Wednesday, 19 February 2025

एफ डब्ल्यू टी

फ्रिक्शन वेल्डिंग टेक्नॉलॉजीज (एफ डब्ल्यू टी) आणि सेटको चं नातं खूप जुनं. २००७-०८ चं. एफ डब्ल्यू टी ने त्यांचा एक स्पिंडल दुरुस्तीसाठी सेटको कडे आणला होता. त्याच सुमारास सेटको ने त्यांच्या पहिल्या मशीनचा स्पिंडल उत्पादन केला होता. 

एफ डब्ल्यू टी आणि सेटको या दोन कंपन्यांमध्ये खूप साधर्म्य आहे. दोन्ही व्यवसाय २००२ मध्ये चालू झाले होते. एफ डब्ल्यू टी सुरुवात लेबर चार्जेस वर फ्रिक्शन वेल्डिंग जॉब वर्क करत झाली होती. नंतरच्या काळात एफ डब्ल्यू टी मशीन उत्पादक म्हणून नावारूपाला आली. सेटको ने सुद्धा व्यवसायाची सुरुवात स्पिंडल दुरुस्ती क्षेत्रात केली आणि आता आघाडीचे    स्पिंडल उत्पादक म्हणून पाय रोवण्याची धडपड चालू आहे. आधी अल्ट्रा प्रिसीजन स्पिंडल असणाऱ्या व्यवसायाचे नाव सामंजस्य करारानंतर सेटको झालं तर एफ डब्ल्यू टी ने अमेरिकेच्याच एम टी आय बरोबर हातमिळवणी केली. दोन्ही व्यवसाय या स्ट्रॉंग मूळ सिद्धांतावर काम करतात आणि नफा हा त्यांच्या व्यवस्थापकीय पद्धतीचा परिपाक आहे असं मानतात. मग ते मनुष्यबळ व्यवस्थापन असो, पारदर्शकता असो, विश्वास असो वा ग्राहक केंद्रित सूत्र असो. 

वैयक्तिक पातळीवर मी एफ डब्ल्यू टी  चे संस्थापक श्री यतीन तांबे यांना मेंटर म्हणून बघतो. ते आमचे ग्राहक तर आहेतच पण अनेक प्रसंगी त्यांनी मित्रत्वाचं नातं फार जिव्हाळ्याने निभावलं आहे. व्यवसायात मला कधीही आव्हानात्मक परिस्थिती उभी राहिली तर मी यतीन सरांकडे हक्काने सल्ला मागण्यासाठी गेलो आणि त्यांनीही मला कधी निराश केलं नाही. सप्टेंबर २०१५ साली जेव्हा माझी दुसरी प्लास्टी झाली तेव्हा व्यावसायिक आयुष्याचा झोल निस्तरण्यासठी मी यतीन सरांकडे गेलो आणि त्यांनीच माझी मनीष गुप्ता सरांशी ओळख करून दिली ज्यांनी एकूणच व्यवसायाकडे बघण्याची नवीन दृष्टी दिली. 

आज, एफ डब्ल्यू टी  हा सेटको चा महत्वाचा ग्राहक आहे. त्यांच्या प्रत्येक मशीनचा स्पिंडल सेटको पुरवते. अर्थात हे घडताना यतीन सर आणि त्यांच्या टीमचा मनःपूर्वक सपोर्ट हा खूप महत्त्वाचा घटक आहे. यतीन सरांनी खऱ्या अर्थाने आमचं हँड होल्डिंग केलं आणि सप्लायर पार्टनर म्हणून आम्हाला डेव्हलप केलं. 

काही दिवसांपूर्वी एफ डब्ल्यू टी त्यांच्या महत्वाच्या व्हेंडर्स चा सत्कार केला. त्यात सेटको चा पण समावेश होता. एकूणच यतीन सर आणि एफ डब्ल्यू टी च्या पूर्ण टीमप्रति आम्ही कृतज्ञ आहोत. 

हे अवॉर्ड घेण्यासाठी जरी मी स्टेज वर गेलो तरी त्या कौतुकाची खरी हकदार ही आमची उत्पादन टीम आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. 

Wednesday, 5 February 2025

मुलगा अतिशय प्रसिद्ध इंजिनियरिंग कॉलेज मधून मेकॅनिकल इंजिनियर झालेला. घरच्या व्यवसायात एक वर्ष हातभार लावला. मग परत एका चांगल्या कॉलेज मधून एम बी ए झाला. 

मला जॉब साठी फोन केला तेव्हा हा मेकॅनिकल इंजिनियर आणि एम बी ए मुलगा एका कन्स्ट्रक्शन कंपनीत मार्केटिंग इंटर्न म्हणून काम करत होता. त्याने फोन केल्यावर मी त्याला पहिले ही भानगड विचारली की मेकॅनिकल केल्यावर कन्स्ट्रक्शन कंपनीत का काम करतो आहेस? त्यावर त्याने कुठे जॉब मिळत नाही म्हणून जो मिळाला तो घेतला हे सांगितलं. 

