Wednesday, 2 September 2026

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आमचा टर्न ओव्हर फार काही जास्त नव्हता. लोक पण फार नव्हते. सेल्स मध्ये तर माझ्या बरोबर फक्त दोन जण होते. त्यातल्या एकाने एका कस्टमर कडून खूप मोठी ऑर्डर आणली. म्हणजे आमच्या वार्षिक उलढालीच्या २०% ऑर्डर व्हॅल्यू होती. आम्ही कस्टमर कडून ५०% ऍडव्हान्स रक्कम, ४०% ऑर्डर सप्लाय अगोदर, उरलेले १०% कमिशन झाल्यावर अशी पेमेंट ची डिमांड केली. निगोशिएट करताना त्याने १०% ऍडव्हान्स, ८०% डिलिव्हरी झाल्यावर लगेच आणि १०% कमिशन झाल्यावर अशी पेमेंट टर्म दिली. मी नाही म्हणत होतो, पण आमच्या सेल्स इंजिनीअर ने मला आश्वस्त केलं की फॉलो अप करून पेमेंट आणेल. मी ही मोठ्या ऑर्डर व्हॅल्यू च्या मोहात पडून ती टर्म स्वीकारली. आणि मग व्हायचं तेच झालं, आम्ही स्पिंडल सप्लाय केले आणि ८०% पेमेंट द्यायचं काही कस्टमर नाव घेईना. मी हवालदिल झालो, कारण खूप मोठं वर्किंग कॅपिटल अडकलं होतं आणि आमच्या सारख्या छोट्या व्यवसायाला ते झेपणारं नव्हतं. ज्याने ऑर्डर घेतली त्या सेल्स इंजिनियरला सुद्धा खूप गिल्टी वाटत होतं. एके दिवशी तो म्हणाला की मी जातो कास्टमरकडे आणि जरा कडक भाषेत पेमेंट मागतो. 

मी त्याला म्हणालो "जा तू, पण जास्त वाद घालू नको. आपला मोठा कस्टमर आहे. त्याला दुखवायला नको. भविष्यात तो ऑर्डर देणार नाही. आणि मुख्य म्हणजे आपण सुसंस्कृत लोक आहोत. तेव्हा वादात न पडता आपण प्रश्न सोडवायचा प्रयत्न करू यात"

हे सगळं ऐकल्यावर माझा बिझिनेस पार्टनर जो इतके दिवस आमचं नाटक बघत होता आणि सप्लायर चे पेमेंट काढायची जबाबदारी त्याच्यावर होती तो उसळून मला म्हणाला "अरे, हे पेमेंट आपल्याला एका आठवड्यात मिळालं नाही तर व्यवसायाला खूप मोठा प्रॉब्लेम तयार होईल. त्या त्या सेल्स इंजिनियर ला कुठं वादात न पडायला सांगतोस. पेमेंट दिलं नाही तर सप्लायर चा पेमेंट साठी आपल्यामागे इतका तगादा लागेल की ते ऐकून कान बहिरे होतील. ऍग्री केल्याप्रमाणे कस्टमर पेमेंट देत नाही आहे, तू काय आपल्या सुसंस्कृत पणाचे गोडवे गातो आहेस."

मग त्या सेल्स इंजिनियर कडे वळत पार्टनर म्हणाला "तू जा रे कस्टमर कडे. आणि चांगली कडक भाषा वापर. त्याने दाद दिली नाही ना तर ऐकव त्याला की आठवड्यात पेमेंट नाही दिलं तर केस ठोकीन म्हणा. त्याने तुला उलटं बोललं तर मग मी बघतो काय करायचं ते. लेजिटीमेट पैशांची डिमांड करतोय, काही भीक नाही मागत आहे."

पार्टनर चं काय डोकं फिरलं माहीत नाही, तोच गेला सेल्स इंजिनियर बरोबर त्या कस्टमर कडे आणि तिथं दंगा करून पेमेंट घेऊनच आला. 

त्या दिवशी मला कळलं की नाही त्या ठिकाणी गुळमुळीत पणा काही उपयोगाचा नाही आणि मुख्य म्हणजे जे योग्य आहे तिथं आपल्या सहकार्याच्या मागे उभं राहून त्याला पूर्ण पाठिंबा देणं हे लीडर चं काम असतं. नंतरच्या आयुष्यात मला याचा फार फायदा झाला. 

Monday, 17 August 2026

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका कस्टमरचा फोन आला होता. तो फोन झाल्यावर अनाहूत पणे माझ्या तोंडून शब्द पडले "कसला बिनडोक माणूस आहे" आणि पुढं दोन चार शिव्या. माझ्या बाजूला पार्टनर बसला होता. त्याने मला, काय झालं असं विचारलं. तर स्टोरी अशी होती. 

एका सुपर इंजि नावाच्या कस्टमरला आम्ही एक स्पिंडल विकला होता. ज्या मशीन वर तो स्पिंडल लावला होता तो एका सुरत च्या कस्टमर कडे चालू होता. त्याच्या ऑपरेशन मध्ये काही तरी इश्यू होता. त्याबद्दल त्याने मला एक दोन वेळा फोन ही केला होता. पण प्रॉब्लेम काय आहे हे तो व्यवस्थित सांगू शकत नव्हता. त्या दिवशी फोन आला होता तेव्हाही प्रॉब्लेम काय आहे हे तो सांगू शकला नाही. फक्त स्पिंडल बरोबर चालू नाही हीच कॅसेट लावली होती. 

हे सांगून मी पार्टनर ला म्हणालो की "स्पिंडल मध्ये प्रॉब्लेम काय आहे हे तो व्यवस्थित सांगू शकत नाही. टेक्निकली ढ गोळ्या आहे तो कस्टमर. कसा काय लोक धंदा करतात काय माहित?" माझ्या टोन मध्ये त्या कस्टमर प्रति तुच्छतेचा भाव होता. 

पार्टनर सुद्धा माझ्या म्हणण्याला दुजोरा देईल या आशेने मी त्याच्याकडे पाहिलं. तर त्याने मला विचारलं की कस्टमर ने कुठं वापरला आहे स्पिंडल. मी सांगितलं की त्याने एक व्ही एम सी बनवली आहे. पार्टनर ने अंदाजे त्या मशीन ची किंमत विचारली. मी सांगितलं, तीस एक लाख रुपये असेल. 

पार्टनर मला म्हणाला "तू एक लक्षत घे. तुझ्या कस्टमर ने तीस लाख रुपयांची मशीन, की ज्यात साधारण पणे दोन एक हजार पार्टस असतील बनवून त्याच्या कस्टमर ला विकली आहे. बरं मशीन बनवताना इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, न्यूमॅटिक, हायड्रोलिक्स या इंजिनियरिंग च्या सर्व शाखांचं नॉलेज त्याला असणं गरजेचं आहे. ते सर्व पार्ट जोडून त्याने मशीन बनवली आणि सप्लाय पण केली आहे. तू सोळा फक्त मेकॅनिकल पार्टस असणारी एक स्पिंडल नावाची साधारण पणे एक लाख रुपये किमतीची सब असेम्बली बनवतोस. आणि ती वेळेत बनवताना तुझ्या xx तुन धूर निघतो. तू काय गप्पा मारतोस, की कस्टमरला टेक्निकली कळत नाही ते". 

पुढं जाऊन तो म्हणाला "बऱ्याचदा आपण आपला जो व्यवहार होतो त्यावरून समोरच्या बद्दल काही मत बनवतो. पण त्या पलीकडे जाऊन त्यांचे काही स्ट्रॉंग पॉईंट्स असतात ज्यामुळे ते खूप मोठं काम करत असतात. हे ध्यानात ठेवून तुझा त्यांच्याशी पूरक व्यवहार ठेवत जा. नाहीतर लोकांना मूर्ख म्हणून हिनवण्याच्या नादात तू कधी मार्केट मधून बाहेर पडशील हे तुला कळणार पण नाही."

पार्टनर चं म्हणणं कायम लक्षात ठेवलं आहे मी. 😊

Saturday, 15 August 2026

आपलं आयुष्य असं निवांत चालू असताना काही लोक आणि त्यांचं काम समोर येतं आणि आपण स्तिमित होऊन जातो. काल छत्रपती संभाजीनगर मध्ये काहीसं असंच घडलं. 

मंजिरी मुळे माझी नितीन घोरपडे यांच्याशी काही महिन्यांपूर्वी प्रत्यक्ष ओळख झाली होती. जगभरातील आयर्न मॅन पूर्ण करणाऱ्या या अवलियाचा इतिहास फारच खतरनाक आहे. व्यसनाधीनता ते आयर्न मॅन चे असंख्य 'किताब हा प्रवासच फुल फिल्मी आहे. 

आणि अशात या फिजिकल फिटनेस च्या वेडाला जोड मिळाली ती समाजसेवेची. अल्कोहॉलिक ऍनानिमस च्या कामाला वाहून घेताना आपला व्यवसाय त्यांनी विशीतल्या मुलाच्या खांद्यावर सोपवला आणि स्वतःला समाजसेवेत झोकून दिलं. 

क्रांती चौंकाजवळ कॉर्पोरेशन कडून जागा भाड्याने घेऊन नितीन सर अल्कोहॉलिक ऍनानिमस चं काम करत होते. या सेंटर च्या बाजूलाच एक कॉर्पोरेशनचं सार्वजनिक शौचालय होतं. "अस्वच्छता" या शब्दाला किळस यावी इतकं ते घाणेरड्या अवस्थेत होतं. प्रचंड दुर्गंधी पसरवणाऱ्या तिथे कचऱ्याचा ढीग होता. शुद्धीत असणारी कुठलीही व्यक्ती तिथे जाणं शक्य नसल्यामुळे तिथं सर्व अवैध धंदे चालायचे. 

ती सगळी भीषण परिस्थिती बाजूच्या वास्तूत दररोज येणाऱ्या नितीन सरांच्या नजरेत (खरंतर नाकात) येत होती. एकेदिवशी काय भनक आली पण नितीन सर सरळ कॉर्पोरेशन च्या ऑफिस मध्ये गेले आणि त्यांनी ती पण जागा भाड्याने मागितली. पूर्ण एक वर्ष पाठपुरावा करून शेवटी कॉर्पोरेशन बरोबर भाडेकरार झाला. 

आणि मग सुरू झाला एका अत्यंत दरिद्री अवस्थेत असलेल्या जागेचा ट्रान्सफॉर्मेशन प्रवास. खर्च प्रचंड होताच. पण त्यावर डोकं धरून न बसता जितके पैसे होते त्याने काम चालू केलं. तब्बल १२ ट्रक घाण त्या पाच सहाशे स्क्वे फूट जागेतून काढला गेला. (त्या कचऱ्याचं वर्णन नितीन सरांनी केलं ते आठवून आता लिहिताना पण कसं तरीच वाटतंय). 

चांगल्या कामासाठी कुणी तरी धावून येतं या युनिव्हर्सल नियमाला धरून इथं पण एक पुण्यातील बिझिनेसमन ने नितीन सरांचा प्लॅन समजावून घेतला आणि जितकं बजेट होतं त्यापेक्षा थोडे जास्त पैसे पाठवले. 

आठ महिने सतत काम केल्यावर ज्या जागेत जाणं सुद्धा दुरापास्त होतं, जी जागा व्यसनाधीन लोकांचा अड्डा होती तिथं आता मुलींसाठी सुबक, वातानुकूलित अभ्यासिका तयार झाली आहे. वरच्या मजल्यावर मेडिटेशन रूम बनवली गेली आहे आणि टेरेस वर नितीन सरांनी छोटेखानी ऑफिस आणि लायब्ररी बनवली आहे. 

काही महिन्यांपूर्वी अस्वच्छतेचं आगर असलेल्या त्या जागेत आज चाळीस मुली विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात, संध्याकाळी मेडिटेशन चा वर्ग भरतो आणि रविवारी सकाळी दहा ते बारा मुलांनी तिथेच बसून पुस्तकं वाचावी अशी व्यवस्था केली गेली आहे. 

मी तासभर तिथं होतं. नितीन सर हा सगळा प्रवास सांगताना माझ्या डोक्यात हे सगळं कसं शक्य आहे हेच चालू होतं आणि मनोमन मी त्यांना सलाम करत होतो. 

Saturday, 1 August 2026

काल राजेशचा माझ्या बद्दलचा, त्यातही माझ्या तब्येतीचा लेख वाचला. त्याच्या लिखाणाबद्दल मला नेहमीच त्याचं कौतुकही वाटतं आणि आनंदही होतो. त्याला अनेकजण आणि मी सुद्धा श्रावणबाळ म्हणतात त्यात काही चूक नाही. तो ज्या पद्धतीने माझी काळजी घेतो त्याबद्दल समाधान आणि अभिमान पण वाटतो. माझी सूनही डॉक्टर असल्यामुळे, मला काही झालं की तत्परतेने तपासण्या करत असते. नातू नील तर आजीच्या सेवेत तत्पर असतो. दुसरा मुलगा उन्मेष आणि सून अर्चना, हे सुद्धा मला काही झालं की आवर्जून फोन करतात, चौकशी करतात आणि गरज पडली तर येऊन काळजी घेतात. घरातल्या अशा वातावरणामुळे माझी तब्येत चांगली राहते. मुलांचे बाबा जाऊन आता सतरा वर्षे झालीत तरी मी आनंदात असते. अर्थात वयोपरत्वे कधी तब्येत खराब झाली तर थोडी चिडचिड होते. 

