Tuesday, 29 September 2015

रेपोरेट

१९९६-९७ ची गोष्ट आहे. मी रोलॉन हायड्रॉलिक्सचा टेक्निकल सेल्स इंजिनियर होतो. विंडसर, इंजेक्शन मोल्डिंग मशीन मॅन्युफॅक्चरर, माझा मोठा कस्टमर. त्यांचं एक मशीन फेल झालेलं दमण मधे. सेलो कंपनीत. खुर्च्या, टेबलं बनायची प्लास्टिकची.

मशीन मेन हायड्रॉलिक सिलिंडर फेल झाला म्हणून झोपली होती. माझ्या कंपनीचे सील वापरले म्हणून मी, विंडसर चा सर्विस इंजिनियर आणि एक गानू म्हणून डिझाईन इंजिनियर अशी तिघा जणांची वरात सेलोला पोहोचली. बाय द वे या गानू मंडळींशी माझं तेव्हापासून जमतं, अगदी ऑपोझिट पार्टीचे असले तरी.

सेलोचे सीईओ राठोड म्हणून होते. एकदम खडूस माणूस. पहिले तर तिघांना सॉलीड धुतला. आणि मग विंडसरच्या एम डी ला सांगितलं, जोवर मशीन चालू होत नाही हे तिघं इथच राहतील. ओलीसच समजा.

मी शॉपफ्लोअर ला गेलो. तिथली सिच्युएशन बघून मी चक्रावून गेलो होतो. जमिनीपासून रूफ टॉप पर्यंत खुर्च्या लागल्या होत्या. मशीन जिथे होती ती जागा फक्त रिकामी होती बाकी नजर जाईल तिथे खुर्च्या. मी तिथल्या मॅनेजरला बोललो "भाऊ, इथे बुड टेकवायला जागा नाही आणि तुझ्या साहेबाला प्रोडक्शन काढायचंच आहे. मशीन चालूच पाहिजे. खुर्च्या कुठे ठेवणार? हे गणीत काय आहे?" तर म्हणाला "दादा, असं आहे. राठोड साहेबांनी जर खुर्चीमागे २५ पैसे कमी केले की मार्केटमधे हवा होते. आणि रात्रीतून सुपडा साफ होतो. दोन दिवस आहात तुम्ही. बघालच."

दुसर्या दिवशी सकाळी मी पाहतो तो मैदान साफ . खुर्च्या गायब. मी विचारलं "ही काय जादू?" तर मॅनेजर म्हणाला "राठोड साहेबांची कमाल, हमाल दे धमाल. २५ पैसे रेट कमी केला खुर्चीचा अन रात्रीतून डीलर्सने उचलल्या सगळ्या खुर्च्या".

१८ वर्षापूर्वी २५ पैसे कमी केल्याने मार्केटमधे असं काय घडलं की उलथापालथ झाली हे कळलं नाही. आज रेपोरेट ५० पॉईंटने कमी झाला म्हणून मार्केटमधे खुशी की लहर का पसरते हे कळत नाही. बँकाचे रेट ०.४ टक्क्याने कमी झाले की मंडळी ४% रेट कमी झाल्यालारखी का उछलकूद करतात, ते ही समजत नाही.

राम, तु अडाणी होतास अन अडाणीच राहणार. 

पंजाब

पंजाबात गेला आहात का तुम्ही. ज्यांच्या घरी तुम्ही जाल तिथे चहाच्या अगोदर एक ताट फिरतं त्यात एकतर काजू, बदाम असे वाटीत मांडून ठेवले असतील. नाहीतर मग काजू असलेले गुड डे सारखे बिस्कीट किंवा मग ओरियो वा डार्क फँटसी सारखे जे मी दुकानाच्या शोकेस मधे फक्त बघू शकतो असे बिस्कीट मांडून ठेवले असतात. पारले जी किंवा मारी पंजाबात फक्त डॉक्टर ने प्रसिक्रिप्शनवर लिहून दिले तर खात असावेत. हे नाही तर मग हलदीरामचे वेगवेगळे चिवड्यांचे प्रकार वाटीत मांडून ठेवतात. त्याचा बकाणा मारून झाला की मग एक टंपास भरून चहा येतो. आपल्यासारखा मराठी माणूस इतकं रैमटवल्यावर गारेगार पडून जातो. यात मग कधी समोसे असतात किंवा कचोरी. एवढं सगळं झाल्यावर मग सरदारजी जेव्हा म्हणतात "चलो अब खाना खाते है" तेव्हा मला भोवळ यायची बाकी राहते.

दोनच महिन्यापूर्वी लुधियानाला ज्यांच्याकडे असा पाहुणचार झोडला असे दोन सरदारजी मनजीतसिंग आणि बलविंदरसिंग परवा कंपनीत आले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी त्यांच्या पाहुणचाराला स्मरून चहा सांगितला. कोपर्यावरचा शंकर्या चहा किटलीत घेऊन आला. आणि मग तो पुण्यातला ३० मिली आणि ६० मिली या कुप्रसिद्ध मापाच्या मधला ४५ मिली चा पंख्याच्या वार्याने उडणार्या प्लास्टिकचा कप समोर ठेवत त्यात किटलीने चहा ओतला. मी ही ऐटीत दोघा सरदारजीना सांगितले "लिजीए चाय" तर दोघे सरदारजी एकमेकांकडे पाहत गालातल्या गालात हसू लागले. मी म्हंटलं "मनजीतजी, क्या हुआ?" तर मनजीतजी हसत म्हणाले "ओय राजेशजी, ये क्या दिया आपने। इससे तो मेरी मुँछे भी गिली ना होगी"

मी खजील झालो. ते गेल्यावर माणसाला तडक मार्केटमधे पाठवून क्रॉकरी मागवून घेतली अन रीतसर कपात चहा बनवायला लागलो.

या एकदा चहाला कंपनीत. टी बॅग्ज देतो. हो आणि एका ऐवजी दोन टी बॅग्ज घ्यायला काही हरकत नसते. नाहीतर परत एखादा सरदारजी सुनवायचा "राजेशजी, इससे अच्छा तो ये होता के गरम पानीही पिला देते" 

अश्रू

मध्ये आमच्या खर्डेघाशी ग्रुपचं गेट टुगेदर झालं होतं. आमचा एक यंग मेंबर आहे. विलास ठेवू यात नाव. स्वत:ची ओळख करून देताना विलास म्हणाला "माझं माझ्या भावनेवर नियंत्रण नाही आहे. कुठे अगदी साधं बोलताना माझ्या डोळ्यातून पाणी येतं." हे बोलताना ही तो पाणावला होता.

मलाच हायसं वाटलं. मला वाटलं, फक्त मीच असा आहे की काय. पण नाही जगात असतात अशी लोकं.

 परवा एका घरगुती कार्यक्रमाला गेलो होतो. लग्नाचा ५०वा वाढदिवस. शिल्पा, उत्सवमुर्तींची मुलगी अगदी व्यवस्थित आई वडिलांच्या आयुष्याचा पट उलगडून सांगत होती. पण मला राहून याचं आश्चर्य वाटत होतं की शिल्पाच्या बोलण्यामध्ये विलक्षण स्थितप्रज्ञता होती. म्हणजे बोलताना आई वडिलांबद्दल प्रेम दिसत होतं, आदर ही जाणवत होता, पण हे सगळं हसत खेळत.

सिद्धार्थ जाधव ने एकदा लक्ष्मीकांत बेर्डे च्या गाण्यावर मेडले सादर केला होता. त्याचं कौतुक करायला महागुरू सचिन आला होता. आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या बद्दल अत्यंत भावूक बोलला. प्रेक्षकातले कित्येक कलाकार आसवं ढाळत होते पण स्वत: सचिन मात्र निर्विकारपणे बोलत होता.

मला नाही जमत. काहीही चांगलं बोलताना आवंढा येतोच येतो. अगदी काहीही. कंपनीत सेल्स टार्गेट अचिव्ह झालं, एक्स्पान्शन म्हणून चेन्नई ब्रांच ओपन झाली, नातेवाईकांच्या कार्यक्रमात चार शब्द बोल म्हणून कुणी सांगितलं, शाळेच्या आठवणी सांगताना, अगदी कुठलीही आनंददायी गोष्ट सांगताना घसा चोक होतोच होतो. जॉब मागायला लोकं येतात. त्यांचा इंटरव्ह्यू घेताना लोकं त्यांची कहाणी सांगतात. ते निवांत पणे सांगतात. अन मी आतल्या आत ढासळत असतो.

वाघेला माझा बिझिनेस पार्टनर. त्याच्या मुलीचं लग्न. सोयरे लंडनचे. चांगले ४०-४५ जण. त्यात एक बाबुभाई म्हणून मुलाचे काका, वय ८० वर्ष. म्हातार्याशी काय सुत जुळलं पण चार दिवसांच्या साथ संगतीनंतर बाबुभाई आमच्या वडिलांच्या गळ्यात पडून "आपके बेटे के रूप मे मुझे भगवान मिला है" म्हणत गदगदून रडू लागले. मलाही विचित्र वाटत होतं पण डोळ्यातल्या धारा काही मी थोपवू नाही शकलो.


तसं म्हंटल तर मी बोलू शकतो चारचौघात. पण ह्या रडक्या भावनेवर नियंत्रण नसल्यामुळे सगळा लोच्या होतो. मग मी बोलायचं टाळतो. आता कंपनीत प्रवचन द्यायचं काम माझ्याकडे असतं. बराच अभिनय करत मी ते पार पाडतो.