मी म्हणालो, ते ही ठीक आहे, पण घरच्या व्यवसायाला का पुढे नेत नाही? तर म्हणाला की लहान आहे व्यवसाय आणि खूप चॅलेंजेस आहेत. 

मी म्हणालो, मी जॉबसाठी तुझा इंटरव्ह्यू घेईल पण त्या आधी घरचा व्यवसाय का पुढे नेऊ नाही शकत याची मला समाधानकारक उत्तरं दे. ती मिळाली तर मी पुढे जाणार नाही. 

फोन ठेवताना तो मुलगा म्हणाला "इतके इंटरव्ह्यू झाले माझे. पण व्यवसायात काय आव्हानं आहेत आणि तो पुढे का चालवत नाही यावर कुणी चर्चा केली नाही."

बहुतेक त्याच्या टोन मध्ये कौतुक असावं. पण त्याला बिचार्याला काय माहित की मी आणि माझा बिझिनेस पार्टनर वाघेला यांनी उभ्या केलेल्या बिझिनेस कडे आमची पुढची पिढी ढुंकूनही बघत नाही. आणि त्याचा बदला म्हणून ज्यांच्या घरात व्यवसाय आहे, ते जॉब मागायला आले की त्यांनी घरातल्या व्यवसायाला पुढे न्यावं यासाठी अर्ध्या एक तासाचं लेक्चर घेतो. 

पण खरंच सांगतो, माझ्या या प्रयत्नाला अजून एकदाही यश मिळालं नाही. हा तरी मुलगा इंटरव्ह्यू झाल्यावर घरी जाऊन आई वडिलांना "मी घरच्या व्यवसायात जॉईन होतो" असं सांगतो का हे बघायचं आहे. 

Sunday, 2 February 2025

जावे त्या देशा

 व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित मित्रगण 

हृदयात धडकी भरावी असे अनेक मित्र समोर दिसत आहेत. 

सगळ्यात प्रथम जावे त्या देशा या पुस्तकाचा लेखक मंदार वाडेकर आणि प्रकाशक झंकार ऑडिओ यांचे मनःपूर्वक अभिनंदन. फेसबुकवर लिखाण करून त्याचे पुस्तक छापणाऱ्यांची काही जण खिल्ली उडवतात. ते साहजिक पण आहे म्हणा. मी ही त्यापैकी एक आहे. कारण आम्ही या क्षेत्राची निवड केली नाही आहे, तर एक व्यासपीठ तयार झालं आहे, त्याचा वापर करून आपल्या छंदाला एक मूर्त स्वरूप मिळावं म्हणून हा खटाटोप आहे. त्यातून अर्थार्जन व्हावं हा बहुतांश लोकांचा उद्देश नसावा, माझाही नव्हता आणि मंदारचा पण नसावा. असं असूनही हा घाट घातला जातो. त्याचं साहित्यिक मूल्य काय आहे, लिखाणाचा दर्जा काय आहे यावर फारशी चर्चा करण्यात काही मतलब नाही कारण कला क्षेत्रातील लोक नसल्यामुळे लिखाणाचा रियाज नसतो. तर ती पातळी गाठणे हे अवघडच आहे. पण तरीही आपलं लिखाण हे कुठल्या ब्लॉग सर्व्हर वर ठेवण्याऐवजी तिचं लिखित स्वरूपात पुस्तक आणणे हे माझ्यालेखी कौतुकास्पद आहे त्याबद्दल पुन्हा एकदा मंदार आणि प्रकाशकांचे अभिनंदन. 

मंदारची आणि माझी ओळख फेसबुकची. त्याचा एक तुफान विनोदी लेख माझ्या वाचनात आला. त्यावेळी त्याने त्याच्या ब्लॉगचा ऍड्रेस तिथे लिहिला होता. मग मी तिथे अजून काही लेख वाचले आणि त्याला मित्र विनंती पाठवली, ती त्याने स्वीकारली सुद्धा. ही गोष्ट साधारण २०१४ ची. आता जवळपास एक दशक झालं आमची ओळख होऊन. 

आज त्याने मला इथे प्रमुख अतिथी म्हणून का बोलावलं हा माझ्यासमोर प्रश्नच आहे. मी त्याला म्हंटले सुद्धा की एक मित्र म्हणून प्रेक्षकात बसतो मी, हे व्यासपीठ वगैरे जास्त होतं आहे. कारण लौकिकर्थाने आम्ही एकमेकांच्या पोस्टवर पडीक नसतो. बरं पुस्तकात त्याने उल्लेख केल्याप्रमाणे तो संघाचा माणूस आणि मी डाव्या विचाराचा पण सेंटर लाईन कडे असणारा. म्हणजे फेसबुकच्या भाषेत तटस्थ किंवा डबल ढोलकी वगैरे वगैरे. बर स्टेजवर अध्यक्ष म्हणून शेफाली मॅडम. म्हणजे या सगळ्या समीकरणात मी कुठेच बसत नव्हतो. म्हणजे मंदारच्या लिखाणाचा फॅन तेही काही विशिष्ट पोस्ट चा ही एक उपाधी सोडता माझ्याकडे दुसरं काही क्वालिफिकेशन नव्हतं. पण तरीही त्याने मला बोलावलं आणि इथे बोलण्याची संधी दिली याबद्दल सर्वप्रथम त्याचे आभार मानतो. 

