आमच्या कडे पाठवला.

स्पिंडल आमच्याकडे आल्यानंतर आम्ही तो पूर्ण डिसमँटल केला. आणि तो क्रॅक गेलेला शाफ्ट व्यवस्थित चेक केला. हे करताना आमच्या असं लक्षात आलं की आपण हा शाफ्ट इथे भारतात आमच्या कंपनीत नक्कीच बनवू शकतो. कस्टमर ला आम्ही आमचा प्रस्ताव पाठवला. कस्टमर चे मेंटेनन्स चे लोकं आमच्या कंपनीत व्हिजिट ला आले, त्यांनी आमची तांत्रिक बाजू बघितली. आम्ही तो स्पिंडल शाफ्ट कोणत्या पद्धतीने बनवू शकतो यावर चर्चा झाली.

आम्ही त्यांच्या सगळ्या शंकांचं समाधान केल्यानंतर त्यांनीही आमच्या क्षमतेवर विश्वास ठेवला आणि पुढे काम करण्यास सांगितले.

सगळ्यात पहिले आम्ही त्या स्पिंडल शाफ्ट चं अतिशय व्यवस्थित ड्रॉईंग बनवलं. हा शाफ्ट आहे तसा बनवणं हे अत्यंत गरजेचं होतं कारण तसं झालं तरच त्याची असेम्ब्ली फिटमेन्ट बरोबर होणार होती. आमच्या इतक्या वर्षाच्या अनुभवावरून आम्ही त्याचं मटेरियल सिलेक्शन केलं (SAE 8620) आणि मग प्रोसेसचा फ्लो चार्ट बनवला. टर्निंग, मिलिंग, त्या नंतर हिट ट्रीटमेंट, रफ ग्राइंडिंग, थ्रेड ग्राइंडिंग अँड सरते शेवटी फिनिश ग्राइंडिंग अशी प्रोसेस ठरवली.

हा शाफ्ट बनवत असताना त्या स्पिंडल साठी लागणाऱ्या बेअरिंग विकत घेण्याची प्रोसेस चालू केली. प्रिसिजन स्पिंडल चं हे एक वैशिष्ट्य आहे की शाफ्ट वरून बेअरिंग काढल्या की त्या बदलाव्या लागतात. अशा प्रकारच्या  स्पिंडल मध्ये बहुतेकवेळा प्रिसिजन अँग्युलर कॉन्टॅक्ट बेअरिंग वापरतात. ह्या स्पिंडल मध्येही त्याच प्रकारच्या बेअरिंग वापरल्या होत्या. आव्हान हे होतं की या स्पेशल बेअरिंग होत्या आणि त्यात सिरॅमिक बॉल वापरले होते. स्टॅंडर्ड बेअरिंग मध्ये स्टील बॉल वापरले जातात. ह्या बेअरिंग चे उत्पादक FAG ही जगप्रसिद्ध कंपनी होती. शोध घेतला असता या बेअरिंग भारतात मिळणं शक्य नव्हतं. मग आम्ही परदेशात आमचे जे सोर्सेस आहेत त्यांच्या कडे चौकशी केली. अथक प्रयत्नानंतर आम्हाला ती बेअरिंग फ्रांस मध्ये मिळाली.

या दरम्यान आम्ही शाफ्ट पण बनवला. या शाफ्ट उत्पादनाच्या प्रकारात स्पिंडल चा ड्रॉ बार फिट होणं हे फार महत्वाचं होतं. पण डिझाईन स्टेज ला आम्ही काळजीपूर्वक काम केल्यामुळे ती असेम्ब्ली अगदी व्यवस्थित झाली.

हे सगळं झाल्यावर मग आम्ही पूर्ण स्पिंडल ची असेम्ब्ली आम्ही आमच्या वातानुकूलित स्पिंडल रूम मध्ये पूर्ण केली. ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये, आम्ही जरी शाफ्ट नवीन बनवला तरी त्याची कुठेही आडकाठी आली नाही.

