Monday, 7 April 2014

khushi

मागे वळून बघताना (२५ वर्ष इंडस्ट्रीत घासल्यावर असं नक्कीच म्हणू शकतो नाही का. खरं तर २४, कारण शेवटचं एक वर्ष फेसबुकवर घासतो आहे) असं माझ्या लक्षात आलं आहे की काही गोष्टींबाबत माझे फारच वांदे झाले आहेत. त्यापैकी एक म्हणजे प्रवास. म्हणजे मी पुण्याहून destination ला पोहोचायचो व्यवस्थित. पण ते लोकल फिरायचं म्हणजे ताप व्हायचा. गुजरात मध्ये छ्त्राल च्या रणरणत्या उन्हात मी बसची वाट बघत उभा राहायचो. (हो, तेव्हा मोदी मुख्यमंत्री नव्हते, त्यामुळे त्याकाळी  उन्हाळ्यात उनच लागायचं. आता सारखे गुजरातचे रस्ते वातानुकुलीत नव्हते). कार समोरून निघून जायच्या पण कुणी लिफ्ट म्हणून द्यायचं नाही. शेवटी मी कुठल्या तरी ट्रक मध्ये बसून अहमदाबादला यायचो. मार्केटींगच्या च्या करिअर मधील फारच विचित्र प्रकार होता तो. (इथे सांगायचं म्हणजे मोदी मुख्यमंत्री झाले आणि माझा तो जॉब सुटला. गुजरात माझा मुख्य area होता सेल्स चा. विचार करा. कसला मुर्ख आहे ना मी. जॉब सोडला नसता तर लोळलो असतो पैशांच्या राशीत. जाऊ द्या ते. उसासे सोडण्याशिवाय काही नाही आता).

तर आठवलं यासाठी कि काही दिवसांपूर्वी औरंगाबाद हून येत होतो. एकटाच होतो कार मध्ये. दुपारची वेळ साडेतीन ची. वाळूज च्या मनमंदिर चौकात एक हरहुन्नरी दिसणारा सेल्स चा माणूस उभा होता. मला माझे दिवस आठवले. मी हळूच त्याच्या बाजूला गाडी उभी केली. काच खाली घेऊन त्याला विचारलं "कुठे जायचं?". त्याला मी बहुधा गाडीवर ठेवलेला ड्रायवर वाटलो असावा. त्याची पण काही चूक नाही, दिसतोच मी तसा. तो ;म्हणाला "नगर ला सोडणार का" मी म्हणालो "बसा लवकर" तर तो साळसूदपणे मागचा दरवाजा उघडून बसू लागला. मी म्हणालो "पुढे बसा, तेव्हढ्याच गप्पा मारत जाऊ." मग किती वर्षांपासून गाडी चालवता, हीच लाईन कि भारतभर प्रवास केलाय वैगेरे सामन्यात: ड्रायवर ला जे प्रश्न विचारून आपण time पास करतो, ते प्रश्न विचारून तो तरुण त्याची कहाणी सांगू लागला. सेल्स, त्याचे फिरणे, कंपनीची expense voucher sanction करतानाची टाळाटाळ, उन वैगेरे वैगेरे.

नगर आले, तर म्हंटला बस स्थानकासमोर सोडा. मी गाडी थांबवली. तर त्याने खिशातून १०० ची नोट काढून मला दाखवली.

मी: काय हे.

तो: एवढे राहू द्या.

मी: एवढ्यानं काय होणार.
तो: मग किती
मी: ५०० लागतील
तो: अहो एवढे कसे
मी: एवढेच
तो: अहो आधीतरी सांगायचं
मी: तुम्ही विचारलं का?