  आता पुस्तकाबद्दल जावे त्या देशा. सगळ्यांना माहिती आहे की आजकाल पुस्तक वाचण्याचं प्रमाण खूप कमी झाला आहे. कार्यक्रमात बोलायचं म्हणून मी मंदार कडून पुस्तक मागून घेतलं. म्हणजे पिक्चर न पाहता रिव्ह्यू लिहिणं किंवा कुठल्याही विषयावरती फारसा अभ्यास न करता मत प्रदर्शित करणं हे सोशल मीडिया वरती चालतं. पण तुमच्यासारखे बहुश्रुत लोक जेव्हा समोर बसलेले असतात तेव्हा आपलाही अभ्यास झालेला असावा असं मला वाटलं. त्यातही अजून एक गंमत झाली. मंदारने मला जे पुस्तकाची कॉपी पाठवली त्यामध्ये 240 व्या पानानंतर 245 पान आलं होतं. मंदारला मी सांगितल्यानंतर ही चूक फक्त माझ्याच पुस्तकात झाली होती. मला क्षणभर शंका आली की मंदारने मुद्दामून असं पुस्तक माझ्याकडे पाठवलं का मी खरंच वाचतोय का. ती चूक लक्षात आली नसती तर कदाचित मंदारने माझी चिरफाड करणारी पोस्ट टाकली असती का आणि मग त्याच्या कुठल्यातरी नागपूरचे मित्राने या ओव्हरटेड माणसाला का बोलवलं अशी कॉमेंट केली असती का हे सगळं माझ्या मनात येऊन गेलं. जोक्स  अपार्ट मला सांगायला आनंद वाटतोय की मंदारच्या पुस्तकाने मला परत जुना मीच भेटवला. 30 जानेवारीला रात्री पुस्तक वाचायला घेतल्यानंतर एक फेब्रुवारीला संध्याकाळी मी ते वाचून संपवलं होतं. म्हणजे मनात आणलं तर आजही पुस्तक पूर्वीसारखं मी एका बैठकीत संपवू शकतो हा विश्वास जावे त्या देशा या पुस्तकाने दिला याबद्दल मी मंदारचे आभार मानतो. 

पुस्तक दोन भागात आहे. पहिला भाग सावंतवाडी सांगली मुंबई दुबई सिंगापूर इथपर्यंत आहे आणि नंतरचा भाग हा अमेरिकेला समर्पित आहे. प्रवास हेच मुळात एक विद्यापीठ आहे असं माझं मत आहे. मंदारच्या पुस्तकाने ते अधोरेखित झालं आहे. फक्त मी जे प्रवासातून शिकतो आणि मंदार ज्या अँगल ने प्रवास करतो, त्यातील गोष्टी टिपतो यात जमीन अस्मानाचा फरक आहे. 

 पुस्तक वाचल्यावर पहिली भावना मनात कुठली आली असेल तर ती म्हणजे मंदार बद्दल मत्सर. ही भावना तो अमेरिकेत राहतो, बँक ऑफ अमेरिकेचा व्हाईस प्रेसिडेंट आहे, डॅलस मध्ये त्याचं अलिशान घर आहे त्याच्याकडे फोर्ड एक्सप्लोरर आहे, हार्ले आहे म्हणून नाही तर मला त्याची असूया वाटली ते त्याच्या नॉलेजचा आवाका बघून. म्हणजे हा माणूस काय करत नाही? उत्तम लिहितो, कविता करतो, गातो, इंग्रजी पिक्चर बघतो, त्यातील डायलॉग लक्षात ठेवतो, त्याचं तुफान वाचन आहे, कलेचा आस्वाद घेतो.  अरे म्हणजे एखाद्या माणसात किती गुण असावेत. मला मंदार चा हेवा वाटला तो ह्या गोष्टींसाठी. जावे त्या देशा ही सिरीज मी वाचायला लागल्यावर मंदारला 22 एप्रिल 2023 ला मेसेज पाठवला तो खालील प्रमाणे 

"तुझी सध्याची सिरीज फारच दर्जेदार लिखाणाची मेजवानी आहे. त्यात तुझा नेहमीचा विनोदाचा बाद सोडून तुझ्या व्यक्तिमत्त्वाची प्रगल्भ संवेदनशील बाजू त्या लिखाणाद्वारे समोर येत आहे ती अचंबित करणारी आहे. ज्या लिखाणाने खेळून ठेवलं असं फार कमी फेसबुकवर वाचायला मिळतं अशा काही मोजक्या लिखाणात तुझ्या या सिरीजचा समावेश करेल. तू तंत्रज्ञ आहेसच, हे लेख जपून ठेवावे हे मी सांगण्याची गरज नाही पण तरीही आग्रह धरतो. 