पूर्ण स्पिंडल ची आम्ही असेम्ब्ली केल्यावर त्याची टेस्टिंग प्रोसिजर आहे त्यात आम्ही स्टॅटिक आणि डायनॅमिक अशा टेस्ट करतो. स्टॅटिक टेस्टिंग मध्ये स्पिंडल टेपर चं ब्ल्यू मॅचिंग, मँड्रेल वर स्पिंडल फेस पासून ३०० मम वर रन आऊट, क्लॅम्पिंग फोर्स या गोष्टी चेक केल्या जातात. तर डायनॅमिक टेस्टिंग मध्ये आमच्या अदयावत टेस्टिंग रूम मध्ये हा स्पिंडल त्याच्या पूर्ण क्षमतेइतका फिरवला जातो. त्या वेळेला त्याचं व्हायब्रेशन, तापमानातील वाढ हे सगळं चेक करून साधारणपणे ४ ते ६ तासाच्या ट्रायल नंतर आम्ही हा स्पिंडल कस्टमर कडे पाठवला.

हा स्पिंडल भारतात रिपेयर केल्याचे काही फायदे:

१. सगळ्यात आधी कस्टमर च्या मनात विश्वास तयार झाला की अशा पद्धतीचं काम भारतात आंतरराष्ट्रीय गुणवत्तेनुसार केलं जातं.

२. आम्ही जर हा स्पिंडल इथे रिपेयर केला नसता तर तो कस्टमर ला परदेशात पाठवावा लागला असता. आणि हे काम प्रचंड वेळ खाऊ होतं. आम्ही जे काम १५ दिवसात केलं ते करायला कदाचित २ महिने लागले असते.

३. स्पिंडल शाफ्ट आपण भारतात तयार केल्यामुळे कस्टमर ची पैशांची बचत झाली. मार्केट च्या माहितीप्रमाणे आम्ही हे काम परदेशीय रिपेयर पेक्षा २५% किमतीत केलं.

Monday, 5 September 2016

पार्टनर ५

"सुख, समाधान आणि शांती यातील फरक सांग बरं"

मी अचानक विचारलेल्या प्रश्नावर पार्टनर बहुधा गांगरला असावा. दोन सेकंदातच सावरून तो म्हणाला

"आपल्याकडे जे नाही आहे ते मिळवणं म्हणजे सुख, आपल्याकडे जे आहे त्यात सुख मानणं म्हणजे समाधान अन सुख आणि समाधान यातील एकदा फरक कळला की आयुष्यात जी मिळते ती शांती"

माझ्या चेहऱ्यावरचे मिश्किल भाव बघताच पार्टनर म्हणाला "आता ही शांती कोण, असा पाचकळ प्रश्न विचारून स्वतःचा दीड शहाणपणा दाखवू नकोस."

मी तोंडात मारल्यासारखा गप्प झालो आणि विचार केला, आता गप गुमान झोपावं. 

इंदोर

इंदोर ला हॉटेल मधून चेक आऊट करत होतो. रिसेप्शनला एक म्हातारा वेटर गणपतीला उदबत्ती ओवाळून पूजा करत होता. त्याने देवाला नमस्कार केला आणि मग माझ्याकडे बघून मनोभावे हात जोडले. माझ्या चेहऱ्यावरचं प्रश्न चिन्ह बघून तो म्हातारबाबा म्हणाला "ग्राहक भी तो भगवान जैसे होते है"

माझ्या चेहऱ्यावरचा उद्दाम पणा आपसूक गळून पडला.

दिवसाची सुरुवात चांगली झाली.

टॅक्सी त बसलो. तिची कंडिशन फार काही चांगली नाही आहे. इतर वेळेस चा मी चिडलो असतो. ड्रायव्हर ला बोललो "हॉर्न छोडके आपकी गाडी का बहोत कुछ बज रहा है"

ड्रायव्हर हसत हसत गाडी चालवतो आहे. 