अर्थात हे वयोपरत्वे बदलू ही शकेल. हेच पहा ना, वैभवीकडे कुणी लहान मुल रक्त काढायला आलं की ती बाळाला मांडीवर घेऊन बसायचं काम करते. रक्त तिच्या lab चा टेक्निशियन काढतो. कारण का? तर ती आजकाल भावूक होते. आता ह्याच वैभवीने १९९२ साली सह्याद्री एक्स्प्रेस च्या धडकेत निधन पावलेल्या ४० एक लहान मुलांचं पोस्टमार्टेम निर्विकारपणे पार पाडलं होतं यावर तिचा स्वत:चा विश्वास बसत नाही.

इथे फेसबुकवर सुद्धा काही, पण अगदी काहीच, पोस्ट वाचून मी भावूक होतो. आता तो स्वभाव आहे. त्याला इलाज नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती. अश्रू  ढाळण्याच्या बाबतीत इतका उदार असणारा मी हसण्याच्या बाबतीत मात्र फार कंजूष आहे. डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसणे हे गेल्या कित्येक महिन्यात मला आठवत नाही. आमचा एक मित्र आहे अतुल वाघ. तो आला की हसवतो बा. पण बाकी आनंद. चला हवा येऊ द्या बघताना वैभवी खदाखदा हसत असते आणि मी मात्र माझं स्मित जणू २५००० रुपये तोळा असल्यासारखं जपून वापरतो.

तर हा माझा प्रकृतीदोष आहे का? मला नाही वाटत. असतो एकेकाचा स्वभाव. म्हणून तर जग बनतं ना! आता सगळीच मंडळी एकसारखी असली असती तर चाललं असतं का?


Saturday, 26 September 2015

तो

तो आला. असेच चुरगळलेले कपडे होते अंगावर. गणेश आला, म्हणाला त्याला हेल्परचं काम हवंय. मी सांगितलं, ठीक आहे थांबायला सांग. तो थांबला. माझी मिटींग झाली अर्ध्या पाऊण तासाची. तोवर तो असाच थांबून होता, कंपनीच्या दरवाजात.

मिटींग संपली. मला तो दिसला. मी बोललो, ये. केबिनमधे बोलावलं आणि विचारलं "हा बोल, काय काम करायचं आहे" तर म्हणाला "काहीही, तुम्ही सांगाल ते. हेल्परचं वैगेरे" मी विचारलं, "काय शिकला आहेस?" तर बायोडाटा काढून दिला. आश्चर्य वाटलं, कारण हेल्परचं काम मागणारे शक्यतो बायोडाटा घेऊन फिरत नाही. ते आपलं तोंडीच सांगतात. "आठवी पास किंवा दहावी नापास" वैगेरे.

बायोडाटा उघडला आणि तीन ताड उडालो. शिक्षण: DETC, Diploma in Electronics and Telecommunication. मी बोललो "काय रे, तु तर डिप्लोमा आहेस, मग हेल्परचं काम का मागतो आहेस" तर म्हणाला "काय करणार सर, जॉबची खुप शोधाशोध केली. मिळतच नाही आहे. मग हेल्परही सही" मी बोललो "अरे हेल्परचा पगार कितीसा असा. तुला नाही अॅक्सेप्ट होणार" तर बोलला "द्याल त्या पगारावर काम करेन"

अवसान गोळा करून मी त्याला म्हणालो "वेडा आहेस का तु? डिप्लोमा आहेस तु चांगला. हेल्परचं काम का मागतोस. काम कुठलंही वाईट नाही हे कळतं मला, पण तु शिकला आहेस, त्याला न्याय देणारं काम निवड."

तर डोळ्यात पाणी आणून म्हणाला "सर, जॉबची खूप गरज आहे. काहीतरी करा" आणि मग घरची शेती, दुष्काळ, कर्ज हे ही सगळं सांगितलं.

मी बोललो "हे बघ, मी तुला हेल्पर म्हणून तर ठेवू शकत नाही. माझी मेकॅनिकल कंपनी. माझ्याकडे मशीन ऑपरेटर म्हणून जॉईन व्हायला आलेल्या पोरांना मी  इंजिनियरचंच काम करायला सांगितलं. तु इलेक्ट्रॉनिक्सचा इंजिनियर. त्यामुळे तुझ्या आवडीचं कामही माझ्याकडे नाही."

कागद ओढला. आजूबाजूच्या इलेक्ट्रॉनिक्स संबंधित आठ एक कंपन्यांची नावं लिहीली. तिथल्या माहितीतल्या लोकांचे नंबर दिले. सांगितलं "या कंपन्यात जा आणि जॉब आहे का विचार इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरचा. कुठे ना कुठे मिळेल चान्स."

जाताना सांगितलं "आणि हे बघ, जॉब मिळाला की पेढे द्यायला ये" अर्ध्या तासाच्या संभाषणात पहिल्यांदाच त्याच्या चेहर्यावर हास्य उमललं.

Thank you म्हणत गेला खरं तो आणि इतक्या वेळाचं सांभाळलेलं धैर्य मी मुक्तपणे ओघळू दिलं.

मनातून हादरलो नसल्याचा अभिनय यशस्वी झाला.

तो.....गडबडीत नावही विचारायचं राहिलं माझं. काही हरकत नाही, पेढे द्यायला येईल, तेव्हा विचारेनच मी.

Thursday, 24 September 2015

सोशल मिडिया

सोशल मिडिया चा वापर जपून करायला पाहिजे हे जे सारखं म्हंटल जातं त्यात नक्कीच तथ्य आहे. आणि मग पोलिस किंवा शासन जेव्हा आवाहन करतं की आणीबाणीच्या परिस्थितीत सोशल मिडिया चा वापर टाळा ते संयुक्तिक ही वाटतं.

फेसबुकवर ऑफिसला जायच्या आधी एखादा तास बसलं आणि त्यातल्या त्यात एखादा महाराष्ट्र भूषण सारखा पेटता मुद्दा असला की असं वाटतं की काय भयानक परिस्थिती झाली आहे भारताची. धर्माची भांडणं आहेत, दोन जातीचं एकमेकांशी पटत नाही आहे. कसं होणार या देशाचं? वान्देच वांदे. आणि मग त्यातून माझ्याकडूनच एखादी पोस्ट लिहिली जाते की भारतात यादवी होईल, एकमेकांना मारतील वैगेरे.
इथे काही बायकांच्या पोस्ट वाचतो की पुरुष किती स्त्री लंपट आहेत, सारखे इन बॉक्स मध्ये येउन त्रास देतात. कधी कधी अशा पोस्टचा  इतका अतिरेक होतो की मला माझ्याबद्दल च  डौट यायला लागतो, च्यायला आपण पण असेच आहोत का, पुरुषत्व अशा पद्धतीने गाजवणारे.

मी ऑफिसला येतो. इरफान, सलीम आणि रियाझला हाय, हेलो करतो. ही पोरं कोल्हापूर भागातली. इरफान मुरगुडचा, रियाझ किणीचा आणि सलीम हुबळी. माझ्या कंपनीचा ऑरेंज, तसं म्हंटला तर भगवा रंगाचा टी शर्ट आहे. मस्त घालतात ही पोरं. कुणाच्याही मनात येत नाही, आयला हा भगवा रंग आहे मी कसा घालू टी शर्ट. रियाझ तर इतका भोळा आहे की पूजेला कुंकू वैगेरे बिनदिक्कत लावतो. रविवारी तर लालबागच्या गणपतीला  ही जाऊन आला म्हणे तो.  बाकी दोघंही थोडया फार फरकाने तसेच आहेत.

बाकी कंपनीत जातीची तर अशी सरमिसळ आहे की ज्याचं नाव ते. पाटील, रेणुसे, तेलंग, कुलकर्णी, रणधीर, परदेशी, विसपुते, ताकवले, सूर्यवंशी, गलांडे, बेंद्रे, वाकुडे, देडगावकर, भागवत, शिंदे, बिहारचा अमन, माझा पार्टनर वाघेला अशी विविध जातीधर्माच्या लोकांची मांदियाळी आहे. आज तेरा वर्ष झाली कंपनी चालवतो आहे पण कधी जातीधर्मावरून कुणी आगळीक केलेली मला आठवत नाही. सगळे एका टेबल वर जेवायला बसतात, हसीमजाक करत जेवण करतात, एकत्र काम करतात आणि घरी जातात.

दोन लेडीज ही काम करतात. इतके वर्षं तर एकंच जण होती इतक्या सगळ्या पुरुष जमातीत. जोडीला अजून एक जॉईन झाली आहे. पण एकंच जण होती तेव्हा तिलाही असुरक्षित वाटलं असेल असं वाटत नाही. एकतर जास्त उशीरा पर्यंत मी त्यांना थांबू देत नाही. आणि मुळात कुणी भंकसगिरी करत नाही त्यांच्याशी. दिवसभर त्यांच्या बरोबर काम केल्यावर त्या जाताना जेव्हा "बाय" म्हणतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर कंपनीतल्या आणि एकंदरीतच पुरुष जमातीबद्दल विश्वास दिसतो. तेव्हा मग फेसबुकवर बायकांच्या पुरुषांच्या लंपट गिरीच्या  पोस्ट वाचून आलेलं न्यूनत्व दूर होतं आणि वाटतं आपण जितके स्वत:ला सकाळी चालू समजत होतो तितके नाही आहोत.