कॉमेंट द्वारे कौतुक करणे बाबतीत मी फार कंजूष आहे असा माझ्यावर आरोप केला जातो. पण तुझ्या पोस्टवर कॉमेंट करताना मी थकत नाही हे मला विशेष सांगावं वाटतं."

त्यानंतर कामाच्या गडबडीत माझे काही लेख वाचायचे राहून जायचे मग मी तो नाद सोडून दिला पण ते करताना मला वाटलं होतं की या लेखांचं नक्की पुस्तक येईल आणि तेव्हा मला सर्वच सलग वाचता येईल. आज माझं भाकीत खरं ठरलं याचा आनंद होतोय. 

या पुस्तकात मला काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या त्याचा उल्लेख इथे करावासा वाटतो. थोडसं ऐकायला कुणाला कसंतरीच वाटेल पण मंदारच्या हृदयामध्ये थोडा समाजवाद पण लपलेला आहे. तो अमेरिकेत राहतो, बँक ऑफ अमेरिकेचा व्हाईस प्रेसिडेंट आहे, म्हणजे तो मेंदू ने भांडवलशाहीचा पाईक आहे. पण हृदयात त्याच्या सोशॅलिझम आहे हे अनेक ठिकाणी जाणवतं. मी सुद्धा कॅपिटलिझम आणि सोशॅलिझम एकाच शरीरामध्ये घेऊन फिरणारा माणूस आहे. अतिशय क्षुद्र उदाहरण आहे माझं.  पण जेव्हा मंदार नेटिव्ह अमेरिकनस, तिथली ब्लॅक लोक यांच्या बद्दल, त्यांच्या मनस्थितीबद्दल, त्यांच्या सामाजिक परिस्थितीबद्दल अतिशय पोट तिडकीने लिहितो तेव्हा आम्ही दोघे एकाच नावेतले प्रवासी आहे असं मला प्रकर्षाने जाणवतं. हे पुस्तक इंग्रजीमध्ये बहुदा येणार नाही कारण ते आलं आणि त्याच्या अमेरिकन सुपीरियर्सनी वाचलं तर मंदार तिथं डिपोर्ट होईल अशी शंका माझ्या मनात साठवून गेली. 

आणि दुसरी गोष्ट मला भावली ती म्हणजे मंदारचं प्राणी आणि पक्षांबद्दल सप्रेम एकही प्राणी किंवा पक्षी त्याच्या प्रेमातून सुटला नाहीये. म्हणजे मग त्यात साप आहे, मासे आहे, खारुताई आहे, घोडे आहेत, अस्वल आहेत, मूस नावाचा प्राणी पण आहे. प्राण्यांना असणारं जगण्याचं स्वातंत्र्य, त्यावर मानवाने घातलेला घाला आणि त्यांच्याबद्दल असणारी आत्मीयता याबद्दल मंदारने वेगवेगळ्या लेखात फार मनापासून लिहिलं आहे. मंदारच्या व्यक्तिमत्त्वाची ही हळवी बाजू पहिल्यांदाच या पुस्तकाच्या निमित्ताने माझ्यासमोर आले. 

लिहिण्याच्या फ्लो मध्ये अनेक लेखक, अभिनेते, चित्रपट, गाणे, गायक यांचे संदर्भ येतात ते सर्व अमेरिकन असल्यामुळे थोडी पंचाईत होते. म्हणजे एका लेखांमध्ये माडगूळकरांच्या बनगरवाडीचा उल्लेख आहे. ते रिलेटही होतं. पण ट्रूपाक, ज्युएल, ग्रीन डे अशा रॅपर,सिंगर किंवा अल्बम चे उल्लेख आले त्याबद्दल लक्षात येत नाही. जुन्या काळात पुस्तकांमध्ये एक शेवटी संदर्भसूची असायची. या पुस्तकाच्या पुढच्या आवृत्तीमध्ये हे जे लोक आहेत यांची माहिती जिथे मिळेल त्या वेबसाईटचा ऍड्रेस जर शेवटी संदर्भसूची मध्ये दिला तर आमच्या नॉलेजमध्ये अजून एक चांगली भर पडेल असं मला एक मनाला वाटून गेलं.  हेच मी जॉन रॉकफेलर किंवा तो एक श्रीमंत की ज्याचं मी नाव आता विसरलो. मी शोधायचा प्रयत्नही केला की ज्याने एक पूर्ण जंगल बसवलं  आहे त्यांचाही उल्लेख त्या संदर्भसूची मध्ये व्हावा 

मी जरी मराठवाड्यातील असलो तरी आता पुण्याचा पाणी गेले 40 वर्ष पितोय त्यामुळे पुस्तक ची फक्त स्तुतीच केली तर मला फारसं करमणार नाही म्हणून काही त्रुटी पण सांगू इच्छितो. 