धसका

दीड दोन महिन्यांपूर्वी मी भुवनेश्वर ला गेलो होतो. फेबुवर कुठेतरी मी उल्लेख केला की लागलीच मित्राचा मेसेज आला "मग काय आता भुवनेश्वर ची सकाळ यव आणि रस्ते त्यंव अशी पोस्ट येणार असेल तुमची"

परवा एका मित्राला सांगितलं की बहुतेक एखाद्या आठवड्यात कलकत्त्याला जाईन. लागलीच तो म्हणाला "झालं मग आल्यावर लागलीच आठ एक दिवस कलकत्त्यात असं आणि तसं चालू राहील" (actually हे एक मैत्रीण म्हणाली, पण मुद्दामून मित्र लिहिलं. पोस्ट निस्तरायला सोपं पडतं)

मागच्या आठवड्यात नाशिक ला गेलो होतो. पाच सहा मित्र सुला वाईन्स ला गेलो होतो. टल्लीन होऊन गप्पा वगैरे झाल्यावर एक जण म्हणाला "काय रे तू गप्प होतास आज?" तर दुसरा लागलीच म्हणाला "अरे तो फेसबुक च्या पोस्ट साठी विषय शोधत होता. एक दोन पोस्ट तो उजवेल बघ आता"

गेल्या तीन पुण्या बाहेरच्या व्हिजिट मध्ये चार वेगवेगळ्या लोकांना भेटलो. त्यांना भिती वाटली मी त्यांच्या बद्दल लिहितो की काय अन मी घाबरून होतो ते माझ्या बद्दल लिहितील की काय. आठवड्यानंतर पण काहीच नाही पडलं, मग हायसं वाटलं.

वैभवी आणि तिचे डॉक्टर मित्र मैत्रिणी गप्पा मारत बसले होते. मी पोहोचलो तिथे की लागलीच सुशील म्हणाला "ए, अरे नीट वागा बरं आता. नाहीतर राजेश लागलीच पोस्ट बनवून फेसबुकवर टाकेल"

एकंदरीत हे असं चालू आहे. म्हणजे मी काय लिहिणार याचा मित्रांनी धसका घेतला आहे आणि मी कुठे गेलो की मित्र काय कॉमेंट करणार याचा मी धसका घेतला आहे.

फेसबुक सध्या असा एकुणात धसका धसकी चा खेळ झाला आहे. धार्मिक दहशतवाद झाला, राजकीय दहशतवाद पहिला, सामाजिक दहशतवाद पण अनुभवला, ते सांस्कृतिक की काय तसला दहशतवाद पण माहित आहे, तसं याला फेसबुकीय दहशतवाद म्हणावा काय?

(बाय द वे, भुवनेश्वर ला मेसेज करणारा मित्रच होता बरं.)

(तरीही विश्वास बसत नसेल तर विकास गोडगे ला विचारा)

पार्टनर ४

मी पार्टनरला विचारलं "काय रे, आजकाल फार तारे तोडत असतोस. नेहमीच कसं पॉझिटिव्ह. जणू काही तुला प्रॉब्लेम्स च नाही. असं कसं?"

पार्टनर छद्मी पणे हसला.

चिडलोच मी "अरे, हसतोस काय बावळटासारखा. काय म्हणतोय मी"

पार्टनर शांतपणे बघत म्हणाला "हे बघ, तुलाही माहित आहे की प्रॉब्लेम्स मलाही आहेत पण पॉझिटिव्ह राहण्याशिवाय दुसरा ऑप्शन आहे का काही मित्रा"

"कसं आहे, असं राहिलं तर काही तरी मार्ग सुचतात. नाहीतर ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलं तर आपण फक्त शिव्या देत राहतो. डोकं शांत ठेवलं तर अल्टरनेटिव्ह रस्त्याचा ऑप्शन डोळ्यासमोर येतो. एखादी गोष्ट करायची नाही म्हंटलं की संपलं की सगळं. आणि काही करायचं म्हंटलं की ते करण्याचे एक एक मार्ग सुचत जातात."

"आणि तसं ही नकारात्मक विचार आले की, हं मग पुढे काय, असं विचार स्वतः ला. त्याचं शेवटचं उत्तर तुला, हं, झालं सांगून आता कामाला लाग, असंच येतं. आणि मग ती शक्ती आणावी लागते."

"हे आहे हे असं आहे दोस्ता. व्रत स्वीकारलं आहे ना! मग  चॉईस नाही दुसरा"

पार्टनर उवाच.