ऑफिस मधून परत निघतो. कार मध्ये बसून फोन होतात. शाहनवाझ शी बोलतो, नाशिकहून कधी चव्हाण, तर ठाण्याहून सोनावणे बोलतो. नगरचे कानवडे, जाधव कधी गप्पा मारतात. अधून मधून देशपांडे, राजवाडे, पत्की बोलतात

घरी पोहोचलो की माझ्या जातीत न जन्मलेली बायको प्रेमाने खाऊ पिऊ घालते, सध्या थोडी आजारी असलेल्या क्षितीजाला तिच्या जातीत न जन्मलेला तिचा नवरा शहाळं आणतो, मलेशियाला गेलेली ब्राह्मण पूनम तिच्या जातीत न जन्मलेल्या नवरा शंतनूशी फोनवर गुलूगुलू गप्पा मारते, पुस्तकाच्या बिझिनेसमधून वकीलीत उतरलेल्या पंजाबी संदीपशी त्याची हिंदू बायको राधिका क्रिमीनल केसबद्दल तावातावाने भांडते, रूपगर्विता चारू बरोबर तिचा तामिळी नवरा शिवकुमार पंचवीस वर्षाच्या वैवाहिक जीवनानंतर काल लग्न झाल्यासारखं संध्याकाळी फिरत असतो

एकंदरीत काय, बरं चालू आहे.  कधी कधी वास्तवातले प्रॉब्लेम विसरण्यासाठी फेसबुक चा सहारा घेतो. पण सोशल मिडियात बागडून आल्यावर  मनावर चढलेलं मळभ दूर करायला वास्तव जगच मदत करतं.

अगदीच स्पष्ट सांगायचं तर, फेसबुकवर जसं दिसतं त्यापेक्षा जग खूप चांगलं आहे. 

Tuesday, 22 September 2015

मदत

चव्हाण वाडा, कोर्ट गल्ली, नगर. विवेकच्या आईने बनवलेलं चविष्ट मटनाचं तुडुंब जेवण करून आम्ही ४-५ जण वाड्याच्या गच्चीत रात्रीचं पहुडलो होतो. वरती निरभ्र आकाश आणि लुकलुकणार्या चांदण्या. गप्पांची मैफल. पॉलीटेक्निकचे मित्र. रात्री २ एक ची वेळ. डोळा लागून अर्धा तासंच झाला असेल. अचानक कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज चालू झाला. माझी झोप चाळवली. भुंकण्याचा आवाज टिपेला पोहोचल्यावर पांघरूण सारून मी पाहतोय तर रस्त्यावर मधोमध एक गावाकडचा माणूस उभा होता. रस्त्यावरच्या लाईटच्या प्रकाशात लख्खच दिसत होतं. पांढरा शर्ट, धोतर, डोक्यावर लालसं मुंडासं, हातात पिशवी. अन त्याच्या भोवती गोल करून ५-६ गावठी कुत्री. मरतुकडीच पण जंगली कुत्र्याचा आव आणणारी. बेफाम होऊन भुंकत होती त्या माणसावर. अन तो माणुस हतबुद्ध होऊन बघत होता. असहाय्य. परिस्थितीने इतकं लाचार बनवलं होतं की कुत्र्याला हाड म्हणायचंही त्याला सुधरत नव्हतं.

मी इकडेतिकडे बघितलं. गच्चीतच मला एक दगड दिसला. उचलला आणि नेम धरून एका कुत्र्याच्या दिशेने भिरकावला. बरोबर पेकाटात बसला त्याच्या. गावठीच कुत्रं ते. कुई कुई करत पळून जाऊ लागलं. आणि ते बघून बाकीच्या कुत्र्यांची पांगापांग झाली.

दोन हाताने खालूनच त्या अनाहूताने मला आशिर्वाद दिले. हसला असावा.

मी परत पांघरूणात येऊन झोपलो.

शांत.


तेव्हाही परिस्थिती बिघडलीच होती. मी मधोमध उभा होतो प्रॉब्लेम्सच्या गराड्यात. एक एक प्रॉब्लेम दात विचकत माझ्याकडे पाहत खिदळत होता. अन मी असहाय्य. अगतिक. मार्ग काही दिसत नव्हता.

प्रकाशाच्या तिरीपेकडे बघत असतानाच तु दिसलास. माझा मित्र. उभा होतास वर हसत. मी ही तुझ्याकडे आश्वासक नजरेने बघत होतो. मला वाटलंच होतं की माझी मदत  करायला तु असशीलच. मला दिसला तुझ्या हातात दगड. अणकुचीदार. आणि भिरकावलास तु बरोबर नेम धरून.



ही कपाळावर झालेली जखम भरून येईलही रे. पण मनावरचा घाव मात्र तसाच राहील.

अंतापर्यंत. 

Monday, 21 September 2015

वाङमय चौर्य

तसं मी व्यवसायाने इंजिनियर आहे. पण छंद म्हणून दागिने घडवतो. दागिने मी कशाचेही बनवतो, सोन्याचे, चांदीचे, कॉपरचे, पितळेचे, लोखंडाचेही. आणि कसेही, सुबक, बरेसे, ओबडधोबड. मुड लागेल तसा.

एके दिवशी माझ्या लक्षात आलं की माझे काही दागिने चोरीला जाताहेत आणि कुणीतरी त्यांचेच आहेत म्हणून सांगताहेत. माझी खूप आगपाखड होते, चिडचिड होते. मनातल्या मनात मी खूप शिव्या घालतो अशा चोरांना.

मी शेजारच्या पोलीस स्टेशनात गेलो आणि कंम्पलेंट केली. हवालदाराचं नाव मार्कंडेय जुकरकर. मी म्हणालो "साहेब, माझे दागिने चोरीला जात आहेत"

माजु: कुठून चोरीला जातात?

मी: हॉलमधेच ठेवतो मी मांडून. तिथूनच जात असावेत.

माजु: ओहो, मग सोसायटीच्या वॉचमनला माहित असेल ना तुमच्याकडे कोण येणं जाणं करतं.

मी: नाही हो, सोसायटीला सिक्युरिटी नाही आहे.

माजु: अहो, मग तुमच्या सीसीटीव्ही कॅमेरात असेल

मी: नाही, घराला असा काही कॅमेरा नाही आहे.

माजु: पण मग कोण जातं येतं हे कीहोल मधून तुम्ही बघत असालच ना?

मी: नाही हो, बर्याचद्या दरवाजा सताड उघडा असतो.

माजु: (छद्मीपणे हसत) येडं समजताय का मला. तुम्हाला स्वत:च्या दागिन्यांची काळजी आहे ना तर मग त्याच्या सिक्युरिटीची काळजी नको घ्यायला. त्याला व्यवस्थित जपा. प्रसंगानुरूप काढा अन घाला. तुम्ही आपला दागिन्यांचा पसारा मांडून ठेवता आणि ओरडता की चोरीला गेला ते.

अन काय हो,  तुमचे दागिने कशाचे आणि घडवणूक कशी असते?

मी: मला असं वाटतं, की घडवणूक चांगली असते बाकी मटेरियल काहीही असू शकतं.

माजु: बरं, मग एक काम करा. तुमच्या दागिन्यांचं प्रदर्शन लावू आपण. त्याला फी लावू. जास्त नाही, महिन्याला रू ५०. ज्याला तुमचे दागिने बघायचे त्याने रू ५० द्यायचे महिन्यासाठी आणि कधीही येऊन तुमचा कुठलाही दागिना बघायचा. औटघटकेसाठी घालूनही बघू शकतो. बाहेर जाताना मात्र परत ठेवायचा त्याने. आणि हो प्रदर्शनाची सिक्युरिटी मी देणार म्हणून मला प्रत्येकी १० रू द्यायचे. तुम्हाला वाटतं ना तुमचे दागिने सोन्याचे आहेत आणि घडवणूक चांगली आहे तर येतील की लोकं पैसे देऊन बघायला.

हं, बोला आहे कबूल?

मी: अं अं अं, जरा विचार करून सांगतो. नाही.....म्हणजे, तसं माझा तो छंद......मला तसे काही पैसे नाही कमवायचे त्यातून.

माजु: पैसे नाही कमवायचे ना! मग जोपास की छंद म्हणून. दागिने सार्वजनिकरित्या उघड्यावर ठेवायचे, सिक्युरिटी नाही, बँकेचं लॉकर सोडा घरातली तिजोरी नाही, मग कशाला ओरडता चोरीला जाताहेत दागिने. आणि वर पैसेही कमवायचे नाही म्हणता त्यातून. मग घालू द्या कुणालाही अंगावर, दोन मिनीटं बरं वाटेल त्यांनाही. ठेवतील काढून नंतर.

आणि अाता पोलीस नाही तर मित्र म्हणून सांगतो. तुमचे मित्र आहेत ना, जवळचे. त्यांना सांगा लक्ष ठेवायला. अन ठेवतातही. माझा अनुभव आहे, आमच्यापेक्षा चांगली धुलाई करतात ते असे दागिने चोरणार्यांची.

आता जावा घरी. घडवा, मढवा दागिने पाहिजे तेवढे. टेन्शन नका घेऊ.

मी विचार करत घरी येतो.

प्रदर्शन.....लॉकर.....सिक्युरिटी......की सर्वांसाठी खुले..........

काय करावं बरं!!! 

Friday, 18 September 2015

इच्छाशक्ती

मराठवाड्यातल्या शेतकरी बांधवांसाठी मदतीची हाक ही अत्यंत संयुक्तिक आहे. निसर्गाच्या आसमानी संकटापुढे गावच्या गावं अक्षरश: हतबल झाली आहेत. गेली तीन चार वर्षं पावसानं या प्रदेशाकडे पाठ फिरवली आहे.