माझे वय सध्या ८२ चालू आहे. आतापर्यंत कधीही तब्येतीची तक्रार नव्हती. पण हल्ली सर्दी, खोकल्यामुळे बेचैन होते. लवंग, मध, वाफ घेणे या घरगुती उपायांचा काही उपयोग होत नाही. तसं झालं की माझी इच्छा नसताना राजेश मला दवाखान्यात स्पेशालिस्ट डॉक्टर कडे नेतो. तिथे मग सी टी स्कॅन वगैरे मनात धडकी भरवणार्या मशीन मध्ये तपासणी होते. तिथं एक विचित्र मानसिक दडपण असतं ज्यामुळे घाबरायला होतं. मग नको तो दवाखाना अशी भावना मनात बळावते. ज्या आजारांशी मी घरातच सामना केला त्यासाठी ते हॉस्पिटल, ती मशिन्स, इंजेक्शन्स आणि मुख्य म्हणजे त्याला लागणारे भरमसाठ पैसे हे नको वाटतं. 

या सगळ्या मागे अजून एक गोष्ट. राजेश चे वडील एम एस इ बी त होते. तिथे पेन्शन नव्हती. त्यामुळे त्यांच्यानंतर जी शिल्लक आहे त्यावरच माझी सगळी भिस्त आहे. मुलं खर्चाला नाही म्हणत नाहीत, पण मलाच असं वाटत राहतं की आपल्या तब्येतीचा भार त्यांच्यावर पडायला नको. त्याच भावनेतून ते औषधांवर पैसे खर्च करणं जीवावर येतं. 

घरात दोन मुलाकडे मिळून पाच गाड्या आहेत भल्यामोठ्या. राजेश सांगतो तो हिशोब मी ऐकून घेते खरं, पण आयुष्यभर पी एम टी अन रिक्षा च्या मीटर कडे बघत प्रवास केलेल्या मला आयुष्याच्या उत्तरार्धात पोरांच्या गाडीमध्ये राणी सारखं इकडे तिकडे फिरायचं समाधान वेगळंच असतं हे कुणाला काय कळणार? मला नाही वाटत या माझ्या विचारधारेत काही चूक आहे. तुम्हाला वाटतं का माझं काही चुकतंय म्हणून? 

Friday, 31 July 2026

आमच्या मातोश्री पैसे खर्च करण्याबाबतीत तशा सढळ हाताच्या. नातू, आम्ही मुलं, सुना वगैरेंना वाढदिवशी किंवा नातवांना  परीक्षेत चांगले मार्क पडले, कुठल्या वास्तुशांती वेळी सटासट पाकीट वाटते. जवळच्या नातेवाईकांना कधी गरज पडली की पैसे काढून देते. 

पण असं असलं तरी एका बाबतीत तिला पैसे खर्च झालेले अजिबात आवडत नाही. ते म्हणजे सिटी मध्ये कुठे जायचं असेल तर तिला रिक्षा किंवा कॅब वर पैसे खर्च करणं अजिबात आवडत नाही. ते वाचवण्यासाठी ती कुठलाही आटापिटा करू शकते. म्हणजे आमच्या घरापासून (फातिमानगर) तिला रावेत ला जायचं असेल तर ती मला म्हणते की ड्रायव्हर आधी तुला सोडेल सिंहगड रोड ला आणि मग मला रावेत ला सोडून येईल. मी तिला सांगतो की माझ्या बरोबर कंपनीत येई पर्यंत तू घरून रावेतला पोहोचशील. मी तुला कॅब करून देतो. (त्याचे पैसे पण मीच भरणार असतो खरंतर). पण तिचा तोच हट्ट असतो. कॅब नको, तुला सोडल्यावर ड्रायव्हर मला सोडून येईल. मी तिला हे पण सांगतो की कंपनीतून रावेतला सोडून यायला कारचं जितक्या रुपयाचं पेट्रोल लागतं, तितकेच पैसे कॅब साठी आपल्या घरापासून रावेत साठी लागतात. पण तिला हे गणित काही केल्या कळत नाही. समहाऊ तिच्या डोक्यात ते सिटीबस चे दहा आणि पंधरा रुपयांचे तिकीट फिक्स आहेत. त्यावर ती सिटी अंतर्गत पैसे खर्च करायला नाहीच म्हणते. मी पण आता या विषयावर डोकेफोड करणं बंद केलं आहे. 

इतके दिवस मला वाटत होतं की हा प्रकार फक्त सिटी अंतर्गत प्रवासासाठी आहे. पण नुकताच मला अजून एका गोष्टीवर पैसे खर्च करणे तिच्या जीवावर येतं हे जाणवलं. ते म्हणजे औषधं. सुदैवाने माझ्या आईची तब्येत ठणठणीत असते. फक्त आता वयोपरत्वे छोटी मोठी आजारपणं उद्भवतात. सगळ्यात आधी तर तिला डॉक्टरकडे यायचंच नसतं. "मला म्हातारीला काय धाड भरली आहे?" हे पालुपद सारखं चालू असतं. आता काही कारणासाठी तिला अक्षरश: भांडण करून डॉक्टर कडे नेलं आणि त्याने ज्या काही भरमसाठ टेस्ट सांगितल्या, त्या प्रत्येक टेस्ट करताना "या डॉक्टर ला काही कळतच नाही. इतक्या कुठं टेस्ट असतात का साध्या आजारासाठी?" हे वाक्य प्रत्येक अर्ध्या तासाने ती म्हणत होती. तब्येतीला काही झालं याच्या कम्प्लिट डिनायल मोड मध्ये. सर्व टेस्ट आणि तपासण्या झाल्यावर आणि त्यातही त्याचे चार्जेस कळल्यावर, जे मी सांगणं टाळत होतो, तिने मला ठणकावून सांगितलं. "यापुढे काहीही झालं तरी  ते आपल्या फॅमिली डॉक्टर कडे घेऊन जायचं." परवा त्या स्पेशालिस्ट डॉक्टर कडे फॉलो अप साठी गेलो होतो आणि त्याने दोन महिन्याने परत बोलावलं तर त्यालाच ऐकवलं "टेस्ट सांगणार नसाल तर येते" नशीब त्या स्पेशालिस्ट डॉक्टर च्या औषधांनी तिला थोडा आराम पडला नाहीतर माझं तिने परत कधीच ऐकलं नसतं. त्याबद्दल डॉक्टर चे आभारच मानायला हवेत. 

इथे खुर्चीत बसल्या बसल्या हात वर केला आणि छातीत थोडी कळ आली की घाबरणाऱ्या माझ्यासारख्याची आई तब्येतीच्या बाबतीत इतकी डेअर डेव्हील कशी काय हे एक मला कोडंच पडलं आहे.

Saturday, 25 July 2026

१९९७-९८ ची गोष्ट आहे. मी पवई साकी नाका रोड वर एक कंपनीच्या ऑफिस मध्ये गेलो होतो. ज्यांना भेटायचं ते मीटिंग मध्ये होते म्हणून रिसेप्शन ला बसलो होतो. तितक्यात तिथली एक मुलगी, बहुधा रिसेप्शनिस्ट, तणतणत ऑफिस मधून बाहेर आली.  समोरून एक दुसरी मुलगी आली आणि तिने रिसेप्शनिस्ट ला नजरेनेच विचारलं की काय झालं. तर रिसेप्शनिस्ट ने मधलं बोट दाखवून सांगितलं की वाट लागली. तर समोरून आलेली मुलगी म्हणाली "आता परत काही काम सांगितलं ना त्या भाड्याने तर बांबू सर त्याच्यात". 

पहिल्यांदा ऐकायला विचित्र वाटलं तरी मला बॉस ने काय काम सांगितलं, त्याचा स्वभाव कसा आहे हे काहीच माहीत नव्हतं. त्यामुळे जजमेंटल न होता मी आपलं मासिक वाचत बसलो. अर्थात मी पण तेव्हा तिशीत होतो आणि त्या मुलीही समवयीन होत्या. त्यानंतर जेव्हा मी विचार केला तेव्हा हे ही लक्षात आलं की तरुणाईची जडणघडण तुमच्या भावतालावर अवलंबून असते. एक काळ होता, पॉलिटेक्निक पासून ते अगदी एस के एफ सोडेपर्यंत वाक्य सुरुवात करताना किंवा संपवताना शिवी यायचीच. आजूबाजूचा माहोलच तसा होता की आपण काही वावगं बोलतो आहे असं वाटायचं नाही. मग हळूहळू भवताल बदलत गेला, घरात मूल जन्माला आलं आणि भाषा बदलत गेली. आता शिवी द्यायची म्हंटलं तरी तोंडातून शब्द फुटत नाही. 

हे आठवण्याचं कारण म्हणजे आताच्या आंदोलनातील जेन झी ची भाषा.लोक असं बोलत होते जणू ही तरुणाई कुठल्यातरी दुसऱ्या ग्रहावरून आली होती. अरे, ही आपलीच पोरं होती. ते ज्या भवतालात मोठी झाली तो एक समाज म्हणून आपणच बनवला आहे. तुम्हीच त्यांना घडवलं आहे. ही तीच तरुणाई आहे ज्यांचा जन्म इंटरनेट च्या काळात झाला आहे. सोशल मीडियावर बोलली जाणारी भाषा, ओ टी टी वर सरसकट ऐकल्या जाणाऱ्या शिव्या हे स्वीकारलं गेलं आहे. आताच ज्या पिक्चरची भरमसाठ स्तुती झाली त्या धुरंधर चे डायलॉग्ज सहकुटुंब सहपरिवार आपण ऐकले आणि त्यावर टाळ्या पण पिटल्या. माझ्या पिढीने जे सामाजिक वातावरण तयार केलं तिथेच आजच्या तरुणाईची भाषा पण रुजली, इतर वेळेस आपण स्वीकारली. जेव्हा आता ज्या सरकारची भलामण करतो त्याच्या विरुद्ध वापरली गेली तेव्हा मात्र आपल्याला टोचली.  

हे झालं भाषेचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या तरुणाईचा जन्म झाला आणि गेल्या बारा वर्षातील निवडणुकीत ते फर्स्ट टाइम व्होटर झाले होते. बी जे पी ला भरभरून मतं दिली होती. तेव्हा त्यांचं वागणं गोड वाटलं होतं. २०१४ च्या विजयानंतर अनेक आघाडीवर भ्रम निरस झाला तेव्हा प्रतिवाद होता की साठ वर्षाची घाण आहे, थोडा वेळ तर लागणारच. असं म्हणता म्हणता बारा वर्षे झाली. एका तपा नंतर सुद्धा जेव्हा लक्षात आलं की समाजाचं क्वालिटी ऑफ लाईफ हे सुधारणे तर दूरच पण खालावत चाललं आहे, लॉ अँड ऑर्डर चा बट्ट्याबोळ झालेला दिसतोय, रस्ते/पाणी/स्वच्छता/वीज/शिक्षण यात सुधारणा करण्याऐवजी इतकी ब्रूट मेजोरीटी असूनही अजूनही सरकार चालवणारा पक्ष धार्मिक ध्रुवीकरण आणि मंदिर यातच मश्गुल आहे. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे त्यात सुधारणा होण्याचे दूरवर चिन्ह दिसत नाही आहे. ज्या भ्रष्टचाराचा मुद्दा घेऊन सत्ता कमावली तो तर तसाच आहे, बारा वर्षांपूर्वी सोन्याची चेन घालून नेत्यांचे पोस्टर दिसायचे ते तर आजही दिसत आहेत, गावातल्या ट्राफिक ची कंडिशन अजून भीषण झाली आहे. 

हे मान्य आहे की या सरकारच्या ध्येय धोरणांमुळे आणि बदलत्या भू राजकीय परिस्थितीमुळे अनेक व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत पण त्या संधीचं सोनं करण्यासाठीची मानसिकता, इको सिस्टम, सोशल फॅब्रिक नसेल तर जितक्या वेगाने या संधी आल्या त्याच्या दुप्पट वेगाने त्या नाहीशा होण्याची शक्यता आहे. 

नशीब हे की तरुणाई आज निर्नायकी होती, असंघटित होती. स्ट्रक्चर्ड अप्रोच असला असता तर काय झालं असता याचा विचार करावा. 

Sunday, 19 July 2026

मागच्याच महिन्यात अमेरिकेत स्पेस एक्स चा आय पी ओ आला आणि एलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंत तर होताच पण त्याबरोबर तो पहिला ट्रिलियनेअर झाला. त्याच वेळेस भारतात अगदी त्या तोडीची नाही पण तितक्याच महत्वाची एक गोष्ट घडत होती. 

आय आय टी खरगपूर आणि आय आय टी मद्रास मधून ड्युअल डिग्री घेऊन बाहेर पडलेले आणि नंतर इस्रो मध्ये आपली उमेदीची सहा एक वर्ष शास्त्रज्ञ म्हणून काम केलेल्या पवनकुमार चंदना आणि नागभारत डोका यांनी स्कायरूट एरोस्पेस या अभिनव उद्योगाची हैद्राबाद मध्ये २०१८ साली स्थापना केली. अवकाश ही काही विशिष्ट लोकांची मक्तेदारी न राहता आम जनतेला त्यातून मिळणारे फायदे मिळावेत या उद्देशाने या दोन अत्यंत ध्येयवेड्या अभियंत्यांनी काम चालू केलं. भारतीय अवकाश कार्यक्रमाचे दोन अर्ध्वयु विक्रम साराभाई आणि ए पी जे अब्दुल कलाम यांच्या सारख्या दिग्गजांची लिगसी ला पुढे नेत त्यांनी धाडसी स्पेस प्रॉडक्ट्स आपल्या अभिनव कल्पनेतून त्यांनी साकार केले. 