हे की ते

नाही म्हणजे कसं आहे की इंजिनियरिंग च्या भाषेत या हृदयाच्या नळ्या तुंबण्याच्या प्रॉब्लेम ला ब्रेक डाऊन मेंटेनन्स म्हणतो. नॉर्मली असा मेंटेनन्स निघाला की एकतर पार्ट रिप्लेस करणं किंवा स्लीव्ह ग्राफ्टिंग अशी प्रोसेस संयुक्तिक ठरते. म्हणजे बायपास किंवा अँजिओ प्लास्टी वगैरे. तिथे हयगय करू नये असं आमचं इंजिनियरिंग शिकवते.

नाही म्हणजे कसं आहे आमच्या इंजिनियरिंग मध्ये एक प्रिव्हेंटिव्ह किंवा प्रेडीक्टिव्ह मेंटेनन्स म्हणून प्रकार आहे. ते टेक्निक वापरलं तर ब्रेक डाऊन मेंटेनन्स उशिरा होतो किंवा झालाच तर ते रिपेयर करायला वेळ कमी लागतो किंवा कष्ट ही कमी पडतात. थोडक्यात काय तर बाकीच्या पॅथी आणि योग वगैरे हे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स सारखं काम करतात.

नाही म्हणजे कसं आहे की आमच्या इंजिनियरिंग मध्ये दोन्ही प्रकारच्या मेंटेनन्स ला सारखंच महत्व आहे आणि दोन्ही क्षेत्रात काम करणारे लोकं एकमेकांबद्दल आदर बाळगून आहेत. वैद्यकीय क्षेत्रात मात्र कार्डिओलॉजिस्ट मंडळी आयुर्वेद किंवा योग याचं महत्व जाणून आहेत. डीन ऑर्निश पासून  अभय बंग, जगदीश हिरेमठ, सुहास हरदास,  हे सगळे हृदय विकार तज्ञ दुसऱ्या पॅथीचा नेहमी सल्ला देतात, हा स्वानुभव आहे. दोन महिन्यांपूर्वी मला पोटदुखी कमी व्हावी म्हणून एका प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट ने हरब्लेक्स नावाची हिमालय ड्रग्स कंपनीची गोळी दिली. पण उलटा विचार केला तर बाकी पॅथीचे लोकं ऍलोपॅथी वर विनाकारण आगपाखड करतात असा माझा अनुभव आहे. (अपवाद मंडळींनी स्वतः ला सन्माननीय समजावे.)

म्हणजे कसं आहे की दोन्ही मेंटेनन्स करणाऱ्या लोकांनी एकमेकांच्या इंटेन्शन बद्दल शंका न घेता मशीनची काळजी घेतली की प्लांट मध्ये आनंदी आनंद असतो. बाकी मंडळी सुज्ञ आहेतच.

म्हणजे कसं आहे की आहे हे असं आहे.

(राम म्हणजे राजेश मंडलिक, बी जे मेडिकल चा इंजिनियर. स्वतः ची दोनदा अँजिओ प्लास्टी झाली आहे. मधवबागेची ट्रीटमेंट पण घेतली आहे. योगाभ्यास नियमित करतो.

पत्नी डॉ वैभवी मंडलिक ही एम डी पॅथॉलॉजी आहे.

बायकोची बहीण डॉ क्षितिजा जुजम ही आयुर्वेदिक डॉक्टर आहे पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे योग पंडिता आहे.

सासू सासरे श्री व सौ सोनईकर हे स्वतः योग अभ्यासक आहेत आणि निगडी परिसरात क्लास घेतात.