मला याठिकाणी एवढंच म्हणायचं आहे की जी आपण मदत जमा करत आहोत ती तात्पुरती आणि तुटपुंजी आहे. आपल्याला सगळ्यांनाच यापुढे जाऊन कामं करणं गरजेचं आहे. राजकारण्यांनी आपल्या सगळ्यांना वापरून तोंडाला पानं पुसली आहेत. आजच्या तरूणांच्या मनात इतकं विष पेरलं आहे की आजचा तरूण शासनाने समाजोपयोगी असलेल्या योजनांकडे अंगभूत द्वेषापायी एकतर विरोध करतो किंवा दुर्लक्ष करतो.

हे असं करण्याऐवजी आहे त्या परिस्थितीत शाश्वत व्यवस्थेकडे नेण्याचं काम जर अॅक्टिव्ह तरूणांनी हाती घेतलं तर त्याला व्यापक धोरणांची जोड दिली तर येणार्या पिढीच्या चेहर्यावर हास्य फुलेल यात शंका नाही.

मराठवाड्यात प्रचलित उद्योग येणं अवघड आहे हे सर्वमान्य झाले आहे. अशा उद्योगाच्या मागे लागण्याचं काही कारण नाही. शेती हाच उद्योग पकडला तर जलसंवर्धन या एका गोष्टीवर कसून काम झालं तर स्वर्ग दूर नाही. गावागावात स्वच्छतेचं महत्व देताना सॉलीड वेस्ट मॅनेजमेंटवर जर काम झालं तर सोने पे सुहागा. मी जेव्हा म्हणालो की शासनाच्या चांगल्या योजनेची विरोधापायी खिल्ली उडवतो, स्वच्छ भारत त्याचं उत्तम उदाहरण आहे.

आणि या व्यतिरिक्त मग ह्युमन रिसोर्स ची सप्लाय चेन तयार करणे वैगेरे गोष्टी येतात.

आशिष, सौरभ, सूरज, मोहसीन विचार करा. काही हजार रूपयाची मदत करूच पण ते सोल्युशन नव्हे. जरा मोठ्या स्केलवर काम करू, मराठवाड्यातील बाहेर जाणारे लोंढे बंद करू. राजकीय विचारधारा बाजूला ठेवू. कुठल्याही राजकीय विचारशक्तीपेक्षा समाजाला वर काढण्याची इच्छा जास्त महत्वाची आहे. 

ग्लास सिलींग भाग २

मध्ये एकदा बिझिनेस मध्ये hitting the glass ceiling याबद्दल लिहिलं होतं. काय कारणं असावीत बरं असं ग्लास सिलींगला धडकतो आपण.

१. पाहिलं कारण म्हणजे डायव्हेर्सिफाइड प्रॉडक्ट रेंज नसणे. म्हणजे फक्त एकाच प्रकारच्या प्रॉडक्ट वर प्रेम करणे. तुमच्या लक्षात येईल की  टाटा, बिर्ला, रिलायन्स, बजाज ह्या कशा कोणत्याही मार्केट कंडिशन ला टिकून आहेत.

२. दुसरं कारण असं की स्वतः च्या बिझिनेस ला भौगोलिक मर्यादा टाकायच्या. फक्त पुण्यात बिझिनेस करतो किंवा फक्त महाराष्ट्रात.

३. घाबरट स्वभाव. रिस्क कमीत कमी घ्यायची. सेफ झोन मध्ये खेळायचं. पण तोच सेफ झोन अनसेफ कधी होतो हे कळत सुद्धा नाही.

४. कंपनी पेढी चालवतो त्या पद्धतीने चालवायची. मालकी हक्क गाजवायचा सारखा.

५. एखादा niche बिझिनेस असतो, तो तसाच ठेवायचा. त्याचं स्केलेबल मॉडेल बनवण्यात अपयश येणं. किंवा तसा विचार पण न करणं.

६.  आहे हे असं आहे, अन तेच चांगलं आहे

७. पार्टनरशिप किंवा जॉईंट व्हेंचर पासून दूर पळायचं. कारण परत तेच, मालकी हक्क गमावण्याची भिती.

८. आपल्या नंतर हा उद्योग कोण चालवणार या बद्दल विचार न करणं. थोडक्यात सक्सेशन प्लॅनिंग करायचं नाही.

९. आपण सर्वज्ञानी आहोत. आपल्याला सगळ्याच गोष्टी कशा परफेक्ट याच विचारात राहणं, जो खरंतर मोठा गैरसमज असतो.  

असे अनेक मुद्दे असतात जे मूर्त नसतात पण सबकॉन्शसली काम करत असतात.

हे असं वागलं की ओळखायचं की आयुष्यात ग्लास सिलिंग ला कधी ना कधी तुम्ही धडकणार. त्यातून बाहेर नक्कीच पडता येतं पण त्यासाठी एका मोठ्या फोर्स ची गरज असते. पूर्ण ताकदीनिशी ते ग्लास सिलिंग फोडावं लागतं आणि मग बिझिनेस च्या पुढच्या कक्षेत प्रवेश करता येतो.  थेअरी ऑफ कन्स्ट्रेंट चा अभ्यास करून एक एक प्रॉब्लेम त्या त्या वेळी दूर करावा लागतो. आणि मुख्य म्हणजे आता जे आपण कम्फर्ट झोन मध्ये काम करतो ते करण्यासाठी दुसरा आपल्यापेक्षा शहाणा माणूस घ्यावा लागतो आणि स्वतः ला डिसकम्फर्ट झोन मध्ये प्रवेश करावा लागतो, हो, आपल्यापेक्षा खूप शहाणी माणसं जगात आहेत यावर विश्वास ठेवावा लागतो.

हा जो नवीन डिसकम्फर्ट झोन आपण तयार केलेला आहे त्यावर काम करून त्याला परत कम्फर्ट झोन मध्ये नेण्याची जी प्रोसेस आहे तिला "ग्रोथ" असं म्हणतात. 

नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. 

ग्लास सिलींग

Breaking the glass ceiling हा वाक्प्रचार ऐकला आहे का कधी? अमेरिकेतल्या बायकांसाठी तयार झालेला. कार्पोरेट लॅडर वर चढताना अशी एक वेळ यायची की यापुढे आपण जाऊ शकतो पण फॉर सम रिझन नाही जात. वरची पोस्ट दिसते, खुणावतीय पण नाही पोहचू शकत.

स्त्रियांपर्यंत मर्यादित असलेला हा फंडा आता कंपन्यांना पण लागू झाला आहे. Hitting the glass ceiling. काय आहे हा प्रकार, ग्लास सिलींग:

सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला कुणी सांगत नाही की तुमचं डोकं ग्लास सिलिंगला धडकलं आहे ते. आता काचेचं सिलिंग ते. तुम्ही त्याच्या पल्याड बघू शकता, साहजिकच आहे ते, शेवटी ग्लास आहे पारदर्शक. संधी फेर घालत असतात, कळतातही तुम्हाला. पण तुम्ही त्या संधींना पकडू नाही शकत. एक अदृश्य शक्ती असते जी तुम्हाला त्या संधीला आवाक्यात आणण्यापासून परावृत्त करते.

आणि हो, याचा अर्थ असाही नाही की तुमचा परफॉर्मन्स चांगला नाही आहे. त्याचा अर्थ इतकाच की तुमच्या अंगभूत गुणांचा तुम्ही पूर्णार्थाने वापर करत नाही आहात.

शक्यतो धंदेवाईक किंवा फॉर दॅट मॅटर नोकरदारांच्या करियरमधे पाच वेळा हा Hitting the Glass Ceiling ची वेळ येते. मी धंदेवाईक नोकरदार माणूस. त्यामुळे जेव्हा मी वाचलं  या बद्दल तेव्हा लागलीच क्लिक झालं.

- पहिल्यांदा हॉबी बिझिनेस म्हणून चालू होतो. भातुकलीचा खेळ. थोडी मजा, थोडा सिरियसनेस. मनातल्या सुप्त भावनांशी आपणच छेडछाड चालू करतो.

- इथे ग्लास सिलिंग तोडलं की छोटासा धंदा म्हणून बस्तान बसवायचा प्रयत्न. इकडचे तिकडचे रिसोर्सेस गोळा करतो, नेटवर्कींग करतो. थोडक्यात हात पाय मारायला चालू करतो. सुप्त भावना आता हळूहळू स्वप्न होऊ पाहतं.

- याच्या पुढची स्टेज असते ती उद्योजक  म्हणून घेण्याची. छोटी टीम बनते. चार पाच लोकांच्या मदतीने नैया हाकू लागतो. स्वप्नाचं रूपांतर आता ध्येयात होतं.

- स्टेज ४ मधे ऑर्गनायझेशन थोडी मोठी बनते. डिपार्टमेंटस तयार होतात. तुमच्या ध्येयाला आता आकांक्षाचे पंख फुटु लागतात.

- आता तुम्हाला लोकं व्यवसायिक वैगेरे बिरूदं लावायला लागतात. कंपनीत स्ट्रक्चर्ड ऑर्गनायझेशन बनत जाते. मग स्ट्रॅटेजिक प्लानिंग वैगेरे मोठमोठे शब्द वापरून मिटींगा चालू होतात.

आणि मग तुमची शर्यत चालू होते ती सेल्स रेव्हेन्यू शी. ग्लास सिलिंग चे काही थ्रेशोल्ड पॉईंट्स आहेत. साधारण १ कोटी, ३ कोटी, १० कोटी, ३० कोटी, १०० कोटी, २०० कोटी, ५०० कोटी......... याच्या पुढे विचार करण्याची सध्या तरी माझी ताकद नाही.

