Thursday, 31 March 2016

मैफील

नील ला आजकाल मराठी हिंदी गाण्यांची आवड निर्माण झाली आहे. आणि त्या कट्यार मुळे परत शास्त्रीय वगैरे. काल काहीतरी गुणगुणत होता. मी विचारलं, काय म्हणतोस. तर म्हणाला "केतकी गुलाब जुही".

आज सकाळी नील माझ्या बरोबर कंपनीत निघाला. कार मध्ये बसायच्या अगोदर "सरणार कधी रण" ऐकून झालं. मग म्हणाला "मला भीमसेन जोशींचं गाणं ऐकायचं आहे"  मी त्याला "टाळ बोले चिपळीला" हे गाणं लावून दिलं. गाणं संपल्यावर तो म्हणाला "Bhimsen Joshi is the greatest singer" मध्ये एक ओळ त्यांची नाही हे ही त्याला कळलं. राम कदमांच्या तोंडून ऐकलेला वसंतराव आणि भीमसेनजींच्या दोस्तीचा किस्सा त्याला सांगितला.

मग लागलं "माझे माहेर पंढरी" गाणं संपल्यावर मी विचारलं "काय बोलतो" तर म्हणाला "काय बोलणार यावर? काही बोलताच येत नाही आहे" दोन मिनिटे शांत बसल्यावर परत म्हणाला "मला असं वाटतंय की ट्राफिक जाम व्हावी. आपण त्यात अडकावं. आणि ही गाणी ऐकत बसावं"

तिसरं गाणं लागलं "तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल" एव्हाना तो येडा झाला होता बहुतेक. गाणं संपल्यावर हात जोडत म्हणाला "भीमसेन जोशी तर तानसेन ला ही हरवतील. मला तर त्यांची पूजा करावीशी वाटते"

मला म्हणाला "मला क्लासिकल गाणं शिकण्याचा क्लास लावायचा आहे" मी काही बोललो नाही. तबल्याचा क्लास अर्धवट सोडून त्यांनी मला तोंडघशी पाडलं होतं. आता चार वेळा म्हंटल्याशिवाय मी परत चूक करणार नाही.

कात्रज मागे पडलं. मी एक शेवटचा घाव टाकायचं ठरवलं. त्याला सांगितलं "भीमसेनजींच्या दोन शिष्यांची तुला जुगलबंदी ऐकवतो. जयतीर्थ मेवुंडी आणि आनंद भाटे" सौभाग्यदा लक्ष्मी भारम्मा. आठ नऊ मिनिटांची सुरांची बरसात आहे. न्हाऊन निघतो आपण चिंब. त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं की तो ही नखशिखांत भिजला आहे. म्हणाला "मेवुंडी भीमसेन जोशींसारखं गातात. भाटेंचा आवाज वेगळा आहे"

कंपनी आली. परवाच एक नवीन शब्द नीलने ऐकला होता, तो वापरत म्हणाला "I am mesmerised"

मी पण अंगावर आलेले काटे झाडत पाऊण एक तासाच्या मैफिलीची सांगता केली. सुरांचं मंदिर झालेल्या कारमधून कर्म मंदिरात प्रवेश करता झालो. आणि दैनंदिन कामाला सुरवात केली.

Wednesday, 30 March 2016

आसक्ती

माझ्या आयुष्यात अशी बरीच मंडळी आली, म्हणजे ही लोकं अशी की ज्यांना मी सुरुवातीला भेटलो तेव्हा सॉलिड इम्प्रेस झालो होतो. असं वाटायचं की माणसाने असं असावं. मग या लोकांशी माझे व्यवसायाच्या निमित्ताने किंवा इतर काही कारणामुळे संबंध आले. अर्थात नैतिक. दिवस सरत गेले, महिने गेले आणि वर्ष ही गेली. काळाच्या कसोटीवर मात्र यातील काही निष्प्रभ झाले. म्हणजे जगाच्या दृष्टीने असतीलही ते कर्तृत्ववान वगैरे पण माझ्या मनावरचा त्यांचा प्रभाव संपला. यातील काही लोकांना मी काही दिवसात जोखलं, तर काहींना ओळखण्यात महिने गेले. काही अति हुशार मंडळींनी कित्येक वर्षं मला गंडवल.