१८ जुलै २०२६ ला त्यांनी "मिशन आगमन" या प्रोजेक्टद्वारे विक्रम १ नावाचं रॉकेट श्रीहरिकोटा या स्पेस सेंटर वरून अवकाशात झेपावलं. स्पेस कार्यक्रम हे अनेक देशांमध्ये आजही सरकारी माध्यमातून राबवले जातात. त्यात असणारे अवाढव्य खर्च आणि गोपनीयता यामुळे ते साहजिकच आहे. पण सरकारी संस्था बरोबर खाजगिकरणातून असे प्रोजेक्ट यशस्वी करता येतात हे अमेरिका आणि चीन पाठोपाठ भारताने दाखवून दिले आहे. 

स्कायरुट ही एक अजब सक्सेस स्टोरी आहे. १००० लोक काम करणाऱ्या या कंपनीत सरासरी वय फक्त २८ आहे. या लोकांनी तांत्रिकदृष्ट्या अतिशय प्रगत आणि अवघड प्रोजेक्ट यशस्वी करून दाखवले यात चंदना आणि डोका यांची नेतृत्व गुणांची प्रचिती येते. आधीच्या अनेक चांद्रयान आणि मंगल यान प्रोजेक्ट प्रमाणे इथेही कमी प्रोजेक्ट कॉस्ट आणि विक्रमी वेळेत हा प्रकल्प स्कायरुटने पूर्ण केला. रु १००० कोटी फंडिंग मिळवणाऱ्या स्कायरुट चं व्हॅल्यूएशन रु दहा हजार कोटीपर्यंत पोहचले आहे. हे दोन संस्थापक आणि स्कायरुट सर्व तरुण एम्प्लॉईज हे अभिनंदनास पात्र आहेत. 

याबद्दल वाचताना इन्स्पेस या भारतीय शासन प्रणित स्वायत्त संस्थेबाबत पण कळलं. भारतीय खाजगी उद्योगांना एरोस्पेस क्षेत्राची दरवाजे उघडे करून देण्यासाठी या नोडल एजन्सीची स्थापना झाली. हे ही वाचून आनंद झाला की त्याचे अध्यक्ष मा पवनकुमार गोएंका आहेत. भारताची वाहन क्षेत्रातील अग्रणी कंपनी महिंद्रा चा कायापालट करण्यात गोएंका साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली इन्स्पेस संस्था नवनवीन आयाम प्रस्थापित करेल यात शंका नाही.

भारतात अनेक सन राईज उद्योग उदयाला येत आहेत. एरोस्पेस हे येणाऱ्या काळात अग्रणी असणार आहे, हे आता सिद्ध झाले आहे. 

(संदर्भ: न्यूजपेपर्स, स्कायरुट यांची वेबसाईट, फाउंडर्स चे लिंक्ड इन प्रोफाईल्स) 


Friday, 26 June 2026

मंडलिक आडनाव सर्वच जातीत असल्यामुळे दोन चार गंमती झाल्या आहेत. त्यातलीच एक. 

काही वर्षांपूर्वी मला एक जण अप्रोच झाले की उद्योजकतेवर ऑन लाईन बोलायचं होतं. त्यांचा फेसबुकवर ग्रुप होता, असेलही अजून. आणि तो जातीवरून ग्रुप बनवला होता. उद्योजकतेवर बोलायचं होतं, त्यामुळे मी नकार द्यायचा काही प्रश्नच नव्हता. तर आयोजकांनी मला सांगितलं की मला त्या ग्रुपचा मेंबर बनावं लागेल. मी त्यांना म्हणालो की मी कुठल्याच ग्रुप चा मेंबर नाही आहे. ते म्हणाले, मेंबर तर व्हावं लागेल. मी त्यांना खरं कारण सांगितलं की तुमचा ग्रुप एका विशिष्ट जातीच्या लोकांसाठी बनला आहे आणि माझी जात ती नाही आहे. तर ग्रुप चा मेंबर झालेलं चालेल का तुम्हाला? तर फोन वर एकदम शांतता पसरली. मग ते म्हणाले की ऑनलाइन सेशन होईपर्यंत मेंबर रहा आणि नंतर ग्रुप सोडला तरी चालेल. मी अजून एक प्रश्न विचारला की मी तुमच्या जातीचा नाही आहे, तर तुमच्या ऑडियन्स ला चालेल ना मी बोललेलं. त्यांनी होकार दिल्यावर मग मी ग्रुप चा मेंबर झालो आणि ऑनलाइन सेशन पार पडलं. 

सेशन झाल्यावर मी काही दिवस ग्रुप चा मेंबर होतो. तिथल्या अनेक पोस्ट पाहिल्या. जात निर्मूलन व्हायला पाहिजे अशा इथे डिंग्या मारणारे अनेक जण तिथं मेंबर होते. ज्या पोस्ट्स वरून इतर जातींची ते टिंगल उडवतात त्या धर्तीच्या अनेक पोस्ट मी त्या ग्रुप वर पाहिल्या. त्याला समर्थन देणारी लोक बघून आश्चर्य पण वाटलं. काही दिवसांनी मनोरंजन बोअर झाल्यावर मी तो ग्रुप सोडला. 

माझे एक आडनाव बंधू खास कंपनीत भेटायला आले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. या ना त्या मार्गाने ते शोधत होते की माझी आणि त्यांची जात सेम आहे का ते. शेवटी रिव्हील झालं की ती वेगळी आहे. ते निराश होऊन निरोप घेऊन गेले. नंतर त्यांनी मला फ्रेंड लिस्ट मधून पण उडवलं. 

मध्ये मी माझ्या पुतण्याबद्दल एक पोस्ट टाकली होती. पोस्ट कसली, तो लग्नाचा उमेदवार आहे हे जाहीरच केलं होतं. ते वाचून एका मुलीच्या आईचा मेसेज आला की त्यांची मुलगी लग्नाची आहे आणि आडनावावरून आम्ही त्यांच्या जातीचा आहे असं वाटतंय, म्हणून मेसेज केला. मी त्यांना सांगितलं की आम्ही त्या जातीचे नाही आहोत, पण आंतरजातीय लग्नाची तयारी आहे. अच्छा म्हणून त्या गायब झाल्या. 😊 आता चेक केलं तर त्या पण लिस्ट मध्ये नाही आहेत. 

जात केंद्रस्थानी न ठेवता प्रत्यक्ष जीवनात जगणं सहज शक्य आहे. सोशल मीडियावर मात्र थोडं अवघडच जातं. 

Wednesday, 24 June 2026

कोरियन मुलगी

दक्षिण कोरिया मध्ये आलो आहे. एका कंपनीबरोबर व्यावसायिक चर्चा करण्यासाठी. फोटो मध्ये जिच्याबरोबर आहे ती बिझिनेस ओनर ची मुलगी आहे. तिशीच्या आतच आहे. इतक्या तरुण वयाच्या मुलीची व्यवसायाची, जागतिक, सामाजिक, धार्मिक, तात्विक समज मात्र चकित करणारी आहे. मीटिंग मध्ये आपल्या वडिलांचा उल्लेख करताना ती आवर्जून मिस्टर शीम असा करते. पण हे करताना ती लेकीचं नातं पण अगदी प्रेमळ पणाने निभावत असते. बोलताना जाणवतं की ती अत्यंत प्रामाणिक आहे, तिचा सेन्स ऑफ ह्युमर उच्च दर्जाचा आहे. कोरियन आहे पण तरी तिचं इंग्लिश एकदम भारी आहे. प्रचंड कष्टाळू आहे. मला माझ्या ट्रॅव्हेल प्लॅन चं फार कौतुक असतं पण तिचे ट्रॅव्हेल प्लॅन पाहून मी स्तिमित झालो. जगभर ती सेल्स साठी फिरत असते. मी भेटलो, त्याच्या काही दिवस ती टर्की ला ३ आठवडे राहून आली होती. मला भेटल्यावर रात्री साडे दहाच्या ट्रेन ने एकटी बुसान हुन सोल ला जाणार होती आणि रात्री एक ला पोहचणार होती. कारण दुसऱ्या दिवशी साडे नऊ वाजता तिची कस्टमर बरोबर मीटिंग होती. 

तिने आणि तिच्या कुटुंबाने केलेला पाहुणचार एका वेगळ्याच लेव्हलचा होता. ती पुढच्या आठवड्यात पुण्याला येणार आहे. तिने स्टँडर्ड इतकं वरचं ठेवलं आहे की त्याची बरोबरी करताना माझा कस लागणार आहे. 

त्यांच्या कंपनीबरोबर व्यावसायिक रिलेशन्स जर प्रस्थापित झाले तर हीच मुलगी आमचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असणार आहे आणि मला खात्री आहे की जग पाहिलेल्या या मुलीकडून खूप काही शिकायला मिळणार आहे. 

Thursday, 4 June 2026

 परवाच्या इ व्ही च्या पोस्ट मध्ये अनेक जणांनी मीरा कारचा आणि पर्यायाने पंडितराव कुलकर्णी यांचा उल्लेख केला. अर्थात नेट वर मीरा कार ही शंकर राव कुलकर्णी यांनी बनवली आहे असा उल्लेख आहे. पण मीरा चं चित्र आणि उल्लेख हे आजही फाय च्या वेब साईट वर आहे. म्हणजे पंडितराव आणि शंकरराव कुलकर्णी हे अतिशय जवळचे नातेवाईक असणार आहेत. तर मी आज लिहिणार आहे ते फाय बद्दल. फ्युएल इंस्ट्रुमेंट्स अँड इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड (फाय) बद्दल. अतिशय  प्रोग्रेसिव्ह ग्रुप असला तरी दुर्दैवाने आमचे फार काही बिझिनेस रिलेशन्स फाय ग्रुप बरोबर एस्टॅब्लिश झाले नाही. त्यामुळे मला फक्त दोन-तीन वेळाच त्यांच्याकडे जाता आलं. त्यामुळे मी जे लिहिणार आहे ते मी जे अनुभवलं आणि थोड्या फार ऐकीव माहितीवर. 

फाय ग्रुप जरी १९५३ मध्ये स्थापित झाला तरी तो नावारूपाला आला तो पंडितराव कुलकर्णी यांच्या लीडरशिपखाली. एकुणातच हे कुलकर्णी कुटुंबीय उद्योजकतेचा मापदंड ठरलं आहे. मी जेव्हा फाय ग्रुप मध्ये गेलो तेव्हा पंडितराव हे व्यवसायात  जास्त ऍक्टिव्ह नव्हते. पण ज्यांना मी भेटलो होतो ते पंडितरावांबद्दल बोलताना थकत नव्हते. त्यांचं उच्च दर्जाचं तांत्रिक ज्ञान, इचलकरंजी सारख्या छोट्या गावात त्यांनी वसवलेला अत्यंत प्रागितिक औद्योगिक समूह, त्या एका ग्रुप मधून बाहेर पडून तयार झालेले असंख्य उद्योजक, त्यांनी समाजासाठी केलेले अनेक प्रकल्प, फाय फाउंडेशन अवॉर्ड्स अशा एक ना अनेक चित्तरकथा मी ऐकल्या आणि स्तिमित झालो होतो. 

अत्यंत साध्या वेशात राहणाऱ्या पंडितरावांकडे अनेक परेदशी डेलिगेट्स वेगवेगळे टेक्निकल प्रॉब्लेम्स वर उत्तर शोधण्यासाठी इचलकरंजी त यायचे. तुम्ही समजू शकता की इचलकरंजी फार व्यवस्थित जगाशी कनेक्ट नव्हतं, पण त्या काळात सुद्धा जगभरातून लोक फाय ग्रुप ला व्हिजिट करायचे. 

फाय ग्रुप बद्दल आदर आमच्या मनात अजून एका कारणासाठी आहे. आम्ही ज्या असोसिएशनचे सभासद आहोत ती आय एम टी एम ए, इमटेक्स म्हणून एक औद्योगिक प्रदर्शन भरवते. त्या एक्झिबिशन मध्ये फाय ग्रुप टेक्निकली उत्कृष्ट डिझाईन केलेल्या मशीन ला अवॉर्ड देते. फाय फाउंडेशन चं अवॉर्ड इमटेक्स मध्ये मिळणं हे त्या डिझाईनला मिळालेली सर्वात भारी पोचपावती समजली जाते. भारतीय मशीन टूल बिल्डर्स बद्दल फाय फाउंडेशन चं असणारं ममत्व हे अजून एका वेगळ्या कारणासाठी आहे. इंडियन मशीन टूल बिल्डर्सचे अर्ध्वयू समजले जाणारे साठे साहेबांचे पंडितराव कुलकर्णी यांच्याबरोबर अत्यंत सौहार्दाचे संबन्ध होते. इन फॅक्ट अशी वंदता आहे की साठे साहेबांच्या प्रगती ऑटोमेशन सुरु आणि एस्टॅब्लिश होण्यामागे पंडितरावांचा सक्रिय सहभाग होता. प्रगती ऑटोमेशन ने जगभरात आपल्या उत्कृष्ट गुणवत्तेच्या प्रॉडक्टस चा झेंडा रोवला ती कथा भारतीय औद्योगिक क्षेत्रात अतिशय प्रसिद्ध आहे. 