एक काही तरी लिमिट असावी आणि  इथलं ग्लास सिलींग फुटलं की बर्याचदा एस्केप व्हेलॉसिटी लागू होते. चाकाला इनर्शिया मिळतो. त्यातून धीरूभाईंचं नाव होतं, नारायणमूर्ती जगाला माहिती होतात, टाटा नाव दीडशे वर्षानंतर झळकत राहतं.  आपोआप गति मिळत राहते. मग चक्र चालू राहते, अव्याहत.

आता ग्लास सिलींग ला धडकून थांबण्याची कारणं, उद्याला.

क्रमश: 

अरे काय चाललय काय

काय यंग्राट ट्रीप झाली चायनाची. कँन्सल करणार होतो पण आमचे हरदास बुवा म्हणाले जा बिनधास्त. मी म्हंटलं आता डॉक्टरच म्हणतोय तर जावं. ए़यर इंडियाच्या गडबडीनंतर रात्री दोनला पोहोचलो. पुडॉंग एयरपोर्टला. टॅक्सीवाला कुठे? तिथेही आपल्यासारखा गराडा पडला ना "साब, कहा छोडू" मॅरियटवाला म्हणाला मी करून देतो कॅब. हो नाही करता करता आला आमचा बाबा, प्लाकार्ड घेऊन.

पोहोचलो हॉटेल. सोमवार अख्खा मस्त गेला. मंगळवारही काही प्रॉब्लेम नाही. रात्री रिट्रोव्हिल ०.२५  मारली की एका क्वार्टर ची नशा.

मंगळवारी दुपारी जेवलो, सुशी आणि त्याच्याबरोबर वसाबी म्हणून चटणी. चटणी नाही आग. पण जमलं व्यवस्थित. मिटिंगा झाल्या. रात्री जेवलो. नॉनव्हेज खायचंच नव्हतं. सॅलड वर जोर. दोन म्हणजे दोनच घोट रेड वाईन घेतली. नको म्हंटलं. रूमवर आलो झोपायला अन रात्री गंमत चालू झाली. छातीत धडधड. तळव्याला घाम. खाली आलो. जेफ, जिम आणि हॉवर्ड या तिघांना फोन करून झाले. जरा रात्री साथ मिळाली तर बरं. तर तिघंही ढाराढूर. तसंही अमेरिकनानंना एका बेडमधे दुसरा पुरूष चालतच नाही. रात्री ११ ला गरम पाण्याचा शॉवर घेतला. अथर्वशीर्ष म्हणून झालं, भीमरूपी म्हंटलं, मंत्रपुष्पांजली झाली पण जीवाला काही घोर नाही. पण रिट्रोव्हिल काही रंग दाखवेना. मुकुंदशी आणि अनामिकाशी चॅटिंग करत होतो तोच काय दिलासा. वैभवीशी बोलावं म्हंटलं आणि हे काही लिहीलं तर राडा.

बुधवार उजाडला. काही सुधरत नव्हतं. ब्रेकफास्ट रूमला आलो. काही खायची इच्छाच नव्हती. फोर्डचे गजानान कोथळकर भेटले. त्यांना सांगितलं, म्हंटलं तब्येतीचा लोच्या झालाय. रात्री मदत लागली तर बोलवेल तुम्हाला. काहीतरी खाल्ल्यासारखं केलं. ऑफिसला पोहोचलो, काही सुधरना तरी. जेसी म्हणून ताई आहे ऑफीसमधे अन हॉवर्ड अमेरिकन चायनीज. मला म्हणाले हॉस्पीटला ला घेऊन जातो. फाटलीच होती, मग बोललो न्या बुवा. शांघायचं जियानडिंग सबअर्ब मधलं अगडबंब हॉस्पीटल. बीपी चेक केलं १३०/८०, पहिला दिलासा. चेहर्यावर इस्त्री फिरवल्यासारख्या डॉक्टरीणबाई. सुदैवाने फाईल नेली होती. बाईनं इसीजी काढायला सांगितला. वरात तिकडं आमची. तोही हळदीचा कार्यक्रम झाला. काढलेली मेंदी घेऊन परत डॉक्टरीण बाईकडे. इस्त्री फिरवलेल्या चेहर्यावर हास्य फुललं. म्हणाली पहिलेपेक्षा खुपच भारी इसीजी आहे. हार्ट तर गुलाबी आहे. तरीही अशीच परिस्थिती राहिली तर बाकी काही चेक करावं लागेल. हे सगळं मँडेरिन भाषेत. जेसीताई समजावून सांगत होती.

आलो ऑफीसला तरीही अस्वस्थ वाटत होतं. मिटिंगमधे बसलो तरी काही सुधरेना. दुपारी परत सॅलड अन सुप. सर्व बंधुंना सांगितलं, मी हॉटेलला जातो. पहिले १९ सप्टेंबरचं रिटर्न तिकीट १७ करून घेतलं. १६ला नव्हती फ्लाईट. झोपायचा निष्फळ प्रयत्न केला. ६:३० काही फळं खाल्ली. अमेरिकन गप्पा छाटत होते. माझं काही मन लागत नव्हतं. अस्वस्थपणा जात नव्हता. मी आलो रूमवर. फोर्डच्या कोथळकरांना फोन केला. म्हंटले या रूमवर.

कोथळकर, पटेल आणि गोपी असं त्रिकूट होतं. त्यांच्याशी गप्पा चालू झाल्या अन अचानक माझा अस्वस्थपणा कमी झाला. त्यांनी रूममधेच कुकरमधे भात बनवला होता. मला म्हणे खा दोन घास. ते बाहेर जेवतच नव्हते. भात आणि साऊथ इंडियन चटणी अन साईड डिश म्हणून वेफर्स. गप्पा मारताना मी पण ओके झालो अन डोळ्यावर परत झोप तरळू लागली. कचकावून झोपलो.

गुरूवारी १७ सप्टेंबरला सॉलीड फ्रेश झालो. आदल्या दिवशी राहिलेले मुद्दे जोरकसपणे मिटिंगमधे मांडले. रात्री दहाला विमान पकडलं. जाताना जेसीला म्हंटलं "जस्सी जैसी कोई नही"

आता पोहोचलो आहे पुण्यात.

गणपती बाप्पा मोरया!

(रा रा मुकुंद भोकरकर आणि अनामिकाला कळलं नसेल दोन दिवस राजेश चॅटिंगला का चटावलाय ते. लक्ष वळवण्याला तोच पर्याय होता. दिलसे धन्यवाद) 

एयर इंडिया

बर्याच जणांनी सांगितलं की आता एयर इंडिया स्टार अलायन्सची पार्टनर आहे. सुधरली आहे खूप. १३ सप्टेंबर ला चायना ला जायचं होतं. तिकिट ही स्वस्त मिळालं. अर्थात तो आपला पहिला क्रायटेरिया एअरलाईन ठरवायचा. मग काढलं तिकीट. एयर इंडियाचा पहिलाच आंतरराष्ट्रीय प्रवास.

दिल्लीपर्यंत व्यवस्थित जमलं. दिल्लीला शिरलो विमानात. बोईंगचं ड्रीमलायनर म्हणे. उशीर झालाच होता. सॉलीड गरम होतं विमान. दहा मिनीटात लोकं बोंबटायला लागले, एसी काम का करत नाही म्हणून. साहजिकच आहे म्हणा. तर हवाई परिचारक म्हणतो कसा, "साब, बाहर टेम्परेचर ज्यादा इसलिए केबिन ठंडा हो नही रहा" त्याला वाटलं असेल बालवाडीतल्या पोरांची ट्रीप आहे. पाणी पाजलं. मग म्हणे एका कुठल्यातरी पॅसेंजरला विमानात त्रास चालू झाला म्हणून डिप्लेन करावं लागलं. त्या सोपस्कारात तास एक गेला. हो नाही करता सव्वा अकराचं विमान साडेबारा पाऊण च्या सुमारास उडलं. कुठल्याही ड्रायव्हर ने स्टार्टर मारला की मी झोपतो, तसा झोपलो. पंधरा मिनीटात उठलो. सध्या मी व्यसनापासून दूर असा दुर्व्यसनी माणूस आहे. त्यामुळे मदिरेच्या नादाला न लागता विचारलं "Tomato juice please" तर तोच हुशार परिचारक म्हणाला "We serve only orange juice". वो ही सही.

 बेटा पिक्चर लावला. माधुरीचं धकधक गाणं लागणार तितक्यात अनाऊन्समेंट झाली. "राईट इंजिनमे तकनीकी कारण के वजहसे विमानको वापस दिल्ली हवाईअड्डा ले जा रहा है" बोंबला तिच्यामारी. माधुरीची धकधक पाहण्याऐवजी माझ्याच हृदयाची वाढली. पण नुकतीच प्लंबिग होऊन वाहिनीत reinforcement झाल्यामुळे सगळं आलबेल होतं.

लखनौरून परत दिल्लीला आलो. काही मंडळी सॉलीड पेटली. वादावादी होऊन आम्हाला डिप्लेन करण्यात आलं. भूकेने पोटात आगडोंब उसळला होता. अशा वेळेस शक्यतो एअरलाईन काही खायला देतं. पण आपण अतिथी देवो भव वाले. म्हणजे इथे अतिथी तिकीटाचे पैसे देतो. बास, पुढे काही नाही. एयर इंडियाने आमच्या तोंडाला पानं पुसली.