मनाचा तळ दिसणं फार अवघड असतं, नाही? कारण त्यावर कधी प्रेमभावाचं शेवाळं साचलं असतं तर कधी दोस्तीच्या आवरणाखाली तो तळ लपलेला असतो. काही जणांच्या मनावर हुशारीचा तवंग साचलेला असतो तर काही जण शूरपणाचा आव आणत जगत असतात. काहींनी अत्यंत व्यवहारकुशलतेचा मुखवटा घातलेला असतो. आणि आपण त्या बाह्य रुपाला फसतो. (ज्यांना पटतंय त्यांनी "आपण" बहुवचनी शब्द घ्यावा, ज्यांना नाही त्यांनी मी स्वत: ला आदरार्थी संबोधतो असे समजावे).

मग कधीतरी नियती नावाची अद्भुत शक्ती एक धक्का देते. पाणी डचमळतं. तो मुखवटा कधी स्वत:हून फेकून द्यावा लागतो तर कधी परिस्थिती तो ओरबाडून घेते. कुणीतरी असं औषध फेकतं की शेवाळं बाजूला होतं, तवंग हटतो. आणि मग तो मानवी मनाचा तळ दिसू लागतो. अगदी लख्ख.  आणि मग नजरेसमोर येतात कधी अत्यंत निर्बुद्ध तर कधी निर्ढावलेले नालायक चेहरे. शुरपणाच्या नावाखाली लपलेली अत्यंत भित्री जमात. व्यवहार कुशलतेच्या आवरणाखाली ओरबड्णारे अणकुचीदार नखं असलेले पंजे. दुसऱ्याचं भलं करण्याच्या नावाखाली स्वत:च्या तुंबड्या भरणारे नराधम.

मग हे असं काही दिसल्यावर, काहींना दूर लोटता येतं. काहींना तो विधाता आपल्या वाटेतून अलगद बाजूला काढतो तर काहींना मात्र आपण झेलत राहतो. आयुष्यात फासे असे पडले असतात की मान पक्की अडकली असते. अन मग ही लोकं आपल्या आयुष्याचा भाग बनतात. सहनही होत नाही आणि सांगणार तरी कुणाला असा एक विचित्र तिढा बसतो. आपणही तळ दिसलाच नाही असा अभिनय करत राहतो. समोर दिसणाऱ्या आवरणाला चांदीचं मखर सजवण्यात धन्यता मानतो. परस्पर संबधातला रस निघून जातो, आयुष्य फरफट होतं आणि आपण सक्तीने जगण्याचा पर्याय निवडतो.

खरं तर अशा जगण्याला आसक्ती म्हणायला पाहिजे.  

Tuesday, 29 March 2016

भारती

कालच्या लेखात इंजिनियरिंग एक दु:स्वप्न असं लिहिल्यावर एका मित्राचा फोन आला आणि असं का म्हणतोस हे विचारलं. का कुणास ठाऊक मला भारती विद्यापीठाबद्दल विलक्षण अढी आहे. खरं तर कारण काहीच नाही. म्हणजे त्यांच्यामुळे मी डिग्री झालो आणि पुढे त्याचा मला खूप फायदा ही झाला. पण जी कृतज्ञतेची भावना शाळेबद्दल किंवा पॉलीटेक्निक बद्दल आहे ती या कॉलेज बद्दल नाही हे तितकंच खरं. याची काही कारणं ही असावीत:

- प्रायव्हेट कॉलेज हा कन्सेप्ट त्यावेळेस आजच्या इतका बोकाळला नव्हता. गव्हर्नमेंट कॉलेज ला admission नाही म्हणजे आपल्यात काही ग्रॉस कमी आहे असं वाटायचं. आजही बी ई कुठून झाला या प्रश्नाचं भारती विद्यापीठ असं उत्तर देताना हलकीशी कळ उमटतेच. COEP ला आपल्याला admission मिळाली नाही हा सल आजही आहे.

- वर्षाला आठ हजार फी. आई वडिलांनी पोटाला चिमटा काढून भरलेली. आपल्या हातून काहीतरी मोठं पाप घडलं अशी भावना आज ही माझ्या मनात येते.

- बरीच नॉन महाराष्ट्रीयन मुलं. आणि प्रचंड श्रीमंत असायची ती. त्यांना महिन्याला येणारे पैसे ऐकून माझे डोळे विस्फारायचे. परत त्यांच्या गाड्या घोड्या. मी सायकलपटू. दरमहा रु २५० वाला. बुजलोच म्हणा ना. खेळात पीछेहाट. अभ्यास सोडून सगळ्या क्षेत्रात मागे.