मायको बॉश मध्ये काम करणाऱ्या माझ्या एका जवळच्या मित्राने पंडितरावांचा किस्सा सांगितला होता. डिझेल पंप मध्ये लागणारा एक क्रिटिकल कॉम्पोनंट होता ज्याचं मशिनिंग करायला २७ सेकंद लागत होते. लाखांमध्ये लागणाऱ्या या प्रॉडक्ट ची प्रॉडक्टिव्हिटी सुधारण्यासाठी इंजिनियर जंग जंग पछाडत होते. फाय ग्रुप त्यांच्याबरोबर कनेक्ट होताच. पंडितरावांकडे तो प्रॉब्लेम घेऊन गेले. काही महिन्यात २७ सेकंद लागणारा कॉम्पोनंट ७ सेकंदात बाहेर पडू लागला. फाय ग्रुप बॉशचा एक महत्वाचा सप्लायर बनला हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. पंडितरावांचं हे जे वरच्या लेव्हलचं तांत्रिक ज्ञान होतं ते इतकं प्रसिद्ध झालं की क्वालिटी बद्दल पराकोटीचं आग्रही असणाऱ्या जापनीज लोकांमध्ये पण त्यांचं नाव झालं. कि हिन नावाच्या प्रसिद्ध कार्ब्युरेटर उत्पादकाने फाय ग्रुप बरोबर सामंजस्य करार करून चाकण इथे प्लांट टाकला. 

आमच्या इमटेक्स च्या शिवाय फाय फाउंडेशन वेगवेगळे अवॉर्ड्स देतं. त्या पुरस्कर्थ्यांची नावं जर बघितली तर त्याचं महत्व आपल्या लक्षात येईल. त्यांच्याबद्दल वाचताना मला हे पण कळलं की ते भारतातील पहिले (आणि कदाचित एकमेव) लोकनियुक्त नगराध्यक्ष होते. 

अर्थात उद्योजकांच्या प्रति जी अनास्था आपण सिद्धांतावर चालणाऱ्या अनेकांबद्दल आपण बघतो ती माझ्या मते पंडितराव कुलकर्णी यांच्या वाटेला पण आली. इचलकरंजी आणि फारतर महाराष्ट्रात त्यांचं नाव आहे पण त्या पलीकडे ते जावं असं काही आपण फारसं काही केलं नाही. नेट वर पण त्यांच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. 

कै पंडितराव कुलकर्णी आणि फाय ग्रुप यांना दिल से सॅल्यूट!


Tuesday, 2 June 2026

तुम्हाला माहिती आहे का की आपल्याकडे एक भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक कार होती. आणि मी ते पुष्पक विमानसारखं कुठली तरी पुराणातील गोष्ट सांगत नाही आहे तर ही गोष्ट आहे २००० च्या आसपासची. सिटी आहे बंगलोर आणि कंपनीचं नाव आहे मैनी. त्यांच्या इलेक्ट्रिक कारचं नाव होतं रेवा. चेतन मैनी नावाच्या तरुण इंजिनियर ने १९९४ च्या आसपास रिसर्च करून ही कार बनवली होती. रेवा बंगलोर च्या रस्त्यावर तर दिसायचीच पण रिपोर्ट सांगतं की जगभरात २६ देशांमध्ये ती निर्यात पण झाली होती. 

जेव्हा जग म्हणत होतं की इलेक्ट्रिक कार हे दिवास्वप्न आहे तेव्हा रेवा शांतपणे आपला मार्गक्रमण करत होती. २००४ च्या आसपास सुरु झालेल्या टेस्ला मुळे अचानक इलेक्ट्रिक कारची जगभरात हवा चालू झाली. इनफॅक्ट रेवा ची दोन वैशिष्ट्ये होती. एक म्हणजे अर्थात ती इलेक्ट्रिक होती आणि दुसरं म्हणजे २००९ साली लॉन्च झालेल्या पण नंतर एक अपयशी ठरलेल्या नॅनो इतकीच तिची साईझ होती. 

आज इ व्ही स्टार्ट अप चा बोलबाला चालू आहे. पण नव्वदीत चालू झालेल्या मैनी च्या रेवा ला महिंद्रा ने २०१० साली अंगीकृत केलं आणि तीच कार इ २ ओ म्हणून ती कार नव्याने लॉन्च केली. आज महिंद्रा इलेक्ट्रिक कार मध्ये धूम करत आहे, पण त्याची सुरुवात इ २ ओ ने झाली आहे असं म्हणायला स्कोप आहे. 

ज्या टेस्ला आणि पर्यायाने इलॉन मस्क चं आज जग गुणगान गात आहे पण त्याने टेस्ला मध्ये शिरकाव करण्याच्या आधी भारतात त्या टेक्नॉलॉजीवर आधारित एक पूर्ण कार भारतीय रस्त्यावर पळत होती. पण आपलं दुर्दैव असं की त्या काळाच्या पुढे असलेल्या टॉक्नॉलॉजीवर ना शासनाने विश्वास ठेवला ना भारतीय समाजाने. आणि कुणास ठाऊक, खुद्द प्रमोटर सुद्धा त्याच्या संशोधनात मागे पडले, कारण पुढे महिंद्रा ने सुद्धा ते ई २ ओ मॉडेल बंद केलं. 

असे प्रॉडक्ट यशस्वी करण्यासाठी जी सर्वांगीण उद्योजकीय वातावरण लागतं तिची आपल्याकडे वानवा आहे. अमेरिका जर आज अत्यंत प्रगत देश झाला आहे त्यामध्ये या उद्योजकीय मानसिकतेचा मोठा सहभाग आहे. 


Tuesday, 26 May 2026

काही वर्षांपूर्वीपर्यंत यशस्वी असण्याची व्याख्या फार सोपी होती. चांगलं शिक्षण घ्यायचं, डिग्री कमवायची, बरा पगार देणारी नोकरी शोधायची आणि आदर्शवादाची कास पकडून आयुष्य जगायचं. पण आता मात्र यशस्वी असण्याच्या शेकडो व्याख्या तयार झाल्या आहेत. 

काही मित्र मॅरेथॉन पाळतात, तर कुणी आयर्न मॅन बनतं, एखादा कुणी हिमालयन ट्रेक चा फोटो टाकतं (एव्हरेस्ट बेस कॅम्प), तर कुणी स्काय डायव्हिंग करतं. एखादा चुलत भाऊ खिद्रेश्वर, हम्पी पासून ते अंगकोर पर्यंत सगळी देवळं पालथी घालतो, तर एखादी बहीण तोफे सारखा कॅमेरा घेऊन वाईल्ड लाईफ फोटोग्राफर बनते. एखादी मैत्रीण वयाच्या पन्नाशीला गिटार शिकते, तर मित्र अचानक बालीच्या समुद्र किनाऱ्यावर योग करताना दिसतो. ओह! गिव मी या ब्रेक. 

सोशल मीडिया उघडावं आणि वाटतं की सगळे कसलं भारी आयुष्य जगत आहेत. मी तर बघूनच डिप्रेस होऊन जातो. 

आणि कळत न कळत मनात विचार येतो, माझं काही चुकत तर नाही ना? मग वाटतं

अगदीच काही नाहीतर गेला बाजार भूतान ट्रिप तरी करू या का?  हिमालय नाही तर के टू एस तरी जमवू का? मॅरेथॉन नाही तर रेसकोर्स ला पाच चक्कर पळू का? लहानपणी तबल्याच्या क्लास लावला होता, तो छंद परत करून बघू का? ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड खूप छान आहे असं ऐकलं आहे. प्लॅन करू का? जग ज्याची दखल घेईल अशी कोणती तरी गोष्ट आपल्या हातून घडेल का? 

यादी वाढत जाते. अन मनात प्रश्न येतो, कुठून घुसलं हे मनात की असं काही केलं तरच भारी आयुष्य जगल्याची भावना तयार होईल?

कधी एखादा मित्र म्हणतो "कुणी सांगितलं सकाळी चार वाजता उठून वाघ बघत फिरायचं?" तर दुसऱ्या मित्राला वाटतं की ताडोबा किंवा रणथंबोर माझं आयुष्य आहे. दोघेही बरोबरच आहेत. 

कदाचित एक शाश्वत सत्य आपण विसरत चाललो आहोत. मानव प्रजात ही एकाच गोष्टीचा आनंद लुटण्यासाठी जन्माला आली नाही आहे. कुणाला काही अचाट करण्याची इच्छा असते, तर कुणाला ध्यानधारणा, कुणाला डोंगरात साद घालत फिरण्याची मनीषा असते तर कुणाला समुद्राची गाज ऐकत शांतते शी हितगुज करायला आवडतं, काहींना परदेश भावतो तर काहींना गावाकडे जाऊन विहिरीत पोहायला.आणि काहींची आनंदाची परमावधी घरात कुटुंबाबरोबर वेळ घालवण्यात असते. 

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शांतपणे आनंदानुभव घेणं हा त्याचं प्रदर्शन मांडण्यापेक्षा जास्त किमती असू शकतो हेच आपण विसरून गेलो आहे. 

मी त्या पिढीचा प्रतिनिधी आहे ज्यांच्या बालपणी आनंदाच्या व्याख्या फार साध्या सरळ सोप्या होत्या. उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे फॉरेन किंवा काश्मीर ट्रिप नसायची तर कुठल्या तरी काका किंवा मामाकडे मुक्काम असायचा, टीव्ही किंवा थिएटर मध्ये जाऊन पिक्चर बघणे म्हणजे आनंदाची परमावधी, बाहेर जाऊन आईस्क्रीम खाणे म्हणजे एक सोहळा असायचा. अशा छोट्या गोष्टींमध्ये उत्सुकता असायची, अप्रूप असायचं कारण त्या दुर्मिळ होत्या. 

आता या गोष्टी होलसेल मध्ये उपलब्ध आहेत. 

कुठेही आणि कधीही फिरायला जाण्यासाठी अगणित पर्याय, अगणित करमणूक, अगणित माहितीचे स्रोत, अगणित अनुभव. 

इथे खरी मेख आहे. कोणत्याही गोष्टीचे अगणित पर्याय हा मानसिक थकवा आणतो. पर्यायांचा भडिमार म्हणजे असंख्य शक्यता. आणि या सगळ्या प्रकारात समाधानाऐवजी उरते ती चिंता, काळजी. 

यात गंमत अशी आहे की एकदा आपण हे सगळं करू शकतं अशी मनात भावना तयार झाली की या सर्व गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी स्वतःला जबाबदार ठरवू लागतो. पण कुठलाही माणूस सगळ्याच गोष्टी करू शकत नाही. 

कुणी जगातले सर्व देश बघू शकत नाही. 
कुणी सर्व कला शिकू शकत नाही. 
कुणी सर्व खेळ शिकू शकत नाही.
कुणी सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ शकत नाही. 
कुणी जगातील सर्व आश्चर्य बघू शकत नाही. 
कुणी आयुष्य परिपूर्ण जगू शकत नाही. 

म्हणून मी बकेट लिस्ट या कल्पनेच्या विरोधात आहे. अँटी बकेट लिस्ट. 

आणि अँटी बकेट लिस्ट म्हणजे निराशावादी नव्हे, आळशीपणा पण नव्हे आणि कमी महत्वाकांक्षी असंही नव्हे. तर ती मुक्ततेची भावना आहे. अँटी बकेट लिस्ट म्हणजे सजगपणे हे ठरवणं आहे की मला समाधानी वाटण्यासाठी काय नाही केलं तर चालेल. 

मला त्या अनुभवांच्या पाठीमागे नाही धावायचं आहे. मला त्या अपेक्षाच ठेवायच्या नाही आहेत. माझं आयुष्य तुलना करण्यापासून मुक्त असणार आहे. 

कदाचित माझी अँटी बकेट लिस्ट मध्ये असेल 

- मला मॅरेथॉन धावणं गरजेचं नाही आहे 
- पन्नास देशांना भेट देणं हे माझ्यासाठी गरजेचं नाही आहे 
- सर्वच छंद मला यायला हवे हा अट्टाहास नाही माझा 
- मी छान जगतो हे मला जगाला ओरडून सांगायचं नाही आहे 
- मला येणाऱ्या प्रत्येक अनुभवाचं रूपांतर हे कन्टेन्ट मध्ये नाही करायचं आहे. 

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण "मला याची गरज नाही आहे" ही भावना "हे मला केलंच पाहिजे" पेक्षा खूप समाधान देणारी आहे. 

या तथाकथित प्रगत आयुष्याची एक शोकांतिका आहे. 

लोक एखाद्या सुंदर ठिकाणी फोटो काढण्यात इतकं मश्गुल होतात की तो अनुभव जगणं विसरून जातात. कुठलं तरी सुंदर निसर्गचित्र आपण मोबाईलच्या स्क्रीनद्वारे बघतो, सूर्यास्त आपला कंटेंट बनतो, कुठे आपण प्रवासाला निघालो तर त्याचा पुरावा होतो, सुट्टीचा आनंद लुटण्याऐवजी आपण त्याचं डॉक्युमेंट बनवतो. आणि या गर्तेत तो खराखुरा अनुभव हरवून जातो. 

कुणास ठाऊक पण आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण  हे कधीही कुठेही अपलोड केले जात नाही, त्याचं प्रदर्शन मांडावं वाटत नाही आणि त्याचं दुसर्याकडून प्रशस्तीपत्र पण लागत नाही. तेक्षण  फक्त जगले जातात, अनुभवले जातात आणि आठवले जातात. 

अँटी बकेट लिस्टचा उद्देश खूप साधा आहे. त्याने आपल्याला आयुष्य आकसून घ्यायचं नाही आहे, पण स्वरचित दबावाला झिडकारून द्यायचं आहे, मिनिंगफ़ुल आयुष्यासाठी जागा करायची आहे, जे म्हणून शक्य आहे ते कारण्याऐवजी जे माझं आहे तेच आयुष्य जगण्याचा चॉईस आहे. 

कारण शेवटी समाधान कदाचित चेक बॉक्स टिक करण्यातून मिळत नसेल पण काही चेक बॉक्स पूर्णपणे दुर्लक्षित करण्यातून मिळेल. 

डॉ प्रसाद राजहंस   


Thursday, 21 May 2026

मागील आठवड्यात गोव्यात आमच्या इंडस्त्रीची कॉन्फरन्स अटेंड केली. काही डेटा पॉईंट्स सांगतो. 