पूर्ण सहा तासाच्या डिलेनंतर विमान उडलं आहे. तासाभरात जेवण आलं. मी विचारलं "orange juice please" तर उत्तर आलं "We already served you in first take off" हसावं की रडावं ते कळलं नाही.  जेवण जेवलो. सहा तासाच्या प्रवासात बाकीच्या एयरलाईन्स जितकी बडदास्त ठेवतात त्याच्या ५०% ठेवली.

चायनासारख्या देशात, जिथे इंग्रजीचा गंध नाही तिथे मी रात्री दोन वाजता पोहोचलो. गंमत आहे. यापेक्षा विचित्र परिस्थिती माझ्या कोपॅसेंजरची होती. शिरस्त्याप्रमाणे तोही पुरूषच होता. हा सदगृहस्थ, सुंग नाव आहे,  शुक्रवारपासून भारताच्या बाहेर जायचा प्रयत्न करतो आहे. शुक्रवारी आणि शनिवारी त्याचं फ्लाईट कँन्सल झालं. आणि आज ही परिस्थिती. चायनात जाऊन तो आपले काय गुणगान गाईल हे वेगळं सांगायला नको.

आपले पंतप्रधान अन मुख्यमंत्री जगभर फिरत ढोल वाजवत आहेत, आमच्या इथे पैसे टाका, इन्व्हेस्टमेंट करा. आमच्या इथे यंव संधी आहेत अन त्यंव बिझीनेस आहे. तुम्हाला सांगतो, जगाला तुम्ही ओरडून सांगितलं ना की आम्ही सुधरलो आहे तरी त्याच्यापेक्षा हे सुंगसारखी माणसं जगभर फिरत असतात, ते एकमेकांच्या कानात आपल्या देशाचं गुणसंकीर्तन करतात त्याने देशाची प्रतिमा ठरते. तुम्ही मार मॅडिसन स्क्वेयरला जाऊन, दुबईला जाऊन अमिताभच्या स्टाईलमधे, हो गुजरातचा अँबेसेडर झाल्यावर हे बाकी बरीक शिकलात, डावा हात वर करून आश्वासनांची खैरात करता ते छानच आहे. पण हे तुमचं घर इन ऑर्डर केलं नाही तर २०१९ नंतर नागपूरला चिंतन शिबीरात कारणं शोधावी लागतील हे लक्षात असू दंयावे. नाहीतरी वर्षभरात चार बाहेरच्या कंपन्यांनी गाषा गुंडाळला आहे हे कळलंच आहे. त्याबद्दल दुसर्या पोस्ट मध्ये.

बाकी डॉक्टरांची परमिशन घेऊन आलो होतो. औषधांचा स्टॉक होता. तरीही गडबड उडालीच. ती नंतर कधीतरी.

बाकी स्टार अलायन्सचं काही ऑडिट असतं की आमच्या आयएसओ सारखी खिरापत वाटत फिरतात. तिथंही आपल्या मंडळींनी तोडपाणी करून सेटिंग लावून ठेवलं आहे बहुधा! 

Tuesday, 8 September 2015

आत्मानंद

अंगात तशा काही फार कला नाहीत. म्हणजे शास्त्रोक्त वैगेरे. पण चार टाळक्यांची मैफल जमली की कंठ फुटतो. आणि संगीत लागलं की पाय थिरकतात. परवा चारूहास म्हणाला "मनस्वी मंडलिक पाहायचे असतील तर त्यांना कविता म्हणताना पहावे"  त्यावेळेस अण्णासारखा दिग्गज माणसाला मी साथ देत होतो. एका पालटून एक कविता येत गेल्या. अऩ साथीला डॉ मोहन. साधा आवाज असलेला हा गृहस्थ जेव्हा सूर छेडायचा अन तोही कवितेवर अप्रचलित पद्धतीने, अक्षरश: आसंमतात ते सूर गुंजत रहायचे.  रेकोर्डेड तानपुर्याला साथीला घेऊन जेव्हा सुर लागायचा तेव्हा रोमांच प्रत्येकाच्या अंगांगात उठला. काय भावना असेल ही तादात्म्य पावायची. होतं असं कधी. कधी ऐकताना, कधी म्हणताना, कधी नाचताना. सभोवताल, सृष्टी, चराचर सगळं विसरतो आपण.

खरंतर प्रसंग धांगडधिंगणाचा. गणपतीची विसर्जनाची मिरवणूक. आमचा ताशावाला सेमच असायचा दरवर्षी. मिरवणूक ३०० मीटरच असायची. सुरू झाली, हळूहळू रंग भरू लागला. मी नाचण्याची गति वाढवत गेलो ढोलताशा बरोबर. तो, सुरेश, ताशा वाजवणारा सॉलीड पेटला. माझी आणि सुरेशची जुगलबंदी जुंपली. पोरांनी पैसे ओवाळले आणि ह्रिदम चढत गेला.  कुणीही हरायला तयार नाही.

आणि ते वाद्य टिपेला पोहोचलं आणि मी ही बेधुंद होऊन नाचत होतो. मग ते घडलं, सुरेश जो कडाकड ताशा वाजवत होता त्याने हळूच ताशा गळ्यातून काढून दुसर्याच्या गळ्यात टाकला अन तो माझ्याबरोबर नाचू लागला, बेफाम. वाद्याची गति हळूहळू कमी झाली. थांबली. अन त्या सुरेशने अक्षरश: मला मिठी मारली. म्हणाला "मानलं तुम्हाला. इतकी वर्षं ताशा वाजवतोय, इतक्या जणांना नाचवलं. पण तुमच्या नाचातला जोश पाहून मलाही नाचावसं वाटलं"

जुन्या काळी सुद्धा रात्रभर मैफिली सजायच्या याचं कारण तेच असावं. आत्मानंदाच्या अवस्थेची अनूभूती आली की काळ, वेळ, स्थळ याचा विसर पडतो आणि आपण त्या अनन्यभावात डुंबत राहतो.

हे आत्म्यातून येणारा आनंद हा वेगळाच प्रकार असेल.

असं होतं ना बऱ्याचदा की एखादं गाणं आपल्याला प्रचंड आवडतं. इतकं की ते गाणं ऐकलं की आपण अक्षरश: सैरभैर होऊन जातो. कधी गळा दाटून येतो तर कधी डोळ्यातून पाणी येतं, एका वेगळ्याच अनुभूतीत  आपण डुंबून जातो. का होत असावं असं? कारण हे प्रत्येक गाण्याला किंवा कवितेला होत नाही, काही निवडक कलाकृती वाचल्यावर किंवा ऐकल्यावर होतं. तेच गाणं जर काही दिवसांनी दुसऱ्या कुणी म्हंटल तर कदाचित तितकं भावणार नाही.

मला असं वाटतं का कोण जाणे, पण एखादी कविता किंवा गाणं जेव्हा बनतं तेव्हा तो गीतकार, संगीतकार, गायक एका आत्मिक आनंदाची अनुभूती घेत असावेत. अशी भट्टी जुळून यावी तशी सगळी सूत्रे हलतात, आणि मुशीत ते गाणं चपखल बसतं. तेच जेव्हा कुणी कॉपी करतं तेव्हा तो सोल किंवा ते जीवन त्यात नसावं आणि म्हणून ते आपल्याला भावत नसावं. 

मुकुंद, हे असं हरवणं कदाचित हरवत चाललं आहे. तुझ्या दोन चार स्फुटांवरून हे सुचलं. मी घेईन तो आनंद परत. "देव देव्हार्यात नाही" "हृदयी जागा तु अनुरागा" "टाळ बोले चिपळीला" "शूर आम्ही सरदार" "ऋणानूबंधाच्या" ऐकीन ही गाणी परत आणि न्हाऊन घेत जाईन.........आत्मानंदात.


असंच काहीही

[9/7, 4:07 PM] राजेश मंडलिक: मागच्या महिन्यातील गोष्ट. स्थळ बंगलोर एयरपोर्ट. बोर्डिंगच्या लाईनमधे. एक अत्यंत गोड पोरगं. लाघवी. ५ वर्षाचं असावं. त्याच्या बापाबरोबर. आणि मागे आई. म्हणजे ५ वर्षाच्या पोराची आई. पोराची विशेषणं तिलाही लागू.

लाघवीपणामुळे मी पोराशी संवाद साधला. आता कुणाचा लाघवीपणा हा प्रश्न विचारू नये.

"बेटा, कौनसे स्टँडर्ड मे हो"

"सेकंड स्टँडर्ड. And I can speak English"

"Oh really. But I can not speak English, the reason I spoke in Hindi"

माझ्याकडे बघितलं त्याने अन दोन सेकंदात म्हणाला

"You do not know English! Then how are you traveling by flight"

बाप दुसरीकडे बघू लागला आणि ती गोरी  सुंदरी पांढरी पडली.

पोरांनी इंग्लिश बोलावं म्हणून काय काय पढवतात हे पालक देव जाणे
[9/7, 4:16 PM] राजेश मंडलिक: हम आपके है कौन कसला पिक्चर बनवला आहे ना! काय ती स्टारकास्ट, कसले भारी सेटस, त्या नटनट्यांचे कपडे, पिक्चरचं संगीत सगळंच लाजवाब.

फक्त एकच प्रॉब्लेम आहे त्या पिक्चरमधे. काही फ्रेममधे माधुरी नाही दिसत. ती जोपर्यंत पडद्यावर नाही आहे तोवर पिक्चर फारच निरस वाटतो.

पडद्यावर व्यापून राहिली आहे माधुरी दिक्षित या पिक्चरमधे.