सगळ्यात पहिले म्हणजे पुस्तकात फोटो का नाहीयेत हा प्रश्न मला पहिला पडला. कारण मंदार कडे एक भारी चा कॅमेरा आहे त्याच्याकडे फोटो काढण्याची कला ही असणार आहे.  आणि त्यांनी हे जे काही त्यांनी प्रवास वर्णन केलेलं आहे तिथे त्यांनी खूप फोटोही काढले असणार आहेत.  त्या फोटोंचा समावेश या पुस्तकात का नाहीये हे एक मला कळलेलं नाहीये . कारण तो येलो स्टोन, तिथला कारंजा,  किंवा जंगल,  तो टेक्सास मधला मोकळा रस्ता,  किंवा असंख्य दर्या,  किंवा ती क्षारयुक्त पांढूरकी जमीन इथले जर फोटो असल्यास ते तर अजून बहार आली असती.  मंदारच्या लिखाणाने ते सगळं डोळ्यासमोर येतं पण फोटो त्याला पूरक असल्यास ते मला असे एक वाटून गेलं 

आणि दुसरी ही तक्रार आहे की अनेक इंग्रजी शब्द ज्याला मराठी प्रतिशब्द उपलब्ध आहेत त्यांचा वापर का नाही केला हे एक माझ्या मनाला चाटून गेलं. म्हणजे एका वाक्यामध्ये युज्वली हे देवनागरीत  लिहिले की ज्याला "सहसा" हा प्रतिशब्द अगदी सहज उपलब्ध आहे. अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर एका वाक्यामध्ये जोजवणे हा अगदी मूळ मराठी शब्द की जो आज फारसा प्रचलित नाहीये पण त्या वाक्याच्या सुरुवातीला सोशल फॅब्रिक की ज्याला माझ्या मते सामाजिक वीण हा एक चांगला प्रतिशब्द उपलब्ध आहे तर हे का नाही वापरले ही एक छोटीशी माझे तक्रार समजू शकता. जी पुढच्या आवृत्तीमध्ये आपण दुरुस्त करू शकतो असं मला वाटलं 

 अर्थात पुस्तकाच्या एकूण कंटेंट समोर दुसरी सूचना तुम्ही टाळू शकता पण पहिल्या सूचनेचा जरूर विचार व्हावा असं माझं नम्र मत आहे. पुस्तक वाचताना मला बऱ्याचदा असं मनामध्ये आलं की अमेरिकेत फिरणाऱ्यांसाठी काही लेख तर अगदी पाठ्यपुस्तकासारखे आहेत फिरायला जायचं असेल तर त्याच्यातून अगदी नोट काढू शकतो आपण आणि पुस्तकाचा सुयोग्य वापर होऊ शकतो. 

 मंदार अजून काही देश फिरलेला आहे. माझ्या मते त्याची काही लेखही होते. व्हॅटकीन सिटी, ग्रीस, इजिप्त या देशातील पर्यटनाबद्दल त्याने लिहिलेलं मला आठवतं आहे.  कदाचित दुसऱ्या पुस्तकांसाठी हे सगळे लेख त्याने राखून ठेवलेत असं मला वाटतं. तेही पुस्तक त्याचं लवकर यावं.  त्याचे अनेक विनोदी लेख ही आहेत  त्याचेही पुस्तक यावं ह्या शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा मंदार आणि प्रकाशकांचे अभिनंदन करतो आभार मानतो आणि तुम्हा सर्वांचे आभार मानतो की तुम्ही माझे हे मनोगत ऐकून घेतलं धन्यवाद. 


Friday, 31 January 2025

it's okay

मी काही इंग्लिश गाण्याचा भोक्ता वगैरे नाही आहे. म्हणजे कधी ते समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. अगदीच काही जुनी गाणी लक्षात येतात कारण त्याचं इंग्रजी कळतं. पण तरीही कधी ब्रिटन किंवा अमेरिकन गॉट टॅलेंट बघतो. त्यातील काही समजतं तर काही प्रेझेंटेशन मधील भावना पोहोचते. 

असंच एक गाणं मी अमेरिकन गॉट टॅलेंट मध्ये बघतो. किमान शंभर वेळा तरी मी ते पाहिलं असेल. आणि दर वेळेला ते गाणं ऐकताना, बघताना माझा घसा दुखतो. 

गाणं म्हणणारी एक तिशीतली युवती आहे, जेन तिचं नाव. गाणं म्हणताना ती नाईटबर्ड नाव वापरते. स्टेज वर ती बोलायला चालू करते आणि पाश्चात्य पद्धतीप्रमाणे आपलं दुःख लागलीच सांगत नाही. बहुतेकदा या कार्यक्रमात आपापल्या नातेवाईकांबरोबर किंवा मित्रमंडळी बरोबर येतात. पण इथे ही जेन एकटीच आली आहे. ती ज्या पद्धतीने म्हणते की I am here by myself तेव्हा आपल्या हृदयात पण तुटतं.  बोलण्याच्या फ्लो मध्ये अगदी सहजतेने सांगून जाते की तिला कँसर आहे आणि आता सुद्धा तिच्या फुफ्फुस, मणका आणि लिव्हर मध्ये मेट्स आहेत. (इतके प्रॉब्लेम असूनही) तुझ्या चेहऱ्यावर इतकं तेज कसं काय, हे म्हंटल्यावर ती सहजतेने म्हणते Its important that everyone knows I am so much more than the bad things happen to me. 