उत्पादन क्षेत्राचं जी डी पी काँट्रिब्युशन हे गेली काही वर्षे १५-१७% टक्क्यांवर अडकलं आहे. मॅनेजमेंट मध्ये ग्लास सिलिंग इफेक्ट असतो. तसं उत्पादन क्षेत्र हे ग्लास सिलिंग ला जाऊन धडकलं आहे. भारताला तो सहभाग २५% पर्यंत न्यायचा आहे. पण काही बेसिक गोष्टी करण्यात अजूनही आपण चाचपडत असल्यामुळे ते १७% चं सिलिंग आपण तोडू शकत नाही आहे. ते तोडण्यासाठी त्रिमितीय जबरदस्त थ्रस्ट ची गरज आहे. 

जागतिक पातळीवर भारताकडे सगळ्यांचं लक्ष आहे. अनेक क्षेत्रातील बाजारपेठ म्हणून आणि जागतिक उत्पादन केंद्र म्हणून जगातले सगळे व्यावसायिक भारताकडे मोठ्या आशेने बघत आहेत. आमच्याच क्षेत्राचा विचार केला तर जगातील सर्व देशात मशीन टूल या मदर इंडस्ट्री मध्ये घसरण चालू आहे. अपवाद फक्त भारताचा. जगात वर्षागणिक -३% अशी घसरण होत असताना भारतात मात्र पुढील दशकभर १०-११% ची वृद्धी अपेक्षित आहे. उत्पादन क्षेत्राची अनेक वर्षे वाहन उद्योगांच्या खांद्यावर होती. पण त्याबरोबरच आता एरोस्पेस, डिफेन्स, रेल्वेज, वूड इंडस्ट्री, इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग अशी अनेक क्षेत्रे उत्पादन क्षेत्र विकसित होण्यात हातभार लावणार आहे. 

या कॉन्फरन्स चं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तरुणांचा लक्षणीय सहभाग. ३००+ सहभागी झालेल्या व्यवसायिकांपैकी ४० एक जण हे २५ ते ३५ वयोगटातील होते. त्यापैकी बरेच जण हे परदेशात शिक्षण घेऊन भारतात व्यवसाय करण्यासाठी परतले होते. (बघता बघता मी ५८ वर्षांचा झालो आणि आतापर्यंत लोक "यंग इन्त्राप्रेन्युअर" उल्लेख करायचे त्या मलाच जाणवतं की आपली सद्दी संपली आहे 😊). फक्त एकच खुपलं की यात मराठी तरुण फार कमी होते. 

मला मराठी तरुणांना हे सांगायचं आहे की सामाजिक संवेदना आणि राजकीय विचारधारा जागृत असणं गरजेचेच आहे, पण त्याबरोबर तुमच्या करिअरला पण तितकंच महत्व द्या. भारतात पुढचं किमान एक दशक हे उत्पादन क्षेत्रात अनेक नवनवीन संधी आणणारं आहे, त्याचा फायदा घ्या. तुम्ही नोकरी करा वा व्यवसाय, उद्योजकीय मानसिकता अंगात बाणवून घ्या. आपल्या भवतालचं सोशल फॅब्रिक उसवण्याचं काम अनेक राजकीय एलिमेंट्स करत राहतील, त्यावर मात करत फक्त आपली भौतिक परिस्थिती सुधारण्याकडे लक्ष द्या. राजकीय पक्ष तुमच्याकडे रेवड्या आणि चिंचोके टाकतील पण त्याचा उपयोग फक्त स्वतःची पोळी भाजण्यासाठी करतील. आपली पत ही त्यापेक्षा जास्त मिळण्याची आहे हे ध्यानात असू द्या. त्यांनी फेकलेल्या ट्रॅप मध्ये न अडकता "कठोर परिश्रमाला पर्याय नाही" या पूर्वसूरींच्या उक्तीचं स्मरण करा. जगाला वेठीला धरणारे राजकीय नेते अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेले नाहीत. त्यांनी तयार केली भू राजकीय परिस्थिती आणि ते हे दोघेही बदलेल. पण त्याच बरोबर आता मिळालेल्या या संधीचा फायदा करून घेतला नाही तर ती पण हुकेल. लक्षात घ्या, अशीच संधी १९९५-९६ च्या सुमारास सर्व्हिस इंडस्ट्री मध्ये आली आणि भारतातील मोठा प्रवर्ग भौतिकतेबाबत सुदैवी ठरला. पण त्या संधीत आणि उत्पादन क्षेत्राच्या संधीत एक मोठा फरक आहे. उत्पादन क्षेत्रातील संपूर्ण इको सिस्टम ची वाढ ही आपल्याच भूमीवर होणार आहे. त्यामुळे होणाऱ्या व्हॅल्यू ऍडिशन चा फायदा हा फक्त आणि फक्त भारतातल्या लोकांना होणार आहे. 

लोहा गरम है, हथौड़ा मार दो!

Tuesday, 19 May 2026

गानू सर आणि मी एकमेकांच्या मित्र यादीत कधी आणि कसे आलो हे लक्षात नाही. पण त्यांची आणि माझी पहिली प्रत्यक्ष भेट चांगलीच आठवते. २०१४ साली गानू सर गोव्यावरून त्यांच्या एका पुण्यातल्या मित्राला घेऊन डायरेक्ट सेटको मध्ये आले होते. मी नव्हतो कंपनीत पण सुदैवाने जवळच गेलो होतो. ते परत येतो म्हणून सांगून गेले आणि त्याप्रमाणे आलेही. 

फेसबुकच्या ओळखीतून भेट हा एक त्या काळी  एक औत्सुक्याचा विषय होता. त्यात गानू सरांच्या आणि माझ्या वयात १५ एक वर्षाचा फरक. बरं, दोघांचं फिल्ड वेगळं. ते अकौंटन्सी ची प्रॅक्टिस करणारे तर मी अभियांत्रिकी क्षेत्रातील. पण केवळ फेसबुकवरील पोस्ट वाचून आणि त्यात लिहिलेले व्यावसायिक सिद्धांत आवडले म्हणून कौतुक करण्यासाठी आवर्जून आलेले गानू सर माझ्यासाठी अप्रूप होते. 

त्या भेटीनंतर असंख्य वेळा भेटी झाल्या. पण आभासी जगात झालेली ही मैत्री प्रत्यक्षात फुलण्यात मोठा सहभाग गानू सरांचा. जेव्हा कधी म्हणून ते पुण्यात आले त्यातील बहुतांश वेळा ते तर भेटलेच पण मी गोव्याला गेलो तेव्हा ही वाट वाकडी करून ते खास भेटण्यासाठी आले. माझं जे काही समाजसेवी संस्थांबरोबर काम आहे त्याचं नुसतं कौतुक न करता त्यात ते ऍक्टिव्ह पणे सहभागी झाले. 

वयाच्या तिशी पर्यंत अगदी पक्के मुंबईकर असलेले गानू त्यानंतर हार्ड कोअर गोयंकर झाले. या सगळ्या प्रवासातील किश्यांचा त्यांच्या कडे खजिना आहे. आमचे फळणीकर सर आणि वैराळकर अण्णा यांच्या सारखं अगदी. या तिघांची गप्पांची मैफल जुळवून आणायची आहे. वाचनाची प्रचंड आवड असलेला हा माणूस हजारो पुस्तकं संग्रही बाळगून आहे. त्याबरोबरच जुन्या जाणत्या शास्त्रीय संगीताच्या गायक गायिकांबरोबरच नव्या युगाच्या लोकांचं गाणं आवडलं तर त्यांचं ते मनसोक्त कौतुक करतात. आणि तिसरी आवड ड्रायव्हिंग ची आणि पर्यायाने प्रवासाची.  आता वयोपरत्वे बाहेर गावचं वाहन चालवणं कमी केलं तरी पाच एक वर्षांपूर्वी ते कार ने गोवा ते पुणे मुंबई करणाऱ्या गानू सरांनी जगभर भटकंती केली आहे. 

ते भाजप चे खंदे समर्थक च नव्हे तर आघाडीचे कार्यकर्ते सुद्धा. त्यांचा काही मित्रवर्ग कधी विरोधी राजकीय सूर लावतात (यात बऱ्याचदा मी पण असतो)  तेव्हा ते खेद व्यक्त करतात पण राजकीय मतांतरे असली तरी सौम्य विरोधापलीकडे ते फार व्यक्त होत नाहीत. 

या माध्यमातून माझी अनेक जणांशी प्रत्यक्ष अनेक जणांशी चांगली मैत्री झाली त्यापैकी गानू सर एक. मागच्या आठवड्यात एका कॉन्फरन्स च्या निमित्ताने गोव्याला जाणं झालं मग गानू सरांना भेटणं हे स्वाभाविक होतं, त्या प्रमाणे भेटलो सुद्धा. त्यांच्याशी बोलताना ते मुंबई सोडून गोव्याला का आले याबद्दल मला जे समज आहे त्याला पुष्टी देणारं उत्तर यावं म्हणून खोदून विचारलं. पण त्यांनी त्याला शिताफीने टाळलं. पण गोव्यात आज जी बीजेपी ची सत्ता आहे तो येण्यामागे गानू सरांसारख्या पडद्यामागचा कलाकारांचा मोठा हात आहे असं मी मानतो. 

गानू सरांना त्यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐💐


Friday, 13 March 2026

 काही वर्षांपूर्वी मी एक व्हिडीओ बघितला होता. ख्रिश्चन लग्नामध्ये मुलीचे वडील, फादर समोर मुलगा-मुलगी एकमेकांना स्वीकारण्याआधी,  एक छोटं भाषण देतात. मला त्या वडिलांची कमाल वाटली. कारण त्या भाषणात विनोद होता, भावना होत्या, अभिमान होता, प्रेम होतं. आणि हे सगळं म्हणताना वडील एकदम कुल होते. त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीवरून मला ते ब्रिट वाटले. त्यांचं भाषण मराठीत लिहिण्याचा मोह आवरत नाही आहे. 

वडील म्हणतात 

"फिलिप, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. सगळ्या चांगल्या गोष्टी एका विशिष्ट पद्धतीने चालू होतात तशी ही पण चालू होते."

"काही वर्षांपूर्वी एक माणूस असतो जो चांगला बाप ही असतो आणि एव्हाना तुला हे कळलंच असेल की तो बाप म्हणजे मीच आहे. तर त्याला एक मस्त मुलगा असतो आणि कुटुंब एकंदरीत आनंदात असतं. एकेदिवशी मला कळतं की माझी बायको पुन्हा एकदा प्रेग्नन्ट झाली आहे आणि लवकरच एक बाळ आमच्या घरात येणार आहे. मग मी देवाकडे प्रार्थना केली. त्याला म्हणालो "देवा, खरंतर सगळं तुझ्यामुळे घडतं. पण येणारं बाळ जर मुलगी असेल तर माझ्यावर कृपा होईल." देवाने माझी प्रार्थना ऐकली. त्या छोट्या परीला मीच माझ्या कुशीत घेतल्यावर मला अपार आनंद झाला."

"मी त्या एंजल कडे बघत अजून एक प्रार्थना केली की "देवा, तिला तिच्या आईसारखं बनव" देवाने माझी ती ही प्रार्थना ऐकली. माझी मुलगी तिच्या आईप्रमाणे अतिशय लाघवी, प्रेमळ, सर्वांची काळजी घेणारी अशी मोठी होत होती. पण मग माझ्या लक्षात आलं की या मायलेकी माझ्याकडे लक्षच देत नव्हतं. मग मी देवाकडे प्रार्थना केली की "देवा, तिच्यात माझा थोडा तरी अंश उतरू दे." आणि गंमत म्हणजे देवाने माझी ती पण प्रार्थना ऐकली. तुला सांगतो ती ट्रक पण चालवते आणि ट्रॅक्टर सुद्धा. ती गवताचा भारा उचलून ट्रॉली मध्ये सहजपणे लोड करते आणि मनात आलं तर तंबाखू पण चघळू शकते. तुला लक्षात येत आहे की कुठला झंझावात तू गळयात अडकवून घेतो आहेस ते." 

"हे सगळं होत असताना तिचं एक स्वतःचं भावनाशील व्यक्तिमत्व घडत होतं, तिची भवतालाबद्दल मतं तयार होत होती, आणि तिची बुद्धी विकसित होत होती. मग देवाकडे पुन्हा प्रार्थना केली "आता पुरे. तू खूप तिच्यावर उपकार केले आहेस. आता अजून एक प्रार्थना. तिला तुझ्यासारखं बनव." आणि काय सांगू तुला,  त्याने ते ही ऐकलं. त्याने तिला लोकांची सेवा करण्यासाठी प्रवृत्त केलं. ती रुग्णांची सेवा करणारी परिचारिका बनली. ती हे काम अत्यंत प्रेमाने करते. तिने अनेकांना आपल्या सेवाभावी वृत्तीने यमाच्या दारातून अक्षरश: खेचून परत आणलं आहे. आणि अनेकांनी तिचा हात आपल्या हातात धरून शांतपणे या पृथ्वीवरून एक्झिट पण घेतली आहे. तिने या कामात स्वतःला झोकून दिलं आहे. ते करण्यासाठी तिने अनेक दिव्य कामं केली आहेत. त्यासाठी जगभर फिरली आहे, डोंगर चढून गेली आहे, रौद्र स्वरूप असलेल्या नदीच्या पात्रात छोट्या बोटीने तिने प्रवास केला आहे आणि युद्धभूमीवर आजूबाजूने बुलेट्स जात असताना जमिनीवर झोपून आपलं रुग्णसेवेचं कर्तव्य बजावलं आहे. तिच्या या वागण्यातून जगात अजून एक सुप्रीम शक्ती आहे याची जाणीव होते."