इतकी की माधुरी दिक्षित च्या पुढे नेने लिहीताना कसं तरीच वाटतं. 😊😊😊

Monday, 7 September 2015

ब्लॉग कॉमेंटांचा

परवा एक गंमत झाली, म्हणजे इतकी की एक सेपरेट पोस्ट तयार व्हावी. तर झालं असं की इग्लंडहून स्टीव्ह आला होता. बोलता बोलता कलामांच्या मृत्युचा विषय निघाला. मी त्याला मी कलामांना इंग्रजीत लिहीलेलं पत्र दाखवलं. वाचल्यावर तो गालातल्या गालात हसत राहिला. अन म्हणाला "असं इंग्रजी आमच्या इथे जुन्या काळात लिहीलं जायचं. वाक्यरचना, शब्द हे आता वापरत नाही. कदाचित माझे वडील असं लिहीत असावेत. मी असं आता लिहू शकत नाही याचं मला वाईट वाटतं."

आता हे तो उपहासाने म्हणाला, माझी टिंगल करत होता की स्तुति हे काही मला कळलं नाही.


दहीहंडी हा एक कालबाह्य उत्सव आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचेल की माहित नाही पण सिनेतारकांना आवाहान करण्याची पोस्ट काही कारणांमुळे राहून गेली. पण मानसी, श्रुति, गिरीजा, अमृता एकच सांगणं या असल्या भिकार स्वरूपाच्या उत्सवात चार पैसे मिळण्यासाठी मोताद होऊ नका. जरा स्व ची चाड ठेवा
कसलं साध्य? खेळ झाला आहे पोरांच्या आयुष्याचा. दहीहंडीचे मनोरे मंडळ आणि ढोलपथक हे करियर ऑप्शन आहेत म्हणे. याच्याइतकी हास्यास्पद गोष्ट नाही
शरद, अरे ग्लॅडिएटर मधे शूर असतात अन पुर्ण पुरूष, स्वत:च्या मर्जीने लढणारे. मागील वर्षी पोस्ट टाकली ती संक्षेपात देतो.

मला दहीहंडी अरबांच्या उंटाच्या खेळासारखी वाटते. लहान पोरं बसवायची अन उंटांना चेकळवायचं. उंट उधळतात. लहान पोरं पडायची, जखमी व्हायची. त्यांना बाजूला काढायचं, नवीन पोरं जुंपायची अन खेळ चालू.

जेव्हा वाचलं तेव्हा वाटायचं अरब मध्ययुगीन काळात वावरतात.

दहीहंडी यापेक्षा वेगळी नाही.


बरं पुसला! मग पुढे काय? काही नाही, हाणामार्या, शिवीगाळ.

या साठीतल्या विद्वानांची बुद्धी नाठी झाली आहे. मला स्वत:ला सावरकरांच्या देशप्रेमाबद्दल, विद्वत्तेबद्दल नेहमीच आदर वाटत आला आहे. पण गांधीहत्येतला त्यांचा सहभाग हा कुठल्या सोम्यागोम्याने अधोरेखित केलेला नाही तर शासनाने नेमलेल्या आयोगाने म्हंटला आहे. आणि जर झापडं न लावता गांधीहत्या आणि मी किंवा कोणतेही सावरकर चारित्र्य वाचले तर त्यांचा सहभाग असावा हे माझ्यासारख्या शेंबड्या पोरालाही वाटते. त्यातली संदिग्धता हा वेगळा विषय. पण संभ्रम असूनही सरसकट कलंक पुसा अशी मागणी करणे हे विद्वानांना योग्य कसे वाटते हा म्या पामराला पडलेला प्रश्न आहे.

माझ्या हाती माईक अन माझंच ऐक असली गोष्ट या मंडळींनी टाळावी. इतिहास घडला, संपलं आहे. वर्तमानाचे प्रश्न दाहक आहेत, भविष्य भीषण आहे अशा वेळेस या मंडळींना त्यांच्यापेक्षा हुशार मंडळींनी केलेल्या निवाड्यावर शंका घेण्याची उपरती कशी होते हा मोठा प्रश्न आहे.

ने मजसी ने किंवा जयोस्तुते म्हणताना आजही मी रोमांचित होतो पण त्याच वेळेस गांधीहत्येत सावरकरांना बेनेफिट ऑफ़ डाऊट मिळाला हे विसरतो येत नाही.

मच्छुदा, मी त्यांच्या साहित्यावर प्रेम करतो, देशप्रेमावर आदर करतो. मोरे काय म्हंटले, कपूर आयोग काय म्हणतोय या गोष्टी विसरून जाऊ. तुम्ही स्वत: सावरकरांवरचे चरित्र वाचा, खेरांचं, फडक्यांचं आणि छातीवर हात ठेवून सांगा तुम्हाला काय वाटतं ते! मनात असं ठेवा की गांधींना मारणे बरोबर की चूक. हत्येच्या योग्यायग्यतेवर तुमची भूमिका बदलेल.

माझ्या मते गांधीहत्या ही कधीही समर्थनीय नाही.

मदत

मराठवाड्यातल्या शेतकरी बांधवांसाठी मदतीची हाक ही अत्यंत संयुक्तिक आहे. निसर्गाच्या आसमानी संकटापुढे गावच्या गावं अक्षरश: हतबल झाली आहेत. गेली तीन चार वर्षं पावसानं या प्रदेशाकडे पाठ फिरवली आहे.

मला याठिकाणी एवढंच म्हणायचं आहे की जी आपण मदत जमा करत आहोत ती तात्पुरती आणि तुटपुंजी आहे. आपल्याला सगळ्यांनाच यापुढे जाऊन कामं करणं गरजेचं आहे. राजकारण्यांनी आपल्या सगळ्यांना वापरून तोंडाला पानं पुसली आहेत. आजच्या तरूणांच्या मनात इतकं विष पेरलं आहे की आजचा तरूण शासनाने समाजोपयोगी असलेल्या योजनांकडे अंगभूत द्वेषापायी एकतर विरोध करतो किंवा दुर्लक्ष करतो.

हे असं करण्याऐवजी आहे त्या परिस्थितीत शाश्वत व्यवस्थेकडे नेण्याचं काम जर अॅक्टिव्ह तरूणांनी हाती घेतलं तर त्याला व्यापक धोरणांची जोड दिली तर येणार्या पिढीच्या चेहर्यावर हास्य फुलेल यात शंका नाही.

मराठवाड्यात प्रचलित उद्योग येणं अवघड आहे हे सर्वमान्य झाले आहे. अशा उद्योगाच्या मागे लागण्याचं काही कारण नाही. शेती हाच उद्योग पकडला तर जलसंवर्धन या एका गोष्टीवर कसून काम झालं तर स्वर्ग दूर नाही. गावागावात स्वच्छतेचं महत्व देताना सॉलीड वेस्ट मॅनेजमेंटवर जर काम झालं तर सोने पे सुहागा. मी जेव्हा म्हणालो की शासनाच्या चांगल्या योजनेची विरोधापायी खिल्ली उडवतो, स्वच्छ भारत त्याचं उत्तम उदाहरण आहे.

आणि या व्यतिरिक्त मग ह्युमन रिसोर्स ची सप्लाय चेन तयार करणे वैगेरे गोष्टी येतात.

आशिष, सौरभ, सूरज, मोहसीन विचार करा. काही हजार रूपयाची मदत करूच पण ते सोल्युशन नव्हे. जरा मोठ्या स्केलवर काम करू, मराठवाड्यातील बाहेर जाणारे लोंढे बंद करू. राजकीय विचारधारा बाजूला ठेवू. कुठल्याही राजकीय विचारशक्तीपेक्षा समाजाला वर काढण्याची इच्छा जास्त महत्वाची आहे. 

Sunday, 6 September 2015

ITI ते IIT

ITI ते IIT. अभियांत्रिकी शिक्षणाची एक मस्त चेन बांधली आहे शासनाने.

ITI मध्ये बेसिक शिक्षण आणि मुख्य म्हणजे ट्रेड शिकवला जातो. मशिनिस्ट, फिटर, इलेक्ट्रिशियन वैगेरे. उपकरणांची हाताळणी कशी करावी याचं शिक्षण दिलं जातं. पूर्वीच्या काळी जनरल पर्पज मशिन्स होत्या तेव्हा तर त्यांचं महत्व वादातीत होतं. आणि मग ITI ला NCTCVT ची जोड मिळाली आणि उत्तमोत्तम टेक्निशियन लोकांची फौज इंडस्ट्री ला मिळू लागली.

मग डिप्लोमा. प्रक्टिकल आणि थेअरी याचा चांगला संगम. म्हणजे तुम्हाला वर्कशॉप मध्ये बर्यापैकी काम करावं लागायचं आणि त्याबरोबर पुस्तकी अभ्यास पण आहे. थोडं कम्युनिकेशन स्किल्स. गणित, डिझाईन, drawing वैगेरे विषयावर हात साफ करावा लागतो.

पुढचा टप्पा graduation. इथे पण वर्क शॉप मध्ये काम असतच पण थेअरी वर जास्त भर. Management चे विविध विषय हाताळले जातात. डिप्लोमा ला जो syllabus असायचा त्याची पुढची पायरी.

आणि शेवटचं म्हणजे IIT. टेक्निकल competence चा अर्क. प्रत्येक विषयची जय्यत तयारी. रिसर्च बेस अभ्यास.