- मराठी मित्र झाले. नाही असं नाही. पण ते बहुधा असेच मारून मुटकून आलेले असावेत. सगळ्यांनी चेहेऱ्यावर एक विचित्र मुखवटे चढवलेले. वेंधळेपणाचे, बेफिकीरपणाचे, बावळटपणाचे. अन मी बहुधा सभ्यतेचामुखवटा चढवला असावा.

- परत तिसऱ्या वर्षापासून बी जे चा नाद. प्रेमाचा पफलू तिकडं फिट होत होता. तशाही भारती च्या पोरी अजिबात घास टाकत नव्हत्या.

या अशा अनेक घटकांमुळे माझी आणि कॉलेज ची नाळ काही शेवटपर्यंत जुळली नाही हे खरं. नाही म्हणायला काही जणांना इंडस्ट्री मध्ये भेटत राहिलो. मग त्यात काझी आहे, राजेश देशपांडे आहे, नुकतंच प्रशांत नलावडे शी बोलणं झालं, गिरीश ची कंपनी जवळ आहे, केतन मध्ये येउन गेला. पण हे अगदी बोटावर मोजण्याइतके. मागच्या वर्षी  २७-२८ जण भेटले हॉटेल मध्ये. सगळ्यांशी ओळख रिव्हाईव करण्याचा भारी मौका होता. पण माझीच angioplasty झालेली २ सप्टे ला आणि हे रियुनियन होतं ६ ला. मी फक्त सगळ्यांशी गळाभेट करण्यापुरता गेलो. आता परत भेटायचं ठरलं तर जाईन नक्की.

जीवनात घडलेल्या अनेक गोष्टींवर असोशीने प्रेम करणारा मी, या कॉलेज बद्दल मी खूपच अनभिज्ञ राहतो. इतका की त्याच्या समोरून जाताना मी एखाद्या जुन्या मित्राला टाळल्यासारखा अगदी नजर चुकवून जातो. 


Saturday, 26 March 2016

सोशल मिडिया

मित्रांनो,

आपल्या सगळ्यांना माहित आहे की आज काल सगळीकडे सोशल मिडिया चा बोलबाला आहे. WA, फेसबुक हे परवलीचे शब्द आहेत. पूर्वी लोकांना गप्पा मारण्यासाठी चावडी असायची. आता हेच चावडीच काम सोशल मिडिया करत आहे. मी स्वत: फेसबुक चा active युजर आहे.

पण या सोशल मिडिया चे काही भयानक दुष्परिणाम मला माहित झाले आहेत. काहींचा मी अनुभव घेतला आहे तर काही वाचले आहेत. WA आणि फेसबुक चं व्यसन लागल्यामुळे कंपनी आणि कुटुंब उध्वस्त झालेल्या कहाण्या बाहेर येत आहेत. या बाबत चे काही महत्वाचे दुष्परिणाम मी खाली लिहितो.

- शारीरिक आजार. मानेचे दुखणे, सारखं टाईप करून बोटाचे आजार, डोळे दुखणे, खूप जास्त वाचल्यामुळे डोकं दुखणे.

- मानसिक आजार. काही विचित्र फोटो सारखे बघितल्याने येणारे नैराश्य, सामाजिक  परिस्थिती वर चुकीची माहिती वाचल्याने होणारे गैरसमज.

- कुठलंही काम करताना चुकीचे किंवा सोपे डिसिजन घेणे. डिसिजन डिले करणे.

- महत्वाचे फोन करायला विसरणे किंवा एखादे महत्वाचे काम राहून जाणे.

- एखादी महत्वाची वस्तू किंवा गोष्ट विसरणे

- अतीव मानसिक आनंद देणाऱ्या गोष्टीबद्दल स्वारस्य न वाटणे. उदा: मुलाने काढलेलं चित्र, प्रवासात दिसणारा निसर्ग इत्यादी

- अपघात. सेल्फी. वाहन चालवताना स्पीड कमी जास्त होणे. रस्त्यावर WA वा फेसबुक चेक करताना चालताना धडपडणे.

कंपनी मध्ये काम करण्यासाठी WA लागतं या अत्यंत बंडल कारणासाठी आपण ते फोन वर डाऊनलोड करतो, पण खोल वर विचार करता तुमच्या हे लक्षात येईल की हे धादांत खोटं आहे. मी स्वत: WA वापरून ६ महिन्यापूर्वी डिलीट केलं आहे आणि विश्वास ठेवा माझं त्यावाचून काहीही अडलेलं नाही.