असं म्हणाल्यावर चिडलाच तो. माझी पण अभिनयक्षमता संपली. म्हणालो "मित्रा, हे राहू दे तुझ्याकडेच." मी माझे कार्ड दिले आणि त्याला म्हणालो "तुझ्या जागी मी मलाच पाहिले, १५ वर्षापूर्वीचा. पार्श्वभाग बाहेर काढून रिक्षाच्या दांडीवर बसून भोर रस्त्यावरून सातारा रोड ला यायचे आणि मग तिथून पुण्याला. मनाला वाटले मी जे भोगले  तसे तू कशाला भोगावेस. आणि पैसे तरी कसले घेणार या खेळणाऱ्या थंड हवेचे" मघाच्या  रागाची जागा आता आश्चर्याने घेतली होती. सरांना चहाचे निमंत्रण झाले. मी म्हणालो "नंतर कधीतरी" सस्मित चेहर्याने त्याने मला प्रेमभराने हस्तांदोलन केलं आणि बाय म्हणाला. मी सुद्धा शीळ वाजवत पुण्याच्या दिशेने निघालो.  जमेल तसा आनंद द्यावा, यालाच जगणे म्हणत असावे बहुधा. मी तेच अनुभवत निघालो……जरा खुशीतच.

Tuesday, 1 April 2014

अस्ताव्यस्त

तसेही वर्षभर मी मूर्ख बनवलाच जात असतो. कधी supplier कडून,  तर कधी customer कडून. कधी juniors येडे समजत असतात तर कधी seniors. दुश्मन तर वाटच बघत असतात कधी गुंडाळतो याला, पण मित्रसुद्धा देतात बर्याचदा झटका.

मला कशाला असेल आजच्या दिवसाचे अप्रूप.
*********************************************************************************

वर्षाला कंपनीच्या कमाईपैकी ३३% सरकारी खजिन्यात गोळा करतो . सेल्स टॅक्स, excise, सर्विस टॅक्स सारं काही भरतो इमानऐतबारे. जास्त काही मागत नाही, एक जनरल टॅक्स करा आणि distribute करा वेगवेगळ्या डिपार्टमेंटला. हो, पण ते income tax abolish करण्याचं ते अशक्य स्वप्न नका दाखवू.

आधीच्या दोन शुभेच्छा़ अबधित ठेवून नवीन आर्थिक वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा़.

गर्व से कहो हम व्यावसायिक है!  (आपल्यालाही जमतात बरं का घोषणा वैगेरे)
*********************************************************************************

माझ्याकडूनही चुका झाल्यात, अगदी अक्षम्य म्हणाव्यात अशाही. काहींचं परिमार्जन मीच केलं तरी काहींचं नियतीनं. आणि कधी कधी तर सुहृदांनी ही कान पिरगाळला तेव्हा कुठे गाडी पटरीवर व्यवस्थित चालू आहे. नाहीतर घसरायला काही वेळ लागत नाही.

सिलसिला आभासी जगातही चालूच आहे.
*********************************************************************************

कशी पोस्ट आहे ना .............. विस्कळीत

न आवरलेल्या आंथरूणासारखी.

कधी कधी लिहावं असं असंबद्ध

अस्ताव्यस्त
********************************************************************************


असा मी जसा मी कसाही मी संस्कार तुमचे
काळजीने चिंब नकारातही होकार तुमचे
न ऐकून ऐकता सोडलेले हुंकार तुमचे
आयुष्य घेई आकार आमचे स्वप्न होई साकार तुमचे

निसरड्या रस्त्यावरून घसरताना सावरणारे पुण्य तुमचे
दलदलीतून चालताना चिखलाचे डाग उडू न देणारे सत्व तुमचे
उपहासाच्या अविर्भावात दडलेले ममत्व तुमचे
पोटाला चिमटा तुमच्या पण सुख वाटी आमच्या असे विचित्र तत्व तुमचे

यशोशिखरावर नजर खिळवताना उभा राहिलो ते खांदे तुमचे
भविष्याचा वेध ज्याने घेतला ते डोळे तुमचे
मायेची मुक्त उधळण करणारे हात तुमचे
साष्टांग दंडवत मायबाप हो घ्या पुढे पाय तुमचे 