जग बदलत गेलं. नवनवीन तंत्र विकसित होत गेली. जनरल पर्पज मशिन्स जाऊन स्पेशल पर्पज, मग NC आणि मग CNC मशिन्स मार्केट मध्ये येऊ लागल्या. PLC, CNC आणि त्यांचे mechanical पार्ट शी कम्युनिकेशन हे कळीचे मुद्दे बनले. प्रोफ़िबस, इथरनेट हे परवलीचे शब्द बनले. Mechatronics ही एक नवीनच बरंच उदयाला आली.

mechanical साईड जर तुम्ही अभ्यासली तर अगदी हा सुर्य आणि हा जयद्रथ. लपवाछपी नाही. आवाज येतो, बेयारिंग बघा, गियर पहा वैगेरे. बदला गोष्ट चालू. इलेक्ट्रोनिक्स चं तसं नाही. डायोड, रेझिस्टर, capacitor मध्ये ती न दिसणारी उर्जा खेळत राहते आणि काही प्रॉब्लेम आला तर शोधणं मुश्किल. छुपे रुस्तुम, म्हणून इंडस्ट्री त  मेंटनंस डिपार्टमेंट चे प्रमुख इलेक्ट्रोनिक्स चे असतात. असो थोडं विषयांतर.

प्रॉब्लेम  असा झाला की तंत्र प्रगत होत गेली पण ITI, डिप्लोमा आणि इंजिनियरिंग चा अभ्यास मात्र काही बदलला नाही. IIT बद्दल मला माहित नाही त्यामुळे तिथे तारे तोडायला नको. आणि मग डिप्लोमा ची मुलं CNC मशिन्स चालवण्याच्या नावाखाली कंपनीत काम करू लागली. आणि ITI मुलं पडेल ती कामं करू लागली. सिस्टम ला अपडेटेड ठेवलं नाही तर त्याचे काय दुष्परिणाम होतात याचं हे उत्तम उदाहरण. माझ्याकडे डिप्लोमा झालेली मुलं मशीन चालवयाच काम मागायला येतात. मी त्यांना कम्पलसरी इंजिनियर चं काम देतो. The only reason is that they are not meant to run the machine.

ITI चालवणारे प्राचार्य आणि डिप्लोमाचे प्राचार्य यांना माझं नम्र आवाहान आहे की इंडस्ट्री त जाऊन भेटा. तिथे काय बदल घडले आहेत त्याचा अभ्यास करा, ते शासनाला कळवा, त्यांच्याकडून syllabus मध्ये बदल करवून घ्या. मी स्वत: ४ एक वर्षापूर्वी ४-५ ITI मध्ये गेलो आणि ट्रेनिंग ऑफर केली पण कुणीही इंटरेस्ट दाखवला नाही. balancing मशीन चालवण्यासाठी मी गेले वर्ष भर माणूस शोधतो आहे. मिळाला नाही.

जुन्या आणि नव्याची सांगड अशी घालायची. ITI ते IIT हि सुंदर साखळी आहे. तिच्या करिक्युलम मध्ये बदल करून, नाविन्याची जोड देऊन Make In इंडिया ला हातभार लावण्याची ही तुमची, माझी आणि शासनाची नैतिक जबाबदारी आहे.

Saturday, 5 September 2015

ते ४८ तास

हृषिकेश शी परवा फोन झाला. म्हणाला, तुम्ही काय करताय डॉक्टरकडे. छातीत दुखतय, पण तुम्ही तर स्ट्रेस घेणारे वाटत नाहीत. मी हसलो. चला कुणालातरी वाटलं की मी स्ट्रेस घेणारा नाही आहे ते.

मधे एका मैत्रिणींचा मेसेज आला, तुमचा प्रोफाईल पिक्चर किती हसरा आहे. तुम्ही चिडत वैगेरे नसालच ना. मी काहीच बोललो नाही.

कशा प्रतिमा बनतात ना!

कसं आहे ना, बाहेर माणूस इंजिनियर असतो, डॉक्टर असतो, सेल्समन असतो. पण ऑपरेशन टेबलवर तो फक्त पेशंट असतो.

ज्या अवस्थेत फक्त नवर्याला बघायचं, त्या अवस्थेत परपुरूषाला बघायचं. कुठुन येत असेल या केरळी नर्सेसकडे धैर्य. सेवाभावी वृत्ती बघून मनोमन नतमस्तक होतो.

लॉजीकने बघितलं तर असं व्हायला पाहिजे पण डॉक्टर तर असं करा म्हणतो. It's your call doc. My body is at your disposal.

कल्पिता, वयाने मोठी, कर्तृत्वाने मोठी. पण एका मेसेजवर आली भेटायला. चार शब्द बोलली. बरं वाटलं. या मोठ्या लोकांची बातच न्यारी.

मेडिक्लेम इन्शुरन्स कंपन्या पैसे रिलीज़ करायला किती नाटकं करतात. पॉलिसी गळ्यात मारताना मात्र हातापाया पडतात. हॉस्पीटल आणि मॉल काम झाल्यावर बाहेर पडण्यासाठी किती हर्डल्स तयार करतात.

पण कसं राहिलं म्हणजे असं परत घडणार नाही आयुष्यात. आई म्हणते आजकाल देवाकडे दुर्लक्ष करतोस मग त्यानेच तुला अद्दल घडवली.

वयाच्या ४७ व्या वर्षापर्यंत दोनदा अँजियोप्लास्टी होण्यासारखी माझी लाइफ़स्टाइल नाही खरं तर. पण झाली. परिस्थितीला शरण जाण्याशिवाय हातात काय उरलं आहे.






Friday, 4 September 2015

कृती

फेसबुकवर अनेक जण अत्यंत पोटतिडकिने काही प्रश्न मांडत असतात. शेतकर्यांचे प्रश्न, सामाजिक दाहक प्रश्न, राजकारण्यांची विविध प्रश्नांवरची अनास्था वैगेरे. अगदीच नावं लिहीत नाही, पण संवेदनशील आहेत हे सगळे. व्यासंग आहे, अभ्यास आहे आणि चाड आहे. पण ही मंडळी प्रश्न मांडताना त्यावरच्या उत्तराची responsibility मात्र घेत नाही. उदाहरणर्थ: शेतकरी सधन व्हायला हवा, हे वाक्य. बरोबर नक्कीच व्हायला हवा. कुणाला वाटणार नाही ते. शेवटी अन्नदाताच तो. आईचं जेवढं स्थान आपल्या आयुष्यात तितकंच राष्ट्राच्या बाबतीत शेतकर्याचं. तो श्रीमंत न व्हावा, सधन न व्हावा असं वाटणारा एक ही जण शोधून सापडणार नाही. पण हे कसं व्हावं. यावर कुणी चर्चा करत नाही. कारण मग या उत्तरात कटुता येते. शेती उद्योगाला उद्योग म्हणून काय काय करावे लागेल याचा उहापोह व्हावा. बरं माझ्यासारख्या पुर्ण आयुष्य नागरसंस्कृतीत गेलेल्या, भारत हा कृषीप्रधान देश आहे यापलीकडे शेतीचं काहीही ज्ञान नसलेल्या, पण शेतउद्योग यातल्या उद्योग प्रकारावर थोडी माहिती असलेल्या माणसाने चार शब्द लिहीले की त्यावर शेतकरी बांधव तुटुन पडतात. म्हणजे आमचे प्रॉब्लेम हे आमचे प्रॉब्लेम, त्यात तुम्ही काही बोलायचं नाही कारण तुम्हाला त्यातलं काही कळत नाही अशी भूमिका घेतली की लोकं गप्प बसतात. गेले कित्येक वर्षाचा इतिहास सांगतो आहे की ज्या पद्धतीने शेतउद्योग हा विषय हाताळला जातो त्याने शेतकरी आज काय परिस्थितीला येऊन पोहोचला आहे. परवा इंटरव्ह्यू घेतले. ५० एक इंजिनियर पोरांपैकी किमान ३० मुलं शेतकर्याची होती. मी विचारलं त्यांना, शेती का नको? त्यांनी जी उत्तरं दिली ती लॉजीकल होती. पण त्यांनी जे सांगितलं त्यावर अभ्यास करण्यासाठी आजचे फेसबुकीय शेतीविषयक अभ्यासकांकडे काही ठोस उपाय आहेत का? दुर्दैवाने त्याचं उत्तर नाही असं आहे. असो.

विषय मनात आला तो आजच्या लोकसत्तातील मुरूगानंदम वरील लेखावरून. आधी वाचलं त्यांच्याबद्दल. सॅनिटरी नॅपकिन वापरण्याची चळवळ कशी उभी केली याची अत्यंत प्रेरणादायी कथा उलगडते. स्त्रिया स्वच्छतेबद्दल उदासीन आहेत इतकं चार वेळा लिहून मुरूगानंदम गप्प बसू शकले असते. पण नाही, त्यांनी प्रश्नाचा मागोवा घेतला आणि एक सशक्त सोल्युशन देशाला दिलं.

वैयक्तिकरित्या असे प्रश्न आणि सोल्युशन्स दैनंदिन जीवनात मांडले पण ज्यांच्यासमोर मांडले त्यांनी त्याला एकतर विरोध केला नाहीतर दुर्लक्ष. त्याला मोडून पुढे रेटण्याची अक्कल आणि धारिष्ट्य माझ्यात नव्हतं, म्हणून मी कोषात जाऊन बसलो. फेसबुकच्या पानांवर झळकत राहिलो. मुरुगानंदम सारखी लोकं मात्र वर्तमानपत्रावर झळकतात.

फेसबुकवरून वर्तमानपत्रात झळकण्याचा मार्ग खडतर आहे खरा.