या व्यसनाला काबूत ठेवण्यासाठी काही सूचना देतो. तुम्हाला जितक्या पाळता येतील तितक्या पाळा.

- कंपनी त आल्यावर फोन खिशातून काढून वेगळ्या जागी ठेवा. काही वेळा ठरवा. सकाळचा चहा, जेवण, दुपारचा चहा. त्या वेळात काय खेळायचं ते खेळा.

- फेसबुक फोन वरून उडवा. घरच्या कॉम्प्युटर वर पहा. किंवा तुमच्या मुलाला वा पत्नीला फेसबुक चा पासवर्ड सेट करायला सांगा. घरातून निघताना लॉग औट करून निघा. घरी गेल्यावर त्यांच्या कडून लॉग इन करा.

- WA वर कमीत कमी ग्रुप ठेवा. फोरवर्ड टाळा.

- शक्य झाल्यास दोन ते तीन महिन्यासाठी WA उडवा. जर परत डाऊन लोड केलं तर त्याचा योग्य वापर कसा करायचा याचा विचार नीट विचार करा आणि मग लोड करा.

- शक्य असल्यास स्मार्ट फोन आणि नेहमी वापरातला फोन वेगळा करा.

लक्षात घ्या, WA आणि फेसबुक ने तुमच्या क्रिया/प्रतिक्रियेवर नियंत्रण ठेवलं नाही पाहिजे. तर तुम्ही त्याला  कंट्रोल केलं पाहिजे. कारण तसं झालं नाही तर तुमचं मनोरंजनाचं रुपांतर दारू सारख्या व्यसनात कधी होईल हे तुमच्या लक्षात पण येणार नाही.

WA किंवा फेसबुक पेक्षा बाकी महत्वाचे app डाऊन लोड करा. जसे की Ola/Uber, IRCTC, Flipkart, Amazon आणि काही अत्यंत उपयोगी गोष्टी ऑन लाईन उपलब्ध आहेत, त्याचा वापर करा. 

आधी केले मग सांगितले, या प्रमाणे मी वर सांगितलेले उपाय केले आहेत आणि त्याचे पॉझीटिव्ह परिणाम मला दिसले आहेत.

साहेब या नात्यापेक्षा मी तुम्हाला मित्र किंवा सिनियर नातेवाईक या भावनेतून मी हे तुम्हाला सांगतो आहे. तुम्ही कुठल्या भावनेतून आणि कसं घ्यायचं हे तुमच्या वर आहे.

Remember, behind every successful man there is deactivated WA or Facebook account.


तुमचा मित्र

राजेश मंडलिक 

Thursday, 24 March 2016

GPA

शासकीय तंत्रनिकेतन औरंगाबाद आलियास GPA. माझ्या आयुष्यातलं एक साधं सरळ स्वप्न. हं, माझी नाशिकची शाळा हे मोहक स्वप्न होतं तर माझं इंजिनियरिंग चं कॉलेज हे दु:स्वप्न होतं. तर GPA हे वास्तव. मी आज जो काही अभियंता म्हणून समाजात मिरवतो त्याचा पाया इथे घातला गेला.

नाशिकच्या स्वप्नवत शाळेतून मी औरंगाबाद ला आलो. विल्को च्या घरातून गादी वगैरे घेऊन मी हॉस्टेल ला राहायला आलो. त्या दिवशी ग्राउंड मधल्या झेंड्याच्या पोल च्या चौथऱ्यावर बसून पहिल्यांदा रडून घेतलं आणि मग रात्री पलंगावर आधीपासून स्वागतास तयार असलेल्या ढेकणापासून वाचण्यासाठी खाली गादी टाकली आणि त्याच्या बाजूला रॉकेल ओतलं आणि मग झोपलो. 