Sunday, 30 March 2014

वारे

आज सिंहगडावर जरा लौकरंच गेलो, साडेपाच वाजता सकाळी. सात वाजता खाली उतरताना अचानक समोरून एक परिचित चेहरा आला. नीट बघितल्यावर लक्षात आले अरे हे तर आपले BJP चे उमेदवार श्री अनिल शिरोळे. घामेघूम झाले  होते बिचारे. बरोबरचे एक जण म्हणाले "शिरोळे साहेब खास आपल्याला भेटण्यासाठी सिंहगडावर आले आहेत." नमस्कार झाला, मग मी त्यांच्याशी हस्तांदोलन केलं. ते म्हणाले तुमचं तर मत हवंच पण मित्रांनाही सांगा. मला त्याक्षणी निर्भय, शरद, अविनाश आणि आनंद नरारे यांची फार आठवण आली. मनात म्हणालो तुमचं माहीत नाही पण तुमच्या नेतृत्वाचं कर्तृत्व मला भावत नाही (कसला सभ्य आहे ना मी). पण तोंडदेखलं हसलो आणि मार्गस्थ झालो.

फेसबुकवर वाचल्यामुळे का काय माहित आजकाल माझ्या राजकीय भावना फारच उचंबळून येतात. आणि मग मी उतरताना या उमेदवारांचा विचार करू लागलो. नैसर्गिकरीत्या पहिला विचार आला युवा तडफदार नेते राजकारणातील डेविड बेकहम, विश्वजित कदम यांचा. परत ते काँग्रेस चे, म्हणजे आपली एकदम आवडती पार्टी. अस्मादिक GPA मधून DME झाल्यावर (कसलं हार्वर्ड मधून MBA झाल्यासारखं टेचात लिहिलं आहे ना!) पिताश्रींना त्यांच्या चिरंजीवा बद्दल फारच विश्वास वाटू लागला आणि मग आम्हाला graduate engineer करण्याच्या मोहिमेवर ते लागले. COEP ला admission मिळणे हे दुरापास्त होतं. MIT कॉलेज मध्ये ₹ १५००० भरण्याची तयारी नसल्याने बाहेरचा रस्ता दाखवल्यावर मी आणि बाबा, सांगली चे SE श्री गायकवाड साहेब यांच्याबरोबर भारती विद्यापीठ येथे धडकलो. हो नाही करता, काही डोनेशन न भरता तिथे admission मिळाली. तेव्हा पंजावर शिक्का मारून या ऋणातून उतराई व्हावं कि काय या विचारात मी गड उतरू लागलो. पण एकंदरच वातावरण बघता हे काही योग्य वाटेना. मनमोहन सिंह यांचे आपण fan आहोत. पण त्यांची पण सद्दी संपली आहे सध्या.

अशा विचारातच मी भूतकाळात गेलो. दिनेश च्या दुकानात सोमवार पेठेत.  त्या STD बूथ मधून माझे देशभरचे फोन व्हायचे. दिनेशची आई म्हणजे माउली च. माझ्यावर फार जीव. तिथे बसलो असताना दाढीधारी युवक आला. मावशींच्या पाया पडला आणि स्टूल वर बसला. मावशीनी ओळख करून दिली "ए दीपक, हे मंडलिक, engineer आहेत. लैच काम करत असतात." थोडाफार बोललो. आणि तो युवक गेला. मावशीनी विचारलं "ओळखलं का" मी नकारार्थी मान हलवल्यावर म्हणाल्या "ते दीपक पायगुडे, नगरसेवक आहेत. झळकणार बघ राजकारणात" मग त्यांनी दीपक कसा दिलदार आहे वैगेरे सांगितलं. मला फारच भारी वाटत होतं तेव्हा. शिवसेनेतून ते आता म न से त आले. पण काय करणार राज साहेबांचे विचार काही आपल्याला झेपत नाही.