"हे सगळं छान असलं तरी काहीतरी मिसिंग आहे असं मला वाटत आहे. मी देवाकडे पुन्हा, आणि कदाचित शेवटची प्रार्थना केली "माझ्या मुलीवर सुखाचा वर्षाव कर" मग तू तिच्या आयुष्यात आलास. तुला भेटल्यावर तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो दिसतो. त्याबद्दल मी विधात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आज मी माझ्या जवळ असणारी सगळ्यात मौल्यवान गोष्ट तुझ्या हातात सोपवत आहे. पण ते करण्याआधी मला तुला सांगायचं आहे की विधाता आणि मी, आम्ही दोघांनी ती आजच्या दिवसासाठी अशी सुंदर बनावी म्हणून अथक प्रयत्न केले आहेत."

"फिलिप, आज माझ्या कन्येचा हात तुझ्या हातात सोपवताना, तुझी हरकत नसेल तर एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे.  मी आणि विधाता असे दोघेही तिच्या पाठीशी आहोत.  तेव्हा तिच्याशी अजिबात पंगा घेऊ नकोस."



Monday, 16 February 2026

सिंगापूर-मुंबई विमान उड्डाणासाठी तयार झालं. रन वे कडे निघालं आणि घोषणा झाली "फर्स्ट ऑफिसर महंमद नजीर इज वेलकमिंग यु ऑन एस क्यू ४२२". 

झालं, माझं टाळकं सटकलं. मी ज्या विमानात प्रवास करतो आहे, त्याचा पायलट मुस्लिम? शक्यच नाही मला आता प्रवास करणं. मी बेल दाबून एअर होस्टेस ला बोलावलं आणि तिरमिरीत तिला सांगितलं की "पायलट मुस्लिम असल्यामुळे मी या विमानातून प्रवास नाही करू शकणार. विमान परत घेऊन मला विमानतळावर सोडा." माझी कीव करत एअर होस्टेस म्हणाली "सर, विमान ऑल रेडी रन वे वर खूप पुढे आलं आहे. असं नाही करता येणार." मी म्हणालो "मला काही ऐकायचं नाही आहे, मला आताच्या आता सोडा" हे बोलताना माझा आवाज चढला होता. ते ऐकून आजूबाजूचे लोक कुतूहलाने माझ्याकडे पाहत होते. त्यात काही जणांच्या चेहऱ्यावर "कसलं येडा माणूस आहे" असा माझ्याप्रति भाव होता. तर काही जणांच्या चेहऱ्यावर माझ्या बद्दल कौतुक दिसलं. ज्यांच्या चेहऱ्यावर कौतुक दिसलं त्यांना मी म्हणालो की मला तुम्ही सपोर्ट करा. तसं म्हंटल्यावर त्यांनी डोळे मिटून झोपण्याचा अभिनय केला. 

विमान उडालं. सकाळचीच वेळ होती. खिडकीतून बघितलं तर खाली समुद्र दिसत होता. दोन मिनिटं विचार केला की पाणीच आहे खाली, उडी मारण्याचा पण धाडसी विचार माझ्या मनात आला. मग त्यातील फोलपणा लक्षात आल्यावर हातावर हात ठेवून बसलो. दोन्ही हात माझेच आहेत त्याची काळजी घेतली. 

शेजारचा पॅसेंजर जो माझ्याकडे अपार कौतुकाने पाहत होता म्हणाला "तुमची स्टाईल आवडली. पण तुम्हाला म्हणून सांगतो. मुस्लिम नको हा प्रकार जिथे शक्य आहे तिथे वापरायचा फक्त. उदाहरणार्थ, उबर किंवा ओला कॅब ड्रायव्हर किंवा एखादं हॉटेल, झालंच तर न्हावी. ज्या वेळेस जिथे चॉईस नाही, तिथं शहाणपणा करायचा नाही." मला हा डाव आवडला. 

मुंबई एअरपोर्टवर माझा ड्रायव्हर रवी आलाच होता. आम्ही पुण्याकडे निघालो. नशीब इतकं बेकार की एक्स्प्रेस हायवे ला तुफान ट्रॅफिक. फुल जॅम. अमृतांजन पॉईंटच्या दोन एक किमी अलीकडे आमची गाडी गचके मारत थांबली. मी रविवर डाफरलो. तो म्हणाला गाडी पूर्ण चेक करून आणली होती. नशीब रस्त्याच्या डाव्या बाजूलाच गाडी होती. तिथल्या बॅरिकेड वर एक मोबाइल नंबर होता. कार रिपेअर म्हणून. रवीला म्हणालो, डायल कर आणि बोलाव त्याला. पाचच मिनिटात समोरच्या बाजूने स्कुटर वर आला. त्याचं नाव विचारलं तर अस्लम. पण विमानातल्या पॅसेंजरचं म्हणणं आठवलं. जिथं चॉईस नाही तिथं शहाणपणा चोदवायचा नाही. दहा मिनिटात त्याला दोनशे रुपये दिले कार दुरुस्तीचे आणि सुखरूप घरी पोहोचलो. 

Monday, 26 January 2026

आरंभ

काही वर्षांपूर्वी मला माझ्या एका मित्राने प्रश्न विचारला होता "हे तू आपलं घर ला सुट्टीच्या दिवशी किंवा कधी रात्री पर्यंत थांबतोस. काय मिळतं तुला यातून?" म्हणजे त्याच्या लेखी या सगळ्या लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचा प्रकार होता. मी त्याला म्हणालो "तिथे किंवा त्यासारख्या संस्थेत गेलं की आपल्या अनेक भावना टोन डाऊन होतात." म्हणजे सांगायचं झालं तर आपल्या व्यावसायिक आयुष्यात एखादा मोठा प्रॉब्लेम आला तर तो सोडवता जाऊ शकतो याबद्दल आश्वस्त वाटतं, स्वतःबद्दल काही भ्रामक कल्पना तयार झाल्या असतील तर त्या दूर होतात, सहवेदनेचा खरा खुरा अर्थ कळतो, माणुसकी वरचा विश्वास दृढ होतो आणि याउपर या लोकांच्या हाताला हात लावून मम म्हणत जी काही कामं होतात त्याद्वारे आपल्या अकौंट मध्ये पण थोडं फार पुण्य जमा होतं हा स्वार्थी विचार पण मनात येतो. 

आज अंबिका टाकळकरच्या आरंभ संस्थेच्या नवीन वास्तूला भेट देताना अगदी हेच घडलं. २०१२ च्या सुमारास काहीतरी माझ्या डोक्यात खूळ आलं आणि पाच सहा समाजसेवी संस्थेसोबत माझा संवाद चालू झाला त्यापैकी आरंभ एक. या सर्वांशी माझी ओळख झाली तेव्हा असं काही अफाट काम समाजात चालू आहे हे पचवून घ्यायला बराच काळ गेला. आरंभ मध्ये मी जेव्हा पहिल्यांदा गेलो होतो, कदाचित २०१५-१६ मध्ये तेव्हा ऑटिझम च्या मुलामुलींसाठी अंबिका ने उभं केलेलं काम बघून मी स्तिमित झालो होतो. ती वास्तू, मुलंमुली, त्यांना झालेली व्याधी आणि आपल्या अथक प्रयत्नाने ऑटिझम ला पराभूत करू या निर्धाराला वाहून घेतलेली अंबिका आणि तिची टीम हे सगळं पाहून नतमस्तक झालो होतो. 

मग या ना त्या कारणाने अंबिका बरोबर बोलत गेलो. मी पहिल्यांदा जिथे गेलो होतो, तिथून तिने संभाजीनगर च्या पोद्दार शाळेच्या शेजारी संसार हलवला आणि आता तिने वाळुंज पासून पैठण बाजूला ३.५ किमी आत आरंभ साठी जी नवीन संस्था बांधली ती म्हणजे तिने संस्थेसाठी पाहिलेल्या स्वप्नांचा, स्वमग्न आणि गतिमंद मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जे जे म्हणून उत्तम, उदात्त करता येईल त्या प्रयत्नांचा विलोभनीय आविष्कार आहे. 

मी अंबिका ला म्हणालो सुद्धा की रस्त्यावरून मला पहिल्यांदा आरंभ ची बिल्डिंग दूरवरून दिसली, तेव्हा पहिली भावना ही आली की तिने घेतलेल्या झेपेने कमालीचा आश्चर्यचकित झालो. आणि ज्या कल्पकतेने तिने आणि आर्किटेक्ट राजेश चौधरी यांनी ती देखणी वास्तू उभी केली आहे तिला तोड नाही. अर्थात हा प्रवास सोपा नव्हताच. निसर्गनिर्मित, मानवनिर्मित आणि करायचं तर उत्तमच या तिनेच स्वतःला दिलेल्या आव्हानामुळे तयार झालेल्या प्रश्नांना अंबिकाने मोठ्या निर्धाराने उत्तरं शोधली.  उदात्त, उन्नत याच्या बरोबरीने पारदर्शक कामाला कुठून तरी आर्थिक आणि मानसिक पाठबळ मिळतंच याची प्रचिती पुन्हा एकदा अंबिकाची गाथा ऐकल्यावर आली. पुढच्या महिन्यापासून आरंभ चा प्रवास या नवीन वास्तुतून नवीन उमेदीने पुढे चालू राहणार आहे. 

ममता ताई, फळणीकर सर, अशोक, गिरीश कुलकर्णी सर आणि अंबिका सारखे लोक खऱ्या अर्थाने तारे जमीन पर आहेत. ही सगळी लोक आपल्याला ओळखतात, आपुलकीने संवाद साधतात ही खूप सुखावह भावना आहे. 

अंबिका, बाळासाहेबआणि त्यांच्या टीमचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा. तुम्हा सगळ्यासाठी पियुष मिश्रा चे शब्द उसने घेऊन म्हणतो

"आरंभ है प्रचंड"


Thursday, 1 January 2026

 नवीन वर्षाची सुरुवात करताना परत एका गोष्टीचा पुनरुच्चार करावासा वाटतो की भारतीय उत्पादन क्षेत्र हे अतिशय सकारात्मक संक्रमणातून जात आहे. किंबहुना जागतिकीकरणाचा भाग झाल्यावर पहिल्यांदाच जगाच्या पाठीवर वेगवगेळ्या क्षेत्रात अनेक घडामोडी एकाच वेळेस घडताना दिसत आहेत. कोविड १९ झालं, रशिया युक्रेन युद्ध झालं, यूरोप मध्ये सीरिया, जॉर्डन, अफगाणिस्तान, लेबनान सारख्या देशातून असंख्य लोक आश्रित म्हणून आले, चीनची एकूणच शक्ती प्रचंड वाढली, तैवान ला त्याने खुले आव्हान दिले तर युरोप मध्ये अनेक देशात चीनने प्रचंड गुंतवणूक केली, अशी परिस्थिती तयार झाली की जग ग्लोबलायझेशन कडून लोकलायझेशन कडे वळत आहे अशी चिन्ह दिसू लागली, जगात क्रमांक एकवर असलेल्या महासत्ता असलेल्या देशाच्या लीडरशिप ने अनाकलनीय निर्णय घेतले ज्यामुळे जगाची दिशा भरकटल्यासारखी वाटली. भारतात सुद्धा बऱ्या वाईट गोष्टी घडल्या, ज्यावर मागे लिहिलं होतं. त्याबद्दल परत लिहीत नाही, कारण मूळ विषय सोडून वेगळ्याच गोष्टींवर चर्चा सुरु होते. 

आज भारताचे उत्पादनक्षेत्र जीडीपी मध्ये १५% सहभाग नोंदवतं. येणाऱ्या दशकामध्ये हे गुणोत्तर प्रमाण २५% नेण्याची योजना आहे. त्यादृष्टीने अनेक योजना कार्यान्वित केल्या गेल्या आहेत. 

हे जरी खरं असलं तरी जगात तयार झालेल्या अनिश्चिततेमुळे (मॅनेजमेंट जार्गन मध्ये याला VUCA जग असे संबोधतात. Volatile, Uncertain, Complex, Ambiguous), दोन गोष्टींचा व्यावसायिकाने विचार करावा असं वाटतं. एक तर जगात काय घडतं त्यापासून आपण इम्यून आहोत या गैरसमजातून बाहेर पडावं. दोन दशकांपुर्वी हे बऱ्याच अंशी खरं असेल, पण आता नाही. आणि दुसरं म्हणजे जगात हे जे काही चालू आहे त्या बदलांचा स्वीकार करणे आणि मुख्य म्हणजे त्या बदललेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी स्वतःमध्ये बदल आणण्यात चपळता दाखवणे. आपलं भविष्य सुरक्षित करण्याची शक्यता या मुळे तयार होईल. खात्री नाहीच. 

आपल्या उत्पादनाची आणि सेवेची गुणवत्ता यात सातत्याने सुधार आणणे हा आपला मंत्र असायला हवा. भारताची उत्पादकता आणि गुणवत्ता याबद्दल जगात फारसं चांगलं बोललं जात नाही. अर्थात शैक्षणिक, सामाजिक आणि  राजकीय भवताल हा सर्वोत्कृष्ट गुणवत्ता आणि उत्पादकता या मानसिकतेला दुर्दैवाने पूरक नाही आहे. पण आजूबाजूच्या इको सिस्टम कडे दुर्लक्ष करत व्यवसायाने अंतर्गत पद्धती या इतक्या सशक्त बनवायला हव्यात की बाह्य मूलभूत अवगुणांचा जगाला विसर पडायला हवा. अवघडच आहे ते, पण घडायला हवं. 