आणि मग पुढची तीन वर्षं अक्षरश: जगलो. GPA ची स्टोरी लिहायची म्हंटल तर मी त्या कॉलेज मध्ये वर्गात काय शिकलो हे लिहायचं तर दोन ओळी पण लिहिता येणार नाही. पण हॉस्टेल अन एक्स्ट्रा Curricular यामध्ये जो काही धिंगाणा घातला तो आज नैया वल्व्हवण्यासाठी मदत करतो असं म्हंटल तर अतिशयोक्ती होणार नाही. त्या तीन वर्षात भेटलेले मैतर आज ही तितक्याच असोशीने भेटतात, शिव्या घालतात. किती म्हणून नावं लिहावीत. काही लिहितोच. माझा तीनही वर्षं रूम पार्टनर असलेला अत्यंत पापभीरू असा सिव्हिल इंजिनियर संतोष देशपांडे, मी ज्याला जयभीम चा अर्थ पहिल्यांदा विचारला अन त्यानेही मला समजावून सांगितला असा रमेश नारखेडे, नगरच्या श्रीराम उद्योगाचा डायनामिक मालक सुनील कानवडे, त्याचा रूम पार्टनर आणि टॉप च्या पोझिशनचा competitor शहानवाझ, आणि या दोघांचे उपकार नेहमीच कबूल करणारा रतन, कुठल्याही गाण्याचे गायक/संगीतकार/गीतकार अन चित्रपट माहित असलेला संजय भोगावकर, दोन वर्ष राहिलेला पण ज्याच्या घरचे ही मला अत्यंत प्रेमाने बोलावतात असा मंगेश पाठक, जिगीषा या आजच्या अत्यंत नावाजलेल्या नाट्यसंस्थेच्या उमेदीतल्या काळातला सदस्य विवेक पत्की, ज्याच्या नगरच्या घरी आम्ही नेहमीच जायचो तो विवेक चव्हाण, केवळ माझं व्हिजिटिंग कार्ड दिसलं तर त्यावरून फोन करून घरी येउन भेटलेला बोर्डे,  अतुल मिरजगावकर, राजेश बोरा असे अगणित मित्र. बऱ्याच जणांची नावं केवळ विस्तारभयास्तव लिहित नाही.

मुद्दलात दरमहा रु २५० यायचे. त्यातले ९० रु मेसला. (शेवटी ११० की १२० झाले होते), ३०-४० रु चहा नाश्ता, इस्त्री वगैरे साठी. ५० रु जास्त मागितले कधी, तर कशासाठी पाहिजे हा प्रश्न बाबा विचारायचे. पहिला बूट (हो, आणि त्याला आजकाल शूज म्हणतात) रु ४४ चा घेतला. सकाळी दुध टाकणारा गवळी जसा वापरतो तसा तो बूट. घेतला त्या दिवशी फक्त घालू शकलो. हे सगळे आकडे लिहिताना गंमत वाटते.

GPA चं हॉस्टेल हे एक अजीबोगरीब प्रकरण होतं. रूम ला दरवाजे केवळ नावाला होते जसे आमचे अंगावरचे कपडे. एका रूम मध्ये किती जणांनी ठिय्या ठोकायचा याला काही धरबंध नव्हता. काय खायचो, काय प्यायचो याचा काही तपास नव्हता. रात्र भर टे टे खेळायचो. शेवटी निबंधे सर यायचे आणि मग आम्ही खाली मान घालत रूम मध्ये परतायचो.

Badminton चं खरं तर कोर्ट नव्हतं. कुठेतरी हात साफ करायचो अन मग जळगाव ला इंटर कॉलेज खेळलो. फायनल ला माझ्यामुळे हरलो म्हणून रनर अप झालो. क्रिकेट ही खूप खेळलो. 

तिथल्या इलेक्शन झालेल्या. दोन्ही पार्टीत मित्र. सिव्हिल आणि मेक ची नेहमी खुन्नस, पण इथे मिलाप झालेला. आज ही मला कोण कोणाच्या विरोधात होतं ते आठवत नाही. पण इलेक्शन जिंकल्यावर झालेल्या पार्टीत आवर्जून बोलावलं होतं. अहो पार्टी म्हणजे काय हो, डिलक्स हॉटेल मध्ये चहा. आणि तो हॉटेल वाला LP वर गाणे लावू द्यायचा आणि आम्ही नाचायचो. याच पार्टी मध्ये पहिल्यांदा मी धूम्रपानाचा आस्वाद घेतला. 