अशा विचारातच घरी पोहोचलो. सिंहगड साथीदार वैभव जो घरातली कामंही करतो तो चहा पिउन खोली झाडू लागला. मी वैभव ला म्हणालो " तू आतली खोली झाड आणि मला दुसरा झाडू दे कारण आता मी सुद्धा झाडू हातात घ्यायची वेळ आली आहे" अशा रीतीने हातात घट्ट झाडू धरून मी घर साफ करू लागलो. मनात मात्र राजकारणाचे "वारे" खेळत होते.



Saturday, 29 March 2014

आकडा

दोन दिवसामागे एक पोस्ट लिहिली आणि त्यात १३ नंबर चा उलॆख झाला. आणि मग त्या नंबर शी निगडीत वेगवेगळ्या गोष्टी आणि इतर देशातील काही नंबरची अंधश्रद्धा हे पण कळले. त्यावरून आठवलं कि माझं आणि आकड्याचं बरंच सख्य आहे. लहानपणापासून मला फिगर चा फारच नाद आहे. (please विनोद नको). एक वेगळाच छंद होता मला, गाड्यांच्या नंबर प्लेट वर २ सारखे नंबर असतील तर त्यांची बेरीज करायची आणि मग add करत जायचं. त्याने माझी बेरीज करण्याची practice फारच जोरात होती. (डॉक्टरांची practice जोरात असते, वकिलीची practice जोरात असते. माझी काय तर बेरीज करण्याची. बोंब च आहे) वाहनांचे नंबर तर अगदी पाठ असायचे. नितीन ची ७४४५ कब, राजेशची ७१७८ ची सुपर, निघोटची ३१७९ सुझुकी, प्रताप ची ९९ सुझुकी हे गाड्यांचे नंबर आजही २५ वर्षानंतर मुखोद्गत आहेत. फोन नंबर ला मी डिरेक्टरी कधी वापरलीच नाही. सगळे डोक्यात. २**५६२१० गोडबोल्यांचा, २**१११७१ कुलकर्ण्यांचा हे आज मला २० वर्षानंतर हि पक्के लक्षात आहे. असाच आमचा पहिला फोन BSNL नि ३६२४३६ नंबरचा दिला होता. तो मिळाल्यावर घरातील लोकं फारच गोरेमोरे झाले होते आणि मग तो चेंज करून ३५८४३६ असा करून घेतला. असो.

खरं तर शाळेत असताना जीवशास्त्र (जीव घ्यायचा हा विषय), रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र आणि नंतर आयुष्यात नागरिकशास्त्र शिकता शिकता अर्धमेला झालेलो मी, आधुनिक अशा संख्या शास्त्रावर (numerology you know) अजिबात विश्वास ठेवू शकत नाही. (वास्तू शास्त्र हा एक मला अगम्य विषय आहे. आग्नेय ला किचन आणि काय काय, डोक्यावरून जातं माझ्या). पण एकदा मी ट्रेन नि कानपूर ला चाललो होतो. डब्यात एक जळगाव ला माणूस चढला. अमन त्याचं नाव. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मला म्हणाला "तुमच्या आयुष्यात २ आणि ४ या फिगर ला फार महत्व आहे." आता त्याला काय सांगावं कि मला कुठली फिगर……. (पुन्हा, please विनोद नको).