ती गाणं म्हणायला सुरु करते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर मिलियन डॉलर स्माईल येतं. आणि नंतर ती जे म्हणते, आपल्याला जाणवतं की ती फक्त तिच्यासाठी गाते आहे. गाण्याचे शब्द आणि तिचा अत्यंत तरल आवाज, हे एक अप्रतिम कॉम्बिनेशन असतं. 

I moved to California in the summertime
I changed my name, thinkin' that it would change my mind
I thought that all my problems, they would stay behind
I was a stick of dynamite and it just was a matter of time, yeah

ती आपलं गाव सोडून उपचारासाठी कॅलिफोर्नियाला आली आहे. नावही तिने बदललं आहे. तिला वाटतं की माझे प्रश्न संपतील, पण नाही, तिला माहित झालं आहे की आता फक्त काही काळाची सोबत आहे.

It's okay, it's okay, it's okay, it's okay
If you're lost
We're all a little lost and it's alright
It's okay, it's okay, it's okay, it's okay
If you're lost
We're all a little lost and it's alright

आयुष्याची लढाई जरी हरावी लागली तरी ठीक आहे. आपल्याला कधी ना कधी, कुठल्या ना कुठल्या स्वरूपात पराभवाचा सामना करावा लागतो, ते ही ठीकच आहे.

Oh dang, oh my, now I can't hide
Said I knew what I wanted, but I guess I lied

ती कबुली देते की मी आयुष्याकडून काय हवं ते मला माहित होतं असं मला वाटायचं पण बहुतेक मी स्वतःशी खोटं बोलत होते.

it's alright
To be lost sometimes

असं म्हणत आपल्या मुलायम आवाजात ती गाणं संपवते आणि त्या तीन चार हजार लोक असलेल्या हॉल मध्ये टाचणी आवाज करेल इतकी शांतता दोन सेकंदासाठी पसरते. नंतरच्या टाळ्यांपेक्षा ही शांतता तिच्या गाण्याला मिळालेली खरी पावती असते. सायमन कॉवेल सारखा इतर वेळेस धीरोदात्त जज सुद्धा मनातून हलतो. तो म्हणतो सुद्धा की तुझा संघर्ष ज्या सहजतेने सांगत गेलीस ते स्तिमित करणारं होतं. त्यावर ती जे उत्तर देते ते जीवन मृत्यू कोळून पिलेल्या एखाद्या तत्वज्ञापेक्षा कमी नसतं. ती म्हणते "You can't wait unless life is not hard anymore before you decide to be happy" आयुष्यात खुश राहण्याचा निर्णय घेण्यासाठी अजून कुठली परीक्षा घेण्याची मी कशासाठी वाट पाहू.

गाणं संपल्यावर ती बॅक स्टेज मध्ये येऊन म्हणते की मी जगण्याची २% शक्यता आहे. पण २% म्हणजे शून्य नाही. ही २% जगण्याची आशा पण माझ्यासाठी खूप स्पेशल आहे.

सात एक मिनिटांचा हा व्हिडीओ संपल्यावर दोन मिनिटे मला काहीच बोलावंसं वाटत नाही. जेनच्या प्रश्नासमोर अत्यंत खुजे असणाऱ्या पण मला स्वतःला खूप मोठे वाटणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मी तयार होतो.

Friday, 17 January 2025

लेट गो

गिव्ह अप करणे आणि लेट गो करणे याचा मराठी अनुवाद एकच होतो "सोडून देणे". पण इंग्रजीचा शब्दाचा भावानुवाद केला तर अर्थ वेगळा आहे. गिव्ह अप करणे म्हणजे "हार मानून सोडून देणे" आणि लेट गो करणे म्हणजे "जे झालं ते झालं, पण मी दुसरा कुठला तरी मार्ग शोधेल, पण ज्याचा ध्यास आहे तो पूर्ण करेल" याची ग्वाही स्वतःला देणे. लेट गो करणे ही खरंतर तसं बघायला गेलं तर मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी फार महत्वाचा गुण आहे. गिव्ह अप करणं कदाचित प्रोफेशनल ग्रोथ साठी चांगलं नाही आहे. 

लेट गो न करणे म्हणजे दोन गोष्टींवर आपण अडून राहतो. एकतर आपल्याला व्यक्तीवर अडकून बसतो किंवा आपल्याला वेळेचं प्रेशर असतं. 