तिथलं शेवटचं gathering पण खूप एन्जोय केलं. दुसऱ्या वर्षीच्या gathering ला विवेक ने खूप प्रयत्न करून म……मरणाचा म्हणून नाटक बसवलं होतं. आणि आम्हा दगडाकडून अभिनय करवून घ्यायला पार प्रशांत दळवी अन चंद्रकांत कुलकर्णी यांना बोलवायचा. त्यांनी पण खूप इमानेतबारे प्रयत्न केला, पण मूळ इथे आडात नव्हतं तर पोहऱ्यात कुठून येणार. तिसऱ्या वर्षी मात्र fishponds, ऑर्केस्ट्रा, क्विझ या सगळ्यांचा ऑर्गनायझर होतो. आणि सॉलिड धमाल केली होती. ह्या असल्या उद्योगामुळे इंटर्नल मध्ये मास्तरांनी दिल खोल के मार्क दिले आणि फायनल इयर च्या मार्कलिस्ट वर फर्स्ट क्लास चा ठप्पा लागला. कारण थियरी मध्ये जे दिवे पाजळले त्यावरून समोर अंधार च होता. पण मास्तर लोकांनी ओरल अन प्रोजेक्ट मध्ये कृपा केली अन पुढं मग डिग्री करण्याची आफत माझ्यावर आली.  

औरंगाबाद च्या मेस हा एक संशोधनाचा विषय आहे. त्या उस्मानपुरा परिसरातल्या यच्चयावत बल्लावानी या पोटावर जे अत्याचार केले आहेत त्याने जगातले कुठलेही अन्न पचवायची ताकद दिली हे निर्विवाद. 

बाकी ते तंत्रनिकेतन आणि आम्ही यांत्रिकी अभियंता. त्यामुळे मराठवाड्या सारखं रुक्ष. हिरवळ एकदम कमी. नाही म्हणायला आमच्या वर्गात दोघी जणी होत्या. मृगजळ जणू. बाकी सिव्हिल आणि DERE मध्ये भरणा होता. पण वर्गातील पोरगी म्हणजे राखी बांधून घेणे ह्या नाशिक च्या शिकवणुकीचा पगडा भारी पडला आणि तसंही मुळात अरसिक असलेलं हृदय हे आम्हा मित्रांच्या हसी मजाक मध्ये आनंद मानत राहिलं. 

तर अशी आमची GPA ची स्टोरी. शाळेचा विषय निघाला की थोडा भावूक होतो.  या कॉलेज चं अगदी तसं होत नाही पण स्टेशन रोड हून जाताना कॉलेज बघण्यासाठी मान उंचावतेच आणि ते दिसो न दिसो एक कृतज्ञतेचि भावना अंगभर सरसरत जाते. 

Wednesday, 23 March 2016

Indigo

I was not keeping well because of stomachache on Sunday March 13, 2016, to the extent I was thinking of cancelling my scheduled trip to Chennai by 6E501 on 14/03/2016. Eventually I decided to go to Chennai only to know that my illness continued for next two days. I was loosing my energy as I could not eat any food. 

With this body condition I boarded with my colleague Aman on 15/03/2016 in 6E385 from Chennai to Pune. I went to sleep before flight took off, which is actually usual ritual. I got up in 45 minutes with dizziness in my head. All of a sudden I profusely started sweating. All things came to my mind which normally a man with two angioplasty would think. I started walking towards toilet thinking that I will fresh up my face using water. By the time I reached toilet, I lost all energy of my body and fainted near to toilet. Indigo staff came to my rescue with lime water and sugar. They also promptly announced if any Doctor is available on board. One Muslim doctor couple came forward who were actually acupuncture specialist. Indigo staff made me comfortable and brought me back to normal in next five minutes. 

I was so upset with overall body condition that I missed to thank staff while disembarking of flight in Pune at 11:55 pm. I thought conveying this to you and request you to pass on my sincere thanks to all the airhostesses who were kind enough to take a swift action to take me out of difficult situation. 

I am quite regular user and also advocate of Indigo in my friend circle and ask them to use it for their business and leisure travel. The 15th March incidence would simply affirmed my affinity and loyalty as a customer towards Indigo.   

Sunday, 20 March 2016

क्रिकेट

आज सकाळी न्हाव्याच्या दुकानात संवाद चालू होता. "अच्छा हो गया कोई बादमे विकेट नही गयी. नही तो अपनी टीम बहुत प्रॉब्लेम मे आती। लास्टमे जीत ही गये हम. बहुत मजा आया. साब, आपने देखी की नही" मी नाही म्हंटल्यावर दोघं एकदम "अरे क्या साब, धमाल आयी. वो हार्दिक का कँच देखा नही. हमारे माँ को पसंद आया" पात्र: अजमल आणि रिझवान

*********************************************************************************


मी लहानपणी क्रिकेटवेडा होतो. खेळायला आणि पाहायला खूप आवडायचं. क्रिकेट खेळताना कुठल्याही एका क्षेत्रात निपुण नसताना मी शाळेत आणि पॉलीटेक्निकला वर्गाचा कर्णधार वगैरे झालो होतो. खरं तर हा अवगुण आयुष्याच्या बऱ्याच क्षेत्रात मदतीला धावून आला आहे. Jack of many, master of none.