मग मी विचार केला

२४: माझा वाढदिवस (महिना लिहित नाही, नाहीतर तुम्ही सगळे गिफ्ट घेऊन हजर व्हाल.)
२: लग्नाची तारीख (**************ditto************************)
२ : मोठया मुलाचा वाढदिवस  (समजून घ्या. आता परत नाही ते वाक्य )
११: १+१=२: छोट्या मुलाचा वाढदिवस
४: बायकोचा वाढदिवस
४: लहान भावाचा वाढदिवस
२४: लहान भावाच्या बायकोचा वाढदिवस
१३: १+३: ४: सख्या चुलत भावाचा वाढदिवस
२४: सख्ख्या चुलत बहिणीचा वाढदिवस
२२: २+२=४: बिझिनेस पार्टनर चा वाढदिवस
२८/०८/२००२=२+८+८+२+२=२२:२+२=४: बिझिनेस ची मुहूर्तमेढ
४ मजला: पहिलं घर
flat no १३: १+३=४ राहतं घर
९८२२४५४२०४=final आकडा ४: माझा मोबाईल नंबर

बास! थांबतो. खूपच बोर झाले असाल. तुम्हाला वाटेल आता काय खानदान काढतो काय हा बाबा. पण कसल्या आणल्यात ना ओढून ताणून २ आणि ४ आयुष्यात. मी त्या ट्रेन मधल्या अमनला मनोमन नमस्कार केला. पण तुम्हाला ह्या २ आणि ४ नंबरचा अजून एक सॉलिड योगायोग सांगतो. मला २ मुलं. बायको १, पण २-४ जणी ना भारी पडेल. आणि सगळ्यात मी स्वत: एकटा पण सभ्य भाषेत, twin personality चा अन खाष्ट भाषेत दुतोंड्या. परत २.

आता एवढा फिगर चा अभ्यास झाल्यानंतर रतन खत्री ची लाईन पकडायचा मला अनावर मोह होतो. आणि मग उदयाला ओपन ला आणि क्लोज ला कुठली फिगर, २ कि ४, लावायची याचा विचार करत झोपी जातो. numerology आणि माझा तेव्हढाच काय तो संबंध.

तरी नशीब हे numerology वाले भानामती वैगेरे करत नाहीत, नाहीतर कुठलीच, २ आणि ४ काय,  शिल्पा शेट्टीची पण फिगर आठवणार नाही अशी करणी केली असती……………

आता २ नंबर शी इतका संबंध आलाच आहे तर दोन नंबर चे धंदे करावेत का?  

Saturday, 22 March 2014

आवाहान केजरीवालांच्या अरविंदांना

माझे बाबा (लता बाईंचा लेख चालू झाला असं वाटतंय ना!) MSEB मधे होते. त्यांचे एक चीफ़ इंजीनियर साहेब होते, देशपांडे. अतिशय कर्तव्यदक्ष. सचोटी ची तर मिसाल होती. घरच्या कामासाठी कार वापरली तर treasury मधे पैसे जमा करत असं सांगायचे बाबा. खरं खोटं देव जाणे बुवा!

तर एकदा रास्ता पेठला संप झाला होता काही मागण्यांवरून. यूनियन चे लोकं भले दंगा घालत होते. कुणी साहेब आला की १/२ किमी आधी त्याला अडवायचे, गाडीतून उतरावयचे, आणि सांगायचं "चालत जा" साहेब लोकं पण मुकाटपणे चालू लागायचे. कुणी सांगितली झंझट.

देशपांडे आले त्यांच्या ambassador मधून. शिरस्त्याप्रमाणे गाडी लोकांनी गाडी अडवली. सांगितलं "साहेब, उतरून पायी जावं लागेल" ते म्हणाले "का"?

लोकं: आदेश आहे
दे: कुणाचा?
लोकं: लीडरचा (भाऊला हात वैगेरे)
दे: लीडर तुमचा, मी का ऐकू? आणि शासनानं मला शासकीय कामासाठी वापरायला दिलेली ही गाडी आहे. त्या योगे मी आॅफीसच्या पोर्च पर्यंत जाणं अपेक्षित आहे, तेव्हा मी उतरेल तर तिथंच. तुम्ही बघा काय करायचं ते!
लोकं: साहेब, बाकीचे लोकं गेलेच की चालत
दे: बाकीच्यांनी शेण खाल्लं, मग...........
लोकं: जावं तर तुम्हाला चालंतंच लागेल
दे: फायनल का तुमचं