सांगायचा मुद्दा हा की भृगु, चरक, पंतांजली याचे दाखले कृपया देऊ नये. पूर्ण विचारांती आणि काही स्वानुभव यावरून हे मत मांडले आहे)

बालाजी

यावर्षी अजूनही बिझिनेस काही टेक ऑफ घेत नाही आहे. आज बंगलोर ला सकाळी सात ला पोहोचलो आणि एक तास एकटाच एअरपोर्ट ला सुन्न बसून होतो. काय करावं काही सुचत नव्हतं. शेवटी डोकं गदागदा हलवून उबेर बुक केली. बालाजी नावाच्या ड्रायव्हर चं नोटिफिकेशन आलं. स्विफ्ट डिझायर. मी गाडीत बसल्या बसल्या खणखणीत आवाजात "गुड मॉर्निंग सर" अशी मानवंदना झाली. इतकं इंग्रजी त तर कुणीही बोलतं असा विचार करत असताना परत तो सारथी म्हणाला "So, you belong to Mumbai, Right?" मी म्हणालो "I am  from Pune". पुढचे एक तास आम्ही इंग्रजीत बोलत होतो. तर बालाजी पुढे म्हणाला "I like this airport area. It is so fresh. Lot of trees, greenary, no pollution at all."

आणि मग मी अधून मधून प्रश्न विचारत राहिलो आणि बालाजी बोलत राहिला. एका वर्षा पूर्वी बालाजी बी पी ओ मध्ये बिझिनेस analyst होता. शिक्षणाने MSc Information Technology. मूळ तेलगू असणाऱ्या कंपनीच्या मालकाने धंदा गुंडाळला. कारण अमरावती गावात त्याच्या जमिनी होत्या आणि आंध्र ची ती राजधानी होणार म्हणून कन्स्ट्रक्शन बिझिनेस ला सॉलिड बरकत आली आहे.

बालाजीने वडिलांना बारावीत सांगितलं होतं की मला ड्रायव्हिंग आवडतं, एक Ambassador घेऊन द्या, मी ट्रॅव्हल्स चा धंदा करतो. राज्यशासनात नोकरीला असलेल्या वडिलांनी सरळ ते उडवून लावलं आणि शिक म्हणून सांगितलं. आता पंधरा वर्षाने नोकरी गेल्यावर त्याचं ड्रायव्हिंग चं पॅशन उफाळून आलं आणि त्याने सरळ टॅक्सी चालवायला घेतली. बायको हनिवेल मध्ये चांगल्या पोस्टवर आहेच.

म्हणाला "मला वेगवेगळ्या ठिकाणी भेटी द्यायला आवडतं. तुम्ही लोकं त्यासाठी पैसे खर्च करता. माझी आवड पूर्ण करण्यासाठी तुम्हीच तर डिझेल चे पैसे देता. मला ट्रॅफिक चा अजिबात कंटाळा येत नाही. या स्टिअरिंग वर बसलं की मला स्वर्गसुख लाभतं"

"एअरपोर्ट च्या बेल्ट वर पोर्टर येतात. आणि काही पैसे घेऊन लगेज बाहेर आणून देतात. आपण त्यांना नाक मुरडतो. पण एका अमेरिकन ने त्याला मस्त शब्द वापरला, Facilitator. I am trying to figure out where to use this beautiful word"

" Many people say that success is key to happiness. Actually it is other way round"

"I am in love of this business. Living life like a king. I don't have too audacious goals but I will certainly keep my customers happy. Hopefully, I should have high end car service like BMW in couple of years" .

"Sir, do not consider this period as set back. You will get set of principles to come back in business. Look at setback this way"

"I have also invested in Pharma distribution company. Like Warren Buffet said, that we should not keep all the eggs in one basket. I follow him."  

त्याने मला ओला पेक्षा उबेर कस्टमर साठी कशी फायदेशीर आहे ते सोदाहरण दाखवलं. मी दोन महिन्यांपूर्वी उबेर ऍप डाउनलोड करण्याची सूचना स्टाफ ला दिली त्याबद्दल हायसं वाटलं.

अजून खूप काही बोलला.

मी जेव्हा टॅक्सी तुन उतरलो, तेव्हा माझ्या मनावर साचलेलं मळभ थोडं दूर झालं होतं. ५४९ रुपयात जीवनाबद्दल इतकं शिक्षण.....सौदा वाईट नव्हता.

साली नियती पण अशी आहे की आजकाल निगेटिव्ह विचार मनात येत राहिले की बालाजी सारखं कुणाला तरी दणकन समोर आदळावते.