लेट गो न करणे हा माझा स्वतःचा अवगुण होता. आता बऱ्यापैकी त्यावर कंट्रोल आणला आहे. एखादी गोष्ट माझ्या मनाप्रमाणे नाही झाली, वर सांगितल्याप्रमाणे, किंवा एखाद्या व्यक्तीकडून, की प्रचंड अस्वस्थ व्हायचो. अजूनही थोडा होतो. पण वयोमानानुसार किंवा अनुभव घेऊन आता थोडी अस्वस्थता कमी झाली आहे. माझी मिसेस, वैभवी ही लेट गो करण्याच्या गुणाचा एपिटोम आहे. माझी जिथे लेट गो करण्याची क्षमता संपते तिथे तिची चालू होते. मुख्य म्हणजे एखादी व्यक्तीने आपल्याबरोबर न राहण्याचा निर्णय घेतला की काय घडलं याचा विचार करून डोकं कुरतडलं जायचं. किंवा एखादी गोष्ट एका ठराविक वेळेत नाही झाली की मला खूप त्रास व्हायचा. अगदी नुकताच असा त्रास एक प्लॉट विकण्याच्या प्रोसेस मध्ये झाला. पण शेवटी लेट गो केलं, गिव्ह अप नाही, आणि विचार केला की जेव्हा होईल तेव्हा होईल. मग माझी तडफड कमी झाली. पण त्याआधी खूप मानसिक डॅमेज झालं होतं.  "कुछ तो मजबूरिया होगी, कोई यूँ ही बेवफा नहीं होता" हे कुणा व्यक्तीबद्दलच नव्हे तर नियतीला उद्देशून पण म्हणू शकतो. आणि या मजबूरिया आपल्याला माहितीच पाहिजे हा अट्टाहास ठेवायला नको याची जाणीव झाली. 

या लेट गो प्रोसेस मध्ये "सोड ना यार, जे झालं ते झालं. काही तरी वेगळं आणि भारी होण्यासाठी हे घडत असेल" अशी भावना मनात येणं आणि मनाला रिलॅक्स करणं याची तुलना मी फक्त एका तळ्यात होती गाण्यामधल्या राजहंस आहे हे कळण्याच्या अवस्थेशी करू शकतो. "चलो इक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनों " या गाण्यात साहिर म्हणूनच गेला आहे 

"तारुफ रोग बन जाये तो उसको भूलना बेहतर,  ताल्लुक बोझ बन जाये  तो उसको तोडना अच्छा, 

वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन, उसे एक खूबसूरत मोड़ देकर छोड़ना अच्छा" 

खूप फटके खाऊन शिकलो की  परिस्थितीला निरोप देण्यात सुद्धा एक शान असावी. भविष्यात कधी भेटण्याची वेळ आली तेव्हा कालपटाचा धागा तुटत पुन्हा एकदा कॉफी मग एकत्र किंवा बियरचा ग्लास टिंग करत चियर्स म्हणण्याची मानसिकता हवी .  कधी परिस्थिती रिजेक्ट करते, कधी एखादी माशूका अलविदा म्हणते तर कधी एखादा मित्र नाकारतो, ते ग्रेसफुली स्वीकारायला शिकायला हवं.  

दुष्मनी जमकर करो लेकिन ये गुंजाइश रहे
अगर कभी हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा न हो

आता कुणालाही बांधून ठेवावंसं वाटत नाही. परिस्थितीला नाही, व्यक्तीला नाही, मित्रत्वाला नाही आणि दुश्मनीला तर नाहीच नाही. तसं केलं तर ते असुरक्षिततेच्या भावनेतून झालं की काय अशी स्वतः बद्दल शंका वाटते. आणि कुणाला "तू नही तो तो और सही, और नहीं तर और कही" असं म्हणत लेट गो केलं तर ९९% वेळा दोन्ही पार्टीचं भलंच होतं  हे एव्हाना अनुभवातून शिकलो आहे. ठीकठाक व्यक्तिमत्व, नॉलेज मिळवण्याची भूक, त्याचं स्किल्स मध्ये बदलण्याचा ऍटिट्यूड, आणि त्याला मूलभूत सिद्धांताची जोड असेल तर ही दुनिया कुणासाठी बेरहम राहत नाही. आणि माझं स्वतःचं म्हणाल तर भरपूर इनिंग खेळून झाल्या आहेत, उन्हाळे पावसाळे पाहिलेत. 

हम भी दर्या है, हमे अपना हुनर मालूम है 
जिस तरफ भी चल पडेंगे रास्ता बन जायेगा 

इंडस्ट्री मधे जवळपास ३५ वर्षे झालीत. परवा च एकाने प्रश्न विचारला की "लोकांनी तुमचं ऐकावं यासाठी तुम्ही वेगळं काय करता?" मी म्हणालो "काहीच करत नाही. फक्त फॉर्मल/इन्फॉर्मल संवादामध्ये आणि कृतीमध्ये समानशीलता पाळतो." त्यातून आयुष्य कधी यश देतं तर कधी अपयश देतं. अपयश आली  तरी जेता मीच असतो कारण मला तिथे अनुभव मिळालेला असतो. जावेद अख्तर लिहून गेलेच आहेत 

क्यो डरे जिंदगी में क्या होगा 

कुछ ना होगा तो तजुर्बा होगा 

असो. काही महिन्यापूर्वी डॉ विकास दिव्यकीर्ती यांचं भाषण ऐकलं होतं. तेव्हा काही नोट्स काढल्या होत्या. त्याचा विस्तार झाला तो असा. 