जमावाकडून होकार आल्यावर देशपांडे ड्रायव्हर ला म्हणाले "विष्णु, कमीशनर आॅफीसला गाडी घे"

साहेबांनी कमिशनरांना परिस्थिती सांगितली आणि सांगितलं की मी सच्च्या दिलाने काम करणारा माणूस आहे पण या पोस्टच्या प्रतिष्ठेला बाधा येईल असं कुणी वागणार असेल तर ते चालणार नाही. कमिशनर देशपांडेंची सचोटीची ख्याती ऐकून होतेच, त्यांना माहिती होतं नाणं खणखणीत आहे. त्यांनी रास्ता पेठेत १४४ क़लम लावला. कुमक पाठवली आणि देशपांडेंना सांगितलं "जा सर तुम्ही, बिनधोक" दोघांनीही एकमेकांना सलाम ठोकला, कडक.

देशपांडे साहेब कारनीच आॅफीसच्या दरवाजापर्यंत गेले आणि बॅग घेऊन जिना चढू लागले. पायी आलेले इतर साहेब लोकं त्यांना नमस्कार करू लागले आणि त्यांनी पण प्रतिसाद दिला, जणू काही घडलंच नाही अशा थाटात.
********************************************************************************

स्थळ: श्रुति मंगल कार्यालय. लग्नाचा कार्यक्रम. लग्नाला हज़र होते, शिवसेनेतुन काॅंग्रेसमधे गेलेले माजी मुख्यमंत्री. लग्न सोहळा संपला. मी गॅलरीत उभा. बघितलं तर साहेब ११८ NE तुन गेले, सगळ्यांचा निरोप घेत. आणि त्यांची दोन्ही मुले मर्सिडीज़ मधून निघाले सगळ्यांना टाटा करत, निरागसपणे. (लहान मुलं निरागसच असतात़, मी ती माझ्यासारख्याची किंवा नेत्यांची. गोची वय वाढल्यावर होते)

*********************************************************************************
तेव्हा अरविंद केजरीवाल साहेब,

एका राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आपल्याला काही सोयी शासनानी दिल्या होत्या त्या आपला आदर राखायचा म्हणून
नाही तर पदाचा. आपण त्या अव्हेरल्या. पदावरून पायउतार पण झालात. (असेल ही काही तांत्रिक वा तात्विक कारण,
कुणास ठाव) आता लोकसभेला शड्डू ठोकून उभे आहात, तुमच्याकडे आम्ही एक सशक्त पर्याय म्हणून बघत आहोत. कुचकामी शासक आणि छुप्या अजेंड्याचे विरोधक यात आम्ही पिचलो गेलो आहोत. आणि भावलं आम्हाला तुमच्यतलं सच्चेपण,अगदी देशपांडेंसारखंच. पण हे सच्चेपण अधोरेखित करण्यासाठी तुम्हाला ह्या शासकीय सोयी नाकारण्याची काहीच गरज नव्हती. शेवटी राज्याचा शकट हाकणं ही काही तोंडची गोष्ट नाही हे कळतं आम्हाला. आतासुद्धा तुम्ही ही रिक्शानी प्रवास करण्याची, लोकलनी लोंबकळण्याची भंकस नका करू. तीसुद्धा आम्हाला राणे आम्हाला येडे बनवून गेले, तशीच वाटते आम्हा सामान्यांच्या डोळ्यावर केलेली धूळफेक.  (लिहीण्याच्या भरात नाव लिहून गेलो का नेत्याचं, काही हरकत नाही).

आपण IIT यन आहात, सुज्ञ आहात, तेव्हा जास्त सांगणे न लगे. बाकी आमच्याकडे एक वाक्य प्रचलित आहे "क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे". जमतय का बघा तेव्हढं .