शाळेत असताना मी अगदी ३०० पानांचा क्रिकेट इनसायक्लोपिडिया बनवला होता. त्यात अनेक उत्तमोत्तम खेळाडूंचे फोटो आणि त्यांची माहिती लिहिली होती. अनेक रेकॉर्ड तोंडपाठ होते. १९८३ च्या विश्वचषक कपच्या फायनल ला आमच्या घरी टीव्ही नव्हता. पहिल्या मजल्यावर होता. आम्ही गेलेलं त्यांना फारसं आवडायचं नाही. प्रत्येक ओव्हर ला वर जायचं, दोन मिनिटं match पहायची आणि खाली येउन चुळबुळत बसायचं. असं करत तो थरार अनुभवला.

डिप्लोमा औरंगाबाद ला झाल्यावर पुण्याला आलो. नाही म्हणायला कॉलनीत क्रिकेट खेळायचो पण अशा अंगभूत गुणांचा विकास जिथे होतो त्या कॉलेज मध्ये मात्र सपशेल पिछाडी. पुण्यातल्या भपक्याला भीत मग माझ्यातले क्रिकेट, टेटे आणि बॅडमिंटन हे सगळेच खेळ दुरावत गेले.

इंटर कॉलेज क्रिकेट खेळणं वगैरे पुण्यात जरी झालं नाही तरी बघण्यात अजून स्वारस्य होतं. भारत पाकिस्तान ची वन डे नेहरू स्टेडीयम ला होती. एक तिकीट मिळालं होतं. मी गेलो. गेट वर तोबा गर्दी. गेट उघडल्या बरोबर, पाण्याचा लोंढा घुसावा तसे लोकं पळत सुटले. मी पायर्यांवर पाय घसरून पडलो. मला तुडवत लोकं पुढं गेले. मान वर काढली. गुदमरून मेलो नाही याबद्दल देवाचे आभार मानले.

पाकिस्तानने आपल्याला १२५ मधे उखडलं होतं. बहुतेक तौफिक अहमद होता ज्याने पाच विकेटस काढल्या होत्या. श्रीकांत की कुणाचा तरी कँच एका पाकिस्तानी फिल्डरने बॉर्डरला अफ़लातून पकडला होता. मी टाळ्या वाजवल्या. तर मागे डोक्यावर एकाने जोरात टपली मारली अन म्हणाला "काय रे भिकारचोट, टाळ्या काय वाजवतोस?" कँच चांगला घेतला म्हणून असं म्हणणार होतो. पण गप्प बसलो. रडत खडत आपण हारलो. कुणी जिंकलं म्हणून परत टाळ्या वाजवाव्या वाटत होत्या, पण चार सहा डोळे माझ्यावर रोखून होते बहुधा. त्यामुळे हा जो काय उन्माद चालू आहे, त्याची वाढ अनेक वर्षांपासून हळूहळू होत आली आहे.

साधारण ९७-९८ पर्यंत क्रिकेट फ़ॉलो करण्यात इंटरेस्ट होता. मग वयोपरत्वे कमी होत गेला. २०११ ची फायनल वगैरे काही मोजक्या मँचेस बघितल्या. बाकी काही मिस झालं तर जीवाला हळहळ वाटत नाही. आयपीएल ची तर मी एकही मँच टीव्हीवर बघितली नाही आहे. एक गहुंजेवर बघितली आणि सॉलीड पकलो.

अाता चालू असलेली अंतर्देशीय स्पर्धा चांगली वाटते. भारत कुठल्याही देशाच्या विरूद्ध जिंकला वा हारला तर सारख्याच पातळीचं आनंद किंवा दु:ख होतं. तो जिंकावा असं वाटत राहतं.

उर्वरित स्पर्धेसाठी भारतीय संघाला शुभेच्छा.

आणि संघाच्या अतीव चाहत्यांना पण शुभेच्छा