Sunday, 12 January 2025

उच्च दर्जाचे इक्विपमेंट

नवीन वर्षाची सुरुवात मिश्र पद्धतीने झाली. काही चांगल्या गोष्टी झाल्या तर काही आव्हानं उभी राहिली. आव्हानामुळे तयार झालेल्या परिस्थितीला कसं तोंड दिलं ते स्थिरस्थावर झाल्यावर लिहीनच. आजची पोस्ट नवीन डेव्हलपमेंट बद्दल. थोडं तांत्रिक भाषा वापरून लिहिणार आहे. सांभाळून घ्या. 

आमच्या फिल्ड मध्ये मेट्रोलॉजी साठी आणि उत्पादनासाठी काही उच्च दर्जाचे इक्विपमेंट लागतात, पर्यायाने ती प्रचंड किमती पण असतात. अतिशय बेसिक लेव्हल ची मेट्रोलॉजी इक्विपमेंट आणि मशिन्स च्या मदतीने आम्ही व्यवसाय चालू तर केला, पण आता वेळ अशी आली की आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचे उत्पादन करायचे असेल तर त्याच तोडीचे दोन्ही इक्विपमेंट घेणं हे गरजेचं झालं होतं. त्याच विचारधारेतून आम्ही मागच्या वर्षी पुण्यातील ऍक्युरेट कंपनीचं सी एम एम (को ओर्डीनेट मेझरमेन्ट मशीन) विकत घेतलं. त्यालाच पूरक असं राउंडनेस टेस्टर विकत घेणं ही आमच्या कामाची गरज होती. टेलर हॉब्सन नावाची एक जगप्रसिद्ध ब्रिटिश कंपनी हे मशीन बनवते. पण त्याची नवीन मशीन ची किंमत ही आम्हाला परवडणारी नव्हती. पण मशीन तर घ्यायचीच होती. 

मी यूज्ड मशीन च्या मार्केटचा धांडोळा घेतला. ऑगस्ट २०२३ पासून शोध घ्यायला चालू केलं. आणि शोधता शोधता एक मशीन स्वित्झर्लंड मध्ये एक वर्षाने ऑगस्ट २०२४ मध्ये सापडलं. इ मेल च्या माध्यमातून खूप चर्चा झाली. सेकन्ड हॅन्ड मशीन म्हणजे त्याच्या वर्किंग बद्दल साशंकता. शेवटी ऑर्डर द्यायच्या आधी एकतर स्वित्झर्लंड ला जाऊन किंवा ऑनलाईन डेमो द्यायचं ठरलं. म्युलर मशिन्स नावाच्या सेलर ने पण ते स्वीकारलं. यशस्वी ऑनलाईन डेमो नंतर आम्ही ते ऑर्डर केलं आणि डिसेंबर २०२४ च्या तिसऱ्या आठवड्यात कंपनीत आलं. आणि नवीन वर्षाची सुरुवात करताना ते चालू पण झालं. 

आमच्या स्पिंडल क्षेत्रात पार्टस उत्पादनात ग्राइंडिंग प्रोसेस, ही शेवटची. ती अतिशय महत्वाची. कारण स्पिंडल चे प्रिसिजन हे त्यावर अवलंबून. या भागात सुद्धा आमच्याकडच्या सर्व मशिन्स एकतर मॅन्युअल किंवा फार तर सेमी ऑटोमॅटिक. दोन्ही प्रकारच्या मशिन्स मध्ये गुणवत्तेसाठी आम्ही झगडतो आणि उत्पादकतेबद्दल सुद्धा. याला पर्याय म्हणून काही युरोपच्या अतिशय उच्च दर्जाची गुणवत्ता असणाऱ्या मशिन्स उपलब्ध आहेत पण परत रडगाणं तेच. किंमत. त्या मशिन्स घेणं शक्यच नव्हतं. 

इथे मग आम्ही तैवान उत्पादित मशीन घेण्याचं ठरवलं. इ टेक नावाच्या नवीन मशीन वर शिक्कामोर्तब केलं. ती मशीन सुद्धा डिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यात आली. आणि नवीन वर्षात तिचेही कमिशनिंग पूर्ण होईल. 

या दोन्ही मशिन्समुळे आमची उत्पादन आणि गुणवत्ता क्षमता मध्ये कमालीची सुधारणा होणार आहे. स्पिंडल दुरुस्ती क्षेत्रात अग्रेसर आहोतच, पण उत्पादनक्षेत्रात सुद्धा ती पोझिशन साध्य करण्याचा मनसुबा आहे. या आणि येणाऱ्या मशिन्स च्या मदतीने ते साध्य करू याचा विश्वास वाटतो. 

अजून एका चांगल्या उपक्रमाबद्दल पुढच्या पोस्टमध्ये. धन्यवाद.