तुम्ही आम्हाला वारे दिलेत, ते आमचं मत वार्यावर न जाऊ द्यायचं बघा बुवा!

- राजेश


Thursday, 20 March 2014

आबा आणि नातू

माझ्या वडिलांचे निधन २००९ साली झाले. नील चा जन्म २००४ चा. पण ५ वर्षात दोघांची चांगलीच गट्टी जमली होती. बाबा गेल्यानंतर पुढच्या ६ महिन्यात नीलचे काही विचार पहा ५-६ वर्षाचाच होता तो. ती निरागसता हलवून टाकते, अगदी आतून. 


बाबा गेल्यानंतर साधारण ३/४ महिन्यांनी आई सोसायटीत खाली गप्पा मारत बसली होती. तिच्याबरोबर कवूर काकू आणि शिंदे काकू बसल्या होत्या. दुर्दैवाने कवूर काका २००४ साली तर शिंदे काका फार पूर्वी expire झाले होते. माझा धाकटा मुलगा नील, त्यावेळेस ५ वर्षाचा होता, खाली त्यांच्याच आजू बाजूला खेळत होता. खेळता खेळता तो अचानक आजी जवळ आला आणि म्हणाला "पण हे असं का होतं, देव सगळ्या आबांनाच देवाघरी का घेऊन जातो"
********************************************************************************
माझे लग्न ९१ साली झाले. त्यावेळेस video cassette असायची. मला अचानक सापडली. मी तिला DVD मध्ये convert करून घेतली. मी, वैभवी, यश आणि नील माझ्या laptop वर तो कार्यक्रम बघत होतो. २०१० साली. आणि बाबा आले स्क्रीन वर. नील अचानक उठला आणि "आजी आजी" करत तिला ओढत घेऊन आला, म्हणाला "बघ, आबा बघ, आता खुश, आता रडू नकोस"
********************************************************************************
एकदा रात्री बेडरूमच्या खिडकीशी उभे राहून नील समोरच्या बिल्डींग कडे बघत होता. मी विचारले "काय रे काय बघतोस" म्हणाला "मी समोरच्या मोबाईल tower वर चढणार" म्हंटलं "का" म्हणाला "तिथून आकाश किती जवळ आहे" "मग?" "मग काय, मला आबांना भेटता येईल ना" मी निशब्द

********************************************************************************
मी चेन्नई ला चाललो होतो. नील नी विचारलं "पप्पा, विमानानी जाणार" मी म्हणालो "हो" नील परत "विमान खूप उंच ढगातून जाते का" मी bag भरत त्याच्याकडे लक्ष न देता "हो" थोडा वेळ गेला. माझं लक्ष गेलं तेव्हा नील शून्यात नजर लाऊन बसला होता. मी विचारले "विचार कसला करतो आहेस" माझ्या जवळ आला आणि म्हणाला "तुम्ही एक काम करा. विमान उंच ढगात गेलं कि खिडकी उघडा, बाहेर जा, आबांना घ्या आणि विमानात बसवा आणि त्यांना घेऊन या."!!!!
********************************************************************************


शरद पाटील च्या पोस्ट नि आठवणी जाग्या झाल्या आणि मनभर पसरून राहिल्या.