एक प्रश्न व्यावसायिकाने सातत्याने विचारायला हवा तो म्हणजे "जगात सर्वोत्तम असं जेव्हा बोललं जातं, तेव्हा माझ्या व्यवसायाचं नाव घेतलं जातं का?" त्याचं उत्तर देताना मुक्त पणे "हो" येत नसेल तर बाह्या सरसावून सर्वोत्तम बनण्यासाठी काम करणे क्रमप्राप्त आहे. 

२०२६ मध्ये पाऊल टाकताना, पुढील दशकात व्यवसायाची भरभराट कशी होईल, याच्या पायाभरणीवर लघु आणि माध्यम उद्योगांनी जोर देण्यात शहाणपण आहे.  

तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 

Saturday, 27 December 2025

Namaste,

I know that at a CEF Meet, I am expected to speak in English.
But today, I will take the liberty of using Marathi sentences whenever the moment demands it—because some emotions refuse to be translated.

Let me take you back to April 1994

Ajay and I were both working at SKF, on the second shift. It was a Wednesday. Ajay was in assembly; I was in grinding. Like every other day, we went together for dinner. That evening, something felt different.

For the first time, Ajay asked me if I could help serve his food. He said he was feeling unusually weak. I still remember him saying that he had swum heavily that morning and thought that might be the reason.

I happily served him dinner.

I waited to say goodbye to him at the end of the shift—but later I learned that he had left early. At the time, it seemed normal. In hindsight, it was anything but.

Thursday was a holiday.
On Friday morning, when I reached the plant, I heard something that stopped me cold—Ajay had been admitted to Jahangir Hospital with a serious illness. None of us knew what it was. We only knew one thing: it was serious.

After finishing my first shift, I rushed to the hospital.

Ajay was lying on the bed.

He is one of the very few people who calls me “Raja.”
Before I could ask a single question, he looked at me and said—

"अरे, राजा ये. माझ्या हातातील आणि पायातील पूर्ण शक्ती गेली आहे. पण काळजी करू नको दोन अवयव माझे अजूनही शाबूत आहेत ज्याचा मी प्रत्येक मिनिटाला वापर करतो, म्हणजे माझं तोंड आणि मेंदू"

—and he laughed.

We both did.
Him—effortlessly.
Me—forcefully.

Because beside him sat Meenal, his wife, silently holding her worry.

The diagnosis was Guillain-Barré Syndrome—rare, almost unheard of in those days, with frighteningly low survival rates. None of us fully grasped the medical complexity, but we all understood one thing: this was a fight for life.

As we were speaking softly, a nurse walked in and said—

"चला, तुम्हाला शॉक द्यायचे आहेत."

Ajay kept smiling.

Slightly irritated, the nurse asked—

"तुला शॉक ऐकून टेन्शन येत नाही का?"

And Ajay replied—

"सकाळपासून ३५००० चे चार इंजेक्शन देऊन तुम्ही मला इतके मोठे शॉक दिले आहेत की ४१५ व्हॉल्ट्स च्या शॉकचं काही टेन्शन येत नाही."

That was Ajay—
humour intact, spirit unbroken.

Against all odds, Ajay defeated GBS. I still remember Dr. Divte saying that while medicines mattered, it was Ajay’s positive attitude that made the real difference.

And from that moment on, his life gathered momentum.

His career at SKF didn’t just progress—it accelerated.

After shouldering multiple responsibilities, a turning point came when Ajay was assigned SKF Ahmedabad—a unit fighting for survival. Losses, legal battles, local challenges—it was a perfect storm.

Ajay didn’t just stabilize the unit.
He transformed it.

That transformation caught the attention of SKF’s global leadership.

He was selected for the Global Leadership Program, and then came a moment that surprised everyone—Ajay was handpicked to lead SKF Sweden.

The first non-Swedish person to lead the global headquarters.

I’m sure Ajay has many stories and accolades from his time in Sweden, which he will share himself. But let me tell you about one moment that gave me goosebumps.

I once watched a video of Ajay addressing a jam-packed football stadium—over 35,000 people—during a tournament sponsored by SKF. I can say with confidence that none of my friends has ever addressed a stadium of that scale.

SKF was my first job.
It was Ajay’s first job too.

Today, many of my SKF colleagues are also my business partners. Ajay chose to stay with SKF, yet our friendship continued to grow. Whenever I was in the Chinchwad area, I made it a point to stop by SKF. We met several times in Ahmedabad as well.

Ajay has that rare magnetic quality—you don’t just know him, you connect with him. That’s why, when it came to connecting two beautiful journeys—MG–RG with Ajay and Meenal—I stepped in without hesitation.

Despite his global responsibilities, Ajay always finds time during his India visits to reconnect—often over a quiet drink and warm conversation.

So today, it gives me immense pride to present to you—

A man who began as a trainee engineer
Who rose to become Managing Director of the parent company
Who holds no formal management degree, yet leads a workforce of over 50,000 people
A leader with courage
A friend with warmth
A wit that disarms
And a spirit that inspires

Ladies and gentlemen, please join me in welcoming Mr. Ajay Naik.

Thursday, 25 December 2025

इंद्रा नूयी

"तुमच्या आयुष्यात एक वेळ अशी येईल की तुमच्या एका बाजूला अमेरिकेचे अध्यक्ष तर दुसऱ्या बाजूला भारताचे पंतप्रधान असतील" असं लहानपणी इंद्रा कृष्णमूर्ती हिला सांगितलं असतं तर तिने हे म्हणणाऱ्याला एकतर वेडं म्हंटलं असतं किंवा ते बोलणं हसण्यावारी नेलं असतं. पण हे घडलं. २००९ साली पंतप्रधान मनमोहन सिंग अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले असताना अमेरिकन उच्च पदस्थांची ओळख करून देताना अध्यक्ष बराक ओबामा एका स्त्री जवळ थांबले आणि मनमोहन सिंग यांना म्हणाले "या इंद्रा नूयी, पेप्सीको च्या सी इ ओ" तेव्हा श्री सिंग म्हणाले "पण या तर आमच्या आहेत". तेव्हा ओबामा हसत म्हणाले "त्या आता आमच्या सुद्धा आहेत." 

हे ऐकत असताना इंद्रा नूयी, म्हणजे पूर्वाश्रमीच्या इंद्रा कृष्णमूर्ती या स्मितहास्य करत जगातल्या दोन नेत्यांशी हस्तांदोलन करत होत्या. त्या हास्यामागे त्यांची अमेरिकेतील ३० वर्षाची कडी मेहनत होती आणि त्याबरोबर त्यांच्या अंगभूत हुशारीची उभरत्या वयात झालेली जडणघडण. 

इंद्राचा जन्म मद्रास मध्ये, आजचे चेन्नई, एका अत्यंत सुशिक्षित आणि सुसंस्कृत घरात झाला. एकत्र कुटुंबपद्धती असलेल्या या घरात लोकांचा गोतावळा मोठा. अनेक भाऊ बहिणींच्या मांदियाळीत इंद्रा चं बालपण हसत खेळत गेलं. 

तिचे आजोबा श्री नारायण सर्मा हे निवृत्त न्यायाधीश होते. त्यांच्यामुळे घरात शिक्षणासाठी पोषक वातावरण होतं. त्यामुळे इंद्रा, चंद्रिका आणि नंदू या तिघांनाही वाचनाची आवड सुरुवातीपासून होती. एकुणात इंद्राच्या आयुष्यावर तिच्या आजोबांचा, ताथा म्हणायचे त्यांना, विलक्षण प्रभाव होता. अत्यंत विचारपूर्वक त्यांनी आपल्या नात नातवांची जडणघडण केली होती. १९७५ साली जेव्हा त्यांचं निधन झालं तेव्हा २० वर्षाची इंद्रा कोलमडून गेली होती. 

इंद्राचे आईवडील हे एकमेकांना पूरक दाम्पत्य होतं. घरातील सर्व काम आई, म्हणजे शांथा, करायच्या तर गणितात पोस्ट ग्रॅज्युएट असणारे वडील, श्री कृष्णमूर्ती, हे बँकेत अधिकारी होते. लौकिकार्थाने कुटुंब श्रीमंत नव्हतं पण संपन्न होतं. या सर्व वडीलकीच्या संस्काराबरोबर जगण्यातील सर्व गोष्टींचा म्हणजे संगीत, नाट्य, नृत्य, खेळ याचा आस्वाद घेत इंद्राचं बालपण फुलत होतं. घरामध्ये आपलं मत व्यक्त करण्याची मुभा होती (जे त्या काळात फारसं प्रचलित नव्हतं). 

इंद्रा ही हुशार आणि आपलं मत निर्भीडपणे व्यक्त करणारी मुलगी होती. लहानपणापासूनच तिचं दिसणं हे टॉम बॉय प्रमाणे असायचं. "तुला नवरा कोण देणार?" असं म्हणत नातेवाईक चिडवायचे सुद्धा. होली एंजल्स या कॉन्व्हेंट शाळेत इंद्रा शिक्षणाबरोबर खेळ आणि वक्तृत्वस्पर्धा यात हिरीरीने सहभागी व्हायची. आठवीत असतानाच इंद्रा दिल्लीला युनायटेड स्कुल्स ऑर्गनायझेशन आयोजित एका कार्यक्रमात वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाली होती. दहावीत असताना इंद्रा घरच्यांच्या मनाविरुद्ध गिटार शिकली आणि त्या काळात आपल्या तीन मैत्रिणीसह, मेरी, ज्योती, हेमा, ऑल गर्ल्स बँड काढला, ज्याची त्या काळात मद्रास मध्ये खूप चर्चा झाली होती. त्याचं नाव होतं लॉगरिदम. त्याचे तीन वर्षे प्रयोग पण झाले. 

पुढे इंद्रा मद्रास ख्रिस्तीयन कॉलेज मध्ये गेली. तिथे रसायनशास्त्र मुख्य विषय घेत पदवी साठी शिक्षण चालू झाले. एम सी सी मध्ये तिने महिला क्रिकेट टीम उभी केली आणि इतकंच नव्हे तर चार कॉलेजेस ला अशी टीम उभी करण्यास प्रवृत्त करून मद्रास मध्ये पहिली महिला क्रिकेट स्पर्धा भरवली. 

मद्रास ख्रिस्तीयन कॉलेज मधून पास आउट झाल्यावर इंद्रा बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत आय आय एम मध्ये दाखल झाल्या. फरक एकच होता, मोठी बहीण आय आय एम अहमदाबाद तर इंद्रा कोलकता मध्ये. त्या एम बी ए प्रोग्रॅम मध्ये इंद्रा आणि इतर ५ मुली होत्या. बाकी १९५ मुलं. साल होतं १९७४. 

एम सी सी आणि आय आय एम कोलकाता मधून इंद्रा अभ्यासाव्यतिरिक्त इतर अनेक कार्यक्रमात झळकत राहिली. त्यातही चर्चात्मक वक्तृत्व स्पर्धेत इंद्राचा हिरीरीने सहभाग असायचा. कदाचित हेच गुण पुढे जेव्हा त्या द इंद्रा नूयी बनल्या आणि अनेक लीडर शिप रोल त्यांनी निभावले, त्याकामी उपयोगात आले. त्याची व्याप्ती इतकी मोठी होती की तरुण वयात इंद्रा पंतप्रधान इंदिरा गांधी किंवा विख्यात अर्थतज्ञ नानी पालखीवला यांच्याशी संवाद साधू शकल्या. बालपणी झालेल्या संस्कारातून आणि नंतरच्या अभ्यासामुळे तरुण इंद्रा राष्ट्रीय प्रश्नावर मतं मांडू शकतील इतक्या प्रगल्भ आणि बुद्धिमान झाल्या होत्या. 

आय आय एम च्या पहिल्या वर्षानंतर मुंबईच्या बी ए आर सी मध्ये इंटर्नशिप केल्यावर इंद्रा ने मार्केटिंग हा मेजर विषय घेत मास्टर्स डिग्री मिळवली आणि कॅम्पस इंटरव्ह्यू मधून त्यांची निवड झाली ती मद्रासस्थित मेत्तुर बर्डसेल या कंपनीत. व्यवसाय होता टेक्स्टाईल इंडस्ट्री साठी धागे पुरवणे. आणि इथेच तिची ओळख झाली ब्रिटिश नॉर्मन वेड, जे कंपनीचे सर्वेसर्वा होते. श्री वेड यांनी पहिल्यांदा इंद्रा ला अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्याबद्दल सांगितलं.मेत्तुर बर्डसेल मध्ये त्यांना स्वतःच्या स्किल्स ची जाणीव झाली आणि दिलेलं काम त्या यशस्वी पणे पूर्ण करू शकतात हा आत्मविश्वास दिला. 

१९७७ साली दक्षिण भारतात टेक्स्टाईल इंडस्ट्री मध्ये संप झाला. आणि मेत्तुर बर्डसेल मध्ये काही काम उरलं नाही. त्यावेळेस इंद्रा मुंबईत जॉन्सन अँड जॉन्सन मध्ये हेल्द केअर प्रॉडक्टस, स्टे फ्री आणि केअर फ्री, च्या सेल्स मध्ये जॉईन झाल्या. इथे त्या पहिल्यांदा अमेरिकन मॅनेजमेंटबरोबर काम करू लागल्या. तिथं त्यांची सेल्स ची करिअर बहरत होती. 