Wednesday, 19 March 2014

काय बोलणार

आज प्रात:समयी उठणे झाले. मुखासमार्जन करून फेसबुक प्रेरित दुचाकी सवारी साठी बाहेर पडलो. दुचाकी वर मांड ठोकून स्वारी मोठया तडफेने खडकवासला धरणाच्या दिशेने निघाली. का कोण जाणे आज दुचाकी जरा फुदकतच चालली होती, जणू दुडका घोडाच. मजल दरमजल करत मी सिंहगड हमरस्त्यावर आलो. आणि ताशाच्या आणि ढोलच्या मंजुळ आवाजांनी माझ्या कानांच्या पडद्यांना गुदगुल्या होऊ लागल्या. तेवढयात माझ्या नजरेला ते विहंगम दृश्य दिसले. एक low waste jeans, चट्ट्या पट्ट्याचा t शर्ट, पायात पांढऱ्या रंगाचे sports shoes, आणि spikes केलेली केशरचना केलेला मावळा हातात मशाल घेऊन धावत येताना दिसला. नजरेचे पारणे फिटले. भरीस भर म्हणून काय त्याने डोळ्यावर काळा गॉगल घातला होता. अजून खरं तर उजाडायचे होते पण पालित्याचा प्रकाश बहुधा त्याच्या डोळ्यांना त्रासदायक होत असावा.

त्या मावळ्याच्या मागे स्वयंचलित दुचाकी स्वार होते. दुचाकीचे आवाजशमन यंत्र काढून टाकले होते. त्यामुळे एकाच दुचाकीतून शेकडो घोडे फुरफुरल्याचा (खिंकाळण्याचा) स्फूर्तीदायक आवाज येत होता. ते बघून मला फारच चेव चढला आणि मी जोमाने धरणाकडे कूच करता झालो.

मार्गक्रमण करता करता हे दृश्य थोडया फार फरकाने पुन्हा पुन्हा दिसू लागले. मी पण फुरफुरतच होतो. असाच नव्या दमाचा गडी असल्यागत जात असता समोरच्या स्वयंचलित चारचाकीच्या (याला छोटा हत्ती असेही म्हणतात) टपावरील मावळ्याने आवाज टाकला "ओ चड्डीवाले काका, सायकल चालवा, इकडं तिकडं काय बघताय" बाकीचे मावळे फुसफुसले. मी आपलं ऐकून न ऐकल्यासारखं केलं (मी फारच sensitive माणूस आहे हो! पुढं काय होईल हे मी sense करतो) आणि थोडया कमी चेवाने दुचाकीची मांड फिरवत निघालो.

काही अंतर पुढं गेल्यानंतर माझे कान सावध च होते, कानावर आलेले न ऐकण्यासाठी. तरी आलाच आवाज "ए नरसाळ्या, हाण कि जोरात सायकल" परत फुसफुसणे. यावेळेस कान पुन्हा बंद पण नजर गेलीच भावडयावर (भा  व  डया, नीट वाचा. नाहीतर म्हणाल तिथं गप्प बसलो आणि इथे शिवी देऊन शहाणपणा ………………… गाळलेली जागा आपापल्या कुवती प्रमाणे) तर हसायलाच आले. उघडया मैदानावर भावड्या झोपला असता ना तर बरगड्या बघून आकाशातल गिधाड आलं असतं. मनोमन विलक्षण………. छे संतापून काय करता, म्हणून हसतच पुढे गेलो.

पुढचा प्रवास फारच निरस झाला. म्हणजे कंपू येत होते पण दुर्दैवाने कानावर काही पडलं नाही. माझी मग धरणाला वळसा घालून परतीच्या प्रवासाची दौड चालू झाली. (येताना दुचाकी हातात घेऊन पळत निघालो असं काही चित्र डोळ्यासमोर आलं का?).

वेगवेगळे मावळे चित्र विचित्र वेशभूषेचे, अर्वाच्य भाषेचे यांना कानात शिसे ओतत आणि डोळ्यावर पट्टी बांधत मागे टाकत होतो. पण पुढे जाताना छाती गर्वानी २ इंच (दोनच फक्त, तेव्हढीच होते) फुगली होती. गर्व से कहो हम………… अरे बघता काय सामील व्हा आणि मनात दाटून आला अभिमान मराठी असण्याचा.

(एका महापुरुषाची दोनवेळा  जयंती साजरी करण्याची एकमेवद्वि तिय घटना या पृथ्वीतलावर फक्त महाराष्ट्रात होत असेल याचा मला सार्थ अभिमान आहे )