पण नियतीच्या मनात काही वेगळं होतं. एका सुट्टीसाठी मद्रास मध्ये असताना त्यांच्या नजरेला अमेरिके तील येल विद्यापीठाच्या एम बी ए कोर्स बद्दल लेख आला. त्यांच्या अनेक मित्र मैत्रिणी अमेरिकन ड्रीम बघायला आले पण होते. इंद्राने येल विद्यापीठासाठी अर्ज केला.अनपेक्षित रित्या त्यांना स्कॉलरशिप सकट ऍडमिशन मिळाली. इंद्रा आणि तिचे कुटुंबीय द्विधा मनस्थितीत होते. त्यात भर पडली ती मेत्तुर बर्डसेल परत चालू झाल्यामुळे नॉर्मन वेड, जे इंद्राच्या कामाच्या पद्धतीने प्रभावित झाले होते, यांनी इंद्राला पूर्ण व्यवसाय सांभाळण्याची ऑफर केली. 

हा तिढा नॉर्मन वेड यांनीच सोडवला. इंद्राने जेव्हा त्यांना येल युनिव्हर्सिटी च्या ऍडमिशन बद्दल सांगितले तेव्हा त्यांनी इंद्राच नव्हे तर कुटुंबियांना सुद्धा अमेरिकेत जाण्याबद्दल उद्युक्त केलं. 

१९७८ मध्ये इंद्रा कृष्णमूर्ती येल विद्यापीठात स्कुल ऑफ ऑरगनायझेशन अँड मॅनेजमेंट या नवीनच उघडलेल्या शिक्षण दालनात प्रवेश करती झाली. 

असंख्य प्रश्नांना तोंड देत, आव्हानं स्वीकारत, प्रचंड कष्ट करत इंद्रा यांनी  येल विद्यापीठाची मास्टर्स डिग्री मिळवली. लौकिकार्थाने ही त्यांची दुसरी मास्टर्स डिग्री. पण आय आय एम कोलकता आणि येल विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात खूप फरक होता. येल मध्ये प्रॅक्टिकल केस स्टडीज वर जास्त भर होता. भारताच्या मद्रास वरून आलेली तरुणी येल विद्यापीठातून अमेरिकेत आपलं स्वप्न साकारण्यासाठी तावून सुलाखून बाहेर पडत होती. 

इंद्रा कृष्णमूर्ती कॉर्पोरेट जग गाजवण्यासाठी सज्ज होताना त्यांची इंटर्नशिप होती शिकागो येथील कन्सल्टिंग फर्म मध्ये. नाव होतं बूझ अॅलन हॅमिल्टन. त्यांची पहिली असाइनमेंट होती इंडियाना स्टेट मधील एका अन्न प्रक्रिये संबंधित व्यवसायाची नीती धोरण आखणे. हे सगळं घडत असताना इंद्रा यांची  राज नूयी या स्मार्ट तरुणाशी. राज तेव्हा इटन नावाच्या इंजिनियरिंग कंपनीत काम करत होते. दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्याची परिणीती प्रेमात झाली. लवकरच दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि इंद्रा कृष्णमूर्ती या इंद्रा नूयी झाल्या. या समांतर घटना घडल्या १९८० मध्ये. 

पूर्ण मास्टर्स झाल्यावर इंद्रा नूयी जगप्रसिद्ध बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुप (बीसीजी) मध्ये रुजू झाल्या. बीसीजी तील त्यांची सहा वर्षे ही अनेक कडू गोड घटनांची साक्षीदार होती. त्याच काळात इंद्रा यांचे वडील श्री कृष्णमूर्ती यांचं निधन झालं. पण हे दुःख पचवताना इंद्रा आणि राज यांचं पहिलं अपत्य प्रिथा जन्माला आली. १९८६ मध्ये इंद्रा यांचा एक मोठा कार अपघात झाला. पण हे सगळं घडत असताना बीसीजी मध्ये त्यांनी स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं ते आपल्या कार्यकौशल्याच्या जोरावर. पायाला भिंगरी लागल्याप्रमाणे इंद्रा जेव्हा कामावर असायच्या तेव्हा अमेरिकेत तुफान भ्रमंती करायच्या. कदाचित हेच कारण असावं की वडिलांचं निधन आणि कार अपघात या दोन्ही प्रसंगी बीसीजी त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभी राहिली. 

बीसीजी च्या वर्क प्रोफाइल मध्ये तक्रार करायला काहीच जागा नव्हती. पण एक हेड हंटिंग कंपनी इंद्रा यांना एक इंटरव्ह्यू अटेंड करण्यासाठी खूप मागे लागली होती. खूप फॉलो अप झाल्यावर शेवटी इंद्रा तो इंटरव्ह्यू देण्यासाठी तयार झाल्या. कंपनी होती मोटोरोला. तिथे इंटरव्ह्यू दरम्यान ओळख झाली गेरहार्ड ब्ल्यूमेयर यांच्याशी. राज यांच्याबरोबर चर्चा करत इंद्रा यांनी ती जॉब ऑफर स्वीकारली. आणि पुढील आठ वर्षात गेरहार्ड यांच्या मेंटरशिप खाली एक स्ट्रॅटेजिस्ट म्हणून आपलं स्थान बळकट केलं. आव्हानं होतीच. प्रिथा पण मोठी होत होती. राज यांचं करिअर पण जोरात चालू होतं. या सगळ्या दरम्यान मोटोरोला ची नीती ध्येय धोरणे आखण्यामागे इंद्रा यांचा लक्षणीय सहभाग होता. स्ट्रॅटेजिस्ट म्हणून इंद्रा यांचं नाव अमेरिकन कॉर्पोरेट क्षेत्रात दुमदुमायला लागलं होतं. 

सगळं व्यवस्थित चालू होतं. पण बदल तर घडतात. त्या न्यायाने गेरहार्ड यांनी मोटोरोला ला अलविदा करत आपल्या मूळ देशात आसिया ब्राऊन बोव्हरी (एबीबी) नावाची प्रसिद्ध कंपनी जॉईन केली. आठ वर्षाच्या काळात गेरहार्ड इंद्रा यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित झाले होते. म्हणून त्यांनी इंद्रा यांना एबीबी चा अमेरिकेतील व्यवसाय सेट व्हावा यासाठी पाचारण केलं. एबीबी च्या कार्यकाळात त्यांना दुसरी मुलगी झाली, तारा. इंद्रा आपलं करिअर आणि दोन्ही मुलींना मोठं करणं यामुळे खूप व्यस्त झाल्या. त्यांची आई शांता त्याच्या मदतीला आल्या होत्या. इंद्रा यांचा व्यावसायिक आलेख वर जात होता. पण एबीबी च्या व्यवस्थापनात अनेक बदल झाले आणि इंद्रा यांनी तिला अलविदा करत अशा कंपनीत जॉईन झाल्या ज्याने त्यांना केवळ अमेरिकेतच नव्हे तर जगाच्या पटलावर ओळख दिली. 

कंपनीचं नाव होतं, पेप्सिको आणि दिवस होता ३० मार्च १९९४. 

आव्हान तर स्वीकारलं होतं. बदल तर मोठा होता. गेली १४ वर्षे त्या इंजिनियरिंग क्षेत्रात कार्यरत होत्या आणि पेप्सिको होती फूड अँड बेव्हरेज क्षेत्रातील एक धुरंधर कंपनी. पेप्सिको तील कार्यसंस्कृती आणि त्या नोकरीतून त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी ही इंद्रा यांच्या व्यक्तिमत्वाला पूरक ठरली. पेप्सिको ही त्या काळात अमेरिकेतील पंधरावी मोठी कंपनी होती आणि जगभरात त्यांचे ४५०००० कर्मचारी काम करत होते. इंद्रा यांचा आत्मविश्वासपूर्ण वावर चालू झाला आणि पेप्सिको मध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्या स्वीकारत गेल्या. अनेक देशातले बिझिनेस प्लॅन्स, महत्वाचे टेक ओव्हर्स, मर्जर्स इंद्रा नूयी यांच्या अभ्यासपूर्ण सल्ल्याने पूर्ण झाले. त्याची परिणीती जी व्हायची तीच झाली. एकविसावं शतक उजाडताना इंद्रा या पेप्सिको च्या प्रेसिडेंट झाल्या. इंद्रा आता अजून जोमाने काम करू लागल्या. कंपनीचं विमान त्यांच्या दिमतीला होतं. अमेरिकेतच नव्हे तर जगभरात त्यांचे झंझावती दौरे चालू असायचे. 

२००६ साली ती अद्भुत घोषणा झाली. इंद्रा नूयी पेप्सिको या जगड्व्याळ कंपनीच्या पहिल्या स्त्री सीईओ म्हणून विराजमान झाल्या. त्याशिवाय त्या पहिल्या इमिग्रंट आणि ब्राऊन कलर सीईओ झाल्या. अनेक अर्थाने इंद्रा यांची कामगिरी ऐतिहासिक होती. आणि भारत सरकारने पुढच्याच वर्षी म्हणजे २००७ साली त्यांना पदमभूषण पुरस्काराने गौरान्वित केलं आणि त्यांच्या दैदिप्यमान कारकिर्दीचं यथोचित कौतुक केलं. त्या काळात अजून एक गौरवाची गोष्ट म्हणजे अमेरिकेतील फॉर्च्युन ५०० कंपनीत फक्त ११ स्त्री सीईओ होत्या, अन त्यापैकी एक होत्या इंद्रा नूयी. 

पुढील १३ वर्षात पेप्सिको ने इंद्रा यांच्या नेतृत्वाखाली आकाशाला गवसणी घालणारी कामगिरी केली. सेल्स, प्रॉफिट, मार्केट कॅप, इन्व्हेस्टर रिटर्न्स या प्रत्येक व्यावसायिक मेझर्स मध्ये पेप्सिको ने लक्षणीय वृद्धी केली. पण इंद्रा यांच्या कारकिर्दीचं सगळ्यात आगळंवेगळं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा पी डब्ल्यू पी प्रोग्रॅम. परफॉर्मन्स विथ पर्पज. पेप्सिको ची उत्पादनं ही तब्येतीस हानिकारक आहेत हा आरोप वर्षानुवर्षे होत होता. त्याला उत्तर देण्यासाठी पी डब्ल्यू पी या कार्यक्रमाद्वारे पेप्सीकोने आपल्या उत्पादनाच्या हेल्दी कंटेंट मध्ये खूप सुधारणा केली. या कारकिर्दीत इंद्रा नूयी यांना अनेक पुरस्कार मिळाले, मानसन्मान मिळाले. 

२०१८ साली आपल्या एकूण कारकिर्दीची चाळीस वर्षे, आणि पेप्सिको मध्ये २४ वर्षे पूर्ण केल्यावर इंद्रा नूयी या पेप्सिको च्या सी इ ओ या पदावरून सन्मानाने पायउतार झाल्या. 

इंद्रा नूयी यांच्या झळाळत्या कारकिर्दीबद्दल वाचताना काही गोष्टी प्रकर्षांने जाणवल्या. घर आणि अत्यंत व्यस्त जबाबदारीची नोकरी करताना त्यांची चांगलीच कसरत झाली. एक किस्सा त्यांनी अनेक ठिकाणी सांगितला की पेप्सिको च्या प्रेसिडेंट झाल्यावर त्या अत्यंत उत्साहात घरी गेल्या तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते. आणि त्यांना ही खुशखबरी घरी सांगायची होती. त्यांनी घरात प्रवेश करताना ही बातमी आईला सांगितली. तर त्या बातमीकडे फारसे लक्ष न देता त्यांची आई इंद्रा यांना म्हणाली की घरातील दूध संपलं आहे. ते आधी घेऊन ये. इंद्रा साहजिक आहे, नाराज झाल्या. त्या आईला म्हणाल्या सुद्धा "मी इतकी आनंदाची बातमी घेऊन आले आणि त्याकडे सपशेल दुर्लक्ष करत तू मला दूध आणायला सांगितले हा  अन्याय नाही का?" त्यावर त्यांची आई म्हणाली "घरात येताना तो तुझा राजमुकुट गॅरेज मध्ये सोडायचा. इथे घरात तू आधी तुझ्या नवऱ्याची बायको, मुलींची आई आणि माझी मुलगी आधी आहेस. मग तुझी पेप्सिको ची पोझिशन". त्यांच्या यशस्वीतेचा विचार करताना त्यांचे पती श्री राज नूयी यांनी जी सपोर्ट सिस्टम उभी केली ती कौतुकास्पद आहे. मला खात्री आहे की इंद्रा यांची कारकीर्द बहरावी यासाठी त्यांनी स्वतःच्या घौडदौडीला लगाम घातला असावा. 

पेप्सिको मधून निवृत्ती घेतल्यावर सुद्धा इंद्रा  अमेरिकेत खूप व्यस्त  आयुष्य जगत आहेत. अनेक कंपन्यांच्या बोर्ड वर त्या सल्लागार म्हणून काम करतात. 

अमेरिकन कंपनीची सीईओ म्हणून एकदा इंद्रा यांना इंग्लंड मध्ये आमंत्रित केलं होतं. हाय प्रोफाइल चर्चेत इंग्लंडचे पंतप्रधान पण त्यावेळी सामील होते. त्यांनी नूयी यांना विचारलं की "तुम्ही ३० वर्षांपूर्वी इंग्लंड ला न येता अमेरिकेला का गेल्या?" हजरजबाबी इंद्रा पटकन म्हणाल्या "मी इंग्लंडला आले असते तर आज तुमच्या बरोबर जेवायचं निमंत्रण मिळालं नसतं." अमेरिकेतील संधी आणि त्या काळातील प्रगतीशील इकॉनॉमी चं सार त्या उत्तरात दडलं होतं. 

कर्माने अमेरिकन आणि मनाने अजूनही जिथे जन्म झाला त्या भारताची कास धरून ठेवलेल्या पद्मभूषण इंद्रा नूयी यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा